कार्ल्सबात (न्यू मेक्सिको, अमेरिका) येथील गुहेतील चुनखडी झुंबर, स्तंभ व खांब.

चुनखडी झुंबर व स्तंभ : चुनखडकातून ठिपकणाऱ्या विद्रावाने तयार झालेले कॅल्शियम कार्बोनेटाचे संधित रूपातील निक्षेप (साठे). चुनखडकातील असंख्य चिरा व भेगा यांच्यातून विरघळलेले कॅल्शियम कार्बोनेट असलेले पाणी जेव्हा झिरपून खाली पोकळ्यांत किंवा गुहांत उतरते तेव्हा त्याचे थेंब गुहांच्या छतांवर लोंबकळत राहतात. या थेंबांचे बाष्पीभवन होऊन अथवा त्यांच्यातील कार्बन डाय-ऑक्साइड वायू निघून गेल्यामुळे कॅल्शियम कार्बोनेट अवक्षेपित होते (न विरघळणाऱ्या साक्याच्या स्वरूपात साचते). एका पाठोपाठ एक अशा रीतीने येणाऱ्या थेंबांच्यामुळे होणाऱ्या थरांची पुटे चढत जाऊन छतापासून लटकणारे झुंबर तयार होते. कित्येकदा हे थेंब छतावर लोंबकळत न राहता खाली जमिनीवर एका पाठीमागून एक ठराविक वेळाने पडत जातात आणि त्यांचे स्तंभ तयार होतात. झुंबर व स्तंभ यांना अनुक्रमे स्टॅलक्टाइट व स्टॅलग्माइट अशी इंग्रजी नावे असून ती ठिपकणे या ग्रीक शब्दावरून आली आहेत. झुंबर व स्तंभ या दोन्हींना एकत्रितपणे इंग्रजीत ड्रिपस्टोन म्हणतात. झुंबर व स्तंभ जोडले जाऊन खांब तयार होतो, तर त्यांची वाढ आडवी झाल्यामुळे पडदे, चादरी इत्यादींसारखे व वेड्यावाकड्या पृष्ठांवर फ्लोस्टोन, ⇨ ट्रॅव्हर्टाइन  यांसारखे ओबडधोबड निक्षेप तयार होतात. कधीकधी या निक्षेपांनी गुहा भरून जाते.

हे निक्षेप तयार होण्यासाठी गुहेसारखी पोकळी, तिच्यावर चुनखडक व झिरपण्याची क्रिया सावकाश होण्यासाठी त्या खडकात चिंचोळ्या, अरुंद व अखंड भेगा असाव्या लागतात. तसेच बाष्पीभवन होण्यासाठी पोकळी पुरेशी हवेशीर असावी लागते. कॅल्शियम बायकार्बोनेटाचा संपृक्त (विरघळलेल्या पदार्थाचे, येथे कॅल्शियम बायकार्बोनेटाचे, प्रमाण जास्तीत जास्त असलेला) विद्राव थेंबाथेंबाने छतातून ठिपकताना त्याचे बाष्पीभवन होऊन त्यातील काही कार्बन डाय-ऑक्साइड वायू निघून जातो. त्यामुळे पाण्याची विद्रावकता (विरघळविण्याची क्षमता) कमी होऊन जादा झालेले कॅल्शियम कार्बोनेट अवक्षेपित होते. प्रत्येक थेंबामुळे पुटे चढत जाऊन झुंबराची लांबी वाढत गेल्याने दगडी नळी तयार होते. या नळीचा आतील व्यास पृष्ठताणाने तरंगणाऱ्या थेंबाच्या व्यासाएवढा असतो कारण थेंबाच्या बाह्य कडेशीच कॅल्शियम कार्बोनेटाचे अवक्षेपण होत असते. नळीच्या पोकळीमुळे विद्राव झुंबराच्या टोकापर्यंत जाऊन त्याची लांबी वाढत जाते. तसेच नळीच्या बाह्य पृष्ठावरून वाहणाऱ्या विद्रावामुळे तिची जाडी वाढते व ती खाली निमुळती होते. हवेच्या प्रवाहाचा उपद्रव न झाल्यास झुंबर ०·६ मी. पेक्षाही लांब वाढते. जमिनीवर पडणाऱ्या थेंबांचे पुन्हा बाप्षीभवन होऊन वरीलप्रमाणेच स्तंभ तयार होतो. मात्र प्रत्येक झुंबराखाली स्वतंत्र स्तंभ व स्तंभाच्या वर झुंबर असतेच, असे नाही.

