स्कॅपोलाइट : ही सिलिकेट खनिजांची मालिका असून हिच्यातील खनिजे रासायनिक संघटनाच्या बाबतीत फेल्स्पार खनिजां-सारखी [⟶ फेल्स्पार गट ] व संरचनेच्या बाबतीत फेल्स्पॅथॉइड खनिजांसारखी [⟶ फेल्स्पॅथॉइड गट ] आहेत. यांचे स्फटिक चतुष्कोणीय, सामान्यपणे दंडाकार प्रचिन व त्यांवर पुसट तंतुमय रचना दिसते. ही रचना पाटनपृष्ठावर सहजपणे दिसते. ⇨ पाटन (100) व (110) अपरिपूर्ण रंग फिकट पांढरा, करडा, हिरवट आणि क्वचित निळसर, गुलाबी व तांबूस चमक काचेसारखी पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी कठिनता ५-६ वि.गु. २.६५ — २.७४. [⟶ खनिजविज्ञान]. 

स्कॅपोलाइट हे सोडियम व कॅल्शियम यांची जटिल ॲल्युमिनो सिलिकेटे असून त्यांचे रासायनिक संघटन बदलणारे असते. कारण ही खनिज मालिका असून मारिआलाइट [(Na,Ca)Al(Al,Si)3 SiO24 (Cl,CO3,SO4)] व मीओनाइट [(Ca,Na) Al3(Al,Si)SiO24 (Cl,CO3,SO4)] ही या मालिकेची सिद्धांततः शुद्ध अशी टोकांची दोन खनिजे आहेत व ती कृत्रिम रीतीने बनविली आहेत. मात्र नैसर्गिक स्कॅपोलाइटांची रा. सं. या दोन संघटनांदरम्यानच असते. कारण यांतील कॅल्शियम व सोडियम ही मूलद्रव्ये विविध प्रमाणांत परस्परांची जागा घेतात. वर्निराइट व डायपायर (  मिझोनाइट  ) ही यांच्या दरम्यानची खनिजे असून वर्निराइट हे सर्वांत सामान्यपणे आढळणारे स्कॅपोलाइट आहे. हायड्रोक्लोरिक अम्लाने स्कॅपोलाइटाचे काही प्रमाणात अपघटन (रासायनिक रीतीने तुकडे होण्याची क्रिया ) होते. स्कॅपोलाइटामध्ये सहजपणे बदल घडून अभ्रक, एपिडोट, संगजिरे व केओलीन ही खनिजे तयार होतात. स्फटिकी सुभाजा, पट्टिताश्म, अँफिबोलाइट, ग्रॅन्युलाइट, ग्रीनशिस्ट, स्कार्न ( लाइमयुक्त सिलिकेटी खडक) इ. खडकांत स्कॅपोलाइट आढळते. अंतर्वेशी ( आत घुसलेल्या ) अग्निज खडकांच्या उष्णतेमुळे होणार्‍या संसर्गी रूपांतरणाद्वारे बनलेल्या स्फटिकी चुनखडकांमधील स्कॅपोलाइट हे वैशिष्ट्यदर्शक खनिज आहे. बहुधा प्लॅजिओक्लेज फेल्स्पारात बदल होऊन स्कॅपोलाइट बनते आणि निसर्गात स्कॅपोलाइट, प्लॅजिओक्लेज, कॅल्साइट व हॅलाइट यांचे समुच्चय आढळतात.डायॉप्साइड, अँफिबोल, गार्नेट, ॲपेटाइट, स्फीन व झिर्कॉन या खनिजां-बरोबर स्कॅपोलाइट आढळतेे. रत्न म्हणून वापरण्यात येणारे स्कॅपो-लाइटाचे प्रकार जमुनिया (ॲमेथिस्ट) व सिट्रिन या खनिजांसारखे दिसतात. रत्न म्हणून वापरला जाणारा स्कॅपोलाइटाचा पिवळा स्फटिकी प्रकार मादागास्करमध्ये ( मॅलॅगॅसीमध्ये) आढळतो. स्कॅपोलाइट अमेरिका (पेनसिल्व्हेनिया ), कॅनडा ( क्वीबेक, आँटॅरिओ ), स्वीडन (  किरूना ) व ऑस्ट्रेलिया (  क्वीन्सलँड ) येथे आढळतो. कदाचित भूकवचाचा वरचा०.१ टक्के भाग स्कॅपोलाइटाचा बनलेला असावा. भूकवचाच्या खोलवरच्या भागात बनलेल्या अग्निज खडकांत स्कॅपोलाइट सामान्यपणे समाविष्टांच्या रूपात आढळते आणि कदाचित खालील भूकवचाचा काही टक्के भाग स्कॅपोलाइटाचा बनलेला असावा. याच्या प्रचिनाकार स्फटिकाचे बाह्यरूप दंडासारखे दिसते, म्हणून दंड अर्थाच्या ग्रीक शब्दावरून याचे स्कॅपोलाइट हे नाव पडले आहे.

पहा : फेल्स्पॅथॉइड गट.

ठाकूर, अ. ना.