विंध्य संघ : भारतातील खडकांच्या एका गटाचे नाव. वालुकाश्म, चुनखडक व शेल या खडकांचा हा स्तरित शैलसमूह आहे. विंध्य पर्वतरांग या खडकांची बनलेली असून तिच्यावरून संघाचे हे नाव पडले आहे. टी. ओल्डॅम यांनी बुंदेलखंड व माळवा येथील वालुकाश्माच्या मोठ्या शैलसमूहाकरिता ही संज्ञा सर्वप्रथम वापरली होती. विंध्य खडकांची एकूण जाडी सु, ४,३०० मी. आहे. बिहार, राजस्थान व मध्य प्रदेश या भागांतील चंद्रकोरीसारख्या अर्धगोलाकार विस्तृत क्षेत्रात (सु. एक लाख चौ.किमी.) या संघाचे खडक पसरलेले असून यांचा सु. ७५,००० चौ.किमी. भाग दक्षिण ट्रॅप खडकांखाली झाकला गेला असल्याचा अंदाज आहे. भारतात यापेक्षा आर्कीयन पट्टिताश्म व दक्षिण ट्रॅप या शैलसमूहांचाच विस्तार मोठा आहे. ससराम व रोहतास (बिहार) पासून अरवलीतील चितोडगढ पर्यंत याचे खडक पसरलेले असून बुंदेलखंडाच्या दक्षिणेसही ते आहेत. मात्र बुंदेलखंडाच्या मधल्या भागात ते आढळले नाहीत. याचा जास्तीत जास्त रुंद दृश्यांश ( उघडा पडलेला भाग) आग्रा ते नीमच दरम्यान आढळला आहे. विंध्य संघाचे वय स्थूलपणे काढण्यात आले असून त्याचा भारतातील पुराण गणात समावेश करतात [⟶ पुराण महाकल्प व गण].

खडक व संरचना : वालुकाश्म, चुनखडक व शेल हे यातील प्रमुख खडक असून त्यांच्या पुढील दोन सुस्पष्ट संलक्षणी (संघटन वा दिसणे या दृष्टीने भिन्न असणारे शैलसमूहाचे भाग) आढळतात : (१) खालच्या भागातील सागरी, चूर्णीय (कॅल्शियम कार्बोनेटयुक्त) व मृण्मय खडकांची संलक्षणी आणि (२) वरच्या भागातील नादेय अथवा नदीमुखीय निक्षेपणाने (खचण्याने) बनलेली जवळजवळ वालुकामय खडकांची संलक्षणी. या संघाच्या थरांमध्ये थोडेच विस्थापन झालेले आहे म्हणजे या खडकांची मूळची क्षितिजसमांतर स्थिती सर्वत्र जवळजवळ तशीच टिकून राहिलेली आढळते. तसेच त्यांच्या गुणवैशिष्ट्यांतही अल्पसेच बदल झालेले दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या प्राचीन असलेल्या या खडकांचे रूपांतरण झाले असेल, असे वाटण स्वाभाविक आहे मात्र फक्त घट्ट व कठीण बनलेल्या या खडकांत रूपांतरणाचे कोठलेही लक्षण वा पुरावा आढळत नाही. उदा., शेल खडकात पाटन (जवळजवळ असणाऱ्या समांतर पृष्ठांना अनुसरून फुटण्याची प्रवृत्ती) निर्माण झालेली नाही तसेच चुनखडकात अल्पसेही स्फटिकीभवन झालेले नाही. अरवली पर्वताच्या वायव्य कडेला असणाऱ्या थरांमध्ये मात्र संरचनात्मक विक्षोभ ठळकपणे दिसतो. या भागात विंध्य खडक साचल्यावर भूकवचाच्या हालचाली झाल्या व त्यामुळे यांच्या थरांत वलीभवन (घड्या पडण्याची क्रिया) वा उपरिप्रणोदन [कमी नती असलेले प्रणोद विभंग निर्माण होण्याची क्रिया ⟶ विभंग, खडकांतील] झालेले आढळते. येथील खडकांची खनिजरचनाही बरीच बदलली आहे. उदा., सुच्छेद्य खडकापासून (फ्रीस्टोनपासून) क्वॉर्ट्‌झाइट खडक बनले आहेत [⟶ रूपांतरित खडक]. महादेशजनक (भूरूपे निर्मिणाऱ्या) उत्थानामुळे हे गाळ वर उचलेले जाऊन त्यांचा खंडीय भाग बनला. द्वीपकल्पाच्या इतिहासातील ही शेवटची मोठी भूवैज्ञानिक हालचाल आहे. यानंतर इतकी मोठी हालचाल द्वीपकल्पात झालेली नाही.

विंध्य संघातील वालुकाश्माचे सर्व थर उथळ पाण्यात साचल्याचे पुरावे त्यांच्यात सर्वत्र आढळतात. उदा., पृष्ठभागी तरंगचिन्हे (पाण्याच्या क्रियेने बनलेली, एकाआड एक उंचवटे व खळगे असणारी तरंगाकार रचना) व आतप-भेगा (पृष्ठभागानजिकच्या वातावरणीय परिस्थितीच्या विशेषेकरून उन्हाच्या परिणामाने गाळवट वा मृत्तिका सुकून पृष्ठभागी पडलेल्या वेड्यावाकड्या भेगा) पुनःपुन्हा आढळतात. तसेच सहज दिसणारे प्रवाहस्तरण (पाण्याच्या क्रियेने बनणारी आडवी स्तररचना) व तिरपे (कर्ण) पत्रण (पटलयुक्त रचना) आढळते. यांवरून हे थर नदी व नदीमुखालगतच्या खळखळणाऱ्या उथळ पाण्यात आणि दिशा व गती सतत बदलत असणाऱ्या प्रवाहात साचल्याचे दिसते.

