बळ्ळारी पट्टिताश्म : (बालाघाट पट्टिताश्म). कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यात आढळणारा पट्टिताश्म खडकांचा गट. १८८० साली डब्ल्यू. किंग यांनी या गटाला हे नाव दिले. सेलमजवळील होसूर पट्टिताश्म, अर्काटनजीकचे अर्काट पट्टिताश्म, कर्नाटकातील ⇨ क्लोजपेट ग्रॅनाइट  व ⇨ बुंदेलखंडी पट्टिताश्म  हे बळ्ळारी पट्टिताश्मांसारखेच खडक असून ते सर्व आर्कीयन शैलसमूहांपैकी सर्वांत नवीन गटाचे आहेत. यातील खडक तांबूस रंगाचे ग्रॅनाइट वा पट्टित (पट्टेयुक्त) ग्रॅनाइट असून त्यांचे खनिज संघटन ग्रॅनाइट, ॲडॅमेलाइट वा ग्रॅनोडायोराइटासारखे असते. गुलाबी ऑर्थोक्लेज हे यांच्यातील प्रमुख फेल्स्पार असून पिस्टासाइट हे यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण गौण खनिज आहे. हे खडक सूक्ष्म, मध्यम वा भरडकणी असून त्यांची संरचना ग्रॅनाइट-सम अथवा अंधुक ते स्पष्ट पट्टित असते. काही खडक पृषयुक्त वयनाचे (सूक्ष्मकणी आधारद्रव्यात मोठे स्फटिक विखुरलेले असल्याने निर्माण झालेल्या पोताचे) असतात. रूबिडियम/स्ट्राँशियम पद्धतीने [⟶ खडकांचे वय] १९७४ साली काढण्यात आलेले येथील ग्रॅनाइटाचे वय २९९± १२ कोटी वर्षे इतके आले आहे.

पहा : आर्कीयन.

केळकर, क. वा.