संगमरवर : कॅल्साइट (CaCO3 ) व डोलोमाइट [Ca Mg (CO3 )2 ] या खनिजांचे पुनर्स्फटिकीभवन होऊन संगमरवर हा रूपांतरित खडक बनतो. व्यापारी दृष्ट्या पॉलिश होऊ शकणाऱ्या कोणत्याही चुनखडकाला संगमरवर म्हणतात.

चुनखडकासारख्या कार्बोनेटी खडकांचे रूपांतरण सहजपणे होते. कारण कॅल्साइट, डोलोमाइट यांसारखी त्यातील खनिजे पाण्यात विरघळू शकतात. भूकवचात खोल भागात तापमान व दाब जास्त असतात. या जादा तापमानाला व दाबाला अशा खनिजांचे सहजपणे पुनर्स्फटिकीभवन होते. तेथे तप्त द्रव हे चांगले विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) ठरतात. शिवाय यांतील लाइम (CaO) व मॅग्नेशिया (MgO) हे चांगले विक्रियाशील घटक आहेत. ॲल्युमिनियम, सिलिकॉन इत्यादींनी युक्त असलेल्या खडका-तील अशुद्धीमुळे ही अस्थिरता मोठया प्रमाणात वाढते. उघडया हवेत कॅल्शियम कार्बोनेट (CaCO3) तापविल्यास त्यापासून लाइम व कार्बन डाय-ऑक्साइड वायू (CO2) मिळतात. यांपैकी कार्बन डाय-ऑक्साइड वायू हवेत निघून जातो. भूकवचामध्ये कॅल्साइट दाबाखाली तापल्यास (उदा., शिलारस घुसून बनलेल्या अग्निज अंतर्वेशनाने) त्याचे असे विघटन झाले तरी कार्बन डाय-ऑक्साइड तेथेच राहतो. यामुळे कॅल्शियम कार्बोनेटाचे तेथे फक्त पुनर्स्फटिकीभवन होते. परिणामी कणरोही (सममितीय कणांमुळे निर्माण होणारा पोत असलेले) पुंज तयार होऊन संगमरवर बनतो. या खडकाचा पोत व अशुद्घी असल्यास खनिज संघटनही मूळ खडकापेक्षा वेगळे असते. कॅल्साइट या एकाच खनिजाचा बनलेला शुद्ध संगमरवर पांढरा शुभ असतो. अशुद्धीमुळे त्याला विविध रंगछटा प्राप्त होतात उदा., फॉर्स्टेराइट (Mg2SiO4). या अशुद्धीच्या जलसंयोगाने सुंदर हिरव्या रंगाचा सर्पेंटाइन संगमरवर (ऑफिकॅल्साइट) बनतो. अशुद्धीमुळे संगमरवराच्या खनिज संघटनातही बदल होऊ शकतात. उदा., सिलिकॉन अशुद्धीमुळे सापेक्षत: कमी तापमानाला चर्टचे पुंज वा क्वॉर्ट्झाचे स्फटिक बनतात. उच्च् तापमानाला डायॉप्साइड व फॉर्स्टेराइट ही खनिजे बनतात आणि अति-उच्च् तापमानाला लार्नाइट, माँटिसेलाइट, रँकिनाइट इ. कॅल्शियमाची विरळ आढळणारी खनिजे रूपांतरणात तयार होतात. पाणी असल्यास संगजिरे, सर्पेंटाइन इ. सजल खनिजे बनतात. लोखंड, ॲल्युमिना (Al2O3) व सिलिका (Si O2) यांच्यामुळे हेमॅटाइट व मॅग्नेटाइट ही लोहखनिजे बनतात. काही बाबतींत या सर्व अशुद्घीच्या विक्रियांमधून गार्नेटे, पायरॉक्सिने व हॉर्नब्लेंडे बनतात. यांशिवाय फेल्स्पारे, स्पिनेल, बुसाइट, पेरिक्लेज, वोलॅस्टोनाइट, एपिडोट, कृष्णाभक, लेपिडोलाइट, स्फीन, ॲपेटाइट, ग्रॅफाइट इ. गौण खनिजेही संगमरवरात असू शकतात.

