फर्निचर : गरज पुरविणारे उपयुक्त, आवश्यक वा सुखावह असे साधन अथवा उपकरण किंवा त्यांचा संग्रह. घर, इमारत, सभास्थान वा सभागृह, कार्यालय, मंदिर, क्रीडास्थान व विहारस्थळ इ. ठिकाणी विविध साधनांची आणि उपकरणांची दुःखनिवारणार्थ, समाधानार्थ वा सुखार्थ आवश्यकता असते. अशाच बहुतेक साधनांना वा उपकरणांना ‘फर्निचर’ ही इंग्लिश संज्ञा आहे. ही संज्ञा अघळपघळ रीतीने वापरली जाते. विशिष्ट मर्यादित अर्थाने वापरली जात नाही.

राहते घर, कार्यालय वा कामाचे ठिकाण येथे राहणे व काम करणे सोयीचे आणि सुखावह होण्यासाठी फर्निचरवस्तूंचा उपयोग करण्यात येतो. उदा., लेखनाकरिता टेबल, वाचनाकरिता आरामखुर्ची, कार्यशाळेतील टेबले इ. उपयुक्त साधने फर्निचरमध्ये अंतर्भूत होतात. ⇨गृहशोभनाच्या दृष्टिकोनातून फर्निचरवर विविध प्रकारचे कोरीवकाम, जडावाचे तसेच मुलाम्याचे काम करून उत्कृष्ट कलाकृतीही तयार करण्यात येतात. फर्निचरघटक सहज हलविता येण्यासारखे असावे लागतात परंतु आधुनिक काळातील राहण्याच्या लहान जागेमध्ये फर्निचरचे काही घटक एका ठिकाणी स्थिर वसविलेले असतात. उपयुक्तता, गृहशोभन आणि सुवाह्यता ही फर्निचरघटकांची मुख्य अंगे असतात.

प्राचीन भारत-तुर्कस्तानी पद्धतीची बैठक,सु. ३ रे शतकपुरातन कालापासून फर्निचर वापरण्याची वहिवाट आहे. प्रत्येक कालखंडात फर्निचरघटकांची विविधता, त्यांची शैली, त्यांवरील कलाकुसरीचे काम, बनावट यांवरून तत्कालीन सामाजिक परिस्थिती व संस्कृती यासंबंधी अनुमान काढता येते. वास्तुकला व फर्निचरच्या विविध शैली यांचा परस्परपूरक संबंध असतो. वास्तुकलेतील शैलींचा प्रभाव फर्निचरच्या शैलींवर पडलेला दिसून येतो. वास्तू व फर्निचरशैली यांची कलात्मक एकात्मता साधण्याचे उद्दिष्ट असते.

फर्निचरवस्तूंचे साधारणपणे चार विभाग करता येतील : (१) घराच्या आत वापरण्याचे प्रकार उदा., ⇨ खुर्ची, टेबल, ⇨ पलंग, कपाट इत्यादी (२) घराबाहेर वापरण्याचे प्रकार उदा., बागेतील बाक, खुर्ची, घडीची खुर्ची इत्यादी. घरातील फर्निचरपेक्षा बाहेरील फर्निचर दणकट असावे लागते (३) घरात एका ठिकाणी बसविलेले तसेच विविध प्रकारे उपयोगक्षम असलेले मिश्र फर्निचरघटक उदा., मंचक-पलंग (संयुक्त रचना)  दिवसा मंचक व रात्री पलंग म्हणून याचा वापर करता येतो. कपाटाचे दार व जेवणाचे टेबल अशी संयुक्त रचना. खोलीचे दोन भाग करण्याकरिता उपयोगात येणारे विभाजक कपाट इत्यादी (४) सार्वजनिक फर्निचर उदा., शिक्षण संस्था, रंगमंदिर, चित्रपटगृह, कार्यालये व कारखाने इ. ठिकाणी उपयोगात येत असलेले फर्निचरप्रकार. या प्रकारांतील फर्निचरवस्तू विशिष्ट उपयोगासाठी असतात व म्हणूनच त्या वापरणाऱ्याला सुखावह व योग्य असाव्या लागतात. उदा., शाळेतील लहान वयोगटातील मुलांकरिता असलेली बाके, टेबले त्यांच्या शरीरयष्टीला अनुरूप असावी लागतात. कारखान्यातील संबंधित कामगारास नेहमी लागणारी हत्यारे ठेवण्याची सोय टेबलामध्ये असणे आवश्यक असते. तसेच उत्पादनवाढीस साहाय्यक होईल अशीच त्यातील फर्निचररचना असावी लागते. फर्निचरवस्तू बनविताना अशीच माध्यमे वापरावी लागतात, की ज्यामुळे काम करताना त्या वस्तूंचा पृष्ठभाग झिजणार नाही. आगगाडी, विमान, मोटारगाडी इ. वाहनांमधील फर्निचरचा आकार व रचना करताना सुखदायकता व सुरक्षितता यांना प्राधान्य दिले जाते.

फर्निचरशिवाय गृहशोभनात घड्याळ्याचा तसेच कलात्मक पेट्या, आरसे [⟶ आरसा], चित्रांच्या चौकटी, दिव्यांचे आधारस्तंभ, फळांच्या करंड्या, पडदे, ⇨गालिचे इ. कलात्मक वस्तूंचा उपयोग करतात. उत्कृष्ट कलाकृतींचा दर्जा अशा वस्तूंना प्राप्त झालेला आहे.

हस्तिदंती जडावकाम व सोनेरी आरोपणे केलेले घडीचे स्टूल, ईजिप्त, इ. स. पू. १४ वे शतक.

ऐतिहासिक आढावा : फर्निचर मुख्यतः लाकडाचे करीत असल्यामुळे ते नाशवंत असते. म्हणून पुरातन कालातील फर्निचरवस्तूंचे प्रत्यक्ष नमुने उपलब्ध नाहीत. ईजिप्तमधील राजांच्या थडग्यात ऐहिक वस्तू ठेवण्याची पद्धत असल्यामुळे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कालखंडातील फर्निचरचे काही नमुने उपलब्ध झाले आहेत. इटलीमधील पाँपेई शहर व्हीस्यूव्हिअस या ज्वालामुखीच्या लाव्हारसाखाली गाडले गेले. तेथे अठराव्या शतकात केलेल्या उत्खननात ब्राँझच्या फर्निचरचे अवशेष मिळाले आहेत. हे तुरळक प्रत्यक्ष नमुने सोडल्यास इ. स. बाराव्या शतकापर्यंतचे फर्निचरचे नमुने उपलब्ध नाहीत. तेराव्या शतकापासूनच्या फर्निचरचे प्रत्यक्ष नमुने उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत बाराव्या शतकापूर्वीच्या फर्निचरसंबंधी राजे व सरदार यांच्या घरातील सामानाच्या याद्या तत्कालीन, वाङ्‌मय ⇨चित्रकला, शिल्पाकृती, चिनीमातीच्या भांड्यावरील चित्रे, नाणी इ. साधनांच्या आधारे करावे लागतात. त्या साधनांच्या साह्यानेच प्राचीन फर्निचरच्या विविध आकारप्रकारांची माहिती संकलित करण्यात आलेली असून तिचा स्थूल आढावा पुढे दिलेला आहे.


ईजिप्शियन फर्निचर : इ. स. पू. २००० वर्षांच्या कालखंडात ईजिप्तमधील संस्कृती पुढारलेली होती. तत्कालीन थडग्यांतील नमुने व इतर साधनांतून उपलब्ध झालेल्या माहितीवरून ईजिप्शियन फर्निचर अत्यंत कलात्मक असल्याचे दिसून येते. त्यांतून त्याचा नाजुकपणा व सौंदर्य जाणवते. तसेच तत्कालीन कारागिरांचे कौशल्यही दिसून येते. कळाशीच्या व कुलपी सांध्यांचा उपयोग केलेला आढळतो. जनावरांच्या खुरासारखे टोक असलेले कातीव किंवा कोरीव पाय खुर्ची किंवा स्टूल यांना असत. हाताच्या व बिनहाताच्या खुर्च्या, तीन पायी टेबले, फुलीच्या (x) आकाराचे पाय असलेली घडीची खुर्ची, पट्ट्यांनी विणलेले पलंग इ. विविध वस्तू त्याकाळी प्रचारात होत्या. त्याकाळी करंबा, एबनी, यू या लाकडांचा उपयोग करण्यात येई. ईजिप्तमध्ये ही झाडे नसल्यामुळे फर्निचरकरिता लाकूड आयात करावे लागे. फर्निचर शोभिवंत करण्यासाठी शिंपा, रत्ने, सोने व इतर धातू यांच्या संपूर्ण चित्राकृती किंवा तुकडे वापरून जडावाचे काम करीत म्हणजे लाकडाला खाच पाडून त्यात हे तुकडे बसवीत व त्यावर लाखेचे रंग किंवा सोन्याचा मुलामा देत. तांब्याचे पाते असलेली करवत, पटाशी, धार लावण्याचा दगड, हातोडा इ. हत्यारे त्या काळात प्रचारात होती. एका सेनापतीने रणांगणावर बसण्याकरिता घडीचे स्टूल वापरले होते. त्यावेळेपासून घडीचे स्टूल अधिकाराचे द्योतक समजले जाऊ लागले. ॲसिरिया, बॅबिलन इ. प्राचीन देशांतील फर्निचरच्या शैली ईजिप्तप्रमाणेच होत्या [⟶ ईजिप्त संस्कृति]. 

ग्रीक फर्निचर : (इ. स. पू. ७०० ते इ. स. पू. ३००). ग्रीक फर्निचरवस्तूंचे प्रत्यक्ष नमुने जरी उपलब्ध नसले, तरी तत्कालीन शिल्पकला व इतर कला यांच्या आधारे ग्रीक लोकांचे फर्निचर आणि राहणी यासंबंधी माहिती मिळते. इ. स. पू. पाचव्या शतकात सर्वच ग्रीक कला पूर्णपणे विकसित झाल्या होत्या. फर्निचरकला त्यास अपवाद नाही. प्रारंभीच्या दोन शतकांत ग्रीक फर्निचरवर ईजिप्तच्या शैलीचा प्रभाव होता. तथापि इ. स. पू. पाचव्या शतकात त्यात आकार व प्रमाणबद्धता यांबाबतीत एकप्रकारची विशुद्धता निर्माण झाली. पुढे इ. स. पू. चौथ्या व तिसऱ्या शतकांत ही विशुद्धता व साधेपणा जाऊन त्याऐवजी अधिक अलंकृत फर्निचर प्रचारात आले. ग्रीक वास्तुकलेचा प्रभाव फर्निचरशैलीवरही पडला. ग्रीकलोकांची राहणी साधी असल्यामुळे त्याकाळी खुर्ची, स्टूल, मंचक, टेबल व पेटी असे मोजकेच फर्निचर रूढ होते परंतु सुखद रंगाचे अभ्रे असलेल्या उशा फर्निचरवर ठेवून तसेच रंगीत पडदे वापरून घरातील दालनात एक प्रकारची प्रसन्नता व संपन्नता निर्माण करण्यात येई.

ग्रीक फर्निचरप्रकारांत ⇨सिंहासन हे महत्त्वाचे असून ते संगमरवरी दगडाचे असे. शिल्पकलेचा तो एक उत्कृष्ट नमुना होय. ग्रीक खुर्ची, टेबल व स्टूल यांचे पाय चौकोनी व निमुळते असत, तर त्यांचे तळवे सिंहाच्या पंजासारखे असत. खुर्चीची पाठ व मागील पाय एकसंध असून त्यांना डौलदार बाक दिलेला असे. काही वेळा पशूंच्या पायांचे आकारही त्यांना देत असत. मंचकाचा उपयोग जेवताना चर्चाप्रसंगी किंवा विश्रांती घेण्याकरिता करीत. डोके टेकण्याकरिता व पाय ठेवण्याकरिता मंचकाला स्वतंत्र व्यवस्था असे. टेबलांचा पृष्ठभाग चौकोनी असून त्यास तीन पाय असत. एका बाजूला दोन व दुसऱ्या बाजूला एक, असे ते बसविण्यात येत. ते टेबल ग्रीक लोकांचे नवप्रवर्तन समजतात. पुढील काळात गोल पृष्ठभाग व तीन पाय असलेली टेबले प्रचारात आली. पेटीचा उपयोग दागदागिने, कपडे व कागदपत्रे ठेवण्याकरिता करीत. पेटी बसण्याकरिता सुद्धा वापरीत असत. फर्निचर सुशोभित करण्याकरिता कोरीव कलाकृती किंवा हस्तिदंत, सोने वा चांदी हे धातून अथवा कूर्मशुक्ती (कासवाच्या पाठीवरील तपकिरी रंगाचे तुकडे) वापरून केलेले जडावकाम यांचा उपयोग करीत असत. सुशोभन करण्याच्या कृतीने फर्निचरच्या विविध भागांच्या आकारात किंवा प्रमाणात बदल होऊ देत नसत. ईजिप्तप्रमाणेच येथेही घडीची खुर्ची हे अधिकाराचे प्रतीक समजत असत. त्यावरील अलंकार व कलाकुसरीची प्रत त्या त्या अधिकाराच्या श्रेणीवर अवलंबून असे. सीडार लाकूड प्रामुख्याने वापरीत असत. [⟶ अभिजाततावाद ग्रीक कला].

अस्थिशिल्पनयुक्त काचेचे जडावकाम केलेला रोमन मंचक रोमन फर्निचर : (इ. स. पू. ३०० ते इ. स. ६००). रोमन काळात अभिजात ग्रीक फर्निचरशैलीतील साधेपणा व आकाररेषांची विशुद्धता कमी झालेली होती. एकप्रकारच्या कृत्रिम अलंकारणाकडे झुकू लागलेल्या मूळ ग्रीक कलेची अवनत अवस्था रोमनांपुढे होती. [⟶ ग्रीकांश संस्कृति]. त्यातच रोमन लोकांना स्वभावतः डामडौल व दिखाऊपणाची हौस होती. परिणामतः रोमन फर्निचरवस्तूमध्ये समृद्धीचे आणि श्रीमंतीचे दर्शन घडविणारे अलंकरण व सुशोभन मोठ्या प्रमाणावर आढळते. फर्निचरवरील दाट कोरीवकामात शंखाकृती व वेलबुटी दिसून येतात. हस्तिदंत, कूर्मशुक्ती, विविध रंगांचे लाकूड, सोने, चांदी व ब्राँझ इ. पदार्थांचा जडावकामासाठी उपयोग करण्यात येई. सोने, चांदी व ब्राँझ या धातूंच्या पत्र्यांनी फर्निचर मढवीत असत. काही वेळा फर्निचर तयार करण्यासाठी ह्या धातूंचे पत्रेही वापरीत. त्यावर टंकून (ठोकून) किंवा कोरून नक्षीकाम केलेले असे. सीडार, विलो, फर, ओक इ. वृक्षांचे लाकूड फर्निचर बनविण्याकरिता वापरीत. इटलीच्या उत्तर भागात आढळणारे पांढऱ्या रंगाचे मॅपलचे लाकूड रंग व पोत या दृष्टीने फारच चांगले असल्यामुळे त्याचाही उपयोग करण्यात येई. एबनी व तत्सम लाकडांचा उपयोग व्हिनीयर कामात (लाकडाच्या पातळ पट्ट्या काढून इतर लाकडावर चिकटविण्याचे तंत्र) करीत असत. तसेच उच्च प्रतीच्या लाकडांवरील तंतुरेषांचा आभास निर्माण करणारे रंगलेपन साध्या लाकडावर करण्याची पद्धतही रूढ होती.

तत्कालीन फर्निचरवस्तंतू खुर्ची, मंचक, बाक, एकस्तंभी गोल टेबल, पेटी इ. समाविष्ट होत. खुर्चीच्या किंवा मंचकाच्या दोन-दोन पायांना जोडणाऱ्या ताणपट्ट्या असून त्या जमिनीच्या पातळीवर असत. टेबल भव्य व लांब असे. त्याला दोन संगमरवरी आधार असत. त्यांवर भरगच्च शिल्पांकन केलेले असे. तसेच पृष्ठभाग व त्याच्या बाजू यांवर कोरीवकाम केलेले असे. दोन्ही आधार ताणपट्टीने जोडीत असत. न्यायाधिशाची खुर्ची विशिष्ट प्रकारची असे. ही खुर्ची रोमन कलाकृतीचा एक नमुना म्हणता येईल. कारण पुढील हजार-दीडहजार वर्षे खुर्च्यांचे आकार ह्या खुर्चीच्या नमुन्यावरच योजिलेले दिसतात.


मध्ययुगीन फर्निचर : (इ. स. ६०० ते इ. स. १४००). रोमन साम्राज्याच्या विनाशापासून म्हणजे इ. स. सहाव्या शतकापासून ते इ. स. अकराव्या शतकापर्यंतचा कालखंड राजकीय दृष्ट्या अस्थिर व अशांततेचा होता. सर्वच कलांच्या दृष्टीने हा अवनतीचा कालखंड होता. फर्निचरकलेचाही यास अपवाद नाही. तत्कालीन फर्निचर जाळपोळीत जळून गेल्याने किंवा त्याची मोडतोड झाल्याने त्याचे अवशेष उपलब्ध नाहीत परंतु ख्रिश्चन चर्चसंस्थेमार्फत मात्र ग्रीक आणि रोमन कलापरंपरांचे थोडेफार जतन झाले. मध्ययुगीन यूरोपीय फर्निचरशैली एकजिनसी नव्हती. ह्या कालखंडात राजे आणि सरदार किल्ल्यांच्या आश्रयाने राहत असत व त्यांतील वास्तुरचना आणि फर्निचर केवळ सुखसोयीच्या दृष्टीने तयार केलेले नव्हते. त्यांत रोमन व पौर्वात्य शैलींचे मिश्रण दिसून येते. इ. स. अकराव्या शतकापासून राजकीय परिस्थितीत हळूहळू स्थैर्य निर्माण होऊ लागले. सरदारवर्ग किल्ल्यांचा आश्रय सोडून शहरात स्थायिक होऊ लागले. व्यापारी, कारागीर असे नवीन गट उदयास आले. चर्चसंस्थेचा जनमानसावरील प्रभाव कमी होऊ लागला. नवीन वास्तुरचनेला चालना मिळाली. इतरही कलांच्या विचारास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. इ. स. बाराव्या शतकाच्या मध्यापासून गॉथिक शैलीचा उदय झाला [⟶ गॉथिक कला]. गॉथिक चर्च हे गावातील सर्व प्रकारच्या कार्यांचे व कार्यक्रमांचे केंद्र होऊ लागले. या वास्तुशिल्पातील गॉथिक वास्तुकलेबरोबरच गॉथिक फर्निचरशैलीही उदयास आली. या फर्निचरच्या आकाररेषा सरळ असत. बाकदार भाग फक्त घडीच्या खुर्चीपुरते मर्यादित होते. फर्निचरवस्तूचा आकार प्रमाणबद्ध असे परंतु आधुनिक दृष्टीने पाहिल्यास तिचे विविध भाग वाजवीपेक्षा जास्त जाड व अवजड असल्याचे जाणवते. तावदाने वापरून फर्निचर हलके करीत असत. कपाटाच्या किंवा पेटीच्या विस्तृत सपाट पृष्ठभागाकरिता तावदान-रचनेचा उपयोग करीत. (मोठा पृष्ठभाग एका फळीतून किंवा फळ्या जोडून केल्यास हवामानातील बदलामुळे ता वेडावाकडा होण्याचा धोका असतो. त्याऐवजी चौकट करून तिच्या आतील बाजूच्या खाचेत फळी बसविल्यास फळीला सर्व बाजूंनी आधार मिळतो व पातळ फळी वापरता येते. अशा रचनेला तावदान म्हणतात.) यामुळे फळी वेडीवाकडी होण्याची संभाव्यता कमी होऊन वस्तूचे वजन कमी करता येते. या कालखंडात फर्निचरची तीव्र टंचाई असे. श्रीमंत लोकांकडेही दोन किंवा तीनच खुर्च्या असत. सरदार व श्रीमंत लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना फर्निचर बरोबर घेऊन जात. 

