छायाचित्रण छायाचित्रणम्हणजे दृश्य प्रकाशाच्या किंवा इतर प्रारणांच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या, उदा., क्ष-किरणांच्या) मदतीने प्रकाशसंवेदनशील रासायनिक द्रव्याच्या थरावर दृश्य चित्र निर्माण करणे.  छायाचित्रणशास्त्रात भौतिकी व रसायनशास्त्राचा सुगम संयोग झाला आहे. भिंगाद्वारे प्रतिमा पाडण्याची पद्धती शास्त्रज्ञांना अवगत होती, पण ती प्रतिमा कायम स्वरूपात मिळण्यासाठी संवेदनशील साहित्य बनविता येत नव्हते. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना अखेर यश येऊन असे साहित्य बनविण्याला १८३० मध्ये खऱ्या अर्थाने सुरुवात झाली, असे म्हणता येईल.

कॅमेऱ्याच्या भिंगातून संवेदनशील थरावर प्रतिमा पाडण्याच्या कृतीला प्रकाशन (किंवा संवेदनशील थराचे उद्‌भासन) म्हणतात. सिल्व्हर हॅलाइड, जिलेटीन व इतर रसायने यांच्या मिश्रणाचा पातळ थर कागद, काच किंवा लवचिक (सामन्यतः सेल्युलॉइडाची) फिल्म यांवर देऊन प्रकाशसंवेदनशील साधने बनवितात. या मिश्रणास पायस म्हणतात. संवेदनशील पायसावर अल्प वेळ प्रकाशन केल्याने अदृश्य चित्र तयार होते. या चित्राचे दृश्य चित्रात रूपांतर करण्यासाठी जी रासायनिक प्रक्रिया करतात तिला विकाशन म्हणतात. विकाशनानंतर सोडियम थायोसल्फेटाचा विद्राव (हायपो) वापरून त्या चित्राचे स्थिरीकरण (संवेदनशील द्रव्य काढून टाकून चित्राचे स्वरूप कायम करण्याची प्रक्रिया) करतात. प्रथम जे चित्र मिळते ते व्यस्त (म्हणजे मूळ काळ्या रंगाच्या ठिकाणी पांढरा व पांढऱ्याच्या ठिकाणी काळा रंग असलेले) असते. या व्यस्त प्रतींवरून संपर्क छपाईने (संवेदनशील कागदावर व्यस्त प्रत ठेवून तिचा प्रकाशाशी संबंध आणून) किंवा चित्रवर्धकाने (चित्र मोठे करणाऱ्या उपकरणाने) पाहिजे तितक्या सम (म्हणजे मूळ दृश्यासारख्या) प्रती तयार करतात. रंगीत छायाचित्रणाची संवेदनशील साधने बनविण्याच्या व संस्करणाच्या पद्धती गुंतागुंतीच्या असतात.

छायाचित्रणासाठी अनेक प्रकारचे कॅमेरे, भिंगे, दिवे आणि संवेदनशील साहित्य लागते व ते तयार करण्यासाठी मोठे कारखाने उभारलेले आहेत. या कारखान्यांत संशोधन करून नवनवीन प्रकारचे साहित्य व उपकरणेही तयार करतात.

मुद्रणकला, विविध उद्योगधंदे, खगोलीय व वातावरणविज्ञानीय वेधशाळा. विविध प्रकारचे संशोधन करणाऱ्या प्रयोगशाळा इ. अनेक क्षेत्रांत सध्या छायाचित्रांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येत आहे. प्रस्तुत नोंदीत छायाचित्रणाची प्रमुख तत्त्वे, पद्धती व उपयोग यांचे विवरण केलेले आहे. कॅमेऱ्याचा विकास, रचना, त्याला लागणारी भिंगे आणि इतर साहाय्यक साधने, त्याचे विविध प्रकार इ. माहिती ‘कॅमेरा’या स्वतंत्र नोंदीत दिली आहे.

इतिहास :छायाचित्रणाचा शोध कोणत्याही एका व्यक्तीने लावलेला आहे, असे म्हणता येत नाही. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस रसायनशास्त्र आणि भौतिकी यांच्या सुगम संयोगामुळे आजच्या छायाचित्रणाच्या इतिहासास प्रारंभ झाला, असे म्हणता येईल. चौदाव्या शतकात लिओनार्दो दा व्हींची यांना कॅमेरा ऑब्स्क्यूरा [⟶ कॅमेरा ऑब्स्क्यूरा व कॅमेरा ल्यूसिडा]माहीत होता हे सर्वमान्य आहे. अठराव्या शतकात कॅमेरा ऑब्स्क्यूराचा उपयोग त्या वेळचे चित्रकार देखावे चित्रित करण्यासाठी करीत असत. या कॅमेऱ्यात सुधारणा करून कागदावर रासायनिक प्रक्रिया करुन चित्र उमटविण्याची कल्पना पुढे आली. १७२५ साली जे. शुल्झ यांनी सिल्व्हर क्लोराइड प्रकाशनामुळे काळे पडते हे दाखविले होते, पण त्या वेळी या माहितीचा उपयोग कसा करावयाचा याची कल्पना कोणालाच आली नाही. विल्यम लेविस (१७६३) जोसेफ प्रीस्टली (१७७२) व सी. डब्ल्यू. शेले (१७७७) यांनी यासंबंधी प्रयोग केले. टॉमस वेजवुड यांनी सिल्व्हर नायट्रेटामध्ये पांढरे कातडे व कागद भिजवून त्यावर सूर्यप्रकाशात पानांची व इतर चित्रे मिळविली व त्याविषयीची माहीती १८०२ मध्ये प्रसिद्ध केली. हंफ्री डेव्ही यांनी सिल्व्हर क्लोराइड प्रकाशाला जास्त संवेदनशील असल्याने त्याचा वापर करावा असे सुचविले. तथापि वर उल्लेख केलेले कॅमेरा ऑब्स्क्यूराच्या साहाय्याने छायाचित्र काढण्याचे सर्व प्रयोग जास्त प्रकाशनकाल व चित्र स्थिर करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचा अभाव यांमुळे अयशस्वी झाले.

कॅमेऱ्याच्या मदतीशिवाय एका कोरीव कामाचे छायाचित्र घेण्यात झोझेफ निसेफॉर न्येप्स १८२२ साली यशस्वी झाले. हे छायाचित्र कायम स्वरूपाचे असे पहिलेच छायाचित्र होते. यापूर्वी १८१६ मध्ये त्यांनी कॅमेऱ्याने कागदावर समचित्र मिळविले होते. न्येप्स यांच्या छायाचित्रांना हीलिओग्राफ असे म्हणत. १८२७ मध्ये त्यांनी लंडनच्या रॉयल सोसायटीकडे कॅमेरा ऑब्स्क्यूराने सिल्व्हर क्लोराइडाचा थर दिलेल्या कागदावर घेतलेले एक निसर्गचित्र व हीलिओग्राफीचे वर्णन पाठविले.

दागेअरोटाइप : दागेअर (१७८९—१८५१) या फ्रेंच चित्रकारांनी चांदीच्या लवणासंबंधी प्रयोग केले होते. त्यांनी न्येप्स यांच्याबरोबर १८२६ साली काम करण्यास सुरुवात केली व ते १८२९ पर्यंत चालले. याच काळात सिल्व्हर आयोडाइडाच्या प्रकाशसंवेदनशीलतेचा त्यांना शोध लागला. कॅमेऱ्यात आयोडीनयुक्त चांदीचे पटल पाऱ्याच्या वाफेशी संपर्क आणून व मिठाच्या पाण्याने धुवून स्थिरीकरण केल्यास चांगले स्पष्ट चित्र मिळते असे दागेअर यांनी दाखवून दिले. न्येप्स व दागेअर यांचे शोध फ्रेंच सरकारने एकदमच प्रसिद्ध केले. या पद्धतीला ‘दागेअरोटाइप’असे म्हणतात. अमेरिकन, इंग्लिश व ऑस्ट्रियन संशोधकांनी लावलेल्या प्रकाशकीय आणि रासायनिक शोधांमुळे १८४१ नंतर प्रकाशनकाल योग्य प्रकाश परिस्थितीत काही सेकंदांइतका कमी झाला. प्रकाशित काचेचे विकाशन ७५ से. तापमानातील पाऱ्याने करून तीवरील चित्र सोडियम थायोसल्फेटाने स्थिर करीत व गोल्ड क्लोराइडने त्यावर आवश्यक त्या छटा आणत. ही छायाचित्रे परावर्तित प्रकाशाने पाहता येत व त्यांच्यात आरशावरील प्रतिमेसारखी बाजूंची उलटापालट झालेली असे. या पद्धतीत मूळ छायाचित्रावरुनच प्रती काढव्या लागत. ही पद्धत विशेषतः व्यक्तिचित्रांसाठी १८६० पर्यंत वापरात होती व फक्त इंग्लंडमध्येच तिचे एकस्व (पेटंट) घेतले गेले होते.

कॅलोटाईप :इंग्लंडमध्ये १८३४ साली डब्ल्यू. एच्. फॉक्स टॉलबट यांनी सिल्व्हर क्लोराइडामध्ये कागद बुडवून कॅमेरा ऑब्स्क्यूराने छायाचित्र घेतले व ते स्थिर करण्यासाठी मिठाचा व पोटॅशियम आयोडाइडाचा उपयोग केला. त्यांनी रॉयल सोसायटीला या पद्धतीचे वर्णन १८३९ मध्ये सादर केले. चांदीच्या संयुगांवर सोडियम थायोसल्फेटाचा होणारा परिणाम १९१९ मध्येच जे. एफ्. डब्ल्यू. हर्शेल यांनी शोधून काढला होता. १८४१ पर्यंत प्रकाशनकाल ३०—६० मिनिटे असे, परंतु टॉलबट यांनी त्याच वेळी शोधून काढलेल्या ‘कॅलोटाइप’पद्धतीत प्रकाशनकाल पुष्कळच कमी होता. या पद्धतीत व्यस्त प्रतीवरील अदृश्य चित्राचे विकाशन गॅलिक अम्लाने करण्यात येई. जे. बी. रीड यांनीही हीच पद्धत स्वतंत्र रीत्या शोधली होती. कॅलोटाइप कागदावरील विकाशित प्रतिमा ही प्रकाश व छाया यांच्या दृष्टीने उलटी होती. तिला हर्शेल यांनी १८४० मध्ये निगेटिव्ह (व्यस्त प्रत) हा शब्द प्रथम वापरला. कागदाचा पारदर्शकपणा वाढविण्यासाठी टॉलबट यांनी तेलाचा किंवा मेणाचा वापर केला. अशा व्यस्त प्रतीवरून ते संपर्क छपाईने सम प्रती संवेदनशील कागदावर काढीत. दागेअर आणि न्येप्स यांच्या शोधांनी छायाचित्रणाला प्रारंभीची चालना मिळाली, तर टॉलबट यांची पद्धत म्हणजे छायाचित्रणाच्या प्रगतीचा पहिला टप्पा होता. कागदाचे स्वरूप व छपाईस लागणारा वेळ हे टॉलबट पद्धतीतील दोष होते.

सिल्व्हर कार्बोनेटाचा लेप दिलेल्या काचेवर हर्शेल यांनी १८३९ मध्ये छायाचित्र घेतले. १८४८ मध्ये आबेल न्येप्स द सँ व्हीत्त्कॉर यांनी छपाईमध्ये सिल्व्हर आयोडाइडासाठी अल्ब्युमिनाचा (अंड्यातील पांढऱ्या भागाचा) उपयोग वाहक म्हणून करावा असे सुचविले. ही प्रक्रिया फार मंद गतीने होत असे, परंतु ती १८५१ पर्यंत प्रचारात होती.


कलोडियन पद्धत :ही पद्धत फ्रेडेरिक स्कॉट आर्चर या इंग्लिश शिल्पकारांनी १८५१ मध्ये शोधून काढली. त्यांनी सेल्युलोज नायट्रेटाच्या ईथर व अल्कोहॉल यांतील विद्रावात (कलोडियनात) विद्राव्य (विरघळणारे) आयोडाइड घातले व त्यात अल्प प्रमाणात ब्रोमाइड मिसळून त्याचा लेप काचेवर दिला. काळोख्या खोलीत आयोडिनयुक्त कलोडियन सिल्व्हर नायट्रेटाच्या कुंडात बुडवून प्रकाशसंवेदनशील केले व जादा सिल्व्हर नायट्रेटाच्या साहाय्याने सिल्व्हर आयोडाइड तयार केले. काच ओलसर असतानाच तिचे कॅमेऱ्यात प्रकाशन केले. नंतर प्रकाशित काचेचे ॲसिटिक अम्लयुक्त पायरोगॅलॉल विद्रावाने विकाशन केले व सोडियम थायोसल्फेटाच्या तीव्र विद्रावाने चित्र स्थिर केले. सोडियम थायोसल्फेटाऐवजी नंतर पोटॅशियम सायनाइडाचा वापर करण्यात आला. आर्चर यांनी या पद्धतीचे एकस्व घेतले नव्हते. ही पद्धत शीघ्र वेगाची असल्याने तिने कॅलोटाइप व दागेअरोटाइप या पद्धतींचे १८५५ च्या सुमारापर्यंत जवळजवळ उच्चाटन केले. व्यक्तिचित्रांसाठी आर्चर व पी. डब्ल्यू. फ्राय यांनी एक वेगळी पद्धत शोधून काढली. अर्धवट प्रकाशित झालेल्या व्यस्त प्रतीच्या मागे काळा कागद वा मखमल लावल्यास ती सम प्रतीसारखी दिसे. ही पद्धत व्यस्त व्यक्तिचित्रणासाठी पुष्कळच लोकप्रिय झाली होती व ती अँब्रोटाइप म्हणून प्रसिद्ध आहे. लाख लावलेला धातूचा काळा पत्राही या पद्धतीत वापरीत असत व तिला टिनटाइप म्हणत. प्रकाशन करण्यापूर्वी अगदी थोडाच वेळ अगोदर चित्रणाची काच तयार करावी लागत असल्याने आणि ताबडतोब तिचे विकाशन करावे लागत असल्यामुळे त्या काळी छायाचित्रणाच्या उपयोगाला पुष्कळच मर्यादा पडलेल्या होत्या.

कलोडियन पायस :बी. जे. सेस आणि डब्ल्यू. बी. बोल्टन यांनी विद्राव्य ब्रोमाइडाची सिल्व्हर नायट्रेटाशी विक्रिया करुन मिळणाऱ्या सिल्व्हर ब्रोमाइडाचे कलोडियनामधील पायस तयार करण्याचा शोध १८६४ मध्ये लावला. १८७४ मध्ये बोल्टन यांनी सिल्व्हर ब्रोमाइडाचा साका तयार करताना निर्माण झालेली विद्राव्य संयुगे वेगळी करण्यासाठी पायस धुण्याची पद्धत शोधून काढली. ही अद्यापिही वापरली जाते. कलोडियन पायस हे जरी जास्त संवेदनशील नसले, तरी ते ओलसर कलोडियनापेक्षा वापरण्यातील सुलभतेच्या दृष्टीने चांगले होते. १८६२ मध्ये सी. रसेल यांनी विकाशनात क्षारीय (अम्लाशी विक्रिया होऊन लवणे देणाऱ्या म्हणजे अल्कलाइन) पदार्थांचा वापर केल्यावर कलोडियन पायसाची संवेदनशीलता पुष्कळच वाढली पण जिलेटीन व सिल्व्हर ब्रोमाइडयुक्त शुष्क काचांचा शोध लागल्यावरच रसेल यांच्या पद्धतीची उपयुक्तता पूर्णपणे प्रस्थापित झाली.

जिलेटीन पायस :१८७१ मध्ये आर्. एल्. मॅडकस यांनी कलोडियनाऐवजी जिलेटीन वापरून पायस तयार केले. जॉन बर्जेस, रिचर्ड केनेट, चार्ल्स बेने इत्यादींनी या कृतीवर संशोधन करून तीत सुधारणा केल्या. त्यांनी शुष्क व धुतलेले पायस बाजारात विक्रीस आणले. हे पायस गरम पाण्यात विरघळवून छायाचित्रकार काचांवर लावीत व त्यांचा उपयोग करीत. जिलेटीन पायसासंबंधीच्या संशोधनात १८७३—८५ या काळात पुष्कळच प्रगती झाली. १८७९ च्या सुमारास सापेक्षतः जलद प्रकाशन हेणाऱ्या शुष्क काचा बाजारात आल्या.

छायचित्रणाबाबत या काळापर्यंत झालेले संशोधन हौशी व वैयक्तिक स्वरूपाचे होते. यानंतर मोठ्या प्रमाणावर निर्मिती सुरू झाल्यावर हे संशोधन कारखान्यांमार्फतच करण्यात येऊ लागून पायस तयार करण्याच्या तंत्रात सुधारणा झाल्या व त्यामुळे पायसाची संवेदनशीलताही आणखी वाढली.

वर्ण-संवेदनशीलता :सिल्व्हर हॅलाइड संयुगे ही निळ्या, जांभळ्या व जंबुपार (वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांना संवेदनशील असतात. म्हणून इतर सर्व रंगाचे काळ्या वा गडद करड्या रंगामध्ये रूपांतर होते. १८७३ मध्ये एच्. डी. फोगेल यांनी पायसात विशिष्ट रंजक द्रव्य घातल्यास वा विलेपित काचा रंजक द्रव्याच्या विद्रावात बुडविल्या, तर त्या इतर रंगांनाही संवेदनशील होतात असे सिद्ध केले. जे. वॉटरहाउस यांनी कलोडियन पायसात व जॉन क्लेटन व पी. ए. ॲटाऊट यांनी जिलेटीन पायसात इओसीन या रंजक द्रव्याचा संवेदनशीलतेसाठी उपयोग केला. त्यांनी तयार केलेल्या काचा एकवर्णी (आयसोक्रोमॅटिक) या नावाने ओळखल्या जात. १८८४ मध्ये योझेफ मारीआ एडर यांनी इओसिनाऐवजी एरिथ्रोसीन या अधिक संवेदनशीलताकारक द्रव्याचा वापर केला व नंतर जवळजवळ ५० वर्षे त्याचा वापर प्रचलित होता. एरिथ्रोसिनाऐवजी एथिल रेड या रंजकाचा उपयोग केल्यास वर्णपटातील नारिंगी वर्णापर्यंत संवेदनशीलता मिळू शकते, असे १९०३ मध्ये आडोल्फ मायथे व आर्थर ट्रॉउबे यांना आढळून आले. बी. होमोल्का यांनी पिनासायानॉल सर्व तांबड्या वर्णासाठी अतिशीघ्र संवेदनशीलताकारक आहे असे सिद्ध केले. अशा प्रकारे दृश्य वर्णपटातील सर्व वर्णांचे छायाचित्रण करणाऱ्या (समग्रवर्णी, पॅनक्रोमॅटिक) काचा तयार करणे शक्य झाले. १९२० मध्ये डब्ल्यू. एच्. मिल्स आणि एफ्. एम्. हॅमर यांनी पिनासायानॉल हा कार्बोसायानीन रंजक आहे, असे सिद्ध केले. यानंतर संवेदनशील रंजकासंबंधी बरेच संशोधन करण्यात आले व वर्णपटातील सर्वच वर्णांना तसेच अवरक्त (वर्णपटातील तांबड्या वर्णाच्या अलीकडच्या अदृश्य) भागालाही संवेदनशील असणारे नवीन रंजक शोधण्यात आले. बहुतेक सर्व नवीन रंजक १९२९ नंतर इंग्लंड, जर्मनी व अमेरिका येथे शोधण्यात आले आणि त्यांपैकी सर्वात महत्त्वाचे रंजक रुपांतरित कार्बोसायानिने व मेरोसायानिने होती. १९१४ मध्ये समग्रवर्णी फिल्म ईस्टमन कोडॅक कंपनीने तयार केली, पण ती चलच्चित्रपटासाठी १९२५ पर्यंत फारशी वापरली गेली नाही. १९३१ मध्ये नवीन प्रकारची शीघ्र संवेदनशील व समग्रवर्णी फिल्म तयार करण्यात आली. संवेदनशीलता आणणाऱ्या रंजकासंबंधीच्या संशोधनातील प्रगतीमुळेच १९३० नंतर रंगीत छायाचित्रणात मोठी प्रगती होऊ शकली, तसेच शीघ्र वेगाच्या व कमी कणीदार असलेल्या काचा व फिल्म तयार होऊ लागल्या.

