पीडकनाशके : कृषी उत्पादन, अरण्यातील व उद्यानातील झाडे, तयार खाद्यपदार्थ, कापडचोपड, लाकडी वस्तू, इमारती इत्यादींना आणि मनुष्य व पाळीव प्राणी यांच्या आरोग्यास विघातक अशा वनस्पतींची व प्राण्यांची वाढ खुंटविणारी, प्रसार थोपविणारी किंवा नाश करणारी रासायनिक द्रव्ये.

पीडके व पीडकनाशके यांचे प्रकार : पीडक प्राण्यांमध्ये मावा, गोचीड इ. कीटक, सूत्रकृमीसारखे कृमी [→ नेमॅटोडा], गोगलगाय व तत्सम मृदुकाय [→ मॉलस्का] इ. अपृष्ठवंशी (ज्यांना पाठीचा कणा नाही असे) प्राणी तसेच उंदीर, ससे व तत्सम कृंतक [दातांनी व नखांनी वस्तू कुरतडणारे → कृंतक गण] वर्गातील आणि पक्ष्यांसारखे पृष्ठवंशी अशा नानाविध प्राण्यांचा समावेश होतो. तणे व कवके (बुरशीसारख्या हरितद्रव्यरहित वनस्पती) ही वनस्पतिवर्गातील मुख्य पीडके होत.

सर्व पीडकनाशके सर्व पीडकांवर परिणामकारक नसतात. प्रत्येक पीडकनाशक विशिष्ट प्राणिवर्गावर किंवा वनस्पतिवर्गावर प्रभावी असते. त्यावरून त्याचे वर्गीकरण ⇨ कीटकनाशके, अकॅरिडनाशके, ⇨ कवकनाशके, ⇨ कृंतकनाशके, मृदुकायनायशके (मॉलस्किसायडे), सूत्रकृमिनाशके [→ सूत्रकृमिजन्य वनस्पतिरोग ], तणनाशके [→ तण ], शैवलनाशके असे केले जाते. या सर्वांचा समावेश पीडकनाशके या व्यापक गटात केला जातो.

पीडकनाशके व औषधे : पीडकांमुळे मनुष्य व इतर प्राणी यांना जे रोग होतात त्यांच्या निवारणासाठी जी रसायने वापरली जातात, त्यांना ‘औषधे’ म्हणतात. उदा., हिवतापाच्या जंतूंचा प्रसार करणाऱ्या डासांचा नाश करण्यासाठी वापरतात ते रसायन (उदा., डीडीटी) हे कीटकनाशक, पण त्या जंतूंमुळे उद्‌भवणाऱ्या हिवतापावर गुणकारी म्हणून वापरतात ते रसायन एक औषध होय. रॅगवीड या तणाचा नाश तणनाशकाने व त्याच्या परागामुळे येणाऱ्या परागज्वराचे निवारण औषधाने होते.

कार्यपद्धती : पीडकांच्या जीवनक्रमात कोणता तरी बिघाड घडवून पीडकनाशके त्यांचा नाश करतात. काही त्यांच्या पोटात जाऊन विषार निर्माण करतात, तर काही स्पर्शाने रक्तात भिनून व काही श्वसनमार्गाने प्रवेश करून त्यांना मारतात. काही पीडकनाशके त्यांचा प्रतिकार करतात व इष्ट वस्तूंचे संरक्षण करतात, तर काही त्यांना वंध्य करून त्यांचे जननच थांबवितात.

पीडकनाशके वापरण्याच्या पद्धतीही भिन्न आहेत. काही धुरीच्या रूपाने [→ धूम्रकारी पदार्थ], काही चूर्णरूपात वा विद्रावरूपात फवारून, तर काही पायसरूपात (तेलासारखे पदार्थ व पाण्यासारखे पदार्थ यांच्या दुधासारख्या मिलापरूपात) शिंपडून व काही जमिनीत मिसळून वापरणे आवश्यक असते. पीडकनाशकाचा पुरवठा दीर्घकाल सतत होत रहावा यासाठी त्याची ठराविक मात्रा जिलेटिनात वेष्टित केलेल्या रूपात जमिनीत घालण्याची एक नवीन पद्धत प्रयोगावस्थेत आहे.

