सैंधव : खारट पाण्याच्या बाष्पीभवनाद्वारे बनलेले हे खनिजरूप नैसर्गिक मीठ असल्याने त्याला बाष्पजनित खनिज म्हणतात. खडकात आढळते म्हणून त्याला रॉक सॉल्ट म्हणतात तर मीठ अर्थाच्या ग्रीक शब्दावरून त्याचे हॅलाइट हे नाव आले आहे. घनाकार स्फटिक, कणमय स्फटिकांचे पुंज, कणमय वा घट्ट रूपांतही ते आढळते. त्याचे स्फटिक घनाकार, मपाटन : (००१) परिपूर्ण कठिनता २·५ वि. गु. २·१६ पारदर्शक ते दुधीकाचेप्रमाणे पारभासी चमक काचेसारखी सामान्यपणे रंगहीन वा पांढरे मात्र अशुद्धीमुळे त्याला पिवळसर, तांबूस, नारिंगी, उदी इ. छटा प्राप्त होतात. किरणोत्सर्गामुळे सैंधव निळसर वा जांभळट होते. रा. सं. छरउश्र. खारट चव व पाण्यात सहजपणे विरघळण्याची क्षमता या गुणधर्मांमुळे ते ओळखता येते. ते गलनक्षम ( वितळणारे) असून सोडियमामुळे त्याची गर्द पिवळी ज्योत मिळते.
सैंधवाचे थर गाळाच्या खडकांच्या थरांमध्ये आढळतात व त्यांची जाडी काही मी. ते ३०० मी. पर्यंत असते. अंशतः बंदिस्त ठिकाणी खारट पाण्याचे बाष्पीभवन होत जाऊन सैंधवाचे थर तयार होतात. त्यांवर गाळाचे थर साचतात. असे थर आलटून पालटून साचत जाऊन दाबाखाली सैंधव तयार होते. या थरांबरोबर सामान्यतः चुनखडक, डोलोमाइट व शेल या खडकांचे थर आढळतात. सैंधवाबरोबर सामान्यपणे जिप्सम, सिल्व्हाइट, ॲनहायड्राइट, कॅल्साइट, मृत्तिका व वाळू ही द्रव्ये आढळतात. संप्लवनाद्वारे ( तापविल्यास द्रवरूप न होता घन पदार्थाची थेट वाफ होण्याच्या क्रियेद्वारे) बनलेले सैंधव ज्वालामुखी प्रदेशांत आढळते, तर शुष्क प्रदेशात सैंधव लाहीच्या रूपात आढळते. लवणी झऱ्यांलगतही बाष्पीभवनाद्वारे हे तयार होऊ शकते.
सैंधव जगभर अनेक ठिकाणी आढळते. मात्र त्याचे निम्म्याहून अधिक उत्पादन अमेरिकेत होते. शिवाय चीन, रशिया, जर्मनी, इंडोनेशिया, कॅनडा, मेक्सिको, फ्रान्स, इटली, ब्राझील, स्पेन, रूमानिया, ऑस्ट्रिया, झेकोस्लोव्हाकिया, पोलंड व ब्रिटन येथेही त्याचे उत्पादन होते. भारतात कच्छच्या रणात तसेच हिमाचल प्रदेशातील मंडी भागात त्याचे बरेच जाड थर चुनखडक, शेल व वालुकाश्म यांच्या पट्ट्यात असून तेथे काही ठिकाणी स्फटिकी सैंधवही आढळते. राजस्थानात सांभर सरोवराच्या तळाशी त्याची निर्मिती होत असल्याचे आढळले आहे.
रासायनिक उद्योगांत क्लोरीन वायू, हायड्रोक्लोरिक अम्ल व सोडियम धातू तयार करण्यासाठी कच्चा माल म्हणून मुख्यतः सैंधव वापरतात. वैरण, खते व तणनाशक म्हणून सैंधव शेती उद्योगात वापरतात. अन्नप्रक्रिया उद्योगांत हे परिरक्षक म्हणून व मुरविण्यासाठी वापरतात. उदा., लोणी, चीज, मासे व मांस यांच्या परिरक्षणासाठी त्याचा उपयोग होतो. सैंधव प्रशीतक द्रव्य म्हणून आइसक्रीम गोठविण्यासाठी व ते आवेष्टित करण्यासाठी वापरतात. सोडा ॲश, खाण्याचा व दाहक ( कॉस्टिक) सोडा, साल सोडा व इतर सुधारित अल्कली उत्पादने बनविण्यासाठी सैंधवाचा वापर होतो. ही उत्पादने कापड, धुलाई, लाकूड, कातडी कमाविणे इ. उद्योगांत वापरतात. खनिज तेल उद्योगाच्या दृष्टीनेही सैंधव महत्त्वाचे आहे. कारण कधीकधी सैंधवाच्या थरांचे विरूपण होऊन ते वरील गाळाच्या थरांत घुसतात. यामुळे सैंधवी वा लवणी घुमट बनतात. या घुमटांबरोबर पुष्कळदा हायड्रोकार्बने (उदा., खनिज तेल व नैसर्गिक वायू) आढळतात. अशा लवणी घुमटांच्या समन्वेषणातून खनिज तेल व नैसर्गिक वायू यांचे साठे सापडू शकतात. अशा प्रकारे असंख्य उपयोग असलेले सैंधव मानवी जीवनातील महत्त्वाचे खनिज आहे. तसेच मानवी आहारात व औषधांत सरळ उपयोग होणारे ते एकमेव खनिज आहे.
ठाकूर, अ. ना.