रंगीत छायाचित्रण : १८१० मध्ये टी. जे. झेबेक, १८४० साली हर्शेल व त्यानंतर एद्‍माँ बेक्रेल आणि आबेल न्येप्स द सँ व्हीत्त्कॉर यांना असे आढळून आले की, सिल्व्हर आयोडाइडावर सूर्याचा वर्णपट टाकल्यास सर्व वर्णपट त्यातील मूळ वर्णांप्रमाणेच नोंदला जातो. परंतु त्यांना या वर्णांचे स्थिरीकरण करणे शक्य झाले नाही. १८९१ साली गाब्रिएल लीपमान यांनी व्यतिकरण (निरनिराळ्या स्थितींतील दोन वा अधिक तरंगमालिका एकमेकींवर येऊन पडल्यामुळे वर्णांची निर्मिती होणे) तत्वाचा उपयोग करुन स्थिरीकरण केलेली रंगीत छायाचित्रे प्रथमच तयार केली. डब्ल्यू. र्ट्सेगकर (१८६८), लॉर्ड रेली (१८८७) आणि ओ. वायनर (१८९०) यांनी हे तत्त्व वापरता येण्याची शक्यता सुचविली होती. या पद्धतीने उत्तम रंगीत छायाचित्रे तयार करता येत, परंतु त्यांतील काचा असंवेदनशील असून फक्त एकच छायाचित्र तयार करता येत असे.

आधुनिक रंगीत छायाचित्रणाची तत्त्वे जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी १८६१ मध्ये रंगीत दृष्टीसंबंधी केलेल्या प्रयोगातून सुचलेली आहेत. तांबडा, निळा व हिरवा प्रकाश विविध प्रमाणांत मिसळून सर्व वर्ण निर्माण करता येतात, असे मॅक्सवेल यांनी प्रतिपादन केले. १८६९ साली ल्वी ड्युकस दु हौरान आणि चार्ल्स फ्रॉस यांनी तीन रंगी छायाचित्रणाची मूलतत्वे मांडली. दु. हौरान यांनी संयोगीकरण व विलगीकरण या दोन मूलभूत पद्धतींचे वर्णन केले व त्या प्रत्यक्षात कशा आणता येतील हेही सुचविले. तथापि समग्रवर्णी काचा आणि आयसोसायानीन व कोर्बोसायानीन रंजक प्रचारात आल्यावरच रंगीत छायाचित्रण खऱ्या अर्थाने प्रचारात आले. १९३५ नंतर बहुशः विलगीकरण पद्धतच रंगीत छायाचित्रणासाठी वापरण्यात येऊ लागली.


फिल्म :काचेचे वजन आणि तिची भंगुरता यांमुळे तिच्याऐवजी वजनाला हलका पण लवचिक पदार्थ वापरण्याचे प्रयत्‍न सुरू झाले. १८७५ मध्ये लीऑन वारनर्क यांनी १०० छायाचित्रे घेता येतील अशी फिल्मची गुंडाळी बनविली. १० वर्षानंतर जॉर्ज ईस्टमन आणि डब्ल्यू. एच्. वॉकर यांनी संवेदनशील कागदाच्या गुंडाळी फिल्मची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करून ती लोकप्रिय केली. गुंडाळी फिल्म असलेला सुवाह्य कॅमेरा कोडॅक कंपनीने १८८८ साली बाजारात आणला. त्या काळी फिल्मचा उपयोग केल्यानंतर कॅमेऱ्यासकट फिल्म उत्पादकाकडे पाठवावी लागे. फिल्मचे विकाशन व छायाचित्रांची छपाई करून आणि पुन्हा दुसरी फिल्म भरून कॅमेरा उत्पादकाकडून परत पाठविण्यात येई. या फिल्मवर मिळणारी छायाचित्रे वर्तुळाकार व सु. ६·३५ सेंमी. व्यासाची असत. १८८९ मध्ये नायट्रोसेल्युलोजासाठी लाकडापासून मिळणारा अल्कोहॉल हा विद्रावक उपलब्ध झाल्यावर लवचिक फिल्म तयार करण्यात आली. १८९१ मध्ये कॅमेऱ्यात दिवसा भरता येणारी फिल्म तयार झाली. सुरुवातीस फिल्म काळ्या कापडात गुंडाळलेली असे. नंतर काळ्या संरक्षक कागदाच्या आतील बाजूस फिल्म गुंडाळण्याची पद्धत सुरू झाली. १८९५ मध्ये चित्रपटाची सम फिल्म तयार करण्यात आली. १९०९ मध्ये ईस्टमन यांनी सेल्युलोज ॲसिटेटाचा उपयोग करुन चित्रपटाची फिल्म तयार केली. फिल्मच्या मागील बाजूस साध्या जिलेटीनाचा लेप देऊन सुरकत्या न पडणारी फिल्म १९०३ साली तयार करण्यात आली. याच वर्षी ‘फिल्मपॅक’या नावाची फिल्म बाजारात आली. ही पटलाच्या स्वरूपाची फिल्म व काचा यांच्यासाठी बनविलेल्या कॅमेऱ्यांतही वापरता येऊ लागली. छोट्या कॅमेऱ्याच्या शोधामुळे व त्यात ३५ मिमी. रुंदीची फिल्म वापरता येऊ लागल्याने २०—३६ छायाचित्रे घेता येतील अशी फिल्मची गुंडाळी (कॅसेट) तयार करण्यात आली. १९६३ मध्ये कोडॅक कंपनीने इन्स्टामॅटिक कॅमेऱ्यासाठी कोडॅपॅक फिल्मचे काडतूस तयार केले.

१९१७ मध्ये फिल्मच्या दोन्ही बाजूंस पायसाचा लेप देण्यात आलेली क्ष-किरण  फिल्म तयार करण्यात येऊ लागली.

१९२३ मध्ये काळोख्या खोलीबाहेरही लहान चित्रपट कॅमेऱ्यात भरता येईल अशी १६ मिमी.ची चित्रपट फिल्म व १९३२ मध्ये ८ मिमी.ची चित्रपट फिल्म तयार करण्यात आली. यामुळे हौशी लोकांना चित्रपट तयार करण्यास मोठी मदत झाली. यांशिवाय ५५ मिमी., ६५ मिमी. व ७० मिमी.च्या चित्रपट फिल्मही तयार करण्यात आल्या आहेत.

विकाशक :कॅलोटाइप पद्धतीत गॅलिक अम्लाचा उपयोग विकाशक म्हणून करण्यात येत होता. १८५१ मध्ये एच्. व्ही. रेनॉल्ट व जस्टस फोन लीबिक यांनी जास्त क्रियाशील असा पायरोगॅलॉल विकाशक स्वतंत्र रीत्या शोधून काढला. या विकाशनामुळे प्रकाशनकाल कमी करणे शक्य झाले. हा विकाशक ओल्या कलोडियनासाठी प्रथम वापरला गेला, पण त्या पद्धतीत त्याची जागा नंतर एका लोहाच्या लवणाने घेतली. पायरोगॅलॉलाचा उपयोग शुष्क कलोडियन काचांसाठीही करीत. १८६१ पर्यंत सिल्व्हर नायट्रेट हा विकाशकाचा एक महत्त्वाचा घटक समजला जाई. तथापि जी. वॉर्डली यांनी नुसत्या पायरोगॅलॉलाचा उपयोग विकाशक म्हणून होतो, हे सिद्ध केले. १८८४ पर्यंत पायरोअमोनियाचा उपयोग विकाशक म्हणून होत होता. त्याच वर्षी क्षारीय कोर्बोनेटे विकाशक म्हणून वापरण्यात येऊ लागली. १८८४ मध्ये सी. एग्ली आणि आर्नोल्ड स्लिपर यांनी हायड्रॉक्सिल अमाइनाचा वापर विकाशक म्हणून करता येईल, असे दाखवून दिले. १८८८ मध्ये एम्. आंद्रेसेन यांनी पॅराफिनिलीन डाय-अमाइन, पॅराटोल्यूइन डाय-अमाइन व झायलिडीन डाय-अमाइन यांचा उपयोग विकाशक म्हणून करण्याचे एकस्व घेतले. १८९१ मध्ये त्यांनी पॅरा-अमिनोफिनॉल व त्यापासून तयार केलेली संयुगे (विशेषतः पॅरा-ॲमिनोफिनॉल सल्फेट म्हणजे मेटॉल) यांचा विकाशक म्हणून उपयोग करण्याचे एकस्व घेतले. १९५१ मध्ये डब्ल्यू. बी. केंड्ल आणि इलफर्ड कंपनी यांनी फेनिडॉन (१ फिनिल- ३-पायरोझोलिडॉन) हा विकाशक शोधून काढला. मेटॉल हायड्रोक्विनोन विकाशकातील मेटॉलऐवजी त्याचा वापर करता येतो.

छपाई :छायाचित्राच्या छपाईची पहिली पद्धत म्हणजे टॉलबट यांची होय. या पद्धतीत सिल्व्हर क्लोराइड व जादा सिल्व्हर नायट्रेट यांचा साध्या कागदावर उपयोग करीत असत. पण यातील चित्र बहुतांशी कागदाच्या तंतूमध्ये बुजलेले असे व या छपाईसाठी जास्त काळही लागे. ल्वी डेझेरे ब्लँक्वार्ट-इव्हार्ड यांनी छपाईसाठी अल्ब्युमिनाचा उपयोग केला. काही वर्षानंतर अल्ब्युमिनाचे दोन थर छपाई कागदावर देऊन उत्कृष्ट व चकचकीत पृष्ठाचा कागद तयार करण्यात आला. त्यावरील छायाचित्र पिवळे असून ते काळसर करण्यासाठी १८५० मध्ये गुस्ताव्ह ल ग्रे यांनी गोल्ड क्लोराइड वापरावे असे सुचविले. ही पद्धत १९०० पर्यंत वापरात होती, पण या पद्धतीने चित्रवर्धनाची क्रिया फारच मंद गतीने होत असे. कलोडियनातील सिल्व्हर क्लोराइडाचे पायस छपाईसाठी वापरावे असे आलेक्सी गोडॅन यांनी सुचविले होते. यानुसार तयार केलेला कागद १८६८ मध्ये बाजारात येऊ लागला. १८५५ मध्ये हंबर्ट द मोलार्ड यांनी जिलेटिनामधील सिल्व्हर क्लोराइडाच्या साक्याचा विद्राव कागदावर लावून छपाईचा कागद तयार केला. याच पद्धतीचा पुढे १८६५ मध्ये डब्ल्यू. एच्. स्मिथ आणि जे. ई. पामर यांनी व ॲब्नी यांनी १८८२ मध्ये विकास केला. यानंतर जिलेटिनोक्लोराइड कागद बाजारात येऊ लागला व त्यामुळे अल्ब्युमिनाचा वापर पूर्णतः बंद झाला. जिलेटीन सिल्व्हर ब्रोमाइड कागद १८७३ मध्ये पीटर मॉइझ्ली यांनी शोधला. सध्या संपर्क छपाईसाठी क्लोराइड पद्धतीचा कागद वापरतात, तर ब्रोमाइड व क्लोरोब्रोमाइड पद्धतीचा कागद मुख्यत्वे विवर्धनासाठी वापरतात.  औद्योगिक व वैज्ञानिक छपाईसाठी, दस्तऐवजाच्या नकला, आरेख्यक कला  इत्यादींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कागद वापरतात.

चांदीविरहित छपाईच्या पद्धती :चांदीचा वापर केलेली मुद्रिते (छपाई केलेली चित्रे) लवकर खराब होतात म्हणून टिकाऊ मुद्रिते मिळू शकतील असे इतर प्रकाशसंवेदनशील पदार्थ शोधण्याचे काही संशोधकांनी प्रयत्‍न केले. रॉबर्ट हंट यांनी फेरिक ऑक्झॅलेट व प्लॅटिनम लवण यांचा उपयोग केला, पण तो प्रयोग यशस्वी झाला नाही. विल्यम विलिस यांनी एका व्यवहारोपयोगी प्रक्रियेचे १८७३ साली एकस्व घेतले, परंतु प्लॅटिनम कागद प्रत्यक्ष बाजारात १८७९ मध्ये आला. तथापि प्लॅटिनमाच्या जास्त किंमतीमुळे ती प्रक्रिया पहिल्या महायुद्धानंतर मागे पडली.

१७९८ मध्ये एन्. जे. व्होक्लँ यांनी सिल्व्हर क्रोमेटाची प्रकाशसंवेदनशीलता शोधून काढली. १८३२ साली ई. आय्. सूको यांना असे आढळले की, कार्बनी पदार्थांच्या सान्निध्यात प्रकाशाने बायक्रोमेटाचे  ⇨क्षपण  होते. १८३९ मध्ये मंग्गो पाँटन यांनी पोटॅशियम बायक्रोमेट कागद तयार केला. एद्‌माँ बेक्रेल आणि रॉबर्ट हंट यांनी त्यात सुधारणा केली. टॉलबट यांनी १८५२ मध्ये बायक्रोमेटयुक्त जिलेटीन प्रकाशनानंतर अविद्राव्य होते हे शोधून काढले. ही पद्धत अद्यापिही फोटोग्रॅव्ह्युअरमध्ये वापरली जाते [ ⟶ मुद्रण ].


पॉल प्रेस्टच, आल्फॉन्स प्वाटव्हॅन, टेस्ट्यूड द बोअरगार्ड, आंरी गार्न्ये, ए. सॅमन आणि जॉन पॉन्सी यांनी कार्बन प्रक्रिया शोधून काढल्या. या प्रक्रियांमध्ये बायक्रोमेटयुक्त जिलेटिनामध्ये सूक्ष्म कणांच्या स्वरूपातील कार्बनाचा रंगद्रव्य म्हणून उपयोग केला होता. १८६४ मध्ये जोझेफ विल्सन स्वान यांनी कार्बन पद्धतीने चित्र काढण्याचे एकस्व घेतले. वॉल्टर बेंटली वुडबेरी यांनी वुडबेरीटाइप या नावाने ओळखण्यात येणारी पद्धत शोधून काढली. १८९४ मध्ये ए. रौली लाडेव्हेझी यांनी संवेदनशील केलेल्या डिंकाचा उपयोग करणारी एक पद्धती शोधून काढली. हीमध्ये आर्. डेमाची यांनी सुधारणा केली. ही पद्धत १९२० पर्यंत वापरात होती. टी. मॅन्ली यांनी ओझोब्रोम पद्धत शोधून काढली. यातच सुधारणा करुन कार्ब्रो नावाची एक पद्धत पुढे शोधून काढण्यात आली. बायक्रोमेटांचा उपयोग करणाऱ्या इतर काही पद्धतीही प्रचलित होत्या.

  

लोह संयुगांच्या प्रकाशसंवेदनशीलतेवर छपाईच्या बऱ्याच पद्धती आधारलेल्या आहेत. १८४२ मध्ये हर्शेल यांनी शोधून काढलेली नील मुद्रिते (ब्लू प्रिंट) पद्धत दुसऱ्या महायुद्धानंतरही वापरात होती. फेरोगॅलिक, प्लॅटिनोटाइप, अर्जेंटोटाइप, फेरोजिलेटीन, व्हॅन डाइक इ. पद्धती लोह संयुगांच्या प्रकाशसंवेदनशीलतेवर आधारलेल्या होत्या.

प्रकाशसंवेदनशील कार्बनी पदार्थांवर आधारलेल्या छपाईच्या पद्धतींपैकी आरेखनांच्या प्रती काढण्यासाठी वापरली जाणारी डायाझोटाइप ही पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. मेटल डायाझोनियम पद्धतीत जंबुपार किरणांनी प्रकाशित केलेल्या डायाझो संयुगांपासून तयार होणाऱ्या पदार्थांमुळे काही धातवीय लवणांचे (उदा., मर्क्युरस नायट्रेट) क्षपण होते आणि बारीक कणाच्या स्वरूपात मिळणाऱ्या धातूचा उत्तम भेददर्शी व गर्द प्रतिमा मिळविण्यासाठी उपयोग करता येतो.

इ. स. १९४७ मध्ये एस्. डी. स्टुके व कॉर्निंग ग्लास वर्क्स यांनी प्रकाशसंवेदनशील काच शोधून काढली. विशिष्ट प्रकारच्या काचेवर जंबुपार किरण पाडून नंतर ती तापविल्यास रंगीत प्रतिमा मिळू शकतात.

 दस्तऐवजांच्या प्रती काढण्यासाठी फोटोथर्मोग्राफी ही शुष्क पद्धत वापरली जाते. या पद्धतीत उष्णतेमुळे विक्रिया सुरू होऊन सरळ दृश्य प्रतिमा मिळते. ३ एम. थर्मोफॅक्स या पद्धतीत अवरक्त किरणांचा उपयोग करण्यात येतो. १९५० मध्ये झेरॉक्स नावाची विद्युत्‌ छायाचित्रण पद्धत व १९५४ साली इलेक्ट्रोफॅक्स ही प्रकाश संवाहक (प्रकाशाच्या क्रियेमुळे ज्याची विद्युत्‌ संवाहकता बदलते अशा) द्रव्याच्या लेपाचा उपयोग करणारी पद्धत ह्या प्रचारात आल्या [ ⟶ मुद्रण]. दस्तऐवजांच्या नकला काढण्याच्या व फिकट ते गर्द यांमधील सर्व छटा असणाऱ्या छायाचित्रणाच्या पद्धतीत प्रतिमेचे एका पायसापासून वा आधारापासून दुसऱ्यावर स्थानांतरण करण्याच्या पद्धतीला फार महत्त्व आहे. रासायनिक विसरणाने (रेणू एकमेकांत मिसळून होणारे) स्थानांतरण व भौतिक स्थानांतरण (रंगद्रव्याने वा रंजकाने जिलेटीनयुक्त उठाव पृष्ठावर तयार झालेली प्रतिमा साध्या वा जिलेटीनलेपित कागदावर वा तत्सम आधारकावर स्थानांतरित करणे) हे या पद्धतीचे दोन मुख्य प्रकार आहेत. विसरण स्थानांतरण पद्धत ही एकाच वेळी गेव्हर्ट कंपनीचे ए. रॉट व आग्फा कंपनीचे ई. वाइडी यांनी १९४४ मध्ये शोधून काढली आणि दस्तऐवजाच्या नकलांसाठी या कंपन्यांनी गेव्हाकॉपी आणि कॉपीरॅपिड हे कागद बाजारात आणले. ई. एच्. लँड यांनी अमेरिकेत १९४७ मध्ये कागदावरील चित्रण करण्यासाठी विसरण स्थानांतरण पद्धती पोलॅरॉइड लँड कॅमेऱ्यासाठी [ ⟶ कॅमेरा]  वापरली. १९५२ मध्ये व्हेरिफॅक्स पद्धत (भौतिक पद्धत) कोडॅक कंपनीने शोधून काढली. तसेच १९६३ मध्ये शोधून काढलेल्या कोडॅक बिमेट पद्धतीत विसरण स्थानांतरणाचा उपयोग करण्यात येतो.

छायाचित्रण पायस व चित्रनिर्मिती : छायाचित्रीय कागद, फिल्म इत्यादींवर एखाद्या प्रतिमेची नोंद करण्याकरिता जो पदार्थ लावतात तो प्रकाशनाने बदलेल असाच निवडावा लागतो. प्रकाशाचा परिणाम होणारे अनेक पदार्थ आहेत, पण त्यांपैकी बऱ्याचशा पदार्थावर होणारा परिणाम फार सावकाशपणे होतो म्हणून त्यांचा उपयोग सूर्यप्रकाश सावकाशपणे वापरता येईल अशाच ठिकाणी करता येतो. उदा., सूर्यप्रकाशात छापलेले निळे नकाशे (नील मुद्रिते). छायाचित्र निर्माण करण्यासाठी चांदीची संयुगे अत्यंत सोयीस्कर असतात म्हणून छायाचित्रणाचे संवेदनशील साहित्य बनविण्यासाठी चांदीच्या संयुगांचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात करतात.

छायाचित्रणासाठी जी चांदीची संयुगे वापरतात त्यांत रसायनशास्त्रात ज्यांना सिल्व्हर हॅलाइडे म्हणजे हॅलोजनांची संयुगे म्हणतात त्यांचा समावेश होतो. हॅलोजने म्हणजे फ्ल्युओरीन, क्लोरीन, ब्रोमीन व आयोडीन ही मूलद्रव्ये होत. यांतील शेवटच्या तिघांची चांदीची संयुगे प्रकाशसंवेदनशील असतात म्हणून त्यांचा उपयोग छायाचित्रणासाठी करतात.

