एपिडायोराइट : खडक. ग्रॅब्रो, डोलेराइट, बेसाल्ट यांसारख्या खडकांवर दाब व जलतापीय (उच्च तापमानाच्या पाण्याची) क्रिया यांचा परिणाम होऊन त्यांचे खनिज संघटन बदलते व जवळजवळ डायोराइटासारखे होते. म्हणून अशा बदललेल्या खडकांना एपिडायोराइट म्हणतात. वरील खडकांतील पायरोक्सिनाचे रूपांतर अँफिबोलात झालेले असते. पुष्कळदा पायरोक्सिनातील (001) किंवा (100) तलाला [→ स्फटिकविज्ञान] समांतर असलेली पाटनपृष्ठे [→ पाटन] अँफिबोलातही (हॉर्नब्लेंडातही) राहिलेली आढळतात. तसेच लॅब्रॅडोराइट या कॅल्शियमी प्लॅजिओक्लेजाचे ऑलिगोक्लेज व अल्बाइट या सोडियमयुक्त प्लॅजिओक्लेजात रूपांतर झालेले असते. लॅब्रॅडोराइटाच्या स्फटिकांची आत्मरूपिक व वडीसारखी ठेवण व जटिल यमलन (जुळे स्फटिक) ही अल्बाइटातही तशीच राहिलेली आढळतात. एपिडायोराइटात अँफिबोल व फेल्स्पार यांशिवाय एपिडोट, गार्नेट, स्फीन किंवा कणीदार क्वॉर्ट्‍‌झ ही पुनर्स्फटिकीभूत गौण खनिजेही असतात. अधिक तीव्र रूपांतरण झाले असता एपिडायोराइटाऐवजी हॉर्नब्लेंड सुभाजा (सहज भंग पावणारे खडक) तयार होतात. धारवाड संघातील अल्पसिकत (सिलिका कमी असलेल्या) रूपांतरित खडकांच्या समूहात हॉर्नब्लेंड सुभाजांच्या जोडीने एपिडायोराइट विपुल आढळतात.

केळकर, क. वा.