हातमाग उद्योग :हातमागाच्या साहाय्याने विणकाम करून कापड बनविण्याचा उद्योग. विणकामाच्या या पद्धतीत ताणा (उभे) व बाणा (आडवे) अशी संरचना वापरून कापड तयार करतात. ताण्याच्या समांतर लांब धाग्यांत त्यांना काटकोनात असलेले बाण्याचे धागे गुंतविले जातात. हे धागे गुंतविण्याचे काम ज्या चौकटींत घडवितात, तिला माग असे म्हणतात. मागांचे मुख्यतः स्वयंचलित (यंत्रमाग) व मनुष्यबळ संचलित असे दोन प्रकार आहेत. मनुष्यबळ संचलित मागात ओढमाग व हातमाग यांचा समावेश होतो.

 

हातमागाचे विविध प्रकार, कार्यपद्धती, आकृती, विणकामातील मूलभूत क्रिया, विणींचे प्रकार आदींबद्दल सविस्तर माहिती मराठी विश्वकोशा मध्ये ‘विणकाम’ या नोंदीत सविस्तरपणे दिलेली आहे.

 

भारतातील हातमाग : भारतातील औद्योगिक जगतात कापड उद्योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे. भारतातील सर्वांत प्राचीन उद्योगां- पैकी हा एक उद्योग आहे. एकूण औद्योगिक उत्पन्नात या उद्योगाचा वाटा १४% असून भारतातून निर्यात होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी सु. ३०% उत्पादन कापड उद्योगाशी निगडित आहे. त्याप्रमाणेच शेती व्यवसायानंतर सर्वांत जास्त रोजगार निर्माण करणारा हा उद्योग आहे.

 

प्राचीन भारतात विणकाम करणारा स्वतंत्र वर्ग होता, जो आजही कमी–अधिक प्रमाणात संपूर्ण भारतात आढळतो. सुप्रसिद्ध भारतीय संत कबीर हे देखील विणकरच होते. हातमाग उद्योग प्रामुख्याने ग्रामीण भागांशी संबंधित होता. आसाम, मणिपूर व त्रिपुरा या प्रदेशांतील विणकर धार्मिक भावना आणि परंपरा यांमुळे अजूनही हातमागाचा व्यवसाय करतात.

 

हातमागाची सर्वसाधारण वर्गवारी पुढीलप्रमाणे करतात : (१) सुती धागा वापरून विणकाम करणारे माग, (२) खरा किंवा कृत्रिम रेशमी धागा वापरून विणकाम करणारे माग, (३) लोकरीचे विणकाम करणारे माग आणि (४) वरील तीन प्रकार सोडून अन्य प्रकारचे विणकाम करणारे माग. मागांची रचना आणि त्यांच्या कार्यपद्धतीचे तंत्र यांनुसार भारतातील हातमागांची विभागणी पुढील चार गटांत करता येते : (१) जुन्या काळातील माग, (२) धोटा फेकण्याचे व धावत्या धोट्यांचे खड्ड्यात बसविलेले माग, (३) चौकटीचे (फ्रेम) माग आणि (४) अर्धस्वयंचलित माग. या चार प्रकारांपैकी पहिल्या तीन प्रकारच्या मागांवर माफक प्रमाणात कापड निर्माण होते. लोकरीच्या कांबळी, सतरंज्या, नवार, टेप इ. विणण्यासाठी पहिल्या प्रकारचे माग वापरतात. गढवाली व बनारसी माग दुसऱ्या व तिसऱ्या प्रकारांत मोडतात. बरेचसे माग वापरल्या जाणाऱ्या स्थळांवरून ओळखले जातात. चौथ्या प्रकारात अर्धस्वयंचलित मागांचे हाताने चालविण्याचे माग व पायाने चालविण्याचे माग हे दोन प्रकार येतात. हाताने चालविण्याच्या प्रकारात एका हाताने फणी चौकट मागे-पुढे ओढली जाते. बाकीच्या सर्व क्रिया आपोआप होतात व दुसऱ्या हाताने दोरीच्या साहाय्याने धोटा इकडून तिकडे फेकण्याची क्रिया केली जाते. दुसऱ्या प्रकारात मागाखाली लावलेले दोन वा अधिक पावडे पायांनी दाबून माग चालतो. बाकी सर्व क्रिया आपोआप घडतात.

 

जुन्या काळचे माग : या मागांची रचना व कार्यपद्धती आता जुनी झालेली असून मागे पडली आहे परंतु ते पिढ्यान्पिढ्या चालत आले असून त्यांच्या रचनेत फारसा बदल झालेला नाही. भारताचा पूर्व विभाग, मध्य प्रदेश, बिहार व ओडिशा या राज्यांतील आदिवासी भागांत ते अद्यापही वापरात आहेत. जाड्याभरड्या घोंगड्या, कांबळी, सतरंज्या, गालीचे, नवार इ. प्रकार या मागांवर तयार होतात. हे अवजड नसल्यामुळे एका जागेपासून दुसऱ्या जागी सहज नेता येतात. विणताना बाण्याचा धागा हातानेच ओढतात. फार स्वस्त व कोणालाही सहज परवडणारे अशी यांची रचना व स्वरूप असल्यामुळेच ते आजतागायत टिकून आहेत. यांचे प्रमुख प्रकार पुढे दिले आहेत :

 

लॉइन माग : प्राचीन स्वरूपाचा हा माग मणिपूर, त्रिपुरा व आसामचा काही प्रदेश येथे विशेषेकरून वापरतात. गारो टोळ्यांतील लोकांचे धाकबुंदा वस्त्र, त्रिपुराकडील किशोरींचे वक्ष वस्त्र, मणिपूरच्या वैष्णव व नाग महिलांचा फेनेक पट्टा, लॉगहन, उल्ख्रम हा नागकन्येचा नृत्यवेश या कपड्यांवरून अशा जुन्या मागावरही किती विविधतापूर्ण कापड तयारहोऊ शकते, याची कल्पना येते. कमी रुंदीचे व एका ताण्यामध्ये केवळ ५–८ मी. एवढेच कापड या मागावर तयार होते. मागावर आवश्यक असणारा ताण विणकर स्वतःच्या कमरेच्या बळावर निर्माण करतो.


