लाख–१ : हेमिप्टेरा गणातील करिया (लॅसिफर) प्रजातीतील लहान किड्याच्या रेझिनयुक्त संरक्षक चिकट स्रावाला लाख म्हणतात. भारत, थायलंड, ब्रह्मदेश व आग्‍नेय आशियातील इतर प्रदेशात हे किडे जंगली व लागवडीतील वृक्षांच्या डहाळ्यांवर व कोवळ्या कोंबावर कीड म्हणून जगतात. लाखेच्या किड्याचे सूक्ष्म लाल रंगाचे डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशी साम्य नसणारी क्रियाशील पूर्व–अवस्था) आश्रयी वृक्षांच्या रसाळ, कोवळ्या डहाळ्यांवर स्थिरावतात व आपली लांब सोंड सालीत खुपसून अन्नरस शोषून घेतात. ते दाट, रेझीनयुक्त द्रव स्रवतात. त्या स्रावाने त्याचे शरीर आच्छादिले जाते. व्यक्तिगत किड्यांचा स्राव एकजीव होऊन डहाळीवर टणक अखंड थर तयार होतो. किड्याचे जीवनचक्र पूर्ण झाल्यावर व पुढच्या (दुसऱ्या) पिढीतील डिंभ बाहेर पडण्यास सुरूवात होण्याच्या वेळेला डहाळ्या कापून घेतात, वाळवितात व व्यापारी लाख मिळविण्यासाठी तिच्यावर प्रक्रिया करतात.

लाख व तीपासून मिळणारे लाल रंजकद्रव्य फार पुरातन काळापासून भारतीयांना माहीत असून कलेमध्ये वास्तुनिर्मितीत तिचा उपयोग होत आलेला आहे. महाभारतात कुंतीसह पांडवांना लाखेपासून तयार केलेल्या लाक्षागृहात जाळून मारण्याचा कौरवांनी प्रयत्‍न केल्याचे वर्णन आहे. अथर्ववेदातही लाखेच्या किड्याचे वर्णन व त्याच्या उपयुक्ततेबद्दल माहिती दिलेली आहे. इ. स. पू. १२०० च्या सुमाराइतक्या जुन्या काळात भारतात लाखेपासून आकार्य (आकार देता येणाऱ्या) व शोभिवंत वस्तू तयार करीत असत. सतराव्या शतकामध्ये व्यापाऱ्यांनी लाखेचे रंजकद्रव्य व त्यानंतर शेलॅक (पत्रीच्या रूपातील लाख) यांची यूरोपियनांना माहिती करून दिल्यावर तिला तेथे व्यापारी महत्त्व प्राप्त झाले. सरतेशेवटी लाख उत्पादने जगातील औद्योगिकीरण झालेल्या बहुतेक देशांत वापरली जाऊ लागली. शेलॅकसहित लाखेचे विविध प्रकार हेच काय ते व्यापारी प्राणिजन्य रेझिने होत. अँनिलीन या रंजक–द्रव्याच्या शोधानंतर रंजकद्रव्य म्हणून लाखेचे महत्व कमी झाले पण ऊष्मादृढ (प्रथम तापविल्याने मऊ व प्रवाही बनणारी पण नंतर कायमची अप्रवाही आणि कडक होणारी) प्लॅस्टिक द्रव्ये आणि व्हार्निशे व पॉलिशे यांमधील तिचे महत्त्वाचे स्थान अबाधित आहे. त्यामुळे विविध उद्योगधंद्यांत व आंतरराष्ट्रीय पातळीवरील लाखेचे महत्त्व वाढले आहे.

लाखेचा किडा : हा एक प्रकारचा खवले किडा [⟶खवले किडे] असून त्याचा समावेश हेमिप्टेरा गणाच्या होमिप्टेरा उपगणातील लॅसिफेरिनी कुलात होती. भारतात लाखेच्या किड्यांच्या चौदा जाती आढळतात. त्यांतील सर्वसामान्य व भारतात विस्तीर्ण भागात आढळणारी जात केरिया लँक्‍का (लँसिफर लँक्सा) ही आहे. भारतात आढळणाऱ्या जातींपैकी काही जाती इतर देशांतही आढळतात, उदा., के. अल्‍बिझिर्ड श्रीलंकेत व के. चायनेन्सिस थायलंडमध्ये, तसेच ब्रह्मदेश, कंबोडिया, लाओस, व्हिएटनाम, चीन, इंडोनेशिया, फिलिपीन्स, मलेशिया, पाकिस्तान, नेपाळ व भूतान या देशांतही केरिया प्रजातीतील अन्य जाती आढळतात.

जीवनचक्र : सूक्ष्म, नावेच्या आकाराच्या, लाल रंगाच्या डिंभापासून या किड्याच्या जीवनचक्रास सुरूवात होते. डिंभाची लांबी सु. ०·५ मिमी. व रूंदी सु. ०·२५ मिमी. असते. एक निकोप मादी ३००–१,००० डिंभांना जन्म देते. विविध पिकांत व निरनिराळ्या वर्षांत पिलाव्यातील नर व माद्या यांचे प्रमाण भिन्न असते तथापि सर्वसाधारणः ते १ : ३ असते. कोंबांवरील वसाहतींची घनता दर चौ. सेंमी.ला १५०–१८० डिंभ असते. एकदा स्थिरावल्यावर डिंभ आपली जागा सोडून जात नाही.

लाखेच्या किड्याच्या जीवनचक्रातील अवस्था : (१) डिंभ, (२) नर लाक्षाकोष्ठ, (३) मादी लाक्षाकोष्ठ, (४) पंखहीन प्रौढ नर, (५) पंखयुक्त प्रौढ नर, (६) प्रौढ मादी, (७) पक्क मादी लाक्षाकोष्ठ, (८) बोरीच्या डहाळीवरील नर व मादी लाक्षाकोष्ठ, (९) बोरीच्या डहाळीवरील लाखेचा थर.