पायस : चांदीच्या संयुगांचा वापर करून जो संवेदनशील पदार्थ काच, फिल्म वा कागदावर लावतात त्याला पायस म्हणतात. पायसातील पदार्थांचे तीन प्रमुख गट असतात : (१) जिलेटीन, (२) सूक्ष्म स्फटिकी सिल्व्हर ब्रोमाइड व त्याबरोबर अल्प प्रमाणात सिल्व्हर आयोडाइड व (३) काही विशिष्ट हेतूंसाठी अल्प प्रमाणात समाविष्ट केलेली इतर रसायने. तिसऱ्या गटात पायसाला वर्ण-संवेदनशील बनविणारे रंजक, जिलेटिनाचे दृढीकरण (घट्ट) करणारी रसायने, जंतुनाशके, आर्द्रताकारक (ओलसरपणा आणणारी) आणि धूसरता विरोधी (प्रकाशित न केलेल्या पायसात धूसरता निर्माण होण्यास विरोध करणारी) रसायने यांचा समावेश होतो.

पायसनिर्मितीसाठी सिल्व्हर हॅलाइडाचे गरम जिलेटिनामध्ये अवक्षेपण करतात (न विरघळणाऱ्या साक्याच्या स्वरूपात रूपांतर करतात). थंड झाल्यानंतर ते जेलीसारखे होते. त्यातील उरलेला क्षार (अल्कली) यानंतर धुवून टाकल्यावर संवेदनशीलता वाढविण्यासाठी ते पक्व करण्याकरिता परत गरम करून त्यात अधिक जिलेटीन घालतात आणि त्याचा उपयोग यानंतर योग्य त्या आधारकावर (फिल्म, कागद इ.) लेपनासाठी करतात. पायसनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर कडक नियंत्रण ठेवावे लागते. नाही तर लेपनकार्यावर अनिष्ट परिणाम होतो.

पायसनिर्मितीत जिलेटीनाचे कार्य हे अनेकविध असते. जिलेटीन पारदर्शक असून सिल्व्हर हॅलाइडाचे सूक्ष्म स्फटिक लोंबकळत्या स्थितीत ठेवण्यासाठी, तसेच आधारकाला पायस धरून ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होतो. पाण्यात न विरघळता ते फुगत असल्यामुळे संस्करण विद्रावातील रसायनांचा शिरकाव होण्यास ते उपयुक्त माध्यम ठरते, यामुळे पायसावर संस्करण विद्रावाचा चांगला परिणाम होतो. याशिवाय ज्या हॅलाइडाच्या कणांवर प्रकाशाची क्रिया झालेली नाही, त्यांचे विकाशन होण्याचेही ते टाळते. प्रकाशाच्या परिणामाने उत्पन्न झालेल्या काही पदार्थांशी त्यांचा संयोग होतो, तर काही पदार्थ त्यातून टाकून दिले जातात. जिलेटीनात असलेल्या गंधकाच्या संयुगामुळे म्हणजे सल्फाइडामुळे पायस संवेदनशील बनविण्यासाठी मदत होते.

आ.१. छायाचित्रण पायसात (अ) प्रकाशनानंतर व (आ) विकाशनानंतर होणारा फरक दाखविण्यासाठी घेतलेल्या फिल्मचा उभा छेद : (१) जिलेटिनाचा थर, (२) आधारक, (३) जिलेटिनाच्या थरातील निलंबित सिल्व्हर हॅलाइडाचे स्फटिक, (४) सिल्व्हर हॅलाइडाच्या स्फटिकांवर प्रकाश पडल्यामुळे स्थलांतरित झालेले अदृश्य धातुरूप चांदीचे कण, (५) विकाशनानंतर संपूर्ण काळे झालेले कण.

अदृश्य चित्राची निर्मिती : ज्यावेळी सिल्व्हर हॅलाइडावर बराच वेळ प्रकाश पडतो तेव्हा ते काळपट पडते. त्याचे अपघटन होऊन (रेणूचे तुकडे होऊन) त्यातून धातुरूप चांदी तयार होते व हॅलोजन बाहेर पडते. प्रकाशन झालेले व न झालेले पायस सारखेच दिसते कारण अल्प वेळ प्रकाश लागून पायस काळे होत नाही. प्रकाशनाच्या वेळी नेमकी कोणती विक्रिया घडते हे अद्यापि नीटपणे समजलेले नाही. त्यासंबंधी विविध सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. १९३८ साली एन्. एफ्. मॉट आणि आर्. डब्ल्यू. गर्‌नी यांनी त्यांची या विषयावरील कल्पना मांडली. हॅलाइडाच्या स्फटिकावरील काही विशिष्ट बिंदूंवरच प्रकाशाचा परिणाम होतो. या बिंदूंना संवेदनशील केंद्रे म्हणतात. प्रकाशन झाल्यावर प्रकाश संवाहक इलेक्ट्रॉन स्फटिकात मुक्तपणे फिरू लागतात आणि योगायोगाने संवेदनशील केंद्रावर आदळल्यास तेथे बंदिस्त होतात. त्यामुळे या केंद्रात ऋण विद्युत्‌ भार साठतो. या ऋण विद्युत्‌ भारामुळे चांदीचे धन भारित मुक्त आयन (अणू) आकर्षिले जातात व संवेदनशील केंद्राकडे स्थलांतरित होतात आणि तेथील इलेक्ट्रॉनांमुळे त्यांचे उदासीन (विद्युत्‌ भार नसलेल्या) अणूंत रूपांतर होते. अशा प्रकारे संवेदनशील केंद्रात चांदीचे अणू साठल्यामुळे ती आकारमानाने वाढत जातात व विकाशन प्रक्रियेत केंद्रस्थाने म्हणून कार्य करण्याइतपत मोठी होतात. ही केंद्रे सिल्व्हर सल्फाइडाची असतात, असे एस्. ई. शेपर्ड यांना सिद्ध केले. जे. डब्ल्यू. मिचेल यांनी मॉट व गर्‌नी यांच्या कल्पनेचा सखोल अभ्यास करून अदृश्य चित्रातील सिल्व्हर सल्फाइडाचे मुख्य कार्य नमूद केले. प्रकाशनाने सिल्व्हर सल्फाइडाच्या अगदी सूक्ष्म कणाचे मोठ्या चांदीच्या कणात रूपांतर होते आणि त्यामुळे विकाशन प्रक्रियेत विकाशकाचा परिणाम होण्यास योग्य स्थान मिळते.


ज्यावेळी पायसाचे कॅमेऱ्यातून प्रकाशन केले जाते त्यावेळी त्यावर एक अदृश्य चित्र निर्माण होते (आ. १ अ) आणि जोपर्यंत त्याचे विकाशन होत नाही तोपर्यंत ते तसेच राहते म्हणून रासायनिक विद्रावाने त्याचे विकाशन करावे लागते. चित्राला ज्या प्रमाणात प्रकाश मिळाला असेल त्या प्रमाणात ते विकाशनानंतर काळे होते (आ. १ आ). चित्र किती प्रमाणात काळसर होते त्यास त्याची घनता म्हणतात. व्यस्त प्रतीची घनता तीतील विकाशित चांदीच्या कणांवर अवलंबून असते. एखाद्या भागात जितके चांदीचे कण अधिक तितकी तिची घनता जास्त असते. पायसात जे सिल्व्हर हॅलाइडाचे स्फटिक असतात त्यांचेच रूपांतर विकाशनानंतर चांदीच्या काळ्या कणांत होते व या पद्धतीने संपूर्ण व्यस्त प्रत तयार होते.

छायाचित्रणाच्या आधुनिक पायसात दोन प्रकारची सिल्व्हर हॅलाइडे वापरतात. एकाच्या वापराने संवेदनशीलता ठराविक आकारमानाच्या   कणासाठी जास्तीत जास्त असते व दुसऱ्यात विकाशनाच्या व स्थिरीकरणाच्या सोयीसाठी संवेदनशीलतेला कमी महत्त्व दिले जाते. सिल्व्हर क्लोराइडापेक्षा सिल्व्हर ब्रोमाइड जास्त संवेदनशील असते म्हणून त्याचा उपयोग साधी व्यस्त फिल्म व क्ष-किरण फिल्मच्या पायसासाठी करतात.

सिल्व्हर क्लोराइड जरी कमी संवेदनशील असले, तरी त्याचे चटकन विकाशन करता येते म्हणून त्याचा उपयोग छायाचित्रणाचे कागद बनविण्यासाठी करतात. अर्थात सर्व कागदावर एकाच प्रकारच्या पायसाचे लेपन करीत नाहीत. त्यासाठी निरनिराळ्या प्रमाणांत सिल्व्हर ब्रोमाइड व क्लोराइड वापरतात.

छायाचित्रणाची संवेदनशील साधने : छायाचित्रणाच्या सुरुवातीच्या काळात छायाचित्रकार त्यांना लागणारे संवेदनशील साहित्य स्वतःच तयार करीत असत. १८८० साली जॉर्ज ईस्टमन यांनी छायाचित्रणाच्या काचा प्रथम अमेरिकेत बनविल्या व त्यांचा प्रसार पुढे यूरोपात झाला. छायाचित्रणासाठी नित्याच्या व्यवहारात काचा, फिल्म व कागद यांचा उपयोग करतात. संवेदनशील पायसाचा लेप देऊन ते तयार करून विविध आकारमानांत, राशीत व जाडीत बनवितात.

काचा : लहानात लहान काचा ३·५ सेंमी. चौरसापासून ते ३८·१ x ३०·४ सेंमी. किंवा त्याहून मोठ्या आकारमानात उपलब्ध असतात. काचा नेहमी एका जाडीच्या व सरळ लागतात, त्यांत कोठेही दोष म्हणजे बुडबुडे असलेले चालत नाहीत. प्रथम त्या स्वच्छ करून नंतर त्यांवर क्रोम-ॲलम (क्रोमियम-पोटॅशियम सल्फेट) घातलेल्या जिलेटिनाचा एक पातळसा थर देतात. त्यामुळे संवेदनशील पायसाचा थर काचेला घट्ट चिकटून बसतो. पायसलेपनासाठी आडव्या दिशेने फिरणाऱ्या पट्ट्यावर काचा ठेवतात व त्यांवर एका फटीद्वारे एकाच जाडीचा पातळसा थर दिला जातो. थर दिल्यावर काचा एकापुढे एक सरकत थंड जागेत जातात. या ठिकाणी जिलेटीन घट्ट होते व शेवटी त्या एका कपाटासारख्या जागेत नेऊन तेथे सावकाशपणे वाळविल्या जातात. काही प्रकारच्या काचांच्या मागच्या बाजूला परावर्तनरोधी रंजकाचा थर देतात. पायस वाळल्यावर काचांची तपासणी करून त्यांतील फक्त चांगल्या निवडतात. निवडल्यानंतर त्या पाहिजे त्या आकारमानात कापतात आणि बाहेरील हवा व प्रकाश लागू नये म्हणून त्यांवर काळ्या व जलरोधी कागदाचे भरपूर वेष्टन गुंडाळून पेट्यांत भरतात. असेच वेष्टन सर्व उत्पादित संवेदनशील साधनांसाठी वापरतात.

तयार काचेचे जसे आकारमान असेल त्या प्रमाणात तिची जाडी ठरविलेली असून ती एक ते पाच मिमी. पर्यंत असते. आता काचांची जागा बऱ्याच प्रमाणात लवचिक फिल्मने घेतलेली असली तरी मुद्रणकाम, शास्त्रीय संशोधन, वर्णपटलेखन, खगोलशास्त्र यांसाठी खास आकारमानाच्या व जाडीच्या काचा मुद्दाम तयार करतात.

फिल्म : काचा वजनास जड व शिवाय फुटण्याचा संभव असल्यामुळे त्यांचा वापर आता कमी झालेला असून फिल्मचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सु. १५० सेंमी. रुंद व ६०० मी. लांब अशा कच्च्या फिल्मवर पायसलेपन करतात व वाळलेल्या चक्रीतून पाहिजे त्या आकाराचे तुकडे किंवा गुंडाळ्या तयार करतात. फिल्म दोन प्रकारांत उपलब्ध असते : जाड कागदाप्रमाणे व गुंडाळीप्रमाणे. जाड फिल्मची अंधारात योग्य बाजू व पायसलेपन कोणत्या प्रकारचे आहे, हे समजावे म्हणून प्रत्येक तुकड्याच्या एका कोपऱ्यात कातऱ्या करतात. काचेप्रमाणे फिल्मवर पण मागच्या बाजूला परावर्तनरोधी रंजक लावतात. तयार झालेल्या फिल्मवर चरे पडू नयेत म्हणून तीवर शेवटी आणखी एका रसायनाचा थर देतात. गुंडाळी म्हणजे रोल फिल्म आतून काळ्या व बाहेरून लाल, हिरव्या किंवा काळ्या रंगाच्या कागदाच्या आतल्या बाजूस एकाच बाजूने चिकटवून चक्रीवर गुंडाळतात. गुंडाळी फिल्मचा खुणेचा आकडा चक्रीच्या बाजूच्या छिद्राचा आकार व तिची रुंदी यांवर अवलंबून असतो. १२० व ६२० क्रमांकाच्या गुंडाळ्या नेहमी वापरण्यात येतात. छोट्या आकारमानात चित्रण करण्यासाठी ३५ मिमी. फिल्म वापरतात. तिच्यात २० व ३६ छायाचित्रे निघतात. ती एका निराळ्या डबीतून विकली जाते.

फिल्मवर पायसाचे लेपन यंत्रांच्या साहाय्याने केले जाते. लेपन क्रियेत तापमान नियंत्रण आवश्यक असते. आधुनिक यंत्रांद्वारे एकाच वेळी १२ मी. रुंद व ६०० मी. लांब फिल्मवर पायसलेपन करतात. नंतर योग्य त्या लांबी-रुंदीच्या गुंडाळ्या यंत्रानेच करतात आणि त्या आवेष्टित करून बाजारात पाठवितात. 

चित्राच्या आकारमानात वाळल्यानंतर फरक पडणार नाही, अशी फिल्म नकाशाच्या कामासाठी लागते म्हणून ती पीव्हीसी, पॉलिस्टायरीन इत्यादींपासून बनवितात. 

क्ष-किरणाच्या फिल्मवर दोन्ही बाजूंनी पायसलेपन करतात. म्हणून तिच्या प्रत्येक तुकड्यासाठी कागदाचे स्वतंत्र वेष्टन करतात.  

रंगीत फिल्म बनविण्याचे काम फार गुंतागुंतीचे असते कारण ती बनविताना एकावर एक असे सात ते नऊ थर द्यावे लागतात. काही काचा व फिल्मांवरील पायस अशा प्रकारे बनवितात की, ते संस्करणानंतर मूळ आधारकावरून सुटे करता येते व नंतर ते पाहिजे असेल त्या ठिकाणी परत लावता येते. 


कागद : छायाचित्रणाच्या कागदासाठी लागणारा आधारक कागद लाकडापासून बनविलेल्या शुद्ध लगद्यापासून व चिंध्यांच्या लगद्यापासून तयार करतात. तो बहुधा मोठ्या गिरण्यांतच तयार करतात. या कागदात कोणत्याही प्रकारचा कचरा, रसायन, लोह, तांबे यांचा लवलेशही चालत नाही. संस्करणाच्या वेळी पाणी, अम्ले व क्षार यांचा बऱ्याच प्रमाणात त्यावर वापर करावा लागतो म्हणून तो पाणी कमी प्रमाणात शोषून घेईल असा बनवावा लागतो.  

छायाचित्रे सुंदर व तेजस्वी दिसावीत म्हणून संवेदनशील पायसलेपनापूर्वी कागदावर बेरियम सल्फेटमिश्रित जिलेटिनाचा थर देतात. कागदाचे जाड, पातळ, चकचकीत, साधा इ. अनेक प्रकार असतात. त्याचप्रमाणे त्यावर लावलेल्या पायसाचे पण चार-पाच प्रकार असतात. त्यामुळे कोणत्याही व्यस्त प्रतीवरून पाहिजे तशी सम प्रत कागदावर मिळू शकते. नकाशे, मुद्रण व्यवसाय व ग्रंथालयीन कामासाठी स्वतंत्र प्रकारचे कागद बनवितात. ज्या पद्धतीने पायसलेपन फिल्मवर करतात, त्याच पद्धतीने ते कागदावर करतात व त्याचे तुकडे करून काळ्या कागदाच्या पिशवीत भरतात. 

काचा, फिल्म व कागद बनविताना निर्मितीच्या प्रत्येक टप्प्याला ते तपासले जातात. तसेच तयार माल गुंडाळण्यासाठी लागणारा कागद, पुठ्ठे इ. सामान मुद्दाम तयार करून घेतात. त्यामुळे आतील मालावर हवेतील ओलाव्याचा व उष्णतेचा परिणाम होत नाही.

उष्ण कटिबंधीय आवेष्टन : उष्ण व दमट हवेत वेष्टनाच्या कागदातून थोड्या तरी प्रमाणात हवेतील ओलावा छायाचित्रणाच्या संवेदनशील काचा, फिल्म किंवा कागदापर्यंत जातो व त्यामुळे आतील माल खराब होतो. अशा रीतीने खराब झालेल्या मालातील दोष संस्करणानंतरच दिसतात. त्यापैकी प्रमुख म्हणजे असा माल धूसर किंवा ढगाळलेला दिसतो म्हणून आता छायाचित्रण साहित्य धातूच्या अतिपातळ कागदात निर्वात मुद्रिते करून थंड जागेत ठेवतात. थंड जागेतून काढलेला माल ताबडतोब न वापरता तो एक दिवस बाह्य तापमानात ठेवून मगच वापरावा लागतो. 

आ. २. कणिरका : (अ) पायसातील सिल्व्हर हॅलाईडाचे मोठे स्फटिक, (आ) पायसातील सिल्व्हर हॅलाईडाचे लहान स्फटिक.

कणिका : चित्र निर्माण करणाऱ्या चांदीच्या कणिका पायस थरात जिकडे तिकडे सारख्या पसरलेल्या असतात. व्यस्त प्रतीचे जेव्हा मोठ्या आकारमानाच्या छायाचित्रासाठी वर्धन केले जाते तेव्हा त्या कणिका ओबडधोबड दिसून चित्रातील स्पष्टता कमी होते. १९२० साली ३५ मिमी.चे कॅमेरे जेव्हा प्रचारात आले तेव्हा या कणिकांबद्दल प्रश्न उभा राहिला. वेगवान फिल्मवर मोठ्या आकारमानाच्या कणिका जास्त आढळतात, तसेच त्याची वृद्धी विकाशकातील रसायनांवर अवलंबून असल्यामुळे सूक्ष्म-कणिकाकारी विकाशक वापरून त्या सूक्ष्म करता येतात. अशा विकाशकात क्षाराचे प्रमाण कमी ठेवून त्यात सिल्व्हर हॅलाइड विरघळण्यासाठी अल्प प्रमाणात पोटॅशियम थायोसायनेट वापरतात. कणिका सूक्ष्म बनण्यासाठी विकाशक रसायन म्हणून पॅराफिनिलीन डाय-अमाइनाचा प्रामुख्याने वापर करतात.


(इ) अविकाशित कणिका, (ई) विकाशित कणिका.

 

वर्ण-संवेदनशीलता : आपल्या समोर दिसणाऱ्या कोणत्याही दृश्यातील रंगांचे योग्य छटांत काळ्या पांढऱ्या रंगाच्या छायाचित्रात रुपांतर करण्याशी वर्ण-संवेदनशीलतेचा संबंध आहे. छायाचित्रणाच्या साध्या फिल्मांचे किंवा काचांचे विकाशन लाल प्रकाशात करतात, याचा अर्थ असा की, त्यांचे पायस सर्व रंगांना संवेदनशील नाही आणि त्यावर समोर दिसणाऱ्या दृश्यातील रंगांचे रूपांतर बरोबर येणार नाही. मानवी डोळ्याला दिसणारे काही रंग छायाचित्रात मुळीच येत नाहीत, तर फिक्कट दिसणारे जास्त काळे येतात. साधे सिल्व्हर हॅलाइड फक्त जांभळ्या आणि निळ्या रंगाला संवेदनशील असते. त्यामुळे रंग बरोबर येत नाहीत. हेरमान फोगेल यांनी १८७३ साली असा शोध लावला की, पायसात रंजक घातल्याने त्याची वर्ण-संवेदनशीलता वाढविता येते. त्यांचा हा शोध छायाचित्रणातील महत्त्वाचा मानण्यात येतो. पायस हिरव्या रंगाला संवेदनशील बनविण्यासाठी त्यात लाल रंजक घालतात. 

