बूर्नोनाइट : (व्हील ओअर). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, वडीसारखे किंवा आखूड प्रचिनाकार [

बूर्नोनाइटाचा स्फटिक

स्फटिकविज्ञान] . पुनरावृत्त जुळे स्फटिक क्रूसासारखे किंवा चाकाप्रमाणे दिसतात म्हणून याला‘रेडेलर्झ’ किंवा ‘व्हील’ अथवा ‘कॉगव्हील ओअर’ असेही म्हणतात. स्फटिकांचे पुंजके वा राशीच्या, संपुंजित, कणमय वा संहत रूपात हे आढळते. ⇨ पाटन : (0 1 0) तुटक. भंजन अर्धशंखाभ ते खडबडीत [⟶ खनिजविज्ञान]. काहीसे ठिसूळ. कठिनता २.५-३. वि.गु.५.८-५.९ चमक धातूसारखी. रंग व कस पोलादाप्रमाणे करडा ते लोखंडासारखा काळा. अपारदर्शक. रा.सं. PbCuSbSa यामध्ये अँटिमनीच्या जागी थोडेसे आर्सेनिक येऊ शकते. सर्वात सामान्य सल्फोलवणांपैकी हे एक असून ते मध्यम तापमानात तयार झालेल्या धातुयुक्त शिरांमध्ये गॅलेना, टेट्राहेड्राइट, कॅल्कोपायराइट, स्फॅलेराइट व पायराइट यांच्याबरोबर आढळते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, रुमानिया, दोन्ही जर्मनी, इटली, मेक्सिको, बोलिव्हिया, चिली, पेरू, कॅनडा इ. ठिकाणी हे सापडते. शिसे, तांबे व ॲटिमनी यांचे गौण धातुक (कच्ची धातू) म्हणून हे वापरले जाते. फिलिप रॅशली यांनी १७९७ साली याचा प्रथम उल्लेख केला होता. तथापि काउंट जे.एल्‌. बूर्नो (१७५१-१८२५) या फ्रेंच खनिजवैज्ञानिकांना हे खनिज एंडेलिऑन (कॉर्नवाल) येथे सापडले व त्यांनी त्याचे वर्णन करून त्याला‘एंडेलिऑन’ असे नावही दिले होते (१८०४) परंतु नंतर त्यांच्या सन्मानार्थ या खनिजाचे ‘बूर्नोनाइट’ असे नामकरण करण्यात आले (1१८२५).

ठाकूर, अ.ना.