सायकल : सायकल किंवा दुचाकी हे मानवी शक्तीद्वारे पायाने गती देऊन चालणारे एक उत्तम वाहन आहे. एका सरळ रेषेत बसविलेली दोन चाके, लोखंडी पातळ नळ्यांची त्रिकोणाकृती चौकट, बैठक, तोल सांभाळणारे व दिशा बदलणारे हँडल, गती देणारे दोन पायटे, दोन चाकांवर घर्षणाद्वारे कार्य करणारे गतिरोधक हे सामान्य सायकलचे मुख्य भाग होत. या वाहनाला आजचे प्रगत रुप प्राप्त होण्यासाठी अनेक संशोधकांचे १७५० सालानंतरचे अडीचशे वर्षांतील श्रम कारणीभूत आहेत. आजही जगाच्या अनेक भागांत यांत्रिक दळणवळणाचे हे महत्त्वपूर्ण साधन आहे.

सायकल या वाहनाच्या कल्पनेचे मूळ ज्याला म्हणता येईल असे वाहन एम्. डी. सिव्हर्क या फ्रेंच गृहस्थांनी १६९० मध्ये प्रथम तयार केले. एका दांड्याने जोडलेली दोन लाकडी चाके इतकेच त्याचे मूळ स्वरुप होते. या दांड्यावर दोन्ही बाजूंनी पाय सोडून बसून पायाने जमिनीला रेटे देतच हे वाहन चालवावे लागे. यानंतर १८१६ मध्ये बॅरन कार्ल द ड्रेस द सौअरब्रू न यांनी हे वाहन वळविण्यासाठी पुढच्या चाकावर एक हँडल बसविले, तरी सायकल पायाने रेटूनच चालवावी लागे. १८४० मध्ये पुढच्या चाकाच्या आसाला पायाने फिरविता येईल असे क्रँक (भुजा) बसविण्याची सुधारणा झाली. १८७६ मध्ये एच्. जे. लॉसन यांनी पायटा, स्प्रॉकेट (साखळीचे दंतचक्र ) व साखळी वापरुन मागच्या चाकाला गती देण्याची पद्घत सुरु केली. आधुनिक सायकलचा हा पहिला नमुना किंवा आदिरुप होय.

सायकलच्या जगतात १८८७ मध्ये ⇨जॉन बॉइड डनलॉप यांच्या रबरी टायरने खरी क्रांती केली. लाकडी चाक व त्याच्यावरील लोखंडी धाव हे प्रकार मागे पडून भरीव रबराचे, मऊ रबराचे आणि रबरी नळीत हवा भरुन फुगविलेले टायर प्रचारात आले. गती आणि सोय या दृष्टींनी हवा भरलेले टायर सर्वांपेक्षा उत्तम ठरले.

सायकलचे विविध भाग : सायकलचे वजन सर्वसाधारणपणे ७ ते १६ किगॅ. असते. ती स्वतःच्या वजनाच्या कितीतरी पट वजन वाहून नेऊ शकते.  

  

आ. १. सायकलचे विविध भाग : (१) हँडल, (२) गतिरोधक-तरफ, (३) गतिरोधकांच्या तारा, (४) चौकटीची पुढची नळी, (५) टायर, (६) गतिरोधक पट्टी, (७) तुंबा, (८) किनार, (९) क्रँक शाफ्ट (भुजा दंड), (१०) पायटा, (११) साखळी, (१२) फ्री व्हील (मुक्त चक्र), (१३) साखळीची आधार नळी, (१४) पंक रक्षक, (१५) बैठकीची नळी, (१६) मागची आधार नळी, (१७) बैठक, (१८) चौकटीची वरची नळी.चौकट : आकृतीत दिसत असल्याप्रमाणे चौकटीची त्रिकोणाकृती रचना केलेली असते. यामुळे सर्व बाजूंना आधार मिळून चौकटीची ताकद वाढते. चौकटीची पुढची नळी सरळ उभी न ठेवता मागच्या बाजूकडे थोडी झुकवून बसविलेली असते. या रचनेमुळे पुढचे चाक सहजासहजी बाजूकडे वळत नाही व सायकल सहजपणे सरळ रेषेत चालते. चिमट्याच्या वरच्या नळीचा भाग व हँडलच्या उभ्या नळीचा खालील भाग चौकटीच्या पुढच्या नळीच्या आत एकमेकांत अडकवून घट्ट आवळून बसविलेले असतात आणि चौकटीच्या नळीमध्ये ठेवलेल्या दोन गोलक धारव्यांवर ( बॉल-बेअरिंगवर ) सहज फिरतील असे बसविलेले असतात. चिमट्याची खालची टोके बाकदार असतात त्यामुळे त्यांचा स्प्रिंगसारखा थोडा उपयोग होतो आणि पुढील चाक वळविण्याचे काम सुलभ होते. सायकलींना बळकटी येण्यासाठी त्यात पोलादाच्या किंवा ॲल्युमिनियमाच्या चौकटीच्या नळ्यांचे जोडकाम साधारणतः सॉकेटांचा ( खोबणीचा ) उपयोग करुन व पितळी झाळ देऊन केलेले असते.

