क्वॉर्ट्‌झ : खनिज. क्वॉर्ट्‌झ हा स्फटिकमय सिलिकेचा निसर्गात विपुल आढळणारा प्रकार होय. त्याच्या स्फटिकाचे सर्वसामान्य वातावरणीय दाबाच्या परिस्थितीत आणि नीच तापमानात (५७३० से. पर्यंत) स्थिर असणारा नीच किंवा आल्फा व उच्च तापमानात (५७३० ते ८६७० से. पर्यंत) स्थिर असणारा उच्च किंवा बीटा असे दोन प्रकार आहेत. आल्फा क्वॉर्ट्‌झाचे स्फटिक त्रिकोणीय समलंबफलकीय असतात व बीटा क्वॉर्ट्‌झाचे स्फटिक समांतरषट्फलकीय समलंबफलकीय असतात. दोन्ही प्रकारचे स्फटिक सामान्यतः प्रचिनाकार

क्वॉर्ट्‌झाचे स्फटिक

असतात व प्रचिनांच्या फलकांवर आडवे रेखांकन असते. प्रचिनांच्या टोकांशी धन व ऋण समांतरषट्फलकांचे प्रत्येकी तीन फलक असतात. त्यापैकी एकाचे  फलक अधिक मोठे व ठळक असतात (आ. ) आणि पुष्कळदा त्या दोघांची वाढ जवळजवळ सारखीच झालेली असते व त्यामुळे स्फटिक द्विप्रसूचीयुक्त षट्‍कोणीय प्रचिनासारखे दिसतात (आ. ). कधीकधी प्रचिनाच्या फलकांची वाढ झालेली नसते व केवळ समांतरषट्फलक वाढलेले असतात (आ. ). काही  स्फटिकांवर त्रिकोणीय समलंबफलकीय फलक (क्ष) वाढलेले असतात व ते असले म्हणजे स्फटिकांची खरी सममिती एकदम कळून येते. क्ष फलकांच्या स्थानाचे दोन प्रकार असतात  आणि त्यांच्या स्थानावरून स्फटिकांना दक्षिणहस्त व वामहस्त क्वॉर्ट्‌झ अशी नावे देतात. दक्षिणहस्त स्फटिकांतील (आ.) क्ष फलकांचे स्थान प्रचिनाच्या वरच्या अंगास उजव्या बाजूस व वामहस्त स्फटिकात (आ. ) ते डाव्या बाजूस असते. असे क्ष फलक स्फटिकावर नसतील, तर ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशाने तपासणी करून एखादा स्फटिक वाम-किंवा दक्षिण-हस्त आहे ते ठरवावे लागते. बीटा क्वॉर्ट्‌झाचे व अधिक उच्च सममिती  असलेले स्फटिक क्वचितच आढळतात. क्वॉर्ट्‌झाचे स्फटिक कधी  लांबट तर कधी बुटके व स्थूल असतात. स्फटिकांची वाढ होत असताना प्रचिन आणि समांतर क्वॉर्ट्‌झाचे स्फटिक षट्फलक यांची वाढ दोलायमान झाल्यामुळे प्रचिनांच्या फलकांवर आडव्या रेघा निर्माण झालेल्या असतात. स्फटिकांत यमलन (जुळेपणा) बहुधा नेहमी असते, पण काही विशेष पद्धती  वापरून पाहणी केल्याशिवाय ते ओळखता येत नाही [→ स्फटिकविज्ञान].

भौतिक गुणधर्ण : कठिनता ७. वि.गु.२·६५. भंजन (फुटणे) शंखाभ. चमक काचेसारखी, काही नमुन्यांमध्ये चरबीसारखी चकचकीत. बहुधा रंगहीन किंवा पांढरा रंग, परंतु जेव्हा क्वॉर्ट्‌झात काही मूलद्रव्ये असतात तेव्हा त्याला निरनिराळे रंग येतात. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. क्वॉर्ट्‌झामध्ये तीव्र असे दाबविद्युत् (स्फटिकावर दाब दिला असता विद्युत् भार निर्माण होण्याचा) आणि उत्तापविद्युत् (स्फटिकाच्या तापमानात योग्य बदल झाला असता त्याच्या निरनिराळ्या भागांवर धन व ऋण विद्यूत् भार निर्माण होण्याचा) गुणधर्म असतात. रा. सं. SiO2.याखनिजांच्या निरनिराळ्या प्रकारांपैकी नुसत्या क्वॉर्ट्‌झ या नावाने ओळखला जाणारा प्रकारच जवळजवळ पूर्णपणे या शुद्ध रासायनिक संघटनेचा असतो व त्याचे सर्व गुणधर्म न बदलणारे असतात. मात्र अतिशय शुद्ध समजल्या जाणाऱ्या परिपूर्ण स्फटिकांमध्ये देखील लिथीयम, सोडियम, पोटॅशियम, ॲल्युमिनियम, फेरिक लोह, द्विसंयुजी ( इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक २ असलेली) मँगॅनीज आणि टिटॅनियम ही मूलद्रव्ये अत्यल्प प्रमाणात असतात व त्यामुळे क्वॉर्ट्‌झाचे भौतिक गुणधर्म बदलतात.

