लिनीआइट : (कोबाल्ट पायराइट) खनिज. स्फटिक घनीय अष्टफलकीय [⟶ स्फटिकविज्ञान]. याच्या कणमय किंवा घट्ट राशी आढळतात. रंग फिकट करडा, कधीकधी काळपट ते जांभळट करडा वातावरणक्रियेने रंग तांबूस होतो. ताज्या पृष्ठाची चमक धातूसारखी. कठिनता ५-५.५. वि. गु. ४.५ – ४.८. भंजन खडबडीत ते काहिसे शंखाभ [⟶ खनिजविज्ञान]. रा. सं. (Co, Ni)3 S4. [(Co, Ni) (Co, Ni, Cu) S4] हे सर्वसाधारण सूत्र असलेल्या मालिकेतील प्रत्येक खनिजाला सामान्यपणे लिनीआइट म्हणतात. मात्र त्यांना निरनिराळी नावेही आहेत (उदा., झीगेनाइट, कॅरोलाइट, व्हायोलराइट इ.). बंद नळीत तापविल्यास थोड्या वेळाने यातील गंधक बाहेर पडते. बोरॅक्स-मणी परीक्षेद्वारे याच्या निळ्या रंगामुळे हे ओळखता येते.

लिनीआइट इतर धातूंच्या सल्फाइडी खनिजांच्या बरोबर बहुतकरून जलतापीय खनिज शिरांत अल्प प्रमाणात आढळते (उदा., जर्मनी, अमेरिका). पुष्कळदा तांबे, शिसे व जस्त यांची धातूके (कच्च्या रूपातील धातू) तसेच कॅल्को-पायराइट ही खनिजे यांच्या बरोबर हे आढळते. कोबाल्टाचे धातूक म्हणून आणि निकेल मिळविण्यासाठी याचा उपयोग होतो. कार्ल लिनीअस यांच्या नावावरून या खनिजाला लिनीआइट हे नाव हायडिंजर यांनी १८४५ मध्ये दिले.

ठाकूर, अ. ना.