आज जी निरनिराळी संवेदनशील पायसे वापरण्यात येतात, त्यांचे खालील चार मुख्य प्रकार पडतात. (१) साधे पायस : हे फक्त जांभळ्या आणि निळ्या रंगांना संवेदनशील असते म्हणून पिवळसर रंगाच्या प्रकाशात ते हाताळता येते. (२) समवर्णी (ऑर्थोक्रोमॅटिक) पायस : हे पायस जांभळ्या, निळ्या, हिरव्या आणि पिवळ्या रंगाना संवेदनशील असते म्हणून ते लाल रंगाच्या प्रकाशात हाताळता येते. वेगवान समवर्णी पायस काही प्रमाणात लाल रंगालासुद्धा संवेदनशील असते. (३) समग्रवर्णी (पॅनक्रोमॅटिक) पायस : हे पायस वर्णपटातील सर्व रंगाना संवेदनशील असते. हिरव्या रंगाला ते कमी संवेदनशील असते म्हणून मंद गती फिल्म हिरव्या प्रकाशात लांब अंतरावरून हाताळता येते. समग्रवर्णी पायसाचे दोन प्रकार असतात. त्यांतील एक लाल रंगाला फार संवेदनशील असून ते कृत्रिम प्रकाशातील छायाचित्रणास चांगले असते. दुसरे पायस सम-समग्रवर्णी (ऑर्थो-पॅन) या नावाने ओळखले जाते. त्यावर सगळे रंग अगदी बरोबर येतात. अधि- समग्रवर्णी (सुपर-पॅन) या नावाने ओळखली जाणारी फिल्म कृत्रिम प्रकाशातील छायाचित्रणासाठी अधिक योग्य असते. (४) अवरक्त पायस : हे पायस खास वैज्ञानिक अवरक्त छायाचित्रणासाठीच तयार केलेले असते.

यांशिवाय वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधनासाठी अनेक प्रकारच्या पायसलेपन केलेल्या काचा व फिल्म बनवितात. 

प्रकाशसंवेदनशीलता : सिल्व्हर हॅलाइड प्रकाशसंवेदनशीलता असल्यामुळे त्याचा पायसात प्रमुख्याने उपयोग करतात. या प्रकाशसंवेदनशीलतेला वेग म्हणतात. कमीत कमी प्रकाशानाने विकाशनानंतर पायस किती काळसर होते यावर हा वेग आजमावतात. प्रकाशनाचा काळ जितका कमी तितका फिल्मचा वेग जास्त समजतात. फिल्म वापरण्याच्या दृष्टीने तिचा वेग किती आहे, हे समजणे महत्त्वाचे असल्यामुळे छायाचित्रणाच्या सर्व साहित्याच्या वेष्टनांवर वेग नमूद केलेला असतो.

संवेदनक्षमतामापन : छायाचित्रण संवेदनक्षमतामापन म्हणजे छायाचित्रण पायसावर पडणाऱ्या प्रकाशाचे व त्याच्या विकाशनानंतर मिळणाऱ्या चित्राचे मोजमापन. हे मोजमापन करण्यासाठी छायाचित्र येण्यासाठी लागणाऱ्या सर्व निर्मिती घटकांचा विचार करून मिळणाऱ्या आकड्यांवरून घनता व प्रकाशनाचा लॉगरिथम यांचा एक आलेख तयार करतात. त्याचा आकार इंग्रजी S या अक्षरासारखा दिसतो आणि तो अभिलक्षण वक्र या नावाने ओळखतात. 

आ. ३. अभिलक्षण वक्र

एफ्. हूर्टर आणि व्ही. सी. ड्रिफिल्ड यांनी १८९० साली ‘प्रकाश- रासायनिक अनुसंधाने आणि छायाचित्रणाच्या संवेदनशील साधनांच्या संवेदनक्षमतेच्या निर्धारणेची नवी पद्धत’ या विषयांवर एक प्रबंध लिहील्यामुळे संवेदनक्षमतामापनाच्या आधुनिक शास्त्राचा पाया घातला गेला आणि त्यामुळे अंदाजाने ठोकताळे करण्याचे कारण पडेनासे झाले. 

अभिलक्षण वक्रामुळे फिल्म, काच किंवा कागद यांच्या संवेदनक्षमता, प्रकाश मर्यादा व मूळ दृश्यातील वर्णछटांचे वा छाया-प्रकाशाचे यथातथ्य चित्रण या गुणधर्मांचा बोध होतो. या वक्राचे तीन मुख्य भाग असतात : (१) पाया अआ, (२) सरळ रेषा आइ आणि (३) ‘खांदा’ इई. आइ रेषा जर खाली वाढविली, तर ती प्रकाशन अक्षास येथे कापते. तेथील प्रकाशनाच्या मूल्याला पायसाची संवेदनात्मक एच आणि डी निरूढी म्हणतात व आइ रेषेने प्रकाशन अक्षाशी केलेल्या कोनास α (आल्फा) म्हणतात. हा कोन फार महत्त्वाचा आहे. त्याच्या त्रिकोणमितीय स्पर्श गुणोत्तराला म्हणजे आइ रेषेच्या उताराला गॅमा म्हणतात आणि तो γ (गॅमा) या ग्रीक अक्षराने दर्शवितात. त्याचा उल्लेख छायाभेद दर्शविण्यासाठी करतात. अभिलक्षण वक्राच्या आइ या सरळ रेषेच्या प्रकाशन अक्षावर पडणाऱ्या आ’इ’ या प्रक्षेपास मर्यादा म्हणतात व तिच्यावरून प्रकाशन अक्षावरील अ’ पासून इ’ पर्यंतच्या अंतरात व्यस्त प्रतीमधील तेजस्वीपणातील फरक समजू शकतो. 

हूर्टर व ड्रिफिल्ड यांच्या वेळी वेगवान संवेदनशील साहित्य उपलब्ध नसल्यामुळे आइ या सरळ रेषेवरून प्रकाशन बरोबर कळत असे, पण जेव्हा वेगवान साहित्य तयार होऊ लागले तेव्हा या अभिलक्षण वक्राचा उपयोग पाहिजे तसा होईनासा झाला. एल्. ए. जोन्स यांनी बऱ्याच संशोधनानंतर असे दाखविले की, कमीत कमी प्रकाशन करून जास्त चांगली प्रत देणारे प्रकाशन महत्त्वाचे आहे आणि सरळ रेषेच्या पायाच्या जवळच असे कमीत कमी प्रकाशन समजते. अभिलक्षण वक्राच्या या भागास ‘किमान चढ’ म्हणतात.  

संवेदनशील साहित्याचा वेग दर्शविण्यासाठी भिन्न पद्धती उपयोजिण्यात आलेल्या होत्या, परंतु त्या निरनिराळ्या रींतींवर आधारलेल्या असल्यामुळे एकमेकींत रूपांतर करणे शक्य होत नसे. अलिकडे संवेदनशील साहित्यावर एएसए (ASA, अमेरिकन स्टँडर्ड्स ॲसोसिएशन) किंवा डीआयएन (DIN, Deutsche Industrie Normal ) या एककांमध्ये किंवा दोन्हींत त्याचा वेग निर्दिष्ट करतात. या दोन पद्धतींच्या प्रमाणात बराच फरक आहे. एएसए पद्धतीत आकडे साध्या आकड्यात लिहितात म्हणजे वीस आकड्याची फिल्म दहाच्या पेक्षा दुप्पट वेगवान असते, तर डीआयएन पद्धतीत ते लॉगरिथमीय असून ते अंशात लिहितात. तीन अंशानी जास्त असलेली फिल्म दुप्पट वेगवान असते किंवा १४ फिल्म ११ च्या फिल्मपेक्षा दुप्पट वेगवान असते. वरील दोनपद्धतींशिवाय बीएस ( BS, ब्रिटिश स्टँडर्ड्स ), शायनर, वेस्टन इ. पद्धतीही वेळोवेळी वापरात आलेल्या होत्या.


छायाचित्रण छटानिर्मिती : छायाचित्रात आपण अगदी पांढऱ्या रंगापासून दाट काळ्या रंगापर्यंत अनेक छटा पाहतो. खरे म्हणजे ते असंख्य छटांनीच तयार झालेले असते. या छटा जितक्या जास्त असतील तितके छायाचित्र अधिक उत्तम होते. ही गोष्ट एकाच व्यस्त प्रतीवरून मंद, मध्यम आणि ठळक अशा तीन निरनिराळ्या प्रतींच्या कागदावर सम प्रत काढल्यावर लक्षात येते. 

ज्या वेळी आपण एखादे दृश्य पाहतो तेव्हा त्याचे छायाचित्र अगदी त्यासारखेच यावे असे वाटते, परंतु काही वेळा त्यात फरक पडतो. मूळ दृश्याचे फिल्मवर प्रकाशन केल्यापासून शेवटी सम प्रत तयार होईपर्यंत जे निरनिराळे टप्पे असतात त्यांवर छायाचित्राचे अंतिम स्वरूप अवलंबून असते. पुढीलपैकी कोणत्याही एखाद्या बाबतीत फरक झाला, तरी छायाचित्र निराळे दिसण्याची शक्यता असते : दृश्यात दिसणारा प्रकाश, ते घेण्यासाठी वापरलेल्या फिल्मची वर्ण-संवेदनशीलता, तिचा अभिलक्षण वक्र, प्रकाशन, विकाशक, छायाचित्र छपाई किंवा वर्धनासाठी वापरलेले साधन आणि प्रकाश, छपाई कागदाचा दर्जा, त्याचे विकाशन व तयार प्रत पहावयाची पद्धत.

तयार छायाचित्रात मिळणाऱ्या छटांचा प्रश्नाकडे बऱ्याच छायाचित्रकारांचे लक्ष वेधले गेले आणि त्यासाठी त्यांनी सुधारणा सुचविल्या. एल्. ए. जोन्स यांनी या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेली आहे. 

आ. ४. विभेदनक्षमता शोधक तक्ता

विभेदनक्षमता : एखाद्या दृश्याचे प्रकाशीय पद्धतीने किंवा छायाचित्रणाच्या साहाय्याने सुस्पष्ट चित्रण करण्याच्या क्षमतेला विभेदनक्षमता म्हणतात. छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या भिंगावर आणि फिल्मवर विभेदनक्षमता अवलंबून असते.

अतिशय जवळजवळ आणि समांतर रेषांच्या आकृतीचे चित्रण लहान आकारमानात करून विभेदनक्षमतेची कल्पना येते कारण तिचे चित्रण करताना एक वेळ अशी येते की, जवळजवळच्या रेषा स्वतंत्र व स्पष्ट न दिसता एकत्रित झालेल्या दिसतात. फिल्मच्या एक मिमी. अंतरात किती रेषांचे स्पष्ट चित्रण करता येते, यावर फिल्मची आणि भिंगाची विभेदनक्षमता दर्शविली जाते. आ.४ मध्ये विभेदनक्षमता निश्चित करण्याच्या तक्त्याचा एक प्रकार दाखविला आहे. 

छायाचित्रणातील संस्करण : छायाचित्रणाच्या फिल्मवर अथवा काचेवर दृश्य चित्र येण्यासाठी तिचे कॅमेऱ्यातून किंवा दुसऱ्या अन्य मार्गाने प्रकाशन करतात. या प्रकाशनामुळे एक अदृश्य चित्र तीवर तयार होते. ते चित्र दृश्य करण्यासाठी जी रासायनिक प्रक्रिया तीवर करतात त्याला संस्करण म्हणतात.

प्रकाशसंवेदनशील साहित्याच्या संस्करणाचे चार प्रमुख विभाग पडतात : (१) विकाशन, (२) अम्ल धुलाई, (३) स्थिरीकरण आणि (४) अंतिम धुलाई.

विकाशन : विकाशन विद्राव तयार करण्यासाठी निरनिराळी सूत्रे वापरण्यात येत असून बहुतेक सर्वांचे मुख्य घटक चार असतात (अ) प्रमुख विकाशक, (आ) त्वरक, (इ) रक्षक व (ई) रोधक. 

विकाशनाच्या प्रक्रियेत प्रकाशन झालेल्या भागातील सिल्व्हर हॅलाइडाचे क्षपण होऊन त्याचे रूपांतर धातुरूप चांदीमध्ये होते. ज्या रसायनामुळे हे विकाशन घडून येते, त्याला विकाशक म्हणतात. विकाशक फिनॉल वा अमाइन वर्गात मोडतात. हायड्रोक्विनोन, मेटॉल, फेनिडॉन इ. रसायने विकाशक म्हणून वापरतात.

साध्या पाण्यात बऱ्याच वेळा क्षार असतात. ही रसायने जर त्यात विरघळवली, तर हवेतील ऑक्सिजनाबरोबर ती पण मिसळतात आणि एक प्रकारचा काळपट पदार्थ बनून ती नाश पावतात. परंतु त्यांत जर सोडियम सल्फाइट घातले, तर ही क्रिया फारच सावकाशपणे चालते म्हणून विकाशकाचा विद्राव साध्या पाण्यात तयार करावयाचा असल्यास त्यात चिमूटभर सोडियम सल्फाइट घालतात. विकाशक म्हणून मेटॉल किंवा हायड्रोक्विनोन किंवा दोन्हींचा वापर करतात. विकाशकाचा वेग त्यातील क्षारतेच्या प्रमाणावर (pH मूल्यावर, ⟶ पीएच मूल्य) अवलंबून असतो म्हणून त्यात काही प्रमाणात क्षार घालावे लागतात, त्यांना त्वरक म्हणतात. सोडीयम कार्बोनेट व टाकणखार, दाहक (कॉस्टिक) सोडा, कोडाल्क इत्यादींचा वापर यासाठी करतात. छायाचित्रात रेखीव आकृतीत असतो तसा छायाभेद जर हवा असेल, तर दाहक सोडा वापरून pH वाढवितात. याउलट व्यस्त प्रतीत जर तो कमी हवा असेल, तर टाकणखाराचा वापर करतात. 

रक्षक म्हणून सोडियम सल्फाइड वापरतात. त्यामुळे हवेतील ऑक्सिजनाने विकाशक खराब होत नाही.  

विकाशनाच्या विद्रावात जर विकाशक रसायन, क्षार व रक्षक एवढीच रसायने घातली, तर फिल्मवर ज्या ठिकाणी प्रकाशन झालेले नाही अशा जागी पण धातुरूप चांदी लवकर तयार होऊ लागते आणि त्यातील अप्रकाशित व प्रकाशित भाग धूसर बनून शेवटी ती काळसर होते. याकरिता विकाशकात पोटॅशियम ब्रोमाइड हे रोधक रसायन म्हणून वापरतात. 

विकाशित चित्राची घनता त्यच्यावरील पायस कोणत्या प्रकारचे आहे, प्रकाशन व विकाशन किती वेळ झाले तसेच विकाशकाचे तापमान, त्याची विरलता (विद्रावातील विकाशकाचे प्रमाण), हाताळताना होणारे त्याचे चलनवलन व त्याचे घटक यांवर अवलंबून असते. 

विकाशन जास्त वेळ चालू ठेवले, तर पायसावर काळपटपणा येतो आणि छायाचित्रातील बारकावे दिसेनासे होतात. विकाशकाचे तापमान कमी असेल, तर विकाशन सावकाश होते. याउलट जर ते जास्त असेल, तर विकाशन जलद होऊन पायसातील जिलेटीन फुगेल आणि काही ठिकाणचे निघून येईल किंवा ते वाळल्यावर जालिकामय दिसेल. म्हणून संस्कारणासाठी लागणाऱ्या पाण्यासकट सर्व विद्रावांचे तापमान एकच ठेवतात. साधारणपणे १८ से. इतक्या तापमानात संस्करण केल्यास ते चांगले होते, असे मानण्यात येते.

प्रकाशित केलेली फिल्म किंवा कागद विकाशकात टाकल्याबरोबर चित्र दिसावयास लागत नाही. विकाशक हळूहळू सगळीकडे लागल्यावर चित्र दिसावयास लागते आणि ज्या वेळी ते योग्य उठावाचे दिसते तेव्हा विकाशनाची क्रिया अम्ल धुलाईने रोखून पुढे स्थिरकाचा वापर करतात. विकाशन आणि त्यानंतरच्या सर्व कृती करताना फिल्म किंवा कागद संस्करण विद्रावात एकसारखे वर-खाली करावे लागतात. 

विकाशकाचा वापर किती झाला यावर त्याची कार्यशीलता अवलंबून असते म्हणून ज्या ठिकाणी विकाशनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालते त्या ठिकाणी ज्या प्रमाणात विकाशकाचा वापर झाला असेल त्या प्रमाणात त्यात क्रियाशील घटकांचे प्रमाण कायम राखण्यासाठी काही रसायने घालतात. त्यामुळे विकाशक परत वापरता येतो. या रसायनांना पुनरोद्धारक म्हणतात.

अम्ल धुलाई : विकाशनानंतर विकाशनाची क्रिया पूर्णपणे थांबावी आणि त्यातील रसायने स्थिरकात जाऊ नयेत म्हणून अम्ल धुलाईची जरूरी असते. यासाठी ग्लेशियल अँसिटिक अम्लाचे काही थेंब पाण्यात टाकून त्यातून फिल्म वा कागद १० ते १२ सेकंदापर्यंत बुडवून काढतात.


स्थिरीकरण : विकाशनाच्या वेळी ज्या सिल्व्हर हॅलाइडाच्या कणांचे धातुरूप चांदीमध्ये रूपांतर होत नाही, ते सर्व स्थिरकात विरघळले जातात. या प्रक्रियेमुळे रूपांतर झालेल्या धातुरूप चांदीला काहीच बाधा होत नाही. स्थिरीकरणासाठी हायपोचा म्हणजे सोडियम थायोसल्फेटाचा वापर करतात. स्थिरीकरण जर चटकन व्हावयास पाहिजे असेल, तर हायपोच्या ऐवजी अमोनियम थायोसल्फेट वापरतात. विकाशक जर वापरलेल्या स्थिरकात गेला, तर स्थिरक गढूळ होतो म्हणून तो तयार करताना त्यात ॲसिटिक अम्ल घालतात. तसेच फिल्म किंवा कागदावरील पायस फुगून सुटू नये म्हणून त्यात साधी तुरटी (ॲलम) घालतात. यांशिवाय रक्षक म्हणून सोडियम सल्फाइटाचा वापर करतात. 

अंतिम धुलाई : स्थिरीकरणासाठी वापरलेली रसायने थोड्या प्रमाणातही जर फिल्मवर किंवा कागदावर राहिली, तर काही काळानंतर त्यांच्या रंगात फरक पडून चित्र फिके झालेले किंवा डागळलेले दिसते म्हणून फिल्मसाठी अंतिम धुलाई वाहत्या पाण्यात कमीत कमी अर्धा तास करावी लागते, तर कागदासाठी ती यापेक्षा जास्त करणे इष्ट ठरते.

छायाचित्रणाच्या निरनिराळ्या प्रकारच्या काचा, फिल्म व कागद यांसाठी विकाशक व स्थिरक स्वतंत्र प्रमाणात बनवावे लागतात. त्यांची अनेक सूत्रे असतात. छायाचित्रकार सुट्ट्या घटकांपासून जरूर त्या प्रमाणात विकाशक, स्थिरक व इतर विद्राव स्वतः तयार करू शकतो किंवा ते तयार स्वरूपात उपलब्ध असलेलेही वापरू शकतो. 

आर्द्रताकारक : ज्या वेळी फिल्म प्रक्रिया करण्यासाठी पाण्यात वा विकाशन विद्रावात बुडवितात त्या वेळी फिल्मचा पृष्ठभाग ओलसर नसल्यामुळे त्यावर हवेचे बारीक बारीक बुडबुडे तयार होतात, तसेच विकाशन विद्राव सारख्या प्रमाणात फिल्मवर पसरत नाही म्हणून विकाशनानंतर तिच्यावर काहीवेळा सूक्ष्म छिद्रासारखे ठिपके येतात आणि ती ढगाळलेली दिसते. अशा प्रकारे फिल्म खराब होऊ नये म्हणून एक रसायन पाण्यात टाकतात त्यास आर्द्रताकारक म्हणतात. आर्द्रताकारकामुळे पाण्याचा वा पाण्यात केलेल्या विद्रावाचा पृष्ठताण कमी होतो व त्यामुळे पाणी वा विद्राव फिल्मवर एकसारखे व चटकन पसरतात. आर्द्रताकारक अत्यल्प प्रमाणात ( हजार भागांत एक वा त्यापेक्षाही कमी भाग) वापरला तरी चालतो. तो द्रव किंवा चूर्ण स्वरूपात वापरतात. आर्द्रताकारकाचा वापर फिल्म धुण्याच्या शेवटच्या पाण्यात केला, तर ती सुकतेवेळी तिच्यावरील पाण्याचा अंश लवकर निथळतो व त्यामुळे ती चटकन वाळते आणि ती सुकल्यावर तिच्यावर काही वेळा पडतात तसे पांढरे डाग पडत नाहीत. 