चौकटीचे जोडकाम झाल्यावर तिच्यावर एनॅमल रंग देऊन कंपनीचे व्यापारी चिन्ह छापतात किंवा धातूचे बनविलेले चिन्ह बसवितात.

चाके : पाळ (रिम), आरा (स्पोक) आणि तुंबा (हब) हे चाकाचे तीन भाग असतात.

 

पाळ : पाळी पोलादाच्या वा ॲल्युमिनियमाच्या तयार करतात. पोलादी पाळी १८ ते २० गेज पत्र्याच्या आणि कडा वळवून गोल केलेल्या असतात. या गोलाईच्या आकारावरच टायर बसतो. पाळीचे माप सांगताना पाळीत बसणाऱ्या टायरचे माप सांगावयाची पद्घत आहे.

आरे : आरे पोलादी तारेचे करतात. आऱ्याच्या एका टोकावर डोके घडविलेले असते व दुसऱ्या टोकावर आटे पाडलेले असतात. आऱ्यावरील डोक्यामुळे आरा तुंब्याच्या भोकात अडकून राहतो आणि आऱ्यावरील आट्यांमुळे किनारीकडे ( पाळीकडे ) ओढून धरता येते. याकरिता किनारीमधून नट आऱ्यावरील आट्यावर बसवावा लागतो. बहुतेक ठिकाणी दोन्ही चाकांत चाळीस आरेच असतात. हे सर्वसाधारणपणे १५ गेजच्या पत्र्याचे किंवा टोकाजवळ १५-१६ आणि इतर जागी १७-१८ गेजच्या पत्र्याचे असतात. मालवाहू सायकलींचे आरे थोडे जाड म्हणजे १४ गेजच्या पत्र्याचे असतात. शर्यतीत वापरल्या जाणाऱ्या सायकलींमध्ये आरे न वापरता कार्बन पोलादाचे अतिपातळ चक्र असते.

तुंबा : याच्या दोन्ही बाजूंना गोलक धारवे असतात. ते चाकाच्या आसावर बसतात आणि आतून किंवा बाहेरुन आवळता येतात. ड्रायव्हिंग स्प्रॉकेट शेलवर बसवितात. ते अनेक मापांचे असतात. चाक मागे फिरविले म्हणजे गिअर बदलतो. एका बाजूला पक्के बसविलेले स्प्रॉकेट आणि दुसऱ्या बाजूला ‘फी व्हील’ बसविण्याची दुसरी पद्घत आहे. या पद्घतीचा प्रवासी सायकलींना चांगला उपयोग होतो. ‘कोस्टर हब’ नावाचा तुंबा अमेरिकेत प्रचलित आहे. यात पायटा मागे फिरविला म्हणजे गतिरोधन होते.

बैठकी खालच्या उभ्या नळीच्या खालच्या सांध्यामध्ये जी पोकळ जागा असते, त्यामध्ये पायटा फिरविण्याचा कँक शाफ्ट ( भुजादंड ) बसवितात. पुढच्या चाकाचा पोलादी आस चिमट्याच्या टोकांवरील भोकांमध्ये बसविलेला असतो. मागच्या चाकाचा पोलादी आस चौकटीच्या मागच्या बाजूवरील खाचांमध्ये बसविलेला असतो.


बदल-चक्रपेटी : हा सायकल जगतातील एक अजब शोध आहे. पूर्वी चौकटीच्या बुडाशी चेनच्या चाकाचाच एक भाग होईल अशा रीतीने ही बदल-चक्रे  बसवीत असत. नंतर दोन वेग देणारा ‘हब-गिअर’ प्रचारात आला. आधुनिक काळात चीन, जपान, इंडोनेशिया व सिंगापूर यांच्यासारख्या पौर्वात्य आणि दक्षिण-पूर्व देशांत सायकलला बदल-चक्रपेटी जोडलेली असते. त्यामुळे सायकलस्वाराला स्वतःची सायकल दोन ते दहा क्र मीय गतीने सहज चालविता येते. जर्मनीतील ‘मर्सिडीझ बेन्झ’ ह्या मोटारनिर्मिती कारखान्याने २००५ मध्ये निरनिराळ्या अठ्ठावीस गती असलेली सायकल तयार केली. ह्यामध्ये सायकलचा वेग दाखवू शकणारा छोटा संगणक हँडलवर बसविलेला असून सायकलची किंमत सु. एक लक्ष छप्पन्न हजार रुपयांपर्यंत ठेवण्यात आली होती.