त्या काळात खुर्ची, स्टूल, बाक, पलंग, टेबल, पेटी, कपाट आणि भोजनगृहातील कपाट इ. फर्निचरवस्तू प्रचारात होत्या. ओक, अक्रोड व स्थानपरत्वे उपलब्ध असलेल्या झाडांचे लाकूड फर्निचर बनविण्याकरिता वापरीत असत. सुशोभनासाठी वास्तुशिल्पातील नक्षीकाम, प्रतिमाने यांचे अनुकरण करण्यात येई. कपाटाच्या दारावरील कोरीवकामामुळे कापडाच्या पडद्याचा आभास निर्माण होई. जाळीचे नक्षीकाम, कोरीवकाम, कमानी, रंगीत चित्रे, ब्राँझ धातूची आरोपणे (माउंटिंग) इ. वापरून फर्निचर शोभिवंत करण्यात येई. कापडाच्या घड्या कोरीवकामात समाविष्ट करण्याची पद्धत हे गॉथिक शैलीचे वैशिष्ट्ये होय. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे सुशोभन माध्यमाचे स्थान सुशोभित केलेल्या पृष्ठभागाच्या मध्यभागी न ठेवता थोडेसे एका बाजूला ठेवत असत परंतु त्यामुळे उत्पन्न झालेली असमानता लक्षात येण्यासारखी नसे. मोठ्या बिजागिऱ्या, मुठी, किल्लीच्या भोकाभोवतीचे आरोपण इ. वस्तू मोठ्या आकाराच्या असत. विविध भाग जोडण्याकरिता कुसूविंधीचा सांधा वापरीत. सरसाचा वापर करीत नसत.

खुर्ची, बाक, स्टूल यांवर रंगीत अभ्रे असलेल्या उशा ठेवण्याची पद्धत होती. तसेच घरातील दालनातून रंगीत पडदे वापरून गृहशोभा वाढवीत असत. फ्रान्समधील फर्निचरवरील कोरीवकाम इतर ठिकाणच्या कामापेक्षा फारच सुबक व नीटनेटके असे. तसेच कोरीवकामात खऱ्या व काल्पनिक पक्ष्यांची चित्रे, विविधरंगी नक्षीकाम इ. असल्यामुळे फ्रेंच गॉथिक फर्निचर तुलनेने जास्त चांगले दिसे. स्पेनमध्ये सुशोभित डोकी असलेल्या खिळ्यांनी फर्निचरवर कातडे बसवीत असत. तसेच बाक व टेबल यांचा सांगाडा लोखंडाचा करीत असत. स्पेनमधील सुशोभनपद्धतीत मूर लोकांच्या कलेचा प्रभाव होता. त्यामध्ये प्राण्यांच्या किंवा मनुष्यांच्या आकृतींचा अभाव असे. नक्षीकामात भौमितिक आकार व अरबी ⇨सुलेखन यांचा समावेश असे. इ. स. चौदाव्या शतकात फ्रान्समध्ये उत्तम ⇨चित्रजवनिका (टॅपेस्ट्री) कापड तयार होई (चित्रजवनिका म्हणजे चित्रे, नक्षीकाम असलेले पडदे व फर्निचरकरिता वापरण्यात येणारे जाड कापड). हे कापड घरातील शोभा वाढविण्याकरिता तसेच फर्निचरवरील गाद्यांकरिता वापरीत असत.

प्रबोधनकालीन फर्निचर : (इ. स. १४०० ते इ. स. १६००). प्रबोधनकाळात मानवाच्या स्वातंत्र्याची, प्रतिष्ठेची तसेच ऐहिक निष्ठेची नवीन जाणीव निर्माण झाली. अभिजात ग्रीक-रोमन कलांचे पुररुज्जीवन करण्याची चळवळ उदयास आली. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला. प्रवास व धाडस करण्याची प्रवृत्ती बळावली. यूरोपीय संशोधकांनी नवीन भूप्रदेश शोधून काढून तेथे वसाहती स्थापन केल्या. आशिया व आफ्रिका खंडात यूरोपीय साम्राज्ये उदयास येऊ लागली. व्यापारवृद्धी झाल्यामुळे सर्व थरांतील लोकांना समृद्धी प्राप्त झाली. त्यामुळे उत्तम घरे व त्याबरोबर फर्निचर यांची मागणी वाढू लागली. पूर्वीच्या कालखंडात फक्त राजे, सरदार व श्रीमंत लोकच फर्निचर वापरीत असत परंतु या कालखंडात सर्व थरांतील लोकांना फर्निचर वापरण्याची आवश्यकता भासू लागली. विशेषतः ग्रीक आणि रोमन कलाक्षेत्रांतील सर्व अंगोपांगांचा सखोल अभ्यास करून व त्याच्या आधारे नवे प्रयोग करून नवीन कलात्मक शैली निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ लागला. [⟶ प्रबोधनकाल प्रबोधनकालीन कला].

इटलीमधील फ्लॉरेन्स येथे नवीन फर्निचरशैलीचा उगम व विकास झाला. फर्निचरच्या आकारातील साधेपणा व भारदस्तपणा हे त्या शैलीचे वैशिष्ट्य. त्यात रेषांची विशुद्धता, अभिजात प्रमाणबद्धता आढळून येते. सुशोभन-कलाकृती तुरळक असल्या, तरी परिणामकारक असत. सूक्ष्म तपशिलात लक्ष दिल्यामुळे फर्निचरवस्तूंना कलात्मक दर्जा प्राप्त होई. उथळ कोरीवकाम केल्यामुळे परिणामतः पृष्ठभाग सपाट असल्यासारखा दिसे. नैसर्गिक देखावे, घरातील व बागेची दृश्ये, मनुष्याकृती, गुंतागुंतीचे भौमितिक आकृतिबंध, फळांचे लोंबते घड, लहान निशाणे, लग्नाच्या मिरवणुकीची तसेच ऐतिहासिक व पौराणिक दृश्ये यांसारखी अनेकविध प्रतिमाने फर्निचर सुशोभित करण्याकरिता योजिली जात. इटलीतील मिलान हे शहरही फ्लॉरेन्ससारखे फर्निचरनिर्मितीचे एक प्रमुख केंद्र होते.

पुढे वरील दोन्ही शहरांचे महत्त्व कमी होऊन रोम हे प्रबोधन शैलीतील फर्निचर बनविण्याचे तसेच कलांचेही केंद्र बनले. पोप व इतर धर्मगुरू तसेच श्रीमंत लोक रोममध्ये मोठमोठे प्रासाद बांधावयास लागले त्यामुळे वास्तुकलेला आणि त्याजबरोबर फर्निचरकलेला उत्तेजन मिळाले. रोमचे फर्निचर जाडजूड व जड असे. रोम शहरात प्रबोधनकालीन अनेक श्रेष्ठ कलावंतांचे वास्तव्य होते. त्यापैकी ⇨मायकेलअँजेला या प्रसिद्ध चित्रकाराच्या कलेचा परिणाम तत्कालीन वास्तुशिल्प, गृहशोभन आणि फर्निचर यांवर मोठ्या प्रमाणावर पडल्याचे दिसते. त्याच्या कलानिर्मितीत पुढील शतकातील बरोक शैलीची बीजे आढळतात. मायकेलअँजेलोचे अनुकरण करणाऱ्या तत्कालीन कारागिरांना आपल्या कोरीवकामात, भित्तिलेपचित्रांत आणि इतर शिल्पांकनांत त्याचे चैतन्य निर्माण करता आले नाही. मायकेलअँजेलोच्या शैलीमध्ये अवास्तव कोरीवकाम व बोजड ‘मोलीम’ (फर्निचरमध्ये निरनिराळ्या प्रतलातील पृष्ठभाग ज्या ठिकाणी मिळतात, त्याठिकाणी होणाऱ्या कोपऱ्याची तीव्रता कमी होण्यासाठी कोपऱ्यात बसविलेली नक्षीची पट्टी.) यांचा समावेश असे. ‘पिएत्रा दूरा’ या नावाने ओळखले जाणारे तत्कालीन जडावकाम अवास्तव दिखाऊपणाचे उदाहरण म्हणून दाखविता येईल. एबनी किंवा तत्सम काळ्या लाकडात मीनाकाम करण्यात येई [⟶ मीनाकारी]. नक्षी किंवा चित्राकृती निर्माण करण्याकरिता पैलू पाडलेली व उजाळा दिलेली हलक्या प्रतीची रत्ने, हस्तिदंत, मुक्ताद्रव व उच्च प्रतीचे दुर्मिळ लाकूड इ. पदार्थांचा उपयोग करीत असत. विशेषतः मोठ्या कपाटावरील विस्तृत पृष्ठभाग सुशोभित करण्याकरिता पिएत्रा दूरा या प्रकारचे जडावकाम करण्याची प्रथा होती. तत्कालीन श्रीमंत लोक आपल्या घरी एकतरी पिएत्रा दूराची कलात्मक फर्निचरवस्तू असणे प्रतिष्ठेचे समजत.


मायकेलअँजेलोचा समकालीन वास्तुशिल्पकार आन्द्रेआ पाललाद्यो याने रोममध्ये निराळ्या शैलीचा पुरस्कार केला. काटेकोरपणा, अभिजात प्रमाणबद्धता, रेषांची विशुद्धता ही त्याच्या शैलीची काही वैशिष्ट्ये. सुशोभन-प्रतिमाने तुरळक व केंद्रस्थानी असत. खोल कोरीवकाम आणि सोन्याचा किंवा सोनेरी रंगाचा मुलामा यांमुळे फर्निचर शोभिवंत दिसे. 

इटलीमधील फर्निचरशैली हळूहळू इतर यूरोपीय देशांत पसरली. सोळाव्या शतकात हॉलंडमधील डच लोकांनी जागतिक बाजारपेठ काबीज केली होती. त्यामुळे त्यांच्या देशांत श्रीमंती व समृद्धी होती. तत्कालीन श्रीमंत लोक उत्कृष्ट कलाकृती विकत घेऊन त्यांचा संग्रह करीत. त्यांच्या मागणीमुळे चित्रजवनिका, सोन्याचांदीची भांडी, कातड्याच्या विविध वस्तू, फर्निचर इत्यादींच्या निर्मितीस उत्तेजन मिळाले. डच फर्निचरची आकृतिरेषा सरळ असून त्यांवर गॉथिक आणि प्रबोधन शैलीतील प्रतिमानांचे मिश्रण असे. डच कारागिरांचे कौशल्य कमी असल्यामुळे इटालियन फर्निचरप्रमाणे डच फर्निचरवस्तूंचे एकूण स्वरूप सुबक नसे. फ्लँडर्समधील फर्निचरवरील कोरीवकाम उत्कृष्ट असे परंतु अतिरेकामुळे ते अवास्तव वाटे.

वेधक कोरिवकामाने अलंकृत केलेली व्हेनिशियन खुर्ची, इ. स. १६ वे शतक पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून फ्रान्स व इटली या देशांचे घनिष्ट संबंध येऊ लागले. त्यामुळे इटलीतील प्रबोधन शैलीचा परिणाम फ्रेंच फर्निचरशैलीवर पडू लागला. तोपर्यंत प्रचारात असलेल्या गॉथिक शैलीतील फर्निचरवस्तूंचे आकार व रोमन शैलीतील सुशोभन-प्रतिमाने फ्रेंच फर्निचरनिर्मितीत दिसू लागली. फ्रेंच मंजुषाकार (फर्निचर तयार करणारा कारागीर) प्रबोधन शैली हळूहळू आत्मसात करीत होता. ही प्रक्रिया सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होती. त्या सुमारास गॉथिक शैली मागे पडून ⇨ बरोक कलेचा उदय झाला. सोळाव्या शतकातील फ्रेंच राज्यकर्ते कलेचे भोक्ते होते आणि त्यांनी योजनापूर्वक विविध कलांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे पॅरिस हे सर्वच यूरोपीय कलांचे केंद्र बनले. विविध कलाक्षेत्रांतील नवनवीन प्रवाहांचा व प्रयोगांचा उदय तेथे होऊ लागला. चौथ्या हेन्रीच्या कारकीर्दीत (१५८९ – १६१०) फ्रान्समधील ⇨लूव्ह्‌र या गावी मंजुषाकार, रंगारी, सोनार, तक्षणक अशा विविध कारागिरांना राहण्यासाठी व कामासाठी मोफत जागा दिली जात असे. ह्या कारागिरांना अनेक सवलती देण्यात येत. तरीपण राजाकरिता काम करण्याची सक्ती नसे. चित्रजवनिका, गालिचे, विविध प्रकारचे रेशीम कापड इत्यादींचे कारखाने लूव्ह्‌रच्या परिसरात उभारण्यात आले.

इंग्लंडमध्ये सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात गॉथिक फर्निचरवस्तूंच्या निर्मितीत प्रबोधन शैलीतील सुशोभन –माध्यमांचा उपयोग करण्यात आला. प्रारंभी इंग्लिश फर्निचरवर इटलीतील प्रबोधन शैलीचा प्रभाव होता परंतु पुढे ⇨ फ्लेमिश कलेचा प्रभाव त्यावर प्रामुख्याने दिसू लागला. पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८-१६३०) इंग्लंड हे प्रमुख दर्यावर्दी राष्ट्र म्हणून पुढे आले. त्याबरोबर आलेल्या समृद्धीमुळे तत्कालीन सरदारांनी व उच्चपदस्थांनी प्रशस्त प्रासाद बांधले. कौशल्यपूर्ण रचना, विस्तृत बागा, उत्तम वास्तुशिल्प, सुखावह आणि आनंददायक अंतर्गत सजावट व फर्निचर ही या प्रासादांची वैशिष्ट्ये होत. या प्रासादांतील फर्निचर गॉथिक शैलीप्रमाणे सरळ रेषाकार असून त्यावर कोरीव अलंकरण केलेले असे. निवगूर झाडाची पाने, कलात्मक कलश, नक्षीदार मेणबत्तीची घरे, पुष्पमाला, वेलबुटीदार नक्षी इ. प्रकारच्या कलावस्तू फर्निचरशोभनासाठी वापरल्या जात.

मध्ययुगीन काळातील फर्निचरची टंचाई पंधराव्या शतकानंतर दूर झाली होती. या कालखंडात समाजातील सर्व थरांतील लोक फर्निचर वापरीत. पत्रलेखनाचे टेबल, खणी-कपाट, प्रसाधन-टेबल, भोजनगृहातील पूरक टेबल, गादीच्या खुर्च्या, पलंग, मंचक अशा वस्तू सर्वसाधारणपणे प्रचारात आल्या. टेबलाच्या पृष्ठभागाची लांबी कमीजास्त करण्याची क्लृप्ती याच काळातील. त्या काळी मोठी कपाटे दोन भागांत तयार करून नंतर एकावर दुसरा भाग बसवीत असत. त्यामुळे त्यांचे परिवहन करणे सुलभ होई. ओकच्या लाकडाऐवजी मॉहॉगनी लाकूड अधिक वापरात येऊ लागले कारण त्यावर कोरीवकाम जास्त चांगले करता येईल.

बहिर्वक्र नक्षीने सजविलेली फ्रेंच वक्ररेषाकार फ्रेंच पद्धतीची सेटी, इ.स. १७ वे शतक.

सतराव्या शतकातील फर्निचर : बरोक शैलीचा उगम रोममध्ये झाला. जोव्हान्नी बेनींनी (१५९८ – १६८०) या इटालियन वास्तुशिल्पकाराने बरोक वास्तुशिल्प व त्याला अनुरूप असे गृहशोभन आणि फर्निचर यांचा विकास घडवून आणला. तत्कालीन रोमन कॅथलिक धर्मगुरूंना जनमानसावरील ललित कलांच्या प्रभावाची जाणीव झाली होती. म्हणून चर्चचा अंतर्भाग भव्य धार्मिक-पौराणिक शिल्पचित्रादिकांनी सजवून वैभवाचे प्रदर्शन करण्याची प्रवृत्ती त्या काळात निर्माण झाली. त्याकरिता विविध रंगांचा संगमरवरी दगड, मुलामा दिलेल्या ब्राँझच्या कलावस्तू, भित्तिलेपचित्रे, रंगचित्रे, सोन्याचा मुलामा केलेली आरोपणे (माउंटिंग) इ. साधनांचा उपयोग होऊ लागला. बेर्नीनीने या कामी कलावंताना नवीन दिशा दाखविली. बरोक सुशोभनमाध्यमांतून एक प्रकारची उत्तेजकता व गतिमानता याचा प्रत्यय येई. तत्कालीन जनमानसाचे हे प्रतिबिंबच असावे. बरोक शैलीत गॉथिक शैलीतील पडदे हे प्रतिमान म्हणून वापरण्यात आले परंतु हे पडदे फडकणारे व पिळवटलेले अशा स्वरूपात आले. रोमन कॅथलिक चर्चमधील या नवीन शैलीचे अनुकरण इतरत्रही होऊ लागले. तत्कालीन फर्निचरची आकाररेषा सरळ असून त्यावर सुशोभनाकरिता प्रामुख्याने कोरीव कलाकृती वापरीत. फर्निचरवरील प्रतिमाने पूर्वपरंपरेतीलच असत.


रेखीव कातीवकाम केलेले चमकदार जॉर्जियन लाकडी टेबल, १७ वे शतक.