व्युत्क्रमी संस्करण : व्युत्क्रमी (उलट दिशेने केलेल्या) संस्करणाच्या पद्धतीने ज्या माध्यमावर व्यस्त प्रत तयार होते, त्यावरच सम प्रत निर्माण करता येते. या पद्धतीत नेहमीप्रमाणे संवेदनशील साहित्यावर पाहिजे त्या चित्राचे प्रकाशन करतात. नंतर त्याचे जरा क्रियाशील विकाशकाने विकाशन करून धुलाई करतात. विकाशित चित्राचे यानंतर पोटॅशियम डायक्रोमेटाच्या अम्लासहित विद्रावाच्या साह्याने विरंजन (रंगविहीन) करतात. येथपर्यंतची सर्व कृती काळोखातच वा सुरक्षा दीपाच्या (ज्याच्या प्रकाशाचा प्रकाशसंवेदनशील साहित्यावर परिणाम होत नाही अशा दीपाच्या) प्रकाशात करावी लागते. फिल्मवरील चित्र काढून टाकल्यावर तिचे प्रखर प्रकाशात थोडा वेळ प्रकाशन करून तिचे परत विकाशन व स्थिरीकरण करतात, त्यामुळे नवी सम प्रत तयार होते. या पद्धतीचा उपयोग पारदर्शिका बनविण्यासाठी मोठ्या करतात. ज्यावेळी ८ किंवा १६ मिमी.च्या चलच्चित्रपटाची एकच प्रत हवी असेल तेव्हा ह्याच पद्धतीने तिचे संस्करण करतात. उलट संस्करण करावयाचे असल्यास प्रकाशन बरोबर असावे लागते.

आ. ५. व्युत्क्रमी संस्करणातील टप्पे : (१) चित्रविषय, (२) प्रथम विकाशन, (३) प्रथम विकाशनात तयार झालेल्या चित्राचे विरंजन, (४) दुसरे विकाशन (विरंजनानंतर उरलेल्या सिल्व्हर हॅलाइडाचे), (५) चित्र विषयाचे मिळणारे छायाचित्र.

रंगपालट : छायाचित्रे नेहमी काळ्या पांढऱ्या रंगात येत असली, तरी रासायनिक प्रक्रियेने त्यांचे रूपांतर पाहिजे त्या रंगात करता येते. अशा प्रकारे रंगपालट केलेली छायाचित्रे दीर्घ काळ टिकतात. तपकिरी रंगात पालट केलेली व्यक्तिचित्रे अधिक लोकप्रिय असतात. ज्यावेळी चित्रपट रंगीत बनविता येत नव्हते तेव्हा अशाच एखाद्या रासायनिक प्रक्रियेने त्यांचा रंगपालट करीत असत. निळसर रंगातील चांदण्यातील किंवा रात्रीची दृश्ये लोकप्रिय होत असत. 

रंगपालटाकरिता वापरलेल्या पदार्थानुसार त्याचे तीन प्रमुख प्रकार पडतात : (१) सल्फाइड, (२) धातवीय लवणे व (३) रंजक.

सल्फाइड रंगपालट : सल्फाइडाचा वापर करून छायाचित्रास तपकिरी रंग आणता येतो. या पद्धतीत छायाचित्रणाच्या ब्रोमाइड कागदावर घेतलेली छायाचित्रे प्रथम पोटॅशियम फेरिसायनाइड व पोटॅशियम ब्रोमाइड यांच्या पाण्यातील विद्रावात चित्राचे विरंजन होईपर्यंत ( २ ते ३ मिनिटे) ठेवतात. नंतर स्वच्छ पाण्याने धुलाई केल्यावर छायाचित्रे सोडियम सल्फाइडाच्या पाण्यातील विद्रावात टाकतात. थोड्या वेळातच ( ३० ते ६० सेकंदांतच) ती दाट तपकिरी रंगात पालटतात. यानंतर ती स्वच्छ पाण्यात धुवून वाळवितात. सोडियम सल्फाइडाचा विद्राव फार वेळ टिकत नाही म्हणून तो जरूर असेल तेव्हाच तयार करणे इष्ट ठरते. सोडियम सल्फाइडाऐवजी बेरियम सल्फाइड वापरल्यास छायाचित्राला तपकिरी रंग जलद येतो. पाण्यातील किंवा उपकरणाला लागलेल्या गंजामुळे काही वेळा निळे डाग पडतात, ते हायड्रोक्लोरिक अम्लाच्या विरल विद्रावाने काढता येतात.

धातवीय लवण रंगपालट : छायाचित्रांचा रंगपालट अनेक धातवीय लवणांनी करता येतो. सेलेनियम भुकटी, सोडियम सल्फाइड आणि पाणी यांच्या विद्रावाने छायाचित्रांचा रंग जांभळट ते लालसर तपकिरी बनविता येतो. याप्रमाणेच मर्क्युरी क्लोराइड, नायट्रोसल्फाइड, कॉपर सल्फेट, युरेनियम नायट्रेट इत्यादींचा वापर करून निरनिराळ्या प्रकारच्या छटा असलेले तपकिरी रंगपालट करता येतात.

रंजकीय रंगपालट : काही वेळा एखाद्या रंजकाच्या विद्रावात छायाचित्रे बुडवून रंगवून काढतात. या पद्धतीत मूळ छायाचित्रातील पांढरा भाग रंगविला जातो. त्यासाठी पारदर्शक रंजक पाण्यात घालतात आणि त्याचा विरल विद्राव बनवितात. जाहिरातीसाठी लागणारी छायाचित्रे बऱ्याच वेळा या पद्धतीने रंगवितात. रासायनिक रंगपालटात छायाचित्रातील काळ्या रंगाचा रंग बदलतो, तर रंजकीय रंगपालटात त्यातील पांढरा भाग रंगविला जातो.


काळोखी खोली : (डार्क रूम). छायाचित्रणाचे संवेदनशील साहित्य काळोखात हाताळावे लागते म्हणून प्रत्येक संस्करणगृहाला (स्टुडिओला) एक काळोखी खोली जोडलेली असते. तिचे आकारमान कामाच्या गरजेप्रमाणे ठरवितात. लहान आकारमानाच्या काळोख्या खोलीचा उपयोग छोट्या प्रमाणात संवेदनशील साहित्य हाताळण्यासाठी आणि त्याच्या धुलाई, छपाई व चित्रवर्धनासाठी करता येतो. मोठ्या संस्करणगृहातून प्रत्येक प्रकारच्या कामासाठी स्वतंत्र काळोखी खोली असते. संवेदनशील साहित्य काळोखात हाताळावे लागते म्हणून दोन रंगांचे सुरक्षा दीप वापरावे लागतात. शिवाय काम करण्यासाठी निरनिराळ्या आकारमानांचे खण असलेले योग्य उंचीचे टेबल आणि त्याजवळच मोरी पण असावी लागते. सुक्या व ओल्या कामांसाठी निराळी टेबले ठेवणे सोयीचे पडते. फिल्म व छायाचित्रांच्या धुलाईसाठी भरपूर पाणी लागते म्हणून त्याची पण सोय खोलीत असावी लागते.

छायाचित्रणाचे विकाशन, संस्करण आणि धुलाईसाठी काचेच्या, प्लॅस्टिकच्या वा अगंज पोलादाच्या थाळ्या वापरतात. गुंडाळी फिल्मच्या व तुकडा फिल्मच्या (सपाट पटलाच्या स्वरूपाच्या फिल्मच्या) संस्करणासाठी अनेक प्रकारची साधने मिळतात. छायाचित्रांच्या प्रकाशनासाठी आणि इतर कामांसाठी वेळ मोजण्यासाठी विजेची किंवा चावीची घड्याळे काळोख्या खोलीत असावी लागतात. संस्करणाच्या प्रत्येक टप्प्यात काही वेळा तापमान मोजणे हितावह असल्यामुळे दोन-तीन तापमापक ठेवणे सोयीचे पडते.

रसायने ठेवण्यासाठी आणि त्यांचे संस्करण विद्राव बनविण्यासाठी काळोख्या खोलीच्या बाहेर सोय करणे इष्ट ठरते. खोलीत नेहमी खेळती हवा आणि स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. 

आ. ६. चित्रवर्धक : (१) दिवा, (२) संघनक भिंगसंच, (३) व्यस्त प्रत ठेवण्याची जागा, (४) भिंग व व्यस्त प्रत यांमधील घडीचा भाता, (५) भिंग, (६) लाल काच, (७) भिंग वर-खाली करण्याचे चाक, (८) चित्रवर्धक वर-खाली करण्याचे चाक, (९) चित्रवर्धकाचा आधार स्तंभ, (१०) विद्युत्‌ पुरवठा, (११) आधार तक्ता.

संपर्क छपाई व चित्रवर्धन : व्यस्त प्रतीवरून कागदावर सम प्रत संपर्क छपाईने व चित्रवर्धकाने बनवितात. संपर्क छपाईने व्यस्त प्रतीच्याच आकाराचेच छायाचित्र बनते, तर चित्रवर्धकाने ते पाहिजे तितके मोठे करता येते. काही वेळा लहान आकारमानाचे छायाचित्र तयार करण्यासाठीही चित्रवर्धकाचा उपयोग करतात. संपर्क छपाईसाठी साध्या संपर्क छपाई चौकटीपासून अत्यंत गुंतागुंतीच्या स्वयंचलित यंत्राचा वापर करतात. या सर्व उपकरणांचे तत्त्व एकच असते. यासाठी एक चौकट, एक दिवा, व्यस्त प्रत व संवेदनशील कागद यांची जरूरी असते. व्यस्त प्रतीच्या पायस असलेल्या बाजूवर संवेदनशील कागदाची पायस असलेली बाजू ठेवून त्यावर दाब देतात व व्यस्त फिल्मच्या बाजूने प्रकाशन करतात. सर्व कामे काळोख्या खोलीत सुरक्षा दीपाच्या प्रकाशात करतात. रंगीत छायाचित्राच्या छपाईसाठी जे स्वयंचलित साधन वापरतात, त्यामध्ये तीन रंगांच्या प्रकाशमापकाच्या साहाय्याने प्रकाशनकाल आपोआप ठरविला जातो. 

चित्रवर्धकात व्यस्त प्रतीचा पायस असलेला भाग खालच्या बाजूस ठेवतात आणि चित्रवर्धक व भिंग वर-खाली करून पाहिजे त्या आकारमानाचे चित्र आधार तक्त्यावर पाडतात. तक्त्यावर संवेदनशील कागद बसवून त्यावर चित्राचे प्रकाशन करतात. दिव्यापासून येणारा प्रकाश एकत्रित करण्यासाठी एक संघनक भिंगसंच वापरतात (आ.६).

बहुतेक चित्रवर्धक उभ्या स्थितीत वापरतात, पण मोठ्या आकारमानाच्या भित्तिचित्रासाठी आडव्या स्थितीत ते वापरण्याची सोय काहींत असते. काहींत चित्र नेहमीच स्पष्ट मिळेल अशी स्वयंचलित चित्रवर्धकांत यंत्रणा जोडलेली असते. 

सम प्रतीसाठी संवेदनशील कागदाचे प्रकाशन केल्यावर त्याचे नेहमी प्रमाणेच संस्करण करावे लागते. 

संस्करण व छपाई-सामग्री : छायाचित्रण वेळप्रसंगीच करणाऱ्याला फिल्मच्या अथवा छायाचित्रण कागदाच्या संस्करणासाठी तीन लांबट चौकोनी आकाराच्या थाळ्या वापरून काम करता येते. संपर्क छपाईसाठी लाकडी किंवा प्लॅस्टिकची चौकट वापरून काम होते. तसेच छायाचित्रास चमक आणण्यासाठी साधी काच चालू शकते. पण मोठ्या प्रमाणावर छायाचित्रणाचे काम करणाऱ्यांसाठी स्वतंत्र सामग्री लागते. 

संस्करण सामग्री : फिल्मचे संस्करण करण्यासाठी प्लॅस्टिकचे डबे मिळतात. डब्यातील ‘फिल्म धारकां’वर फिल्म चढवून तिचे संस्करण हात न लावता करता येते. त्यामुळे प्रत्येक डब्यात एक याप्रमाणे एकावेळी अनेक फिल्मांचे संस्करण करता येते. काही डब्यांना फिल्म धारकांवर फिल्म चढविण्यासाठी काळोखी खोली लागते, तर काहींत ती भर उजेडात भरता येते. अशा डब्यांना काही वेळा तापमापकही जोडलेला असतो. काहींत कोणत्याही आकारमानाच्या फिल्मचे संस्करण करता येते, तर काहींत विशिष्ट आकारमानाच्या व लांबीच्या फिल्मचेच संस्करण करता येते. एका वेळी ६ ते १२ तुकडा फिल्म किंवा काचांचे संस्करण करता येईल, असे डबे पण मिळतात. या डब्यांचा उपयोग अंतिम धुलाईपर्यंत करता येतो.

आ. ७. कोणत्याही आकारमानाच्या फिल्मचे विकाशन करणारा डबा

अंतिम धुलाईनंतर फिल्म सुकविण्यासाठी स्वच्छ जागेत ती टांगतात किंवा सुकविण्याच्या खास कपाटात ठेवतात. सुकविण्याचे कपाट अंदाजे २·५ मी. उंच, १ मी. रुंद व ०·५ मी. खोल इतक्या आकारमानाचे असते. त्यात वरच्या बाजूस विजेचा एक पंखा व तीन-चार विद्युत्‌ तापक असतात. गरजेप्रमाणे पंखा व तापक वापरता येतात. आतील तापमान समजण्यासाठी कपाटाला एक तापमापक जोडलेला असतो. कपाटाच्या दरवाज्याला काच असल्यामुळे आत ठेवलेल्या फिल्मची किंवा काचांची पाहणी बाहेरून करता येते. या प्रकारच्या कपाटात फिल्म सुकविल्याने तीवर धूलिकण जमत नाहीत.


 

आ. ८. छायाचित्र छपाई यंत्र

छायाचित्र छपाई यंत्रे : अलीकडे जाहिरातींसाठी छायाचित्रांचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो म्हणून यांत्रिक पद्धतीने ती छापली जातात. अशा यंत्रात एका बाजूस आपल्याला पाहिजे ती व्यस्त प्रत, छपाईच्या कागदाची गुंडाळी व संस्करणासाठी ठेवलेल्या टाक्यांत विद्रावक टाकून यंत्र चालू केल्याबरोबर थोड्या वेळातच दुसऱ्या बाजूला तयार छायाचित्रे एकामागून एक येत राहतात. आणखी एका प्रकारच्या यंत्रात एका व्यस्त फिल्मच्या ऐवजी अनेक छायाचित्रे असलेली गुंडाळी व्यस्त फिल्म लावता येते. त्याचप्रमाणे जर एकाच छायाचित्राच्या ठराविक प्रती हव्या असतील, तर तो आकडा दाबून यंत्र सुरू केल्यावर दुसऱ्या टोकाला तितक्या प्रती मिळतात व पुढील व्यस्त प्रत यंत्रावर आपोआप आणली जाते. या प्रकारच्या काही यंत्रांत चित्रवर्धनसुद्धा करता येते.

कमी प्रमाणात संस्करणाचे काम करणाऱ्यांसाठी हाताने व पायाने चालविता येतील अशी छायाचित्र छपाई यंत्रे मिळतात. 

सुकविण्याचे यंत्र : अगंज पोलादी पत्र्यावर एका वेळी १०—१२ प्रती सुकविण्याचे यंत्र बहुतेक सर्व ठिकाणी वापरतात. काही ठिकाणी यंत्राच्या दोन्ही बाजूंना पत्रा लावण्याची सोय असते. त्यामुळे काम भराभर होते. ही साधने हाताने चालवावी लागतात. 

काही ठिकाणी छायाचित्रे मोठ्या प्रमाणावर सुकविण्यासाठी यंत्रे असतात. या यंत्राच्या एका बाजूला ओली छायाचित्रे लावल्यावर दुसऱ्या टोकाला ती सुकून व चमकदार होऊन बाहेर पडतात. अशा यंत्रावार एका तासाला अंदाजे ९ X ६·५ सेंमी. आकारमानाची ५०० ते १,००० छायाचित्रे सुकतात.

इतर सामग्री : चित्रवर्धक अनेक प्रकारचे असतात. साध्या चित्रवर्धकाने पाहिजे तितक्या मोठ्या आकारमानाचे छायाचित्र काढता येते. यांत्रिक चित्रवर्धकाने ठराविक आकारमानाचे छायाचित्र किंवा त्याच्या प्रती काढता येतात.

रंगीत छायाचित्रांच्या छपाई आणि वर्धनासाठी स्वयंचलित यांत्रिक साधने असतात. त्यात तीन रंगांच्या प्रकाश गाळण्या, प्रकाशनमापक आणि इतर गोष्टी समाविष्ट केलेल्या असतात.

आरेखने व दस्तऐवजातील टंकलिखित मजकूर यांच्या प्रती काढण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या परावर्ती छपाईसाठी संपर्क छपाईची साधने वापरता येतात.

छायाचित्रणाची साहाय्यक साधने : छायाचित्रणासाठी कॅमेऱ्याखेरीज अनेक प्रकारची साहाय्यक साधने लागतात. त्यांत कॅमेऱ्याला आधार देणारा तिपाई घोडा, कृत्रिम प्रकाशासाठी स्फुर दीप (अल्प काळ टिकणारा तीव्र प्रकाश देणारा दिवा, फ्लॅश लँप) आणि इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप (इलेक्ट्रॉनिक फ्लॅश गन), प्रकाश गाळण्या, प्रकाशनमापक वगैरे प्रकारच्या साधनांचा समावेश होतो. या साधनांची सर्वसाधारण माहिती येथे दिलेली असून अधिक माहितीसाठी ‘कॅमेरा’ ही नोंद पहावी. स्फुर दीप आणि इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप यांसंबंधीची काही माहिती खाली ‘प्रकाश योजना’ या शीर्षकाखाली दिलेली आहे.

तिपाई घोडा : जेंव्हा फिल्मचे प्रकाशन /२५ सेकंदापेक्षा जास्त वेळ करावे लागते तेव्हा कॅमेरा हलू नये म्हणून तिपाई घोडा वापरतात. त्याचे अनेक प्रकार आहेत. प्रवासात वापरण्याचे घोडे हलक्या वजनाचे व घडीचे असतात. जड वजनाची भिंगे जर कॅमेऱ्याला लावावयाची असतील, तर घोडा दणकट असावा लागतो. स्टुडिओ कॅमेऱ्यासाठी मोठ्या आकारमानाचे आणि मजबूत घोडे मिळतात. औद्योगिक छायाचित्रणासाठी घोडा बहुगुणी प्रकारचा असावा लागतो. 

प्रकाश गाळणी : वर्णपटातील काही इष्ट वर्णांना पारदर्शक व नको असलेल्या वर्णांना अपारदर्शक असलेल्या प्रकाश गाळण्या जरूरीप्रमाणे वापरण्यात येतात. साध्या काळ्या-पांढऱ्या छायाचित्रणात प्रकाश गाळणीचा उपयोग अनेक वेळा करावा लागतो. उदा., बाह्यचित्रणाच्या वेळी जर आकाशात ढग असतील व छायाचित्रात ते अधिक स्पष्ट यावेत असे वाटत असल्यास चित्रणासाठी समग्रवर्णी फिल्म घेऊन कॅमेऱ्याच्या भिंगावर छायाचित्र घेताना पिवळी, केशरी किंवा लाल रंगाची प्रकाश गाळणी वापरल्यास ढग फारच चांगले येतात. प्रकाश गाळण्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बनवितात, त्या चकतीसारख्या असून पिवळ्या, केशरी, लाल, हिरव्या आणि निळ्या या रंगांच्या मिळतात. यांशिवाय पोलॅरॉइड व इतर विशेष प्रकारच्या गाळण्याही उपलब्ध आहेत. प्रकाश गाळण्या निरनिराळ्या आकारमानांच्या व जाडीच्या मिळत असून भिंगावर लावण्यासाठी अनेक प्रकारच्या वलयांत बसविलेल्या असतात. प्रकाश गाळणी वापरताना प्रकाशन जास्त करावे लागते, ते किती जास्त करावयाचे हे गाळणीच्या रंगावर व त्याच्या दाटपणावर अवलंबून असते. 

प्रकाशनमापक : छायाचित्र चांगले येण्यासाठी फिल्मचे योग्य प्रकाशन करावे लागते म्हणून मार्गदर्शनासाठी कोष्टके बनविलेली असतात. तसेच प्रकाशनमापक उपकरणेही मिळतात. कोष्टकात भिंगाचा केंद्रांक (भिंगाचे केंद्रांतर भागिले छिद्रव्यास म्हणजे सापेक्ष छिद्रव्यास), फिल्मचा वेग, प्रकाशनकाल, छायाचित्राचा विषय आणि ते घेण्याची वेळ व जागा यांची सांगड घातलेली असते. अशा प्रकारचे कोष्टक फिल्मच्या प्रत्येक डबीबरोबर दिले जाते.

