ऑटुनाइट: (लाइम युरॅनिनाइट). खनिज. स्फटिक चतुष्कोणीय, चापट वडीसारखे. अभ्रकासारख्या पत्रित किंवा ढलप्यांच्या स्वरूपातही आढळते. पाटन : (००१) स्पष्ट [→ पाटन]. पत्रे ठिसूळ. कठिनता २-२·५ वि.गु. ३·१–३·२. पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. चमक काचेसारखी, पाटनपृष्ठाची मोत्यासारखी. रंग लिंबाप्रमाणे पिवळा, कधीकधी हिरवट पिवळा. कस पिवळसर. जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य) किरणांत याच्यापासून पिवळसर हिरवे अनुस्फुरण (दृश्य किरण बाहेर टाकल्यामुळे होणारी लुकलुकण्याची क्रिया) मिळते.

रा. सं. Ca (UO2)2 (PO4)2·10-12H2O. कधीकधी Ca च्या जागी थोडे Ba किंवा Mg येते. सामान्यतः द्वितीयक (नंतर तयार झालेले) युरॅनिनाइट व युरेनियम यांच्या ऑक्सिडीभवनाने व अपक्षयाने (वातावरणीय झीज, रासायनिक क्रिया इत्यादींमुळे) तयार झालेले खनिज. कधीकधी ते चांदी, लोह व कथील यांच्या धातुपाषाणांबरोबर आढळते. बऱ्याच वेळा ते पेग्मटाइटात आढळते.

कटांगा (काँगो), कॉर्नवाल (इंग्‍लंड), सबूगाल (पोर्तुगाल), ऑटुन (फ्रान्स), फाल्केन्स्टाइन (जर्मनी), न्यू हँपशर, ब्लॅक हिल (डकोटा, अमेरिका) इ. प्रदेशांत आढळते. युरेनियमाचा धातुपाषाण म्हणून उपयोग. नाव ऑटुन या स्थानावरून.

ठाकूर, . ना.