नवजीव: भूवैज्ञानिक इतिहासाच्या मुख्य काल विभागांपैकी अगदी अलीकडच्या काल विभागाला नवजीव महाकल्प व त्या महाकल्पात तयार झालेल्या खडकांच्या गटाला नवजीव गण म्हणतात. ⇨ मध्यजीव महाकल्पाच्या म्हणजे क्रिटेशस कल्पाच्या अखेरीपासून (सु. ९ कोटी वर्षांपूर्वीपासून) ते आतापर्यंतच्या काळाचा समावेश नवजीव महाकल्पात होतो. पुराजीव आणि मध्यजीव महाकल्पांच्या (सु. ६० ते २४·५ कोटी व सु. २३ ते ९ कोटी वर्षांपूर्वीच्या काळांच्या) मानाने नवजीव महाकल्प अगदी लहान आहे पुराजीव महाकल्पातील कँब्रियन (सु. ६० ते ५१ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) या एकट्या विभागाचा अवधी नवजीव महाकल्पाच्या अवधीपेक्षा मोठा आहे. नवजीव महाकल्पाचे तृतीय व चतुर्थ असे दोन विभाग सामान्यतः केले जातात. त्यांपैकी तृतीय विभाग त्याला कल्प म्हणता येण्याइतका मोठा म्हणजे सु. साडेसहा कोटी वर्षांचा आहे. चतुर्थ विभागाचा अवधी वीस ते तीस लक्ष वर्षांइतकाच आहे म्हणून त्याला कल्प म्हणण्याऐवजी उपकल्प व त्याच्या खडकांना उपसंघ अशी नावेही दिली जातात.

वर्गीकरण : भूवैज्ञानिक इतिहासाच्या वर्गीकरणाची एक योजना प्रथम जोव्हान्नी आर्दुइनो या इटालियन वैज्ञानिकांनी १७६० मध्ये सुचविली होती. त्यांनी खडकांचे तीन आनुक्रमिक गट केले होते. त्यांपैकी सर्वांत जुन्या व स्फटिकमय खडकांच्या गटास आदिम, मधल्या व गाळाचे कण एकत्र जुळून घट्ट झालेल्या खडकांच्या गटास द्वितीय व त्याच्या नंतरच्या आणि सुटे कण असलेल्या गाळाच्या खडकांच्या गटास तृतीय (टर्शरी) अशी नावे त्यांनी दिली होती. वरील संज्ञांपैकी आदिम आणि द्वितीय या संज्ञा आता वापरल्या जात नाहीत पण तृतीय ही संज्ञा मात्र किंचित मर्यादित अर्थाने नवजीव महाकल्पाच्या (व गणाच्या) एका विभागास उद्देशून वापरली जाते. नदी-नाले व बायबलात वर्णन केलेला महाप्रलय यांच्या कार्यामुळे सापेक्षतः अगदी अलीकडील काळात साचविल्या गेलेल्या गाळाच्या खडकांस चतुर्थ (क्वाटर्नरी) ही संज्ञा जे. डेस्नोयर्स यांनी १८२९ साली सुचविली. जे गाळ महाप्रलयाने साचविले गेले आहेत, अशी कल्पना पूर्वी होती ते वास्तविक वाहत्या हिम-बर्फांनी साचविलेले आहेत, असे पुढे कळून आले. चतुर्थ ही संज्ञाही प्रचारात राहिलेली आहे.

तृतीय संघाच्या खडकांचे वर्गीकरण प्रथम चार्ल्स लायल यांनी १८३३ साली केले. सागरी मॉलस्कांच्या (मृदुकाय प्राण्यांच्या) ज्या जातींचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) तृतीय कालीन खडकांत आढळतात, त्यांच्यापैकी आता जिवंत असलेल्या जातींचे किती आहेत, याचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी त्यांचे ⇨ इओसीन, ⇨ मायोसीन व ⇨ प्लायोसीन असे तीन विभाग केले होते (इओसीन–नूतन जातींचा उषःकाल मायोसीन–नूतन जाती कमी प्लायोसीन–नूतन जाती अधिक). नंतर (१८५४) एच्.ई.फोन बेयरेच यांनी इओसीन व मायोसीन यांच्या मध्ये ⇨ ऑलिगोसीन (नूतन जाती थोड्या) नावाचा विभाग असावा, असे सुचविले. इओसीनच्या तळभागातल्या जीवाश्मी वनस्पती त्याच्या वरच्या भागातील जीवाश्मी वनस्पतींहून अगदी भिन्न आहेत, असे व्हिल्हेल्म फिलिप शिंपर यांचे मत होते आणि इओसीनच्या तळभागाचा एक वेगळा विभाग कल्पावा व त्याला ⇨ पॅलिओसीन हे नाव द्यावे, असे त्यांनी १८७४ मध्ये सुचविले.