डिंभ स्थिरावल्यानंतर साधारणतः एक आठवडा किंवा त्यानंतर ते सर्व शरीरावर असलेल्या उपत्वचेखाली असणाऱ्या ग्रंथींमधून लाख स्रवण्यास सुरूवात करतात. फक्त मुखांगे (तोडांचे अवयव), दोन श्वासरंध्रे व गुदद्वार या भागांवर लाख स्रवणाऱ्या ग्रंथी नसतात. अशा तऱ्हेने स्वतःच्या स्रावाने बनलेल्या कोष्ठाच्या आवरणामध्ये डिंभ बंदिस्त होतो. तो मोठा होतो तसतसे कोष्ठाचे आकारमान वाढत जाते. प्रौढ दशा येईपर्यत डिंभ तीन वेळा कात टाकतो. डिंभावस्थेतील या तीन अवस्थांचा काळ हा तापमान, आर्द्रता व आश्रयी वनस्पती यांवर अवलंबून असतो. कोष्ठाच्या आकारावरून डिंभाच्या विकासाच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थांपासून लिंग भेद ओळखता येतो. पहिली कात टाकल्यावर लिंग भेद विशेष स्पष्टपणे दिसतो. नराचा लाक्षाकोष्ठ सपाता किंवा खडावा यांसारखा दिसू लागतो व दुसऱ्या वेळेला कात टाकल्यावर लगेच मागच्या टोकाला सैल प्रच्छद (झाकणासारखी वाढ) दिसू लागतो. कोष्ठामध्ये डिंभ दुसऱ्यांदा कात टाकतो आणि पूर्वकोशावस्थेतून व कोशावस्थेतून पार पडतो. या अवस्थांत डिंभ काही खात नाही व मुखांगे निरूपयोगी होतात. कोशावस्था पूर्ण झाल्यावर पंखहीन किंवा अपक्ष प्रौढ नर प्रच्छद बाजूला रेटून बाहेर पडतो. पंखहीन नर जास्त प्रमाणात असतात. वसाहतीतील या दोन प्रकारच्या नरांची सापेक्ष संख्या हंगामपरत्वे बरीच बदलते.  


 मादी डिंभ फुगीर होतो व नासपतीचा किंवा गोलसर पिशवीचा आकार धारण करतो. त्यामुळे लाक्षाकोष्ठाचा आतील सर्व भाग व्यापला जातो. तिसऱ्यांदा कात टाकल्यावर मादी लैंगिक दृष्ट्या प्रौढ होते. अशा मादीचा प्रच्छदातून बाहेर पडलेल्या व ६२–९२ तासांचे आयुष्य असलेल्या नराशी संयोग होतो. लाख स्रवण्याची क्रिया मादी चालू ठेवते आणि किड्याच्या आकारमानाबरोबरच लाक्षाकोष्ठही झपाट्याने वाढत जातो. सरतेशेवटी मादीच्या लाक्षाकोष्ठाचे आकारमान नराच्या लाक्षाकोष्ठापेक्षा अनेक पटींनी वाढते. अंडी घालून होईपर्यंत मादी लाख स्रवत असते. अफलित मादीसुद्धा फलित मादीसारखी लाख व जननक्षम प्रजा निर्माण करू शकते.

अंडी घालण्याची वेळ जसजशी जवळ येते तसतसे मादीचे शरीर एका बाजूने (खालच्या) आकुंचन पावते व लाक्षाकोष्ठाची आतील जागा हळूहळू रिकामी होते. त्याच वेळेला मेण आणि मेणतंतू स्रवले जातात व रिकाम्या जागेत टाकले जातात. अंडी घालण्यासाठी गुद गुलिका (गाठ) कोष्ठामध्ये आत ओढून घेतली जाते. घातलेली अंडी लगेच उबतात. अंडी घालणे व डिंभ निपजणे  या क्रियांमध्ये तापमानाचा महत्त्वाचा भाग असतो. उन्हाळ्यात तापमान १७ से. च्या खाली आणि हिवाळ्यात १५ से. च्या खाली गेल्यास अंडी घालणे जवळजवळ पूर्णपणे थांबते तथापि मादीची अंडी घालण्याची क्षमता ८–१२ दिवसांपर्यंत टिकून राहते. २०से. च्या खालील तापमानास लाक्षाकोष्ठातील डिंभ अक्रिय होतात पण नंतर अनुकूल परिस्थितीत लाख स्रवण्याची त्यांची क्षमता नष्ट होत नाही.

वाण : लाखेच्या किड्याचे रंगिनी व कुसुमी (कुसुंबी) हे दोन वाण भारतात सामान्यतः ओळखले जातात. त्यांपासून तयार झालेले पीक ज्या महिन्यात काढले जाते त्यावरून त्यांच्या पिकांना नावे दिलेली आहेत. प्रत्येक  वाणाची एका वर्षात दोन जीवनचक्रे पूर्ण होतात पण पीक तयार होण्याच्या हंगामात बराच फरक पडतो. रंगिनी वाणाचे ‘कटकी’ पीक ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये काढतात. त्याचे डिंभ जून-जुलैमध्ये झाडांवर सोडलेले असतात. वैशाखी पीक जून-जुलैमध्ये मिळते. त्यैचे डिंभ ऑक्टोबर–नोव्हेंबरमध्ये झाडांवर सोडतात. सामान्यतः वैशाखी पीक अपक्कावस्थेमध्ये लवकर एप्रिल किंवा मे मध्ये काढतात. त्याचप्रमाणे कुसुमी वाणांचे ‘अगहनी’ पीक जानेवारी–फेब्रुवारीमध्ये काढतात. त्यांचे डिंभ जून–जुलैमध्ये सोडतात. तसेच ‘जेठवी’ पीक जून-जुलैमध्ये काढतात. त्याचे डिंभ जानेवारी-फेब्रुवारीत सोडतात. कर्नाटकात रंगिनी वाणाची जल्लारीच्या (शोरिया टालूरा) वृक्षांवर तेरा महिन्यांत तीन जीवनचक्रे होतात पण त्याच वाणाची उत्तर भारतात जल्लारीच्या वृक्षावर दोनच जीवनचक्रे होतात. त्याचप्रमाणे उत्तर भारतात वाढविलेले कुसुमी डिंभ तमिळनाडूत कोशिंब (कुसूम सक्‍लेचेरा ओलिओसा ) वृक्षावर सोडल्यास भिन्न वेळेला जीवनचक्र पूर्ण करतात.

एक निकोप रंगिनी मादी आपल्या आयुष्यात सु. ०·०२९ ग्रॅ. लाख निर्माण करते, तर कुसुमी मादी सु. ०·०६९ ग्रॅ. लाख निर्माण करते. एक किग्रॅ. लाख मिळविण्यासाठी सु. ३४,७९० रंगिनी माद्यांची व सु. १४,६२० कुसुमी माद्यांची गरज असते. भारतात कोशिंब वृक्षांची संख्या व त्यांचे वितरण मर्यादित असल्याने कुसुमी लाखेपेक्षा रंगिनी लाखेचे उत्पादन ५–८ पट आहे. भारतात तयार होणाऱ्या लाखेपैकी सु. ८९% लाख रंगिनी वाणापासून व सु. ११% लाख कुसुमी वाणापासून मिळते. तथापि फिकट रंग व उच्च प्रतीचे रेझीन यांमुळे कुसुमी लाखेला जास्त किंमत मिळते. 

आश्रयी वनस्पती : भारतात शंभराहून अधिक वनस्पतींवर लाखेचे किडे आढळतात पण लाखेच्या मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाच्या दृष्टीने खालील जाती महत्त्वाच्या आहेत. 

