ॲझुराइट : (चेसीलाइट) खनिज. स्फटिक एकनताक्ष [→ स्फटिकविज्ञान]. स्फटिकांची ठेवण विविध प्रकारची. स्फटिक पुष्कळदा जटिल आकाराचे. अरीय (अऱ्यांसारख्या) रचनेचे, गोलसर किंवा मातीसारखे पुंजही आढळतात. पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी. चमक काचेसारखी ते जवळजवळ हिऱ्यासारखी. भंजन शंखाभ. ठिसूळ. कठिनता ३·५-४. वि.गु. ३·७७-३·८९. रंग आकाशी ते भडक निळा. कस खनिजाच्या रंगापेक्षा फिकट निळा [→ खनिजविज्ञान]. रा. सं. 2CuCO3·Cu(OH)2. ॲझुराइट हे सामान्यतः ⇨मॅलॅकाइटाच्या जोडीने आढळते, पण ते मॅलॅकाइटाइतके वारंवार आढळत नाही. ही दोन्ही खनिजे द्वितीयक (मूळ खडक तयार झाल्यानंतरच्या) प्रक्रियांनी तयार झालेली असतात. ज्याच्यात कार्बन डाय-ऑक्साइड वायू विरघळलेला आहे, अशा पाण्याची तांब्याच्या खनिजांवर क्रिया होऊन ती तयार होतात. तांब्याचे धातुपाषाण (कच्चे तांबे) असलेल्या शिरांच्या किंवा खडकांच्या उथळ भागात व तांब्याचे धातुपाषाण निक्षेप (नैसर्गिक साठे) असलेल्या सर्व प्रदेशांत ती आढळतात. नाव खनिजाच्या रंगावरून, ‘निळा’ या अर्थाच्या मूळ फार्सी किंवा अरबी शब्दाच्या ‘ॲझुअर’ या अपभ्रष्ट रूपावरून पडले आहे.

 

ठाकूर, अ. ना.