बार्बिच्युरेटे : केंद्रीय तंत्रिका तंत्राच्या [मज्जा संस्थेच्या ⟶ तंत्रिका तंत्र] कार्यास रोध करणाऱ्या महत्वाच्या औषधांचा एक समूह. हा समूह बार्बिच्युरिक अम्लापासून तयार करण्यात येतो. ही औषधे मेंदूच्या ऑक्सिजनाच्या वापराचे प्रमाण कमी करतात. नैसर्गिक झोपेत असा परिणाम होत नाही. १९०३ मध्ये ई. एच्. फिशर व जे. मेरिंग यांनी व्हेरोनाल या नावाने बार्बिटाल या संयुगाचा शोध लावला. बार्बिच्युरिक अम्ल औषध म्हणून वापरीत असत पण त्याच्या काही दुष्परिणामांमुळे त्याच्या संयुगांचा शोध लावण्यात आला. ही संयुगे बार्बिच्युरेटे म्हणून ओळखली जातात. ती वेदनाहारक, शामक (उत्तेजित अवस्थेचे शमन करणारी), संमोहक (झोप येण्यास प्रवृत्त करणारी), आकडीरोधक म्हणून वापरण्यात येतात. झोपेच्या गोळ्यांतील एक घटक म्हणूनही त्यांचा वापर करतात. नैदानिक दृष्ट्या त्यांचे चार गट पडतात : (१) आठ तास व त्यापेक्षा जास्त काळ कार्य करणारी (उदा., बार्बिटाल, फिनोबार्बिटाल इ.) (२) चार ते आठ तास कार्य करणारी (उदा., ॲमिलोबार्बिटाल, पेंटोबार्बिटाल इ.) (३) चार तासांपेक्षा कमी काळ कार्य करणारी (उदा., सेकोबार्बिटाल, हेक्झोबार्बिटाल इ.) आणि (४) अल्पकाळ पण जलद कार्य करणारी (उदा., केमिथाल, पेंटोथाल इ.). चौथ्या गटामधील संयुगे संमोहक म्हणून वापरतात व ती नीलेद्वारे (शिरेतून) देतात. बार्बिच्युरेटांचा जास्त काळ वापर केल्यास, तसेच जास्त मात्रेने ती वापरल्यास विषबाधा होते व त्यांची सवयही जडते.

मॅलॉनिक अम्ल व यूरिया यांच्या रासायनिक विक्रियेने बार्बिच्युरिक अम्ल (C4H4N203) तयार होते याला असेही म्हणतात. बार्बिच्युरिक अम्लाच्या रेणूतील (५) या ठिकाणच्या कार्बन अणूला जोडलेल्या हायड्रोजन अणूंऐवजी इतर अणुगट प्रतिष्ठापित करून (एक अणू काढून त्याच्या जागी दुसरा अणू वा अणुगट घालून) जी बार्बिच्युरेटे मिळतात, त्यांना ऑक्सिबार्बिच्युरेटे म्हणतात.(२) C=O ऐवजी C=S गट घालून जी बार्बिच्युरेटे मिळतात, त्यांना थायोबार्बिच्युरेटे म्हणतात. ऑक्सी संयुगे वर्णहीन, गंधहीन, घन, स्फटिकीय व कडू चवीची असतात, तर थायो संयुगे पिवळट हिरवी व लसणाच्या वासासारखा गंध असणारी असतात. दोन्ही प्रकारची संयुगे पाण्यात विरघळत नाहीत पण ईथर, क्लोरोफॉर्म यांसारख्या कार्बनी विद्रावकांत (विरघळविणाऱ्या पदार्थांत) जलद विरघळतात. बार्बिच्युरिक अम्लाच्या सोडियम लवणांचे विद्राव तापविल्यास वा जास्त काळ सर्वसाधारण तापमानाला ठेवल्यास त्यांचे अपघटन होते (घटक अलग होतात). सर्व संयुगांचा मानवी शरीरावर परिणाम होतो व ती मूत्रावाटे शरीराबाहेर टाकली जातात.

बार्बिच्युरेटे ज्या मूळ बार्बिच्युरिक अम्लापासून तयार करतात, ते अम्ल आडोल्फ फोन बेयर यांनी १८६४ मध्ये तयार केले व त्यास त्यांच्या ‘बार्बरा’ या मैत्रिणीच्या नावावरून बार्बिच्युरिक अम्ल हे नाव त्यांनी दिले.

 मिठारी, भू. चिं.