अष्‍मीभूत वन : अश्मीभूत म्हणजे शिळेचे रूप प्राप्त झालेला. ज्यांच्यात वृक्षांची अश्मीभूत खोडे आहेत असे गाळांचे खडक कित्येक क्षेत्रांत उघडे पडलेले आढळतात. या क्षेत्रांना ‘अश्मीभूत वने’ म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी गाळात पुरल्या गेलेल्या वृक्षांच्या खोडांचे कायांतरण होऊन अश्मीभूत खोडे तयार झालेली असतात. हे कायांतरण गाळात मुरणाऱ्या पाण्यामुळे घडून आलेले असते. ज्याच्यात सिलिका किंवा इतर एखादे खनिज विरघळलेले आहे, असे मुरत जाणारे पाणी गाळात पुरल्या गेलेल्या व कुजत असलेल्या खोडांतील सूक्ष्म पोकळ्यांत शिरते व त्यांच्यात विरघळलेले खनिज त्या पोकळ्यांत हळूहळू साचविले जाते. खोडांच्या लाकडाच्या जागी खनिजाची, सामान्यत: सिलिकेची, स्थापना होते व अखेरीस त्याचा घन खडक बनतो. असे कायांतरण झालेल्या खोडांचे आकार टिकून राहिलेले असतात एवढेच नव्हे तर त्यांच्या लाकडाच्या सूक्ष्म आंतरिक संरचनाही सुरक्षित राहिलेल्या असतात व सूक्ष्मदर्शकाच्या साह्याने त्या ओळखता येतात.

ज्वालामुखी राखेचा वर्षाव होऊन, त्या राखेत किंवा वाऱ्याबरोबर वाहत आलेली वाळू किंवा पुराच्या पाण्याबरोबर आलेला गाळ साचून वने पुरली जाणे शक्य असते. अशा पुरल्या गेलेल्या वृक्षांची खोडे मूळ जागीच असलेली आढळतात. पुराबरोबर वाहत आलेल्या वृक्षांची खोडे एखाद्या सखल भागात साचून तीही गाळात पुरली जाणे शक्य असते. अशी खोडे व त्यांच्यापासून बनलेली अश्मीभूत खोडे अर्थात अस्ताव्यस्त पडलेली असतात, ती पुष्कळ असली म्हणजे ती असलेल्या क्षेत्रालाही ‘अश्मीभूत वन’ म्हणतात.

ईजिप्तमधील कैरोशेजारी व अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अरिझोनातील पेंटेड डेझर्ट व वायोभिंगमधील यर्लोस्टोन पार्क येथील अश्मीभूत वने विख्यात आहेत. ॲरिझोनातील अश्मीभूत खोडे वाहून आलेल्या वृक्षांची आहेत. यलोस्टोन पार्कातील खोडे ज्वालामुखीच्या राखेत पुरल्या गेलेल्या वृक्षांची असून बहुसंख्य खोडे मूळच्या जागीच राहिलेली आहेत. 

 

पहा: पुरावनस्पतिविज्ञान

ठाकूर, अ. ना.