चालत्या मोटारी, गाड्या, घोडे यांसारख्या विषयांसाठी स्वतंत्र कोष्टक असते. त्यात विषयांची वर्गवारी केलेली असून ते कोणत्या दिशेने जातात यावर प्रकाशन ठरविलेले असते. जुळवाजुळव करून अचूक प्रकाशनकाल दर्शविणारी पुठ्ठ्याची किंवा पत्र्याची प्रकाशनमापक उपकरणेही मिळतात व ती स्वस्त असून वापरण्यास सोपी असतात. 

प्रकाशनमापक उपकरणात प्रकाश विद्युत्‌ (प्रकाशाच्या क्रियेने विद्युत्‌ दाब निर्माण करणाऱ्या) घटाचा उपयोग केलेला असतो. त्याची रचना अशा रीतीने बनविलेली असते की, ते एका हातात धरले असता केवळ हाताच्या अंगठ्याने त्यावरील फिल्मचा वेग, भिंगाचा केंद्रांक इ. गोष्टी सहज जुळविता येतात व चित्रविषयाकडे उपकरण धरल्यावर तबकडीवरील दर्शक काट्याने चित्रणासाठी लागणारा प्रकाशनाचा काळ, भिंगाचा केंद्रांक इ. गोष्टी अचूक दर्शविल्या जातात. अलीकडच्या प्रकाशनमापक उपकरणात वर्णतापमान पाहण्याची सोयही केलेली असते. काही उपकरणे निकेल-कॅडमियमाच्या विद्युत्‌ घटावर चालतात व ती अधिक प्रभावी असतात. 


प्रकाशमापक : (फोटोमीटर). याचा आकार नळकांड्यासारखा असतो. याचा दृष्टि-कोन फक्त २चा असल्यामुळे याच्या साहाय्याने लहानशा जागेवरील प्रकाशाचेही मापन करता येते. यात दिसणाऱ्या दोन आकृत्यांची प्रकाशीय तीव्रता एकाच दर्जाची दिसेपर्यंत मापकाची जुळवाजुळव करावी लागते. ती पूर्ण झाल्यावर बाहेरच्या बाजूस अचूक प्रकाशमापन दर्शविले जाते. 

साधन पिशवी : छायाचित्रणाची सर्व सामग्री एकत्र ठेवता येईल अशा निरनिराळ्या आकारमानांच्या चामडी वा प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळतात. त्या मजबूत असून प्रवासात सहज वापरता येतात. त्यांचा उपयोग केल्याने छायाचित्रणाची मौल्यवान सामग्री नीटनेटकी राहते. 

प्रकाशयोजना : सुरूवातीच्या काळात छायाचित्रण फक्त सूर्यप्रकाशातच करावे लागे. परंतु नैसर्गिक प्रकाशात नेहमीच छायाचित्रे घेता येतील असे नसल्यामुळे कृत्रिम प्रकाशाची काही वेळा सोय करावी लागते. गॅसच्या दिव्याचा प्रकाश व टंगस्टन तंतूच्या दिव्याचा प्रकाश यांना संवेदनशील असणाऱ्या द्रव्यांचा शोध लागल्यानंतरच त्यांचा वापर करण्यात आला. ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांच्या ज्वालेच्या झोताने तापविलेल्या चुन्याचा प्रकाश (लाईम लाईट) १८४० पासून छायाचित्रणासाठी वापरात होता. मॅग्नेशियमची तार जाळून तीव्र प्रकाश मिळतो, हे १८५० साली निदर्शनास आले. त्यामुळे मॅग्नेशियमाची तार किंवा चूर्ण जाळून मिळणाऱ्या प्रकाशाचा छायाचित्रणासाठी उपयोग करीत असत. मॅग्नेशियमाचे चूर्ण व पोटॅशियम क्लोरेट यांच्या मिश्रणास स्फुरचूर्ण म्हणत आणि ते १८८० साली उपलब्ध झाले. पहिला स्फुर दीप १९२५ मध्ये तयार झाला. १८५१ मध्ये विद्युत्‌‌ ठिणगीच्या उजेडात टॉलबट यांनी शीघ्र गतीचे स्फुरचित्रण केले. वायुविसर्जित (वायूतून विद्युत्‌‌ प्रवाह जाऊ देऊन प्रकाश निर्माण करणाऱ्या) स्फुर दीपाचा वापर करण्यासाठी १९३० पर्यंत प्रयोग करण्यात आले. १९४० मध्ये इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप बाजारात आला. 

साध्या स्फुर दीपाचा वापर पूर्वी मोठ्या प्रमाणावर करीत असत. या दिव्यात ऑक्सिजन भरलेल्या काचेच्या गोळ्यात ॲल्युमिनियम किंवा झिर्कोनियम धातूच्या केसासारख्या बारीक तारेचे वेटोळे असून विद्युत्‌ घटातील प्रवाहाने ते पेटून तीव्र प्रकाश मिळतो. हा दिवा केव्हाही कॅमेऱ्याला जोडता येतो. प्रकाशनासाठी जेव्हा कॅमेऱ्याची झडप उघडते तेव्हाच दिवा पेटून प्रकाश मिळतो. दर प्रकाशनासाठी एक दिवा लागत असल्यामुळे अशा प्रकारचे दिवे आता कमी प्रमाणात वापरले जातात. कोणत्याही प्रकारचा धूर किंवा वायू न निघता तो पेटतो म्हणून इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप उपलब्ध होण्यापूर्वी त्याचा वापर मोठ्या प्रमाणात सर्वत्र केला जात असे. मध्यम आकाराचा दिवा फोटो फ्लड दिव्याच्या (तीव्र प्रकाश देणाऱ्या एक प्रकारच्या तंतुदीपाच्या) २० ते ३० पट प्रकाश देतो. त्याचे वर्णतापमान अंदाजे ३,८०० के. असते. रंगीत छायाचित्रणासाठी निळ्या रंगाचे कवच असलेला दिवा वापरावा लागतो. कॅमेऱ्याच्या झडपेच्या प्रकाराप्रमाणे योग्य असेल असाच दिवा निवडावा लागतो. केंद्र प्रतल झडप (भिंगाच्या केंद्राच्या पातळीत असणारी झडप) असलेल्या कॅमेऱ्याला सावकाश पेटणारा दिवा लागतो. अशी झडप बऱ्याचशा एकभिंगी परावर्तक (उदा., लायका, एक्झॅक्टा, प्रॅक्टीका इ.) कॅमेऱ्यात असते. काही वेळा दिव्यातील ऑक्सिजनामुळे तो फुटण्याचा संभव असतो किंवा त्यातील वायू एखाद्या लहान छिद्रामुळे उडून जाण्याचीही शक्यता असते. असे वाया गेलेले दिवे ओळखता यावेत म्हणून प्रत्येक दिव्यावर एक निळा ठिपका लावलेला असतो. दिवा वाया गेलेला असल्यास या ठिपक्याचा रंग गुलाबी होतो. दिव्याच्या वेष्टनावर प्रकाशन मार्गदर्शक छापलेला असतो.

साध्या स्फुर दीपाची जागा आता इलेक्ट्रॉनीय स्फुर दीपाने घेतली आहे. या दिव्याचा प्रकाश सूर्यप्रकाशासारखा असल्यामुळे तो रंगीत छायाचित्रणासाठी प्रकाश गाळणीशिवाय वापरता येतो. या प्रकारचा एकच दिवा हजारो वेळा वापरता येतो व तो साध्या शुष्क विद्युत्‌ घटावर, पुन्हा विद्युत्‌ भारित करता येणाऱ्या विद्युत्‌ संचायक घटावर किंवा घरातील विद्युत्‌ प्रवाहावर वापरता येतो. अगदी लहान आकारमानाचे सुद्धा असे दिवे मिळू शकतात. छायाचित्रणासाठी जेव्हा विस्तृत भागावर प्रकाश लागतो तेव्हा एकाच वेळी दोन वा तीन दिवे प्रकाशित करता येतात. त्यामुळे छायाचित्रात काळपट सावल्या फारच कमी प्रमाणात दिसतात. तत्क्षणिक प्रकाशासाठीच साधा स्फुर दीप किंवा इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप वापरतात. 

अखंड प्रकाश मिळविण्यासाठी विशेष प्रकारचे तंतुदीप वापरतात. हे तंतुदीप फोटो फ्लड या नावाने ओळखले जातात. ते २५० व ५०० वॉटमध्ये मिळत असून त्यांचे वर्णतापमान ३,३५० के. इतके असते. ते फक्त काही तासच चालतात. फोटो फ्लड दिव्यांच्या ऐवजी काही ठिकाणी क्वॉर्ट्‌झ आयोडीन दिवे वापरतात. त्यांच्या आकारमानाच्या मानाने ते फार तेजस्वी असतात. शिवाय ते जास्त तास वापरता येतात.

आ. ९. दिव्यांचे काही प्रकार : (अ) विस्तार दीप (आ) एकाग्र दीप (इ) स्फुर दीप (१) निळ्या रंगाचा ठिपका, (२) केसासारखी बारीक तार, (३) विद्युत्‌ प्रवाह नेणाऱ्या तारा.स्टुडिओसारख्या बंदिस्त जागेत छायाचित्रण करण्यासाठी कृत्रिम प्रकाश वापरावा लागतो व त्यासाठी अनेक प्रकारचे दिवे मिळतात. हे दिवे तिपाईने उभे करता येत असून त्यांची उंची कमी जास्त करता येते. दिवा अर्धगोलाकार झाकणी परावर्तकात असतो व त्यामुळे त्याचा प्रकाश झाकणीच्या आकाराप्रमाणे कमी किंवा विस्तीर्ण जागेत पसरतो. या प्रकारच्या दिव्यांना विस्तार दीप (फ्लड लाइट) म्हणतात.

छायाचित्राचा विषय जर मोठ्या आकारमानाचा असेल, तर दोनचार दिवे एकत्र लावावे लागतात. त्यासाठी दिवे एकत्र लावता येतील असे स्तंभ असतात किंवा ते वर टांगून दोरीच्या साहाय्याने वर-खाली करावे लागतात.

छायाचित्र घेण्यासाठी काही वेळा विशिष्ट जागेपुरताच प्रकाश लागतो. यासाठी जो दिवा वापरतात, त्याला एकाग्र दीप (स्पॉट लाइट) म्हणतात. अशा दिव्यापुढे एक भिंग बसवितात व त्यामुळे दिवा मागेपुढे केल्याने दिव्याच्या प्रकाशाचा वर्तुळाकार कमीजास्त करता येतो.

नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश यांत काही महत्त्वाचे फरक आहेत. नैसर्गिक प्रकाशावर छायाचित्रकाराला ताबा ठेवता येत नाही, तर कृत्रिम प्रकाश पाहिजे तेव्हा वापरता येतो. नैसर्गिक प्रकाश लांबून येत असल्यामुळे छायाचित्रणाच्या दृष्टीने फरक पडत नाही. कृत्रिम प्रकाश जितका जवळ असेल, तितका चित्रविषय तेजस्वी दिसतो म्हणून चित्र प्रकाशनाच्या वेळी दिवा व चित्रविषय यांच्यातील संबंध नेहमी लक्षात यावा लागतो. हा संबंध व्यस्त वर्ग नियम म्हणून ओळखला जातो. या नियमानुसार प्रकाशाची तीव्रता अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते.


वर्णतापमान : एखादी संपूर्ण काळ्या रंगाची वस्तू (कृष्ण पदार्थ) जसजशी गरम होऊ लागते तसतशी ती आपला वर्ण तापमानाप्रमाणे बदलते. हा एक भौतिक आविष्कार आहे. हे वर्ण लाल, केशरी, निळा व सफेत (तेजस्वी) या क्रमाने दिसतात. यावरून वस्तूच्या तापमानानुसार तिचा आढळणारा प्रमुख वर्ण ही संकल्पना मांडण्यात आली. याच संकल्पनेला प्रकाश उद्‌गमाचे वर्णतापमान म्हणतात व हे तापमान केल्व्हिन ( के.) अंशात मोजतात [ ⟶ उष्णता प्रारण ]. 

एखाद्या देखाव्यात दिसणारे वर्ण त्याच्या आजूबाजूच्या फरकामुळे नेहमी बदलतात आणि ही गोष्ट ऋतू, दिवसाची वेळ, जागा, हवामान इत्यादीवर प्रामुख्याने अवलंबून असते. चांगली हवा असलेल्या दिवशी जर भर दुपारी एखाद्या ठिकाणचे रंगीत छायाचित्र घेतले, तर ते थोडेसे निळसर दिसते व त्याच दिवशी त्याच ठिकाणचे पहाटे किंवा संध्याकाळी जर दुसरे छायाचित्र घेतले, तर ते लालसर दिसते. यावरून असे दिसते की, दिवसाचे दुपारचे वर्णतापमान ५,००० ते ६,००० के. च्या आसपास असते आणि पहाटे वा संध्याकाळी ३,००० ते ४,००० के. इतके असते. 

वर्णतापमानमापन : रंगीत छायाचित्र घेण्यापूर्वी काटेकोरपणे वर्णतापमान मोजण्याची गरज भासल्यामुळे वर्णतापमानमापक उपकरण तयार करण्यात आले. या उपकरणामुळे वर्णतापमान केल्व्हिन अंशांत मोजता येते. कमीत कमी १५० ते २०० के. इतका फरक लक्षात येण्याजोगा असतो. बहुतेक रंगीत फिल्म काही ठराविक वर्णतापमानास योग्य अशा बनविलेल्या असतात म्हणून छायाचित्र त्यांवर तंतोतंत येण्यासाठी व रंग दुरुस्तीसाठी कॅमेऱ्याच्या भिंगावर कोणती प्रकाश गाळणी वापरावी, हे पण या उपकरणावर पाहता येते. काही उपकरणांत प्रकाशनमापक व वर्णतापमानमापक एकत्रित असतात.

वर्णतापमान मोजण्यासाठी आणखी एका एककाचा वापर करतात. त्याला ‘मायरेड’ असे म्हणतात. केल्व्हिन तापमानाचे मायरेडमध्ये रूपांतर करावयाचे झाल्यास १०,००,००० ला केल्व्हिन वर्णतापमानाने भागले म्हणजे वर्णतापमान मायरेडमध्ये मिळेल. उदा., 

५,००० के. =

१०,००,००० 

= २०० मायरेड. 

५,००० 

काही उपयुक्त प्रकाशयोजनांचे वर्णतापमान 

सूर्यप्रकाश

सूर्योदय किंवा सूर्यास्त 

सर्वसाधारण 

उन्हाळ्यातील   } 

दुपारचा प्रकाश  

२,०००–३,००० के.

 

५,०००–६,००० के. 

कृत्रिम प्रकाश

टंगस्टन दिवा 

फोटो फ्लड दिवा 

स्फुर दीप (साधा) 

स्फुर दीप (निळा) 

इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप

२,४०० —  ३,००० के.

३,४०० के.  

३,८०० के.  

५,०००–६,००० के.  

५,०००–६,००० के.  

आ. १०. रंगीत छायाचित्रण पद्धती : (अ) संयोगीकरण पद्धत (आ) विलगीकरण पद्धत : (नि) निळा, (तां) तांबडा, (हि) हिरवा, (म्रॅ) मॅजेन्टा, (पि) पिवळा, (सि) सियान, (पां) पांढरा, (का) काळा.

रंगीत छायाचित्रण : रंगीत छायाचित्रणात कॅमेऱ्यासमोरील दृष्याचा जसा रंग असेल तशा रंगात छायाचित्र यावे लागते. सूर्यप्रकाश आणि विजेच्या दिव्याचा प्रकाश हा अनेक भिन्न तरंगलांबीच्या किरणांचा बनलेला असतो आणि या भिन्न तरंगलांबीमुळे निरनिराळ्या रंगांची डोळ्याला जाणीव होते. काचेच्या लोलकाच्या साहाय्याने सूर्यप्रकाशाचे पृथक्करण करून त्यातील निरनिराळे घटक दाखविता येतात. इंद्रधनुष्यातही ते दिसतात. त्यांचा क्रम जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारिंगी व तांबडा असा असतो.

मानवाच्या डोळ्यातील जालपटलामध्ये निळ्या, तांबड्या व हिरव्या या तीन रंगांना संवेदनशील असलेल्या पेशी असतात व त्यांमुळे आपणांस डोळ्यासमोरील दृश्य रंगीत दिसते, असे टॉमस यंग यांनी १८०१ मध्ये प्रथम प्रतिपादिले. त्यांच्या या सिद्धांतामुळे रंगीत छायाचित्रणाचा पाया घातला गेला. क्लार्क मॅक्सवेल यांनी तीन रंगांच्या निरनिराळ्या प्रमाणांतील मिश्रणाने निरनिराळे रंग कसे दिसतात, हे सप्रयोग दाखविले. रासायनिक दृष्ट्या जर्मनीमध्ये १८७३ च्या सुमारास फोगेल यांनी वर्णसंवेदनशील रंजकांचा शोध लावल्यामुळे रंगीत छायाचित्रणाचा खरा पाया घातला गेला. छायाचित्रे रंगीत येण्यासाठी निरनिराळ्या पद्धती शोधल्या गेल्या, परंतु त्यांतील पुष्कळशा पद्धती गुंतागुंतीच्या असल्यामुळे व वापरण्यास सुलभ नसल्यामुळे त्या प्रचारात राहिलेल्या नाहीत.

बहुतेक प्रचलित पद्धतीत एकाच फिल्मवर प्रथम निळ्या, हिरव्या व तांबड्या या तीन मूळ रंगांत स्वतंत्र चित्रण केले जाते. या तीन स्वतंत्र चित्रणांचे एकत्रिकरण कसे करावयाचे यानुसार त्यांच्या दोन पद्धती बनतात : एक संयोगीकरण पद्धत व दुसरी विलगीकरण पद्धत.

संयोगीकरण पद्धत : या पद्धतींत निळ्या, हिरव्या व तांबड्या रंगांच्या प्रकाशांच्या छटा कमीअधिक प्रमाणात एकत्रित झाल्याने पाहिजे तो रंग मिळतो. निळा व हिरवा यांच्या मिश्रणाने निळसर जांभळ्यापासून लालसर किरमिजी रंगापर्यंतच्या असंख्य छटा मिळतात आणि हिरवा व तांबडा यांच्या मिश्रणाने पिवळसर हिरव्यापासून लालसर नारिंगीपर्यंत असंख्य छटा मिळतात. वरील कोणत्याही दोन रंगांच्या प्रकाशाच्या मिश्रणात जर उरलेला तिसऱ्या रंगाचा प्रकाश घातला, तर या मिश्रणाने रंग फिक्के झालेले दिसतात व ज्या वेळी त्यांचे मिश्रण योग्य प्रमाणात होते तेव्हा सफेत पांढऱ्या प्रकाशाचा भास होतो.

तिहेरी प्रक्षेपण प्रक्रिया, चाळणी (स्क्रीन युनिट) व लेंटिक्युलर फिल्म ( ज्यात आधारकाच्या पायस लावलेल्या बाजूच्या विरूद्ध बाजूवर दाब देऊन सूक्ष्म बहिर्गोल भिंगासारखे आकार उमटविलेले असतात अशी फिल्म) प्रक्रिया या तीन प्रमुख प्रक्रियांत संयोगीकरण पद्धत वापरण्यात येते. तिहेरी प्रक्षेपण प्रक्रियेत तांबड्या, हिरव्या व निळ्या गाळण्यांच्या मदतीने प्रकाशन केलेल्या वेगवेगळ्या तीन व्यस्त प्रतींवरून तयार केलेली काळी-पांढरी सम प्रत त्याच रंगांच्या गाळण्यांतून प्रक्षेपित करण्यात येते. स्थिर वस्तूचे चित्रण एकापाठोपाठ एक अशा गाळण्या लावून करतात, तर हलत्या वस्तूंचे चित्रण तिन्ही गाळण्यांत एकदमच करतात. तिहेरी प्रक्षेपण प्रक्रियेत रंगसंगती चांगली येते, पण ही प्रक्रिया किचकट असल्याने व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी झाली नाही. 

चाळणी प्रक्रिया १८९२ साली जॉन जॉली व जे डब्ल्यू. मकडॉन यांनी प्रथम वापरली. फिन्ली, आग्फाकलर, ड्यूफेकलर इ. प्रक्रिया याच प्रक्रियेतून निर्माण झाल्या. या प्रक्रियेने उत्कृष्ट रंगसंगतीच्या पारदर्शिका मिळत असत, पण फिल्मांची निर्मिती किचकट व महागही असे.

लेंटिक्युलर फिल्म प्रक्रिया १९०८ साली आर्. बर्‌थॉन यांनी शोधून काढली व ए.केलर-डोरीअन, जे. जी काफस्टाफ आणि ईस्टमन कोडॅक कंपनी यांनी तीत सुधारणा केल्या. ही प्रक्रिया १९२८ मध्ये कोडॅकलर प्रक्रिया या नावाने रंगीत चलच्चित्रपटांसाठी वापरात आली. या प्रक्रियेत रंगीत फिल्म चांगली मिळते, पण तिचे प्रक्षेपण करणे अवघड जाते.