अगलनीय (वितळण्यास कठीण), पाण्यात अविद्राव्य (न विरघळणारे) परंतु हायड्रोफ्ल्युओरिक अम्लात विद्राव्य. क्वॉर्ट्‌झाची भुकटी आणि सोडियम कार्बोनेट यांचे सम प्रमाणातील मिश्रण वितळविले, तर स्वच्छ काच तयार होते.

काचेसारखी चमक, शंखाभ भंजन व स्फटिकाकार या गुणधर्मांनी क्वॉर्ट्‌झ सहज ओळखता येते. पांढरे वैदूर्य (बेरिल) व कॅल्साइट ही क्वॉर्ट्‌झासारखी दिसतात, परंतु कॅल्साइटाची कठिनता क्वॉर्ट्‌झापेक्षा पुष्कळ कमी तर वैदूर्याची थोडी अधिक असते.


निसर्गात क्वॉर्ट्‌झाचे विविध प्रकार आढळतात. त्यांना निरनिराळी  नावे आहेत. अधिक महत्त्वाच्या प्रकारांचे संक्षिप्त वर्णन येथे दिले आहे.

स्पष्ट स्फटिकी प्रकार : (१) रॉक क्रिस्टल : रंगहिन, सामान्यतः मोठे स्पष्ट स्फटिक असलेला क्वॉर्ट्‌झाचा प्रकार.

(२) जमुनिया : (ॲमेथिस्ट). रंग जांभळा अथवा जांभळट. सामान्यतः अल्पप्रमाणात असलेल्या फेरिक लोहामुळे हा रंग आलेला असतो [→ जमुनिया].

(३) गुलाबी क्वॉर्ट्‌झ : याचे स्फटिक मोठे असतात, परंतु त्यांचे फलक व्यवस्थित तयार झालेले नसतात. याचा रंग गुलाबी असतो, पण पुष्कळदा प्रकाशात उघडे पडल्यास तो फिका होत जातो.

(४) धुरकट क्वॉर्ट्‌झ : (काइर्नगॉर्म स्टोन). याचे स्फटिक धुरकट पिवळ्या ते तपकिरी आणि जवळजवळ पूर्ण काळ्या रंगाचे असतात. वर्णपटीय विश्लेषणात अशा प्रकारच्या क्वॉर्ट्‌झात इतर द्रव्याची  कुठलीही मलिनता आढळलेली नाही. किरणोत्सारी (कण अथवा किरण बाहेर टाकणाऱ्या) पदार्थाचे प्रारण (तरंगरूपी ऊर्जा) क्वॉर्ट्‌झावर पडल्यामुळे त्याला काळा रंग येतो.

(५) सीट्रीन : हे फिक्या पिवळ्या रंगाचे असते.

(६) दुधी क्वॉर्ट्‌झ : या प्रकारच्या क्वार्ट्‌झाच्या स्फटिकात द्रायूंचे (द्रव या वायू यांचे) सूक्ष्म बुडबुडे किंवा थेंब समाविष्ट झालेले असतात व त्या समाविष्टांमुळे क्वॉर्ट्‌झाचे स्फटिक दुधी रंगाचे होतात. काही दुधी क्वॉर्ट्‌झाची चमक चरबीसारखी असते.

(७) मार्जारनेत्री : (कॅट्स आय). क्वॉर्ट्‌झाच्या ज्या प्रकाराला गोल आकार देऊन तो फिरविला असता त्याच्या अंगी ⇨ओपलासारखा रंग पालटण्याचा गुण दिसतो किंवा मांजराने जणू बुबळे फिरविल्याचा भास होतो त्याला ⇨मार्जारनेत्री असे म्हणतात. हा रंग फिरविण्याचा गुण तंतुमय पदार्थांच्या समाविष्टांमुळे किंवा क्वॉर्ट्‌झ स्वतःच तंतुमय असल्याने येतो.

