ॲस्बेस्टस : हे नाव निरनिराळे रासायनिक संघटन असणाऱ्या अनेक तंतुमय खनिजांस दिले जाते. त्यांच्यापैकी मुख्य म्हणजे क्रिसोटाइल किंवा तंतुमय ⇨ सर्पेंटाइन  [Mg3Si2O5(OH)4] हे होय. उरलेली खनिजे ⇨ अँफिबोल गटातली आहेत व त्यांना ‘अँफिबोली ॲस्बेस्टस’ असेही नाव देतात. अँफिबोली ॲस्बेस्टसांपैकी मुख्य म्हणजे ⇨अँथोफिलाइट (Mg, Fe)7 (Si8 O22) (OH)2, ॲमोसाइट म्हणजे एकंदरीत बरेच लोह असलेले अँथोफिलाइट, ⇨ट्रेमोलाइट Ca2Mg5 (Si8O22) (OH)2, ⇨ॲक्टिनोलाइट Ca2(Mg, Fe)5 (Si8 O22) (OH)2,व क्रॉसिडोलाइट Na3 Fe”3 Fe”’2(Si8O23)(OH) ही होत. वरील प्रकारांपैकी सर्वांत मौल्यवान म्हणजे क्रिसोटाइल होय व उद्योगधंद्यांत वापरल्या जाणाऱ्या ॲस्बेस्टसांपैकी  ९० टक्के क्रिसोटाइल असते.

क्रिसोटाइल हे सर्पेंटाइन खडकांत शिरांच्या रूपाने आढळते. खाणींतून काढलेल्या खडकांपासून ५ ते १०% इतकेच क्रिसोटाइल मिळते. त्याच्या एकूण उत्पादनापैकी सु. ६०% कॅनडाच्या क्वेबेक प्रांतातील थेटफर्ड जिल्ह्यात, सु. १५% रशियातील मध्य उरल पर्वताच्या बाझनोवा क्षेत्रात व उरलेले दक्षिण आफ्रिका आणि इतर काही देशांत होते.

कडप्पा कालीन मॅग्नेशियमी चुनखडकांत घुसलेले डोलेराइटाचे शिलापट्ट असलेल्या भारतातील काही ठिकाणी वरील दोन खडकांच्या सांध्याशी सर्पेंटाइन तयार झालेले आढळते व त्याच्यात, विशेषत:तमिळनाडूतील कडप्पा जिल्ह्यातील पुलिवेंडलीच्या आसपासच्या भागांतील सर्पेंटाइनात, चांगल्या क्रिसोटाइलाचा बराचसा साठा आहे. त्याचे तंतू सरासरीने ०.६० ते १.२५ सेंमी. लांबीचे व काही त्यापेक्षा कमी व काही अधिक, सु. १५ सेंमी. लांबीपर्यंतचे, असतात.

भारतातील आर्कीयन कालीन पुष्कळ खडकांत, कर्नाटकातील हसन व बंगलोर जिल्ह्यांत, तमिळनाडूतील सेलमजवळ, राजस्थानांतील अजमीरमेरवाड व बिहारातील सराइकेला इ. भागांत अँफिबोली ॲस्बेस्टसाचे पुंजके विखुरलेले आढळतात व त्यांच्यापासून बरेच ॲस्बेस्टस मिळणे शक्य आहे [→ अँफिबोल गट].

 ठाकूर, अ. ना.

ॲस्बेस्टस अदाह्य (न जळण्याजोगे) असते ही सर्वांच्या परिचयाची गोष्ट आहे. स्पिरिट जाळून स्टोव्ह पेटविण्यासाठी जे काकडे वापरले जातात त्यांचे अग्रभाग ॲस्बेस्टसाचे असतात. थोर व्यक्तींच्या शवास अग्नी देताना रक्षा सुरक्षित मिळावी म्हणून त्यांची शवे ॲस्बेस्टसापासून तयार केलेल्या कापडात गुंडाळीत असत, असे वर्णन प्लिनी यांनी (इ.स. पहिले शतक) केलेले आहे. ॲस्बेस्टसाचे तंतू जळून खाक होत नाहीत व त्यांच्यापासून बनविलेल्या वाती चिरकाल टिकतात, हेही प्राचीन लोकांस माहीत होते. सायप्रस बेटातील ॲस्बेस्टसापासून तयार केलेल्या चिरकाल टिकणाऱ्या वातींचा उल्लेख प्‍लूटार्क यांनी केलेला आहे. या खनिजाची माहिती प्राचीन काळापासून असली, तरी त्याचे औद्योगिक उत्पादन प्रथम १८६८ साली इटलीत झाले व ते त्या वर्षी सु. २०० टन होते. ॲस्बेस्टसचा वापर उत्तरोत्तर वाढत जाऊन त्याचे जागतिक उत्पादन १९६९ साली सु. ३७ लक्ष टनांइतके झाले. त्या साली कॅनडात १४.४८ लक्ष टन, रशियात १० लक्ष टन, द. आफ्रिकेत २.५८ लक्ष टन तर भारतात फक्त ९,६०० टन उत्पादन झाले. 