रंगिनी वाणासाठी : पळस (ब्युटिया मोनोस्पर्मा) हा भारतात सर्वत्र आढळणारा वृक्ष लाखेच्या किडयांचा सर्वांत सामान्य आश्रयी आहे. भारतात बहुतेक ठिकाणी आढळणारा बोर (झिझिफस मॉरिशियाना ) हा वृक्षही एक प्रमुख आश्रयी आहे. झिझिफस झायलोपायरा हा बोरीच्या प्रजातीतील वृक्ष भारताच्या बऱ्याच विस्तीर्ण भागात (विशेषतः राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व कोकणापासून खालच्या द्वीपकल्पीय भागात) आढळतो व तो मध्य प्रदेशात एक महत्त्वाचा आश्रयी आहे. फायकस क्युनिया हा भारताच्या बऱ्याच मोठ्या भागात (विशेषतः घळ्यांच्या बाजूंवर) सापडणारा वृक्ष तप्त उन्हाळ्यात डिंभ-लाखेच्या परिरक्षणासाठी फार उपयुक्त आहे. बहुशः छोटा नागपूर (बिहार) व आसाम या भागांत तो लाख संवर्धनासाठी वापरण्यात येतो. वड (फायकस बेंगालेन्सिस ) व पिंपळ (फायकस रिलिजिओजा ) हे भारतात सर्वंत्र आढळमारे वृक्ष देशातील उष्ण भागांत आश्रयी म्हणून विशेष महत्त्वाचे ठरले आहेत, कारण त्यांवर उन्हाळ्याच्या काळात डिंभ-लाख टिकू शकते. तूर (कजानस कजान) हे भारतात सर्वत्र घेण्यात येणारे पीक आसामातील डोंगराळ भागात लाखेच्या किड्याचे महत्त्वाचे आश्रयी असून तेथे ते द्विवर्षायू किंवा त्रिवर्षायू (दोन वा तीन हंगामांचे) पीक म्हणून घेतले जाते. अल्बिझिया ल्युसिडा ही वनस्पतीही आसाममध्ये महत्त्वाची आश्रयी म्हणून गणली जाते. भारताच्या विविध भागांत रंगिनी वाणाच्या संवर्धनासाठी वरील वनस्पतींच्या मानाने कमी प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इतर आश्रयी वनस्पती पुढीलप्रमाणे आहेत : वैशाखी पिकासाठी काळा पळस (औजिनिया ऊजेनेन्सिस ), अपक्कावस्थेतील कापणीच्या वैशाखी तसेच कटकी पिकांसाठी खैर (अँकेशिया कँटेच्यू ) व वैशाखी आणि कटकी या दोन्ही पिकांसाठी बाभूळ (अँकेशिया अरेबिका ) व ग्रेविया सेऱ्यूलॅटा. 

कुसुमी वाणासाठी : कोशिंब (स्क्‍लेचेरा ओलिओसा ) हा उपहिमालयी भागातील सतलज नदीपासून पूर्वेकडील शिष्क वनांत आणि मध्य व दक्षिण भारतात आढळणारा वृक्ष आहे. छोटा नागपूर, मध्य प्रदेश, ओरिसा या प्रदेशांत तसेच कर्नाटक व तमिळनाडू या राज्यांच्या काही भागांत कुसुमी वाणाच्या लाखेचे बहुतेक सर्व संवर्धन या वृक्षावरच करण्यात येते. खैर हा भारतातील बहुतेक भागांत आढळणारा वृक्ष छोटा नागपूरमध्ये कुसुमी लाखेच्या अगहनी पिकासाठी यशस्वीपणे उपयोगात आणण्यात आलेला आहे.  


 लाख संवर्धन : योग्य आश्रयी वनस्पती असलेल्या वनांत, उपवनांत व आसपासच्या प्रदेशात लाख संवर्धनाचा धंदा शेतकरी जोडधंदा म्हणून करतात. लाख उत्पादन करणारे भारतातील महत्त्वाचे प्रदेश पुढीलप्रमाणे आहेत : बिहार-छोटा नागपूर विभाग, संथाळ परगणा व गया जिल्हा मध्य प्रदेश-बिलासपूर, रायपूर, बालाघाट, छिंदवाडा, जबलपूर, अंबिकापूर (सरगुजा), मंडला, रायगड, सिवनी, दुर्ग, हुशंगाबाद व शहडोल हे जिल्हे पश्चिम बंगाल-पुरूलिया, मुर्शिदाबाद, माल्डा व बांकुरा हे जिल्हे मेघालय- खासी व जैंतिया टेकड्या, गारो टेकड्या आसाम-मीकीर टेकड्या, नौगाँग, कामरूप व सिबसागर वनविभाग ओरिसा-मयूरभंज, संबळपूर, बोलानगीर, धेनकानाल, कालाहंडी व केओंझार हे जिल्हे महाराष्ट्र-भंडारा व चंद्रपूर हे जिल्हे गुजरात-पंचमहाल व बडोदे हे जिल्हे उत्तर प्रदेश-मिर्झापूर जिल्हा आणि लखनौ व वाराणसी वनविभाग. तसेच पंजाब, कर्नाटक व तमिळनाडू (मदुराई जिल्हा) या राज्यांत थोड्या प्रमाणावर लाखेचे उत्पादन होते. 

डिंभ-लाखेपासून लाख संवर्धनाला सुरूवात होते. डिंभ – लाख म्हणजे आश्रयी वृक्षांच्या लाक्षाकोष्ठातून डिंभ बाहेर पडण्याच्या बेतात असलेल्या लाखेच्या थरयुक्त डहाळ्या होत. या डहाळ्या छाटून त्याचे जुडगे बांधतात व नव्या आश्रयी वृक्षावर सोयीस्कर जागी बांधतात. त्यामुळे डिंभ जवळपासच्या रसाळ कोंबावर चढतात व स्थिरावतात. आश्रयी वृक्षांची योग्य निगा, रोग व पीडकमुक्त डिंभ वृक्षावर सोडण्याची वेळ व पद्धत, लाखेच्या किड्यांच्या पीडकांचा व भक्षकांचा बदोबस्त हे सर्व चांगले लाख उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक आहेत. याकरिता लाख संवर्धनाची सुधारित तंत्रे विकसित करण्यात आलेली असून ती उत्पादकांत लोकप्रिय करण्यात येत आहेत. 