यूरोपमधील इतर देशांतही बरोक शैलीचा प्रसार झाला परंतु फ्रान्समध्ये तिचे थोडे निराळे स्वरूप निर्माण झाले. फ्रान्सचा राजा चौदावा लुई (इ. स. १६४३ – १७१५) याने ⇨ व्हर्सायचाराजवाडा फ्रेंच राष्ट्राचे सामर्थ्य व वैभव यांचे प्रतीक म्हणूनच बांधला. ह्या राजवाड्याचे वास्तुशिल्प, गृहशोभन व फर्निचर हे सर्व बरोक शैलीचे उत्कृष्ट नमुने होत. चौदाव्या लुईने विविध ललित कलांचा योजनापूर्वक विकास घडवून आणला व फ्रान्सची अशी निराळी बरोक शैली निर्माण केली. तक्षणक, मंजुषाकार, ब्राँझ-कारागीर यांसारखे विविध प्रकारचे कारागीर परदेशातून बोलावून त्यांना योग्य जागा व इतर सोयी उपलब्ध करून दिल्या. लूव्ह्‌र येथील कलादालनात प्रथितयश कलाकारांनाच जागा व सोई उपलब्ध होत असत. या कलादालनात प्रवेश मिळणे म्हणजे राजमान्यता मिळणे असे समजले जाई. इ. स. १६६२ मध्ये चौदाव्या लुईने गोबेलिन्स या शहरी राजाश्रयाखाली विविध कारखाने काढले. ह्या कारखान्यांची देखरेख रॉबेअर आदा ल ब्रनां याप्रसिद्ध चित्रकाराकडे सोपविली होती. तत्कालीन राजवाड्यांतील सर्व प्रकारचे फर्निचर व गृहशोभन-साहित्य गोबेलिन्स येथील कारखान्यात तयार झालेले होते. ल ब्रनां हा प्रतिभाशाली चित्रकार होता. त्याने प्रामुख्याने केलेल्या बाबी म्हणजे व्हर्सायचा राजवाडा, लूव्हरचे अपोलो कलादालन व व्हर्सायचे कलादालन या होत. मंजुषाकाराला फर्निचरवरील सुशोभनासाठी निवड करण्याकरिता आलंकारिक कलाकृती उपलब्ध होत्या [⟶ आलंकारिक कला]. बरोक शैलीतील अवास्तव सुशोभन कमी करून प्रमाणबद्धता, आकृतिरेषांची विशुद्धता व भारदस्तपणा या गुणांकडे फ्रेंच फर्निचरवस्तूंना कलात्मक दर्जा प्राप्त होई. सुशोभनात कोरीवकामाचा जास्त उपयोग करण्यात येई. त्यात कोरण्याची खोली कमीजास्त करून होणाऱ्या फर्निचरच्या सुशोभनात ‘मार्किट्री’चा उपयोगही रूढ होता. आंद्रे शार्ल बूल हा लूव्ह्‌र येथे काम करणारा मंजुषाकार मार्किट्री- कामाकरिता प्रसिद्ध होता. ही पद्धत पुढीलप्रमाणे होती : सारख्या जाडीचे पण पातळ असे दोन पदार्थांचे पत्रे उदा., पितळ व कासवाच्या पाठीचे कवच सरसाने एकमेकांस चिकटवीत. त्यावर नक्षीकाम किंवा चित्राकृती काढून पातळ करवतीने कापून जाळी तयार करण्यात येई. त्यातून दोन भाग मिळत, एक जाळीचे नक्षीकाम व दुसरा त्याचा पूरक भाग. पितळ व कवच यांचे पत्रे अलग करून दोन नक्षीकामे व दोन पूरक भाग मिळत. पितळेची नक्षी व कवचाचा पूरक भाग असे एकत्र आणून ते लाकडाच्या फळीवर चिकटवीत. त्यावर धातूच्या मोलिमांची चौकट, नक्षीदार कोपरे, सोन्याचा मुलामा दिलेली आरोपणे बसवून एक चौकट बनवीत. त्याप्रमाणे कवचाचे नक्षीकाम व पितळेचा पूरक भाग एकत्र आणून दुसरी चौकट तयार करीत. अशा तऱ्हेने एकसारखे नक्षीकाम परंतु निरनिराळी पार्श्वभूमी असलेले दोन सुशोभन-घटक तयार होत. असे घटक फर्निचरच्या सपाट पृष्ठभागाच्या सुशोभनासाठी वापरीत. उदा., कपाटांची दारे.

उत्कीर्णन केलेले लाखेचे लाकडी आसन, चीन, १७ वे शतक. इंग्लंडमध्ये पहिल्या चार्ल्‌सच्या कारकीर्दीत ⇨ इनिगो जोन्स या वास्तुशिल्पकाराच्या नेतृत्वाखाली पाललाद्योच्या शैलीतील वास्तू बांधण्यात आल्या व त्याच शैलीतील फर्निचरचा पुरस्कार करण्यात आला. तसेच ⇨ सर क्रिस्टोफर रेन या सुप्रसिद्ध वास्तुशिल्पकारानेही हेच धोरण अवलंबिले. सतराव्या शतकातील शेवटच्या तीस वर्षांत ग्रिनलिंग गिबन्झ याने कोरीवकामात विशेष प्रावीण्य प्राप्त करून वरील दोन्ही वास्तुशिल्पकारांच्या वास्तुनिर्मितीत भरीव हातभार लावला. त्याच्या कलाकृती लंडनमधील पिकॅडिली भागातील सेंट पॉल व सेंट जेम्स या चर्च वास्तूंत आणि ऑक्सफर्ड व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये पहावयास मिळतात. त्याच्या कोरीव शिल्पकलातील सुटसुटीतपणा व वास्तवता हे विशेष उल्लेखनीय आहेत. या शतकातील राजवाड्यातील फर्निचर चौदाव्या लूईने पुरस्कृत केलेल्या शैलीच्या धर्तीवर असे. तत्कालीन इंग्लंडमध्ये वेताचे फर्निचरही प्रचारात होते. खुर्चीकरिता वेताने विणलेली पाठ व बैठक वापरीत. मध्यंतरी क्रॉमवेलच्या कारकीर्दीत (१६४९-६०) जाडजूड व अनलंकृत असे फर्निचर रूढ झाले. मात्र गादीकामाकरिता उत्तम प्रतीचे कापड वापरीत आणि भरतकाम व झालरी यांचा सजावटीसाठी उपयोग करीत.

या शतकात चीनमधून यूरोपीय देशांत पुष्कळच फर्निचर आयात करण्यात येई. परिणामतः चिनी सुशोभनाचे आकृतिबंध यूरोपमधील फर्निचरवर दिसू लागले. त्या काळात सुशोभन-चौकटीवर लाखेचे रंग देण्याकरिता त्या चीन-जपानमध्ये पाठविण्यात येत किंवा रंग दिलेल्या चौकटी चीनमधून आयात करीत.

रूपेरी आरोपणे लावलेली घडाची लाकडी खुर्ची, चीन, १८ वे शतक. अठराव्या शतकातील फर्निचर : शार्ल क्रेसां व फ्रेंच मंजुषाकाराने अठराव्या शतकाच्या सुरुवातीस एक नवीन शैली प्रचारात आणली. त्याने अमरथ, पालिसांद्रे, तपकिरी व लाला मॉहॉगनी जांभळ्या रंगातील विविध छटांचे लाकूड वापरून रंगच्छटांच्या माध्यमातून फर्निचरचे सुशोभन केले. तसेच त्याच्या शैलीत अमरथ व पालिसांद्रे या लाकडाच्या पार्श्वभूमीवर मुलामा केलेली ब्राँझची आरोपणे बसवून उठावदार शोभा आणली गेली. आंत्वान व्हातो या प्रसिद्ध चित्रकाराने सतराव्या शतकातील चित्रशैलीविरुद्ध बंड केले व आपल्या चित्रांच्या माध्यमातून आल्हाददायक, सुंदर, उत्साहवर्धक व दु:खविरहीत जगाचे स्वप्न साकार केले. त्यातच रोकोको शैलीची बीजे होती, असे समजतात. फ्रान्सच्या पंधराव्या लूईच्या कारकीर्दीत (१७१५-७४) फ्रान्समध्ये उद्यानातून मानवनिर्मित कृत्रिम गुहा उभारण्याची प्रथा रूढ होती. त्यासाठी वेडेवाकडे व रंगीत दगड, शंख-शिंपले इ. वस्तू वापरीत. त्या जलवेष्टित गुहांसारख्या दिसत. त्यांना सागरी गुहांचे स्वरूप आणीत असत. त्यांना ‘रोकेल’ असे म्हणत. पुढे विसाव्या शतकात पंधराव्या लूइच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शैलीलाच रोकेल किंवा रोकोको असे नाव पडले. अठराव्या शतकाच्या पहिल्या वीस वर्षांत बरोक शैलीचेच फर्निचर प्रचारात होते परंतु रोकोको शैलीचा प्रभाव वाढत होता. त्याचा कळस १७५० च्या सुमारास झाला. त्यापुढे मात्र तो प्रभाव क्षीण होऊ लागला. बरोक शैलीतील समप्रमाणता जाऊन रोकोको शैलीतील सहेतुक विषमता फर्निचरनिर्मितीत दिसू लागली. उदा., टेबलाच्या पृष्ठभागाची समोरील बाजूंची लांबी एकसारखी नसे. टेबल व खणी-कपाट यांचा आकार आतून फुगविल्यासारखा फुगीर असे. त्यांवर भरपूर कोरीवकाम, उत्कीर्णन व उठावरेखन इ. प्रक्रियांनी तयार केलेल्या ब्राँझच्या शुद्ध किंवा सोन्याचा मुलामा दिलेल्या कलाकृतीची सजावट करण्यात येई. या कालखंडातही चीन जपानमधील सुशोभनशैलीचा प्रभाव टिकून होताच. पॅगोडाचे आकृतिबंध, विविध पक्ष्यांचे शिल्पांकन, निसर्गचित्रे इत्यादींचाही सजावटीसाठी उपयोग करण्यात येई. खुर्ची, टेबल इ. फर्निचरचे पाय द्विवक्र असून त्यांवर ब्राँझची आरोपणे वसविलेली असत. फर्निचरच्या आकृतिरेषांत सरळपणा असे. ज्या वक्र व तत्सम वक्ररेषांचा भरपूर उपयोग करण्यात येई. जस्त व तांबे यांचा ‘ओर्मलू’ नावाचा सोन्यासारखा दिसणारा मिश्रधातू आरोपणासाठी वापरीत असत.


 फ्रान्समध्ये प्रथमपासूनच रोकोको शैलीला विरोध होता. इ. स. १७३७ मध्ये झांक फ्रांस्वा ब्लॉदेल या वास्तुशिल्पकाराने एक पुस्तक लिहून रोकोको शैलीवर टीका केली. त्याच्यासारखेच वास्तुशिल्पज्ञ व चित्रकार यांनी प्रवर्तित केलेली नवीन शैली ‘नव-अभिजात’ म्हणून ओळखली जाते. इ. स. १७३८ मध्ये इटलीत पाँपेई व हर्क्यूलॅनिअम या प्राचीन नगरांचे उत्खनन सुरू झाले. तेथील उत्खनित कलावशेषांचा अभ्यास होऊ लागला. अभिजात ग्रीक-रोमन कलाकृतींचे अनुकरण वास्तुशिल्पांत फर्निचरनिर्मितीत करण्यात येऊ लागले. इ. स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये राज्यक्रांती होईपर्यंत नव-अभिजात शैलीचा प्रभाव टिकून होता. या कालखंडात रोकोको शैलीतील वक्ररेषाकार मागे पडून खुर्ची-टेबलांचे पाय सरळ व निमुळते झाले आणि त्यांना सरळरेषाकार प्राप्त झाला. प्राचीन रोमन कलेतील सुशोभन-प्रतिमाने प्रचारात आली. प्रमाणबद्धता, समतोलपणा व सुबकता ही नव-अभिजात शैलीची वैशिष्ट्ये होत.

मुलामा दिलेली कातीव हंसाकृती व्हेनेशियन खुर्ची, इ. स. १८ वे शतक. इंग्लंडमध्ये अठराव्या शतकाच्या सुरुवातीला वाढते साम्राज्य व वाढता व्यापार यांमुळे समृद्धी आली होती. ॲन राणीच्या कारकीर्दीत (१७०२-१४) श्रीमंत लोकांनी जसे प्रासाद बांधले तसेच मध्यमवर्गीयांनी घरे बांधली, त्यामुळे फर्निचरचा व्यवसाय भरभराटीस आला व त्यांचे बरेच लहानमोठे कारखाने सुरू करण्यात आले. तसेच विविध प्रकारच्या कारागिरांचे उदा., मंजुषाकार, तक्षणक, गादीकाम करणारा, खुर्च्या करणारा असे स्वतंत्र गट तयार झाले. ह्या शतकाच्या पूर्वार्धातील वास्तुशिल्प व फर्निचर इटलीतील पलाडीअन शैलीतील होते. पुढे विल्यम व्हाईल ह्या शाही मंजुषाकाराने इ. स. १७५० ते १७६५ या पंधरा वर्षांत इंग्लंडमध्ये रोकोको शैली रुजविण्याचा प्रयत्न केला.

ह्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨टॉमस चिपेंडेल या लंडनमधील मंजुषाकाराने जंटलमन अँड कॅबिनेटमेकर्स डायरेक्टर (१७५४) हे पुस्तक प्रसिद्ध केले. त्यात सर्वतऱ्हेचे फर्निचर व त्यावरील सुशोभनप्रतिमाने यांची चित्रे दिलेली होती. चिपेंडेलच्या शैलीत पलाडीअन, रोकोको व चिनी शैली यांचे मिश्रण असूनही फर्निचर वस्तूचे अंतिम स्वरूप सुसंगत वाटत असे. आकर्षक लाकडांची अचूक निवड, उत्तम निर्मितिमूल्ये व दर्जा हे चिपेंडेल शैलीचे विशेष होत. या शैलीतील टेबलखुर्च्यांचे पाय सरळ व निमुळते असत.

अठराव्या शतकाच्या मध्यास रॉबर्ट ॲडम व त्याचा भाऊ जेम्झ ॲडम ह्या इंग्लिश वास्तुशिल्पज्ञांनी इटलीत वास्तुकलेचा अभ्यास केला. त्यांच्या वास्तुरचनेत व निर्मितीत कोरीवकामाचा सुशोभनाकरिता उपयोग केल्याचे दिसते. प्रबोधनकालातील इटालियन प्रतिमाने त्यात आढळून येतात. चिपेंडेल, हेपल्‌व्हाइट व शेरटन हे मंजुषाकार ॲडम बंधूंच्या अभिकल्पाप्रमाणे फर्निचर तयार करीत.

ओर्मलूची नक्षी व अभिजात पदकचिन्हे यांनी मढविलेली हेपल्‌व्हाइट शैलीतील मंजुषा. इ. स. १७८५ मध्ये जॉर्ज हेपल्‌व्हाइट याने कॅबिनेट मेकर अँड अपहोल्स्टरर्स गाइड या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले. बारीक निमुळते चौकोनी पाय, सरळ आणि वक्र रेषांचे सफाईदार मीलन, उत्कृष्ट प्रमाणबद्धता हे त्याच्या शैलीचे वैशिष्ट्य होय. सॅटिन-वूड किंवा हळदूचे पिवळ्या रंगाचे लाकूड त्याने फर्निचरसाठी निवडले. खुर्च्याच्या पाठीकरिता लंबगोल, वर्तुळाकार, ढालीसारखे किंवा हृदयासारखे असे विविध आकार त्याने प्रचारात आणले. त्यावर नाजूक कोरीव नक्षीकाम केलेले असे. ॲडमने वास्तुशिल्पात वापरलेली प्रतिमाने हेपल्‌व्हाइटच्या फर्निचरवस्तूंत दिसून येतात.

टॉमस शेरटन या मंजुषाकाराने १७९१ च्या सुमारास कॅबिनेट मेकर अँड अपहोल्स्टरर्स ड्राइंग बुक या नावाच्या पुस्तकाचे चार खंड प्रसिद्ध केले. ॲडमने अभिजात रोमन शैलीचे पुनरुज्जीवन केले होते. त्याचा परिणाम शेरटनच्या फर्निचर अभिकल्पात दिसून येतो. त्यानेही सॅटिनवूड लाकडाचीच निवड केली. व्हिनीयरचे काम व त्यावर जडावकाम करून किंवा त्यास विविधप्रकारे रंगवून फर्निचरची शोभा वाढविण्यात येई. शेरटनने मार्किट्रीचा उपयोगही केला. त्याच्या खुर्च्याचे पाय गोल व निमुळते असत. फर्निचरची आकाररेषा सरळ असे. काही फर्निचर वस्तूंत कलशाकार कातीव पाय दिसून येतात. नव-अभिजात आणि सोळाव्या लुईच्या शैलीतील प्रतिमाने व सुशोभन-माध्यमे यांचाही त्याने उपयोग करून घेतला.


एकोणिसाच्या शतकातील फर्निचर : अठराव्या शतकाच्या शेवटी प्राचीन ग्रीक वास्तुशिल्प व इतर कला यासंबंधी पुष्कळच माहिती उपलब्ध झालेली होती. ग्रीक शैलीतील अभिजात साधेपणा, सुशोभनमाध्यमे व फर्निचरचे आकार यांचे अनुकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होऊ लागला. इ. स. १७८९ ते १८१५ या काळात फ्रान्समध्ये राज्यक्रांती होऊन नेपोलियन बोनापार्टचा उदय व अस्त झाला. या धामधुमीच्या काळात नवीन शैली उदयास येऊ शकली नाही. तथापि तत्कालीन शैलीत भावी काळातील साम्राज्य (एंपायर) शैलीला अनुरूप असे परिवर्तन हळूहळू होत होते. संक्रमणावस्थेतील ही फर्निचरशैली फ्रान्समध्ये ‘डिरेक्टर’ या नावाने प्रसिद्ध आहे. प्राचीन ग्रीक व रोमन शैलीतील फर्निचरची नक्कल असे तिचे स्वरूप होते.