गाळाचे इतके जाड थर कसे साचले असावेत, हे ई. डब्ल्यू. ब्रेडेनबर्ग यांनी पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. संमुखनतीयुक्त द्रोणी तयार होत असतानाच तिच्यात हे खडक साचत गेले. यामुळे तिच्या कडेचे काही अधिक जुने खडक उचलले जाऊन त्यांची झीज होत राहिली आणि त्याच वेळी द्रोणीच्या मध्याशी अखंड अवसादन होत राहिले. परिणामी तळ खाली जात राहून गाळ साचत गेला व थरांची जाडी वाढत राहिली.

वर्गीकरण : पूर्व (आधीचा) व उत्तर (नंतरचा) असे विंध्य संघाचे दोन विभाग करतात. मात्र या दोन विभागांतील खडकांच्या थरांच्या जाडीत खूप तफावत आहे. म्हणून काहींच्या मते सोन खोऱ्यातील विंध्य संघाचे जसे सेम्री, कैमूर, रेवा व भांडार हे चार भाग पाडण्यात येतात, तसे संपूर्ण विंध्य संघाचे चार विभाग करून पूर्व व उत्तर विभाग हे वर्गीकरण टाळावे. मात्र बहुसंख्य तज्ञांना पूर्व व उत्तर विंध्य हे वर्गीकरण योग्य वाटते. कारण या  दोन विभागांदरम्यान कोठे कोठे सुस्पष्ट विसंगती (लगतचे दोन थर साचण्याचे काळ वेगवेगळे असून गाळ साचण्याच्या अभावी किंवा क्षरणाच्या-झीज होण्याच्या काळामुळे-असा खंड पडण्याची स्थिती) आढळते. तसेच या विभागांतील खडकांमध्ये शिलावर्णनाच्या (डोळ्यांनी अथवा कमी क्षमतेच्या विवर्धक भिंगाने पाहून आणि रंग, संरचना, खनिज घटक व कणांचे आकारमान यांच्या आधारे ठरविलेल्या खडकाच्या भौतिक गुणधर्माच्या वर्णनाच्या) दृष्टीने तफावत असल्याने असे दोन विभाग करणे उचित ठरते म्हणजे स्थूलपणे पूर्व विभाग मुख्यत्वे चूर्णीय तर उत्तर विभाग मुख्यतः वालुकामय आहे. शिवाय पूर्व व उत्तर विंध्य या संज्ञा दीर्घकाळापासून वापरात आहेत म्हणून त्या ठेवाव्यात असे म्हटले जाते. पूर्व विंध्य विभाग सोन खोऱ्यात चांगला विकसित झाला असून त्यात काही प्रमाणात विक्षोभ झालेला (घड्या, विभंग इ. पडलेले) आढळतो. उलट उत्तर विंध्य विभागातील खडकांचे थर क्षुब्ध न होता क्षितिजसमांतर स्थितीत राहिलेले आढळतात. उत्तर विंध्य खडकांचे किरणोत्सर्गी (भेदक कण वा किरण बाहेर टाकण्याच्या गुणधर्माचा वापर करणाऱ्या) पद्धतीने काढलेले वय सु. ६० कोटी वर्षे आले आहे. विंध्य संघाचे हे वर्गीकरण कोष्टकात दाखविले आहे.

विंध्य संघाचे वर्गीकरण

विभाग 

माला 

जाडी (मी.) 

समुदाय वा टप्पे 

 

 

 

  

उ 

त्त 

 

विं 

ध्य 

भांडर 

सु. ४५० 

उत्तर भांडर वालुकाश्म 

सिर्बू शेल 

पूर्व भांडर वालुकाश्म 

भांडार चुनखडक 

हिरेयुक्त पिंडाश्म थर 

रेवा 

सु. १५० – ३०० 

उत्तर रेवा वालुकाश्म 

झिरी शेल 

पूर्व रेवा वालुकाश्म 

पन्ना शेल 

हिरेयुक्त पिंडाश्म थर 

कैमूर 

सु. १५० – २०० 

उत्तर कैमूर वालुकाश्म 

कैमूर पिंडाश्म 

विजयगड शेल 

पूर्व कैमूर वालुकाश्म 

सुकेत शेल 

विसंगती

पूर्व  

 

 

विंध्य 

 

सेम्री, कुर्नुल, भीमा,                              

मालानी (रायोलाइट व टफ) 

मी. या माला तसेच जालोर व सिवाना ग्रॅनाइट

सु. ४५० – १३००

 