(८) व्याघ्रनेत्री : (टायगर्स आय). क्वॉर्ट्‌झाचा मुख्यत: दक्षिण आफ्रिकेत आढळणारा, पिवळ्या रंगाचा व तंतुमय प्रकार. ‘क्रॉसिडोलाइट’  या तंतुमय ॲस्बेस्टसाच्या जागी क्वॉर्ट्‌झ येऊन म्हणजे प्रतिष्ठापनाने व्याघ्रनेत्री तयार झालेले असते.

(९) समाविष्टांनुसारही क्वॉर्ट्‌झाचे काही प्रकार निर्माण होतात. उदा., रूटीलेटेड क्वॉर्ट्‌झ. यात बारीक सुईच्या आकाराचे रूटाइलाचे स्फटिक असतात. अशाच प्रकारे कधीकधी तोरमल्ली (टुर्मलीन) व त्यासारखी खनिजेही क्वॉर्ट्‌झात असतात. ॲव्हेन्चुराइनामध्ये हेमॅटाइटाची अथवा अभ्रकाची लहान, चमकणारी, खवल्यासारखी समाविष्टे असतात. द्रव व वायू यांचीही समाविष्टे काही वेळा क्वॉर्टझात असतात. उदा., द्रवरूप कार्बन डाय-ऑक्साइडाची समाविष्टे.

गूढस्फटिकी प्रकार : गुढस्फटिकी (सूक्ष्म स्फटिकी) क्वार्ट्‌झाचे तंतुमय व सूक्ष्म कणमय असे दोन प्रकार आढळतात.

(अ) तंतुमय प्रकार : निरनिराळ्या तंतुमय प्रकारच्या क्वॉर्ट्‌झाला सर्व साधारणपणे ⇨कॅल्सेडोनीहे नाव देतात. खरे कॅल्सेडोनी वृक्काकार (मूत्रपिंडाच्या आकाराचे), स्तनाकार किंवा द्राक्षांच्या घडांसारखे तेलकट किंवा मेणासारखी चमक असणारे, पारभासी आणि तपकिरी ते पांढऱ्या रंगाचे असते. विविध रंग व पट्टन (पट्ट्यांसारखी संरचना) यांनुसार कॅल्सेडोनीचे पुढीलप्रमाणे प्रकार पडतात. (१) कार्नेलियन : लाल, (२) सार्ड : तपकिरी, (३) क्रिसोप्रेज: सफरचंदी हिरवे, (४) अकीक (ॲगेट): पट्टेदार प्रकार, शेवाळी अकीक (मॉस ॲगेट) : याच्यात मँगॅनीज  ऑक्साइड या मलद्रव्याच्या शेवाळाच्या रंगाच्या व आकाराच्या आकृत्या असतात. अकीकीकृत काष्ठ : काही लाकडांचे धुरकट अकीकाने प्रतिष्ठापन झालेले असते. अशा अश्मीभूत (शिळा रूप झालेल्या)लाकडाला सिलिकीकृत किंवा अकीकीकृत काष्ठम्हणतात ]→ अकीक [. (५) हेलिओट्रोप  किंवा ब्लडस्टेन : हिरव्या रंगाचे रक्तासारखा लाल जॅस्पराचे ठिपके असलेले कॅल्सेडोनी. (६) ऑनिक्स : अकीकासारखे परंतु पट्टे समांतर सरळ रेषेत असलेले कॅल्सेडोनी [→ ऑनिक्स ].

(आ)सूक्ष्मकणमय प्रकार (१) फ्लिंट : दिसण्यात कॅल्सेडोनीसारखे परंतु फिकट किंवा पुष्कळदा काळसर [→ फ्लिंट]. (२) चर्ट : फ्लिंटासारखे परंतु फिकट रंगाचे [→ चर्ट]. (३) जॅस्पर : हेमॅटाइटाच्या समाविष्टांमुळे तांबडी किंवा लाल झालेली सिलीका [→ जॅस्पर]. (४) प्रेझ : फिकट हिरव्या रंगाची व मंद तेज असलेली सिलिका.


आढळ : ग्रॅनाइट, रायोलाइट, पेग्मटाइट अशासारखे सिकत (सिलिका जास्त असलेल्या) अग्निज खडकांमध्ये क्वॉर्ट्‌झ हा महत्त्वाचा घटक असतो. वालुकाश्मांसारख्या गाळाच्या खडकांत तसेच पट्टिताश्म व सुभाजासारख्या रूपातरित खडकांतही क्वॉर्ट्‌झ विपुल प्रमाणात आढळते. क्वॉर्ट्‌झाइट या नावाचा खडक तर जवळजवळ पुर्णपणे क्वॉर्ट्‌झाचा बनलेला असतो. कित्येक खनिज शिरांमध्ये इतर खनिजे  वा धातुके (कच्ची धातू) यांच्याबरोबर विपुल क्वॉर्ट्‌झ असते. समुद्राच्या तळावर खडूचे (चॉकचे) निक्षेप साचत असताना त्यांच्यात फ्लिंटाच्या स्तनाकार किंवा ग्रंथिल (गाठीसारख्या) राशी तयार होतात. चर्ट हे चुनखडकांत तयार होते. नदीनाल्यांच्या गाळामध्ये, समुद्र किनाऱ्यावर, जमिनीवरच्या मातीत क्वॉर्ट्‌झ हे वाळूच्या स्वरूपात व भरपूर प्रमाणात असते.