नेपोलियन बोनापार्टने नवीन राजवाडे बांधले नाहीत परंतु पेर्‌स्ये व फाँतेन या वास्तुशिल्पकारांच्या देखरेखीखाली नवीन अशा साम्राज्य शैलीनुसार अंतर्गत सुशोभन व फर्निचर यांचे नूतनीकरण केले. त्या वास्तुशिल्पकारांनी रोमन व ग्रीक सुशोभन-माध्यमे वापरली परंतु त्यांचे अंधानुकरण केले नाही. तत्कालीन फ्रान्समधील संस्कृती व नवीन उपलब्ध झालेले पदार्थ यांना अनुरूप अशी नवीनच शैली निर्माण केली. अभिजात ग्रीक-रोमन कलेतील चैतन्यांचा मागोवा घेऊन त्यामागील तत्त्वांचा व सूत्रांचा त्यांनी मार्मिकपणे उपयोग करून घेतला. फर्निचरमधील कोपऱ्यांची तीव्रता कमी करण्याचा कोणताही प्रयत्न या नव्या निर्मितीत नव्हता. त्यामुळे मोलीमे वापरण्याची गरज नव्हती. मोठेमोठे पृष्ठभाग त्यांची सलगता व जाडजूड तळ यांमुळे फर्निचरवस्तूचा एकूण आकार संपुंजित दिसे. मध्यबिंदूच्या दोन्ही बाजूंकडील समप्रमाणता काटेकोर असे. अंतर्गत गृहशोभन करताना व फर्निचरवस्तूंचे स्थान ठरवितानाही सुसंवादाचे भान राखले जाई. फर्निचरच्या सुशोभनाकरिता मार्किटी, सोन्याचा मुलाम केलेली ब्राँझची आरोपणे, कोरीवकाम, लाखेचे रंग इत्यादींचा उपयोग करण्यात येई. अभिजात परंपरेतील एंपायर ही शेवटची शैली. १८३० च्या सुमारास तिचा प्रभाव संपला. पुढे इ. स. १८३० ते १८७० पर्यंत गॉथिक, प्रबोधन, बरोक, रोकोके इ. पूर्वकालीन शैलींची नक्कल करण्याकडे एकंदर कल होता. ही नक्कल सुद्धा चांगली झाली नाही त्यामुळे ह्या काळात कलात्मक फर्निचर निर्माण होऊ शकले नाही.

इ. स. १८१५ ते इ. स. १८६० पर्यंतच्या कालात ‘बायडरमीअर’ या नावाने एक शैली प्रचारात होती. तत्कालीन जर्मन वर्तमानपत्रांत ‘बायडरमीअर’ या नावाचे एक संस्कृतिहीन, सुखवस्तू मध्यमवर्गीय माणसाचे व्यंगचित्र प्रसिद्ध होई. त्यावरून या शैलीला बायडरमीअर फर्निचर असे नाव पडले. शेरटन, डिरेक्टर, एंपायर या शैलीतील ब्राँझ आरोपणे वगळून हे फर्निचर तयार केलेले असे. आकृतिरेषेचा व सुशोभन-माध्यमाचा साधेपणा ह्या शैलीचे वैशिष्ट्य होय. १८५० नंतर रोकोको शैलीतील वक्र रेषांचा तिच्यावर प्रभाव पडू लागला.

मायकेल थोने या ऑस्ट्रियातील मंजुषाकाराने स्तरीय लाकूड पाण्यात उकळवून वाकविण्याचे प्रयत्न केले. पुढे त्याने बीचचे स्तरीय नसलेले लाकूड त्याच पद्धतीने वाकविण्याचा यशस्वी प्रयोग केला. लाकडाला पाहिजे तो आकार देऊन थोने याने एक झुलती खुर्ची तयार केली. व्हिएन्ना शहरी त्या प्रकारच्या खुर्च्या बनविण्याचा एक कारखानाही निघाला. इंग्लंडमध्ये या खुर्च्या विशेष लोकप्रिय ठरल्या. थोनेची ही खुर्ची म्हणजे औद्योगिक आकृतिबंधाच्या फर्निचरची सुरुवात होय [⟶ औद्योगिक आकृतिबंध].

इंग्लंडमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला नव-अभिजात शैलीतील फर्निचर वापरात होते. हेन्री हॉलंड या वास्तुशिल्पकाराने त्याचा विशेष प्रसार केला. १८३७ मध्ये राणी व्हिक्टोरिया गादीवर आली व तिने दीर्घकाळ राज्य केले. तिच्या कारकिर्दीत इंग्लंडची वेगाने भरभराट झाली. सुरुवातीच्या काळात गॉथिक शैलीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो अयशस्वी ठरला. तो काळ समृद्धीचा असल्यामुळे लोकांच्या फर्निचरसंबंधीच्या आवडीनिवडी वेगाने बदलत त्यामुळे फर्निचरची एकच एक शैली प्रभावी नव्हती व त्याची एकूण गुणवत्ताही फारशी चांगली नव्हती. इ. स. १८५१ मध्ये लंडन येथे फर्निचरचे एक जागतिक प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात मांडलेल्या वस्तूंवरून फर्निचरची गुणवत्ता खूपच कमी झाल्याचे दिसून आले. प्रमाणबद्धतेचा अभाव व अवास्तव जाडजूडपणा यांसारखे दोष त्यांतून दिसून आले. त्यामुळे फर्निचरचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू झाला. इ. स. १८५० ते १८७५ या दरम्यान प्रबोधनकालीन शैलीचे पुनरुज्जीवन करण्यात आले.

व्हिक्टोरियन काळातील गादीयुक्त कोरीव लाकडी आसन, १९ वे शतक. औद्योगिक क्रांतीमुळे ह्या शतकात फर्निचर तयार करण्याचे नवेच तंत्र उदयास आले. यंत्राचा उपयोग करून फर्निचरचे विविध भाग तयार केले जात. शेवटी विविध भाग एकत्र करून संपूर्ण फर्निचर परत तयार होई. या पद्धतीत कारागिराला संपूर्ण वस्तू निर्माण करण्याचे श्रेय मिळत नसे व आपल्या कामाचा अभिमानही जाणवत नसे, त्यामुळे वैयक्तिक कौशल्याचा ऱ्हास व्हावयास लागला. तत्कालीन इंग्लिश कवी व कलावंत विल्यम मॉरिस व त्याचे समविचारी मित्र यांनी कारागिराच्या वैयक्तिक कौशल्याचे पुनरुज्जीवन करण्याची मोहीम सुरू केली. मध्ययुगीन फर्निचरशैली पुन्हा रूढ करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. असे फर्निचर साधे पण सुंदर करण्याकडे कल असे. फर्निचरचे नवीन नवीन आकारही रूढ करण्यात आले. सजावटीकरिता जपानी चित्रांचा वापरदेखील होऊ लागला.

एकोणिसाव्या शतकातील कागदलगद्याचे फर्निचर आणि टनब्रिज व्हिनीयर काम उल्लेखनीय आहेत. ⇨ कागदलगद्याचे कलाकाम नवीन नव्हते परंतु ह्या शतकाच्या पूर्वार्धात त्यापासून उत्तम फर्निचर तयार करण्यात येऊ लागले. यासाठी कागदाचा लगदा, चुना, सरस किंवा आसंजक व काही वेळा वाळू यांचे मिश्रण करून ते दाबून त्याला पाहिजे तो आकार देत. त्यानंतर भट्टीत भाजून लाकडाइतके कठीण करण्यात येई. ते करवतीने कापता येत असे, तसेच खोदून त्यावर जडावाचे कामही करता येई. दुसरीही एक पद्धत त्या काळी रूढ होती. तीनुसार जाडीइतके तुकडे घेऊन ते आसंजकाने चिकटवून त्यावर दाब देत. त्यांची लाकडासारखी फळी होत असे. तबक (ट्रे) टेबलाचे पृष्ठभाग, पेट्या इ. करण्याकरिता तिचा वापर करत. या वस्तूंवर रंगीत चित्रे, मुक्ताद्रव्य इ. सुशोभन-माध्यमे असत. खुर्चीच्या पाठीसाठीही त्याचा उपयोग करीत.

इंग्लंडमधील टनब्रिज या गावी केंद्रित असलेल्या व्हिनीयर कलेला टनब्रिज-काम म्हणून ओळखले जात असे. विविध रंगांच्या पातळ लाकडी पट्ट्या आसंजकाने चिकटवून त्यांवर दाबयंत्राने दाब देत. त्यातून विविधरंगी आकृतिबंधाचे चौकोनी लाकूड तयार होत असे. अशा लाकडाचे पातळ अनुप्रस्थ छेद घेऊन मिळणारे तुकडे वापरून व्हिनीयर काम करीत असत. मोठा पृष्ठभाग असल्यास ह्या तुकड्यांचा जडावकामासाठी उपयोग करीत. फळे, फुले वा निसर्गदृश्ये साकार करण्याकरिता त्या तुकड्यांचा वापर करीत. हे काम मोठे जिकिरीचे असे. एकादे लहान चित्रही शेकडो बारीक तुकड्यांनी पूर्ण करण्यास कित्येक महिने लागत. कागदलगद्याचे फर्निचर व टनब्रिज-काम ह्या दोहोंतील गुणवत्ता १८५० नंतर कमी होऊ लागली. 


उत्तर अमेरिकेत यूरोपमधील विविध देशांतील लोकांनी निरनिराळ्या ठिकाणी वसाहती केल्या, त्यांनी आपापल्या देशातील फर्निचरच्या नमुन्याप्रमाणे फर्निचर बनविण्यास सुरुवात केली. त्यात साधेपणा असे. फर्निचरसाठी स्थानिक लाकूड वापरीत. यूरोपमधील सर्व शैलीचे फर्निचर त्या त्या कालखंडात अमेरिकेमध्ये बनविले जाई. त्यांतून वसाहतीतील कारागिरांची सर्जनशीलता व कुशलता दिसून येते. अठराव्या शतकाच्या शेवटी शेकर नावाच्या एका धार्मिक पंथाच्या अनुयायांनी न्यूयॉर्कला खुर्च्या बनविण्याचा कारखाना काढला. मोठ्या प्रमाणावर खुर्च्या तयार करून हे लोक त्या घरोघर जाऊन विकीत असत.

विसाव्या शतकातील फर्निचर : विसाव्या शतकातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा परिणाम फर्निचरशैलीवर झालेला दिसून येतो. ह्या शतकात लोकांच्या राहणीतील औपचारिकपणा कमी होऊ लागला. घरकामाकरिता विविध यांत्रिक प्रयुक्त्यांचा अवलंब करण्यात आला. लहान जागेत राहण्याची आवश्यकता निर्माण झाली. फर्निचरवस्तू तसेच दूरचित्रवाणीसारखी घरगुती मनोरंजनाची साधने यांचे आधुनिक जीवनातील महत्त्व वाढले. मध्यम वर्गीयांच्या संख्येत व उत्पन्नात वाढ झाली. या परिस्थितीचा परिणाम फर्निचरशैलीवर होणे अपरिहार्य होते. फर्निचरचा वापर बहुसंख्य लोक करू लागले. जागेच्या टंचाईमुळे फर्निचरचा आकार लहान व सुटसुटीत होऊन बहुद्देशीय किंवा विविधोपयोगी फर्निचरवस्तू निर्माण करण्याची गरज उत्पन्न झाली. फर्निचरची स्वच्छता व दुरुस्ती अल्पावधीत करण्याची गरज हीदेखील नव्या फर्निचरवस्तूंच्या निर्मितीस पोषक ठरली.

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस फर्निचरची गुणवत्ता कमी झालेली होती. प्रमाणबद्धतेच्या अभावामुळे त्यात बोजडपणा आलेला होता. या कारणामुळे या शतकाच्या शेवटच्या दशकात आधुनिक (मॉडर्न) फर्निचरकलेचा उदय झाला. आधुनिक कलांचे क्षेत्र सर्वसमावेशक होते [⟶ आधुनिक कला]. अमेरिकमेध्ये ⇨ लूइस सलिव्हन व ⇨ फ्रँक लॉइड राइट या वास्तुशिल्पज्ञांनी ‘कार्यानुसार आकार’ या तत्त्वाचा पुरस्कार केला. इ. स. १९०७ मध्ये जर्मनीत ‘डाईश वर्कबुंड’ या संघटनेनेही याच तत्त्वाचा पुरस्कार केला. या संघटनेचा उद्देश कला व उत्पादनतंत्र यांची सांस्कृतिक सांगड घालणे असा होता. तसेच यंत्रामुळे कलात्मक गुणवत्तेची हानी होत नसून ती त्यांचा योग्य उपयोग न केल्याने होते, असे या संघटनेचे मत होते. संपूर्णतः उपयुक्तता, संपूर्ण कार्यकारणसंबंध व सुशोभनांचा अभाव, अशी तिची घोषवचने होती. इ. स. १९१९ मध्ये ह्या संघटनेपैकी ⇨ वॉल्टर ग्रोपिअस याने ⇨ बौहाउस नावाचे एक कला शिक्षणकेंद्र व्हायमार या शहरी काढले. या केंद्रात सर्जनशीलतेला पूर्ण वाव देण्यात येई. फर्निचरचे अभिकल्प करताना, कमीत कमी किंमत, जास्तीत जास्त उपयुक्तता, साधी व स्पष्ट आकाररेषा, कोणताही पदार्थ वा कच्चामाल वापरण्याची मुभा व महोत्पादन तंत्र इ. उद्देश लक्षात घेतले जात. ह्या केंद्रातील लोकांच्या प्रयत्नातूनच क्रोमचा मुलामा दिलेल्या लोखंडी नळ्या, ॲल्युमिनियमच्या नळ्या, मोठ्या आकाराच्या काचा, बेकेलाइट, स्तरीय लाकडांचे त्रिमितीय खंड, विविधरंगांचे प्लॅस्टिकचे त्रिमितीय तुकडे यांचा उपयोग फर्निचरनिर्मितीत रूढ झाला. १९२५ साली व्हायमार येथील केंद्र देसॉ ह्या शहरी हलविण्यात आले व १९३३ साली ग्रोपिअसला राजकीय परिस्थितीमुळे जर्मनीतून बाहेर पडावे लागले परंतु त्याने प्रवर्तित केलेली ही चळवळ इतर देशांत पसरली.

तत्कालीन प्रथितयश व पुरोगामी वास्तुशिल्पज्ञांनी निर्माण केलेल्या आधुनिक फर्निचरवस्तूंत सौंदर्यदृष्टी व यंत्रयुग यांची सुसंगती साधलेली दिसते. तेव्हापासून नव्याने उपलब्ध झालेल्या पदार्थांचा उपयोग करून व आधुनिक उत्पादन तंत्र वापरून निर्माण होणारे उत्तम प्रकारचे फर्निचर वापरात येत आहे. या शतकाच्या सुरुवातीला प्रस्थापित शैलीत जास्तीत जास्त बदल करण्याची, अगदी साधे आकार देण्याची, सुशोभने काढून टाकण्याची टूम निघाली होती तथापि उपयुक्ततेवर अवास्तव भर दिल्यामुळे नावीन्याचा अभाव असलेले व चमत्कारिक आकाराचे फर्निचर निर्माण झाले. त्याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये रोमन, फ्रेंच, रोकोको इ. पूर्वकालीन शैलीतील फर्निचरविषयी आकर्षण निर्माण झाले. तेव्हापासून या जुन्या शैलीतील प्रमाणबद्धता, आकाररेषांची सहजता व सुसंगती, कलात्मक गुणवत्ता यांचा योग्य उपयोग करून घेऊन व वेळ वाचविण्याकरिता यंत्रांचा उपयोग करून उत्कृष्ट फर्निचरची निर्मिती होऊ लागली. गादीकामाकरिता स्पंजसारखे रबर व प्लॅस्टिक यांचा सर्रास उपयोग करण्यात येऊ लागला.

प्लॅस्टिकचे गादीकाम (स्पंज) असलेले फर्निचर धोकादायक ठरले आहे. इंग्लंडमध्ये अशा प्रकारचे फर्निचर पेटून लागलेल्या घरगुती आगीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. विशेषतः जळती सिगारेट व आगकाडी यांमुळे प्लॅस्टिकचा स्पंज पेट घेतो. म्हणून फर्निचर ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायदा करण्याचा इंग्लंडचा विचार आहे. या कायद्यात दिलेल्या चाचण्यात उतरलेली प्लॅस्टिकेच वापरण्यास परवानगी दिली जाणार आहे. अनेक प्रकारे उपयोगी पडणारे तसेच घडीचे फर्निचर या शतकात विशेष रूढ आहे. आधुनिक फर्निचरचे वजन व त्याचा आकार यांत खूपच तफावत असते. परिवहनास किंवा साठा करण्यास सुलभ व्हावे म्हणून फर्निचरवस्तूचे घटक निरनिराळ्या विभागांत निर्माण करतात. अपेक्षित जागी फर्निचर उभे करण्याकरिता यांत्रिक प्रयुक्त्यांचा उपयोग करून ते भाग जोडण्यात येतात. आधुनिक काळात स्थिर फर्निचरवस्तूही वापरात आहेत.

सप्रे, गो. वि.

भारतीय फर्निचर : फर्निचर म्हणजे उपयुक्त उपकरण किंवा उपकरणसमुदाय. भारतातील फर्निचरनिर्मितीची परंपरा प्राचीन आहे. विविधता, कलात्मकता व उपयुक्तता या तीनही दृष्टीने ही परंपरा समृद्ध आहे. प्रस्तुत नोंदीत या परंपरेचा पुढील मुद्यांनुसार संक्षिप्त आढावा घेतला आहे : (१) भारतीय फर्निचरची ठळक वैशिष्ट्ये, (२) स्थूल ऐतिहासिक आढावा, (३) काही वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन फर्निचरप्रकार आणि (४) प्रादेशिक फर्निचरनिर्मितीचे विशेष.

भारतीय फर्निचरची ठळक वैशिष्ट्ये : भारतीय फर्निचरची परंपरा भारतीय संस्कृतीइतकीच प्राचीन आहे. इतर देशांतील फर्निचरप्रकारांप्रमाणेच भारतीय फर्निचरप्रकार हेदेखील विशिष्ट वातावरण आणि भौगोलिक परिस्थिती, लाकूड, वनस्पतींची पाने, साली, तंतू, धागे यांसारखे अवयव, माती, वाळू, कापूस, लोकर, रेशीम, ताग, सनताग, दगड, धातू, हस्तिदंत, प्राण्यांचे अवयव व कातडी यांसारख्या माध्यमांची उपलब्धता समाजातील धार्मिक, कौटुंबिक, वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाच्या गरजा, प्रथा आणि संकेत वास्तुकला, चित्रकला, गृहशोभन यासंबंधीच्या कल्पना इत्यादींशी निगडित असले, तरीही भारतीय फर्निचरकलेची किंवा तंत्राची काही वैशिष्ट्ये नमूद करण्यासारखी आहेत : (१) भारतात विविध प्रकारच्या पोतांचे मऊ व कठीण लाकूड सुलभपणे तसेच मुबलक उपलब्ध असल्याने लाकडी फर्निचर भारतात प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले. लाकूड किंवा वृक्षवनस्पतींचे अवयव यांसारख्या नाशिवंत माध्यमाचे हे फर्निचर कालौघात नष्ट झाले असले, तरी शिल्पचित्रादी कलानिर्मितीसंबंधी ग्रंथांतून वा पुरावशेषांवरून प्राचीन लाकडी फर्निचरचे काही नमुने लक्षात येतात. यासाठी आधारभूत साहित्य पुढीलप्रमाणे होय. ऋग्वेदादी वेदवाङ्‌मय, रामायण-महाभारत-पुराणे, वात्स्यायनाचे कामसूत्र, राजा भोजदेवकृत समारांगणसूत्रधार व युक्तिकल्पतरु, चालुक्यवंशीय तिसऱ्या सोमेश्वर राजाचा मानसोल्लास ग्रंथ इत्यादी. अजिंठा-वेरूळची लेणी, खजुराहोचे शिल्प, पुरातत्त्वीय उत्खनने इत्यादींच्या आधारे प्राचीन भारतीय फर्निचरकलेचे स्वरूप दिग्दर्शित करता येते.