फायदे व तोटे : पीडकनाशके वापरल्याने कृषी उत्पादनाच्या हेक्टरी प्रमाणात वाढ होते, उत्पादन हमखास मिळू शकते, उत्पादनाची प्रत सुधारते व उत्पादन खर्चातही बचत होते हे निश्चित फायदे आहेत परंतु पीडकनाशकांचा उपयोग डोळसपणे करणे आवश्यक आहे. अन्यथा पीडकांवर उपजीविका करणारे प्राणी उपासमारीने किंवा विषबाधा होऊन मोठ्या प्रमाणात मेले, तर निसर्गातील समतोल ढासळण्याची शक्यता असते. पीडकनाशके काही प्रमाणात उत्पादित पदार्थात साठविली जातात व त्यामुळे खाद्यपदार्थांच्या द्वारे ती मनुष्यांच्या व प्राण्यांच्या शरीरात प्रवेश करतात. शरीरात त्यांचे प्रमाण मर्यादेबाहेर गेले, तर काही विकार निर्माण होतात. पीडकनाशके वापरलेल्या क्षेत्रापासून पावसाच्या पाण्यामुळे नजीकच्या जलाशयात जाऊन साचली म्हणजे तेथील जलचर सृष्टीवर (उदा., माशांच्या वाढीवर) अनिष्ट परिणाम घडू शकतो. पिण्याचे पाणीही असेच दूषित होऊ शकते. हवेत त्यांचे प्रमाण वाढले, तर वातावरणीय प्रदूषणही संभवते [→ प्रदूषण ]. कित्येकदा पीडकनाशकामुळे उपकारक जीवही मरतात आणि उपयुक्त नैसर्गिक कार्यास अडथळा येतो उदा., परागसिंचनाचे कार्य करणारी फुलपाखरे व मधमाश्या. या आपत्ती टाळण्यासाठी योग्य तेच पीडकनाशक निवडून व योग्य वेळीच व आवश्यक तितकाच त्याचा वापर केला पाहिजे.

पीडकांपासून बचाव करण्याचे अन्य मार्ग : शेतजमिनीचा निचरा नीट होऊ देणे, पिकामध्ये फेरबदल करणे [→ पिकांची फेरपालट ], मशागतीची कामे यंत्रांनी करणे, किरणोत्सर्गी (भेदक किरण अथवा कण बाहेर टाकणाऱ्या) द्रव्यांचा उपयोग करून पीडकांचे निर्बीजीकरण करणे [→ अणुउर्जेचे शांततामय उपयोग ], पीडकांना दाद देणार नाहीत असे बियाणे वापरणे इ. उपाय पीडकांपासून रक्षण मिळावे म्हणून करता येतात. पीडकनाशकांमुळे दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून पीडकनाशके वापरताना या उपायांचीही जोड देण्याची पद्धत प्रचारात येत आहे [→ कीटक नियंत्रण पीक संरक्षण ].

निर्मिती : काही कीटकनाशके वनस्पती व खनिजे यांपासून तयार करतात. उदा., पायरेथ्रीन, रोटेनॉन व निकोटीन सल्फेट ही वनस्पतींपासून आणि क्रायोलाइट हे खनिजापासून मिळते. सूक्ष्मजीवांच्या संवर्धन प्रक्रियेपासूनही (कृत्रिम तऱ्हेने त्यांची वाढ करण्याच्या पध्दतीतून) काही पीडकनाशके मिळतात. उदा., पतंग व पाकोळ्यांच्या अळ्या यांचे निवारण करण्यास उपयोगी पडणारे एक द्रव्य बॅसिलस थुरिंजिएन्सिस या जंतूंची वाढ होताना निर्माण होते. तथापि बहुसंख्य पीडकनाशके संश्लेषणाने (योग्य त्या अणू व रेंणूमध्ये रासायनिक विक्रिया घडवून) बनविली जातात.

