ट्रॅव्हर्टाइन : (कॅल्क सिंटर). झऱ्याच्या विशेषतः गरम झऱ्याच्या म्हणजे उन्हाळ्याच्या पाण्याद्वारे निक्षेपित  झालेला (साचलेला) फिकट चुनखडकाचा प्रकार. कमी घट्ट किंवा सच्छिद्र अशा ट्रॅव्हर्टाइनाला ⇨ टूफा   म्हणतात. मलिनद्रव्यामुळे याला सुंदर पिवळसर, गुलाबी वगैरै छटा येतात. कधीकधी हा पट्टेदारही असतो. हा दुधी काचेप्रमाणे काहीसा पारभासी असतो. याचे वयन (पोत) खडूसारखे, तंतुमय, परंतु संरचना विविध प्रकारची असते. हा बहुधा संधिते (गुठळ्या), घट्ट इ. रूपांत आढळतो. काही वेळा यांत पाने व फांद्या यांचे जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात.

रोमजवळ (इटली), ओव्हर्न (फ्रान्स), यलोस्टोन पार्क (अमेरिका) वगैरे ठिकाणी यांचे चांगले निपेक्ष (साठे) आहेत. याचा बांधकामासाठी व अंतर्गत सजावटीसाठी उपयोग करतात. रोममधील पुष्कळ इमारती (उदा., सेंट पीटर चर्च) याच्या आहेत. झिलई केलेले पट्टेदार ट्रॅव्हर्टाइन ऑनिक्स मार्बल, मेक्सिकन ऑनिक्स किंवा ईजिप्शियन ॲलॅबॅस्टर या नावांनी दागिन्यांत वापरतात. चुनखडक असणाऱ्या भागातील कार्बन डाय-ऑक्साइडयुक्त भूमिजलात कॅल्शियम कार्बोनेट विरघळते. असे पाणी ⇨उन्हाळ्याच्या रूपाने भूपृष्ठावर येते तेव्हा त्यावरील दाब कमी होऊन त्यातून काही कार्बन डाय-ऑक्साइड बाहेर पडतो. त्यामुळे पाणी कॅल्शियम कार्बोनेटाने संपृक्त (विरघळलेल्या पदार्थाचे प्रमाण कमाल असलेले) होते. अशा पाण्याचे बाष्पीभवन झाल्याने झऱ्याच्या मुखाशी काही कॅल्शियम कार्बोनेट साक्याच्या रूपात साचत जाते व ट्रॅव्हर्टाइन चुनखडक तयार होतो. चुनखडकांमधून वाहणाऱ्या नदीमुळे ट्रॅव्हर्टाइनाचे जाड थर साचून कधी कधी धबधबा निर्माण होऊ शकतो. याचे काही निक्षेप कॅल्शियमयुक्त (कॅल्केरियस) शैवलांद्वारे किंवा सूक्ष्मजंतूंद्वारे साचले असण्याची शक्यता आहे.

‘कोणत्याही बांधकामाचा दगड’ या अर्थाच्या इटालियन शब्दावरून ट्रॅव्हर्टाइन हे नाव पडले.

ठाकूर, अ. ना.