(२) लोखंड, पंचधातू यांसारख्या मौल्यवान धातूंचे फर्निचरही भारतात निर्माण होत होते. सोने-चांदी यांसारख्या मौल्यवान धातूंचा, तसेच हस्तिदंतादी माध्यमांचा फर्निचरच्या निर्मितीत व सजावटीत वापर होत असल्याचे दिसून येते. (३) वास्तुरचनेचा एक भाग म्हणूनही ओटे, कोनाडे, फडताळे, बैठकी आसने किंवा पीठे यांसारख्या सोयी करण्यासाठी दगड, माती, चुना, विटा इत्यादींचा उपयोग करण्यात येई. वास्तुगत अशा या फर्निचरवजा सुविधा, बागबगीचे, राजवाडे, महाल, तसेच खाजगी व सार्वजनिक इमारती इत्यादींतून आढळून येतात. (४) दर्भासने वा कूर्चासने, आसंदी (रुंद उच्च आसन), पीठे, मंच किंवा मंचक, पर्यंक (पलंग), खट्‌वा (खाट), कपाट, पेटी, शिंके, घडवंची, करंडक, दर्पण, छत्र, चामर, समई, हंड्या, झुंबरे, तोटे, लोटे, फुलपात्रे, दीपमाला, सिंहासने, मखर, चौरंग, अंबारी, पाट, सारीपाट, पाळणा, चौपाळा, झोपाळा, पालखी, मेणा यांसारख्या आसनप्रकारांना भारतीय परंपरेत विशेष प्राधान्य होते, असे दिसते. आसनांच्या या भारतीय फर्निचरप्रकारांचे एक वैशिष्ट्य होते. ते म्हणजे मांडी घालून बसण्याची वा पायाची घडी घालून बसण्याची पद्धत विशेष रूढ असल्याने या पद्धतीनुसारच बरेच भारतीय आसनप्रकार तयार केल्याचे दिसते. काही आसनप्रकारांत पाय खाली सोडून बसण्याचीही सोय होती, हे काही सिंहासनस्थ मूर्तीवरून लक्षात येते. (५) फर्निचरप्रकारांची माध्यमे, त्यांतील योग्यायोग्याची निवड, त्याच्या मोजमापाचे प्रमाण आणि त्यांचा उपयोग यासर्वच बाबतींत काही धार्मिक किंवा शुभाशुभ असे संकेत भारतीय फर्निचरपरंपरेत आढळून येतात. फर्निचरनिर्मितीसारखी ही लौकिकातील कला प्राचीन भारतीय कलासाहित्याप्रमाणेच धार्मिक कल्पनांनी प्रभावित झाल्याचे दिसून येते. विशेषतः प्राचीन मंदिरवास्तू व त्यांचे शिल्पांकन यांतून देवालयीन सुशोभन आणि देवतांच्या आसनादी वस्तू यांसंबंधीचे एक काटेकोर तंत्रच विकसित झाल्याचे दिसून येते. (६) प्रदेशविशिष्ट फर्निचरप्रकारांच्या दीर्घकालीन परंपराही भारतासारख्या विशाल देशात आढळून येतात. त्या त्या प्रदेशातील उपलब्ध साधनसामग्री आणि राहणीमान यांचा परिणाम या प्रदेशविशिष्ट फर्निचरपरंपरांवर ठळकपणे दिसून येतो. मेणा, पालखी, डोली, शिबिका हे एकाच वर्गातील पण भिन्न क्षेत्रांतील वैशिष्ट्यपूर्ण प्रकार होत. (७) फर्निचरकला ही दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने कालमानानुसार जीवनात होणाऱ्या बदलांचा परिणाम फर्निचरनिर्मितीवरही होतच असतो. देशातील राजकीय सत्ताधाऱ्यांच्या प्रभावानेही फर्निचरसारख्या कनिष्ठ कलेवर परिणाम होतो. भारतात प्रदीर्घ मुस्लिम राजवटीच्या काळात व नंतर ब्रिटिश सत्ताकाळात इतर अनेक गोष्टींप्रमाणेच भारतीय फर्निचरवरही मोठाच परिणाम झाला. मुस्लिम राजवटीच्या काळात गालिचे, जाजम, अलंकृत गाद्या, लोड, तक्के तसेच इतरही दरबारी फर्निचर यांची भर पडली. तथापि मुस्लिम प्रभाव हा सरदारवर्गापुरताच फर्निचरप्रकारात विशेषत्वाने झाला. ब्रिटिशकाळात मात्र टेबल, खुर्च्या, बाक, स्टूल, कपाटे, पेट्या इ. फर्निचर हे सामान्य लोकांपर्यंत येऊन पोचले. फर्निचरविषयक अभिरूची सार्वत्रिक होऊन विद्यमान काळात तर ती जवळजवळ एकसारखीच झाल्याचे दिसून येते. (८) अत्यंत वेगाने बदलत गेलेल्या या भारतीय फर्निचरप्रकारात काही पारंपरिक प्रकार कमीअधिक फरकांसह टिकून राहिले आहेत. त्यांत व्यासपीठे विविध प्रकारचे लाकडी पाट, चौरंग, झोपाळे, खाटा, संदूकी, लाकडी मोठ्या पेट्या, उतरत्या पृष्ठाची वहीखाते लिहिण्याची पेटी, घडवंची, तऱ्हेतऱ्हेचे पिंजरे, आडोशीपट, तबके, कलमदान, पुस्तकाची घोडी, तिवई, मखर व छपरी पलंग, देव्हारे, झोपाळे, पाळणे इत्यादींचा अंतर्भाव होतो. तथापि भारतीय फर्निचर हे सतत आकार-प्रकार व माध्यमांच्या बाबतीत बदलत राहिल्याचेच दिसून येते.

जाधव, रा.ग.

स्थूल ऐतिहासिक आढावा : ऋग्वेदादी वेदवाङ्‌मयातील सूत्रधार (सुतार), तष्ट्ट (सुतार), कारु (कारागीर), तक्षन्, तक्षक वा तक्षा (सुतार) यांसारख्या काष्ठकामाशी संबंधित संज्ञा अथवा तल्प (पलंग), पर्यंक (पलंग), आसंदी, प्लेंख किंवा प्रेंख (झोपाळा), हिरण्यकशिपु (सुवर्णवस्त्रांकित आसन), प्रोष्ठ (एक प्रकारचा बाक) या काष्ठवस्तुनिदर्शक नामांवरून भारतीय काष्ठपरंपरेची प्राचीनता सूचित होते.

रामायणातही स्थापत्यशिल्पी, रथकार, कारुककर्म (कारागिरी), वर्धकिन् (सुतार), सूत्रकर्म (सुतारकाम) या ज्ञाती व कर्मवाचक संज्ञा अथवा मंचक, शिबिका यांसारख्या काष्ठकलेशी निगडित वस्तुनामांतून तत्कालीन फर्निचरप्रकारांचे दर्शन घडते. त्या काळातील मंचक हे लाखेसारख्या लाल रंगाच्या ‘आस्तरणाने’ सुशोभित करण्यात येत असल्याचे तर कधी त्यांवर शुभ्रधवल ‘परिस्तोम’ पसरविण्यात येत असल्याचे उल्लेख आढळतात.

महाभारतकालीन पीठ-प्रकार एक महत्त्वाचा फर्निचरप्रकार होता. ही पीठे चौरंगासारखी चौकोनी असून त्यांवर हस्तिदंती जडावकाम वा सुवर्णाचे नक्षीकाम केलेले असे. राजे-महाराजे व राजस्त्रियांसाठी त्या काळी खास स्वरूपाचे मंचक अथवा पर्यंक वापरण्याची प्रथा होती. त्यांची लांबी पीठांपेक्षा अधिक असे. त्यांवर गाद्या टाकून त्या गाद्या पांढऱ्या शुभ्र आवरणांनी आवृत असत आणि त्यांवर पाठीशी उशा-तक्के ठेवण्यात येत.

रामायण-महाभारतकाळात सिंहासन ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब होती. त्यांच्या बनावटीवरून त्यांचे गरुडासन, हंसासन, पद्मासन, राजासन, शंखासन असे विविध प्रकार पडत. सिंहासनाची ही वैशिष्ट्ये इतिहासकाळापर्यंत जाऊन भिडतात. मयूरासन त्याचेच एक प्रतीक मानता येईल.

भारतातील प्राचीन ⇨सिंधु संस्कृतीची (सु. इ. स. पू. २७५० ते १७५०) केंद्रे म्हणून ⇨ मोहें-जो-दडो, ⇨ हडप्पा, ⇨ लोथल व ⇨ कालिबंगा यांचा उल्लेख करता येईल. या संस्कृतीचे क्षेत्र राजस्थान, गुजरात व दक्षिणेत थेट दायमाबाद (जि. अहमदनगर) येथपर्यंत असल्याचे अलीकडील उत्खननावरून दिसून येते. दायमाबाद येथे सापडलेला एक मौलिक प्राणिसंच भरीव कास्य धातूचा असून त्यात एक मोठी दुचाकी, बैलगाडी तसेच हत्ती, रेडा आणि रानडुक्कर यांच्या मूर्ती आहेत. उत्कृष्ट नगररचना हे या संस्कृतीचे वैशिष्ट्य मानले जाते. तेव्हा तत्कालीन घरगुती फर्निचरवस्तूही वैशिष्ट्यपूर्ण असाव्यात, याचा पुरावा दायमाबाद येथे पक्क्या मातीच्या खेळण्यांबरोबर सापडलेल्या एका बिनहाताच्या खुर्चीवजा आसनावरून, तसेच कालिबंगा येथे सापडलेल्या एका खाटेवरून (हिच्यावर दोरी विणल्याच्या खुणा आहेत) मिळतो. तत्कालीन खरे फर्निचर लाकडी म्हणजे नाशिवंत स्वरूपाचे असल्यामुळे ते कालौघात नष्ट झाले. तथापि त्या काळातील भाजकी मृत्पात्रे, खेळणी, धान्यसाठवणीचे माठ आणि ते जमिनीवर ठेवण्याकरिता केलेल्या विटांच्या गोलाकार चुलीसारख्या बैठकी या सर्वांची काही अंशी घरगुती फर्निचरमध्ये गणना करता येईल. हडप्पा येथे भाजक्या मातीच्या बशा सापडल्या असून त्यांवर चित्रे काढलेली आहेत. त्या बशांचा उपयोग भिंतीवर लटकविण्याकरिता होत असावा, असे तज्ञांचे मत आहे. त्यावरून भित्तिफलकांची प्रथा किती पुरातन आहे, हे लक्षात येते.

वास्तुकला व फर्निचर यांचा निकटचा संबंध असतो. सम्राट अशोकाच्या काळात (सु. इ. स. पू. ३०३-२३२) दगडी वास्तू व शिल्पाकृती या पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या. तत्कालीन फर्निचरवस्तूंचे स्वरूपही त्यामुळे केवळ लाकडी वा मातीच्या वस्तूंपेक्षा वेगळे बनते. त्यांना शिल्पसौंदर्याचा लाभ झाला. 


अलेक्झांडरच्या स्वारीनंतर (इ. स. पू. चौथे शतक) तत्कालीन भारताच्या वायव्येस ⇨गांधार शैलीचा उदय झाला. गांधार शैलीतील अनेक शिल्पांतून विविध प्रकारच्या आसनांचे नमुने दिसून येतात परंतु भारतातील भौतिक संस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडते, ते शिल्पकलेतून वा चित्रकलेतूनच. ⇨ सांचीच्या बौद्ध स्तूपाभोवतालचे तोरण, ⇨ अमरावती-१, ⇨ नागार्जुनकोंडा, ⇨ अजिंठा, ⇨ वेरूळ, तंजावर, मटानचेरी येथील शिल्प, देवालये व भित्तिचित्रे या सर्वांतून विविध प्रकारच्या सुशोभित वस्तू व फर्निचरचे प्रकार यांचे दर्शन घडते. त्यांत वेगवेगळ्या आकाराची खुर्चीवजा आसने, आसंदी, पीठे, मंचक, अर्धासने, सिंहासने व ‘भोजनफलक’ इत्यादींचा अंतर्भाव होतो.

मध्ययुगीन काळात खजुराहो, कोनारक, भुवनेश्वर, पुरी, अबू, मोढेरा, चितोडगढ, गिरनार, पाटण इ. ठिकाणी उत्तम वास्तू व देवालये बांधली गेली. त्यांतही फर्निचरचे अनेकविध नमुने दिसून येतात.

इ. स. बाराव्या शतकानंतर भारतात ठिकठिकाणी मुसलमानी सत्ता प्रस्थापित झाल्या. पुढे पंधराव्या-सोळाव्या शतकात हिंदु-मुस्लिम कल्पनांच्या मिश्रणातून मिश्र शैलीतील फर्निचर उदा., चौक्या (चारपाई), तख्त-पोस, लोड, तकिये, पलंग, आसने, कनाती, पडदे इ. पुढे आले. याच काळातील बौद्ध व जैन धार्मिक पोथ्यांतील चित्रे, मोगलकालीन लघुचित्रे इत्यादींतून फर्निचरप्रकारांचे काही नमुने आढळतात [⟶ मोगल कला]. ⇨ राजपूत कला, ⇨ राजपूत चित्रकला, ⇨ पहाडी चित्रशैली आणि ⇨ दख्खनी कला यांसारख्या चित्रशैलीतील चित्रांमधून शयनगृहातील, दरबारातील तसेच रागमालेच्या [⟶ रागमाला चित्रे] व प्रेमकथेच्या पार्श्वभूमीवरील फर्निचरप्रकारांचे दर्शन घडते. पुढे अठराव्या शतकानंतर त्याच शैलीतील चित्रांतून यूरोपीय पद्धतीच्या खुर्च्या, टेबले इ. डोकावू लागतात. त्यांचे अनेक नमुने नंतरच्या ‘कंपनी पेंटिंग’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या चित्रांतून दिसतात. भारतीय लघुचित्रकलेचा अस्त होत असता एकोणिसाव्या शतकात कलकत्त्यासारख्या ठिकाणी ब्रिटिश वसाहतवाल्या साहेबांकरिता निसर्ग चित्रे काढून त्यांना देत असत. ही चित्रे ब्रिटिश साहेबांना आवडत असत. ती कंपनी शैली म्हणून प्रसिद्ध आहेत. राजपूत राजांच्या राजवाड्यात भेटीदाखल मिळालेल्या परदेशी टेबलखुर्च्या दिसू लागल्या. त्यांवर बसून काढलेली त्यांची अनेक व्यक्तिचित्रे उपलब्ध आहेत. नंतरच्या काळात त्या फर्निचरवर पितळी पत्र्याचे नक्षीकाम, वेलबुट्या इ. सजावट दिसू लागली. राजस्थानातील अनेक लहानमोठ्या संस्थानांत चांदीसोन्याच्या पत्र्यांनी मढविलेले तसेच शुभ्र स्फटिकाचे फर्निचर निर्माण होऊ लागले.

हस्तिदंती कलाकुसरीने सजविलेले काळ्या लाकडाचे (बॉम्बे ब्लॅकवूड म्हणून ओळखल्या जाणारे) इंडोपोर्तुगीज फर्निचर गोव्याहून भारतात येत असे. त्याचे काही नमुने लंडनच्या व्हिक्टोरिया अँड आल्बर्ट म्यूझीयममध्ये आहेत. अहमदाबाद, सुरत, मुंबई, गोव्याचा प्रदेश व मद्रास येथील श्रीमंत पारशी आणि इतर व्यापारी वर्गातील लोकांच्या भव्य बंगलेवजा घरांतून हे फर्निचर एक प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून वापरले जाई. त्यासाठी काळे शिसवी, वॉलनट, रोजवूड व मॉहॉगनी या लाकडांचा वापर करण्यात येई आणि त्यांवर अप्रतिम कलाकुसर, देवादिकांची चित्रे इ. कोरण्यात येत असत. हत्ती किंवा सिंह यांच्या पायांचे ठावे असलेले आणि दोन किंवा तीन व्यक्तींना बसण्याजोगे कोच तसेच खुर्च्या, कॉफीपानाची टेबले, विभाजक फलक इ. प्रकार निर्माण होऊ लागले. त्याच्या कारागिरीवरून हे फर्निचर द. भारतात तयार होत असावे, असे दिसते. अशा प्रकारचे पुरातन फर्निचर अनेक प्रतिष्ठित कुटुंबातून सोईस्कर सुधारणा करून हल्लीही वापरण्यात येते. मोठ्या फर्निचर-उत्पादक संस्था व कल्पक कारागीर यांनी या बाबतीत केलेल्या प्रयत्नामुळे पुरातन फर्निचर हेदेखील आधुनिक गृहशोभनाचा एक वैशिष्ट्यपूर्ण घटक ठरले आहे जुन्या फर्निचरमध्ये सुधारणा करून मद्यपानकक्षेचे टेबल, फडताळ किंवा कपाट, खुर्ची यासाठी किंवा फीतध्वनिमुद्रणाचे साहित्य वापरणासाठी त्याचा उपयोग केल्याचे दिसून येते. मोठमोठ्या शहरांतून घरांचा आकार जसजसा लहान होत गेला, तसतसे खोलीतील फर्निचर बदलू लागले. घडीच्या फर्निचरप्रकारांचा उपयोग जागा वाचविण्यासाठी करण्यात येऊ लागला. आधुनिक कुटुंबात जेवणाचे पाट जाऊन त्याच्या जागी जेवणाचे टेबल व खुर्च्या आल्या. सोफासेट बोजड वाटू  लागल्यामुळे त्याची जागा दिवाण किंवा सेटीने घेतली. काही ठिकाणी सोफा-कम-बेड आले. जागा वाचविण्यासाठी भिंतीतील कपाटे, कृत्रिम कोनाडे, खोलीविभाजक फलक इत्यादींचा वापर वाढू लागला.

