बंगाली पट्टिताश्म : भारताच्या द्वीपकल्पातील, पट्टेदार रचना व स्पष्ट पर्णन (पापुद्रेयुक्त मांडणी) असणाऱ्या पट्टिताश्म नावाच्या रूपांतरित खडकांना उद्देशून ही संज्ञा वापरली जात असे आता ती क्वचित वापरली जाते. हे पट्टिताश्म सुभाजा खडकांत (सहजपणे भंग पावणाऱ्या रूपांतरित खडकात) ग्रॅनाइटचे अंतर्वेशन (घुसण्याची क्रिया) होऊन तयार झालेले व अंशतः ग्रॅनाइटांच्या पदार्थांचे आणि अंशतः सुभाजा खडकांच्या पदार्थांचे बनलेले असतात. मूळ सुभाजा खडक विविध प्रकारचे असल्यामुळे त्यांच्यापासून झालेल्या पट्टिताश्मांचे खनिज संघटनही विविध प्रकारचे असते. रूपांतरित खडकांत आढळणाऱ्या खनिजांपैकी पुष्कळशी खनिजे त्यांच्यात आढळतात. बंगाली पट्टिताश्मांसारखे पट्टिताश्म ⇨ द्वीपकल्पी पट्टताश्माच्या गटातही आढळतात.

केळकर, क. वा.