केओलीन : (चिनी माती). ही माती मुख्यत्वेकरून केओलिनाइट या सजल ॲल्युमिनियम सिलिकेटाची [Al4 (Si4O10) (OH)8] बनलेली असते. केओलिनाइट पांढऱ्या रंगाचे असते. कधीकधी मलद्रव्यांमुळे त्यास इतर रंगांच्या छटा येतात. या एकनताक्ष, प्रचिनाकार खनिजाचे स्फटिक अत्यंत सूक्ष्म आकारमानाचे, अतिपातळ व शंकरपाळ्याच्या किंवा षट्‌कोणी चकत्यांच्या आकाराचे असतात[→ स्फटिकविज्ञान]. पाटन :(001) उत्कृष्ट [→ पाटन]. कठिनता २ – २·५ व वि. गु. २·६० – २·६३. हे अविद्राव्य आणि अगलनीय (वितळण्यास कठीण) असते. याच्या चकत्यांची चमक मोत्यासारखी असते [→ मृद्-खनिजे].

ॲल्युमिनियम सिलिकेटे व मुख्यत्वेकरून फेल्स्पार यांच्यावर वातावरणक्रिया होऊन किंवा त्यांचे जलतापीय रूपांतरण (तप्त जलविद्राव किंवा वायूंमुळे बदल) होऊन केओलिन तयार होते. ते भूपृष्ठावरील खडकांच्या बारीक चुऱ्यात तसेच शेतमातीत आढळते. निर्मितीच्या मूळ स्थानापासून वाहतूक होऊन (उदा., वाहत्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाऊन) आणि इतर ठिकाणी निक्षेपण होऊन (साचून) केओलिनाचे काही साठे निर्माण झालेले आहेत.

केओलिनाचा मुख्य उपयोग चिनी मातीची भांडी आणि इतर वस्तू करण्यासाठी होतो. उच्च प्रतीच्या पांढऱ्या शुभ्र आणि धुतलेल्या केओलिनाचा अतिसूक्ष्म थर छापण्याच्या कागदावर देतात. त्यामुळे कागद मऊ व पांढरा शुभ्र होतो. छायाचित्रे व रंगीत चित्रे यांच्या छपाई करिता हा कागद विशेष उपयोगी पडतो. यांव्यतिरिक्त रबर, उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) विटा, पोर्सलीन, चिनी मातीच्या पांढऱ्या वस्तू, काही औषधे इ. बनविण्यासाठी केओलिन वापरतात. चीन हा या मातीचा सर्वांत मोठा उत्पादक देश असून इंग्लंड, झेकोस्लोव्हाकिया, जर्मनी व फ्रान्स हे केओलिनाचे साठे असलेले प्रमुख देश होत. भारतामध्ये उच्च प्रतीच्या चिनी मातीचे साठे बिहार, कर्नाटक, केरळ, तसेच दिल्ली व जबलपूर जवळचे भाग यांच्यामध्ये आहेत. पश्चिम बंगाल, ओरिसा, गुजरात, राजस्थान व तमिळनाडू या राज्यांतही चांगले केओलीन मिळते. पिवळट तपकिरी रंगाची ‘टेरा कोटा’ नावाची अशुद्ध चिनी माती भारतात पांढऱ्या शुभ्र चिनी मातीपेक्षा जास्त प्रमाणात मिळते. १९७० साली भारतात कच्च्या व प्रक्रियित चिनी मातीचे सु. ४५ लाख रु. किंमतीचे ६·५ लाख टन उत्पादन झाले. चीनमधील जौचु फा जवळील काउलिंग नावाच्या टेकडीत आढळत असल्यामुळे या मातीला काउलिंग हे नाव पडले. केओलीन हे त्याचे अपभ्रष्ट रूप आहे.

पहा : मृत्तिका उद्योग

आगस्ते, र. पां.