भारतातील आधुनिक कुटुंबांतून किंवा कंपन्यांच्या अतिथिगृहांतून अथवा मोठ्या उपहारगृहांतून जे फर्निचर दिसते, त्याचे स्वरूप सामान्यतः वास्तुकलेच्या व गृहशोभनाच्या क्षेत्रांतील तज्ञांच्या कल्पनेनुसार ठरते. त्यांतील मुख्य सुशोभनाचा घटक म्हणजे दिवाणखाना किंवा आरामकक्ष होय. भिंतीवर टांगलेल्या वा काढलेल्या निवडक चित्राकृती व इतर शोभायमान विजेच्या दिव्यांची विविध प्रकारची योजना, ⇨ हंड्या व झुंबरे, गालिचे, दिवाण, लोड व तक्के, ब्राँझमूर्ती, दगडी वा मातीचे पुतळे, कलात्मक लाकडी वस्तू इत्यादींनी दिवाणखाना किंवा आरामकक्ष सुशोभित करण्यात येतो. कधी कधी प्लॅस्टिक किंवा तंतुकाच यांचा उपयोग करून तयार केलेले फर्निचर, भिंतीतील कपाटे, व्हिनीयरचे ठेंगणे फर्निचर, काचेच्या पृष्ठभागाचे टेबल, उंची पडदे, फुग्यासारख्या हवा भरलेल्या प्लॅस्टिकच्या खुर्च्या, जमिनीवर ठेवताच खुर्चीचा आकार घेणारी थर्मोकोलच्या गोळ्या भरलेली चामड्याची पिशवी इ. वस्तूंचाही उपयोग करण्यात येतो. कार्यालयीन सभागृहात चिपेंडेल शैलीतील व्हिनीयर फर्निचर वापरण्याकडे कल दिसून येतो. व्हिनीयर प्लायवूड वरच्या दर्शनी बाजूला लावून बनविलेले फर्निचर करण्याची आधुनिक प्रथा दिसते. तसेच ठेंगणे दिवाण, खुर्च्या, टेबले वगैरे करतात. त्यांचाही रंग व्हिनीयर प्लायवूडसारखाच करतात. विशेषतः चिपेंडेलचे भिंतीतील जे कपाट दिसते, ते अशा व्हिनीयर पद्धतीचे असते. चामड्यापासून फर्निचर तयार करण्याचे प्रयोग सांप्रत भारतात होत आहेत. त्यातील निरनिराळ्या फर्निचरवस्तूंचे पोत, रंग व रचना यांचा मेळ साधण्यात येतो. त्यातील सुसंवाद वेधक असतो त्यामुळे प्रत्येक फर्निचरवस्तूला खास वैशिष्ट्य प्राप्त झालेले दिसून येते. चामड्याचे मेजपृष्ठ (टेबल टॉप) आच्छादनसदृश वेधक व गुळगुळीत असते.

वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन फर्निचर : प्राचीन ग्रंथ व शिल्प यांच्या आधारे वैशिष्ट्यपूर्ण अशा काही भारतीय फर्निचरवस्तूंची माहिती पुढे दिलेली आहे.

खजुराहो शिल्प : (९०० ते २५). प्राचीन फर्निचरप्रकारांचे नमुने खजुराहो येथील शिल्पांतूनही आढळतात. त्यांपैकी काहींचे वर्णन पुढीलप्रमाणे करता येईल : त्या काळामध्ये लाकडी घडीचे मेज वापरात असल्याचे दिसते. त्याला परस्परांवर सांधलेले चार पाय असून त्यांवर कधी कधी सुबक व नक्षीदार उठावकाम केलेले असे. मेजाचा पृष्ठभाग म्हणजे एक सपाट फळी होय. तीवर प्रसंगविशेषी वस्त्राच्छादन टाकण्यात येई. मेजाची उंची बेताचीच असल्यामुळे त्याचा उपयोग जमिनीवर बसूनही करण्यात येई. विशेषतः बुद्धिबळ व फासे खेळण्याकडे त्याचा उपयोग होई. ग्रंथ वाचण्यासाठी वा कागदपत्रे ठेवण्याकडेही या मेजाचा वापर करण्यात येई.


तत्कालीन आसनाचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण होते. बैठक व पाठ हे त्याचे दोन घटक असून त्याला आधुनिक खुर्चीप्रमाणे हात वा पाय नसत. मात्र बैठकीवर भरदार गादी टाकीत त्याची पाठ बरीच उंच व मागे कललेची असे. काही आसने बरीच उंच असून त्यांच्या दर्शनी पृष्ठभागावर नक्षीकाम केलेले असे. पुष्कळदा त्यांचा पुढचा भाग किंचित अंतर्वक्र असे. त्यामुळे बसणाराला पाय सोडून ते जमिनीवर टेकविता येत. कित्येक आसनांची पुढची बाजू वर्तुळाकार असल्याचेही आढळते. त्यांची बैठक लाकडी असून त्यावर भर घालून ती जाड करण्यात येई. या आसनावर बसणारी व्यक्ती ‘ललितासन’ वा ‘महाराजासन’ या आसनपद्धतीने विराजमान होई.

खजुराहो-शिल्पांतून सूचित होणारे फर्निचरप्रकार : १. अलंकृत दर्शनी बाजू असलेले उच्चासन, २. कलत्या पाठीचे व भरगच्च गादीचे आसन, ३. मान टेकण्यासाठी काष्ठफलक लावलेली चारपाई, ४. पाय सोडून बसण्याचे अंतर्वक्र आसन, ५. साधारण उंचीचे घडीचे मेज, ६. नक्षीकामयुक्त पातालपादपीठ, ७. तक्तपोशीसदृश काथ्याने विणलेली शय्या, ८. आकर्षक कशिदाकाम केलेल्य अम्‌ऱ्यातील तक्क्या, ९. ‘मोर्रा’ नामक वैशिष्ट्यपूर्ण आसनप्रकार, १०. साध्या चारपाईचा नमुना, ११. उशीसदृश कलता काष्ठफलक असलेला पलंग.

याच आसनाचा एक ‘मोर्रा’ नामक प्रकार वैशिष्ट्यपूर्ण असे. त्याची उंची अधिक असून त्यावर घातलेली गादी चौकटीच्या नक्षीने अथवा वेलबुटीदार आकृतिबंधाने सजविलेली असे. याच पद्धतीच्या आसनांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा आकार उभट गोल पण डमरूप्रमाणे मध्ये निमुळता असे. हे आसन बहुधा वेत किंवा वेळू यांपासून तयार करण्यात येत असावे, असे तज्ञांचे मत आहे. त्याचे साम्य कालिदासकालीन वेत्रासनाशी जुळते.

तत्कालीन तक्तपोशी या प्रायः भक्कम लाकडी असून चार लाकडी पायांवर लांबरुंद फळ्या ठोकून केलेल्या असत. कधी कधी त्या आधुनिक खाटेसारख्या काथ्यानेही विणण्यात येत. कित्येकांना डोक्याकडील भागास एक उभट मागे झुकलेली फळी असे तर काहींना लहान आकाराची, परंतु भर घालून भक्कम व जाड केलेली अर्धवर्तुळाकार उशीवजा फळी लावलेली असे.

तत्कालीन समाजात पातालपादपीठ किंवा पायदान ही एक महत्त्वाची बाजू मानली जाई. थोर विभूतींसाठी बहुधा कमलाकार पातालपादपीठाचा वापर करण्यात येई. ही पादपीठे प्रायः गोलाकार, उंच व नक्षीयुक्त असत. त्यांचा पृष्ठभाग मऊ असे.

यावरून त्या काळात लाकडी वस्तूंचे निर्मितितंत्र विकसित झालेले दिसते. तक्षणादी कलाही प्रगत अवस्थेत होत्या. त्यामुळे मेज, आसने, मंचन, तक्तपोशी यांच्या विविध शैली व आकारप्रकार दिसून येतात. त्यांवरील कोरीवकाम, कातीवकाम, खाचकाम, जडावकाम व झिलई या सर्वच घटकांतून वेधक कलात्मकता आढळून येते.

वात्स्यायनाचे कामसूत्र : (इ. स.पहिले वा तिसरे-चौथे शतक). या ग्रंथातील साधारण अधिकरणांतर्गत नागरवृत्तप्रकरणनामक चतुर्थ अध्यायातील उल्लेखानुसार त्या काळी घराच्या बाह्य दालनात दोन पलंग ठेवण्याची एक प्रथा असल्याचे दिसून येते. त्यांपैकी एकावर पांढरी शुभ्र चादर घातलेली मऊ गादी आणि वरील बाजूस कलात्मक विणकाम केलेले कापडाचे छत लावण्यात येई. उशा-पायथ्याशी तक्के ठेवण्यात येत. या मुख्य पलंगाच्या बाजूलाच दुसरा एक पलंग ठेवण्यात येई. तो त्याहून किंचित ठेंगणा असे. त्याचा वापर प्रामुख्याने रतिक्रीडेसाठी करण्यात येई. या पलंगाच्या उशाकडील बाजूस पलंगाच्या उंचीची एक वेदिका असे. त्यात चंदनी उटीसदृश विलेपने, पुष्पमाळादी सौंदर्यप्रसाधने, अत्तरांसारख्या सुगंधी द्रव्यांची पात्रे, मातुलंग (महाळुंग) वृक्षाची साल, तांबुलभोगार्थ विडे व प्रकाशासाठी मेणबत्ती इ. वस्तू ठेवण्यात येत व बाजूला जमिनीवर पिकदाणी असे.

बृहत्‌संहिता : (इ. स. सहावे शतक). प्राचीनकाळी पलंगांसाठी प्रायः असन (असाणा), स्यंदन (तिवस), हरिद्र (दारुहळद), देवदार, चंदन व शाल (साल) इ. वृक्षांचे लाकूड वापरण्यात येई. यासंबंधीचे काही विविधनिषेध बृहत्‌संहितेत दिलेले आढळतात. उदा., उन्मलून पडलेल्या, हत्तीने उपटलेल्या, फुलाफळांनी डवरलेल्या, तडिताघाताने तुटलेल्या वा शुष्क वेलींनी वेढलेल्या वृक्षांचे अथवा चैत्यगृहातून वा स्मशानातून आणलेले लाकूड निषिद्ध मानण्यात येई. चंदनकाष्ठ मात्र सर्वांत मंगलदायी समजले जाई. त्याच्याशी शिंशप (शिस्), तिंदुक (टेंबुर्णी), देवदार व असन (असाणा) या वृक्षांच्या लाकडाचा संयोग घडवून आणणे अभद्र मानण्यात येई. पलंगाचे पाय हे शुद्ध व बिनगाठीच्या लाकडाचेच असावे, असा त्याकाळी संकेत होता. पलंगावर हस्तिदंती जडावकाम केलेले असेल, तर अधिकच उचित मानले जाई. शुक-सारिकांचे लाकडी पिंजरे (प्रकोष्ठ) त्याकाळी प्रचलित होते. हे पिंजरे शयनकक्षांत ठेवले जात.

बाणभट्टाची कादंबरी : (इ. स. सातवे शतक). यात कुसुमदामदोल्याचे म्हणजे बागेतील झोपाळ्याचे वा झूल्याचे वर्णन आढळते. त्यामधून नादमधुर किंकिणींचा मंजुळध्वनी निर्माण होई. कृष्णजन्मोत्सवात अशा पुष्पदोल्याचा वापर मथुरेसारख्या क्षेत्रात आजही करण्यात येतो.

समरांगणसूत्रधार : (इ. स. अकरावे शतक). या भारतीय वास्तुशास्त्रावरील राजा भोजदेवविरचित संस्कृत ग्रंथातील शयनासनलक्षणनामक २९ व्या अध्यायात शय्या (पलंग), आसन इत्यादींच्या बनावटीचे वर्णन असून त्यातून तत्कालीन काष्ठतक्षणकलेचे वैशिष्ट्य दिसून येते. उदा., राजमंचकाचे उत्तम, मध्यम व कनिष्ठ असे तीन भेद असून त्यांची उंची अनुक्रमे १०८ अंगुले (१·८२ मीटर), १०४ अंगुले (१·७६ मीटर) व १०० अंगुले (१·६९ मीटर) असावी. तत्कालीन संकेताचे वर्णनही ग्रंथकाराने केलेले आढळते. उदा., एकाच प्रकारच्या लाकडाचा (एकद्रव्यजा) पलंग हा शुभ, तर दोन प्रकारच्या (द्विदारु-घटिता) व तीन प्रकारच्या लाकडाचा (त्रिदारु-घटिता) पलंग अशुभ मानला जाई. पलंगाला सुवर्ण, रौप्य व हस्तिदंती जडावकामाने सुशोभित करण्यात येई. तत्कालीन प्रगत काष्ठशिल्पनाची साक्ष पलंगांप्रमाणेच आसन, कंकत (कंगवा), दर्वी (पळी), पादुका, मंजुषा, पंजर (पिंजरा), नीड (रथावरील सारथ्याची बैठक), यान (एक प्रकारचे वाहन), चटु (आराधनेसाठी वापरावयाचे आसन), दीप व मार्गदीप-स्तंभ अशा तत्कालीन घरगुती वस्तूंच्या नक्षीयुक्त व कुशल बनावटीवरून पटू शकते.


युक्तिकल्पतरु : या ग्रंथातही राजा भोजदेवाने आसनप्रकार आणि पीठप्रकार यांची सर्वांगीण माहिती दिलेली आहे. त्यात सिंहासन (राजासाठी) व खाट किंवा खट्ट (सर्वसामान्यांसाठी) असे आसनांचे दोन प्रकार सांगितले असून सिंहासनाचेही पद्म, शंख, गज, हंस, सिंह, भृंग, मृग व हय असे आठ प्रकार वर्णिले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या वापरासाठी तयार करण्यात येणाऱ्या खाटेला आठ काष्ठखंड, चार पाय व उशीसदृश उंच भाग असे. या खाटांवर शोभिवंत कोरीवकाम केलेले असून त्यांच्या लांबीरुंदीवरून व बनावटीनुरूप त्यांना सर्वरोगक्षयंकरी, सर्वकामार्थदायिनी वा संपत्तिदायक अशी नावे दिलेली असत.

त्याकाळी धातू, दगड किंवा लाकूड या माध्यमांच्या साह्याने पीठ तयार करण्यात येत असल्याचे दिसते. सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या पीठांची लांबी दोन हात असून रुंदी व उंची लांबीच्या निम्मी म्हणजे एक हात ठेवण्यात येई. अशा पीठाला सुखपीठ म्हणत. हे सुखपीठ प्रामुख्याने चंदनी लाकडाचे तयार केलेले असे व ते सर्वसिद्धीकर मानण्यात येई. पीठाला भोके नसावीत, ते जड नसावे तसेच त्याचा पृष्ठभाग उंचसखल नसावा, ते शास्त्रोक्त पद्धतीनेच तयार केलेले असावे इ. दंडक त्याकाळी होते. यांखेरीज अन्य काष्ठपीठांना सिद्धिपीठ, जारकपीठ, जयपीठ अशी नावे होती, त्यांचे प्रयोजनही वेगवेगळे असे. उदा., सुखसंपत्तीप्राप्ती, रोगनाश वा शत्रुनाश इत्यादी. ही काष्ठपीठे तयार करताना विशिष्ट झाडांच्याच लाकडाचा वापर करण्याची प्रथा होती उदा., सुगंधी पुष्पयुक्त वृक्ष किंवा सागवान, फणस यांसारखी मजबूत काष्ठांची झाडे. ठिसूळ लाकडाचे पीठ निषिद्ध मानले जाई.

धातुपीठांसाठी तांबे, चांदी, लोखंड, कासे इ. धातू वापरले जात. प्रत्येक पीठाचा हेतू व फलश्रुती ही वेगळी असत. वैदूर्य, स्फटिक वा नील इ. रत्नांपासून शिलापीठ तयार केले जाई. त्यास राजपीठ म्हणत. उत्सवाच्या वेळी राजा प्रायः अयस्कान्तक मण्यापासून तयार केलेल्या पीठाचा वापर करी. विजयप्राप्तीसाठीही या पीठाचा वापर केला जाई तर क्रीडासमयी केलिपीठाचा वापर करावा, असा संकेत होता. सर्वसामान्य लोकांच्या पीठाला अंगपीठ म्हणत.

मानसोल्लास : (इ. स. ११२९). चालुक्यवंशीय तिसऱ्या सोमेश्वर राजाने रचलेल्या प्रस्तुत संस्कृत ग्रंथात आसने व मंच यांचे विविध प्रकार आणि त्यांचा उपयोग याविषयीचे वर्णन केलेले आढळते. त्या काळापर्यंत भारतीय संस्कृतीवर मुसलमानी संस्कृतीचा प्रभाव पडला नसल्यामुळे या ग्रंथातील वर्णन परंपरागत भारतीय फर्निचरचे शुद्ध स्वरूप लक्षात घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. प्रस्तुत ग्रंथात आसनाचे विविध प्रकार सांगितले आहेत. उदा., मंगलासन, पवित्रासन, मज्जनासन, सुखासन, पट्टगद्दिकासन, भूशय्यासन, लौहासन, धारासन आणि सिंहासन. यांपैकी काही आसनांचे स्वरूप कालिकापुराणांतील (सु. दहावे शतक) आसनांशी मिळतेजुळते आढळते. तथापि काही आसने मात्र वैशिष्ट्यपूर्ण असलेली दिसून येतात. बहुतेक आसने चंपक (चाफा), आम्र (आंबा), मधूक (मोह), पनस (फणस), श्रीपर्णी, दारु (देवदार) व औदुंबर या वृक्षांच्या लाकडापासून तयार करण्यात येत तर लौहासन हे लोखंडापासून व सुखासनादी आसने ही विटा रचून ओट्याप्रमाणे तयार करण्यात येत असल्याचा उल्लेख आढळतो. त्यांचा आकार-प्रकार व वापर यांतही विविधता असे उदा., मंगलासन हे अत्यंत विशाल आकाराचे, चार पायांचे व सुवर्णाप्रमाणे शोभायमान केलेले असे तर सुखासन, पट्टगद्दिकासन व मूशय्यासन ही आसने विटा रचून तयार केलेली असून त्यांचा पृष्ठभाग अत्यंत स्वच्छ, गुळगुळीत पारदर्शक व जडावकामयुक्त असे. त्यावर रुईची गादी घालण्यात येई. पट्टगद्दिकासनावर मात्र लाल रंगाचे चर्माच्छादन वा विविधरंगी आवरण घातलेले असे. ते अधिक शोभिवंत दिसे. भूशय्यासन हे पट्टगद्दिकासनावरच हंसपिसांचे आच्छादन घालून ते पांढऱ्या वस्त्रफितींनी बांधण्यात येई. हे आसन बरेच विस्तृत असून त्याचा वापर प्रायः संगीतसभा, सुखसंवाद-चर्चा वा मनोविनोदन यांसारख्या प्रसंगी करण्यात येई. साधारणतः पवित्रासन, मज्जनासन व धारासन ही देवदारादींच्या लाकडापासून बनविलेली असत. चार पायांच्या या आसनांची उंची सारखीच असे. धारासन मात्र इतरांच्या तुलनेने अधिक उंच असे तर लौहासनाला पाच, सात वा नऊ असे पाय असत. त्यावर गादी घालण्यात येई.

