मार्ल : (बांग लाइम). खडक. सूक्ष्मकणी खनिजांचे मातीसारखे मिश्रण. सामान्यतः मृत्तिका (किंवा गाळवट) व कॅल्शियम कार्बोनेट (व कधीकधी थोडे मॅग्नेशियम कार्बोनेट) यांच्या नैसर्गिक रीत्या आढळणाऱ्या मातीसारख्या सुचूर्ण्य (भुसभुशीत) मिश्रणासाठी मार्ल ही संज्ञा वापरतात. कोठे कोठे ती विविध संघटनांच्या मिश्रणांसाठीही वापरली जाते.

काही ठिकाणी चिखल व कॅल्शियम (चूर्णीय) द्रव्य एकत्र साचतात आणि त्यांच्यापासून मृण्मय चुनखडक वा कॅल्शियमी (कॅल्शियम कार्बोनेटयुक्त) शेल हे खडक बनतात. अशा चुनखडक व मृत्तिका यांच्या मधल्या संघटनाच्या सैलसर व सहजपणे भुगा होणाऱ्या मिश्रणाला (खडकाला) मार्ल वा कॅल्शियमी मार्ल म्हणतात. हे मिश्रण घट्ट झाल्यावर बनलेल्या खडकाला ‘मार्ल खडक’ (मार्लाइट वा मार्लस्टोन) म्हणतात आणि मार्ल खडकातील मृण्मय (७०%) व कॅल्शियमी (३०%) घटकांचे प्रमाण सिमेंट उत्पादनास योग्य असले, तर त्याला ‘सिमेंट खडक’ म्हणतात. मार्लमधील मृत्तिकेचे प्रमाण वेगवेगळे असते. मृण्मय घटकापेक्षा कॅल्शियमी घटक जास्त प्रमाणात असल्यास अशा खडकाला मृण्मय वा मार्ली चुनखडक म्हणतात व मृत्तिका विपुल प्रमाणात असल्यास खडकाला मार्ली व चूर्णीय मृत्तीका म्हणतात. मार्ल सागरात व गोड्या पाण्यात आढळते आणि दोन्हींचे संघटन सारखे असू शकते. ते उथळ सरोवरात व दलदलीच्या भागांत तयार होते. त्यांचा रंग पांढरा, करडा, निळसर करडा व क्वचित तांबडा किंवा काळा असतो. काही बाबतींत मार्लचे चॉकशी [→ चॉक] साम्य असते व काही ठिकाणी चॉक व मार्ल यांचे अंतःस्तरण (एकमेकांच्या थरांशी सरमिसळ) झालेले आढळते. मार्ल सापेक्षतः अधिक आधुनिक अवसादी (गाळाच्या) निक्षेपांत आढळतात (उदा., अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या द. अटलांटिक व गल्फ किनाऱ्यांवर).

गोड्या पाण्यातील व सागरातील अपृष्ठवंशी (पाठीचा कणा नसलेल्या) प्राण्यांच्या (उदा., गोगलगाय, शिंपाधारी) कवचांचे तुकडे साचून काही मार्ल तयार झालेले असते. त्याला शेल (कवचयुक्त) वा निळे मार्ल म्हणतात. त्याचा सुशोभनासाठी उपयोग करतात. गोड्या पाण्याच्या सरोवरातील काही मार्ल वनस्पतींच्या (उदा., शैवले) क्रियेद्वारे बनलेले असते. प्रकाशसंश्लेषणासाठी (सूर्यप्रकाशात हरित द्रव्याच्या मदतीने कार्बन डाय-ऑक्साइड व पाणी यांपासून अन्ननिर्मिती करण्याच्या क्रियेसाठी) या वनस्पती पाण्यातील कॅल्शियम बायकार्बोनेटापासून कार्बन डाय-ऑक्साइड घेतात व त्यामुळे काही भागांतील पानांजवळील कॅल्शियम कार्बोनेटाची विद्राव्यता कमी होते व तेथे ते अवक्षेपित होते (साक्याच्या रूपात साचते). अशा अवक्षेपणाने तेथे कॅल्शियम कार्बोनेटाचा पापुद्रा (पुट) तयार होतो, नंतर असे पापुद्रे खाली पडतात व तळाशी साचत जाऊन मार्ल तयार होते.

 पूर्वी मार्ल खत म्हणून वापरीत. आताही जेथे हे विपुलपणे आढळते तेथे विशेषतः कॅल्शियमी द्रव्य अल्प प्रमाणात असलेल्या जमिनीसाठी खत म्हणून वापरतात. जमिनीची अम्लता कमी करण्यासाठी व पीटयुक्त जमीन सुधारण्यासाठीही मार्ल वापरतात. तसेच क्रिकेटचे मैदान तयार करतानाही हे वापरतात त्यामुळे हिरवळ चांगली येते. यांशिवाय पोर्टलँड सिमेंट, विटा, निरोधक पदार्थ इ. तयार करण्याकरिता याचा वापर केला जातो.

ग्रीन सँड मार्ल हे ग्लॉकोनाइट या खनिजाने युक्त असून ते अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर आढळते. उत्तर अमेरिका व यूरोप येथे पाणी मृदू करण्यासाठी व कधीकधी खत म्हणून ते वापरतात.

मार्ल या शब्दाची व्युत्पत्ती अज्ञात आहे. तथापि प्लिनी यांच्या मते हा शब्द गॉल लोकांच्या भाषेतील असावा.  

पहा : खते चुनखडक मृत्तीका.

ठाकूर, अ.ना.