संगमरवरात स्फटिकीभूत कॅल्साइट व थोड्या प्रमाणात असे डोलोमाइट कण असतात. लहान कण नुसत्या डोळ्यांनी वेगवेगळे ओळखता येत नाहीत. यातील कण भरडही असू शकतात व त्यांच्यात वैशिष्टय्पूर्ण कॅल्साइट ⇨ पाटन स्पष्ट दिसू शकते. संगमरवरातील कण बहुधा अंतर्बंधनाने चिकटलेले असतात. कणांचे आकार, आकारमान व बांधणी यांव्दारे खडकाचे गुणधर्म ठरतात. प्रकाशाच्या कणांतील पारगमनानुसार संगमरवराची सुंदर चमक ठरते. त्याची कठिनता सु. ३ असते. अम्लाचा संगमरवरावर परिणाम होऊन फसफसण्याची क्रिया घडते. कारण त्यातून कार्बन डाय-ऑक्साइड वायूचे बुडबुडे बाहेर पडतात. मात्र डोलोमाइटी संगमरवराचे चूर्णच अम्लात असे विरघळते. हवेतील कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड या वायूंमुळे तसेच अम्ल पर्जन्यामुळे संगमरवराची झीज होऊ शकते.

कॅल्साइट हे संगमरवरातील मुख्य खनिज असून त्याचे कठिनता, प्रकाशाचे पारगमन व इतर गुणधर्म विविध दिशांत भिन्नभिन्न असतात. यामुळे तो वापरताना व्यावहारिक अडचणी येतात. कॅल्साइट द्विप्रणमनशील खनिज असल्याने संगमरवर कापताना काळजी घ्यावी लागते. संगमरवराच्या लाद्या वाकू शकतात. कारण तापल्यावर कॅल्साइट स्फटिकांचे दिशांनुसार भिन्न प्रमाणात प्रसरण होते.

संगमरवराचे जाड व विस्तृत थर जगात अनेक ठिकाणी आढळतात. अभकी सुभाजा, फायलाइट, पट्टिताश्म व गॅन्युलाइट या रूपांतरित खडकांबरोबर संगमरवर अंतस्तरित रूपात आढळतो. व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे संगमरवराचे साठे पुराजीव व कँबियन-पूर्व काळात (सु. ६० ते २४.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात) तयार झाले आहेत. इटली, गीस, अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियम, स्पेन, दक्षिण अमेरिकेतील देश इ. देशांत संगमरवराचे साठे आहेत. दक्षिण आफिकेतील नाताळ भागात डोलोमाइटी संगमरवराचे साठे आहेत.

