तोरमल्लीचे स्फटिक

तोरमल्ली : (टुर्मलीन). खनिज. स्फटिक समांतर षट्‌फलकीय अर्धाकृती. स्फटिक सामान्यतः ३, ६ किंवा ९ बाजू असलेले प्रचिन कधीकधी कांडी किंवा सुईसारखे क्वचित चापट किंवा प्रसूच्याकृती प्रचिनांच्या पृष्ठावर ठळक उभ्या रेखा असतात. कधीकधी गोलाई आलेले किंवा निमुळत्या पिपासारखे स्फटिक, तसेच समांतर वा अपसारी स्फटिकांचे जुडगेही आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान]. याला ⇨ पाटन नसते. भंजन किंचित शंखाभ ते खडबडीत. ठिसूळ. कठिनता ७–७·५. वि. गु. ३–३·२५. चमक काचेसारखी ते राळेसारखी. रंग सामान्यतः काळा शिवाय उदी, निळा, हिरवा, तांबडा, गुलाबी, जांभळा, पिवळा इ. क्वचित पांढरा वा रंगहीन. कधीकधी एकाच स्फटिकात दोन निरनिराळे रंग असतात किंवा विविध रंगांची मंडलित रचनाही आढळते (उदा., स्फटिकाच्या एका टोकाचा रंग लाल व दुसऱ्याचा हिरवा किंवा आतला लाल आणि बाहेरचा हिरवा), असे पारदर्शक स्फटिक फार आकर्षक दिसतात. कस रंगहीन. हे खनिज द्विवर्णिक आहे म्हणजे स्फटिक उभ्या व त्याला काटकोनात असणाऱ्या अक्षाच्या दिशेने पाहिला असता दोन निरनिराळ्या रंगांचा दिसतो. याचे स्फटिक घर्षणविद्युत्‌, तापविद्युत्‌ व दाबविद्युत् ह्या गुणधर्मांचे असतात म्हणजे घासल्याने त्यांच्यावर विद्युत् भार निर्माण होतो तसेच त्याच्या उभ्या अक्षाच्या टोकांजवळच्या तापमानात योग्य तो बदल केल्याने किंवा या अक्षाच्या टोकांवर दाब दिल्याने दोन्ही टोकांशी विरुद्ध विद्युत्‌ भार निर्माण होतात. हे बोरॉन व ॲल्युमिनियम यांचे आणि मॅग्नेशियम, लोह किंवा क्षारीय (अल्कली) धातू प्रामुख्याने असलेले जटिल बोरोसिलिकेट आहे. याचे स्थूल रासायनिक संघटन HgAl3 (B,OH)2 SiO4SiO19 असे असून यातील H च्या जागी क्षारीय वा दोन संयुजा असणाऱ्या (इतर अणूंशी वा अणुगटांशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक दोन असणाऱ्या) धातू (Mg, Fe, Ca) येऊ शकतात. सामान्यतः यात लेशमात्र फ्ल्युओरीनही असते. रा. सं. वरून याचे सामान्यतः पुढील तीन प्रकार पडतात. (१) लोहयुक्त प्रकार : हा काळा असून त्याला शॉर्लाइट (शॉर्ल) म्हणतात. (२) मॅग्नेशियायुक्त प्रकार : हा उदी रंगाचा असून त्याला ड्रॅव्हाइट म्हणतात व (३) क्षारीय धातुयुक्त प्रकारात थोडे लिथियम ऑक्साइडही असते व त्यामुळे त्याला विविध रंग येतात रंगांनुसार त्यांना पुढील वेगवेगळी नावे देण्यात येतात : गुलाबी रूबेलाइट, गडद निळा इंडिकोलाइट वा ब्राझीलियन नील (सफायर), हिरवा ब्राझीलियन पाचू (एमराल्ड), पिवळा सिलोनीज पेरिडोट, जांभळट तांबडा सायबेराइट व रंगहीन ॲक्रॉइट.

ग्रॅनाइटासारख्या खडकांच्या शिलारसातील वायूंमुळे हे खनिज तयार होते. ते मुख्यतः ग्रॅनाइटी पेग्मटाइट व त्याच्यालगतच्या खडकांत मायक्रोक्लीन, अल्बाइट, क्वॉर्ट्‌झ, शुभ्र अभ्रक, तसेच लेपिडोलाइट, वैदूर्य, ॲपेटाइट, फ्ल्युओराइट इ. खनिजांच्या जोडीने आढळते. ते ग्रॅनाइटासारख्या अग्निज व पट्टिताश्म, सुभाजा, स्फटिकी चुनखडक, स्लेट यांसारख्या रूपांतरित खडकांत गौण खनिज म्हणूनही आढळते. डबरी गाळाच्या खडकांतही हे सापडते. उरल पर्वत, बोहीमिया, सॅक्सनी, एल्बा बेट, ब्राझील, नॉर्वे, कॉर्नवॉल, डेव्हन परगणा, ग्रीनलंड, मॅलॅगॅसी, ब्रह्मदेश, श्रीलंका, अमेरिका, नैर्ऋत्य आफ्रिका इ. भागांत ते सापडते. भारतात हे राजस्थान आणि बिहार राज्यांत पेग्मटाइटांमध्ये आढळते व काश्मीरातील पादर जिल्ह्यातही सापडते.

या खनिजाचे पारदर्शक व चांगले रंगीत स्फटिक रत्न म्हणून वापरतात. तसेच दाबविद्युतीय गुणधर्मामुळे याचे स्फटिक निरनिराळ्या प्रकारच्या दाबमापक उपकरणांत वापरले जातात. असे एक उपकरण अणुस्फोटाचा दाब मोजण्यासाठी वापरले जाते. याच्या स्फटिकातून प्रकाश जाताना त्याचा सामान्य किरण जवळजवळ शोषला जातो आणि उभ्या अक्षाला समांतर कापलेल्या चकत्यांमधून फक्त असामान्य किरण जाऊ शकतो. अशा दोन चकत्या एकमेकींना काटकोनात ठेवल्यास त्यांतून प्रकाश पलीकडे जाऊ शकत नाही. अशा प्रकारे अशा दोन चकत्या म्हणजे साधे ध्रुवणकारक (एकाच दिशेत आंदोलने असणारा प्रकाश देणारे) उपकरण असून त्यांना तोरमल्ली चिमटा म्हणतात आणि स्फटिकांच्या निरीक्षणासाठी त्याचा वापर करतात. ध्रुवणमापक आणि ध्रुवणदर्शक उपकरणांमध्येही तोरमल्ली स्फटिक वापरले जातात [⟶ ध्रुवणमिति]. विद्युतीय गुणधर्मांमुळे ते काही विद्युतीय उपकरणांमध्येही वापरले जातात.

इ. स. १७०३ पर्यंत या खनिजासाठी शॉर्ल ही संज्ञा वापरात होती. तदनंतर सिंहली तोरमल्ली या शब्दावरून इंग्रजी टुर्मलीन हे नाव या खनिजाला देण्यात आले. पाश्चिमात्य लोक हे ऑक्टोबर महिन्याचे रत्न मानतात व भारतात ते नवरत्नांपैकी एक रत्न मानले जाते.

केळकर, क. वा. ठाकूर अ. ना.