अँफिबोलाइट : रूपांतरित (बदललेल्या) खडकांच्या एका प्रकाराचे नाव. हे खडत मुख्यतः हॉर्नब्‍लेंड व प्लॅजिओक्लेज या खनिजांचे बनलेले असतात. शिवाय यांत क्वार्ट्‌झ, कृष्णाभ्रक, एपिडोट, रूटाइल यांसारखी खनिजे अल्प प्रमाणात असणे शक्य असते. अँफिबोलाइटांची संरचना सामान्यतः समकणी असून त्यांच्यातील हॉर्नब्‍लेंडाच्या काड्यांसारख्या स्फटिकांची मांडणी स्पष्ट रांगा होतील अशी सर्वसाधारणपणे नसते. क्वचितच ती तशी आढळते. अल्पसिकत (सिलिका कमी प्रमाणात असलेल्या) अग्निज खडकांचे किंवा काही अशुद्ध व कॅल्शियममय अशा गाळाच्या खडकांचे मध्यम तीव्रतेचे प्रादेशिक रूपांतरण (दाबणाऱ्या व कातरणाऱ्या प्रेरणा व वाढलेले तापमान यांच्यामुळे होणारे बदल) होऊन अँफिबोलाइट तयार झालेले असतात.

पहा : रूपांतरिक खडक.

ठाकूर, अ. ना.