गिल्बर्ट, ग्रोव्ह कार्ल : (६ मे १८४३—१ मे १९१८). अमेरिकन भूवैज्ञानिक. पर्वतांची संरचना, भौतिकीय आणि हिमनदीय भूविज्ञान या विषयांतील त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म व शिक्षण रॉचेस्टर येथे झाले. १८६२ साली ते पदवीधर झाले. १८६९ मध्ये ओहायहो जिऑलॉजिकल सर्व्हेत दाखल झाल्यावर १८७१ मध्ये ते भूवैज्ञानिक व पुढील वर्षी प्रमुख भूवैज्ञानिक झाले. तेथील व्हीलर सर्व्हेत असताना पश्चिमेकडील भागाच्या त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना रॉचेस्टर विद्यापीठाने ए.एम्‌. पदवी दिली.   ते १८७५ साली उटा व डकोटा राज्यांतील जॉन वेस्ली पॉवेल यांच्या सर्वेक्षणाच्या मोहिमेत दाखल झाले. तेथे असताना त्यांनी १८७७ साली उटातील हेन्रील पर्वताचे अध्ययन केले आणि तो पर्वत घुमटाकार अग्निज अंतर्वेशनाने (अग्निज राशी घुसल्याने) तयार झाला आहे असे सुचविले. अशा प्रकारच्या अंतर्वेशनाचे वर्णन सर्वांत आधी त्यांनीच करून त्याला लॅकोलाइट [→ लॅकोलिथ] हे नावही दिले. यासंबंधीचा त्यांचा जिऑलॉजी ऑफ हेन्‍री मौंटन्स  हा अहवाल महत्त्वाचा आहे. सन १८७९—१९१८ या दरम्यान ते युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हेत होते. ते ॲपालॅचिअन विभागाचे प्रमुख (१८८४) व प्रमुख भूवैज्ञानिक (१८८९—९२) होते. प्राचीन सरोवर बॉनव्हिल आणि नायगारा नदी व धबधबा यांच्या संशोधनासंबंधीची त्यांची बॉनव्हिल मोनोग्राफ  आणि हिस्टरी ऑफ नायगारा रिव्हर  ही पुस्तके १८९० साली प्रसिद्ध झाली. त्यांनी रॉकी पर्वताच्या भागातील प्रदेशाचे नकाशे काढले व त्याचे भूवैज्ञानिक वर्णनही केले. अशा तऱ्हेने भूवैज्ञानिक संरचना व भूपृष्ठाचे स्वरूप यांच्यातील संबंधाचे प्रथम अध्ययन करणाऱ्यांपैकी ते एक होत. महासरोवरांच्या भागातील भूकवचाच्या हालचाली व सिएरा नेवाडा या भागाचे भू-आकारविज्ञान (भूमीच्या स्वरूपांची वैशिष्ट्ये, उत्पत्ती व उत्क्रांती यांचा अभ्यास करणारे शास्त्र) यासंबंधीचे त्यांचे अध्ययन महत्त्वाचे आहे. त्यांनी हिमनदी व हिमानी क्रिया यांविषयीही संशोधन केले. हिमानी क्रियेने तयार होणाऱ्या U अशा आकाराच्या दरीला ‘हँगिंग व्हॅली’ हे नाव त्यांनीच दिले. ते कार्नेल (१८८६), कोलंबिया (१८९२) व जॉन्स हॉपकिन्स (१८९५) या विद्यापीठांत खास व्याख्याते होते. तसेच ते लंडनची रॉयल सोसायटी व जिऑलॉजिकल सोसायटी यांचे फेलो आणि अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सभासद होते. त्यांनी अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्सेसचे अध्यक्षस्थान एकदा व अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सोसायटीचे अध्यक्षस्थान दोनदा भूषविले होते. १९०० साली लंडनच्या जिऑलॉजिकल सोसायटीने त्यांना वुलस्टन पदक अर्पण केले. ते जॅक्सन (मिशिगन) येथे मृत्यु पावले. ठाकूर, अ. ना.