पूर्व विंध्य : सोन खोरे (छत्तीसगढ), बुंदेलखंड, साउगोर जिल्हा, धार वनक्षेत्र, उत्तर भोपाळ, चितोड झालरा-पाटन क्षेत्र व पूर्व राजस्थान येथे हे खडक आढळतात. तसेच या काळातील अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असणाऱ्या) अग्निज खडकांच्या भित्तीही आहेत. विंध्य पर्वताच्या तुटलेल्या कड्यांच्या विस्तृत मालिकेत, विशेषतः माळवा व बुंदेलखंड या नमुनेदार क्षेत्रात, या खडकांचा चांगला विकास झालेला आढळतो. शिवाय सोन व भीमा खोऱ्यांत हा विभाग चांगल्या रीतीने पाहतो येतो. जे.बी. ऑडेन यांनी सोन खोऱ्यातील विंध्य खडकांचे तपशीलवार अध्ययन केले आहे. या विभागाची जाडी सु. ९०० मी. असून चुनखडक, शेल व वालुकाश्म हे यातील महत्त्वाचे खडक आहेत. शिवाय यात पोर्सेलानाइट (सिलिकाभूत व टफ- घट्ट झालेली ज्वालामुखी राख) व ग्लॉकोनाइट वालुकाश्म यांचेही थर अधूनमधून आढळतात. सेम्री मालेच्या खडकात डोलोमाइट खडक घुसलेले तसेच पिंडाश्म, अग्निदलिक कोणाश्म व गोट्यांचा थरही आढळतो. यावरून तेव्हाची भौतिक परिस्थिती अस्थिर होती हे समजते. उलट संपूर्ण उत्तर विंध्य विभाग स्थिर राहिल्याचे दिसते. सेम्री मालेतील (सोन खोरे, करौली संस्थान) रोहतास या सर्वांत वरच्या समुदायात सिमेंटला उपयुक्त चुनखडक व शेल आढळतात. सुकेत शेल व करौलीतील तिरोहान चुनखडक सेम्री मालेशी तुल्य असून सुकेत शेलमध्ये चकत्यांसारखे पिंड आढळतात. या चकत्या म्हणजे आदिम ब्रॅकिओपॉड प्राण्यांचे वा शैवलांचे जीवाश्म (शिळाभूत झालेले अवशेष) असावेत, असे मानतात. भीमा मालेत क्वॉर्ट्‌झाइट व खरीचे दगड असून वरच्या भागात शेल व विविध रंगी चुनखडक आढळतात. कुर्नूल जिल्ह्यात कडप्पा संघावर विसंगतपणे वसलेले कुर्नूल मालेचे दृश्यांश (जाडी सु. ३७५ मी.) आहेत. या मालेच्या तळाशी वालुकाश्मांचा गट असून त्याच्या काही भागांत हिरे असलेले बानागनापल्ली थर आहेत. धार वनक्षेत्रात पूर्व विंध्य खडक चांगले उघडे पडलेले आहेत. गोदावरी खोऱ्यातील सुल्लवाई वालुकाश्म म्हणजे पूर्व विंध्य कालीन वालुकाश्म व क्वार्ट्‌झाइट यांचा गट आहे. तो पाखाल क्वार्ट्‌झाइटावर विसंगतपणे वसलेला आहे. हैदराबाद व लगतच्या क्षेत्रातील पाळानाड माला म्हणजे शेल, चुनखडक व क्वार्ट्‌झाइट या खडकांचे जाड थर आहेत. या सर्व ठिकाणी स्थानपरत्वे खडकांच्या प्रकारात भिन्नता आढळते. मात्र हे सर्व खडक चूर्णीय किंवा मृण्मय आहेत. काही चुनखडकांत संधितांसारखी (कांद्यातील पापुद्यांसारखी) संरचना आढळते. या संकेंद्री (एकाच मध्याभोवतीच्या) थरांचे रंग वेगवेगळे असतात. यामुळे पॉलिश केल्यावर खडक सुंदर संगमरवरासारखा दिसतो.

राजस्थानातील विंध्य खडक : मुख्यतः अरवली पर्वताच्या पूर्व भागात व पश्चिमेकडील वाळवंटात विंध्य खडकांचे सुटे दृश्यांश आढळतात. पश्चिम राजस्थानातील विंध्य खडक लक्षणीय आहेत. या संघाशी तुल्य असणाऱ्या संलक्षणीच्या खडकांत पुष्कळ बदल झालेले असून विपुल अग्निदलिक द्रव्य असलेला यातील रायोलाइटी लाव्ह्यांचा गट अरवली सुभाजांवर विसंगतपणे वसलेला आहे. जिल्ह्याच्या नावावरून या संलक्षणीला मालानी माला (रायोलाइट) म्हणतात. येथील रायोलाइटांचे वय सु. ७८.३-६० कोटी वर्षे काढले आहे व त्यांनी जोधपूर भोवतालचा काही हजार चौ.किमी. भाग व्यापला आहे. हे रायोलाइट अंशतः काचमय, पुष्कळदा विकाचीकृत (काचेचे स्फटिकीभवन झालेले) व बदामीकुहरयुक्त असून त्यांच्यात टफ व ज्वालामुखी कोणाश्माचे थर अधूनमधून आढळतात. रायोलाइटातील सिलिकेचे प्रमाण बरेच भिन्न आढळते. विकाचीभवनामुळे बहुतेक खडकांतील काचमय आधारक (ज्यात मोठे कण जडवले गेलेले असतात असे सलगपणे आढळणारे सूक्ष्मकणी द्रव्य) पूर्णपणे नाहीसा झालेला असतो. अरवलीपासून बऱ्याच दूरच्या किराणा टेकड्यांत (पंजाब) मालानी मालेचा दृश्यांश आढळला आहे. आग्नेय मेवाडात विंध्य संघाचे चुनखडक, शेल व वालुकाश्म असून त्यांच्याबरोबर मालानी लाव्हा, तसेच सेम्री मालेचे कोणाश्म व पिंडाश्मही आढळतात.

