अर्जेंटाइट: खनिज. याला ‘सिल्व्हर ग्‍लान्स’ असेही नाव आहे. सामान्यतः संपुंजित राशीच्या किंवा लेपाच्या स्वरूपात आढळते. याचे घनीय, अष्टफलकीय, द्वादशफलकीय किंवा षडष्टकफलकीय स्फटिक किंवा स्फटिक जुळून झालेल्या जाळ्यासारखे किंवा वृक्षासारखे गट आढळतात. सामान्य तापमानात अर्जेंटाइटाच्या स्फटिकांची आंतरिक संरचना समचतुर्भुजी व १८० से. पेक्षा अधिक तापमानात घनीय असते, असे क्ष-किरण व औष्णिक परीक्षणांवरून दिसून आलेले आहे [⟶ स्फटिकविज्ञान]. कठिनता २-२·५ वि. गु. ७·३. सहज छेद्य किंवा चाकूने कापता येते. अपारदर्शक. चमक धातूसारखी. कोरी पृष्ठे चकचकीत, उघड्यावर राहिलेली निस्तेज. रंग व कस शिशासारखा काळसर. कस चकचकीत. रा.सं. Ag2S. चांदीचा सर्वांत महत्त्वाचा धातुपाषाण. चांदी, चांदीचे खनिज संयुग, गॅलेना, पायराइट, स्फॅलेराइट, टेट्राहेड्राइट इ. खनिजांच्या जोडीने चांदी खनिज शिरांत आढळते. मेक्सिको, पेरू, चिली, बोलिव्हिया इत्यादींतील अर्जेंटाइटापासून चांदी मिळविली जाते. नाव चांदीच्या ‘अर्जेटम’ या लॅटिन नावावरून पडले आहे.

 

ठाकूर, अ. ना.