 

ट्राइबल माग : लॉइन मागाप्रमाणेच साधी रचना असलेला हा माग आहे. बिहार, ओडिशा, मध्य प्रदेश व इतर काही राज्यांमधील टोळीवाल्यांच्या प्रदेशांत हा माग वापरला जातो. चांगल्या रंगाकृतीचे, जाड व घट्ट पोताचे आणि आकर्षक रंगीत पट्ट्यांचे कापड या मागावर तयार होते.

 

साध्या, परंतु बळकट काठ्यांची चौकट जमिनीवर पक्की उभीकरतात. कमी उंची, कमी रुंदी आणि हाताने धागा चालविणे ही या मागाचीमुख्य कल्पना आहे. साधे, जाडेभरडे व घट्ट पोताचे कापड या मागावर तयार होते. याची उत्पादनक्षमता अर्थात बरीच कमी असते.

 

उभे माग : यामध्ये ड्रजेट माग (गालिच्याचा माग) व लोकरीची कांबळी विणण्याच्या मागांचा समावेश होतो. काही वर्षांपूर्वी भारतातील ग्रामोद्योगात या मागांना महत्त्वाचे स्थान होते. बंगलोर, सेलम, ईरोड व एलोरू यांसारख्या ठिकाणी भारतात सध्या अशा प्रकारचे लोकरीचे काम केले जाते. यांचे प्रमुख प्रकार पुढे दिले आहेत.

 

ड्रजेट माग : हा माग गालीचे विणण्यासाठी वापरतात. याची चौकट जाड बांबूच्या काठ्यांची केलेली असते. या मागाला वई अगर फणी नसते. मागाची रुंदी ९० सेंमी.पासून ९ मी.पर्यंत असते. बाणा हाताने भरून लाकडी फणीच्या साहाय्याने ठोकून बसवितात. यावर उत्पादन कमी होते, परंतु मालाचा पोत दणकट पक्का व घट्ट असतो. या मागावर ताणा न दिसता बाणा उठून दिसेल अशा गुंतागुंतीच्या रंगाकृती गडद व भडक रंगांत विणल्या जातात. या मागावर रुंद गालिचे उत्तम बनतात. [→ गालिचे].

 

लोकरीच्या कांबळ्यांचे माग : कांबळ्यांसाठी निरनिराळ्या प्रकारचे माग वापरतात उदा., चौकटीचे माग, धोटा फेकण्याचे माग, चेंडूच्या आकाराचा बाणा वापरायचे माग इत्यादी. या मागाची चौकट जमिनीत पक्की बसविलेली असते. दररोज १–२.५ मी. लांबीचे विणकाम या मागावर होते. सौराष्ट्रातील बऱ्याच विणकाम केंद्रांत या मागांवर नक्षीदार पाबळ्या तयार करतात.

 

सतरंजीचा माग : हा माग खड्ड्यात बसविलेल्या मागासारख्या रचनेचा असतो. यावर बाणा पंजाच्या साहाय्याने ठोकून बसविला जातो व पोलादी फण्याही वापरतात. नेहमीच्या वया न वापरता विणकर स्वतः फासे तयार करून त्यांचा वापर करतो. ताणा पिळलेल्या सुताचा वापरतात. बाणा नरम व जाड म्हणजे २ वा ३ क्रमांकाचा असतो.

 

नवार माग : या मागाची रुंदी कमी असते. एक चौकट, सुताचे स्वतः बनविलेले फासे व दोन रूळ अशी साधने यात वापरली जातात.ताणा आणि बाणा यांसाठी अनुक्रमे २ व १० क्रमांकांचे धागे वापरतात.साधी दोऱ्याची अगर नागमोडी वीण वापरतात. यावर १–१० सेंमी.पर्यंत रुंदीची नवार तयार होते.

 

टेप माग : या मागाची रचना नवार मागाप्रमाणे असते. ताणा एका टोकाला एखाद्या खुंटीला बांधून ठेवतात. बाणा एका आखूड पट्टीवर गुंडाळून वापरला जातो. ठोकण्याचे काम चपट्या तिरकस धारेच्या फळीने केले जाते. एका वेळी अनेक टेप तयार होतील असे सुधारलेले टेप माग हाताने अगर विजेच्या साहाय्याने चालविले जातात.

 

धोटा फेकण्याचे खड्ड्यात बसविलेले माग : या मागाचे हाताने धोटा फेकण्याचा व फटक्याचा माग असे दोन प्रकार पडतात. फटक्याचा माग इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात प्रथम तयार झाला. हे माग विशेष गुंतागुंतीचे नसतात व त्यांत अवजड भागही नसतात. फटका, थून व गावठी वया हे या मागाचे मुख्य भाग असतात. बाणा विणलेल्या कापडाच्या टोकाला ठोकला जातो, यासाठी फटक्याला पुढे झोका देण्यात येतो. निरनिराळे रंग असलेला बाणा वापरून रंगाकृती विणणारा व किमतीला माफक असा हा मागाचा प्रकार आहे. या मागावर बारीक सुताचे चांगले विणकाम होते परंतु या मागांवर जास्त लांबीचे कापड सहजासहजी निघू शकत नाही. कामाचा ताण, जास्त कष्ट, कमी उत्पादन व प्राप्ती यांमुळे खड्ड्यात बसविण्याचे माग जास्त प्रचारात नाहीत.

 

गढवाल माग : या मागामध्ये फटका कमी वजनाचा असतो व तो छतापासून टांगलेला असतो. वया सुती धाग्याच्या व फण्या बांबूच्या असतात. ताण्याची लांबी साधारण २२ मी. असते. चौकट उंच असते. किनारीच्या विणकामासाठी वर पिंजरा किंवा जकार्ड चढविता येतात. गढवाली साड्यांसाठी हाताने फेकण्याचा धोटा वापरतात.

 

जामदानी माग : या मागाने कोऱ्या सुताच्या कापडावर शुभ्र पांढऱ्या सुताच्या बाण्याने आकृती काढता येते. दोरीने बांधून ताण दिला जातो. कापड तयार झाल्यावर ताण देण्यात येतो. अनेक लहान कांड्यांचा उपयोग करून प्रत्येक रंगाकृती सलग अशा धाग्याने विणली जाते. मागील बाजूस दोन बुट्ट्यांमधील विणलेले बाण्याचे तार (धागे) कापावे लागू नयेत म्हणून अशा लहान कांड्यांचा वापर करतात.