छाटणी : कोशिंब, पळस व बोर या तीन आश्रयी वृक्षांवर प्रामुख्याने लाखेचे पीक घेतले जाते. या वृक्षांच्या छाटणीचे स्वरूप, प्रमाण व तिचा वर्षाचा काळ यांवर रसाळ डहाळ्या तयार होणे व त्यामुळे लाखेचे पीकही अवलंबून असते. तथापि स्थानिक परिस्थित्यनुरूप छाटणीचे वेळापत्रक बदलावे लागते. कोशिंब आणि वड व पिंपळ यांच्या प्रजातीतील काही जातींच्या वृक्षांवरील पीक काढताना छाटणीही होतेच. छाटणी किंवा पीक काढताना एकूण वृक्ष चांगल्या स्थितीत राहील व त्याचा विस्तार वाढेल यांकडे लक्ष पुरविले पाहिजे. गेगट व मृत फांद्या काढून टाकतात. ५ सेंमी. पेक्षा जास्त व्यास असलेल्या जाड फांद्या काढत नाहीत. १·२५ सेंमी. पेक्षा कमी व्यासाच्या फांद्या सुरूवातीपासून ( मुळापासून ) छाटतात. त्यासाठी धारदार कातरीसारखी हत्यारे वापरतात. हात पोहोचणार नाही तेथे प्रमाणभूत वृक्ष छाटणीचे हत्यार वापरतात. 

गट पद्धत : एकाच वृक्षावर सातत्याने डिंभ सोडले, तर त्याचा जोम कमी होतो व लाखेचे उत्पादन पुढे घटत जाते. त्यामुळे आळीपाळीने वृक्षाला विश्रांती देणे श्रेयस्कर असते. गट पद्धतीत उपलब्ध आश्रयी वृक्षांचे गट पडतात. गटांची संख्या व त्यांचे आकारमान हे वृक्षप्रकार व लाखेच्या किड्याचा वाण यांवर अवलंबून असतात. प्रत्येक गटात एका निश्चित वेळापत्रकानुसार डिंभ सोडतात. कोशिंब वृक्ष हळू वाढतो म्हणून साधारणतः दीड वर्षाच्या कालावधीनंतर त्यावर डिंभ सोडतात. पिकाचा कालावधी सहा महिन्यांचा असल्याने उपलब्ध झाडे चार गटांत विभागतात व त्यांच्यावर पाळीपाळीने डिंभ सोडतात. प्रत्येक गटातून दोन वर्षांतून एकदा पीक मिळते. रंगिनी वाणाच्या पळस, बोर व इतर आश्रयी वृक्षांच्या बाबतीत एकूण उपलब्ध वृक्ष १ : ३ : ३ या प्रमाणात तीन गटांत विभागतात. छोटा गट सोयीसाठी साधारण मध्यभागी ठेवतात व कटकी पिकासाठी ती उपयोगात आणतात. इतर दोन गट वैशाखी पिकासाठी एकाआड एक वर्षी वापरतात. उष्ण प्रदेशात पळस व बोराची लागवड दोन गटांच्या पद्धतीने करता येते. इतर आश्रयी वृक्षांचाही आळीपाळीने वा संयुक्त रीत्या उपयोग करता येतो. उन्हाळ्यात पालवी येणाऱ्या वड, पिपंळ व इतर वृक्षांचा उपयोग वैशाखी व जेठवी पीक घेण्यासाठी करतात.

डिंभ सोडणे : डिंभ बाहेर पडण्यास सुरूवात होण्यापूर्वी डिंभ – लाख कापतात. डिंभाची ही अवस्था निरोगी मादीच्या गुद भागाजवळील लाखेच्या थरावर पिवळे ठिपके दिसू लागण्याच्या लक्षणावरून ठरवितात. ते ठिपके हळूहळू मोठे होऊन नारिंगी रंगाचे होतात. ते लाक्षाकोष्ठाच्या एक चतुर्थांश आकारमानाचे झाले की, डहाळ्या छाटण्यास सुरूवात करतात. सुमारे पाच दिवसांनंतर डिंभ बाहेर पडण्यास सुरूवात होते. कीडमुक्त व फक्त जाड थर डिंभ-लाख म्हणून निवडतात. 

निरोगी डिंभ-लाख असलेल्या डहाळ्यांचे १५ – ३० सेंमी. लांबीचे तुकडे करतात व ते एकएकटे किंवा त्यांच्या दोऱ्याने बांधलेल्या जुड्या आश्रयी वृक्षाच्या रसाळ कोंबाजवळ बांधतात. हे तुकडे लांबीवर, पार्श्वीय (बाजूवर) अथवा फांद्यांमध्ये गुंफून बांधतात. ते लांबीवर बांधले म्हणजे आश्रयी वृक्ष व डिंभ यांत जास्तीत जास्त संपर्क येतो. पार्श्वीय बांधणीत आश्रयीच्या दोन कोंबांच्या मधल्या मोकळ्या जागेवर डिंभयुक्त काटक्या बांधतात. एका वृक्षासाठी लागणारी डिंभ-लाखेची मात्रा ही वृक्षाचा प्रकार, त्याचे आकारमान व त्यावरील योग्य फांद्यांची संख्या यांवर अवलंबून असते. मध्यम आकारमानाच्या विविध आश्रयी वृक्षांसाठी डिंभ – लाख पुढीलप्रमाणे लागते. पळसाच्या वृक्षासाठी ०·५–१·०० किग्रॅ. बोरासाठी १ – २ किग्रॅ. खैरासाठी १-२ किग्रॅ. व कोशिंबासाठी ५–१० किग्रॅ.

लाख संवर्धनाचे यश हे डिंभ-लाखेच्या अखंड पुरवठ्यावर अवलंबून असते. निरनिराळ्या हवामान परुस्थितींचा निरनिराळ्या आश्रयी वनस्पतींवर वेगवेगळा परिणाम होत असल्याने काही आश्रयी जातींवर इतर जातींपेक्षा डिंभ-लाख चांगल्या प्रकारे टिकू शकते. तप्त उन्हाळ्यात आश्रयी वृक्षांच्या बाबतीत ही गोष्ट विशेषत्वाने अनुभवास येते. यामुळे डिंभ-लाखेचा सतत पुरवठा होण्याकरिता लाखेचे संवर्धन एकाच प्रकारच्या आश्रयी वृक्षापुरते मर्यादित न ठेवता विविध वृक्षांचा उपयोग करतात. तसेच उन्हाळ्यात पालवी येणारे वृक्ष संवर्धनासाठी निवडतात. उदा., फायकस क्युनिया, फा. लॅकॉर, अल्बिझिया ल्युसिडा वगैरे. 

एकाच प्रकारच्या विशिष्ट आश्रयी वृक्षावर वर्षानुवर्षे त्याच प्रदेशातील डिंभ – लाख वापरली, तर लाखेची प्रत कमी होते, म्हणून लाख संवर्धनासाठी विविध प्रकारच्या आश्रयी वृक्षांचा शोध घेणे श्रेयस्कर असते. या दृष्टीने सर्वत्र प्रसार असलेल्या खैराचा उपयोग रंगिनी व कुसुमी पिकांसाठी होत असून कोशिंब वृक्षाबरोबर तो यशस्वीपणे अदलून  बदलून वापरता येतो. 

