अंतरा-ट्रॅपी थर : ज्वालामुखी खडकांच्या जवळजवळ सपाट आडव्या थरांची राशी असली म्हणजे तिच्यातील खडकास ‘ट्रॅप’ म्हणतात व त्या राशीतील ज्वालामुखी खडकांच्या दोन थरांच्यामध्ये गाळांच्या खडकांचा थर असला तर त्याला ‘अंतरा-ट्रॅपी थर’ म्हणतात. एका उद्गिरणानंतर दिर्घ कालाने दुसरे, अशा रीतीने ज्वालामुखीची अनेक उद्गिरणे झाली म्हणजे ती होण्याचा मधल्या काळात आधीच्या उद्गिरणाने तयार झालेल्या ज्वालामुखी खडकावर वातावरण, पाणी इत्यादींच्या क्रियेने झीज होऊन तो खोदला जातो. त्याच्या पृष्ठात खळगे व घळी तयार होतात. अशा खळग्यांत किंवा घळींत वाहत्या पाण्याबरोबर आलेला गाळ साचतो. वाहत्या पाण्याबरोबर जीवांची शरीरे किंवा त्यांचे भाग येणे शक्य असते व तेही गाळात पुरले जाणे व नंतर जीवश्मरुपाने टिकून राहणे शक्य असते. पुढे दुसरे उद्गिरण झाल्यावर त्याच्या लाव्ह्यापासून तयार झालेल्या ज्वालामुखी खडकांचे झिजलेले पृष्ठ व त्या पृष्ठावर साचलेले गाळ ही झाकली जातात. अंतरा ट्रॅपी थर अशा रीतीने तयार झालेले असतात. भारतात आढळणारे महत्त्वाचे अंतरा-ट्रॅपी थर पुढील होत : (१) राजमहाल टेकड्यांतले, उत्तर गोंडवनी कालातील. त्यांच्यात सायकॅइडे [→ सायकॅडेलीझ बेनेटाइटेलीझ ] व थोडे नेचे व शंकुमंत (सूचिपर्णी वृक्ष) यांचे विपुल जीवाश्म आढळतात [→ गोंडवनी कल्प ]. (२) दक्षिण-ट्रॅपातील व सुमारे तृतीय कल्पाच्या प्रारंभाच्या कालातील ट्रॅप. यांच्यात पाम-वृक्षांचे, थोड्या द्विदलिकित वृक्षांचे व शंख, शिंपा, मासे, बेडूक, कासवे, कीटक, क्रस्टेशियन (कवचधारी) इत्यादींचे ⇨जीवाश्म आढळतात.   पहा : दक्षिण-ट्रॅप बेडूक-थर. केळकर, क. वा.