उद्योगधंद्यात ॲस्बेस्टसाला महत्त्व येण्याचे कारण, त्याच्या अंगी अदाह्यता, अलगनीयता (न वितळण्याची क्षमता), तंतुमय रचना, तंतूची नम्यता (लवचिकपणा) व बळकटपणा, मंद उष्णता संवाहकता, उच्च विद्युत् रोधकता, रासायनिक द्रव्यांचा विशेष परिणाम न होणे व न कुजणे यांसारखे विविध गुण एकवटलेले आढळतात, हे होय. हे गुणधर्म ॲस्बेस्टसाच्या सर्व जातींत सारख्याच प्रमाणात नसून काहींत सापेक्षत: अधिककिंवा कमी असतात. परंतु त्यांचे एकूण गुणधर्म लक्षात घेऊन त्यांचा एखाद्या विशिष्ट कामासाठी उपयोग करून घेतला जातो. निरनिराळ्या ॲस्बेस्टसांचे काही गुणधर्म कोष्टकात दिलेले आहेत.

ॲस्बेस्टसांच्या तंतूंचे काही गुणधर्म

ॲस्बेस्टस जातगुणधर्म

ॲक्टिनोलाइट

ॲमोसाइट

अँथोफिलाइट

क्रिसोलाइट

क्रॉसिडोलाइट

ट्रेमोलाइट

रंग

हिरवट

राखी, तपकिरी

राखी, तपकिरी, हिरवट

पांढरा, पिवळा, हिरवा, राखी

निळा, गडद निळा

पांढरा, पिवळसर, निळसर, हिरवट

तननबल

किग्रॅ./चौ.सेंमी. सु.

७०किंवा कमी

१,१२५ ते ६,३००

२८०किंवा कमी

५,६०० ते ७,०००

७००० ते २१०००

७० ते ५६०

वितळबिंदू ॰ सें. सु.

१,३९०

१,४००

१,४६५

१,५२०

१,१९०

१,३१५

उष्णतारोधकता

———–

चांगली, उच्च तापमानात ठिसूळ होते

अतिशय उच्च

चांगली, उच्च तापमानात ठिसूळ होते

कमी वितळते

मध्यम ते चांगली

नम्यता

कमी

चांगली

कमी

उच्च

चांगली

कमी

ॲस्बेस्टसाचे मूल्य हे त्याच्यापासून किती लांब व किती सूक्ष्म धागे काढता येतात, त्या धाग्यांचा चिवटपणा, तननबल (ताण सहन करण्याची क्षमता) व नम्यता या गोष्टींवर अवलंबून असते. धाग्यांचे पृष्ठ खडबडीत, दंतुर असले म्हणजे त्याचे सूत सुलभपणे काढता येत नाही, ते गुळगुळीत व झिलईदार असले म्हणजे सहज काढता येते. ०.६० सेंमी. पेक्षा आखूड धागे असणाऱ्या ॲबेस्टसाचे सूत काढता येत नाही. पण त्यापेक्षा लांब धागे असणाऱ्या ॲबेस्टसाचे सूत काढून त्याच्यापासून कापड विणता येते. केवळ ॲस्बेस्टसाचे किंवा त्याच्यात कापूस किंवा पितळेच्या किंवा तांब्याच्या सूक्ष्म तारांचे तुकडे मिसळूनही सूत काढले जाते. आग विझविणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यांना वापरावे लागणारे दोर, कपडे, व शिरस्त्राणे करण्यासाठी नाट्यगृहातील किंवा चित्रपटगृहातील अग्निरोधक पडदे व चादरी करण्यासाठी लांब धाग्याचे ॲस्बेस्टस उपयोगी पडते. गतिरोधकांचे अस्तर व क्लचांच्या (दोन फिरणारे दंड जरूरीप्रमाणे जोडणाऱ्या व अलग करणाऱ्या प्रयुक्तीच्या) पृष्ठाचे लेप यांसाठी सूक्ष्म तारांचे तुकडे मिसळून प्रबलित (बळकट) केलेले ॲस्बेस्टस वापरले जाते. आखूड धाग्याच्या ॲस्बेस्टसापासून छपराची कौले,पुठठे, तक्ते, सपाट व पन्हळी पत्रे, ॲस्बेस्टसी कागद, शाकारणीसाठी लागणारे सिमेंट, वस्तू गुंडाळण्याच्या व बंदिस्त ठेवण्याच्या खोक्यांचे कागद वगैरे वस्तू तसेच अदाह्य रंग इ. तयार केली जातात. विजेच्या केबली, तारा, स्विचबोर्ड यांसाठी व इतर विजेची उपकरणे बनविताना विद्युत् निरोधक पदार्थ म्हणून ॲस्बेस्टसाचा उपयोग होतो. ॲस्बेस्टसाच्या काही जाती अम्‍लप्रतिरोधक आहेत व अम्‍ले गाळण्याची गाळणी बनविण्यासाठी त्यांचा उपयोग होतो.ॲस्बेस्टसाचा सर्वांत अधिक खप ॲस्बेस्टससिमेंटची कौले, पत्रे व नळ बनविण्यासाठी होतो. काचेच्या तंतूंनी प्रबलित केलेल्या ॲस्बेस्टसापासून सूत व कापड, प्लॅस्टिकाने प्रबलित केलेल्या ॲस्बेस्टसापासून चटया, कागद इ, वस्तू बनविण्यात येऊ लागल्या आहेत. ॲस्बेस्टसाच्या निरनिराळ्या जातींच्या गुणधर्मांची माहिती खाली दिली आहे.