परजीवींचा व परभक्षींचा उपद्रव : पुष्कळ जातींच्या परजीवी (दुसऱ्या सजीवांवर उपजीविका करणाऱ्या) गांधील माश्यांचा लाखेच्या किड्यांना उपद्रव होतो. या माश्या किड्यांच्या शरीरावर अंडी घालतात व त्यांचे डिंभक किडे खातात आणि प्रौढ लाक्षाकोष्ठाला भोके पाडून बाहेर पडतात. या परजीवीमुळे लाखेच्या पिकाचे नुकसान सामान्यतः ५-१०%, पण काही वर्षी व काही ठिकाणी ते ५०% पर्यंत होऊ शकते. पतंगांच्या दोन जातींच्या व लेसविंग या कीटकांच्या तीन जातींच्या अळ्या लाखेचे किडे व थर खाऊन किंवा उत्सर्जित मलद्रव्यांचे थर पसरवून सु. ४०% पर्यंत नुकसान करतात. याखेरीज पक्षी व खारी यांच्यामुळे लाखेच्या जिवंत किड्यांचे व थरांचे बरेच नुकसान होते. पीडक कीटकांच्या नियंत्रणासाठी नुकत्याच काढलेल्या लाखयुक्त डहाळ्या प्रवाही वा खोल पाण्यात बुडविणे डहाळ्यांवरील लाख ताबडतोब काढून पीडक कीटकांचे डिंभ व कोश जाळून, चिरडून, बुडवून किंवा कार्बन डायसल्फाइडाची धुरी देऊन नष्ट करणे डिंभ-लाख तारेच्या जाळीच्या करंड्यांत बंदिस्त ठेवणे वगैरे उपाय योजतात. 

काही कीटक अप्रत्यक्षपणे लाख संवर्धनास मदत करतात. ते लाखेच्या किड्यांचे परजीवी व भक्षक यांना हुसकावून लावतात किंवा शत्रूंवर उपजीविका करतात. काही मुंग्या लाखेच्या किड्यांच्या अंगरक्षणाचे काम करतात, तर काही पीडकांच्या अळ्यांचा नाश करतात. तथापि या कीटकांची संख्या पीडकांच्या संख्येच्या मानाने कमी असल्याने पीडकांच्या नियंत्रणाला त्यांची मर्यादित प्रमाणातच मदत होते. 


 काढणी व उत्पन्न : सामान्यतः छाटणीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे लाखेच्या काढणीसाठी वापरतात. काढणी व्यवस्थित केल्यास आश्रयी वृक्षाची वेगळी छाटणी करण्याची गरज भासत नाही. डिंभ-लाख डिंभ बाहेर पडण्याच्या काही दिवस आधी काढतात. दूरच्या इतर लाख उत्पादक प्रदेशात पाठविण्यासाठी अशी लाख एक आठवडा आधी काढतात. मोटारीने, लोहमार्गे किंवा हवाईमार्गे पाठविण्याची डिंभ-लाख १५–२० किग्रॅ. वजनाच्या बांबूच्या  करंड्यांत भरून पाठवितात. उरलेली जादा लाख डहाळ्या खरवडून काढतात. तिला हिरवी किंवा काडीची लाख म्हणतात. तिचा हवेशीर जागी १० -१५ सेंमी. जाडीचा पातळ थर घालून व तो अधून-मधून वर-खाली करून वाळवितात. ही लाख पोत्यात भरून साठवितात किंवा विक्रीला पाठवितात. ओली लाख साठवीत नाहीत कारण किण्वनाची (आंबविण्याची) क्रिया सुरू होते, गोळे तयार होतात व तिची प्रत खालावते. वाळविलेली लाख सुद्धा फार काळ साठवून ठेवल्यास तिच्या विद्राव्यता (विरघळण्याची क्षमता) व इतर गुणधर्मांवर दुष्परिणाम होतो व त्यामुळे तिची किंमत कमी होते.

आश्रयी वृक्षांवर सोडण्यासाठी वापरलेल्या डिंभांच्या वजनाच्या अडीज ते तीनपट लाखेचे उत्पन्न मिळते. चांगले पीक आल्यास ते ५–७ पट येते. रंगिनी पिकाच्या लाखेच्या बाबतीत खरवडून काढलेल्या मालाचे उत्पन्न काढलेल्या एकूण लाखेच्या (डहाळ्यांसकट) उत्पन्नाच्या एक तृतीयांश येते, तर कुसुमी पिकाच्या बाबतीत ते निम्मे असते.

संघटन : काडी लाखेत रेझीन (७० ८०%) हा प्रमुख घटक असतो. याखेरीज शर्करा, प्रथिने व विद्राव्य लवणे (४–६%) रंगद्रव्य (१–२%) मेण (४– ६%) वाळू, काष्ठ द्रव्य, कीटकांच्या शरीराचे भाग व इतर द्रव्ये (८–१२%) तीत असतात, तसेच अल्पांशाने बाष्पनशील (बाष्परूपाने उडून जाणारे) तेल असते. 

परिष्करण : काडी लाख हाताने किंवा शक्तिचलित चक्कीमध्ये चुरडून दगडी कुंडांत किंवा पोलादी पिंपांत धुवून घेतात. नंतर सिमेंट लावून एकसारख्या केलेल्या जमिनीवर सावलीमध्ये ती वाळवून हलकी द्रव्ये अलग करण्यासाठी वारवितात. धुण्याच्या क्रियेत जलविद्राव्य रंगद्रव्ये निघून जातात. धुवून दाणेदार रूपात मिळालेली लाख (बीज-लाख) पिवळी किंवा तांबूस तपकिरी रंगाची असते. बीज-लाखेशिवाय शेलॅक, गुंडी लाख, गानेंट लाख, मेणरहित लाख, विरंजित (रंग काढून टाकलेली) लाख इ. विविध प्रकारांची परिष्कृत लाख बाजारात मिळते. यांतील शेलॅक ही व्यापाराच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाची आहे.  

शेलॅक व गुंडी लाख उष्ण प्रक्रियेने किंवा विद्रावक (विरघळविणाऱ्या द्रव्याच्या) प्रक्रियेने मिळवितात. उष्ण प्रक्रियेत वितळलेली गरम लाख कापड किंवा अन्य माध्यमातून गाळून घेतात. विद्रावक प्रक्रियेत बीज-लाख योग्य विद्रावकात विरघळवितात व नंतर गाळून घेतात. शेलॅकच्या जागतिक उत्पादनाच्या सु. ७५% उत्पादन उष्ण प्रक्रियेने मिळवितात. उष्ण प्रक्रिया मनुष्यबळाने  वा यंत्रांद्वारे करण्यात येते. यंत्रांद्वारे तयार करण्यात येणाऱ्या लाखेचे गुणधर्म एकसारखे असतात. जगात २५% शेलॅक यांत्रिक पद्धतीने मिळवितात. इंडियन लॅक रिसर्च इन्स्टिट्यूटने शेलॅक मिळविण्यासाठी ऑटोक्लेव्ह (दाबयुक्त वाफ असलेले मजबूत पात्र) प्रक्रिया विकसित केली आहे. तीमध्ये यांत्रिक प्रक्रियेच्या दर्जाची शेलॅक मिळते.