 

बालारामपुरम् माग : याची रचना अगदी साधी असते. फटका, वई यांसारखे अन्य माग छताच्या तुळयांपासून टांगलेले असतात. फटका हलका असून त्यात बांबूची फणी बसविण्याची सोय असते. बांबूचा वेगळ्या प्रकारचा धोटा या मागावर वापरतात तो स्वस्तही असतो. अतिशय सुबक व तलम अशा सुती साड्या आणि १०० क्रमांकाच्या पोताची अंगावर घेण्याची वस्त्रे या मागावर विणली जातात. साडीच्या पदराला आणि किनारीला बहुधा जर वापरलेली असते.

 

बनारसी माग : हा माग विशेष प्रकारच्या जरीच्या विणकामासाठी प्रसिद्ध आहे. उत्तम प्रकारच्या रंगाकृती काढण्यासाठी जाळे वापरणे हे याचे वैशिष्ट्य होय. रंगाकृती तयार करताना ताण्याचे धागे निवडण्यासाठी जाळ्याचा उपयोग होतो. ताण्याचे टोक उचलण्यासाठी एका वेगळ्या वईचा उपयोग केला जातो. या वईला ‘नाका’ असे म्हणतात. हे नाके गाठींनी पागियांना बांधलेले असतात. ताण्याचे निवडक धागे या नाक्यांमधून विणले जातात. रंगाकृतीचा बाणा लहानलहान कांड्यांवर गुंडाळलेला असतो. अशा कांड्यांना ‘सिरकी’ असे म्हणतात. नवा धागा जोडायचा असल्यास तो नाक्यामधून तसेच वईमधून व नंतर फणीमधून जातो.

 

जाळे पागियाच्या व नाक्याच्या साहाय्याने रंगाकृती निर्माण करते. याच वेळी नेहमीच्या वया मूळ कापड विणतात. या मागावर कामकरण्यास दोन-तीन माणसे लागतात. पारंपरिक बनारसी माग जाऊन त्याऐवजी जमिनीच्या वरती बसविण्यात येणारा माग वापरला जातो.

 

चंदेरी माग : चंदेरी मागावर ज्या साड्या विणल्या जातात त्यात किनारीला दुहेरी व मध्यभागामध्ये ताण्यात एकेरी खऱ्या रेशमाचे धागे वापरले जातात. बाण्यासाठी तलम सूत वापरले जाते. रंगाकृती काढण्यासाठी जाळे वापरले जाते. आडवे पागिये एक ताण्याच्या वर व एक खाली असे बांधतात. एक हलकासा फटका टांगलेला असतो. त्याला बांबूची फणी असते. या मागावर काम करण्यासाठी दोन माणसे लागतात. आकृतींचे विणकाम जाळे उचलून करण्यात येते. साडीच्या पदरावर, किनारीवर व मध्यभागी सुंदर नाजूक सोनेरी आकृत्या विणल्या जातात. हे काम तीन शिंगांच्या होड्या (नरी) वापरून केले जाते.

 

औरंगाबाद हिमरू माग : या मागावर उच्च दर्जाचे कापड तयार होते. अंगाचा ताणा व बाणा सुती असून रंगाकृती रेयॉनाच्या धाग्याने विणतात. दर्शनी बाजूस हिमरू रंगाकृती मोठ्या, स्पष्ट व रेखीव असतात. बाण्याचे न विणलेले तार मागील बाजूस असतात. पारंपरिक विणकाम करण्यासाठी शिंगांची होडीच्या आकाराची नरी वापरतात. हलका फटका वापरतात. फणी बारीक बांबूची असते. रंगाकृती जशी असेल त्याप्रमाणे २–८ नऱ्या वापरतात.

 

कांजीवरम् माग : सुंदर नक्षीकामाची (अडाई) आकृती हे कांजीवरम् मागाचे वैशिष्ट्य होय. जी नक्षी विणायची ती आधी चौकोनी रेघा असलेल्या कागदावर काढून घेतात. तिच्यावरून धागा कसा व केव्हा घ्यायचा हे ठरविता येते. अडाईमध्ये धागे जमिनीपासून समांतर लावलेले असतात. ज्या प्रकारचे विणकाम करायचे त्याप्रमाणे फासे या समांतर धाग्यांना बांधतात. नवीन आकृती विणताना हे समांतर धागे सोडून त्यांच्या जागी नवीन फासे बांधतात. यामुळे विणकामास अधिक वेळ लागतो.

 

कांजीवरम् मागात पिंजरा सामान्यतः वापरत नाहीत. काही वेळाफटक्यासाठी चौकट वापरतात. आकृतीसाठी ताण्याची टोके उचलण्याची व ती निवडण्याची कांजीवरम् जाळ्यांची योजना फार अप्रतिम असते. या साड्या रेशमाच्या असतात. तीन नरी वापरून ठसठशीत किनारी विणतात.

 

धावत्या धोट्यांचे खड्ड्यात बसविलेले माग : भारतात आसामखेरीज सर्वत्र हे माग फार लोकप्रिय आहेत. इतर मागांच्या मानानेया मागावर तिप्पट ते चौपट उत्पादन होते. पिंजरे व जकार्ड यांच्यासाहाय्याने या मागावर विविध आकृती असलेले विणकाम करता येते. खड्ड्यातील मागाला धावत्या धोट्याची (फ्लाय शटल्ची) जोड हीगोष्ट आता भारताच्या हातमाग उद्योगाला फार उपकारक होत आहे. या मागात फटक्याला खालचा पाटा व प्रत्येक बाजूला एक याप्रमाणे दोन धोटा-पेट्या (शटल् बॉक्सेस्) असतात. त्यांतील पिकर (धोटा मारण्याच्या चामड्याच्या बाहुल्या) दोऱ्यांच्या साहाय्याने चालतात. धोटा फेकण्याचा व धावता धोटा पद्धतीतील हाच एक मुख्य फरक होय. धावता धोटा खड्ड्यातील मागावर इतर कोणत्याही मागापेक्षा अधिक सुकरतेने तलम धाग्याचे हातरुमाल अथवा लुंगी यांसारखे कापड विणले जाऊशकते. यावर जास्त लांब ताणा घेता येतो. त्यामुळे वेळेची बचतहोऊन उत्पादन अधिक मिळते. या प्रकारच्या मागांमध्ये पुढीलमाग येतात.

