लॅझुलाइट : (बर्किआइट, ब्ल्यू स्पार). खनिज. स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार [⟶ स्फटिकविज्ञान] व क्वचित आढळतात. बहुधा संपुंजित, कणमय ते घट्ट राशीच्या रूपात आढळते. ⇨ पाटन : (110) अस्पष्ट. भंजन खडबडीत ते ढलपीसारखे. कठिणता ५-५.५. वि.गु. ३-३.१. चमक काचेसारखी. दुधी काचेप्रमाणे पारभासी. क्वचित पारदर्शक. रंग गडद निळा. रा.सं. MgAl2(OH)2(PO4)2. यात बहुधा मॅग्नेशियमाच्या जागी फेरस लोह आलेले असून अशा प्रकारे FeAl2(OH)2(PO4)2 म्हणजे स्कोर्झालाइट (ई.पी. स्कोर्झा या ब्राझिलियन खनिजवैज्ञानिकांच्या नावावरून) या खनिजापर्यंतची मालिका आढळते. फुंकनळीने तापविल्यास प्रथम लॅझुलाइटाचा रंग उडून जातो व नंतर तुकडे पडतात. बंद नळीत तापविल्यास नळी धुरकट दिसते व पाणी बाहेर पडते. पाण्यात विरघळत नाही. रा.सं. व फुंकनळी परीक्षेद्वारे इतर निळ्या खनिजांपासून वेगळे ओळखता येते.

 

विरळाच आढळणारे हे खनिज ग्रॅनाइट पेग्मटाइट, ॲल्युमिनियमयुक्त रूपांतरित खडक, क्वॉर्ट्झाइट इ. खडकांत कायनाइट, अँडॅलुसाइट, कुरुविंद वा रूटाइल या खनिजांबरोबर आढळते. ऑस्ट्रिया, स्टीरिया, स्वीडन, अमेरिका, मॅलॅगॅसी, ब्राझील येथे हे आढळते. गौण रत्न म्हणून हे वापरतात. पारभासी प्रकार मदारघाटी प्रकाराने कापतात तर पारदर्शक प्रकाराला पैलू पाडतात. निळ्या रंगामुळे आकाश अर्थाच्या अरबी शब्दावरून याचे लॅझुलाइट हे नाव पडले आहे.

ठाकूर, अ. ना.