तृतीय कल्पाच्या व संघाच्या विभागांची सामान्यतः प्रचारात असलेली नावे आणि त्यांच्यात आढळणाऱ्या सागरी मॉलस्कांच्या एकूण जीवाश्मांपैकी आता जिवंत असलेल्या जातींच्या जीवाश्मांचे प्रमाण ही पुढीलप्रमाणे आहेत : (१) पॅलिओसीन (सु. ६·५ ते ५·५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) ० ते १%, (२) इओसीन (सु. ५·५ ते ३·५ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) १–५%, (३) ऑलिगोसीन (सु. ३·५ ते २ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) १०–१५%, (४) मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीचा काळ) २०–४०% व (५) प्लायोसीन (सु. १·२ कोटी के ६ लाख वर्षांपूर्वीचा काळ) ५०–९०%.

लायल यांची किंवा त्यांच्या योजनेत किंचित बदल करून तयार झालेली वर्गीकरणाची वरील योजना मुख्यतः पॅरिस व लंडन यांच्या भोवतालच्या खडकांवरून केलेली आहे. इतर खंडांतील प्रदेशांत ती सोयीस्कर ठरते, असे नाही. शिवाय केवळ जमिनीवरील प्राण्यांचे जीवाश्म असणाऱ्या खडकांचे विभाग वरील वर्गीकरणाच्या कसोट्या वापरून करता येत नाहीत. एखाद्या खडकातील जीवाश्मांच्या समुच्चयाचे एकूण स्वरूप त्याच्यातील जीवाश्मी प्राण्यांच्या क्रमविकासाच्या (उत्क्रांतीच्या) अवस्था, त्या खडकाचे शेजारच्या इतर खडकांशी असलेले संबंध इ. गोष्टी लक्षात घेऊन तो वरील योजनेतील कोणत्या विभागात घालावा, हे ठरवावे लागते. लायल व इतरांनी सुचविलेल्या योजनेतील नावे प्रचारात आहेत पण ती मूळ अर्थाने वापरली जातात, असे नाही.

तृतीय कल्पाचे पॅलिओजीन (पुरातृतीय) किंवा न्युम्युलिटिक व निओजीन (नवतृतीय) असे दोनच भाग करावेत व पॅलिओजीनमध्ये पॅलिओसीन, इओसीन व ऑलिगोसीन यांचा व निओजीनमध्ये मायोसीन व प्लायोसीन यांचा समावेश करावा, अशी सुचना १९५६ साली करण्यात आलेली होती पण तिला विशेषशी मान्यता मिळालेली नाही.

चतुर्थ कल्पाचे (१) ⇨ प्लाइस्टोसीन म्हणजे अत्यंत नूतन व (२) रीसेंट म्हणजे अभिनव असे दोन भाग केले जातात. तृतीय कल्पाच्या वर्गीकरणाच्या पद्धतीस अनुसरून प्लाइस्टोसीन (आधुनिक जातींची जीवाश्मी कवचे ९०–१००%) हे नाव दिलेले आहे. प्लाइस्टोसीन काळी पृथ्वीवर हिमकाल अवतरला होता व खंडांच्या विशेषतः उत्तर गोलार्धातल्या खंडांच्या विस्तीर्ण क्षेत्रावर हिम-बर्फाचे आच्छादन पसरले होते म्हणून प्लाइस्टोसीनला ग्लेशियल (हिम किंवा हिमानीय) काळ असेही म्हणतात. हिमकालातील थंडीचा कडाका कमी होऊन साधारण आजच्यासारखे हवामान असणाऱ्या आधुनिक काळाचा प्रारंभ नुकताच झालेला आहे.