 

उप्पड माग : याने साड्यांच्या किनारीवर छोट्या आकृत्याकाढतात व कागदावर काढलेल्या आकृत्यांच्या साहाय्याने मध्यभागी बुट्ट्या काढतात.


 

वेंकटगिरी माग : या मागावर किनारीत ‘पेट्ट्यू’ (पट्टा) विणतात. ताण्याला बांधलेल्या दोऱ्या ओढण्यास अधिक माणसे लागतात. त्यांत पिंजरा बसविण्याचे प्रयत्न चालू आहेत. ते सफल झाल्यास विविध आकृत्यांचे विणकामही होऊ शकेल.

 

सेलम माग : याची बैठक जरा उंच असते. ‘पाटु पेट्टी’ पिंजराबसविला जातो. त्यामुळे किनारीचे काम चांगले होते. मदुराई, कोईमतूरव सेलम या तिन्ही मागांची रचना सारखीच असते. मदुराई भागांत जकार्ड जास्त वापरतात.

 

मद्रास हातरुमाल माग : यामध्ये ताणा बीमवर गुंडाळला जातो.त्याला मागील बाजूस दोन ठिकाणी आधार दिलेला असतो. घट्ट वपक्क्या विणीचे कापड या मागावर तयार होते. कापडाची रुंदी कायम ताणलेल्या अवस्थेत राहील अशी रचना केलेली असते. विणकराची बैठक थोडी उतरती असते. पाठीमागे व पावड्यावर वाकून पेल तयार करणेयामुळे सोपे जाते.

 

माऊ माग : उत्पादनाच्या बाबतीत यंत्रमागाशी बरोबरी करणाऱ्या हातमागामध्ये माऊ मागाचा क्रमांक पुष्कळ वरचा लागतो. थून चक्कर किंवा किनारी आणि गाभ्यातील बारीक आकृती विणण्यासाठी दोनजकार्ड अशी रचना असते. चेंडूच्या आकाराच्या ताण्याला फास घालून, वजन लावून तो कप्पीवर मागील बाजूस ठेवला जातो. त्यामुळे अधिक उत्पादन मिळते. एक जकार्ड गाभ्यासाठी व दुसरे किनारीसाठी वापरले जाते. या मागावर एका वेळेस साधारण ६ मी. कापड मिळते. फणी बदलणे व पुन्हा बसविणे या गैरसोयी असूनही हा माग जास्त उत्पादन देतो.

 

संडिला माग : याचे वैशिष्ट्य म्हणजे जादा ताण्याच्या किंवा जादा बाण्याच्या कापडाचे रंगाकृतियुक्त उत्पादन हे होय. थून चक्करची साधने बसविली असता संडिला मागावर गॉझ व बँडेजचे कापड विणले जाते.दररोज २०–२६ मी. कापड या मागावर विणता येते.

 

नागपूर माग : यामध्ये धोट्याची दुहेरी पेटी बसविलेली असते. या मागाचा फटका हलका असतो. त्याचा खालचा पाटा कमी रुंदीचा असतो. लांब, हलक्या, परंतु कमी उंचीच्या नरी वापरतात.

 

चौकटीचे माग : या मागावर दोन किंवा अधिक पावड्यांनी विणकाम केले जाते. वेगवेगळ्या आकृत्या विणण्यास त्याचा खूप फायदा होतो. एका वेळी जास्त लांब कापडही या मागावर विणता येते.

 

पश्चिम बंगाल, आसाम आणि पूर्वेकडील इतर काही प्रदेशांत खड्ड्यातील मागांच्या ऐवजी चौकटीचे माग वापरण्यात येत आहेत. केरळ आणि पंजाब या राज्यांतही हे माग बरेच लोकप्रिय आहेत. तेथे या मागांवर पलंगपोस, पडदे आणि इतर अशाच प्रकारच्या कापडाचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर केले जाते. सुरत, सोलापूर, शांतिपूर व मदुराईयेथेही हे माग वापरतात आणि त्यांवर उत्तम पोतांच्या साड्या विणतात. या मागांवर पुढील आणखीही अनेक प्रकारचे कापड तयार होते : साध्या साड्या, किनारीत व पदरात रंगाकृती असलेल्या साड्या, सदऱ्याचेकापड, चोळीचे खण तसेच पट्ट्याचे व चौकटीचे कापड, जकार्डची नक्षी असलेले कापड, चादरी, टॉवेल इत्यादी. सर्व माग स्वतंत्रपणे बसवितायेत असल्यामुळे वाहतूक करून नेण्यास हे माग सोयीचे असतात. यावर २४ पर्यंत पावडे बसविता येतात. मागील बाजूस ५०० मी. इतक्या लांबीचा ताणा गुंडाळण्यासाठी मोठे रूळ ठेवण्यास जागा असते. धोटा फेकण्याची सर्व साधने व उपकरणे या मागावर लावता येतात. या मागांना अधिकजागा लागते तसेच यांची किंमत बरीच असते आणि ते चालविणे सोपे नसते. विणकाम चालू असताना हे माग हलण्याचा व कंप पावण्याचासंभव असतो. याचे पुढील प्रकार पडतात :

 

मलबार माग : यामध्ये चौकट जड व बळकट असते. त्यामुळे जाड कापड विणतानाही तो हलत नाही अगर कंप पावत नाही. या मागावर घट्ट कापड तयार होते. ताण्याचा रूळ मागील बाजूस असतो. ताण्याच्या तारा मागील बाजूने घेऊन वई व फणी ह्यांमधून घेऊन पुढील बाजूस कापडाच्या रुळापर्यंत आणल्या जातात. चांगला ताण बसतो व बाण्याचे धागे कमीवेळा तुटतात. पिंजरे व जकार्ड बसविण्याची सोय व्हावी म्हणून खास उंच चौकटीचा मलबार माग बनविला जातो.

 

मदुराई माग : या मागाला पोलादी फण्या असतात. जाड व तलम सर्व तर्‍हेच्या कापडाचे विणकाम या मागावर होते. जेव्हा जाडे सूतवापरले जाते तेव्हा वजनदार व बारीक सुताकरिता हलका फटकावापरला जातो.