भारतात संगमरवर विस्तृतपणे आढळतो. राजस्थानात अरवली मालेत याचे मोठे साठे आहेत. उदा., मकाना (जोधपूर) येथे पांढरा शुभ, काळा व गडदरंगी खारवा (अजमेर) येथे हिरवा व पिवळा मौंडला व मैसलाना (जयपूर) येथे घट्ट काळा व गडदरंगी दादिकर (अल्वर) येथे डोलोमाइटी किशनगढ जिल्ह्यात गडदरंगी व काळा तसेच जैसलमीर जिल्ह्यात पिवळा शेल (प्राणिज कवच) युक्त संगमरवर आढळतो. मध्य प्रदेशात नरसिंगपूर जिल्ह्यात ठिपकेदार गुलाबी, भेडाघाट (जबलपूरजवळ) येथे पांढरा व नर्मदेत इतरत्र गुलाबी, गुजरातमध्ये मोतीपुरा (बडोदे जिल्हा) येथे तुकतुकीत हिरवा ठिपकेदार, खिरासा सेद्रिजला येथे पांढरा, कठीण, ठिपकेदार संगमरवर आढळतो. भारतात इतरत्रही संगमरवर थोड्या प्रमाणात आढळतो. केरळच्या तिरूचिरापल्ली भागातील शेल चुनखडक कठीण, सूक्ष्मकणी, पारभासी असून तो अलंकरणाच्या कामासाठी वापरतात. बांधकामात तो त्रिचनापल्ली संगमरवर या नावाने वापरला जातो. पंजाबामधील मेहेंद्रगढ जिल्ह्याच्या नरनैल तहसिलमधील मंडी व दातला टेकड्यांत एके काळी काळ्या व पांढृया संगमरवराचे खाणकाम होत होते. मकाना संगमरवराच्या बुटक्या अरूंद व समांतर टेकड्या ८ किमी. लांब पट्टयत पसरलेल्या असून त्यांतील संगमरवराची जाडी भिन्न आहे. हा पांढरा मध्यम ते भरड कणी मधूनमधून गुलाबी व निळसर करडे पट्टे असलेला संगमरवर ताजमहाल व मोतीमशीद (आगा), व्हिक्टोरिया मेमोरियल (कोलकाता), दिल्ली व इतरत्रच्या मोगल इमारती बांधण्यासाठी वापरला आहे. संगमरवराचे ठिकाण, त्याचा शैलसमूह, त्यातील जीवाश्म व वैशिष्टय्-पूर्ण खनिज यांवरून त्याला नाव देतात उदा., मकाना संगमरवर, शेल संगमरवर, सर्पेंटाइन संगमरवर वगैरे. संगमरवराच्या चादरी सहजपणे वेगळ्या करता येत नाहीत, यामुळे याचे खाणकाम काळजीपूर्वक करावे लागते. याच्या खाणकामात स्फोटके मर्यादितपणे वापरतात. कारण त्यामुळे खडकांचे तुकडे व भुगा होऊन तो वाया जातो. खाणकाम करताना खडकांतील नैसर्गिक संधीचा फायदा घेतात. चॅनलिंग यंत्राने खडकात सु. ५ सेंमी. रूंद व काही मी. खोल पन्हाळीसारख्या खोबणी तसेच छिद्रे पाडतात. हे काम सर्वांत सोप्या विभाजन दिशेत व नियोजित ठोकळ्यानुसार करतात. त्यांच्यात पाचरी ठोकून ठोकळे सुटे करतात. असे ठोकळे करवतीने कापून हव्या त्या आकाराचे व आकारमानाचे तुकडे तयार करतात उदा., लाद्या, फरश्या इत्यादी. अशा काळजीपूर्वक खाणकामातही ५० टक्के खडक वाया जातो.

संगमरवर दिसायला सुंदर, कठीण, सघन, टिकाऊ, मजबूत, अग्निरोधक असतो. तसेच त्याला उत्तम पॉलिश करता येते व त्याची चमक वैशिष्ट्यपूर्ण (आकर्षक) असते. यामुळे हा खडक बांधकामाप्रमाणे पुतळे, शिल्पे, स्मारके, शिलालेख, कोनशिला, कबरी, इमारतीची बाह्य व अंतर्गत सजावट, फरश्या व खांब, नावीन्यपूर्ण वस्तू इ. असंख्य गोष्टींसाठी वापरला जातो. पुतळ्यासाठी पांढरा शुभ, चमकदार व एकसारखे कण असलेला संगमरवर वापरतात. तो सर्वांत महाग असतो. बाहेरच्या कामासाठी सच्छिद्र नसलेला व एकसारख्या पोताचा संगमरवर वापरतात. संगमरवराची कौलेही बनवितात. मात्र ती महाग असतात.

संगमरवराचे तुकडे व कपच्या रस्ते, कुट्टिमचित्रासारख्या जमिनी व भिंती, छतासाठीचे साहित्य इत्यादींमध्ये वापरतात. तुकडे दळून तयार केलेले चूर्ण साबणात अपघर्षक म्हणून आणि भिंतींच्या संदाव्यात (गिलाव्यात) वापरतात.

पहा : चुनखडक रायालो माला रूपांतरित खडक.

ठाकूर, अ. ना.