प्लाइस्टोसीन आणि अभिनव काल यांचा चतुर्थ नावाचा वेगळा गट न करता तृतीय कल्पातच त्यांचा समावेश करावा असे कित्येक वैज्ञानिकांचे मत आहे. सागरातील वा जमिनीवरील जीवांचे जे गट तृतीय काली प्रमुख होते तेच चतुर्थ कालीही प्रमुख आहेत. वनश्रींचे व प्राणिसमूहांचे एकूण स्वरूप लक्षात घेतले, तर तृतीय व चतुर्थ कल्पात भेद करता येत नाही. सपुष्प वनस्पती, सस्तन प्राणी, पक्षी, अस्थिमत्स्य (टेलिऑस्ट मासे), समुद्रातील गॅस्ट्रोपोडा (शंखधारी), बायव्हाल्व्हिया (शिंपाधारी) इ. गट पूर्वीप्रमाणे आजही प्रमुख आहेत.

नवजीव महाकल्पाच्या वर्गीकरणाची सामान्यतः प्रचारात असलेली योजना पुढील कोष्टकात दिलेली आहे.

नवजीव महाकल्पाचे व गणाचे विभाग

विभागाचे नाव

(कल्प व संघ)

उपविभागाचे नाव

(युग व माला)

उपविभागाचे

वय (वर्षे)

चतुर्थ

होलोसीन (पूर्णनूतन) किंवा रीसेंट (अभिनव)

११ हजार

प्लाइस्टोसीन (अत्यंत नूतन) किंवा हिमकाल

६ लाख

तृतीय

प्लायोसीन (अतिनूतन)

१·२ कोटी

मायोसीन (मध्यनूतन)

२·० कोटी

ऑलिगोसीन (अल्पनूतन)

३·५ कोटी

इओसीन (आदिनूतन)

५·५ कोटी

पॅलिओसीन (पुरानूतन)

६·५ कोटी

भौगोलिक फेरफार : नवजीव महाकल्पात पृथ्वीच्या भौगोलिक स्वरूपात व तिच्यावरील जीवांत प्रचंड फेरफार घडून आले. कवचाच्या हालचाली घडून येऊन द. यूरोप आणि दक्षिण व आग्नेय आशियात पसरलेल्या आल्प-हिमालयादि पर्वतरांगा व पॅसिफिकभोवतालच्या पर्वतरांगा निर्माण झाल्या. ⇨ गोंडवन भूमी भंग पावून तिचे ऑस्ट्रेलिया, द. अमेरिका, द. आफ्रिका इ. घटक अलग झाले. भारताच्या द्वीपकल्पाचा आफ्रिकेशी असलेला संबंध तुटला व त्याच्या उत्तरेस असलेल्या टेथिस समुद्राच्या क्षेत्रात पर्वतरांगा निर्माण होऊन ते आशिया खंडाला जोडले गेले [→ खंडविप्लव]. असे अनेक फेरफार होऊन तृतीय कल्पाच्या अखेरीस पृथ्वीवरील खंडांना जवळजवळ आजच्यासारखे आकार प्राप्त झाले. पृथ्वीच्या पुष्कळ क्षेत्रांत ज्वालामुखी क्रिया घडून आली. मध्यजीव महाकल्पाच्या अखेरीस व तृतीय कल्पाच्या प्रारंभीच्या काळात भारताच्या द्वीपकल्पात भेगी ज्वालामुखींची प्रचंड उद्‌गिरणे झाली [→ दक्षिण ट्रॅप].

हवामानातील फेरफार: नवजीव महाकल्पाच्या प्रारंभी उष्ण कटिबंधाचा पट्टा आजच्यापेक्षा बराच रुंद होता व एकूण पृथ्वीचे हवामान आजच्यापेक्षा उबदार होते. बहुतेक सर्व महासागरांच्या पाण्याचे तापमान उष्ण किंवा उपोष्ण होते. दक्षिण गोलार्धातील खंडांविषयी सविस्तर माहिती मिळालेली नाही पण उत्तर गोलार्धातील ५० अक्षांशांपर्यंतच्या प्रदेशात उपोष्ण हवामान होते, असे त्या प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींच्या जीवाश्मांवरून कळून आलेले आहे. तृतीय कल्पाच्या अखेरच्या काळात हवामान उत्तरोत्तर थंड होत जाऊन उष्णतामानाचे आजच्यासारखे ठळक पट्टे निर्माण झाले. नंतर थंडी वाढत राहून प्लाइस्टोसीन हा हिमकाल अवतरला. त्या काळी उष्ण कटिबंधाचा पट्टा आजच्यापेक्षा अरुंद व शीत कटिबंधाचा पट्टा अधिक विस्तृत होता आणि उ. अमेरिकेच्या उत्तरेकडील व यूरोपच्या वायव्येकडील विस्तीर्ण प्रदेशांवर हिम-बर्फाचे आच्छादन पसरले होते. त्यानंतर काही काळाने थंडी कमी होऊन हवामानाचे आजचे पट्टे निर्माण झाले.

