स्टिब्नाइट : अँटिमनी धातूचे हे सामान्य व मुख्य खनिज आणि धातुक ( कच्च्या रूपातील धातूचा ) स्रोत आहे. मुख्यतः यापासून अँटिमनी धातू मिळवितात. अँटिमोनाइट, अँटिमनी ग्लान्स, ग्रे अँटिमनी किंवा स्टिबियम ही याची पर्यायी नावे आहेत. याचे स्टिब्नाइट हे नाव या खनिजासाठी वापरण्यात येणार्‍या जुन्या ग्रीक शब्दावरून आले आहे.

स्टिब्नाइटाचे स्फटिक समचतुर्भुजी वर्गाचे असून त्यांचा आकार प्रचिनासारखा असतो. प्रचिनाच्या फलकावर सामान्यपणे उभ्या रेखा किंवा खोबणी असतात. बाक आलेले किंवा पीळ पडलेले स्फटिक पुष्कळदा आढळतात. ते कित्येकदा सुईच्या आकाराचे असतात. प्रचिनाकार व सुईसारखे स्फटिक एकत्र जुळून झालेले अरीय ( त्रिज्यीय ) रचनेचे लहान- -मोठे जुडगेही अनेकदा आढळतात [⟶ स्फटिकविज्ञान ]. कधीकधी हे खनिज संपुंजित, पात्यांच्या जुडग्यासारख्या किंवा कणांच्या रूपांतही आढळते. खनिजाचा रंग व कस शिशाप्रमाणे करडा ते काळा. गंजल्यावर याचे पृष्ठ काळसर व क्वचित रंगदीप्त होते. खनिज अपारदर्शक किंचित छेद्य ( सुरीने कापता येणारे ) ⇨ पाटन : (010) उत्कृष्ट भंजन उपशंखाभ कठिनता २ वि.गु. ४.५२ — ४.६२ चमक धातूसारखी खनिजाची नव्याने कापलेली किंवा पाटनाची पृष्ठे चकचकीत दिसतात. हे खनिज सहज वितळते. रा. सं. Sb2S3.

स्टिब्नाइटात क्वचित सोने, चांदी, लोह, शिसे व तांबे ही मूलद्रव्ये थोड्या प्रमाणात आढळतात. हे भूकवचाच्या सापेक्षतः उथळ भागात क्षारीय विद्रावातून निक्षेपण होऊन ( साचून ) क्वॉर्ट्झाच्या ( सिलिकेच्या ) शिरांमध्ये सामान्यपणे आढळते. अशा लहान शिरा अनेक देशांमध्ये आढळतात. अँटिमनीची इतर खनिजे आणि गॅलेना, हिंगूळ, स्फॅलेराइट, बराइट, मनशीळ, हरताळ इ. खनिजे स्टिब्नाइटाबरोबर आढळतात. याचे मोठे साठे असलेल्या शिरा चीनच्या हूनान प्रांतात आहेत. शिवाय मेक्सिको, बोलिव्हिया, अल्जीरिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, रूमानिया, सॅक्सनी, टस्कनी, जपान, बोर्निओ, पेरू इ. प्रदेशांत स्टिब्नाइट आढळते.

भारतात विशाखापटनम् व हजारीबाग यांच्या लगतच्या भागांत स्टिब्नाइटाचे थोडे साठे आहेत. मात्र, ते किफायतशीर रीतीने येथून काढता येत नाही. चित्रदुर्ग जिल्ह्यात क्वॉर्ट्झोज खडकांतील शिरांमध्ये स्टिब्नाइट व अँटिमनी थोड्या प्रमाणात आढळतात. लाहोल ( कांग्रा ) येथे स्टिब्नाइटाचे मोठे साठे आहेत. मात्र, त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे. तेथील स्टिब्नाइटाचे साठे ग्रॅनिटॉइड पट्टिताश्मांमध्ये असून गॅलेना व स्फॅलेराइट या खनिजांबरोबर मिसळलेल्या रूपात स्टिब्नाइट आढळते.

स्टिब्नाइट मुख्यतः अँटिमनी धातू मिळविण्यासाठी वापरतात. सुरमा म्हणून तसेच पापण्यांचे व भुवयांचे केस काळे करण्यासाठी या खनिजाची पूड प्राचीन काळापासून वापरात आहे. आगकाड्या, शोभेचे दारूकाम इत्यादींतही याचा थोडा उपयोग होतो.

पहा : अँटिमनी.

ठाकूर, अ. ना.