भारतीय उत्पादन : पीडकनाशकांच्या भारतीय उत्पादनास १९५२ मध्ये सुरुवात झाली. प्रथम बीएचसी हे पीडकनाशक बनविण्यात आले आणि त्याच्या पाठोपाठ डीडीटी व इतर पीडकनाशके (उदा., लिंडेन, पॅराथिऑन, मॅलॅथिऑन इ. कीटकनाशके) फेरबाम, ऑरिओफंजीन इ. कवकनाशके वॉरफेरीन व झिंक फॉस्फाइड ही कृंतकनाशके मेटाल्डिहाइड हे मृदुकायनाशक मिथिलाम एन सोडियम हे सूत्रकृमिनाशक २, ४-डी व २, ४, ५-टी ही तणनाशके भारतात तयार होऊ लागली. यांशिवाय प्रत्यक्ष वापरण्यासाठी पीडकनाशके ज्या रूपात लागतात–मिश्रणे, पायसे इ.–त्या रूपात ती बनविण्याचा उद्योगही भारतात चालतो. पेरण्यापूर्वी बियाण्यावर संस्कार करण्यासाठी लागणारी रसायनेही भारतात होतात. या सर्व उद्योगांसाठी लागणारी बरीचशी रासायनिक द्रव्येही भारतातच बनतात.


सध्या भारतात वापरात असेलल्या निरनिराळ्या पीडकनाशक रसायनांपैकी ४० रसायनांची निर्मिती करण्याचे तंत्र आता विकसित झालेले आहे. भारतातील एकूण खपाच्या ७५ % पीडकनाशक रसायने भारतात बनविली जातात. यांशिवाय इतर पीडकनाशकांच्या निर्मितीबद्दलचे संशोधन खाजगी व सरकारी प्रयोगशाळांतून करण्यात येत आहे. या उद्योगाचे महत्त्व जाणून बऱ्याच कारखान्यांतून त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. १९७३ मध्ये या कारखान्यांची उत्पादन क्षमता ४५,१२० टन होती, ती १९७५ मध्ये सु. ५०,००० टन आणि १९७८ अखेर सु. ७५,००० टन इतकी झाली. १९५४-५५ मध्ये ह्या रसायनांचा भारतातील वापर प्रती हेक्टरी सु. १४·५६ लि. इतका होता, तो १९७६-७७ मध्ये सु. १,९७९ लि. इतका झाला. याच्याशी तुलना करता जपानमध्ये हा खप प्रती हेक्टरी सु. ८,१४५ लि., अमेरिकेत सु. ६,५८० लि., तर य़ुरोपात सु. ८,५१० लि. इतका आहे.

सध्या वापरात असलेली पीडकनाशके अमेरिकेची संयुक्त संस्थाने, पश्चिम जर्मनी, स्वित्झर्लंड, ब्रिटन, इटली इ. देशांत प्रथम बनविण्यात आली. १९६२ पर्यंत जपानमध्येही ह्या देशांनी शोधून काढलेली पीडकनाशकेच बनविण्यात येत होती. त्यानंतर तेथे नवीन पीडकनाशके शोधण्यासंबंधी संशोधन सुरू झाले.

नवीन पीडकनाशकांचा शोध : एखादे पीडकनाशक दीर्घकाळ वापरले गेले म्हणजे त्याला विरोध करू शकतील अशा पीडकांच्या नव्या जाती निर्माण होतात. त्यामुळे नवनवीन पीडकनाशकांचे संशोधन करणे क्रमप्राप्तच होते. नवीन पीडकनाशक शोधून काढणे हे काम फार खर्चाचे वन दीर्घकाल लागणारे असते. कारण एखादे रसायन पीडकनाशक म्हणून उपयोगी पडेल हे ठरविण्यासाठी त्याला अनेक कसोट्यांना उतरावे लागते. त्याची मारकमात्रा व वापरण्याची कार्यक्षम पध्दत ठरवावी लागते. औद्योगिक प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी योग्य संश्लेषण पध्दत बसवावी लागते. हे सर्व साध्य होण्यास कमीकमीत पाच वर्षांचा तरी अवधी लागतो.

पहा : कवकनाशके कीटकनाशके कीटक नियंत्रण कृंतकनाशके तण धूम्रकारी पदार्थ.

संदर्भ : 1. Hassali, K. A. World Crop Protection, 2 Vols., London, 1969.

     2. Metcalf, R. L. Advances in Pest Control Research, 6 Vols., New York, 1957-65.

     3. Mukundan, T. K. Plant Protection-Principles and Practice, Bombay, 1964.

मिठारी, भू. चिं.