टाचणी : (पिन). कागद, कापड वा इतर वस्तू एकत्र टाचून ठेवण्यासाठी वारण्यात येणारा, एका बाजूला काट्यासारखे तीक्ष्ण टोक व दुसऱ्‍या बाजूला घडविलेले गोल बसकट (नेहमीच्या व्यवहारातील किंवा उपयोगानुसार अन्य प्रकारचे) डोके असलेला कडक तारेचा तुकडा. कापडासारख्या नरम पदार्थाचे तुकडे एकत्र अडकवून ठेवण्यासाठी भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्‍यावरील देशांत टाचणीचा उपयोग फार पुरातन काळीही करीत असत. त्या काळात वल्कले वापरात होती व त्या वेळी पांघरुणाचे भाग एकमेकांत अडकविण्यासाठी बाभळीचे काटे किंवा माशांची टोकदार हाडे वापरीत असत. पुढे काशाची तार बनविण्यात येऊ लागल्यावर त्या तारेपासून टाचण्या बनविण्यात येऊ लागल्या. त्या वेळी टाचणीचे डोके बनविण्यासाठी तारेचे टोक गुंडाळून त्याची गोळी तयार करीत किंवा तेथे मण्यासारखी एखादी शोभिवंत वस्तू ठेवीत.

ईजिप्तमधील थडग्यांत सापडलेल्या धातूच्या काही मौल्यवान टाचण्या ३,००० वर्षांपूर्वीच्या आहेत. रोमन लोकही धातूच्या टाचण्या वापरीत असत व त्यांच्या डोक्यावर रत्नाचे खडे बसवीत असत. अशा टाचण्या मुख्यतः अंगावरच्या वस्त्रांची टोके एकमेकांत अडकविण्यासाठी करीत असत. १८२३ पर्यंत टाचण्या बनविण्याचे काम हातानेच करीत असत. हल्ली प्रचारात असलेल्या अखंड जातीच्या टाचण्या बनविण्याचे यंत्र १८२४ साली लॅम्युएल राइट या अमेरिकी यांत्रिकाने तयार केले व इंग्लंडमध्ये जाऊन त्याचे एकस्व (पेटंट) मिळविले. तेव्हापासून यांत्रिक पद्धतीने टाचण्या बनविण्यास सुरुवात झाली. आता टाचण्या बनविण्यास पितळी किंवा नरम पोलादाची कडक तार वापरतात.

टाचणी बनविताना प्रथम रिळावर गुंडाळलेल्या तारेचे टोक मार्गणक मुद्रानळीतून किंवा फिरत्या पोलादी खुंट्यांच्या दोन रांगांमधून ओढत नेतात. त्यामुळे टाचणीची तार अगदी सरळ होते. नंतर या तारेच्या टोकावर खोलगट भाग असलेल्या हातोड्याचा ठोका मारून तेथे टाचणीचे डोके घडवितात. नंतर त्या तारेतून ठराविक लांबीचा डोके घडविलेला तुकडा तोडून घेतात. या तुकड्याचे साधे टोक अपघर्षण चाकांवर (वस्तू घासून व खरवडून गुळगुळीत करणारा पदार्थ लावलेल्या चाकांवर) घासले जाऊन तीक्ष्ण होते (आ. १). या टाचण्या गंजू नयेत म्हणून पितळी टाचण्यांवर कल्हई करतात व पोलादी टाचण्यांवर निकेलाचा लेप चढवतात. पितळेच्या टाचण्या कथिल मिसळलेल्या ऑक्झॅलिक अम्लाच्या विद्रावात उकळल्या म्हणजे त्यांच्यावर कल्हई चढते. पोलादी टाचण्यांवर निकेलाचा लेप देण्यासाठी विद्युत् विलेपन पद्धती वापरतात. टाचण्यांवर कल्हई किंवा निकेल चढविल्यानंतर त्या एका फिरत्या पिंपात घासून चकचकीत करतात. आता टाचण्या स्वयंचलित यंत्रांवर महोत्पादन पद्धतीने बनविल्या जातात व त्यामुळे त्यांची किंमत अगदी क्षुल्लक असते. एका जातीच्या टाचण्या एका स्वतंत्र कागदात अनेक रांगा करून त्यात खुपसून ठेवतात व रांगांची घडी करून विक्रीसाठी पाठवितात. काही वेळा निरनिराळ्या लांबीच्या टाचण्या लहान डब्यातून वजनानुसार विकतात.