मंचाचेही अनेक प्रकार प्रस्तुत ग्रंथात वर्णिले आहेत. ते असे : दन्ताघ्रिमंच, लौहमंच, चतुष्पदमंच, वरमंच, बलमंच, वेत्रमंच, पट्टिकामंच व दोलामंच. यांपैकी दन्ताघ्रिमंचाचे पाय व पृष्टभागही हस्तिदंताचाच असे. चतुष्पादमंच हा सुवर्णापासून बनविलेला असून त्याला वस्तुतः आठ पाय असत. वरमंचाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून सुमधुर नाद निर्माण होत. त्याचा वापर प्रायः प्रणयी युगुलाकडूनच केला जाई. बलमंचालाच ‘लवमंच’ असेही म्हणत. त्यावर बसले की आधुनिक स्प्रिंगच्या वा स्पंजच्या खुर्चीप्रमाणे तो खालीवर होई. वेत्रमंच हा वेतांचा असून त्याचे पाय वक्राकार असत. पट्टिकामंच हा विविध रंगांच्या कापडी पट्ट्यांनी विणीत व त्यासाठी कापसाचाही वापर करीत. दोलामंच हा एक प्रकारचा हिंदोळाच असे. चंदन वा देवदारादी काष्ठांचा हा मंच रत्नजडित असून सोनसाखळीने तो टांगण्यात येई आणि त्यावर कमलपुष्प वा कमलकेसरांची शय्या सजविलेली असे. शरद ऋतूतील क्रीडांसाठी या दोलामंचाचा राजेलोक वापर करीत.

प्रादेशिक फर्निचरनिर्मितीचे विशेष : काश्मीरमध्ये परंपरागत पद्धतीने देवदार व वॉलनट यांच्या मऊ लाकाडापासून घरगुती वस्तूंची निर्मिती करण्यात येते. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने विविध प्रकारची बोळकी, तबके, चित्रचौकटी, कपाटे, आडोशीपट, मेजपृष्ठे, दीपाधार व फुलदाण्या इत्यादींचा समावेश होतो. या सर्वच वस्तूंवर सूक्ष्म पण मोहक स्वरूपाचे कोरीव नक्षीकाम केलेले असते. कधी कधी या काष्ठवस्तूंवर लाखेचे चारपाच थर देऊन छिन्नीच्या साहाय्याने त्यांवर बुलबुलादी पक्ष्यांचे व गुलाबासारख्या फुलांचे आकृतिबंध काढले जातात.

हिमाचल प्रदेशातील परंपरागत फर्निचरप्रकारात पाण्याची भांडी, लहानमोठी बोळकी, धान्याच्या आडींचा समावेश होतो. यांचे घाटदार आकार, त्यावरील भौमितिक तसेच वेलबुटीचे व पुष्पमाळांचे आकृतिबंध वैशिष्ट्यपूर्ण असतात.

पंजाबमधील पारंपरिक फर्निचर वेलबुटीदार नक्षी तसेच इतर भौमितिक आकृतिबंध यांनी सजविलेले असते. संकल्पित वस्तूंच्या वेगवगळ्या अलग तुकड्यांवर हे नक्षीकाम आधी केले जाते व नंतर ते भाग एकसंध केले जातात. होशियारपूर, जलंदर, अमृतसर, भेडा ही पंजाबी फर्निचरनिर्मितीची केंद्रे प्रसिद्ध आहेत. होशियारपूरचे लाकडी वस्तूवरील जडावकाम तर पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. पूर्वी हस्तिदंताऐवजी जुनाट पियानोच्या स्वरपट्ट्या व अलीकडे प्लॅस्टिकचे तुकडे या कामी वापरण्यात येतात. या फर्निचरप्रकारात प्रायः मेजपृष्ठे, टीपॉय, तबके, मेजाचे पाय, आडोशीपट, बोळकी इत्यादींचा समावेश होतो. अमृतसर व जलंदर येथे लाकडी फर्निचरवर पारंपरिक स्वरूपाचे लाखकामही केले जाते. त्यांपैकी पलंगाचे पाय व दिवाण तसेच जांभळ्या रंगाची नक्षीदार कपाटेही प्रसिद्ध आहेत.

उत्तर प्रदेशातील पारंपरिक फर्निचर नाजुक तक्षणकामासाठी प्रसिद्ध आहे. बहुधा एबनी लाकडाचा वापर त्यासाठी केला जातो. विविध प्रकारच्या पेट्याही येथे तयार करण्यात येतात. उत्तर प्रदेशातील अलीगढ, लखनौ, गाझीपूर व मथुरा ही केंद्रे लाकडी वस्तूंच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत. मैनपुरी येथे पूर्वी लाकडावर तारकशीकाम करण्यात येई. विशेषतः कलमदाने, खडावा, पेट्या इ. वस्तू तारकशीने अलंकृत करण्यात येत. नगीना गावी होणारे मेज, खुर्च्या, पेट्या इ. फर्निचर खोदकामासाठी प्रसिद्ध होते.


आसामातील नामघर किंवा किर्तनघर (देव्हारा) वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे नामघर आकाराने बरेच मोठे असून त्यात साधकासाठी एक सिंहासनसदृश पण मयूराकार अशी लाकडी बैठक असते. तिला तीन ते नऊ टप्पे असून त्या टप्प्यांना सिंहाकृती लाकडी ठोकळ्यांनी आधार दिलेला असतो. कधी कधी खालच्या टप्प्याला हत्तीच्या व तळाच्या टप्प्याला कासवाचा आकार देण्यात येतो. याशिवाय घरातील वापरासाठी केलेल्या सुवाह्य लहान बैठकी, मेज, आसने व ग्रंथाळे (बुक रेस्टस), कपाटे, हुक्के इ. वस्तूही वैशिष्ट्यपूर्ण असतात.

बिहारमधील फर्निचर व काष्ठवस्तू या लाखेचे पाणी दिलेल्या असून त्यांवर परंपरागत शैलीने तक्षण केलेले असते. त्यांपैकी ‘सिंदूरदान’ पेटी विशेष उल्लेखनीय आहे.

गुजरातमधील तक्षणयुक्त मेज म्हणजे पौर्वात्य व पाश्चिमात्य शैलींच्या संमिश्रणाचा एक उत्कृष्ट नमुना होय. त्यावर कमळ, पोपट, मयूर, हंस आदींचे आकृतिबंध असून त्यांतून अनेक प्रकारची नक्षी व घाट साधलेले असतात. शिवाय नवखणांचे ‘नवखणिया’ व तीन खणांचे ‘त्रणखणिया’ कपाट ही गुजराती फर्निचरची खास वैशिष्ट्ये होत. पिंजऱ्यावर विलोभनीय वेलबुटीदार नक्षी व पक्ष्यांचे आकृतिबंध कोरलेले असतात. झुल्यावरील नक्षीयुक्त आकृतिबंध, त्याचा घाटदार आकार व त्यावर केलेले ⇨ संखेडाकाम हे गुजराती फर्निचर शैलीचे खरेखुरे प्रतीक होय. संखेडाकामात लाकडावर प्रथम वर्खाचा थर देऊन नंतर त्यावर लाखेचा थर देण्यात येतो. सुरत येथील ‘सादडी’ कामात मात्र लाकडी वस्तूवर कुट्टिमचित्रसदृश परिणाम साधण्यात येतो. त्यावर हस्तिदंत, विविधरंगी लाकूड वा तत्सदृश अन्य माध्यमांचा वापर करण्यात येतो. यांखेरीज लाकडावर पितळी पट्ट्या ठोकूनही फर्निचर अलंकृत करण्यात येते. कधी कधी पट्ट्यांऐवजी पितळी गोलाकार तुकड्यांचाही वापर होतो. राजस्थानातील भावनगर हे मोठ्या कपाटासाठी प्रसिद्ध आहे. त्याला तेथे ‘पात्र’ म्हणतात. नववधूसोबत दहेज म्हणून हे पात्र तिला देण्यात येते. ते टिकावू व आकर्षक असते. त्यासाठी विविध प्रकारच्या पत्र्यांचा वापर करण्यात येतो. जुनागढ व धोराजी ही गावे स्टँडच्या झोपाळ्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच शयनकक्षेतील फडताळ व लग्नसमारंभप्रसंगीचे रंगीत ‘पीठ’ (बोहले) व ‘सिंदूर पेटी’ ही राजस्थानातील फर्निचरची खास वैशिष्ट्ये समजली जातात.

तमिळनाडूमधील डोक्यावर वाहून नेण्याजोगे छोटे देव्हारे, मेजपृष्ठे इ. पारंपरिक निर्मिती वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे लाकडी सामान प्रायः कृष्णवर्णीय एबनी लाकडाचे असते. मात्र कधी कधी रोजवूडचाही वापर करण्यात येतो. देव्हाऱ्यावर ठसठशीत नक्षीसंपन्न विविध आकृत्या असतात. ते आकाराने लहान, सुबक व आकर्षक असतात. त्यांचा वापर अलीकडे भिंतीवर टांगण्यासाठीही करण्यात येतो. मेजपृष्ठावर वेलबुटीदार नक्षी वा पोपटासारख्या पक्ष्यांच्या प्रतिकृती उठविण्याची प्रथा आहे. कधी कधी काव्यात्म प्रत्यय देणारी निसर्गदृश्येही कोरण्यात येतात. हे संपूर्ण मेजपृष्ठच एखाद्या लाकडी हत्तीच्या पाठीवर वा डोक्यावर देऊन हत्तीचे संपूर्ण शरीर अलंकृत करण्याचीही प्रथा येथे आहे. त्या हत्तीभोवती लहान लहान हत्तींनी फेर धरल्याचेही दृश्य उभे करण्यात येते तर मोठ्या हत्तीने आपल्या सोंडेने दिवा धरलेला असतो. हत्तीप्रमाणेच नागही कोरण्यात येतो.

कर्नाटकात पारंपरिक फर्निचरसाठी रक्तचंदनाचा वापर करण्यात येतो. त्यांवरील तांबूस चकाकीमुळे वस्तू वेधक दिसते. मूळ लाकडी वर्णच्छटेला धरून कधी कधी हस्तिदंती जडावकामही करण्यात येते. तसेच रंगीत दृश्येही चितारण्यात येतात. उदा., मेंढ्यांचा कळप व मेंढपाळ, फुलमाळीण, पाणी भरणारी स्त्री, पक्ष्यांचे थवे व वृक्षलता इत्यादी. काही वस्तूंवर लाखेचा थर देऊन त्यांवर नागमोडी रेषा व ‘दाणा’ पद्धतीची नक्षी चितारण्यात येते. त्यामुळे त्या काष्ठवस्तू फारच लोभस वाटतात.

आंध्र प्रदेशात तांबूस रंगाच्या लाकडापासून नाजुक चित्रचौकटी, काष्ठमंजुषा इ. वस्तू तयार करण्यात येतात. येथील निर्मळ गावचे फर्निचर उत्कृष्ट असते. हे फर्निचरनिर्मितीचे मोठे केंद्र असून तेथील फर्निचरची विशिष्ट शैली, त्याचा आकार-प्रकार, रंगलेपन, परंपरागत स्वरूप व नाजुकपणा इ. वैशिष्ट्यांमुळे ते वेधक व आकर्षक ठरते. त्यात प्रामुख्याने पेट्या, तबके व खुर्च्या-टेबले इत्यादींचा अंतर्भाव होतो.


१. रंगीत लाकडी पेटी, ओरिसा २. आधुनिक लाकडी उच्चासनाचा एक नमुना ३. अलंकृत चौरंग ४. आधुनिक कपाट ५. हस्तिदंती जडावकामयुक्त लाकडी मंजुषा, १७ वे शतक ६. गौरा झोपाळा ७. आदिवासीची खुर्ची ८. पक्ष्यांचे लाकडी पिंजरे, किशनगढ शैलीतील चित्राधारे ९. डाबला : नववधूच्या दागिन्यांचा लाकडी डबा, काठेवाड १०. झोपाळा, संखेडाकाम, गुजरात ११. तिपई १२. अँग्लो-इंडियन फर्निचरवस्तूतील जाळीदार नक्षी. 


महाराष्ट्रातील सावंतवाडीचे चौरंग, पाट, पोथीवरील फळ्या, कपाटे, टेबले, खुर्च्या इ. वस्तू वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्या आसावर कातून त्यांची कलाकुसर वाढविण्यात येते, तसेच त्यांवर लाखेचा रंगलेप देऊन त्यांचे सौंदर्यवर्धन करण्यात येते. हे लाखेचे रंगलेपन करण्यापूर्वी लाकूड तापवून व मग त्यावर पारदर्शक लाख ठेवून ती वितळली की सारखी करावी लागते. कल्याण व पेण येथील घरातील झोपाळे व आषाढ-श्रावणात अंगणात लावावयाच्या ‘पाट्या’ आणि पाळणेही प्रसिद्ध आहेत. ब्रिटिशकाळात नागपूरचा उत्कृष्ट कोरीवकाम असलेला लाकडी आडोशीपट म्हणजे एक प्रदर्शनीय वस्तू समजण्यात येई.

जोशी, चंद्रहास अंधारे, श्री. कृ.

फर्निचर उत्पादन : एकोणिसाव्या शतकापर्यंत फर्निचर तयार करण्याचा धंदा व्यक्तिनिष्ठ होता. प्रत्येक कारागीर किंवा कारागिरांचा लहानसा गट स्वतंत्रपणे आपला कारखाना काढत असे. ह्या पद्धतीत कारागिराला आपले व्यक्तिगत कौशल्य दाखविता येत असे व आपल्या कलाकृतीचा त्याला अभिमान वाटत असे. उत्तम साहित्य, उत्तम रचना व कौशल्य यांमुळे अंतिम फर्निचर घटक उत्कृष्ट तयार करण्याची प्रथा होती. चौदाव्या शतकापर्यंत ख्रिस्ती धर्मपीठांमध्ये फर्निचर करण्याचे कारखाने होते व कारागिरांना तेथे प्रशिक्षणही देत असत. चौदाव्या शतकानंतर धर्मगुरूंचे महत्त्व कमी होऊन व्यापारी व इतर श्रीमंत लोकांचा जनमानसावर प्रभाव पडू लागला. फर्निचरची मागणी वाढू लागल्यामुळे फर्निचर धंद्याला ऊर्जितावस्था आली. व्यवसायानुसार कारागिरांच्या ‘गिल्ड्स’ (संघटना) अस्तित्वात आल्या. विशिष्ट धंदा करावयास कारागिराला संघटनेचा सभासद असावे लागे. मंजुषाकारांच्या गिल्डचा सभासद होण्यास सहा वर्षे उमेदवारी व त्यानंतर तीन वर्षे श्रेष्ठ कारागिराबरोबर काम करावे लागे. अशा ९ वर्षानंतर तो कारागीर गिल्डचा सभासद होण्यास पात्र होत असे. जबर प्रवेश शुल्क भरण्याची क्षमता असल्यास व त्या वेळी संघटनेत जागा रिकामी असल्यास कारागिराला सभासद होता येत असे व मग त्याला श्रेष्ठ कारागीर म्हणून समजत असत. श्रेष्ठ कारागिरासच स्वतंत्रपणे कारखाना काढता येत असे. या शिक्षण पद्धतीतून उत्कृष्ट कौशल्य असलेले कारागीर तयार होत असत. गिल्डची पद्धत फ्रेंच राज्यक्रांतीपर्यंत अस्तित्वात होती. सोळाव्या शतकात फर्निचरची मागणी वाढल्याने फर्निचर व्यवसायात सुविविध कामे करण्याकरिता सुतार, जोडकाम्या, मंजुषाकार असे वेगवेगळे कारागिरांचे गट निर्माण झाले. पुढे सतराव्या शतकात खुर्च्या तयार करणाऱ्या कारागिरांचा स्वतंत्र गट निर्माण झाला. त्याशिवाय सुशोभनाच्या कामातही कोरीवकाम, मीनाकाम, मार्किट्री काम, व्हिनीयर काम करणारे असे विविध स्वतंत्र गट होते. फर्निचरमधील कातीव भाग करणाऱ्यांचाही स्वतंत्र गट असे. प्रत्येक गटाने आपापल्या कामात विशिष्ट कौशल्य मिळविलेले असे. तत्कालीन वास्तुशिल्पज्ञ, चित्रकार यांच्या देखरेखीखाली विविध शैली अस्तित्वात येत असत.

सुशोभनात धातूंची आरोपणे – विशेषतः ब्राँझची (काशाची)-वापरत असत. या कामाकरिता निराळे कारखाने होते. प्रथम शिल्पी कारागीर लाकडाची किंवा मेणाची आरोपणाची फर्मा-प्रतिकृती तयार करीत असे. फर्म्यावरून मातीचा ठसा करून वितळविलेले ब्राँझ ओतून आरोपण तयार होत असे. विविध हत्यारे वापरून आरोपणाचे अंतिम स्वरूप साकार करीत असत. मुलामा देण्याकरिता सोने व पारा यांच्या पारदमेलाचा (पाऱ्यातील सोन्याच्या विद्रावाचा) पातळ थर, मुलामा पाहिजे असलेल्या आरोपणाच्या पृष्ठभागावर देत असत. आरोपण तापविल्यावर पारदमेलामधील पारा उडून जातो व पृष्ठभागावर सोन्याचा मुलामा तयार होतो. मुलाम्याचे अंतिम रूप चकाकीविरहित किंवा चकाकीयुक्त करीत असत.

फर्निचरला अंतिम रूप देण्यापूर्वी सर्व पृष्ठभाग घासकागदाने घासून गुळगुळीत करावे लागतात. तैलरंग किंवा लाखसदृश रंग, व्हार्निश इ. देणारे कारागीर, गादीकाम करणारे कारागीर असे विविध गट असत.

