अरगजा: एक चूर्णरूप सुगंधी उटणे. अंगाला लावावयाच्या साबणाचा प्रसार होण्यापूर्वी याचा उपयोग शरीरावरील तेलकटपणा काढून टाकण्यासाठी स्‍नानाच्या वेळी केला जात असे. देवपूजेत वापरावयाच्या उटण्यालाही ‘अरगजा’ म्हणतात. अरगजा बनविण्यासाठी नागरमोथा, कापूर काचरी, गव्हला कचरा, वाळा, दवणा, मरवा इ. वनस्पती वापरतात.

अरगजा-चूर्णे साध्या व उंची अशा दोन प्रकारची बनवतात. अरगजा-चूर्ण पुढीलप्रमाणे बनवितात : प्रथम वनस्पतींची बारीक पूड करतात. नंतर त्या पुडी एकत्र मिसळून वस्त्रगाळ करतात. त्यावर सुवासिक द्रव्यांचा फवारा देतात. हे चूर्ण दुधात किंवा पाण्यात मिसळून वापरले जाते. दिवाळीच्या सुमारास महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांतून त्याचा वापर अद्यापिही केला जातो. सुगंधी साबणाच्या प्रसारामुळे अरगजाचा वापर आता कमी झाला आहे.

 

साबळे, सु. रं.