या लाव्ह्यांशी निगडित ग्रॅनाइटाचे स्कंध (पृष्ठभागाच खाली काही अंतरावर बनलेले मोठे, ओबडधोबड पुंज) राजस्थानातील काही भागांत त्यांच्यावरील खडक झिजून गेल्याने उघडे पडलेले आहेत. त्यांमध्ये हॉर्नब्लेंड-कृष्णाभ्रकयुक्त ग्रॅनाइट (जालोर ग्रॅनाइट) व हॉर्नब्लेंडयुक्त ग्रॅनाइट (सिवाना ग्रॅनाइट) हे प्रकार आहेत. सिवाना ग्रॅनाइटाचा स्कंध मालानी माला व अरवली सुभाजा या दोन्हींत घुसलेला असून समुद्रसपाटीपासून सु. ९०० मी.पर्यंत तो वर आलेला आहे.

विंध्य युगाबरोबर राजस्थानच्या भूवैज्ञानिक इतिहासातील महत्त्वाचा टप्पा संपला. पूर्व राजस्थानात या काळानंतरचे काही खडक फक्त पृथक्स्थित (विखुरलेल्या) रूपात आढळत असून ते बहुधा वाळूखाली झाकले गेले आहेत. राजस्थानची भूसांरचनिक (भूकवचाच्या प्रादेशिक संरचनांशी व विरूपणाशी निगडित) संरचना ही हिमालयाची दिशा निश्चित होण्याच्या संदर्भात महत्त्वाची ठरली. कारण तिबेट व भारतीय द्वीपकल्प यांच्यातील टेथिस समुद्रातील गाळ दाबले जाताना भारतीय अग्रभूमीचा पंजाब हा भाग पाचरीसारखा ठरला आणि या पाचरीची संरचना राजस्थानच्या भूसांरचनिक संरचनेमुळे निश्चित झाली होती. पुराण युगातच राजस्थानातील महत्त्वाचे गिरिजनन (पर्वत निर्माण होण्याची क्रिया) व अग्निज क्रिया घडून गेली होती. हे गिरीजनन स्थानिक स्वरूपाचे असल्याने त्याच्या मर्यादेबाहेरच्या विंध्य खडकांसारख्या प्राचीन खडकांवरही रूपांतरणसारखा त्याचा परिणाम झाला नाही. यानंतर राजस्थानात मोठी भूसांरचनिक उपलथापालथ झाली नाही.

उत्तर विंध्य : याचे नमुनेदार क्षेत्र नर्मदेच्या उत्तरेस (कटनी-अलाहाबाद) असून त्यातील तांबड्या व पिवळसर वालुकाश्मांचे भांडर, रेवा व कैमूर असे तीन उपविभाग (माला) करतात. भांडर व रेवा तसेच रेवा व कैमूर या मालांच्या दरम्यान (पिंडाश्मांचे) हिरेयुक्त थर आहेत. अरवलीच्या पूर्व सीमेवर झालरा-पाटन ते भरतपूर दरम्यान विंध्य संघाचे क्षेत्र आहे. या काळात हा भाग जमीन (खंडीय) होता व तेथे शुष्क परिस्थिती होती. वालुकाश्मातील पूर्ण गोलाकार कण, वालुकाश्माचा तांबडा (वा तपकिरी) रंग आणि भांडर शेलमधील विखुरलेले जिप्सम हे या स्थितीचे निदर्शक आहेत.

उत्तर विंध्य संघाचे खडक आणि अधिक जुने अरवली खडक हे अरवलीच्या ईशान्य भागात एकमेकांलगत आलेले आहेत. त्या ठिकाणी मोठा प्रक्षेप (उभ्या दिशेतील विस्थापन-सरकणे) असणारा अतिशय लांब विभंग असल्याचे उघड झाले आहे. या विभंगामुळे विक्षुब्ध न झालेले जवळजवळ क्षितिजसमांतर असे विंध्य संघातील वालुकाश्म (भांडर माला) आणि अतिशय घड्या पडलेले व पर्णनयुक्त (समांतर पातळ पटलयुक्त संरचना असलेले) सुभाजा खडक एकमेकांच्या संपर्कात आलेले आहेत. स्थूलपणे चंबळेच्या प्रवाहाला समांतर व आग्ऱ्यापर्यंत उत्तरेस गेलेल्या या महान विभंगाचा प्रक्षेप सु. १५०० मी. व लांबी सु. १५० किमी. आहे. हा विभंग म्हणजे साधे विभंगपृष्ठ अथवा स्थानभ्रंश नाही, तर अधिक नवीन विंध्य वालुकाश्म साचण्याची स्थूल सीमाच म्हणता येईल. यामध्ये नंतर विभंगांमुळे व प्रणोदनामुळे बदल झाले व याला सीमावर्ती विभंगाचे स्वरूप प्राप्त झाले आणि या विभंग नव्या व जुन्या शेलसमूहांच्या संगमाचे स्थान सूचित करतो.