झुंबर म्हणजे लांब नळाप्रमाणे मध्यभागी पोकळ आणि बहुधा खाली निमुळती होत जाणारी नळी असते. झुंबराचा आकार मुळा, गाजर, बीट इत्यादींसारखा असतो. स्तंभ झुंबराच्या मानाने आखूड, रुंद व भरीव असतो. कधीकधी स्तंभाच्या टोकाचा विद्राव होऊन तेथे खळगा पडतो व त्या विद्रावातील कॅल्शियम कार्बोनेट पुन्हा निक्षेपित होऊन त्याच्यापासून खळग्याच्या बाह्य कडा बनतात. झुंबर व स्तंभ या दोन्ही निक्षेपांचा रंग सामान्यपणे पांढरा ते करडा असतो. परंतु विद्रावातील इतर लवणांनुसार त्यांना इतर छटाही येतात. उदा., लोह लवणाने पिवळट, उदसर वा लालसर आणि तांब्याच्या लवणामुळे हिरवट किंवा निळसर. दोन्हींची लांबी सामान्यतः ०·३ मी. पेक्षा अधिक असते. कधीकधी लांबी फ्रान्समध्ये आढळलेल्या झुंबराप्रमाणे ३३ मी. पेक्षा जास्तही असते. समांतर पट्ट्यांच्या भिन्न रंगांमुळे तुटलेल्या झुंबरात संकेंद्री (एकाच केंद्राभोवती वलये असलेली) संरचना दिसते. मात्र ही वलये कालनिदर्शक नसतात.

हे निक्षेप सामान्यपणे चुनखडकांच्या आणि डोलोमाइटांच्या गुहांमध्ये आढळतात. अशा गुहा इंडियाना, न्यू मेक्सिको (नॅशनल पार्क, कार्ल्सबात) आणि केंटकी (मॅमथ) या अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील तसेच इंग्लंड, मध्य फ्रान्स, युगोस्लाव्हिया वगैरे भागांत आहेत. अल्जीरिया, ईजिप्त व इतरत्र आढळणारा ओरिएंटल ॲलॅबॅस्टर तसेच मेक्सिकन ऑनिक्स हेही चुनखडी स्तंभ होत.

कॅल्शियम कार्बोनेटाशिवाय इतर खनिजांचेही असे निक्षेप आढळतात. उदा., ओपल, कॅल्सेडोनी, मार्‌कॅसाइट, लिमोनाइट, इतर कार्बोनेटे व सल्फाइडे. लोह सल्फाइडाच्या झुंबराच्या ⇨ ऑक्सिडीभवनाने बनलेल्या लिमोनाइटालाच तथाकथित ‘नळ धातुक’ म्हणतात. हिमगुहांमध्ये हिमझुंबरे आढळतात, पण हिमस्तंभ क्वचित सापडतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या लाव्ह्याची झुंबरे वेगळ्या पद्धतीने तयार होतात. लाव्ह्याच्या प्रवाहाच्या शेवटच्या टप्प्यात त्याचे पृष्ठ घनरूप होते व त्याखालचा लाव्ह्याचा पुरवठा थांबला म्हणजे तेथे गुहा तयार होते. या गुहेच्या छताजवळील लाव्ह्यातील एकत्रित झालेले वायू व लाव्ह्याच्या फटींमधून येणारी हवा यांच्यातील ऑक्सिडीभवनाने उष्णता उत्पन्न होते. या उष्णतेने कधीकधी छताचे खडक वितळून त्यांचा रस खाली पडू लागतो. तो थिजल्याने काही ठिकाणी लाव्ह्याची वेडीवाकडी झुंबरे तयार होतात.

ठाकूर, अ. ना.