ऑलिगोसीन : भूवैज्ञानिक इतिहासातील एका विभागाचे नाव. कालाच्या विभागाला ऑलिगोसीन युग व त्या युगात तयार झालेल्या खडकांच्या गटाला ऑलिगोसीन माला म्हणतात. या सु. साडेतीन कोटी वर्षांपूर्वी सुरू झालेल्या व सु. दीड कोटी वर्षे टिकलेल्या कालविभागात जमिनीवरील सस्तन प्राण्यांचा विकास होऊन यूरोपात व उत्तर अमेरिकेत शृंगहीन ऱ्हिनोसेरॉस व हिप्पोपोटॅमस यांच्या नात्यातील अँथ्रॅकोथेअर्स व आफ्रिकेत हत्तींचे पूर्वज अवतरले. सागरात फोरॅमिनीफेरा विपुल पण पूर्वीपेक्षा कमी होते. कच्छातील नारी व आसामातील बराइल या माला ऑलिगोसीन कालातील आहेत.

पहा : नवजीव.

ठाकूर, अ. ना.