द्रोणी (बेसीन). सीमेकडून मध्याकडे नती (उतार) असणारे खडकांचे थर असलेली संरचना ज्यात आहे, असे क्षेत्र. झीज व भर झालेली असल्याने असे क्षेत्र खोलगट दिसेलच, असे नाही उदा., लंडन व पॅरिस द्रोणी. मात्र अधिक विद्राव्य (विरघळणारे) घटक विद्रावांवाटे निघून जाण्यासारख्या क्रियेने अशी संरचना भूपृष्ठावर उघडी पडल्यास जवळजवळ वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार खळग्यासारखी दिसते व कधी कधी खोलगट भागात सरोवर निर्माण होऊ शकते. अशी संरचना सामान्यतः खडकांना घड्या पडून निर्माण होते [→ घड्या, खडकांतील].

 

पुष्कळदा व्यापक अर्थाने ढोबळपणे वर्तुळाकार वा लंबवर्तुळाकार आकाराच्या जमिनीवरील वा समुद्रतळावरील बऱ्याच मोठ्या खोलगट प्रदेशालाही द्रोणी म्हणतात. उदा., महासागर, सरोवरे वगैरे. या प्रदेशाभोवती पूर्णपणे वा बहुतेक बाजूंनी उंचवटा असतो. अशा द्रोणी लहान डोंगरांनी वेढलेल्या दरीपासून ते महासागरांच्या द्रोणीपर्यंतच्या आकारमानाच्या असतात. भूकवचात प्रत्यक्ष हालचीली होऊन (उदा., पृथ्वीचे कवच खाली वाकविले जाऊन वा जमीन वर उचलली जाऊन), ज्वालामुखीचा शंकू आत कोसळला जाऊन तसेच हिम अथवा वाहते पाणी यांच्या क्रियांनी क्षरण (झीज) होऊन अशा द्रोणी निर्माण होतात. त्यांच्यामध्ये पाणी, माती, गाळ, इ साचू शकतो. नेव्हाडाच्या उंच पठारीतील द्रोणी (अमेरिका), तारिम द्रोणी (मध्य आशिया), काँगो द्रोणी (अाफ्रिका) इ. अशा प्रकारच्या द्रोणी आहेत.

ठाकूर अ. ना.