नायटर : (सोरा, सुखियाखार, सॉल्टपीटर). खनिज. स्फटिक समचतुर्भुजी, प्रसूच्याकार जुळे स्फटिक सामान्य असून त्यामुळे ⇨ ॲरॅगोनाइटाप्रमाणे छद्म षट्‌कोणी दिसते [⟶ स्फटिकविज्ञान]. बहुधा लेपांच्या व सुईसारख्या रेशमी स्फटिकांच्या तसेच कधीकधी संपुंजित कणमय व मातीच्या रूपांतही हे खनिज आढळते. पाटन : (011) चांगले. भंजन अर्धशंखाभ ते खडबडीत [⟶ खनिजविज्ञान]. कठिनता २. वि. गु. २·०९-२·१४. चमक काचेसारखी. रंग पांढरा, कस पांढरा वा रंगहीन. दुधी काचेसारखे पारभासी. रा. सं. KNO3. यात अगदी थोडे पाणी असते. हे पाण्यात सहज विरघळते. याचा वितळबिंदू ३३७° से. असून ४००° से. पेक्षा जास्त तापमानास याचे अपघटन होऊन (तुकडे पडून) ऑक्सिजन वायू बाहेर पडतो. हे जमिनीवर, गुहांच्या भिंतीवर व खडकांवर लेपाच्या रूपात व काही मातींचा एक घटक म्हणून सापडते. एकाआड एक उष्ण व आर्द्र असे हवामान असणाऱ्या प्रदेशांत हे तयार होते. चुनखडकांच्या व इतर गुहांतील तसेच रुक्ष प्रदेशांत जैव पदार्थांचे ऑक्सिडीभवन होऊनही हे तयार होते व तेथे सुट्या मातीच्या रूपाने आढळते. विपुल जैव द्रव्य असणाऱ्या जमिनीवर हे आढळते. येथे ते नायट्रोजनयुक्त वा जैव पदार्थावर सूक्ष्मजीवांची क्रिया होऊन बनत असावे. सोडा नायटर, एप्समाइट, नायट्रोकॅल्साइट व जिप्सम ही खनिजे याबरोबर आढळतात. स्पेन, इटली, ईजिप्त, इराण, अरेबिया, श्रीलंका, द. आफ्रिका, पेरू, बोलिव्हिया इ. प्रदेशांत हे आढळते. भारतामध्ये बिहार, पंजाब, बंगाल, कर्नाटक (रायबाग), आंध्र प्रदेश, तमिळनाडू व महाराष्ट्र या राज्यांत हे थोड्या प्रमाणात आढळते. स्फटिकीभवनाने हे शुद्ध रूपात मिळविण्यात येते. पूर्वी बिहारातून याची यूरोप व अमेरिकेत निर्यात होत असे. मात्र आता होणारी निर्यात क्षुल्लक आहे. हे प्राचीन काळापासून माहीत असून बाराव्या शतकामध्ये याचा बंदुकीच्या दारूत उपयोग होऊ लागला. नंतर फटाके, स्फोटक पदार्थ व आगकाड्यांमध्ये याचा उपयोग होऊ लागला. नायट्रोजनाची संयुगे व नायट्रिक अम्ल मिळविण्यासाठीही हे वापरीत असत. अन्नपदार्थ टिकविण्यासाठी, मांसाला धुरी देण्यासाठी, धुराचा माग काढणाऱ्या संयुगांत, औषधांमध्ये तसेच सल्फ्यूरिक अम्लाच्या उत्पादनात व रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिडीकारक व विक्रियाकारक म्हणून आणि द्रवरूप इंधने वापरणाऱ्या रॉकेटातही  ऑक्सिडीकारक म्हणून याचा उपयोग होतो. नायटर हा शब्द पौर्वात्य भाषांतून आला असावा.

पहा. सोडा नायटर.

ठाकूर, अ. ना.