नॅट्रोलाइट: (सोडा झिओलाइट). झिओलाइट गटातील खनिज. स्फटिक एकनताक्ष (छद्म समचतुर्भुजी), प्रचिनाकार  प्रचिनांवर उभ्या रेषा असतात कधीकधी क्रूसाच्या आकाराचे जुळे स्फटिकही आढळतात [→ स्फटिकविज्ञान]. नॅट्रोलाइट बहुधा अरीय (त्रिज्यीय) मांडणीच्या पुंजांच्या व कधीकधी तंतुमय, संपुंजित, कणमय किंवा संहत रूपांत आढळते. ⇨पाटन(110) स्पष्ट. कठिनता ५–५·५. वि. गु. २–२·५. ठिसूळ. चमक काचेसारखी, तंतुमय प्रकाराची रेशमासारखी. रंगहीन वा पांढरे, कधीकधी पिवळसर, तांबूस वा करडसर छटा. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. रा. सं. Na2(Al2Si 3O10)·2H2O. कधीकधी सोडियमाच्या जागी थोडे पोटॅशियम आलेले असते. हे बंद नळीत तापविल्यास पाणी बाहेर पडते. मेणबत्तीच्या ज्योतीने हे वितळते. हे द्वितीयक (नंतरच्या क्रियांनी तयार झालेले) खनिज असून उकळबिंदूपेक्षा कमी तापमानाच्या पाण्यातील विद्रावाने निक्षेपित झालेले (साचलेले) असते. बेसाल्टासारख्या खडकांमधील पोकळ्यांच्या व भेगांच्या कडांशी याचे लेप आढळतात. इतर झिओलाइटे, कॅल्साइट इत्यादींच्या जोडीने हे आढळते. हे बोहीमिया, फ्रान्स, इटली इ. देशांत आणि महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकांत कोठे कोठे आढळते. हे पाणी मृदू करण्याच्या (ज्यात साबणाचा जलद व भरपूर फेस होतो असे करण्याच्या) दृष्टीने उत्कृष्ट असल्याने त्यासाठी याचा उपयोग करतात. यामध्ये सोडियम असल्याने सोडियम अर्थाच्या नॅट्रियम या लॅटिन शब्दावरून नॅट्रोलाइट हे नाव एम्. एच्. क्लापरोट या जर्मन रसायनशास्त्रज्ञांनी १८०३ साली दिले.

पहा : झिओलाइट गट.

ठाकूर, अ. ना.