टफ : (ज्वालामुखी टफ). ज्वालामुखीच्या स्फोटक उद्‌गिरणाद्वारे (उद्रेकाद्वार) बाहेर फेकली गेलेली राख व धूळ यांचे कण घट्ट होऊन बनलेला सापेक्षतः मऊ व सच्छिद्र खडक. सच्छिद्र दगड या अर्थाच्या टोफस या लॅटिन शब्दावरून टफ हे नाव पडले. ⇨ अग्निदलिक खडकातील कण सूक्ष्म म्हणजे ३२ मिमी.पेक्षा कमी व्यासाचे असतात. यांपेक्षा मोठ्या कणांच्या खडकाला ⇨ॲग्लोमरेट  म्हणतात. टफ बहुधा कमीअधिक प्रमाणात स्तरित झालेला आणि भुसभुशीत असतो. खनिज संघटनानुसार याचे रायोलिटिक, ट्रॅकाइटिक व अँडेसाइटिक असे किंवा व्हिट्रिक (मुख्यतः काचयुक्त), क्रिस्टल (मुख्यत्वे स्फटिकांच्या तुकड्यांनी युक्त) व लिथिक (प्रामुख्याने आधीच्या खडकांच्या तुकड्यांनी बनलेला) असेही प्रकार पाडतात. हा पाँपेई (इटली) येथे आढळतो.

 पहा : ज्वालामुखी 

ठाकूर, अ. ना.