पायरोटाइट : (पायरोटाइन). खनिज. स्फटिक षट्कोणी बहुधा वडीसारखे, कधीकधी पापुद्र्यासारखे वा प्रसूच्याकार स्फटिकांवर आडव्या रेखा असतात. १३८० से. तापमानाच्या वर ते समचतुर्भुजी होते [→स्फटिकविज्ञान]. बहुधा ते संपुंजित व पटलित (पापुद्र्यांच्या) रूपांत आढळते. भंजन खडबडीत ते काहीसे शंखाभ [→खनिजविज्ञान]. ठिसूळ.

पायरोटाइटचा स्फटिक

कठिनता ३.५-४.५. वि. गु. ४.६-४.७. ताज्या पृष्ठाचा रंग तांबूस, मात्र हे चटकन बदलत असल्याने रंग उदसर काशासारखा (ब्राँझसारखा) दिसतो. कस करडसर काळा. अपारदर्शक. चुंबकीय. रा. सं. Fe1-xS (येथे x=० ते ०.२). ट्रॉयलाइट या याच्या प्रकारचे रा. सं. जवळजवळ FeS व वि. गु. ४.७९ असून तो काही अशनींमधील (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येऊन पोहोचलेल्या पृथ्वीबाहेरच्या पदार्थांमधील) महत्त्वाचा घटक असतो.

पायरोटाइट अग्निज खडकांत गौण घटक म्हणून आढळते मात्र गॅब्रो, नोराइटासारख्या अल्पसिकत (सिलिकेचे प्रमाण कमी असलेल्या) अग्निज खडकांत याचे मोठे साठे आढळतात. कधीकधी रूपांतरित खडक, शिरा व पेग्मटाइट यांतही हे आढळते. पेंटलँडाइट, कॅल्कोपायराइट आणि इतर सल्फाइडी खनिजे यांच्या जोडीने पायरोटाइट आढळते. नॉर्वे (काँग्जबॅर), कॅनडा, (सडबरी), जर्मनी (सेंट आंद्रेआस्बेर्क), इटली (त्रेनतीनो-आल्तो आदीजे), फिनलंड, स्वीडन, बव्हेरिया इ. भागांत याचे साठे आहेत. कधीकधी याचा लोहाचे धातुक (कच्च्या रूपातील धातू) म्हणून उपयोग होतो (उदा., स्वीडन). यातील निकेलाच्या खनिजांमुळे कधीकधी ते निकेल मिळविण्यासाठीही काढतात (उदा., कॅनडा, पू. जर्मनी, बव्हेरिया). याच्या ताज्या पृष्ठाच्या रंगावरून तांबूस अर्थाच्या ग्रीक शब्दावरून पायरोटाइट हे नाव जे. डी. डेना यांनी १८६८ साली दिले. चुंबकीय गुणधर्मामुळे याला मॅग्नेटिक पायराइट हे नावही देण्यात येते.

ठाकूर, अ. ना.