पूर्व व उत्तर विंध्य संघाच्या विभागणीचा अर्थ : या दोन विभागांत विसंगतीने सीमारेषा आखली गेली आहे. ही विसंगती उत्तरेस फार स्पष्ट आहे मात्र मेवाड, चितोड व सोन खोरे या दक्षिणेकडील भागांत ती पुसट होत गेली आहे. याचा अर्थ पूर्व विंध्य गाळ साचल्यावर अचानकपणे भूकवचाच्या हालचाली झाल्या व हे गाळ उत्तर अरवली काळातील क्षेत्रात उचलले गेले, अशा रीतीने त्यांच्यावर गाळ साचणे थांबले. काही काळानंतर हा भाग पुन्हा पाण्याखाली जाऊन त्यावर गाळ साचू लागला. अर्थात या काळातील परिस्थिती आधीसारखी नव्हती. शिवाय जेथून डबर व गाळ येतात ती त्यांची मूळ स्थाने म्हणजे पर्वत-पठारे यांच्यातही पूर्णतया बदल झाला. विशिष्ट क्षेत्रातील भौतिक बदलांबरोबर होणाऱ्या व गाळ साचण्यात खंड पाडणाऱ्या भूकवचातील अशा हालचालींचा व त्यामुळे उद्भवणाऱ्या विसंगतीचा उपयोग करून खडकांचे स्तरवैज्ञानिक विभाग पाडतात. गाळ साचण्याच्या क्रियेत पडणाऱ्या अशा लहान स्थानिक खंडांचा उपयोग माला, समुदाय इ. उपविभाग करण्यासाठी होतो तर अधिक तीव्र स्वरूपाच्या अशा बदलांचा उपयोग दोन संघांतील सीमारेषा ठरविण्यासाठी होतो. या तीव्र बदलांच्या बरोबर समुद्र व जमीन (खंड) यांच्या क्षेत्रांत सुस्पष्ट असे बदल होतात. परिणामी येथील जीवांचे दोन खंडांतर्गत व दोन समुद्रांतर्गत स्थलांतर होऊ शकते.

विंध्य वालुकाश्म : वालुकाश्म हे या संघातील सर्वात सामान्यपणे आढळणारे खडक आहेत. या वालुकाश्मातील सूक्ष्मकण एकसारख्या आकारमानाचे असून विस्तृत क्षेत्रात खडकांचे संघटन व पोत एकसारखा आढळतो. यांच्यात तांबडा, गुलाबी, तपकिरी, पिवळा, पांढरा, सायरंगी, करडा, जांभळा इ. रंगाच्या निरनिराळ्या छटांचे सुंदर खडक आढळतात. शिवाय ठिपकेदार व चट्टेपट्टे असलेले खडकही आढळतात. कैमूर व भांडर मालांतील वालुकाश्म सूक्ष्मकणी, गडद तांबडे, मऊ व कोरीव काम करण्यास सोपे आहेत. अशा रीतीने वेगवेगळे गुणधर्म अन्य कोणत्याही भारतीय खडकांत एकवटलेले आढळत नाहीत. बुंदी, धोलपूर, कोटा, भरतपूर, जयपूर, बिकानेर, मिर्झापूर जिल्हा इ. भागांत हे खडक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून ते सहजपणे खणून काढता येतात. यामुळे बांधकाम व वास्तुकला यांच्या दृष्टीने विंध्य वालुकाश्म हा सर्वांत महत्त्वाचा खडक ठरला आहे. उदा., याच्या पातळ थरांपासून फरश्या, लाद्या, छतासाठीचा दगड मिळतो. ओबडधोबड थरांच्या रूपातील सुच्छेद्य खडकांपासून मोठे ठोकळे वा स्तंभ मिळवितात. काही प्रकार इतके समांग व मऊ आहेत की, त्यांवर अतिशय नाजूक नक्षीकाम व कोरीवकाम करता येते. त्यापासून जाळ्या व जाळीदार पडद्या बनविता येतात. हा खडक शेकडो वर्षापासून वापरात असून या काळात हवेत उघडा पडल्याने त्याचा टिकाऊपणाही सिद्ध झाला आहे.

जीवसृष्टी : विंध्य संघाच्या प्रचंड जाड थरांत ओळखता येण्यासारखे जीवाश्म जवळजवळ आढळले नाहीत. जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे निदर्शक असे अस्पष्ट अवशेष मात्र त्यांच्यात अधूनमधून आढळतात. उदा., कैमूर मालेच्या तळाशी असलेल्या काळ्या सुकेत शेलमध्ये जापला येथे दगडी कोळशासारख्या चकचकीत द्रव्याचे भिंगाकार अवशेष आढळले आहेत. रामपुऱ्याजवळ १-३ मिमी. व्यासाच्या छोट्या, कार्बनीभूत चकत्या सापडल्या असून त्या कोणत्या तरी जीवांचे अवशेष असावेत, असे मानतात व तेथे त्या विपुलपणे आढळतात मात्र इतरत्र या थरात वा त्याच्यावरील थरांतही त्या आढळलेल्या नाहीत. तेथे त्या अतिशय अपूर्ण स्वरूपात टिकून राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवांची जातीच नव्हे तर प्रजातीही ठरविणे अवघड आहे. आदिम ब्रॅकिओपॉड प्राण्याच्या झडपा किंवा शैवलांचे अवशेष अशा भिन्नभिन्न जीवांपासून त्यांची उत्पत्ती झाल्याचे दावे करण्यात आले आहेत. शिवाय पृष्ठभागी असणाऱ्या नलिकेसारख्या खुणा (अवशिष्ट जीवाश्म) याही जीवाच्या अस्तित्वाच्या निदर्शक मानतात. पूर्व विंध्य संघातील सर्वांत वरच्या रोहतास चुनखडक या समुदायात सुस्पष्ट असे सर्पिल ठसे आढळले आहेत. काहींच्या मते हे जैव अवशेष आहेत. चुनखडक, कार्बनयुक्त शेल व पूर्व विंध्य संघातील वरच्या अर्ध्या भागातील ग्लॉकोनाइट वालुकाश्म यांचे जाड थर हे जीवसृष्टीच्या अस्तित्वाचे द्योतक समजले जातात.