 

राजस्थान माग : या मागाला लाकडी चौकटीऐवजी दगडी फरशी वापरली जाते. इतर सर्व रचना चौकटीच्या मागासारखी असते.

 

शांतिपूर माग : जकार्डचा उपयोग करून या चौकटीच्या मागावर उत्तम पोताच्या कापडाचे विणकाम केले जाते. मागील बाजूस ताण्याचा रूळ असतो. हा रूळ व कापडाचा रूळ एकाच पातळीत असतात.


 

सोलापूर माग : जकार्ड व पिंजरा यांच्या मदतीने या मागाचे काम चालते. जरीच्या धाग्याचे विणकाम करण्यासाठी या चौकटीच्या मागावर वेगळी रचना केलेली असते. जाड ताणा बांधण्यासाठी मागील बाजूस सोय असते. भारी साड्या तयार करण्यासाठी या मागाचा विशेष उपयोग होतो.

 

अर्धस्वयंचलित माग : अर्धस्वयंचलित मागांना अलीकडे बरेच महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील अनेक विणकाम केंद्रांत त्याचा अधिकाधिक वापर होऊ लागला आहे. रचना व कार्यपद्धती या दोन्हींच्या बाबतीत हे माग यंत्रमागासारखेच असतात. फटक्याच्या हालचालीसाठीजर या मागाला विद्युत् चलित्र बसविले, तर त्याचे स्वरूप यंत्रमागा-सारखेच होईल.

 

अर्धस्वयंचलित मागावर काही ठराविक प्रकारचेच कापड विणलेजाते. त्याचे उत्पादन साध्या हातमागाच्या तिप्पट अगर चौपट असते.मात्र, यंत्रमागाच्या ते साधारण निम्मे होऊ शकेल. या मागावर विणकर फटका आपल्या हाताने मारून माग पायाने चालवू शकतो. या मागाच्या व यंत्रमागाच्या किमतीत फारसा फरक नसतो. याचे पुढील प्रकार पडतात :

 

चित्तरंजन माग : यामध्ये चौकट जाड असते. फटक्याला दोन उंच लाकडांचा आधार दिलेला असतो. मागील बाजूस असलेल्या गोलक धारव्यांवर एक भुजादंड बसविलेला असतो व तो जसा फिरतो त्याप्रमाणे फटका मागे-पुढे जातो. फटक्याच्या हालचालीनेच विणून झालेले कापड रुळावर गुंडाळले जाते. एकाच विणीचे कापड तयार होत असताना श्रमकमी पडतात. जास्त ताणा घेऊ शकत असल्यामुळे ताणा भरण्यासाठीपुनःपुन्हा काम थांबवावे लागत नाही. मात्र, चौकट हलणे व कंप पावणेयांमुळे यावर सुबक पोताच्या कापडाची निर्मिती करणे कठीण असते.

 

बनारस माग : हा माग चित्तरंजन मागासारखाच असतो. फरक इतकाच की, पेल व फटका हे स्वयंचलित असतात व त्यांचा एक-मेकांशी संबंध नसतो. भुजादंडामुळे टॅपेटला (पावड्याच्या दांड्याला) गती मिळते. मागावर घट्ट फणी असते. २ ? २ ट्विल (कापडाचा प्रकार) यावर तयार होते परंतु जास्त किंमत, सुरुवातीचा खर्च, जास्त जागा व चालविण्याचा खर्च यांमुळे हातमाग व्यवसायात हा माग कमी वापरला जातो.

 

मदनपुरा माग : याचे सर्व भाग लाकडाचे असतात. मुंबईतील मदनपुरा या भागात हा मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, त्यामुळे हे नाव पडले आहे. पायाने पावडे चालवून मागाला गती देण्यात येते. सर्व प्राथमिक हालचाली फटक्याच्या साहाय्याने होतात. साधे व हलके रंगीत कापड तयार करण्यास हा माग फार उपयुक्त आहे. या मागात सैल फणी वापरतात.

 

हॅटरस्ले पायमाग : हा माग जवळजवळ यंत्रमागासारखाच असतो. याची रचना मदनपुरा मागाप्रमाणे असते. पावडे हलवून अथवा फटका चालवून त्याला गती दिली जाते. याचे सर्व भाग बिडाचे म्हणजे ओतीव लोखंडाचे असतात. फटका लाकडाचा असतो. सैल फणी वापरली जाते. या मागावर हलक्या व भारी वजनाचे असे दोन्ही प्रकारचे कापड तयार होते. यंत्रमागाच्या कार्यपद्धतीत व या मागाच्या चालीत सारखेपणा असतो. हालचाली विद्युत् चलित्राने होत नाहीत एवढाच फरक असतो.

 

भारतातील हातमागाचा इतिहास : इ. स. पू. सु. २००० वर्षांपासून कापड विणण्याची कला भारतातील कारागिरांना माहीत होती. निरनिराळ्या प्रकारांनी सूत व कापड रंगविणे, कापड विणताना जरीचा धागा वापरणे ही कलाही प्राचीन भारतीयांना अवगत होती. असे असले तरी काळानुरूप संस्कृतींच्या प्रभावानुसार भारतीय हातमाग उद्योगात बदलघडत गेला आहे. हातमाग उद्योगाची सुरुवात व वाढ पुढील अनुक्रमानुसार दर्शविता येते : सिंधू संस्कृती, वैदिक काळ, मौर्य काळ, ग्रीकांचा प्रभाव, भारतीय जरीकाम, भारतीय शाली, भारतीय विणकाम, वसाहतकालीन विणकाम, अठरावे आणि एकोणिसावे शतक तसेच स्वातंत्र्योत्तर प्रगती.

 

प्राचीन कलेमुळे पुढील प्रकारच्या कापडास विशेष महत्त्व प्राप्त झाले : (१) धंदेवाईक विणकर, साळी, कोष्टी व रंगारी यांनी बनविलेले कापड. (२) राजाश्रयाखाली शोभेसाठी व चैनीसाठी कारागिरांनी तयार केलेले कापड. (३) निरनिराळ्या विभागांतील कारागिरांनी हौशीने केलेले भरतकाम. (४) टोळ्या करून राहणाऱ्या लोकांनी निर्माण केलेले वैशिष्ट्यपूर्ण कापड.