ब्रॅकेट : बैठक, तळ आणि चेन स्टे जेथे एकत्र येतात, त्या ठिकाणी दाते असलेली साखळी फिरविणारे चाक, क्रँक व पायटे बसविलेले असतात. ब्रॅकेट नळकांडीसारखे असते आणि त्यात पोलादी आस धारव्यांवर बसविलेला असतो. औष्णिकोपचार करुन कठिण केलेल्या पोलादी पट्ट्या  आसाच्या दोन्ही बाजूंना बसविलेल्या असतात. यालाच पायटे जोडलेले असतात.

साखळी : ही वजनाने हलकी आणि अचूक मापाची असते. हिच्या कड्या नरम पोलादाच्या असतात आणि त्या पोलादाच्या रिव्हेटनेच जोडतात. या कड्या बहुधा सु. १·२५ सेंमी. लांब असतात. शर्यतीच्या सायकलींच्या साखळीच्या कड्या मात्र सु. २·५ सेंमी. लांब असतात.

टायर आणि ट्यूब : चालीतील घर्षणाने कमी झिजावे आणि चालीला सुकरता यावी या उद्देशाने टायर तयार केलेले असतात. टायरच्या आत रबराची गोल आणि वर्तुळाकार नळी बसवून तीत हवा भरावयाची सोय केलेली असते. ही ट्यूब विशेष प्रकारच्या रबरापासून तयार करतात. त्यामुळे या ट्यूबमध्ये भरलेल्या हवेत जास्त दाब सहन करण्याची क्षमता असते. टायरांच्या कडांमध्ये कडक तार बसविलेली असते तीमुळे हवा भरलेल्या रबरी ट्यूबचा रेटा आतून वाढला, तरी टायर किनारीवर पक्का बसतो. [⟶ टायर–२].

पंक-रक्षक : चाके फिरताना अपकेंद्री-केंद्रोत्सारणाने रस्त्यावरील घाण सायकलस्वारावर उडू नये म्हणून चाकांवर पंक-रक्षक बसविलेले असतात. पत्रा वाकवून त्याला अर्धनलिकाकार आणि अर्धवर्तुळाकार देऊन हे रक्षक तयार करतात. यांची ताकद वाढावी म्हणून यांच्या दोनही कडा वळवून त्यांनाही गोलाकार देतात.

गतिरोधक : सायकलच्या हँडलला बसविलेल्या दोन उतरत्या तारा वरच्या दिशेत ओढल्या म्हणजे त्याला जोडलेल्या चाकांजवळच्या टणक रबरी किंवा कातडी पट्ट्या  किनारीवर आवळल्या जातात, त्यामुळे सायकलचा वेग कमी करता येतो किंवा ती थांबविता येते. गतिरोधक पट्ट्या  ओढण्याच्या उभ्या तारा ओढण्याकरिता हँडलच्या दोन्ही आडव्या भागांवर मुठीने दाबण्याच्या तरफा बसविलेल्या असतात.

सायकलला लागणारे साहाय्यक साहित्य : घंटी, दिवा, सामान ठेवण्याचे कॅरिअर, साखळीवरचे आवरण, कुलूप, घोडी (स्टँड), हवा भरण्याचा पंप, वंगण तेलाची कुपी, स्क्रू ड्रायव्हर, काही पोलादी पाने इ. साहाय्यक साहित्य सायकलसाठी गरजेचे असते.

सायकलींचे इतर प्रकार : तीन चाकी : दोन चाकांसारखीच तीन चाकी सायकलही वजनाला हलकी असते. तीन चाकांमुळे या सायकलचा तोलही चांगला राहतो. मालवाहू सायकलला पुढे दोन आणि मागे एक चाक असते. सुरुवातीच्या काळात मोठी माणसेही तीन चाकी सायकल वाहन म्हणून वापरीत असत. लहान मुलांसाठी तीन चाकी सायकलींचे अनेक प्रकार प्रचलित आहेत. काही शहरांतून सार्वजनिक प्रवासी वाहन म्हणून वापरल्या जाणाऱ्या सायकलींना एक चाक पुढे असून दोन चाके मागे असतात. अशा सायकली एकविसाव्या शतकातही भारतात उत्तरेकडील राज्यांत वापरल्या जातात.

एक चाकी : या सायकलला एक चाक, बैठक आणि दोन पायटे इतकेच भाग असतात. ही सायकल सर्कसमध्ये करमणुकीचे खेळ करण्यासाठी वापरतात.