अशा प्रकारे जीवाश्मांचा वापर करून विंध्य संघाचे वय आणि त्यावेळचे जलवायुमान (दीर्घकालीन सरासरी हवामान) यांविषयी काही निश्चित निष्कर्ष काढता येत नाही. मात्र विंध्य संघाचा सर्वांत वरचा भाग हा कँब्रियन काळाच्या तळाचा (सु. ६० कोटी वर्षे, काहींच्या मते ऑर्डोव्हिसियनमधील-सु. ४९-४२ कोटी वर्षांपूर्वीचा) निदर्शक असू शकेल. उत्तर विंध्य संघाचे खडक व सॉल्ट रेंजमधील कँब्रियन कालीन पर्पल सँडस्टोन यांच्या शिलावर्णनातील निकटचे साम्य या दृष्टीने सूचक म्हणता येईल. त्या काळी खंडांतर्गत सरोवरे व समुद्र होते, तसेच पन्ना व इतरत्र हिमानी क्रियेचे पुरावे आढळतात. मात्र त्या वेळी तेथील एकूण प्रादेशिक जलवायुमान सौम्य प्रकारचे होते, असे अनुमान करण्यात आले आहे.

आर्थिक महत्त्व : उत्तर विंध्य विभागातील कैमूर व रेवा तसेच रेवा व भांडर यांच्यादरम्यानच्या थरांत हिरे आढळतात. वज्रकरूर व इतरत्र हिऱ्याचे नळ आढळले आहेत. इतिहासकाळात सुप्रसिद्ध पन्ना व गोवळकोंडा, तसेच कडप्पा, बेल्लारी, संबळपूर, चंद्रपूर इ. जिल्ह्यांतील विंध्य खडकांत हिरे आढळले आहेत. कोहिनूर, ग्रेट मोगल, निझाम, ऑरलॉफ्ट, निळा होप, पिट इ. सुप्रसिद्ध हिरे पन्ना व गोवळकोंडा भागातील असून अकबराच्या वेळेपर्यंत पन्ना खाण जोरात चालू होती. आता रत्नाच्या दर्जाचे व औद्योगिक गुणवत्तेचे थोडेच हिरे येथून मिळतात. हिरेयुक्त थरांचा देशीय खडक पिंडाश्म असून त्यात पाण्याच्या क्रियेने झिजून बनलेले अधिक जुन्या खडकांचे (उदा., बिजावर अँडेसाइट) गोटे आढळतात. यापासून बनलेल्या मूळच्या आधारकात एके काळी हिरे स्फटिकीभूत झाले असावेत व अशा रीतीने या गोट्यांमार्फत हिरे विंध्य खडकांत आले असावेत, असा अंदाज आहे.

या संघातील खडक हे बांधकाम सहित्याचे विपुल साठेच आहेत. उत्तम व टिकाऊ वालुकाश्म, सुच्छेद्य खडक, फरशी-लादीचे खडक, तसेच शोभिवंत खडकही या संघातून प्रचंड प्रमाणात मिळतात. शिवाय सिमेंट व चुना यांच्या दृष्टीने उपयुक्त असे व शोभिवंत चुनखडकही यातून मोठ्या प्रमाणात काढतात.

भारतातील वास्तुकलेची सर्वांत सुंदर बांधकामे विंध्य वालुकाश्मांची आहेत. उदा., सारनाथ, सांची व बारहट येथील स्तूप दिल्ली, आग्रा, फतेपूर सीक्री इ. ठिकाणचे राजवाडे, किल्ले, स्मारके, देवळे, हौद, कारंजी तसेच इतर ऐतिहासिक व आधुनिक शासकीय इमारती मुख्यत्वे या खडकांच्या बांधलेल्या आहेत. आदिमानवाच्या सुऱ्या, खर्डे इ. हत्यारांपासून ते नाजूक नक्षीच्या जाळ्या, पडद्या तसेच फलक, मैलाचे (अंतरदर्शक) दगड, स्तंभ, कुंपणाचे व पायऱ्यांचे दगड, टेबलावरील माथ्याचे दगड, जाती इ. विविध ठिकणी हे दगड वापरले आहेत. यामुळे भारतातील सर्वांत जास्त खणून काढला हा खडक आहे.


विंध्य चुनखडक सिमेंट व चुना बनविण्यासाठी, तसेच पोलादनिर्मितीत वापरतात. सोन खोरे (बिहार व उत्तर प्रदेश), रेवा खोरे (मध्य  खोरे), गुंतूर (आंध्र प्रदेश) इ. भागांत चुनखडक आढळतो. शहाबाद जिल्ह्यातील रोहतास खडक विशेष महत्त्वाचा आहे. यांशिवाय वर्णविलास दाखविणारे चुनखडक (पूर्व विंध्य व पूर्व भांडर), साबळगड चुनखडक, निबाहेर चुनखडक, पालानाड (गुंतूर जिल्हा) चुनखडक इ. उत्कृष्ट शोभिवंत चुनखडकही आढळतात. ते इमारतीमधील जडावाचे काम, संगमरवराला पर्यायी खडक इ. प्रकारे वापरतात.