 

वेगवेगळ्या बाजारपेठांमधून निर्माण झालेले हे परंपरागत कापड स्थळांच्या अथवा कलावंतांनी दर्शविलेल्या दृश्यांच्या अनुषंगाने प्रसिद्धहोत गेले. कला व स्थळ विशेषावरून जे कापड प्रसिद्ध झाले त्यांचीमाहिती पुढे दिली आहे.

 

हिमरू शाली आणि पैठणी : विशेषतः हिमरू शाली औरंगाबादला तलम सूत आणि रेशमापासून विणतात. पैठण व येवले येथील पैठण्या आणि शालू जरीकाम व टिकाऊपणा यांसाठी प्रसिद्ध आहेत. भरजरी रुंद काठ व पदर हे पैठणीचे वैशिष्ट्य आहे.

 

पाटोळा, चारचोला व सौराष्ट्र धाबळी : रेशमी ताणा व बाणा स्वतंत्र बांधणी पद्धतीने रंगवून पाटोळा साडी विणतात. चारचोला व चुनरी हीसुद्धा बांधणी पद्धतीने रंगवून विणतात. त्यासाठी एक किंवा अधिकरंग वापरतात. लोकरीच्या रंगीत धाग्यांचा वापर करून शोभिवंत अशा रंगाकृती विणून सौराष्ट्र धाबळी तयार होते. काळा धागा वापरूनकांबळी बनवितात.


 

टसर : टसर व मुगा या खऱ्या रेशमापासून टिकाऊ रेशमी कापड विणतात. यापासून धोतरे, चादरी, सदऱ्याचे कापड, कोटाचे कापड व बाफ्ता (एक प्रकारचे रेशमी कापड) बनवितात. टसर रेशीम मध्य प्रदेशात प्रसिद्ध आहे. चंदेरी या गावावरून चंदेरी साडी हा प्रकार प्रचलित झाला. या प्रकारात संगमरवरावरील नक्षीकामाप्रमाणे साडीवरनक्षी असते. तसेच यात तलम सूत, रेशीम व जर वापरली जाते.

 

ढाका-जामदानी, बालुचार (पश्चिम बंगाल) : ढाका-जामदानीह्या अतितलम सुताच्या साड्या असून त्यांमध्ये माणसांच्या हालचालींचे देखावे विणलेले असतात. किनारीमध्ये वेगवेगळ्या रंगाकृती असतात. बलुचार रेशमी साड्या मुर्शिदाबाद येथून प्रसिद्धीस आल्या.

 

बांधणी (राजस्थान) : बांधणी व चुनरी कित्येक लोकगीतांचे विषय बनल्या आहेत. गाठी बांधून रंगविण्याच्या पद्धतीने त्या तयार होतात म्हणून हे नाव पडले आहे. लहेरिया साडीमध्ये अधिक रंग याच पद्धतीने रंगविलेले असतात. गुजरात, काठेवाड (सौराष्ट्र) आणि राजस्थान येथे बांधणी व लहेरिया मोठ्या प्रमाणावर लग्नप्रसंगी व अन्य समारंभात वापरतात.

 

फुलकरी (पंजाब) : फुलांचे आकार व भौमितिक आकार रेशमी धाग्यांच्या साहाय्याने विणून पंजाबमध्ये फुलकरी कापड तयार होते.

 

विचित्रपुरी साडी : संबळपूर या ओडिशामधील टोळीवाल्यांच्या प्रदेशात या साड्या तयार होतात. पक्षी, प्राणी तसेच इतर रेखीव आकृत्या रंगीत ताणा व बाणा वापरून तयार करतात.

 

बनारसी शालू : जरीच्या बुट्ट्यांचे काम असलेल्या बनारसी रेशमी साड्या, शेले व शालू प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत.

 

तेलीया रुमाल : (आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली आणि चिराला). ॲलिझरीन रंगांचा उपयोग करताना वापरल्या जाणाऱ्या तेलाचा किंचित वास राहतो, त्यामुळे तेलिया हे नाव पडले आहे. सुमारे १ मी. लांब व १.२५ मी. रुंद असे हे रुमाल असतात. या रुमालांना ३-४ सेंमी. रुंदीची किनार असते. निरनिराळ्या रेखाकृती असलेले हे तलम सुती रुमाल अगर दुपट्टे असतात.

 

कांजीवरम् साड्या : तमिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात वापरात असलेल्या या भारी रेशमी साड्या कांचीपुरम् येथे तयार होतात. यात जरीचे काम केलेले असते.

 

मणिपूर, नागा आणि आसामचे कापड : या प्रदेशातील टोळीवाल्या जमाती एरी एंडी व मुगा रेशीम वापरून साड्या विणतात. गाभ्यात सुताचे काम असते व निरनिराळ्या रंगाकृतीसुद्धा विणलेल्या असतात.

 

भारतातील हातमाग उत्पादन आणि सरकारी योजना : हातमाग उद्योग भारताच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. सुमारे १९४ लाख कामगार या व्यवसायाशी निगडित आहेत. भारतात शेती खालोखाल सर्वाधिक रोजगार देणारा हा व्यवसाय आहे. कापड गिरण्या आणि यंत्रमाग (पॉवरलूम) यांच्याशी स्पर्धा करीत हातमागउद्योगाने आपले अस्तित्व टिकवत विस्तार केला आहे. त्यासाठी शासनाच्या विविध संस्थांचा व योजनांचा हातभार या उद्योगाला लाभतो. पन्नासच्या दशकात हातमागाद्वारे कापडाचे उत्पादन ५०० दशलक्षचौ. मी. होते, तर २०००-०१ मध्ये ते ७,५०६ दशलक्ष चौ. मी. एवढे वाढले. देशातील एकूण कापड उत्पादनात हातमाग उद्योगाचा वाटा२०% आहे. हातमाग उद्योगातून भारताची उज्ज्वल परंपरा, सांस्कृतिक विविधता आणि कारागिरांची कलात्मकता निदर्शनास येते. हातमागाने निर्माण केलेली उत्पादने ही भारतीय परंपरेचे प्रतीक समजली जातात. हातमाग कारागिरीत लवचिकता असते व नवीन प्रयोगशीलतेस नेहमीचवाव असतो.

