व्हर्मिक्युलाइट : मृद्-खनिज (मॅग्नेशियम, लोखंड, ॲल्युमिनिअम, सिलिकॉन, ऑक्सिजन ही मूलद्रव्ये व पाण्याचे रेणू या खनिजात असतात). स्फटिक एकनताक्ष [→ स्फटिकविज्ञान]. नम्य व लवचीक नसलेल्या अभ्रकासारख्या पापुद्य्रांच्या (पत्रीच्या) रूपात हे आढळत असून काही पापुद्य्रांत पाणी असते. ⇨पाटन : (001) चांगले. रंग पांढरा ते पिवळा आणि तपकिरी हिरवा. कठीनता १·५ वि. गु. २·४ रा. सं. (Mg, Fe, Al)3 (Al, Si)4 O10 .4H2O. हे जलदपणे ३००से. पर्यंत तापविल्यास यातील पाणी निघून जाते व अपपर्णनाने (पापुद्रे सैल होऊन सुटे होण्याच्या प्रक्रियेने) हे २० पट फुगू शकते. यामुळे हे कृमीसारख्या आकारात प्रसरण पावते (यावरूनच कृमी उत्पन्न करणे या अर्थाच्या लॅटिन शब्दांवरून याचे व्हर्मिक्युलाइट नाव पडले आहे). परिणामी हे सच्छिद्र व हलके (वि. गु. सु. ०·०९) बनते. अभ्रकी खनिजांत (उदा., कृष्णाभ्रकात) जलतापीय (तप्त पाण्याच्या) क्रियांमुळे बदल होऊन हे बनते. अमेरिका (माँटॅना, कॅरोलायना, वायोमिंग), दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, ब्राझील व भारत (आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान) या देशांत हे आढळते. अमेरिकेत याचे सर्वाधिक उत्पादन व खप होतो.

प्रसरण पावलेल्या या खनिजाचा उपयोग हलके सिमेंट व प्लॅस्टर, तसेच कागद, रंगलेप व प्लॅस्टिक, तेलाचे गाळणे यांमध्ये होतो. अदाह्य आवेष्टन व भरण द्रव्य, ध्वनी व उष्णता निरोधक, उच्चतापसह पदार्थ, बीज संवर्धनाचे माध्यम व ग्रॅफाइटाऐवजी वंगण म्हणून याचा उपयोग होतो. जमिनीचा कस सुधारण्यासाठीही हे वापरतात.

पहा : मृद्-खनिजे.

ठाकूर, अ. ना.