जीवसृष्टी: सागरातील ॲमोनाइट व जमिनीवरील महान सरीसृप (सरपटणारे प्राणी) निर्वंश झाले, तेव्हा मध्यजीव महाकल्पाची समाप्ती होऊन नवजीव महाकल्पाचा प्रारंभ झाला. नवजीव महाकल्पात समुद्रातील प्राण्यांपैकी बायव्हाल्व्हिया, गॅस्ट्रोपोडा, एकिनॉयडियांचे काही गट व फोरॅमिनीफेरा यांचा अतिशय विकास झाला व अखेरीस सागरातील आजचे प्राणिसमूह अवतरले. मत्स्यांपैकी अस्थिमत्स्य गटाचाही अतिशय विकास झाला. नवजीव महाकल्पाच्या प्रारंभापासून ते आजपर्यंतच्या कालावधीत अस्थिमत्स्यांची संख्या व वैचित्र्य ही इतर पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांपेक्षा अधिक राहिलेली आहेत, म्हणून नवजीव महाकल्पाला ‘अस्थिमत्स्यांचा काळ’ असे म्हणता येईल.

जमिनीवरील वनस्पतींपैकी सपुष्प वनस्पतींचा, विशेषतः गवतांचा, कल्पनातीत विकास झाला व त्याच्यामागोमाग प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने वनस्पतींवर निर्वाह असणाऱ्या सस्तन प्राण्यांचा व पक्ष्यांचाही अतिशय विकास झाला.

नवजीव महाकल्पाच्या प्रारंभीचे सस्तन प्राणी लहान व आदिम जातींचे होते. त्यांचा, विशेषतः त्यांच्यापैकी अपरास्तनींचा (वार असणाऱ्या प्राण्यांचा), विकास होऊन मोठे व विशेषीकृत अंगे असणारे खुरी (उदा., गाय, उंट, हत्ती) मांसभक्षक (उदा., सिंह, कुत्रा) कृंतक म्हणजे कुरतडून खाणारे प्राणी (उदा., उंदीर, ससा) तिमी (उदा., देवमासा, डॉल्फिन) नरवानर (प्रायमेट्स) इ. गटांचे प्राणी निर्माण झाले. त्यांच्यापैकी काही (उदा., वटवाघळे) उडू शकतात काही सागरात राहतात. नवजीव महाकल्पाच्या प्रारंभापासून सस्तन प्राणी हेच जमिनीवरील प्राण्यांत प्रमुख राहिलेले आहेत म्हणून नवजीव महाकल्पाला ‘सस्तन प्राण्यांचा काळ’ असे म्हणतात.

तृतीय कल्पाच्या किंचित आधी ऑस्ट्रेलिया इतर खंडांपासून वेगळा झाला व तेव्हापासून तो वेगळाच राहिलेला आहे. तो वेगळा झाला तेव्हा त्याच्यात अंडजस्तनी (अंडी घालणाऱ्या स्तनी मोनोट्रीम) गटाचे काही सस्तन प्राणी असावेत, पण त्यांच्यातील जवळजवळ सर्व सस्तन प्राणी धानी (जिच्यात लहान पिलांची वाढ होते अशी पिशवी उदरावर असलेल्या प्राण्यांच्या) गटाचे होते. इतर खंडांत जसे आदिम अपरास्तनी होते तसे ऑस्ट्रेलियात नव्हते. मनुष्य जाण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात ज्यांचा प्रवेश होणे शक्य होते असे सस्तन प्राणी म्हणजे वटवाघळे व समुद्राच्या पाण्यावर तरंगत जाणाऱ्या लाकडी ओंडक्याबरोबर जाऊ शकणारे कृंतक हे होत. अशांची संख्या अल्पच असणार म्हणून ऑस्ट्रेलियात धानी प्राण्यांचा क्रमविकास होऊ शकला आणि त्यांचे तृणभक्षक, मांसभक्षक, कृंतक-सम इ. अनेक प्रकार निर्माण झाले.

