कायनाइट : खनिज. स्फटिक त्रिनताक्ष समूहाचे, सामान्यतः लांब पात्यासारखे, क्वचित टोकदार, बरेचसे नम्य (लवचिक) असल्यामुळे ते बहुधा वाकलेले किंवा पिळवटलेले असतात. स्फिटिकांचे पुंज किंवा स्तंभाकार ते काहीशा तंतुमय राशीही आढळतात. पाटन : (100) उत्कृष्ट, (010) अस्पष्ट, (001) ला समांतर विभाजनतलेही असतात [ → पाटन स्फटिकविज्ञान]. स्फटिकाच्या लांबीला समांतर असलेल्या भागाची कठिनता पाच असून त्याला काटकोनात असणार्‍या भागाची सात असते. वि. गु. ३⋅५५ – ३⋅६६. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. दुधी काचेसारखे पारभासी ते पारदर्शक. रंग पांढरा, निळा कधीकधी करडा, हिरवा किंवा काळा. स्फटिकाच्या मध्याकडे रंग गडद होत जातो. रंगात अनियमित चट्टेपट्टेही असतात. कस रंगहीन. रा. सं. Al2SiO5. मुख्यतः पट्टिताश्मांत व अभ्रकी सुभाजांत कधीकधी त्यांना छेदणार्‍या क्वॉर्ट्‌झ शिरांत व पेग्मटाइट या खडकांतही गौण खनिज म्हणून आढळते. ते बहुधा गार्नेटाच्या, कधी-कधी स्टॉरोलाइटाच्या किंवा कुरुविंदाच्या जोडीने आढळते. ज्यांच्यात विपुल ॲल्युमिनियमयुक्त खनिजे आहेत, अशा खडकांच्या मध्यम प्रतीच्या प्रादेशिक रूपांतरणाने कायनाइट तयार होते. भरतात मुख्यतः सिंगभूम (बिहार) जिल्ह्यात सापडते. ओरिसातही खारसावन येथे व इतर ठिकाणी कायनाइट सापडले आहे. उच्चतापसहतेमुळे (उच्च तापमान सहन करण्याच्या गुणधर्मामुळे) कायनाइटाला मृत्तिका व काच उद्योगात महत्त्व प्राप्त झाले आहे. ठिणगी गुडदी (पेट्रोल एंजिनात इंधन पेटविण्यासाठी त्यात विद्युत् ठिणगी पाडणारे साधन, स्पार्क प्लग) व इतर उच्चतापसह पोर्सलीन वस्तू तयार करण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. भारतात कायनाइटापासून वर्षाला ८०,००० टन उच्च-तापसह पदार्थ तयार होतात. केन्या, रशिया, फ्रान्स इ. देशांतही कायनाइट सापडते. कायनाइट १,२००से. पेक्षा अधिक तापविल्यास उच्चतापसह मुलाइट (Al6Si2O13) व सिलिका (SiO2) यांचे मिश्रण तयार होते. नाव-रंगावरून निळा या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून पडले आहे. बदलत्या कठिनतेमुळे याला डायस्थीन हेही नाव आहे.

ठाकूर, अ.ना.