काष्ठजीवाश्म गट : (इरावती संघ). ब्रह्मदेशात आढळणाऱ्या व झाडांच्या खोडांचे अवशेष असलेल्या खडकांच्या एका गटाचे नाव. नद्यांच्या पाण्याबरोबर वाहत आलेला गाळ साचून हे खडक तयार झालेले असून ते पेगू संघाच्या खडकांवर सामान्यतः विसंगत रीतीने वसलेले आढळतात. बहुसंख्य खडक वालुकाश्म असून मधून मधून पिंडाश्म किंवा शेल हे खडकही आढळतात. या खडकांनी व्यापिलेल्या क्षेत्रातील अनेक जागी वृक्षांच्या खोडांच्या ओंडक्यांचे शेकडो किंवा हजारो जीवाश्म (शिळारूप अवशेष) आढळतात. त्यांपैकी पुष्कळशा ओंडक्यांच्या मूळच्या काष्ठाच्या जागी सिलिका पिली गेली असून त्या ओंडक्यांचे चांगले अश्मीभवन (खडकांत रूपांतर) झालेले आहे. पाण्याबरोबर वाहात आलेल्या वृक्षांची खोडे गाळात पुरली जाऊन येथील काष्ठजीवाश्म तयार झालेले आहेत. त्यांच्यापैकी काही बारा ते पंधरा मी. लांबीचे आहेत. एकदलिकित व व्दिदलिकित अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पतींच्या काष्ठांचे जीवाश्म येथे आढळतात. अनेक सस्तन प्राणिजातींचे व काही सुसरींचे व कासवांचे जीवाश्मही या खडकांत आढळतात. सस्तन प्राण्यांचे जीवाश्म हे घोडा, डुक्कर, हिप्पोपोटॅमस, गाय इ. प्राण्यांच्या गटांच्या पूर्वज जातींचे आहेत. या खडकांत लाकडाचे विपुल जीवाश्म आढळत असल्यामुळे त्याला काष्ठजीवाश्म (फॉसिलवुड) गट असे नाव थीओबोल्ड यांनी दिले होते, परंतु नंतर ते नाव बदलून इरावती संघ हे नाव दिले गेले. कारण या गटाचे खडक इरावती नदीच्या खोऱ्यात आढळत असून ते मध्य ब्रह्मदेशात दक्षिणोत्तर पसरलेले आहेत.

ठाकूर, अ.ना.