अलाहाबादजवळ वातावरणक्रियेने विंध्य वालुकाश्मापासून बनलेली वाळू सु. २५० चौ.किमी. पेक्षा जास्त क्षेत्रात आढळते. ती काचेसाठी उत्तम असून अतिशय शुद्ध वाळू प्रकाशकीय साहित्याच्या काचेसाठी वापरतात.

पूर्व कैमूरमधील विजयगड शेल खडकाच्या एक मी. जाडीच्या थरात पायराइट आढळते. ते चांगल्या गुणवत्तेचे (४५% गंधक) असून त्यात आर्सेनिक नसते. बिहारमधील वालुकाश्मातील पायराइट सल्फ्यूरिक अम्लासाठी वापरतात.

राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील उत्तर विंध्य वालुकाश्माशी निगडित असलेले जिप्समाचे मोठे साठे असून त्याचा उपयोग प्लॅस्टर ऑफ पॅरिसकरिता होतो. येथील अमोनियम सल्फेट खतांसाठी उपयुक्त आहे.

विंध्य संघातील सूक्ष्मकणी वालुकाश्मात भूमिजलाचे चांगले मोठे आहेत. भरडकणी तसेच पिंडाश्म खडकांतही असे लहान साठे आढळतात. पुरेशी वातावरणक्रिया झालेल्या व विभंग असलेल्या खडकांतून घरगुती वापरासाठी पाणी मिळू शकते.

  विंध्य खडकांपासून बनणारी मृदा विशेष सुपीक नसते. त्यामुळे तिच्यात वनस्पती जास्त प्रमाणात वाढू शकत नाहीत व त्यामुळे तिच्यात ह्यूमसही कमी तयार होते.

हिमालयातील विंध्य खडकांशी तुल्य खडक : मध्य हिमालयातील रूपांतरित (स्फटिकी) खडक आणि बाह्य हिमालयातील अधिक नवे खडक यांच्या दरम्यान जीवाश्महीन गाळाच्या खडकांचा पट्टा आहे. या पट्‌ट्यात विंध्य खडकांचे द्वीपकल्पाबाहेरील प्रतिनिधी आहेत, असा तर्क आहे. खडकांच्या स्तरांच्या मांडणीच्या क्रमात (व जीवाश्मांच्या वाटणीत) असणाऱ्या सारखेपणाला समस्तरक्रमी संरचना म्हणतात. हिमालयातील हे खडक विंध्य खडकांशी किती प्रमाणात समस्तरक्रमी आहेत, हे नक्की समजलेले नाही. हिमालयातील या खडकांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत. उदा., अटकस्लेट या गडद रंगी खडकांचे मोठे दृश्यांश पेशावरजवळ असून त्यांत थोडे चुनखडक व वालुकाश्म इतस्ततः आढळतात आणि ट्रॅपसारख्या खडकांची अंतर्वेशनही (घुसलेल्या राशीही) यात आहेत. हझारा येथेही अशा जीवाश्महीन काळ्या स्लेटचा मोठा दृश्यांश आहे. डोग्रा स्लेट पीरपंजाल व घौलाधार पर्वतांच्या बगलेवर आढळतात. सीमला स्लेट विंध्याचे प्रातिनिधिक समजले जाणारे गडद रंगी न बदललेले स्लेट व अभ्रकी वालुकाश्म आहेत. सीमला स्लेटनंतर खंड पडून मग पट्टित स्लेट, वालुकाश्म व गोटे असलेले क्वॉर्ट्‌झाइट यांचा गट म्हणजे जौनसार माला होय. चक्राताच्या उत्तरेला अतिशय घट्ट, करड्या डोलोमाइटयुक्त चुनखडकांची देवबन माला आहे. पश्चिम दुआर्स व भूतान पायथा-टेकड्या व दार्जिलिंगजवळील भागात बाक्सा माला असून तिच्यात क्वॉर्ट्‌झाइट, स्लेट व डोलामाइट यांचे पट्टे आढळतात. द्वीपकल्पातील विंध्य खडकांच्या तुलनेत हिमालयातील त्यांच्याशी तुल्य असणाऱ्या खडकांमध्ये वालुकामय खडक कमी, तर मृण्मय खडक विपुल प्रमाणात आढळतात. शिवाय हिमालयाच्या वलीभवन झालेल्या प्रदेशांत आढळत असल्याने या खडकांत अधिक प्रमाणात घड्या पडलेल्या आढळतात ते अधिक दाबले गेले आहेत आणि कोठे कोठे पर्यस्त (उलटे) झालेले आहेत.