आ. २. शर्यतीची आधुनिक सायकल (यामध्ये निरनिराळ्या अठ्ठावीस गती देणाऱ्या वेगबदलाचे दोन संच बाजूला दाखविले आहेत)टॅन्डेम : ही सायकल एकाच वेळी दोन माणसांना चालविता येईल अशा पद्घतीने बनविलेली असते. यांमधील बैठकी एकापुढे एक अशा बसविलेल्या असतात आणि दोन्ही माणसांसाठी स्वतंत्र पायटे असतात. अशा प्रकारची सायकल सहाजणांसाठीही करता येते.

शर्यतीची सायकल : या सायकलचे हँडल खाली वळविलेले असते. त्यामुळे सायकलस्वार पुढे वाकून सायकल चालवू शकतो व त्यामुळे पुढून येणाऱ्या वाऱ्याचा रोध कमी होऊन सायकलचा वेग वाढविता येतो. ही सायकल वजनाला हलकी असते. चाकांच्या किनारी जरा अरुंद असतात आणि त्यामध्ये विशेष प्रकारची ट्यूब व टायर वापरतात. या सायकलीचा गतिरोधक टायरच्या बाहेरच्या बाजूवरही दाबून लावता येतो. पायटे उलटे फिरविले म्हणजे गतिरोधन व्हावे अशी रचना काही प्रकारांत मागील तुंब्यामध्ये केलेली असते. त्यास पायटा गतिरोधक (पेडल बेक) म्हणतात.


 घडीची सायकल : या सायकलची घडी करुन पाठीवरुन नेता येईल इतकी ती हलकी बनविलेली असते परंतु त्यामानाने ती मजबूतही असते. सैनिकी लोकांना अशा सायकलींचा विशेष उपयोग होतो.

स्त्रियांची सायकल : स्त्रियांना पुढच्या बाजूने बसण्याला सोईस्कर व्हावी अशा विशेष रीतीने बनविलेली चौकट वापरुन ही सायकल बनवितात. या प्रकारात चौकटीची वरची नळी नसते व चौकटीची मजबुती कायम ठेवण्याकरिता खालच्या बाजूस एक जादा नळी बसविलेली असते.

अपंगांची सायकल : सामान्य सायकलींमध्ये बदल करुन अपंगांसाठीची सायकल तयार केली जाते. कमीतकमी त्रासात अपंगांना कोणाचीही मदत न घेता प्रवास करता यावा, अशा हेतूने या सायकलींची रचना केलेली असते. शारीरिक अपंगत्वानुरुप सायकलींमध्ये हँडल, बैठक, गतिरोधक तरफ तसेच इतर साहाय्यक साहित्य यांची मांडणी केलेली असते. गतिनियमनाकरिता सोयीस्कर अशी पायटयंची रचना असून त्यासोबत साखळी गतिचक्र असते. डोके, उरस्थ, धड व श्रोणिभागाच्या सुरक्षितता लक्षात घेऊन तयार केलेल्या बैठकीमुळे सायकलस्वार आरामदायी प्रवास करु शकतो. अत्याधुनिक सायकलींमध्ये जसजसे बदल होत गेले त्यानुसार अपंगांसाठी असलेल्या सायकलींचेही आधुनिकीकरण होत गेले आहे. अपंगत्वानुसार सायकलींचे विविध प्रकार बनविलेले आहेत. उदा., दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, घडीची तीन चाकी, प्रवासी सायकल, एकेरी किंवा दुहेरी बैठकीची संयोगी सायकल इत्यादी.

स्वयंचलित सायकल : अशा प्रकारांत साध्या सायकलवर पेट्रोल एंजिन बसवून एंजिनाच्या साहाय्याने सायकल चालविण्याची सोय केलेली असते.

सायकल वापरण्याचे फायदे : आधुनिक काळात हृदरोगतज्ञ रुग्णाने सायकल चालवावी असा सल्ला देतात. सायकल चालविण्याने रक्ताभिसरण होण्यास मदत तर होतेच परंतु मूळ चयापचय क्रि येसही सायकल चालविण्याचा व्यायाम पोषक होतो. बैठी कामे करणाऱ्यांच्या पायांच्या स्नायूंना सायकलमुळे व्यायाम मिळून जादा चरबी कमी होते. उघड्यावर सायकल चालविण्याने मोकळी हवा मिळते, तसेच शरीराला ऑक्सिजनाचा जास्त पुरवठा होऊन दीर्घश्वसनही होते. एकाच जागी स्थिर राहून सायकल चालविण्याचा व्यायाम व्हावा म्हणून मोठ्या व्यायामशाळांमध्ये सायकल यंत्रे उपलब्ध असतात. त्यांची गती समजण्यासाठी त्यांना वेगमापकही जोडलेले असतात.

गोखले, श्री. पु.