विलगीकरण पद्धत : या पद्धतीत आपणाला हवा असलेला रंग सफेत पांढऱ्या प्रकाशातून नको असतील त्या सर्व तरंगलांबी काढून मग मिळवितात, म्हणून तीन मूळ रंगाच्या विरूद्ध म्हणजेच पूरक रंग वापरणे सोयीचे पडते. जसे तांबड्या रंगाचा पूरक रंग म्हणजे सफेत पांढऱ्या प्रकाशातून तांबड्या प्रकाशाचा भाग काढल्यावर जो उरतो तो, त्याचा रंग निळसर हिरवा असतो. त्यालाच वजा-लाल किंवा सियान म्हणतात. या प्रमाणेच हिरव्या रंगाचा पूरक रंग लालसर जांभळा म्हणजेच मॅजेन्टा असतो व निळ्या रंगाचा पूरक रंग हिरव्या व तांबड्या रंगाचा मिलाफ म्हणजेच पिवळा असतो. या शोषक रंगांच्या प्रकाश गाळण्यांद्वारे केलेल्या छायाचित्रणाने तीन मूळ रंगांत उत्तम प्रकारे चित्र तयार होते. पिवळा आणि सियान यांच्या मिश्रणाने पिवळट हिरव्यापासून निळसर हिरव्यापर्यंत अनेक छटा मिळतात. तसेच पिवळा व मॅजेन्टा यांच्या मिश्रणाने तांबड्या रंगातील असंख्य छटा म्हणजे पिवळसर नारिंगी, लाल भडक व लालसर किरमिजी तयार होतात. त्याचप्रमाणे सियान आणि मॅजेन्टा यांच्या मिश्रणाने अनेक छटांचे निळे रंग बनतात.

ज्या वेळी हे सर्व रंग अस्तित्वात असतात त्या वेळी सप्तरंगांतील काही किंवा सर्व भाग शोषले जातात म्हणून अशा वेळी करडा किंवा काळा रंग आपणास दिसतो.

विलगीकरण पद्धत वापरणाऱ्या प्रक्रियांत तांबड्या, निळ्या व हिरव्या प्रकाशांत तीन निरनिराळ्या व्यस्त प्रती काढतात आणि त्यांच्यावरून तीन मूळ रंगांच्या पूरक रंगांतील सम प्रती तयार करतात. या तीनही सम प्रती एकमेकींवर ठेवून कागदावर एकच रंगीत छायाचित्र तयारकरण्यात येते किंवा पारदर्शिकाही तयार करता येते. (१) एकापाठोपाठ एक असे तीन वेगवेगळ्या गाळण्यांतून तीन काचांवर अथवा फिल्मांवर प्रकाशन करून किंवा (२) एकाच प्रकाशनात एकाच वेळी तीन काचांवर वा फिल्मांवर प्रकाशन करून किंवा (३) प्रत्येक रंगासाठी वेगळा गाळणी थर असलेल्या तीन थरी फिल्मवर प्रकाशन करून किंवा (४) एकच गाळणी थर असलेल्या तीन थरी फिल्मवर प्रकाशन करून व्यस्त प्रत बनविली जाते. यांपैकी पहिल्या तीन प्रक्रियांनी तयार केलेल्या व्यस्त प्रतींवरून तीन रंगीत सम प्रती काढतात व त्यांपासून कागदावर किंवा फिल्मवर अंतीम चित्र तयार करतात. चौथ्या प्रक्रियेतील फिल्म तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. 

इ.स. १९३५ सालानंतर संयोगीकरण पद्धतीऐवजी बहुशः विलगीकरण पद्धत वापरण्यात येऊ लागली. संयोगीकरण पद्धत प्रक्षेपणाच्या व नुसत्या पाहता येतील अशा पारदर्शिकांसाठीच तर विलगीकरण पद्धत पारदर्शिकांसाठी व परावर्तित किरणांनी पाहता येतील अशा कागदावरील चित्रांसाठी वापरली जाते. रंगीत चित्रपटांसाठी आता विलगीकरण पद्धतीचाच प्रामुख्याने उपयोग केला जातो. संयोगीकरण पद्धत चित्रपटांसाठी वापरीत नाहीत. तिचा वापर रंगीत दूरचित्रवाणीसाठी करतात. 

रंगीत फिल्म : रंगीत छायाचित्रणाच्या कोणत्याही पद्धतीत प्रथम निळ्या, हिरव्या व लाल या तीन रंगात समोरील दृश्य टिपावे लागते.१९५० सालापर्यंत समोरील दृश्याची निळ्या, हिरव्या व तांबड्या या रंगाच्या प्रकाश गाळण्यांद्वारे तीन निराळी काळी- पांढरी छायाचित्रे घेत व त्यांवरून रंगीत चित्राची छपाई करीत असतात.

आ. ११ तीन रंगी बहुथरी व्यस्त फिल्मचा उभा छेद : (१) जिलेटिनचा सर्वांत वरचा थर, (२) निळ्या प्रकाशाला संवेदनशील असलेल्या पायसाचा थर, (३) पिवळी प्रकाश गाळणी, (४) निळ्या व हिरव्या प्रकाशाला संवेदनशील असलेल्या पायसाचा थर, (५) जिलेटिनचा मधला थर, (६) निळ्या व तांबड्या प्रकाशाला संवेदनशील असलेल्या पायसाचा थर, (७) जिलेटिनचा खालचा थर, (८) आधारपट्टी, (९) प्रकाश परावर्तनरोधी थर.

आता रंगीत छायाचित्रणासाठी एकाच आधारपट्टीवर तीन रंगांसाठी एकावर एक थर देऊन बनविलेली फिल्म वापरतात. तिला बहुथरी किंवा तीन थरी फिल्म म्हणतात. ही बहुथरी फिल्म तीन मूळ रंगांना संवेदनशील असलेल्या पायसाचा उपयोग करून बनवितात. फक्त निळ्या रंगाला संवेदनशील असे पायस बनविणे सोपे असते, परंतु अल्प प्रमाणात तरी निळ्या रंगाला संवेदनशील असलेल्या पायसाशिवाय फक्त तांबड्या व हिरव्या रंगांना संवेदनशील असलेले पायस बनविणे सोपे नाही म्हणून या तीन थरी फिल्मच्या थरात एक प्रतिबंधी प्रकाश गाळणी घालावी लागते. त्यामुळे इतर रंगांच्या चित्रणात निळ्या रंगाचा प्रकाश जाऊ शकत नाही.

रंगीत छायाचित्रणाच्या फिल्मवरील सर्वांत वरचा थर निळ्या प्रकाशाला संवेदनशील असतो. त्याखाली पिवळ्या प्रकाश गाळणीचा थर असतो त्यामुळे निळ्या रंगाचा कोणताही भाग पुढे जाऊ शकत नाही. त्यानंतरचा थर निळ्या व हिरव्या प्रकाशाला संवेदनशील असलेल्या पायसाचा बनवितात व शेवटचा म्हणजे तळातील थर निळ्या व तांबड्या रंगांच्या प्रकाशाला संवेदनशील असतो. कॅमेऱ्याच्या भिंगातून येणाऱ्या प्रकाशामुळे ज्या वेळी फिल्मवर रंगीत प्रतिमा पडते त्या वेळी तिच्यातील रंगानुसार प्रत्येक थरावर तिचा परिणाम होतो. उदा., आकाशाच्या निळ्या रंगामुळे सर्वांत वरच्या थरावर परिणाम होतो. तसेच तांबड्या, हिरव्या व पिवळ्या रंगाचा इतर थरांवर परिणाम होतो. सफेत पांढऱ्या वस्तूवरून येणारा प्रकाश सर्व थरांवर सारखाच परिणाम करतो. याप्रमाणेच इतर रंगांचा परिणाम कमीअधिक प्रमाणात तिन्ही थरांवर होऊन समोरील दृश्याची रंगीत प्रतिमा टिपली जाते.

प्रकाशन केलेल्या फिल्मचे यानंतर साध्या फिल्मप्रमाणे संस्करण करावे लागते. म्हणजेच अदृश्य आकृतीचे विकाशन करून ती दृश्य करावी लागते. रंगीत छायाचित्राच्या व्यस्त विकाशनाच्या वेळी विकाशनासाठी वापरण्यात येणारी रसायने तिच्या थरात वापरण्यात आलेल्या पायसातील जोड घटकाबरोबर मिळतेजुळते घेऊन साध्या म्हणजे चांदीच्या चित्राबरोबर रंगीत चित्र तयार होते. तीन थरांसाठी वापरण्यात येणारा विकाशक असा असतो की, तो थरातील रंगाच्या पूरक रंगात चित्र बनवितो म्हणजेच निळ्या रंगाच्या प्रकाशाला संवेदनशील बनविलेल्या वरच्या थरात पायसामध्ये असा जोड घटक घालतात की, ज्या ठिकाणी साधे काळे-पांढरे चित्र आले असते त्या ठिकाणी पिवळ्या रंगात चित्र तयार होते. याप्रमाणेच मधल्या थरात मॅजेन्टा रंगात व शेवटच्या थरात निळसर हिरव्या रंगात चित्र तयार होते.

यानंतर फिल्मच्या पायसातील नको असलेले घटक काढण्याचे काम असते. त्यातील पहिले काम विकाशन ताबडतोब थांबावे म्हणून विकाशनासाठी वापरलेली रसायने अम्ल धुलाईने काढणे. नंतर स्थिरक वापरून चित्र स्थिर करणे. काळ्या-पांढऱ्यात आलेले चित्र रसायनांच्या साह्याने नाहीसे करण्याचे काम पुढे करावे लागते म्हणून ते रसायनांच्या साह्याने काढून टाकावे लागते व त्यानंतर परत स्थिरक वापरून रंगीत चित्र स्थिर करावे लागते. यानंतर स्वच्छ पाण्याच्या चांगल्या धुलाईनंतर फिल्म वाळवितात. अशा प्रकारे रंगीत व्यस्त फिल्म तयार होते म्हणजे ती फक्त छायाप्रकाशाच्या छटांत उलटी असते असे नाही, तर रंगांच्या बाबतीतही उलटी असते. यामुळे या व्यस्त फिल्ममध्ये चित्रित दृश्यातील लाल भडक वस्तू दाट निळसर रंगात दिसतील व निळे आकाश पिवळसर दिसेल, त्याचप्रमाणे हिरवी झाडे लालसर जांभळी दिसतील. 

या रंगीत व्यस्त फिल्मवरून मूळ अस्सल रंगांत छायाचित्र येण्यासाठी तिची छपाई दुसऱ्या तीन थरी रंगीत सम फिल्मवर करतात. या फिल्मचे संस्करण व धुलाई केल्यावर अस्सल रंगांत छायाचित्र मिळते.


रंगीत फिल्मचे संस्करण : रंगीत फिल्मच्या संस्करणासाठी अनेक प्रकारची रसायने वापरतात. विकाशनाच्या रसायनांत सर्व पद्धतीत बरेच साम्य असते. 

प्रकाशन केलेले अदृश्य चित्र काळ्या चांदीच्या चित्रात दृश्य करण्यासाठी नेहमी पुढील घटक विकाशनात वापरतात : (१) मुख्य विकाशक घटक, (२) रक्षक, (३) क्षार व (४) रोधक.

रंगांच्या विकाशनासाठी सीडी — २ व सीडी – ३ या नावाने मिळणारे विकाशक घटक वापरतात. ह्या विकाशक घटकांमुळे ऑक्सिडीकरण [⟶ ऑक्सिडीभवन ] उत्पाद तयार होऊन ते पायसाच्या प्रत्येक थरातील रंगाच्या जोड घटकातून न विरघळणारे रंजक तयार करते. ज्या वेळी चांदीचा एक कण तयार होतो त्या वेळी तेथे तयार होणाऱ्या ऑक्सिडीकरण उत्पादामुळे जवळच एक रंजकाचा कण तयार होतो. म्हणजेच रंगीत विकाशनाच्या वेळी पहिल्या टप्प्यात काळे-पांढरे व रंगीत चित्र एकत्रित तयार होते.

विकाशनानंतर त्यासाठी वापरण्यात आलेली रसायने फिल्मवरून काढून तिची चांगल्या प्रकारे धुलाई करतात. या धुलाईत पुष्कळ वेळा ॲसिटिक अम्लाचा वापर करून विकाशनाचा क्षार कमी करून फिल्मला लागलेला विकाशक निष्प्रभ करतात. विकाशन न झालेले आणि प्रकाशन न झालेले पायसातील सिल्व्हर हॅलाइड फिल्मवरून काढून टाकण्यासाठी स्थिरक म्हणून सोडियम थायोसल्फेटाचा उपयोग करतात. स्थिरीकरणानंतर स्वच्छ पाण्याने अंतिम धुलाई करतात आणि ती सुकवितात.

रंगीत व्युत्क्रमी संस्करण : रंगीत चित्रणाच्या काही फिल्म अशा प्रकारे बनवितात की, त्यांचे संस्करण केल्यावर त्या प्रथमदर्शनीच अस्सल रंगात तयार होतात. या फिल्मचा उपयोग हौशी लोक छायाचित्रणासाठी जास्त प्रमाणात करतात. या संस्करणाच्या पद्धतीस व्युत्क्रमी संस्करण म्हणतात.

या संस्करण पद्धतीत प्रकाशन केलेल्या फिल्मच्या प्रत्येक थरातील फक्त सिल्व्हर हॅलाइड प्रथम विकाशन करतात, पण त्यातील रंगाच्या जोड घटकाचे करीत नाही. धुलाईनंतर ती फिल्म शुभ्र प्रकाशासमोर दुसऱ्या प्रकाशनासाठी धरतात व नंतर परत तिचे विकाशन करतात. या वेळी मात्र तिन्ही रंगीत थरांत चित्र तयार होते. यानंतर विकाशनमुळे धातुरूप काळ्या चांदीमध्ये उमटलेले चित्र रसायनांच्या साहाय्याने काढून टाकतात व रंगीत चित्राचे स्थिरीकरण करतात. स्थिरीकरणानंतर चित्राची चांगल्या प्रकारे धुलाई करून ते सुकवितात. सुकविल्यानंतर अस्सल रंगात फिल्म तयार होते, तिला पारदर्शिका म्हणतात.

या प्रकारच्या रंगीत फिल्मांमध्ये कोडॅक्रोम, एक्टाक्रोम, ॲन्स्कोक्रोम, आग्फाकलर, सीटी — १८ इत्यादींचा समावेश होतो. दिवसाच्या प्रकाशात आणि कृत्रिम प्रकाशात वापरण्यासाठी अशा दोन प्रकारांत त्या मिळतात.

कोडॅक्रोम फिल्म निराळ्याच पद्धतीने तयार केलेली असते म्हणून तिचे विकाशन फिल्म वापरणाऱ्याला करता येत नाही. त्यामुळे ती विकाशनासाठी कंपनीकडेच पाठवावी लागते.

रंगीत छायाचित्रणाच्या विविध प्रक्रिया : रंगीत छायाचित्रणासाठी वापरण्यात येणाऱ्या फिल्मांचे प्रकार व त्यांच्यावर करण्यात येणारे संस्करण यांनुसार रंगीत छायाचित्रणाच्या प्रक्रियांचे विविध प्रकार पडतात. या प्रक्रियांपैकी काही महत्त्वाच्या प्रक्रियांचे वर्णन खाली दिले आहे.

चाळणी प्रक्रिया : रंगीत छायाचित्रणासाठी . या प्रक्रियेत रंग गाळण्याची चाळणी व व्यस्त काच एकत्र नसत. रंग गाळण्यासाठी शुष्क स्टार्चाचे सूक्ष्म कण पारदर्शक रंजकात रंगवून ते वापरले जात. ही प्रक्रिया तीस वर्षे प्रचारात होती आणि ल्यूम्येअर ऑटोक्रोम प्लेट या नावाने त्या चाळण्या विकल्या जात.

याच तत्त्वावर पुढे १९०७ च्या सुमारास फिन्ली काचा तयार करण्यात आल्या. यांसाठी तीन निरनिराळ्या प्रकाश गाळण्या न वापरता तीन प्रकाश गाळण्यांचे बारीक कण बनवून त्यांची एकत्रित प्रकाश गाळणी तयार करून तीवर समग्रवर्णी पायसाचे लेपन करीत. या काचेचे प्रकाशन गाळणीच्या बाजूने केले जात असे. त्यामुळे पायसावर येणारे चित्र निळ्या, हिरव्या व लाल रंगांच्या प्रकाश गाळणीच्या बारीक कणांमुळे विभागले जात असे. काचेचे विकाशन व्युत्क्रमी संस्करण पद्धतीने केल्यावर सम प्रत काळ्या – पांढऱ्यात दिसे, पण तिचे प्रक्षेपण केल्यावर किंवा उजेडातून पाहताना ती सर्व रंगांत दिसे.

त्यानंतर फिन्ली क्रियेत फरक करण्यात आला. फिल्मवर पायस लेपनापूर्वी रंगीत कलिलामध्ये चाळणी छापण्यात आली. पुढे आग्फाकलर, ड्यूफेकलर नावांच्या फिल्म, चलच्चित्रण फिल्म आणि तुकडा फिल्म याच पद्धतीने तयार करून बाजारात आल्या. या प्रक्रियेने बनविलेल्या पारदर्शिका चांगल्या असत, पण त्या मोठ्या प्रमाणावर तयार करणे अवघड व न परवडणारे होते. त्यांच्या प्रक्षेपणासाठी जास्त प्रकाश लागे आणि काही वेळा त्या पाहताना रंगाच्या चाळणीच्या चौकटी स्पष्टपणे दिसत असत.


लेंटिक्युलर प्रक्रिया : ही प्रक्रिया कोडॅक कंपनीने बाजारात आणली. या प्रक्रियेत मूळ फिल्मच्या आधारकाच्या पायस लावलेल्या बाजूच्या विरूद्ध बाजूवर बहिर्गोल भिंगासारखे सूक्ष्म आकार दाबलेले असून छायाचित्र घेताना कॅमेऱ्याच्या भिंगावर तीन रंगांसाठी एकच एकत्रित प्रकाश गाळणी लावत. फिल्मचे प्रकाशन तिच्या आधारकाच्या बाजूने करीत व त्यामुळे फिल्मवर असलेल्या असंख्य भिंगांसारख्या आकारांतून कॅमेऱ्यासमोरील दृश्याचे प्रकाश गाळणीच्या रंगाप्रमाणे सूक्ष्म ठिपक्यांत चित्र उठत असे. या फिल्मचे व्युत्क्रमी पद्धतीने संस्करण केल्यावर तिची काळ्या—पांढऱ्यात पारदर्शिका तयार होई, पण जेव्हा ती मूळच्या एकत्रित प्रकाश गाळणीबरोबर जोडली जाई तेव्हा ती रंगीत दिसे. या प्रक्रियेने मिळणारी फिल्म उत्कृष्ट असे, पण तिचे प्रक्षेपण करण्यासाठी विशिष्ट प्रकाशयोजना करणे आवश्यक असे.

रंगद्रव्य प्रक्रिया : छायाचित्र रंगीत येण्यासाठी ज्या प्रक्रियेत जिलेटिनामध्ये रंगद्रव्ये घालतात, त्या प्रक्रियेला रंगद्रव्य प्रक्रिया म्हणतात.कार्बन प्रक्रिया व कार्ब्रो प्रक्रिया याच तंत्रावर आधारलेल्या आहेत.

बायक्रोमेट व रंगद्रव्य असलेल्या जिलेटिनाच्या थरावर प्रकाशाचा परिणाम होतो. प्रकाशाचा परिणाम ज्या प्रमाणात थरावर झाला असेल, त्या प्रमाणात तो फुगून कमीजास्त घट्ट होतो आणि त्यात वापरलेल्या रंगद्रव्यात एक पारदर्शिका तयार होते. अशा प्रकारे तीन रंगांसाठी घेतलेल्या व्यस्त प्रतींवरून तीन निरनिराळ्या रंगांत पारदर्शिका तयार झाल्यावर त्या एका कागदावर एकावर एक अशा चढवल्यावर एक रंगीत छायाचित्र मिळते.

कार्ब्रो प्रक्रिया : ए.मॅरिअन व टी. मॅन्ली यांनी ही प्रक्रिया शोधून काढली प्रकाशाचा परिणाम जसा बायक्रोमेट असलेल्या जिलेटिनाच्या थरावर होतो तसाच तो ब्रोमाइड असलेल्या थरावरही होतो.