क्रिसोटाइल : याचे तंतू सामान्यत: ०·१५ ते २·५ सेंमी., क्वचित १५ सेंमी. पेक्षा अधिक लांब असतात. ते नम्य असतात व चांगल्या जातीचे तंतू रेशमासारखे चमकदार असतात. त्यांचे तननबलही पुष्कळ असते. क्रिसोटाइलाचे ०·०७५ सेंमी. जाडीचे तंतू जवळजवळ ६·८ किग्रॅ.चा भार सहन करू शकतात असे दिसून आलेले आहे. याच्यापासून सूत सहज काढता येते व ९·६५ किमी. लांबीच्या धाग्याचे वजन केवळ ४५० ग्रॅ. भरेल इतका सूक्ष्म धागा याच्या तंतूंपासून काढता येतो.

ॲमोसाइट : हे ॲस्बेस्टस दक्षिण आफ्रिकेतील खाणींतून काढले जाते. त्याचे तंतू सरासरी २० सेंमी. व क्वचित २७ सेंमी. पर्यंत लांब असतात. पण ते खरखरीत व किंचित ठिसूळ असल्यामुळे सूत काढण्याला निरुपयोगी असतात. ॲमोसाइट हे क्रिसोटाइलाच्या मानाने अधिक अम्‍ल-प्रतिरोधी असल्यामुळे त्याचा उपयोग उष्णतारोधक वस्तू बनविण्यासाठी व अम्‍ल विद्रावात टिकू शकणारी उपकरणे व गाळण्या बनविण्यासाठी होतो.

क्रॉसिडोलाइट : (निळे ॲस्बेस्टस). हे रीबेकाइट या अँफिबोलाचा तंतूमय प्रकार असून त्याचे लांब, भरड, नम्य, सरासरी २·५ सेंमी. लांबीचे व सूत काढण्यास योग्य असे तंतू मिळतात. हे खनिज क्रिसोटाइलाइतके अगलनीय नसते व त्याचे धागे क्रिसोटाइलाइतके सहज काढता येत नाहीत. पण ते अधिक बळकट व अधिक रासायनिक विक्रिया-प्रतिरोधी असतात. दक्षिण आफ्रिकेत, ब्राझिलात व ऑस्ट्रेलियात याच्या खाणी आहेत.

ट्रेमोलाइट ॲस्बेस्टस : (इटालियन ॲस्बेस्टस). हे शुद्ध असले म्हणजे पांढरे सफेद असते. त्याचे तंतू कधीकधी बरेच म्हणजे एक मीटरापेक्षाही लांब असतात, पण ते ठिसूळ असून त्यांचे तननबल कमी असते. सूत काढण्याला ते निरुपयोगी असतात, पण अम्‍ल- व उष्णता-प्रतिरोधी असल्यामुळे अम्‍ल गाळण्या व अग्निरोधी वस्तू बनविण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

ॲक्टिनोलाइट : हे ॲस्बेस्टस उद्योगधंद्यात फारसे वापरले जात नाही. क्वचित त्याची पूड इतर जातींत मिसळून वापरली जाते.

साठे, त्र्यं. रा.