हिमालयातील जीवाश्महीन खडकांचा द्वीपकल्पातील पुराणकालीन खडकांशी संबंध : मध्य हिमालयाच्या (अक्षाच्या) दक्षिणेकडील जीवाश्महीन खडक हे द्वीपकल्पातील धारवाडी, कडप्पा व विंध्य या संघांचे प्रतिनिधी असावेत, असे समजतात. हे द्वीपकल्पातील त्या त्या संघाचे उत्तरेकडील पृथक्स्थित वा विस्तारित भाग असावेत, असेही मानतात. हिमालय निर्माण होण्यापूर्वी ते सलग होते. हिमालय व त्याबरोबर सिंधु-गंगा खोरे निर्माण होत जाऊन हे खडक विभागले गेले असावेत, म्हणजे हिमालयनिर्मितीच्या काळात ते हिमालयाच्या वक्र भागात पकडले जाऊन अलग झाले. द्वीपकल्पातील त्यांचे भाग मात्र विक्षुब्ध झाले नाहीत. हिमालयाच्या अक्षाच्या उत्तरेच्या तिबेटमधील प्रत्यक्ष परिस्थितीमुळे या म्हणण्याला पुष्टी मिळते. (कारण) तिबेटच्या बाजूचे खडक अगदी भिन्न प्रकारचे असून त्यांच्यात कँब्रियनपासून ते इओसीनपर्यंतच्या (सु. ५.५ ते ३.५ कोटी वर्षापूर्वीपर्यंतच्या) बहुतेक कालखंडांत तयार झालेले जीवाश्मयुक्त सागरी गाळ आढळतात. पर्वताच्या दोन्ही बाजूंच्या या अगदी वेगळ्या संलक्षणींवरून दोन्ही ठिकाणी पूर्णपणे वेगळी अशी भौतिक व भौगोलिक परिस्थिती होती, हेच सूचित होते. याचा अर्थ भारत व तिबेट ही क्षेत्रे अगदी पूर्वीपासून वेगळी होती व त्यांचा भूवैज्ञानिक इतिहासही पूर्णपणे वेगळा आहे.

समस्तरक्रम व सहसंबंध : विंध्य संघाच्या समस्तरक्रमाबद्दल म्हणजे पर्यायाने त्यांच्या वयाबद्दल भिन्न मते आहेत. सी. एस्. फॉक्स यांच्या मते सॉल्ट रेंजमधील जीवाश्मयुक्त कँब्रियन खडक (विशेषतः पर्पल सँडस्टोन) आणि उत्तर विंध्य खडक यांचे शीलावर्णन जुळणारे आहे. यावरून ई. ब्रेडेनबर्ग यांनी उत्तर विंध्य विभागाचे वय स्थूलपणे कँब्रियन (सु. ६० ते ५० कोटी वर्षांपूर्वीचे) सुचविले आहे. टी. एच्. हॉलंड यांनी मात्र आर्कीयन-धारवाड जटिल समूहावर वसलेल्या द्वीपकल्पातील सर्व जीवाश्महीन खडकांचे वय कँब्रियनपूर्व (६० कोटी वर्षाहून जास्त) ठरवून त्यांचा पुराण महाकल्पात समावेश केला आहे. यावरून आर्कीयन व अधिक नवे जीवाश्मयुक्त खडक यांच्या दरम्यानची एक प्रकारची संक्रमण अवस्था पुराण महाकल्पातील खडकांनी दर्शविली जाते. विंध्य खडकात थोडे जीवाश्म व जैव क्रियेचे पुरावे आढळल्याने त्यांना कँब्रियन-पूर्व काळातून अलीकडे म्हणजे कँबियनमध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र कँबियनमधील त्यांचा नेमका कालस्तर कोणता हे निश्चित झालेले नाही.

भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने स्वीकारलेल्या भारतातील शैलसमूहांच्या वर्गीकरणात पुराण महाकल्पानंतरच्या स्तरांच्या सलगतेत दोन सर्वांत महत्त्वाचे खंड सुचविले आहेत. भूकवचातील मोठ्या हालचाली व झीज होण्याचा काळ, तसेच जीवसृष्टी व गाळ साचणे यांच्या नवीन युगाची सुरुवात या खंडांनी सूचित होते. यांपैकी पहिला खंड हा विंध्य संघानंतर लगेच येत असून तो द्वीपकल्प व त्याबाहेरही सर्वत्र आढळतो. कडप्पा संघाचे खडक बनल्यानंतर भूकवचाच्या हालचाली झाल्या व त्याचे क्षरण (झीज) झाले. यानंतर विंध्य संघाचे खडक साचले. यामुळे विंध्य संघ कडप्पा संघापेक्षा नवा मानतात. शिवाय उपहिमालयातील जौनसार माला व हैमंताचा मोठा भाग विंध्य संघाशी, तर आंध्र प्रदेशातील कुर्नूल संघ पूर्व विंध्याशी समतुल्य समजतात.

अशा रीतीने विंध्य संघाच्या वयाच्या बाबतीत स्थूलपणे पुढीलप्रमाणे विधान करता येते:विंध्य संघ गोंवनी संघापेक्षा जुना व ग्वाल्हेर मालेपेक्षा (धारवाडी संघ) नवा आहे. थोडक्यात याचा काळ पूर्व-पुराण महाकल्प ते पूर्वपुराजीव एवढा येतो.

पहा : कडप्पा (कडाप्पा) संघ गोंडवनी संघ धारवाडी संघ पुराण महाकल्प व गण.

संदर्भ : 1. Dey, A. K. Geology of India, New Delhi, 1968.

           2. Krishnan, M. S. Geology of India and Burma, Madras, 1960.

           3. Medlieott, M.A. Blandford, W. T. A Manual of Geology of India, Calcutta,1983.

           4. Pascoe, E. A. A Manual of he Geology of India and  Burma, 3 Vols., Delhi 1959.

           5. Wadia, D. N. Geology of India, London, 1961.

ठाकूर, अ. ना.