क्वॉर्ट्‌झ हे पृथ्वीच्या सर्व भागात आणि सापेक्षतः विपुल प्रमाणात आढळते. १९७० साली भारतात १,६८,००० टन क्वॉर्ट्‌झाचे उत्पादन झाले व त्यापासून १३,८४,००० रु. मिळाले.

उपयोग : क्वॉर्ट्‌झाच्या विविध गुणधर्मांनुसार त्याचे पुष्कळ व निरनिराळे उपयोग होतात. हजारो टन क्वॉर्ट्‌झइमारतीच्या व इतर बांधकामासाठी वापरले जाते. क्वॉर्ट्‌झाइट व संहत (प्रमाण जास्त असलेला) वालुकाश्म हे इमारती दगड म्हणून वापरले जातात. क्वॉर्ट्‌झाची वाळू सिमेंटमध्ये व इमारती चुन्यामध्ये व त्याचे मोठे मोठे तुकडे काँक्रिटमध्ये मिसळतात. अपघर्षक (खरवडून किंवा घासून पृष्ठ गुळगुळीत करणारा पदार्थ), उच्चतापसह (उच्च तापमान सहन करू शकणाऱ्या) विटा, चांगल्या प्रतीची काच, पोर्सलीन, धातुकर्मातील अभिवाह (एखादा पदार्थ कमी तापमानास वितळण्यासाठी त्यात मिसळलेला पदार्थ). रंग, भरणद्रव्य इत्यांदीसाठी क्वॉर्ट्‌झ भरपूर प्रमाणात वापरले जाते. निरनिराळ्या रंगांचे व विविध प्रकारचे क्वॉर्ट्‌झआभूषणांसाठी व रत्ने म्हणून वापरले जाते. दाबविद्युतीय आणि उत्तापविद्युतीय गुणधर्म असणाऱ्या क्वॉर्ट्‌झाचा काही विशिष्ट विद्युत् उपकरणांमध्ये उपयोग करतात. क्वॉर्ट्‌झाचा  प्रसरण गुणांक अतिशय कमी असल्यामुळे ज्या क्रियांमध्ये तापमानात अचानक मोठे बदल होतात अशा क्रियांमध्ये वापरावयाच्या ताटल्या, मुशी इ. बनविण्यासाठी त्यांचा उपयोग करतात. अवरक्त व जंबुपार या (दृश्य वर्णपटातील तांबड्या आणि निळ्या रंगांपलीकडील अशा) दोन्ही प्रकारच्या प्रारणांमध्ये क्वॉर्ट्‌झ पारदर्शक रहात असल्यामुळे त्याची भिंगे व लोलक ही निरनिराळ्या शास्त्रीय उपकरणांत वापरली जातात. स्वच्छ पारदर्शक क्वॉर्ट्‌झाच्या चकत्या आणि पातळ पाचरीच्या आकाराच्या पट्ट्या ध्रुवण सूक्ष्मदर्शकात वापरतात. तसेच निरनिराळ्या तरंगलांबींचे एकवर्णी प्रकाश निर्माण करण्यासाठी क्वॉर्ट्‌झाचे लोलक वापरले जातात.

आल्प्स पर्वतामधील कडाक्याच्या थंडीत पाणी गोठून क्वॉर्ट्‌झ तयार होते, या कल्पनेवरून ग्रीक लोक त्याच्या स्वच्छ व निर्मळ स्फटिकांना ‘क्रिस्टलॉस’ अथवा ‘शुभ्र बर्फ’ असे म्हणतात. याच समाजावरून पुढे क्वॉर्ट्‌झाला ‘क्रिस्टल’ तसेच ‘रॉक क्रिस्टल’ ही नावे पडली. जॉर्ज अँग्रिकोला यांनी क्वॉर्ट्‌झ ह नाव इ. स. १५३० मध्ये प्रथम वापरले. क्वॉर्ट्‌झ हा एक प्राचीन जर्मन शब्द आहे.

आगस्ते, र. पां.