 

हातमाग उद्योगास चालना मिळावी, योग्य रीतीने त्या उद्योगाचे नियोजन करता यावे तसेच त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचे प्रश्न सोडविता यावेत यासाठी २० नोव्हेंबर १९७५ रोजी हातमाग विकास आयोग (डेव्हलपमेंट कमिशन फॉर हॅण्डलूम्स) या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या आयोगाद्वारे कार्यान्वित झालेले महत्त्वाचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे : (१) रोजगारनिर्मिती, (२) तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण आणि स्तर उंचावणे, (३) विक्रीशास्त्राला साहाय्य करणे, (४) प्रचार, (५) पायाभूत सुविधांसाठी साहाय्य, (६) कल्याणकारी योजना आखणे, (७) वाढीस अनुस्यूत योजना बनविणे, (८) निर्यात करता येण्याजोग्या उत्पादनांचा विकास करणे आणि (९) संशोधन व विकास. या कार्य-क्रमांतर्गत असणाऱ्या सर्व योजना विणकाम करणाऱ्या कामगारांचा विचार करणाऱ्या आहेत. हातमाग उद्योगासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण गरजांत कच्च्या मालाचा पुरवठा, कर्ज उपलब्धी आणि विक्रीसाठी प्रचार-प्रसार या मूलभूत गोष्टी आहेत.

 

हॅण्डलूम बोर्डाने विणकर लोकांना वेळोवेळी तांत्रिक व अन्य बाबतींत मदत व सल्ला देता यावा म्हणून पुढील सात ठिकाणी केंद्रे स्थापनकेली : मुंबई, चेन्नई, वाराणसी, कोलकाता, विजयवाडा, दिल्ली आणि इंदूर. निरनिराळ्या विणकर सहकारी संस्था विभागीय मदत केंद्राकडे आपले प्रतिनिधी पाठवून या सोयींचा फायदा घेतात. भारताच्या कृत्रिम रेशीम उत्पादनाचा १०% भाग हातमाग उद्योगासाठी राखून ठेवण्यात येतो. विणकाम व रंगकाम यांची समग्र तांत्रिक माहितीही या केंद्रांत दिली जाते. याशिवाय केंद्र सरकारने चेन्नई, वाराणसी व सेलम येथे हातमाग तंत्र शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत. हातमागावरील कापडाच्या विक्रीसाठी व निर्यातीसाठी लागणारी सर्व प्रकारची मदत विणकर–सहकारी संस्थांना सरकारकडून मिळते.

 

हातमाग कापडाच्या दर्जावर नियंत्रण : उपलब्ध साधनापासून जास्तीत जास्त दर्जेदार हातमागावरील कापड तयार व्हावे यासाठी पुढीलसंस्थांनी (अ) कापडाची तपासणी व दर्जा यांबाबत निर्णय आणि (आ) तपासणीस उपयुक्त अशा ठराविक प्रतीचेच कापड तयार व्हावे, यासाठी नियम करून दिले आहेत : (१) इंडियन स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूशन ( आयएसआय), दिल्ली आणि (२) कॉटन टेक्स्टाईल्स फंड कमिटी, मुंबई. यानुसार विक्री व निर्यात यांसाठी जे कापड तयार करावयाचे त्याच्या प्रतीचे परिमाण ठरविले गेले. कशा पद्धतीने कापडाची प्रत तपासणी करावयाची त्यासंबंधी सर्व तपशील आयएसआय या संस्थेने तयार केला. प्रत्यक्ष तपासणी करून तत्संबंधी अनुज्ञापत्रक, शिफारसपत्रक अगर सुधारणा करण्याविषयी सूचना इ. गोष्टी पार पाडण्याचे काम कॉटन टेक्स्टाईल्स फंड कमिटीने केले.


 

हातमागावरील कापडाची निर्यात : भारत सरकारने १९५९ मध्ये स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनच्या आधिपत्याखाली हॅण्डलूम एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन (एचईओ) ही संघटना स्थापन केली. भारतीय तज्ञ व व्यापारी मंडळींनी वेळोवेळी पाश्चिमात्य व इतर अनेक देशांस भेटी देऊन भारतीय मालास उपलब्ध असलेल्या सर्व बाजारपेठांचे व्यवस्थित निरीक्षण केले. या तज्ञांनी केलेल्या शिफारशींच्या अनुरोधाने एचईओ संघटनेने आपले काम सुरू केले. तिच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे : (१) कापडाचे नमुने पाहून शिफारस करणे. (२) मागणी उत्तम येईल अशा परदेशी मालाचे नमुने मिळविणे. (३) कच्चा माल, सूत,रंग व रसायने यांचा पुरवठा करणे. (४) तांत्रिक मदत, ज्या तर्‍हेच्या मालास मागणी असेल त्याला अनुरूप रंगाकृती इ. पुरविणे. (५) तयार मालाच्या जाहिरातीसाठी प्रदर्शने, दालने इ. व्यवस्था करणे. (६) परदेशी बाजारपेठ व भारतीय उत्पादक यांचा समन्वय साधून निर्यातीसमदत करणे.

 

हातमाग विकास आयोग या कार्यालयांतर्गत २५ विणकाम सेवा केंद्रे आणि ५ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅण्डलूम टेक्नॉलॉजी (खखकढी) या संस्था काम करतात. खखकढी च्या संस्था वाराणसी (१९५६), सालेम (१९६०), गौहाती (१९८२), जोधपूर (१९९३) व बारगढ (२००८) येथे स्थापन केल्या आहेत. विविध विणकाम सेवा केंद्रे हातमागउद्योगांत संशोधन आणि विकासाचे काम करतात तर खखकढी विद्यार्थ्यांना हातमाग तंत्रज्ञानात आणि कापड उद्योग रसायनशास्त्र या विषयांत पदविका आणि पदव्युत्तर पदविका देण्याचे काम करतात. बाजारपेठेत सातत्याने होणाऱ्या वाढीसाठी प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची व तज्ञांची गरज वाढत आहे. यांव्यतिरिक्त हातमाग क्षेत्राच्या वाढीसाठी, तसेच जागतिक बाजारपेठेत आत्मविश्वासाने उभे राहता यावे म्हणून पुढील संस्था प्रयत्न करतात : (१) नॅशनल हॅण्डिक्राफ्ट्स ॲण्ड हॅण्डलूम म्यूझीयम, नवी दिल्ली (२) हॅण्डलूम एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (कएझउ), चेन्नई (३) नॅशनल हॅण्डलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. (छकऊउ) लखनौ आणि (४) ॲसोसिएशन ऑफ कॉर्पोरेशन ॲण्ड ॲपेक्स सोसायटीज् ऑफ हॅण्डलूम्स (ACASH), नवी दिल्ली.