गुंडी लाख तयार करण्यासाठी कापडाच्या पिशवीतून गाळलेली गरम लाख कथिलाच्छादित लोखंडी पत्र्यावर थोडी थोडी टाकण्यात येते. या गरम लाखेच्या छोट्या वर्तुळाकार चकत्या (गुंड्या) तयार होतात. त्या थंड होऊन कठीण बनतात.  

गार्नेट लाख दुय्यम प्रतीच्या बीज-लाखेपासून (‘किरी’ लाखेपासून) विद्रावक निष्कर्षणाने [⟶ निष्कर्षण] बनवितात. ती गर्द रंगाची असून तुलनेने मेणरहित असते. ती फुटलेल्या अनियमित आकाराच्या चिपांच्या स्वरूपात विकली जाते.

विरंजित लाख हे परिष्कृत स्वरूपाचे उत्पादन रासायनिक संस्करणाने मिळविण्यात येते. सोडियम कार्बोनेटात शेलॅक किंवा सामान्यत: बीज-लाख विरघळवून, अशुद्ध द्रव्ये गाळून व गाळलेल्या विद्रावाचे सोडियम हायपोक्लोराइटाने विरंजन करून ही लाख तयार करण्यात येते. रेझीन सल्फ्यूरिक अम्‍लाने अवक्षेपित करण्यात (न विरघळणाऱ्या साक्याच्या रूपात मिळविण्यात) येते, त्यातील अम्‍ल धुवून टाकून नंतर ते वाळविण्यात येते. ही लाख ओली व कोरडी अशी उपलब्ध असून ओली लाख दंड (कांडी) किंवा लडीच्या स्वरूपात विकली जाते.  

काडी लाख चुरडण्याच्या प्रक्रियेत आणि बीज-लाख धुताना व वाळविताना मिळणाऱ्या बारीक चूर्णासारख्या पदार्थाला ‘मोलाम्मा’ म्हणतात. यात ७०% रेझीन असते. कापडी पिशवीने गाळण्याच्या पद्धतीने शेलॅक तयार करताना किरी लाख उपउत्पादन म्हणून मिळते. तीत ५०–६०% रेझीन असते. किरी लाख काढून घेतल्यावर पिशवीला चिकटलेली लाख धुण्याच्या सोड्याच्या विरल विद्रावात उकळून अलग करता येते. ही लाख पृष्ठभागी तरंगते आणि ती गोळा करून दाबून वड्यांच्या स्वरूपात मिळते. तिला ‘पसेवा’ म्हणतात. तीत ९०% रेझीन असते. किरी व मोलाम्मा यांचा गार्नेट लाख व बांगड्या तयार करण्यासाठी उपयोग करतात. यांचा लाकडी वस्तूंतील चिरा व भेगा भरण्यासाठी थोड्या प्रमाणात उपयोग करतात. वीज-लाखेबरोबर मोलाम्मा व पसेवा यांचा उपयोग करून दुय्यम प्रतीची शेलॅक तयार करतात. 

शेलॅक : हे एक कठीण व चिवट अस्फटिकी द्रव्य असून त्यामध्ये पुष्कळ जटिल रेझीनयुक्त संघनितांचा घन विद्राव असतो. त्यांच्या जोडीला त्यात लाखेच्या किड्याच्या अन्य उत्पादांचे अल्पांश, लाल व पिवळे रंगद्रव्य, वासयुक्त द्रव्य व मेण हे घटकही असतात. शेलॅकचा रेझीनयुक्त घटक अतिजटिल असून त्यात मुक्त अल्कोहॉली कार्बोक्सिलिक एस्टर, लॅक्टोन, लॅक्टाइड व आल्डिहाइडी गट असतात. ईथर, टोल्यूइन किंवा विरल क्षार (अल्कली) यांच्या साहाय्याने रेझिनाचे निष्कर्षण करून त्याचे दोन अंश वेगळे करता येतात. त्यांत विरघळणारे रेझून (मृदू रेझीन) ३०% व न विरघळणारे रेझीन (शुद्ध किंवा कठीण रेझीन) ७०% असते. कच्च्या लाखेतील रंगद्रव्यामध्ये लॅसेइक अम्‍ल व एरिथ्रोलॅसीन हे रंजक असतात. यातील पहिला (लाखेचा तांबडा रंजक) जलविद्राव्य असून बीज-लाख तयार करण्याच्या प्रक्रियेत धुताना बऱ्याच प्रमाणात काढून टाकला जातो. एरिथ्रोलॅसीन या पिवळ्या रंजकामुळे लाखेतील रझिनाला वैशिष्ट्यपूर्ण सोनेरी तपकिरी रंग प्राप्त होतो. विरंजित लाख थोडी कमी टिकाऊ व कठीण असते. लाख तापविल्यावर तिला विशिष्ट वास येतो. याचा उपयोग निरनिराळ्या प्रकारच्या काडी लाखेपासून तयार केलेल्या शेलॅकमधील फरक समजण्यासाठी होऊ शकतो. शेलॅकमध्ये सामान्यत: ४% मेण असते. त्याचा वितळाबिंदू उच्च असतो आणि ते कार्नोबा मेणासारखे असते. 

गुणधर्म : रेणुभार ९६४–१, १०० वितळबिंदू ७७–९० से. वि. गु. (१५ ·५ से. ला) १·११–१·२२. शेलॅक तापविल्यावर मऊ होते व मग वितळते, तसेच १२०– १५० से. ला जास्त वेळ तापवित राहिल्यास रेझिनाचे ⇨ बहुवारिकीकरण होते व शेवटी तिचा रबरासारखा पदार्थ तयार होतो. थंड केल्यावर तो पदार्थ चिवट, ठिसूळ व शिंगासारखा होतो. शेलॅकसाठी नीच अल्कोहॉले (मिथिल व एथिल), त्यानंतर ॲमिल अल्कोहॉले, ग्‍लायकॉले व ग्‍लायकॉल ईथरे हे उत्तम विद्रावक आहेत, मॅलेइक, थॅलिक, सक्सिनिक, फॉस्फोरिस, बोरिक यांसारख्या बहुक्षारकीय अम्‍लांचा [⟶ अम्‍ले व क्षारक] उपयोग करून विविध उपयुक्त गुणधर्म असलेले रूपांतरित लाखेचे प्रकार व रेझिने मिळविता येतात.