तृतीय कल्पाच्या प्रारंभी द. अमेरिका ही उ. अमेरिकेशी अल्पकाल जोडली गेली होती पण त्यानंतर बराच काळ ती उ. अमेरिकेपासून वेगळी होती. तृतीय कल्पाच्या अखेरीस ती दोन्ही पुन्हा जोडली गेली. द. अमेरिका वेगळी झाली तेव्हा तिच्यात धानी प्राण्यांशिवाय काही आदिम अपरास्तनीही होते. त्यांचा विकास होऊन अनेक प्रकारचे लहानमोठे व राक्षसी आकारमानाचेही तृणभक्षक पशू निर्माण झाले. ते इतर खंडांतील तृणभक्षकांपेक्षा वेगळ्या जातींचे होते. मांसभक्षक अपरास्तनींचा विशेष क्रमविकास झाला नाही. त्या खंडातील मांसभक्षक मुख्यतः धानी गटाचे होते.

तृतीय कल्पाच्या बऱ्याचशा काळात आता बेरिंगची सामुद्रधुनी आहे. त्या भागातील एका जमिनीने उ. अमेरिका व यूरेशिया ही एकमेकांस जोडली गेली होती व त्यांच्यापैकी एकातील प्राणी दुसऱ्यात जाऊ शकत. आफ्रिका व यूरेशिया यांच्यापैकी एकातील प्राणीही दुसऱ्यात जाऊ शकत. या सर्व खंडांतील आदिम अपरास्तनींचा वेगाने विकास होऊन इतर सस्तन गट मागे पडले. प्रगत अपरास्तनींच्या लहानमोठ्या प्राण्यांच्या शेकडो जाती निर्माण झाल्या. तृतीय कल्पाच्या अखेरच्या प्लायोसीन काळात स्तनी प्राण्यांपैकी सर्वांत मोठे शरीर असणाऱ्या जाती वरील खंडांत होत्या. दक्षिण गोलार्धातील खंडांत प्लाइस्टोसीन काली कशी परिस्थिती होती, याविषयी माहिती विशेषशी मिळालेली नाही पण उत्तर गोलार्धातील खंडांविषयी पुष्कळ माहिती मिळालेली आहे. त्या काळी उत्तर गोलार्धातील उत्तरेकडच्या प्रदेशांचे हवामान जीव जगण्यास अत्यंत प्रतिकूल होते. तेथील कित्येक प्राणी अधिक उबदार हवामान असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशात जाऊ शकले पण पुष्कळसे विशेषतः राक्षसी आकारमान असणारे सस्तन प्राणी नष्ट झाले. प्लाइस्टोसीन काली अश्मयुगीन मानव पृथ्वीवर होता.

नवजीव महाकल्पाच्या प्रारंभीच आदिम, सदंत पक्षी निर्वंश होऊन आधुनिक पक्षी अवतरले होते आणि या महाकल्पाच्या प्रारंभीच्या काळातही भिन्नभिन्न प्रकारचे लहानमोठे पक्षी असत.

खडक: नवजीव महाकल्पात तयार झालेले सागरी व असागरी गाळांचे खडक सर्व खंडांत आढळतात. ते सापेक्षतः अलीकडील काळात तयार झालेले असल्यामुळे क्षरणाने (झीज होऊन) त्यांचा विशेषसा नाश झालेला नाही किंवा त्यांच्यात विशेषसे फेरफार झालेले नाहीत. या महाकल्पाच्या प्रारंभीच्या किंवा मधल्या काळात तयार होऊन नंतर उचलले गेलेले खडक प्रमुख पर्वतरांगांच्या उंच भागातही आढळतात. भारताच्या द्वीपकल्पाच्या वायव्य, उत्तर आणि पूर्व सीमांवरील पर्वतरांगांत तृतीय कल्पातील गाळाच्या खडकांच्या प्रचंड राशी आढळतात. त्यांपैकी अधिक जुने खडक सागरांत व अधिक नवे जमिनीवर तयार झालेले आहेत. भारताच्या द्वीपकल्पाच्या पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवरील कित्येक जागी तृतीय कल्पातील सागरी खडकांच्या लहानलहान राशी आढळतात. सिंधु-गंगा मैदानी प्रदेशातील जलोढ (गाळ) या महाकल्पाच्या अगदी अलीकडच्या काळातील आहेत.

पहा : चतुर्थ कल्प तृतीय संघ.

संदर्भ : 1. Kay, M. Colbert, E. H. Stratigraphy and Life History, New York, 1965.

           2. Pascoe, E. H. A Manual of the Geology of India and Burma, Vol. III, Calcutta, 1964.

केळकर, क. वा.