कोबाल्टाइट : खनिज. स्फटिक घनीय सामान्यतः घनाकार अथवा पायराइटाप्रमाणे पृष्ठावर रेखा असलेले पायराइटफलकाकार [→ स्फटिकविज्ञान]. कणमय व संहत स्वरूपांतही आढळते. पाटन : (००1) उत्कृष्ट [→ पाटन]. ठिसूळ. कठिनता ५·५ वि.गु. ६·३. चमक धातूसारखी. रंग रुपेरी, लालसर छटा. कस करडसर काळा. रां.स. (Co, Fe) AsS. यात अल्पसे निकेलही असते. उच्चतापीय निक्षेपांत (उदा., रूपांतरित खडकांत) विखुरलेले किंवा सल्फाइडी शिरांमध्ये सापडते. कोबाल्टाच्या व निकेलाच्या इतर खनिजांच्या बरोबर असते. तुनाबर्ग (स्वीडन), स्कटेरूडा (नॉर्वे), रेव्हन्झथॉर्प (ऑस्ट्रेलिया) व कोबाल्ट (कॅनडा) या भागांत कोबाल्टाइटाचे चांगले निक्षेप (साठे) आहेत. झाईरे (बेल्जियन काँगो) मध्ये कोबाल्टाची आणि तांब्याची ऑक्सिडीभूत [→ ऑक्सिडीभवन] खनिजे मोठ्या प्रमाणात बरोबर आढळतात. कोबाल्टाचे जगातील सर्वाधिक उत्पादन तेथे होते. खेत्री (राजस्थान) येथे कोबाल्टाइटाचे चांगले स्फटिक सापडतात. कोबाल्टाइट मुख्यतः कोबाल्ट मिळविण्यासाठी वापरतात व त्यामुळेच कोबाल्टाइट नाव पडले आहे. हे स्माल्ट नावाची काच तयार करण्यासाठी वापरतात. सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर द्यावयाचा निळा एनॅमल बनविण्यासाठी भारतातील जवाहिरे कोबाल्टाइट वापरतात, त्याला ते ‘सेहटा’ म्हणतात. चमक व रंग यांच्यामुळे पूर्वी कोबाल्टाइटाला कोबाल्ट ग्लान्स म्हणत.

ठाकूर, अ. ना.