औद्योगिक वापरांच्या दृष्टीने शेलॅकचे भौतिक गुणधर्म महत्त्वाचे आहेत. शेलॅकचे पटल विविध प्रकारांच्या पृष्ठभागांना चांगले चिकटते आणि त्याला उत्तम चमक, कठीणपणा व बल असते. ऊष्मीय संवाहकता व ऊष्मीय प्रसरण गुणांक कमी असलेले ते बळकट बंधक द्रव्य आहे. तिची ऊष्मीय आकार्यता व मोठ्या प्रमाणावर भरणद्रव्ये शोषून घेण्याची क्षमता हे गुणधर्म लक्षणीय आहेत. उच्च विद्युत्‌ अपार्यता स्थिरांक व उच्च दाबाच्या विद्युत्‌ प्रवाहाला झिरपमार्ग उत्पन्न न होणे हे तिचे विद्युत्‌ गुणधर्म महत्त्वाचे आहेत. ती जंबुपार (दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांना रोधक आहे. तापमान व आर्द्रता यांतील बदलांचा तिच्या भौतिक गुणधर्मांवर बराच परिणाम होतो.  


 प्रत व विनिर्देश : बीज-लाखेच्या व्यापारी प्रती आश्रयी वृक्ष व पिकाचा हंगाम (आणि काही बाबतीत स्थान) यांवरून ठरविलेल्या आहेत. शेलॅकच्या व्यापारी प्रती उपयोगात आणलेल्या बीज-लाखेचा प्रकार व गुणवत्ता, उत्पादनाची पद्धत, रोझीन व ऑर्पिमेंट (हरताळ) यांसारख्या इतर द्रव्यांबरोबर केलेले संमिश्रण, स्वरूप आणि अविद्राव्य अशुद्ध द्रव्यांचे प्रमाण यांनुसार ठरविलेल्या आहेत. भारतीय मानक संस्थेने शेलॅक आणि बीज-लाख यांच्या आंतरराष्ट्रीय विनिर्देशांची (आवश्यक असलेल्या गुणांची) यादी तयार केलेली असून त्याकरिता त्यांतील ओलावा, गरम अल्कोहॉलामधील अविद्राव्य पदार्थ, थंड अल्कोहॉलातील अविद्राव्य पदार्थ, पाण्यात विद्राव्य असलेले पदार्थ, विरंजकता, रंग, राख, मेण, ऑर्पिमेंट, रेझीन, तापविलेल्या स्थितीतील आयुर्मर्यादा व अम्‍ल अंक (अम्‍लता दर्शविणारा अंक) हे गुण विचारात घेतलेले आहेत. यानुसार संस्थेने बीज-लाखेच्या ७ प्रती, हाताने तयार केलेल्या शेलॅकच्या ६ प्रती व यंत्रनिर्मित शेलॅकच्या ६ प्रती ठरविलेल्या आहेत. या संस्थेने बीज-लाखेकरिता आयएस १५–१९७३, हाताने तयार केलेल्या शेलॅककरिता आयएस १६ (पार्ट १)–१९७३, यंत्रनिर्मित शेलॅककरिता आयएस १६ (पार्ट २)–१९७३ व विरंजित लाखेकरिता आयएस १७–१९७३ ही मानके प्रसिद्ध केलेली आहेत.

उपयोग : प्लॅस्टिके, विद्युत्‌ निरोधक, आसंजके (चिकटविणारे पदार्त) मुद्रणाची शाई, औषधी वड्या व गोळ्या, चामडे व जोडे यांच्यावरील संस्करण, लाकडाची पॉलिशे, व्हार्निशे, हॅट कडक बनविणे व इतर अनेक उद्योगांत लाखेचा उपयोग करण्यात येतो. लाकूड, धातू व अन्य पृष्ठभागांवरील लाखेचा उपयोग करण्यात येतो. लाकूड, धातू व अन्य पृष्ठभागांवरील लाखेच्या पटलाच्या ठायी उत्तम चमक आणि अपघर्षण, पाणी व विद्युत्‌ प्रवाह यांना प्रतिरोध हे गुण असतात. रसायनांना असलेल्या तिच्या प्रतिरोधाचा उपयोग शिलामुद्रणात करून घेतात. सु. १९५० सालापर्यंत शेलॅकचा प्रामुख्याने ग्रामोफोनच्या तबकड्या (ध्वनिमुद्रिका) बनविण्यासाठी उपयोग होत असे. आता भारतात व परदेशांतही शेलॅकचा सर्वांत जास्त उपयोग पृष्ठावरण उद्योगात व्हार्निशे, पॉलिशे, अंतिम संस्करण द्रव्ये व लॅकर या रूपांत होतो. या कामी अविरंजित लाखेपेक्षा विरंजित लाखेचा उपयोग जास्त प्रमाणात होतो. याकरिता औद्योगिक अल्कोहॉलात लाख विरघळून बनविलेली स्पिरिट व्हार्निशे आणि सौम्य क्षार विद्रावात शेलॅक विरघळवून तयार केलेली जलीय व्हार्निशे वापारली जातात. फर्निचर, वाद्ये, क्रीडा साहित्य व खेळणी यांना पृष्ठभागी लावण्यासाठी तसेच लाकूड व धातूच्या पृष्ठभागातील चिरा व फटी बुजविण्यासाठी विविध प्रकारे स्पिरिट व्हार्निशांचा उपयोग करतात. कागद व धातूची भांडी, पोटात घ्यावयाच्या औषधी गोळ्या, मानववंशशास्त्रीय व प्राणिवैज्ञानिक नमुने यांना संरक्षक लेप देण्यासाठी, तसेच रबरी कापड, मेणकापड, लिनोलियम इत्यादींच्या अंत्यरूपणासाठी स्पिरिट व्हार्निशे वापरतात. जलीय शेलॅक व्हार्निशे चामड्याचे अंत्यरूपण, हॅट कडक बनविणे, औषधी गोळ्यांवर लेप देणे, मातीच्या भांड्यांवर भाजण्यापूर्वी लेप देणे वगैरेंसाठी उपयोगात आणतात. रूपांतरित शेलॅकवर आधारित आणि चांगली लवचिकता व रसायनांना प्रतिरोधक असलेले पॉलियुरेथेन लेप विकसित करण्यात आलेले आहेत. कोरीवकाम केलेल्या पितळी भांड्यांवर सुभोभित अंत्यरूपण करण्यासाठी शेलॅक वापरतात. लाकडी खेळणी, दिव्यांचे स्टॅण्ड, चालताना वापरावयाच्या काठ्या, पलंगांचे पाय वगैरेंच्या सुभोभनासाठी शेलॅकचा घनरूपात उपयोग करतात. राळ, बरायटीज, केओलीन, रंगद्रव्य इत्यादींचे शेलॅकबरोबर मिश्रण करून सिले करण्याची लाख तयार करतात. 

