बोरॅसाइट : (श्टासफुर्टाइट). खनिज. स्फटिक बाहेरून घनीय दिसतात (पहा आकृती) मात्र आतील संरचना समचतुर्भुजी असते. स्फटिक २६५० से.पेक्षा जास्त तापविल्यास आतील संरचनाही घनीय होते [⟶ स्फटिकविज्ञान]. हे संपुंजित स्वरूपातही आढळते व सामान्यपणे या प्रकाराला जर्मनीतील श्टासफुर्ट या गावावरून श्टासफुर्टाइट म्हणतात. ⇨पाटन नसते. भंजन शंखाभ ते खडबडीत [⟶ खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ७-७.५ वि. गु. रंगहीन स्फटिकांचे २.९-२.९७

बोरॅसाइटाचे

हिरवट व लोहयुक्त स्फटिकांचे २.९७ – ३.१०. बोरॅसाइट रंगहीन वा पांढरे, कधीकधी करडसर पिवळट, हिरवट, क्वचित गुलाबी. कस पांढरा. चमक काचेसारखी ते हिऱ्यासारखी. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. याच्या स्फटिकांत तापविद्युतीय (तापमानातील फरकामुळे स्फटिकाच्या पृष्ठभागी विद्युत्‍ भार निर्माण होण्याचा) आणि दाबविद्युतीय (दाबासारख्या यांत्रिक प्रेरणेमुळे स्फटिकांच्या पृष्ठभागी विद्युत्‍ भार निर्माण होण्याचा) हे गुणधर्म चांगले तीव्रपणे आढळतात. रा. सं. Mg3B7O13Cl. यामध्ये मॅग्नेशियमाच्या जागी कधीकधी लोह व क्वचित मँगॅनीज आलेले असते. बहुधा हे लवणयुक्त पाण्याच्या बाष्पीभवनाने बनते. हॅलाइट, जिप्सम व ॲनहायड्राइट यांच्या निक्षेपांमध्ये (गाळात) व सागरी पोटॅशयुक्त निक्षेपांत याचे स्फटिक विखुरलेले वा जडवलेले आढळतात. लवणी घुमटात याच्या गाठी आढळतात. (उदा., श्टासफुर्ट). हे जर्मनी, इंग्लंड, तुर्कस्तान, फ्रान्स, अमेरिका इ. प्रदेशांत आढळते. श्टासफुर्ट येथे बोरॉन हे मूलद्रव्य मिळविण्यासाठी बोरॅसाइट काढले जाते. हे मॅग्नेशियमाचे नैसर्गिक बोरेट आहे व त्याच्या या रासायनिक संघटनावरून त्याला बोरॅसाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.