स्पॉड्युमीन : पायरोक्सीन गटातील या खनिजाचे स्फटिक एकनताक्ष, प्रचिनाकार, पृष्ठावर उभे खोलगट रेखांकन असलेले आणि बहुधा भरड व खडबडीत पृष्ठाचे असतात. प्रचिनाकार स्फटिक बहुधा (100) या पृष्ठाला अनुसरून चपटे झालेले असतात. कारण या पृष्ठाला समांतर असलेले विभाजनतल चांगले विकसित झालेले असते. या पृष्ठा-वरील यमलनाने सामान्यपणे त्याचे जुळे स्फटिक तयार होतात. त्याचे १२ मी. पर्यंत लांबीचे अतिशय मोठे स्फटिकही आढळतात. शिवाय पाटनक्षम पुंजांच्या रूपातही हे खनिज आढळते [⟶ स्फटिकविज्ञान ]. पाटन : (110) परिपूर्ण कठिनता ६.५ — ७ वि.गु. ३.१५ — ३.१९ चमक काचेसारखी, पाटनपृष्ठावर कधीकधी मोत्यासारखी रंग पांढरा, करडा, गुलाबी, पिवळा वा हिरवा पारदर्शक ते दुधी काचेप्रमाणे पारभासी [⟶ खनिजविज्ञान ]. रा. सं. LiA1 (Si2O6).

स्पॉड्युमिनाच्या स्वच्छ गुलाबी वा लिलॅक रंगाच्या प्रकाराला कुंसाइट, तर पाचूसारखा स्वच्छ हिरवा रंग असलेल्या प्रकाराला हिडेनाइट म्हणतात. स्पॉड्युमिनात ॲल्युमिनियमाच्या जागी क्रोमियम आल्यास हिडेनाइट मिळते. पिवळ्या रंगाचे स्पॉड्युमीन व मार्जारनेत्री स्पॉड्युमीन असेही दोन प्रकार माहीत आहेत. काही वेळा स्पॉड्युमिनात लिथियमाच्या जागी अगदी थोडे सोडियम आलेले आढळते. स्पॉड्युमिनात सहजपणे बदल होऊन अल्बाइट, शुभ्र अभ्रक, मायक्रोक्लीन इ. खनिजे तयार होतात.

स्पॉड्युमीन विरळा आढळणारे दुर्मिळ खनिज आहे. याचे अतिशय मोठे स्फटिक गॅ्रनाइट पेग्मटाइटाच्या भित्तींमध्ये फेल्स्पार खनिजांबरोबर आढळतात. अमेरिकेत एक मीटर लांबीचे व अनेक टन वजनाचे स्फटिक आढळले आहेत. ऑस्ट्रिया, स्कॉटलंड, अफगाणिस्तान, म्यानमार व स्वीडनमध्येही हे आढळते. अमेरिकेत कुंसाइट व हिडेनाइट हे प्रकारही आढळतात तर मादागास्करमध्ये कुंसाइट आढळते. तसेच ब्राझीलमध्ये पिवळ्या रंगाचे स्पॉड्युमीन आढळले आहे.

स्पॉड्युमीन मुख्यतः लिथियम मिळविण्यासाठी वापरले जाते. ग्रीजे तापमानांच्या विविध पल्ल्यांत वंगणक्षम राहावीत म्हणून त्यांच्यात लिथियम घालतात. मृत्तिका उद्योग, संचायक विद्युत् घट,वातानुकूलन यंत्रणा, वितळजोडकामातील अभिवाह इत्यादींमध्येही लिथियम वापरतात. स्पॉड्युमिनाचे चमकदार व काचेसारखे नितळ स्फटिक उपरत्न म्हणून वापरतात. तथापि सूर्यप्रकाशात यांचा रंग फिकट होत जातो. म्हणून संग्राहक व संग्रहालये यांच्या दृष्टीनेच यांना मोल असते. राखाडी रंग या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून स्पॉड्युमीन हे नाव आले आहे. याला ट्रायफेन असेही म्हणतात. जे. एफ्. कुंस व डब्ल्यू. ई. हिडेन यांच्या नावांवरून अनुक्रमे कुंसाइट व हिडेनाइट ही नावे खनिजांना आलेली आहेत.

पहा : पायरोक्सीन गट.

ठाकूर, अ. ना.