उच्च विद्युत्‌ रोध, उत्तम पटल तयार होणे, इतर पदार्थांना चांगल्या प्रकारे चिकटणे,पृष्ठभागाचे कार्बनीकरण न होणे, तसेच उच्च विद्युत्‌ दाबाचे विसर्जन झाल्यास संवाहक मार्गाचे प्रसारण होणे या शेलॅकच्या गुणधर्मांमुळे विद्युत्‌ उद्योगात तिचे अनेक उपयोग होतात. विद्युत् निरोधक, व्हार्निशे व फिती, साच्यात घालून तयार केलेले निरोधक, मायकानाइट वस्तू इत्यादींत शेलॅक वापरतात. स्तरित कागदी विद्युत्‌ निरोधक व अभ्रकाची निरोधक उत्पादने यांतही ती वितळलेल्या वा व्हर्निश रूपात वापरतात. साच्याने तयार केलेले संयुक्त निरोधक, स्विचे व त्यांचे फलक, मुठी, विद्युत्‌ ठिणगी संरक्षक आवरणे वगैरेंच्या निर्मितीत शेलॅकचा उपयोग करतात. 

पादत्राणांच्या टाचा व तळ, चटया व फारश्या, टायर कडी (ट्यूब) इ. रबरयुक्त वस्तूंमध्ये शेलॅक हा एक गौण पण महत्त्वाचा घटक असतो. आसंजक व संयोजक (सिमेंट) यांत शेलॅकचा उपयोग करतात. गॅस्केट सिमेंट, विद्युत्‌ दिव्यांच्या टोप्या व रेडिओतील निर्वात नलिका बसविण्यासाठी आधार इत्यादींत ते वापरतात. शेलॅकयुक्त आसंजक मायकानाइट, स्तरित फलक, जलरोधी अपघर्षक कागद व कापड, शाणन (ग्राइडिंग) चक्रे इत्यादींत ते वापरतात. धातू व काच परस्परांना चिकटविण्यासाठी बंधकद्रव्य म्हणून शेलॅकचा उपयोग करतात. भारतात सोन्याचांदीच्या पोकळ दागिन्यांत भरण्यासाठी व बांगड्या बनविण्यासाठी लाख वापरतात. देशी वैद्यकशास्त्रात काडी लाख औषध म्हणून पोटात देतात व बाहेरून लावण्यासाठी तेलाच्या अर्काच्या स्वरूपात वापरतात. 

भारतीय उद्योग : जगातील ८० टक्क्यांहून अधिक लाखेचे उत्पादन भारतात होते. भारताखेरीज थायलंड, ब्रह्मदेश, चीन, मलेशिया व इंडोचायना या देशांत लाखेचे उत्पादन होते. 

लाख ही जंगल संपत्ती असून या उद्योगामुळे आदिवासी व वन्य जमातींच्या सु. ४० लाख लोकांना रोजगार मिळतो. १९६३ पर्यंत भारतातील संपूर्ण लाख व्यापार खाजगी मक्तेदारांकडून नियंत्रित केला जात होता. १९६३ मध्ये आदिवासी उत्पादकांच्या हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी लाखेचे विपणन व प्रक्रिया कार्य हाती घेण्याच्या उद्देशाने बिहार राज्य सहकारी लाख विपणन संघ स्थापन करण्यात आला. या संघाने रांची येथे शेलॅक तयार करण्याचे केंद्र सुरू केले असून लाखेचे मेण तयार करण्याचा कारखानाही स्थापन केला आहे. बिहार राज्य आदिवासी विकास सहकारी निगम, पश्चिम बंगाल राज्य सहकारी विपणन संघ व ओरिसा राज्य आदिवासी विकास सहकारी निगम हेही लाखेचे विपणन व प्रक्रिया हे कार्य करतात. 

मिर्झापूर (उत्तर प्रदेश) येथे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास परिष्कृत लाखेच्या उत्पादनास अनेक लहान कारखान्यांनी प्रारंभ केला. १९०१ मध्ये तेथे ८ मोठे व ७३ छोटे कारखाने लाखेवर प्रक्रिया करीत होते. बिहार व मध्य प्रदेशात शेलॅक तयार करणारे कारखाने स्थापन झाल्यावर मिर्झापूरचे महत्त्व कमी झाले. बिहारमधील झाल्डा, बलरामपूर व तुलसी ही महत्त्वाची शेलॅक निर्मिती केंद्रे आहेत. पश्चिम बंगालमध्ये पुरूलिया येथे अनेक लहान लाख परिष्करण कारखाने आहेत. याखेरीज कलकत्ता येथे यंत्रनिर्मित शेलॅकचे दोन मोठे कारखाने आहेत. मध्य प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यात व महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यात काही लहान लाख परिष्करण केंद्रे आहेत. गोंदिया येथे शेलॅक तयार करण्याचा कारखाना आहे. 

बिहारमधील नामकूम (रांची) येथे १९२४ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन लॅक रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये लाखेच्या संवर्धनाची तंत्रे, प्रक्रिया व नवीन उपयोग यांसंबंधी संशोधन करण्यात येते. या संस्थेने पारदर्शक लाख तयार करणाऱ्या किड्यांचा शोध लावलेला असून त्यासंबंधी अधिक संशोधन चालू आहे. 

भारतात कच्च्या लाखेचे उत्पादन १९७०–७१ मध्ये २४,५६० टन, तर १९७३–७४ मध्ये १९,२५८ टन झाले. भारतातील लाखेचा वापर वार्षिक उत्पादनाच्या १० टक्क्यांपर्यंत (साधारणपणे २,२०० ते २,५०० टन) असतो. भारतातून अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ब्रिटन, जर्मनी, रशिया व चीन या देशांना शेलॅकची निर्यात होते. १९८३–८४ मध्ये १३·५८ कोटी रूपये किंमतीच्या शेलॅकची निर्यात झाली.

पहा : लॅकर लाखकाम व्हार्निश. 

संदर्भ :   1. C. S. I. R. The Wealth of India. Industri Products, Part. V, New Delhi, 1960.  

             2. C. S. I. R. The Wealth of India, Raw Materials, Vol. VI, New Delhi. 1962.  

             3. Glover, P. M. Lac Cultivation in India, Namkum,1937.

             4. Hicks, E. Shellac: Its Origin and Applications,  New York, 1961.

             5. Metcalf. C. L. Flint, W. P. Destructive and Useful Insects, Their Habits and  Control,Tokyo, 1962. 

पोखरकर, रा. ना.: दोरगे. सं. कृ. जमदाडे, ज. वि.