 

यांव्यतिरिक्त काही राज्यांत देखील पुढील हातमाग शैक्षणिक संस्था स्थापन झाल्या आहेत : (१) श्री प्रागडा कोट्ट्या मेमोरिअल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅण्डलूम टेक्नॉलॉजी, वेंकटगिरी (आंध्र प्रदेश ) (२) कर्नाटका हॅण्डलूम टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, गदग (कर्नाटक ) (३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅण्डलूम टेक्नॉलॉजी, चंपा (छत्तीसगढ) आणि (४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॅण्डलूम टेक्नॉलॉजी, कन्नूर (केरळ ).

 

ॲसोसिएशन ऑफ कॉर्पोरेशन ॲण्ड ॲपेक्स सोसायटीज ऑफहॅण्डलूम ही संस्था १९८४ मध्ये स्थापण्यात आली. ती हातमाग क्षेत्रातील संस्थांना पुढील विविध बाबींसाठी मदत करते : हातमाग व्यवसायाचे व्यवस्थापन करणे रोजगार निवडीसाठी साहाय्य करणे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शने आयोजित करणे व त्यांत सहभाग घेणे कल्पना व कौशल्याचे आदान-प्रदान करणे अधःसंरचना निर्मितीत साहाय्य, वितरणासंबंधी मार्गदर्शन, बाजारपेठ सर्वेक्षण आणि संशोधन यांसारख्या कामांची माहिती साठविणे व त्यांची प्रदत्त बँक बनविणे भारतात तसेच भारताबाहेर हातमाग उत्पादनांची प्रसिद्धी करणे उत्पादन दर्जा टिकविण्यासाठी व निश्चित करण्यासाठी व्यवस्था निर्माण करणे राष्ट्रीय–आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये प्रसिद्धी-वितरणासाठी मध्यस्थ म्हणून कामपाहणे हातमाग क्षेत्रासाठी कल्याणकारी योजना राबविणे. तसेच अउअडक च्या प्रमुख कामांत एक निविदा प्रणाली (सिंगल टेंडर सिस्टीम डढड) अंतर्गत शासनाची विविध मंत्रालये, संस्था, विभाग आदींना हातमाग उत्पादने पुरविणे. डढड मध्ये बॅरड ब्लँकेट, बेड डरी, बेडशीट, साडी, उशांचे अभ्रे, टॉवेल, स्पाँज क्लॉथ, वुलन ब्लँकेट आदी गोष्टींचासमावेश होतो.

 

हातमाग उत्पादनांच्या निर्यातीसंबंधीच्या बाबींसाठी हॅण्डलूम एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल या संस्थेची स्थापना १९६५ मध्ये करण्यात आली. हातमाग उत्पादनांची २००९-१० या वर्षांत एकूण निर्यात सु. १,२५२.८० कोटी रुपये एवढी होती.

 

नॅशनल हॅण्डिक्राफ्ट्स ॲण्ड हॅण्डलूम म्यूझीयम्स (छककच) या दिल्लीस्थित संस्थेचे लोकप्रिय नाव क्राफ्ट्स म्यूझीयम असे आहे. या संस्थेचा मुख्य हेतू जनतेला हस्तव्यवसाय व हातमाग (हॅण्डिक्राफ्ट व हॅण्डलूम) यांतील प्राचीन भारतीय परंपरांचा परिचय करून देणे तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासक, संशोधक, कलावंत, संग्राहक आदींना आदान-प्रदानासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा आहे. कला वस्तूंचे संग्रहण, निगा व देखभाल, संवर्धन व संरक्षण, जतन तसेच कला आणि कारागिरीचे पुनरुत्पादन, पुनरुज्जीवन आदी गोष्टी ही संस्था प्रामुख्याने करते.

 

नॅशनल हॅण्डलूम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेची स्थापना१९८३ मध्ये लखनौ येथे झाली. त्यासाठी शासनाने २० कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. या संस्थेची ६ प्रादेशिक कार्यालये असून त्याच्या२८ शाखा आहेत.

 

महाराष्ट्रातील हातमाग उद्योग : महाराष्ट्रात हातमाग आयुक्त विभागाचे (डिपार्टमेंट कमिशन फॉर हॅण्डलूम्स याचे) प्रादेशिक कार्यालय मुंबई येथे असून इतर शाखा औरंगाबाद, कोल्हापूर व नागपूर येथे आहेत. हातमागासंबंधीचे कार्य कापड उद्योग विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र लघू उद्योग विकास मंडळ, महाराष्ट्र राज्य हातमाग मंडळ (नागपूर), महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी संघ इ. संस्था पाहतात.

 

महाराष्ट्रातील हातमाग उद्योग संपूर्ण राज्यात विखुरलेला आहे. निर्मिती स्थानावरून त्या उत्पादनांना ख्याती प्राप्त झाली आहे. उदा., इचलकरंजी साडी, सोलापुरी चादरी, नागपुरी साडी, येवल्याची व पैठणची पैठणी, महेंदर्गी चोळी व खण इत्यादी. महाराष्ट्र शासन विविध संस्थांच्या आणि योजनांच्या माध्यमातून हातमाग उद्योगास अर्थसाहाय्य, कर्जपुरवठा, वित्त पुरवठा, प्रशिक्षण, बाजारपेठ उपलब्ध करून देणे आदींबाबत सहकार्य करते.

 

पहा : काथ्या कापड उद्योग गालिचे चटया तंत्रविद्या रेशीम लोकर विणकाम साडी.

 

संदर्भ : 1. Barve, V. R. Complete Textile Encyclopaedia, 1967.

           2. Bordar, A. Origin and Development of Loom.

           3. Lord, P. R. Mohamad, M. H. Weaving : Conversion of Yarn to Fabric, 1973.

           4. Maharashtra State Development Report, Handlooms and Handicrafts, 2004.

            5. Sudalaimutha, S. Devi, S. Handloom Industry in India, 2007.

वाघ, नितिन भरत भागवत, रा. शं.