एकोणिसाव्या शतकात फर्निचर धंद्यात उत्पादक म्हणजे फर्निचर तयार करणारे व विक्रेते म्हणजे फर्निचर विकणारे दोन स्वतंत्र गट तयार झाले. यामुळे ग्राहक व उत्पादक यांचा प्रत्यक्ष संबंध तुटला. विक्रेता आपल्या दुकानात फर्निचरची चित्रे, सूची व प्रत्यक्ष नमुने ठेवत असे. त्यातून ग्राहकाला निवड करावी लागे. यात ग्राहकाच्या स्वतःच्या आवडीनिवडीला फारसा वाव नसतो. थोडाफार फरक करण्याकरिता विक्रेता दुकानाशेजारी व्यवस्था करीत असे. फर्निचर मोठ्या प्रमाणावर उत्पादित केल्यामुळे ते स्वस्त किंमतीस देता येऊ लागले.

फर्निचर तयार करताना प्रथमतः लाकडाची निवड करावी लागते. हवामानातील बदलामुळे नैसर्गिक लाकडाचे मोठे पृष्ठभाग विकृत होतात, तसेच फर्निचरच्या सांध्यांमध्ये फटी पडतात. उत्तम रापविलेले लाकूड वापरल्यास विकृती कमी होते. उत्तम कारागीर फर्निचर घटक विकृत होऊ नये म्हणून घटकाची रचना व जुळणी कौशल्याने करीत असे. आधुनिक काळातील स्तरीय वा पत्रित लाकडाचा उपयोग केल्यास विकृती निर्माण होण्याचा धोका नसतो. तसेच दाबयंत्रात त्यांना जरूर ते त्रिमितीय आकार देता येतात. फर्निचरचे कारखाने बहुधा लहान असतात. त्यामुळे फर्निचरला लागणाऱ्या आकाराचे व रापविलेले लाकडाचे नग बाहेरून घ्यावे लागतात परंतु मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणाऱ्या कारखान्यात ओंडक्यापासून आवश्यक ते आकार कापणे आणि त्यानंतर रापविणे याकरिता स्वतंत्र विभाग असतो. लाकडात रेडिओ कंप्रतेची (दर सेकंदाला सु. १० ते १० आवर्तने होणारी) कंपने निर्माण करून ते तापविण्याच्या आधुनिक तंत्रानुसार रापविण्याची क्रिया थोड्या वेळात व उत्तम दर्जाची होते.

पुढील टप्प्यात निवडलेल्या लाकडाचे यंत्रण करावे लागते. कापलेल्या लाकडाचा पृष्ठभाग गुळगुळीत करण्याकरिता रंधा वापरतात. लाकडाचे भाग रंधून झाल्यावर फर्निचर घटकाचा सांगाडा तयार करण्याकरता सांधे करावे लागतात. कुसूविंधी, आंगठी किंवा सुरशी रचना सांध्याकरिता वापरतात. हाताने काम करीत असत त्या वेळी कुसूविंधी सांधा वापरत असत. विविध यंत्रे उपलब्ध झाल्यावर आंगठी व विशेषतः सुरशी सांधे वापरू लागले आहेत. कारण यंत्रावर या सांध्यांची पूर्वतयारी करावयास सोपे पडते. फर्निचरमधील खुर्ची ह्या घटकात दोन भागांमधील कोन विषम किंवा संयुक्त असतात. तसेच खुर्ची वापरताना सांध्यावर येणारी प्रेरणा जास्त असते. खुर्चीचे मागचे पाय बाकदार असतात. पायांचा वक्र एका प्रतलात किंवा दोन प्रतलांत असू शकतो. असे पाय मोठया आकारमानाच्या लाकडातून हाताने तयार करावे लागलात परंतु एका प्रतलातीत बाक असल्यास प्रतिरूपक (नमुन्यानुसार प्रती तयार करणाऱ्या) यंत्रावर करता येतात. एकोणिसाव्या शतकात फर्निचर उत्पादनात यंत्रांचा उपयोग सुरू झाला त्या वेळी मंजुषाकार सर्व प्रकारची यंत्रे आपल्या कारखान्यात ठेवत नसत. यंत्रण करण्याचे कारखाने निराळे असत. प्रत्येक जण आपापले लाकडाचे भाग रंधून व सांध्यांची पूर्व तयारी यंत्रावर करून आणत असे. जोडण्याचे व अंतिम रूप देण्याचे काम मंजुषाकार आपल्या कारखान्यात करीत असत. आधुनिक मोठ्या कारखान्यांत खास यंत्रण विभाग असतो.


विविध भाग यंत्रण विभागातून जुळणी विभागाकडे जातात. मंजुषाकार सर्व भाग जोडून सांगाडा तयार करतो. सांधा पक्का होण्याकरिता सरस किंवा संश्लिष्ट (कृत्रिम रीतीने तयार केलेला) आसंजक (चिकटवून जोडण्याचे कार्य करणारा पदार्थ) वापरतात. मोठ्या कारखान्यात जुळणी विभागात वाहक (विविध भाग वाहून नेणाऱ्या) साधनावर जुळणी केली जाते. जमिनीवरील आधारावर सहज फिरणारे रूळ बसविलेले असतात. वाहक स्थिर ठेवून फर्निचर घटक जसजसा जोडला जातो तसतसा रुळावर पुढे ढकलला जातो. संश्लिष्ट आसंजके फारच थोड्या वेळात पक्की होत असल्यामुळे एक सांधा पूर्ण होऊन दुसऱ्या सांध्यांकरिता फर्निचर घटक पुढे जाईपर्यंत लागणारा वेळ आसंजक पक्का होण्यास पुरतो. सांधे पूर्ण झाल्यावर सांध्याच्या ठिकाणी यंत्रण जरूर असल्यास यंत्रण विभागाकडे फर्निचर घटक परत जातो किंवा सुवाह्य यंत्रांच्या साहाय्याने हे काम पूर्ण केले जाते.

सुशोभनातील काही कामे फर्निचर घटक जोडण्याच्या आधी करावी लागतात व काही कामे नंतर करता येतात. व्हिनीयर काम करावयाचे असल्यास ते जोडणीच्या आधी करावे लागते. चांगल्या लाकडाच्या पातळ चादरी काढून हलक्या लाकडाच्या सांगाड्यावर चिकटवतात. त्यामुळे उच्च प्रतीच्या लाकडासारखी शोभा येते. व्हिनीयर करावयाच्या पृष्ठभागावर आसंजक लावून त्यावर व्हिनीयर चादर बसवितात. आसंजक पक्का होईपर्यंत जोडावयाचे भाग दाबाखाली ठेवावे लागतात. आधुनिक कारखान्यात दाबयंत्राच्या एका बाजूस भागाला आसंजक लावण्याची यंत्रणा असते. जोडावयाचा भाग दाबयंत्राखाली आपोआप सरकतो. दाबयंत्राखाली असताना रेडिओ कंप्रता तापन तंत्राने आसंजक पक्का केला जातो. थोड्याच वेळात व्हिनीयर पूर्ण झालेला भाग दाबयंत्राच्या दुसऱ्या बाजूस बाहेर पडतो. सौंदर्यदृष्ट्या विविध रंगांच्या अरुंद व्हिनीयर पट्ट्या लागत असल्यास काचतंतूने शिवण्याचे यंत्र उपलब्ध झालेले आहे. ह्या यंत्रावर व्हिनीयर पट्टीच्या निम्म्या जाडीतून शिवले जाते त्यामुळे बाहेरून शिवण दिसत नाही. आवश्यक तितकी रुंदी झाल्यावर पूर्वी दिल्याप्रमाणे व्हिनीयर चिकटवितात.

कोरीवकाम हातानेच करावे लागते म्हणून महाग पडते. म्हणून आधुनिक फर्निचरमध्ये सुशोभनाकरिता कोरीवकाम वापरीत नसत परंतु ग्राहकाची आवड लक्षात घेऊन मोजके कोरीवकाम वापरण्याची पद्धत पुन्हा सुरू झाली. कोरीवकाम प्रतिरूपक यंत्रावर करणे शक्य झाले आहे. याकरिता काही विशिष्ट नमुने वापरतात. मंजुषाकार स्वतंत्रपणे काम करताना कोरीवकाम बाहेरून करून आणतो किंवा त्यासाठी स्वतंत्र कारागीर नेमतो.

सुशोभनातील इतर माध्यमे उदा., मार्किट्री, मीनाकाम, पिएत्रा दूरा काम करणारे कारागीर आपापली स्वतंत्र दुकाने ठेवत असत. पृष्ठभाग घासकागदानी घासून किंवा विविध सुवाह्य यंत्रांनी घासून तयार करतात. गादीकाम करावयाचे असल्यास गादीकाम विभागाकडे फर्निचर घटक पाठविला जातो. गादीकाम बहुतांशी हाताने करावे लागते. शिवण्याकरिता किंवा फेसयुक्त प्लॅस्टिक व रबर या पदार्थांच्या लाद्या कापण्याकरिता काही यंत्रे उपलब्ध आहेत.

कारखान्यात जुळणी केलेले फर्निचर त्याच्या वजनाच्या मानाने आकारमानाने फारच मोठे असते. म्हणून साठा करण्याकरिता किंवा वाहतुकीकरिता खूपच जागा लागते व वाहतुकीचा खर्च वाढतो. कारखान्यात फर्निचर घटक विविध भागांत उत्पादित करतात व जागेवर नेल्यावर काही थोडी सोपी कामे करून जोडतात. विक्रेता ही व्यवस्था करतो. दुसऱ्या एका प्रकारात ⇨ कॅम, स्क्रू व पाचर या प्रयुक्तींचा उपयोग करून ग्राहकाला विविध भाग जोडता येण्यासारखी रचना उपलब्ध झालेली आहे. अशा फर्निचरच्या विविध भागांची अदलाबदल करता यावी म्हणून प्रत्येक भागाचे काटेकोरपणे उत्पादन करतात. घडीच्या फर्निचरला सुद्धा साठ्याकरिता व वाहतुकीकरिता कमी जागा लागते.

भारतामध्ये महाराष्ट्र (मुंबई, नागपूर व सावंतवाडी), कर्नाटक (बेळगाव-म्हैसूर), केरळ (त्रिचुर, कोचीन, त्रिवेंद्रम), आंध्र प्रदेश (निर्मळ, तिरुपती), गुजरात (अहमदाबाद, बडोदे, जुनागड, भावनगर), राजस्थान (बिकानेर, दोराजी), उत्तर प्रदेश (अलीगढ, लखनौ, गाझीपूर, मथूरा), पंजाब (जालंदर, होशियारपूर, अमृतसर, भेडा, लुधियाना), जम्मू व काश्मीर (श्रीनगर), ओरिसा (पुरी, सोनेपूर, मयूरभंज), आसाम या राज्यांत लाकडी परंपरागत फर्निचर, तसेच आधुनिक फर्निचरही काही ठिकाणी तयार करण्यात येते परंतु पोलादी फर्निचरप्रमाणे संघटित क्षेत्रात हे उत्पादन करण्यात येत नसून सर्व कारखाने लघू उद्योगाच्या स्वरूपातील आहेत.

उत्तम रापविलेल्या लाकडाची दुर्लभता व लाकडी फर्निचरच्या बाबतीत असणारा आगीचा धोका यांमुळे अलीकडील काळात पोलादी फर्निचर लोकप्रिय झालेले आहे. पोलादी फर्निचरच्या निर्मितीत पोलादाच्या नळ्या जास्त प्रमाणात वापरतात, कारण त्या वजनाने हलक्या, बळकट, लवचिक आणि घन धातूंपेक्षा आकार देण्यास सुलभ असतात. त्यांच्यावर विविध रंगांचे एनॅमल लावता येते. याखेरीज पोलादावर रासायनिक प्रक्रिया करून त्यावर काळा किंवा हिरवा गंजरोधी पृष्ठभाग तयार करता येतो किंवा त्यावर क्रोमियम विलेपित करता येते.

पोलादी फर्निचर तीन प्रकारांचे असते : (१) घरगुती उपयोगाचे फर्निचर : पलंग, कपाटे, सोफा, खुर्च्या, टेबले इ. (२) कार्यालयीन फर्निचर : विविध प्रकारच्या खुर्च्या व टेबले, विविध प्रकारच्या मांडण्या (रॅक), सूची व फायलिंग कामाची कपाटे इ. (३) रुग्णालयातील फर्निचर : विविध प्रकारचे बिछाने व पाळणे, शस्त्रक्रियेची टेबले, दंतवैद्याच्या खुर्च्या इत्यादी.

कार्यालयीन, घरगुती व रुग्णालयीन हलके पोलादी फर्निचर हलके पोलादी पत्रे किंवा पोलादी नळ्या यांच्यापासून बनवितात. या फर्निचर घटकांचे अभिकल्प प्रमाणभूत केलेले असल्यामुळे त्यांचे विविध भाग निरनिराळी दाबयंत्रे, भोके पाडावयाची यंत्रे, बाक देणारी यंत्रे वापरून सुलभपणे तयार करता येतात. पत्र्यापासून तयार करण्यात येणारे भाग वितळजोडकामाने (वेल्डिंगने) वा नटबोल्टने जोडतात. एका भागावरील पुढे आलेले टोक दुसऱ्या भागातील सुयोग्य खाचेत बसवूनही भागांची जोडणी करण्यात येते. पोलादी नळीच्या फर्निचरकरिता नळ्या विशिष्ट पद्धतीने जरूर तो आकार देण्यासाठी वाकविण्यात येतात. वाकविताना नळीमध्ये विकृती उत्पन्न होऊ नये म्हणून तिच्यात रेझीनयुक्त द्रव्य भरतात. योग्य आकार दिल्यानंतर नळी तापवून तीमधील रेझीनयुक्त द्रव्य काढून टाकतात. नळी योग्य दंडावर बसवूनही वाकविण्याची प्रक्रिया करण्यात येते. नळीच्या फर्निचरचे भाग वितळजोडकामाने जोडण्यात येतात आणि त्यांना क्रोमियम विलेपनाने किंवा रंगीत एनॅमलने किंवा धातवीय मुलाम्यांनी अंतिम बाह्यरूप देण्यात येते. कॅनव्हास व प्लॅस्टिक यांचा नळीच्या खुर्च्याकरिता आच्छादन म्हणून उपयोग करतात. नळीच्या टेबलांच्या वरच्या सपाट पृष्ठभागांकरिता लाकूड, काच वा प्लॅस्टिक यांचा उपयोग करण्यात येतो.


भारतामध्ये एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी महाराष्ट्रात पोलादी तिजोऱ्या तयार करण्यास सुरुवात झाली. त्यानंतर लवकरच कपाटे व इतर घरगुती आणि कार्यालयीन फर्निचर तयार करण्यास प्रारंभ झाला. रुग्णालयातील फर्निचर आधुनिक पद्धतीने तयार करण्यास १९३० नंतर सुरुवात झाली. पोलादी नळ्यांच्या फर्निचरचे १९४० च्या सुमारास उत्पादन करण्यात येऊ लागले. दुसऱ्या महायुद्धानंतर पोलादी फर्निचरची लोकप्रियता वाढली. १९५५ साली संघटित उत्पादन क्षेत्राची उत्पादनक्षमता वार्षिक ३०,००० टन होती व प्रत्यक्ष उत्पादन २२,५०० टन झाले. १९६१ साली संघटित उत्पादन क्षेत्रात २० मोठे कारखाने पोलादी फर्निचरचे उत्पादन करीत होते. त्यांची उत्पादन ३३,००० टन व प्रत्यक्ष उत्पादन ३३,५०० टन होते. १९६६ साली २५ मोठे कारखाने उत्पादन करीत होते. त्यांची उत्पादनक्षमता ४४,००० टन व प्रत्यक्ष उत्पादन ३८,५०० टन होते. त्या वर्षी लघू उद्योग क्षेत्रातील पोलादी फर्निचरचे उत्पादन संघटित क्षेत्रापेक्षाही जास्त होते. लघू उद्योग क्षेत्रात १९६६ साली ६४२ कारखाने होते. त्यांपैकी महाराष्ट्र व तमिळनाडू प्रत्येकी ११०, व प. बंगाल १०३, आंध्र प्रदेश ६७, उ. प्रदेश ५७ व दिल्ली ५४ अशी प्रदेशवार विभागणी होती आणि इतर कारखाने इतर राज्यांमध्ये विखुरलेले होते. लघू उद्योग क्षेत्राची उत्पादनक्षमता ७३,००० टन होती. १९७१ मध्ये संघटित क्षेत्रात १३ मोठे कारखाने उत्पादन करीत होते व त्यांची उत्पादनक्षमता ४२,७२९ टन होती व प्रत्यक्ष उत्पादन ३४,५०० टन होते. लघू उद्योग क्षेत्रामध्ये सु. ९०० कारखाने उत्पादन करीत होते.

भारतामधून कुवेत, इथिओपिया, नेपाळ, टांझानिया, युगांडा, केन्या इ. देशांना पोलादी फर्निचरची निर्यात केली जाते. १९६७-६८ साली २० लक्ष रु. किंमतीचे आणि १९७१-७२ मध्ये ५० लक्ष रु. किंमतीचे पोलादी फर्निचर निर्यात करण्यात आले. १९६७-६८ मध्ये भारताने १८ लक्ष रुपयांचे आणि १९७१-७२ मध्ये ७ लक्ष रुपयांचे पोलादी फर्निचर आयात केले. यामध्ये वैद्यकीय व दंतवैद्यकीय फर्निचर व त्यांचे भाग यांचा अधिककरून समावेश होता. ब्रिटन, अमेरिका, स्वीडन, प. जर्मनी व जपान या देशांतून ही आयात करण्यात आली.

ॲल्युमिनियम व तिच्या मिश्रधातू पोलादापेक्षा वजनाने हलक्या असल्याने व त्यांवर आवश्यक ते संस्करण करून फर्निचरचे विविध घटक सहजपणे तयार करता येत असल्याने त्यांपासून तयार केलेले फर्निचर लोकप्रिय झाले आहे. अशा प्रकारच्या फर्निचरचे उत्पादन आता वाढू लागले आहे.

सप्रे, गो. वि.

पहा : आडोशीपट आरसा काथ्या खुर्ची गालिचे गृहशोभन चटया चित्रजवनिका चौरंग तक्षण पलंग बुरूडकाम भित्तिशोभन रथ लाकडी कलाकाम शवपेटिका सिंहासन सुतारकाम हस्तव्यवसाय.

संदर्भ : 1. Aronson, y3wuoeph, New Encyclopaedia of Furniture, New York, 1967.

   2. Chattopadhyay, Kamaladevi, Handicrafts of India, New Delhi, 1975.

   3. Dhamija, Jasleen, Indian Folk Arts and Crafts, New Delhi, 1970.

   4. Hooper, J. Hooper, R. Modern Furniture and Fittings, Toronto, 1955.

   5. Joyce, Ernest, The Technique of Furniture Making, 1970.

   6. Oliver, J. L. The Development and Structure of the Furniture Industry, 1966.

   7. Vidya Prakash, Khajuraho, Bombay, 1967.