टाचण्यांचे विविध प्रकार : (१) सामान्य टाचणी, (२) सुरक्षित टाचणी, (३, ४) डोक्यातील केसात घालण्याच्या टाचण्या, (५, ६) आरेखन टाचण्या, (७) विणकामाची टाचणी, (८) दाबयंत्राने (स्टॅपलरने) बसविण्याची टाचणी.

सामान्य टाचण्या शक्य तितक्या बारीक तारेच्या म्हणजे ०·५ ते ०·७५ मिमी. व्यासाच्या असतात परंतु त्यांची लांबी १ सेंमी.पासून ५ सेंमी.पर्यंत असते. टाचण्यांची लांबी ठराविक अंकाने दर्शविली जाते. टाचणीची लांबी आणि तिचा बाजारी अंक दाखविण्यासाठी खालील कोष्टक वापरले जाते.

लांबी मिमी. 

९ 

१३ 

२२ 

२५ 

२७ 

३२ 

३९ 

४५ 

५० 

बाजारी अंक 

६ 

८ 

१४ 

१६ 

१७ 

२० 

२४ 

२८ 

३२ 

कापडात खुपसलेल्या टाचण्यांची उघडी टोके हाताला किंवा अंगाला टोचून इजा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जखमेवर बांधलेल्या पट्टीसाठी किंवा लहान मुलांच्या कपड्यावर बसविण्यासाठी सुरक्षित जातीची टाचणी (आ. २) वापरतात. या टाचणीचे टोक एका झाकणाच्या आत ठेवता येते. या प्रकारची टाचणी न्यूयॉर्क येथील वॉल्टर हंट या यांत्रिकांनी १८४९ साली बनविली व तिचे एकस्व मिळविले.

स्त्रियांच्या डोक्यावरील केसात फुले अडकविण्यासाठी बोथट टोकाच्या रंगीत प्लॅस्टिकाच्या लांब टाचण्या वापरतात. त्या टाचण्यांच्या डोक्यावर मण्यासारखा (आ. ३) गोल किंवा गुंडीसारखा चपटा भाग्य असतो. केस किंवा फुले अडकविण्यासाठी आ. ४ मधील टाचणी किंवा आकडाही वापरतात. अशा काही मौल्यावान टाचण्या चांदीच्या तारेपासून बनवितात व त्यांच्या डोक्यावर रत्नाचे खडे जडवितात.

रेखाचित्रे काढण्याचे आरेखन कागद आरेखन-फलकावर धरून ठेवावे लागतात. त्यासाठी वापरावयाच्या टाचण्या अगदी आखूड करतात. त्यांचे दोन प्रकार आ. ५ व ६ मध्ये दाखविले आहेत. हाताने विणलेल्या कापडाचे भाग तात्पुरते अडकवून ठेवण्यासाठी आ. ७. मध्ये दाखविलेली काटकोनी डोक्याची टाचणी वापरतात. कागदांना मारायचा तारेचा टाका (आ. ८) हा टाचणीचा अलीकडील प्रकार आहे. 

भारतात टाचण्या बनविण्याचे अनेक लहान कारखाने आहेत. भारताला लागणारा सर्व माल भारतातच तयार होतो. त्यातील काही माल परदेशांतही पाठवितात. भारतातून १९७१ साली १ लाख रु. किंमतीच्या टाचण्यांची निर्यात झाली व ९४,००० रु. किंमतीच्या काही विशेष प्रकारच्या टाचण्यांची आयात झाली.

ओक, वा. रा.