या प्रक्रियेत तीन निरनिराळ्या रंगांच्या प्रकाश गाळण्या वापरून घेतलेल्या व्यस्त प्रतींवरून प्लॅटिनो मॅटसारख्या ब्रोमाइड कागदावर तीन सम प्रती तयार करतात. हा कागद रंगीत छायाचित्रणासाठी मुद्दाम तयार केलेला असतो. त्यावर लावलेल्या पायसावर ते घट्ट करण्यासाठी इतर ब्रोमाइड कागदांवर असतो तसा जिलेटिनाचा आणखी थर दिलेला नसतो. सम प्रती बराच वेळ पाण्यात ठेवल्यावर त्यावर बायक्रोमेट व रंग असलेल्या जिलेटिनाचा थर देऊन तो दाबतात. दाबामुळे छायाचित्रातील छायाभेदाप्रमाणे जिलेटिनाचे एक रंगीत चित्र तयार होते. या प्रमाणे तीन रंगांसाठी घेतलेल्या तीन छायाचित्रांचे थर एकावर एक चढवून रंगीत छायाचित्र मिळते. 

रंजक नाशक प्रक्रिया : हि प्रक्रिया १९३४ साली गास्पारकलर नावाच्या रंगीत छायाचित्रणाचे कागद बनविण्यासाठी प्रथम वापरण्यात आली. या प्रक्रियेचे वैशिष्ट्य असे की, सिल्व्हर हॅलाइड आणि रंजक असलेले तीन थर एकावर एक देऊन पायस तयार केलेले असे. सम पारदर्शिकेचे कागदावर प्रकाशन केल्यावर प्रथम विकाशनात तिन्ही थरांतील सिल्व्हर हॅलाइड काळे पडते आणि दुसऱ्या विकाशनात ज्या प्रमाणात चित्रात काळसरपणा आलेला असेल त्या प्रमाणात नको असलेला रंजक नाहीसा होतो. शेवटी उरलेल्या काळ्या-पांढऱ्या चित्राचे विरंजन केल्यावर रंगीत छायाचित्र तयार होते. रंगीत व्यस्त प्रतीवरून याच कागदावर व्युत्क्रमी संस्करणाने रंगीत छायाचित्र मिळू शकते.

रंजक विरंजन प्रक्रिया : जे.एच्. स्मिथ यांनी शोधून काढलेल्या प्रक्रियेने रंगीत छायाचित्रणासाठी उटोकलर नावाचा कागद बनवीत असत. या प्रक्रियेत प्रकाशामुळे पायसाच्या थरातील रंग फिके होतात. थायोसीनामाइन वापरून रंजकाचे विरंजन नियंत्रित करतात, तर संवेदनशील द्रव्य निष्प्रभावी करून मिळालेले चित्र स्थिर करतात.

उठावाकृती धुलाई प्रक्रिया : रंगीत छायाचित्र घेण्यासाठी ही प्रक्रिया कोडॅक कंपनीने १९३५ साली सुरू केली. या प्रक्रियेत घट्ट झालेल्या जिलेटिनाच्या रंगद्रव्ययुक्त उठावाकृती मिळतात व त्यांचे गरम पाण्यात विकाशन करावे लागते. यासाठी कोणत्याही प्रकारच्या तीन रंगी छायाचित्रणाच्या कॅमेऱ्याने प्रथम तीन व्यस्त प्रती काढाव्या लागतात. या प्रत्येक व्यस्त प्रतीवरून उठावाकृती धुलाई फिल्मवर तिच्या मागच्या बाजूने प्रकाशन करून काळ्या-पांढऱ्यात सम प्रत बनवितात. त्यांचे नंतर विरंजन करून त्या योग्य रंजकात रंगवितात. नंतर त्या जिलेटीन लावलेल्या एका कागदावर एकानंतर एक अशा दाबाखाली ठेवतात. त्यामुळे जिलेटीन लावलेल्या कागदावर रंग उठतात. अशा प्रकारे तिन्ही रंगांतील चित्रे एकावर एक उठल्यावर एक रंगीत छायाचित्र तयार होते. या प्रक्रियेने आठ दहा प्रती काढता येतात.

रंजक स्थानांतरण प्रक्रिया : उठावाकृती धुलाई प्रक्रियेनंतर कोडॅक कंपनीने रंजक स्थानांतरण प्रक्रिया शोधून काढली आणि ती आजही प्रचारात आहे.

उठावाकृती धुलाई प्रक्रियेप्रमाणेच या प्रक्रियेत प्रथम तीन व्यस्त प्रती घ्याव्या लागतात. या व्यस्त प्रतींवरून रंजक स्थानांतरणाच्या फिल्मवर मागच्या बाजूने प्रकाशन करून त्याचे विकाशन जिलेटीन फुगून घट्ट करणाऱ्या विकाशकात करतात. नंतर प्रकाश मिळालेल्या ठिकाणचे जिलेटीन घट्ट होते. उरलेले नरम जिलेटीन गरम पाण्याने काढून टाकल्यावर उरलेल्या भागाच्या पायसाचा ठसा तयार होतो. या ठशाला रंजक लावून तो जिलेटीन लावलेल्या कागदावर उठवितात. याप्रमाणे तिन्ही रंगांच्या छपाईनंतर उत्तमपैकी रंगीत छायाचित्र तयार होते. या जिलेटिनापासून बनविलेल्या ठशावरून अनेक रंगीत प्रती काढता येतात. याच तंत्राने टेक्निकलर फिल्म तयार करतात.

जोड-घटकी रंजक प्रक्रिया : हल्ली रंगीत छायाचित्रणासाठी एकत्रित तीन थरी विलगीकरण पद्धतीने बनविलेली फिल्म वापरतात. कारण ती बनविण्यास, वापरण्यास व संस्करणास सोपी पडते. यासाठी जे रंजक वापरतात ते पायसामध्ये सिल्व्हर हॅलाइडाच्या बरोबरच घातलेले असतात आणि ते आपला रंग विकाशनाबरोबर प्रगट करतात.

रंगीत सम प्रतीसाठी जो कागद वापरतात तो पांढरा परावर्तक आधारक असलेला अथवा संश्लेषित (कृत्रिम रीतीने बनविलेल्या ) रेझिनाचा थर दिलेला किंवा पांढऱ्या रंगद्रव्ययुक्त प्लॅस्टिकचा असतो. त्यावर रंगीत सम पारदर्शिकेवरून व्युत्क्रमी संस्करणाने किंवा रंगीत व्यस्त फिल्मवरून किंवा तीन रंगी चित्रासाठी मुद्दाम तयार केलेल्या काळ्या-पांढऱ्या रंग वेगळ्या करणाऱ्या व्यस्त प्रतींवरून रंगीत छायाचित्र काढता येते. कोडॅक्रोम किंवा एक्टाक्रोम पारदर्शिकेवरून किंवा आग्फाकलर, एक्टाकलर यांसारख्या रंगीत व्यस्त फिल्मांवरून याच प्रकारच्या कागदावर रंगीत सम प्रती बनवितात. मूळ रंगीत पारदर्शिकेवरून किंवा रंगीत व्यस्त फिल्मवरून सम पारदर्शिकांच्या रंगीत प्रती बनविण्यासाठी खास प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. पोलॅरॉइड लॅंड कंपनीने १९६३ साली पोलाकलर नावाची फिल्म बाजारात आणली. ती एकत्रित तीन थरी असून तीत विलगीकरण पद्धत वापरतात. या फिल्ममध्ये विसरण स्थानांतरण तत्त्वाचा उपयोग केलेला असून केवळ ५० सेकंदांत कॅमेऱ्यामध्ये सम रंगीत प्रत मिळू शकते.

रंगीत चित्रपट : सुरुवातीचे रंगीत चित्रपट संयोगीकरण पद्धतीचे होते. किनेमाकलर या पद्धतीत फक्त दोनच रंग असून वेगवेगळ्या सम प्रतींचे प्रक्षेपण एकापाठोपाठ फिरत्या जोड गाळणीमधून करण्यात येत असे. नंतर ड्यूफेकलर ही चाळणी प्रक्रियेवर आधारलेली फिल्म व लेंटिक्युलर फिल्म पद्धतीची कोडॅकलरची १६ मिमी.ची फिल्म बाजारात आल्या. त्यातील रंग जरी चांगले येत असत, तरी त्या पद्धती किचकट असत. त्यांच्या प्रक्षेपणासाठी फार प्रकाश लागे व काही वेळा त्यावर जाळीसारखी नक्षी दिसे म्हणून नव्या प्रकारच्या रंगीत फिल्म उपलब्ध झाल्यावर या प्रकारच्या फिल्म व्यवहारातून गेल्या.

विलगीकरण पद्धतीने रंगीत फिल्म बनू लागल्यावर सर्वप्रथम म्हणजे १९२८ साली टेक्निकलर फिल्म बाजारात आली. यानंतर कोडॅक्रोम ८ मिमी., १६ मिमी. व ३५ मिमी. मध्ये आली. आता आग्फाकलर, गेव्हाकलर, ईस्टमनकलर इ. अनेक रंगीत व्यस्त व रंगीत सम फिल्म तयार होऊ लागल्या आहेत [⟶ चलच्चित्रपट तंत्र ].


पारदर्शिका : हौशी छायाचित्रकारांनी काढलेल्या रंगीत फिल्म ३५ मिमी. फिल्मांच्या पारदर्शिकेच्या स्वरूपात असतात. ह्या पारदर्शिका सामान्यतः प्लॅस्टिकच्या किंवा जाड कागदाच्या चौकटीत बसविलेल्या असतात. तसेच त्या दोन काचांमध्ये ठेवून काचा कडेने चिकटवून ‘स्लाइड’ स्वरूपातही असतात. अशा पारदर्शिका चित्रपटगृहात किंवा शाळेत काळोख्या खोलीत दाखविता येतात. यासाठी लागणाऱ्या प्रक्षेपकात भिंग,स्लाइड ठेवण्याची व्यवस्था व प्रकाशयोजना ( दिवा, परावर्तक व केंद्रक भिंग) असते. ३०—५० स्लाइड एकाच वेळी बसतील असे तबक आधुनिक प्रक्षेपकात असते. लहान आकाराच्या स्लाइड २४×३६ मिमी. च्या तर मोठ्या स्लाइड ३×३ सेंमी. च्या असतात.

पोलॅरॉइड छायाचित्रण : पोलॅरॉइड पद्धती ही विसरण स्थानांतरण पद्धतीवर आधारलेली आहे. प्रकाशन झाल्यावर एका मिनिटातच कॅमेऱ्यामध्येच फिल्मवर संस्कार होऊन सम प्रत मिळते. हे तत्त्व एडवीन लॅंड यांनी १९४७ साली कॅमेऱ्यासाठी वापरले. सुरुवातीला वापरलेली फिल्म व्यस्त व सम प्रतींचे दुहेरी काम करी. १९६३ मध्ये रंगीत छायाचित्रणही या पद्धतीने करता येऊ लागले. 

या पद्धतीने मिळणारे छायाचित्र गुंडाळी फिल्मबाबत ८·२५ × १०·८० सेंमी. आकारमानाचे तर पटलाच्याबाबत ते १० × १२·५० सेंमी. आकारमानाचे असते. हौशी छायाचित्रकारांसाठी व झटपट व्यक्तिचित्रांसाठी, ओळखपत्रावरील चित्रांसाठी ही पद्धत प्रथम वापरण्यात आली. स्टुडिओमध्ये या प्रकारच्या चित्रांच्या साह्याने प्रकाशन चाचणी चटकन करता येते व प्रकाशयोजना योग्य आहे की नाही, हे पाहता येते. व्यापारी क्षेत्रात त्याचे बरेच उपयोग आहेत. वृत्तपत्रीय छायाचित्रणातही या पद्धतीचा उपयोग करतात. प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणात, अवरक्त छायाचित्रणात इत्यादींमध्ये ही पद्धत वापरतात. न्याय साहाय्यक व वैद्यकीय छायाचित्रणातही तिचा वापर करतात. तथापि ही पद्धत शीघ्र गती छायाचित्रणास उपयोगी पडत नाही. तसेच या एकाच चित्रापासून अनेक प्रती काढता येत नाहीत. जेथे ताबडतोब प्रक्रिया करता येत नाही अशा ठिकाणी उदा., पाण्याखालील आणि अवकाश छायाचित्रणात तिचा वापर करता येत नाही. चलच्चित्रणासाठी लागणारी फिल्म तयार करण्यासंबंधी संशोधन चालू आहे.एसएक्स-७० या सुटसुटीत कॅमेऱ्याने तत्काल रंगीत छायाचित्रण करता येते. हा कॅमेरा हौशी छायाचित्रकार तसेच वैज्ञानिक छायाचित्रणातही वापरतात.

प्रस्तुत नोंदीच्या राहिलेल्या भागात व्यक्तीचित्रे, वृत्तपत्रीय, औद्योगिक, खगोलीय, वैज्ञानिक इ. क्षेत्रांत छायाचित्रणाचे करण्यात येणारे उपयोग व त्यांत वापरण्यात येणारी तंत्रे यांचे तसेच छायाचित्रणाच्या साहित्यनिर्मितीच्या उद्योगासंबंधी विवरण केलेले आहे.

व्यक्तिचित्रे : केवळ एखाद्या व्यक्तीला कॅमेऱ्यासमोर आणले व फिल्मचे प्रकाशन केले की, चांगले व्यक्तीचित्र मिळतेच असे नाही. व्यक्तिचित्र काढणे ही एक कला आहे. व्यक्तीचित्र घेताना कॅमेरा योग्य अंतरावर ठेवावा लागतो. प्रत्येक कॅमेऱ्याला काही मर्यादा असतात. त्यांचे उल्लंघन केल्यास व्यक्तिचित्रात विकृती निर्माण होते. व्यक्तीचित्र जवळून न घेता ते जर दीर्घ केंद्रांतर असलेल्या भिंगाचा वापर करून दुरून घेतले, तर ते अधिक चांगले येईल. दृश्यदर्शकाचा वापर करून त्यातच चित्राची मांडणी करावी. छायाचित्रातील व्यक्तीकडे पाहताना पार्श्वभूमीकडे लक्ष जाईल अशी पार्श्वभूमी टाळावी. प्रत्येक व्यक्तीला तिचे स्वतंत्र व्यक्तीत्त्व असते, ते टिपण्यात छायाचित्रकाराचे खरे कौशल्य असते. ‘जरा थोडे हसा’ असे सांगून चित्र चांगले येईलच, असे नाही कारण मुद्दाम हसताना व्यक्तीला तिचे छायाचित्र घेतले जाणार आहे याची कल्पना असते व हास्य कृत्रिम येते. काही तरी विषय काढून व्यक्तीला बोलते करावे म्हणजे ती मोकळेपणाने वागेल आणि योग्य वेळ येताच छायाचित्र घ्यावे. 

बाह्य वातावरणात व्यक्तिचित्रे घेताना ऐन दुपारची वेळ निवडू नये कारण त्या वेळेला सूर्यप्रकाशात प्रखरता असते त्यामुळे छायेतील स्पष्टता छायाचित्रात दिसत नाही. ढगाळलेल्या दिवशी उजेडाच्या व छायेच्या बाजूतील स्पष्टता नीट दिसते. सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यप्रकाश एका बाजूकडून येत असल्यामुळे दुसऱ्या बाजूला परावर्तनासाठी सफेत कपड्याचा, कागदाचा किंवा जवळच्या भिंतीचा वापर करून सुंदर छायाचित्र घेता येते. पार्श्वभूमीची स्पष्टता दिसणार नाही अशा रीतीने भिंगाचा छिद्रव्यास (भिंगाच्या अक्षास समांतर असलेली किरणशलाका भिंगाच्या जेवढ्या पृष्ठभागातून आत जाऊन प्रतिमा पाडू शकते तेवढ्या भिंगाच्या पृष्ठभागाचा व्यास) ठेवावा. पार्श्वभूमीसाठी आकाशाचा उपयोग करताना पिवळ्या प्रकाश गाळणीचा उपयोग करावा. घरातील खिडकीजवळ छायाचित्र घेताना वरीलप्रमणेच सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. हल्ली वेगवान फिल्म आणि मोठ्या छिद्रव्यासाची भिंगे मिळत असल्यामुळे घरातल्या घरात उत्तम व्यक्तिचित्रे घेता येतात. 

कृत्रिम प्रकाशातील व्यक्तिचित्रे : दोन विस्तार दीप, एक एकाग्र दीप, फिक्या व गडद रंगाच्या पडद्याच्या आकाराचे कापड इतके सामान असल्यावर कृत्रिम प्रकाशात चांगली व्यक्तिचित्रे घेता येतात. एका विस्तार दीपाचा मुख्य प्रकाश म्हणून वापर करावा आणि दुसरा थोडा दूर ठेवून छायेच्या बाजूला ठेवावा. वाटल्यास एकाग्र दीपाचा उपयोग थोड्या मागच्या बाजूने डोक्यावर आणि खांद्यावर प्रकाश येईल असा करावा. व्यक्तीला पार्श्वभूमीपासून कमीत कमी एक मी. अंतरावर बसवावे. विस्तार दीप व्यक्तीपासून जर १·५ मी. अंतरावर असतील, तर वेगवान समग्रवर्णी फिल्मसाठी ६·६ छिद्रव्यास ठेवून /३० से. प्रकाशन पुरे होईल. एकच विस्तार दीप असेल तर सफेत कागदाचा किंवा कापडाचा परावर्तक म्हणून वापर करावा. दिव्यांच्या जागा बदलून अनेक प्रकारांनी प्रकाशयोजना करता येतात म्हणून दिव्यांचा योग्य प्रकारे वापर करावा. फोटो फ्लड दिव्याबरोबर मिळणाऱ्या अंतर, प्रकाश तीव्रता व फिल्मचा वेग यांची माहिती देणाऱ्या कोष्टकाचा यासाठी उपयोग करावा. काही वेळा व्यक्तीचा रंग आणि कपडे लक्षात घेऊन प्रकाश गाळणी वापरावी.

वृत्तपत्रीय व औद्योगिक छायाचित्रण : बातमीच्या मथळ्याबरोबर जर छायाचित्रे असतील, तर बातमी अधिक परिणामकारक होते. वृत्तपत्रीय छायाचित्रकारास नेहमी सर्वतोपरी सुसज्ज रहावे लागते. त्याच्याजवळ दोन-तीन कॅमेरे, भरपूर फिल्म, इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप, साहाय्यक भिंगे इ. सामग्री नेहमी असावी लागते.

ज्या कामावर जायचे असेल त्याची त्याला संपूर्ण माहिती असावी लागते किंवा ती गोळा करण्याची त्याची पात्रता असावी लागते. दंगलीच्या प्रसंगी न कचरता समोर दिसणाऱ्या घटनेची वेळप्रसंगी दूरचित्रण (टेलिफोटो) भिंगाचा उपयोग करून छायाचित्रे घेतली पाहिजेत. महापूर, दंगे, लढाई किंवा आग लागली असताना काही वेळा जीवावर उदार होऊन व प्रसंगावधान राखून काम करावे लागते. छायाचित्रे ऐनघाईगर्दीत घेतानादेखील काही छायाचित्रकार चित्ररचनेकडे लक्ष देतात.

औद्योगिक छायाचित्रकाराचे काम वृत्तपत्रीय छायाचित्रकारापेक्षा निराळे असते. त्याला कामावर नेहमी मदतनीसाची गरज असते. निरनिराळ्या प्रकारच्या कॅमेऱ्यांची, साहाय्यक भिंगांची, कॅमेऱ्यासाठी मजबूत व बहुगुणी घोड्याची आणि सुटसुटीत प्रकाश साधनांची त्याला आवश्यकता असते. मोठमोठ्या कारखान्यांबाहेरील व आतील छायाचित्रे दीर्घकोनी भिंगाशिवाय घेता येत नाहीत. नैसर्गिक प्रकाशात जर कारखान्याचे चित्र घ्यावयाचे असेल, तर प्रकाशाच्या दृष्टीने सोयीची वेळ ठरविण्यासाठी त्याची आगाऊ पहाणी करणे आवश्यक ठरते. त्याचप्रमाणे मोठ्या कारखान्यांच्या आतील रात्रीची छायाचित्रे एकदोन विस्तार दीपांनी वा इलेक्ट्रॉनीय स्फुर दीपाने घेता येण्यासारखी नसतात. त्यासाठी जागेची संध्याकाळनंतर पहाणी करून अधिक प्रकाशाची गरज कोठे आहे, ते ठरवून मग दिव्यांची मांडणी करून छायाचित्रे घ्यावी लागतात.

रंगीत छायाचित्रासाठी काही वेळा रंगीत प्रकाशाचा उपयोग केल्यास छायाचित्र अधिक प्रभावी  होते. एखाद्या यंत्राचे रंगीत किंवा काळ्या-पांढऱ्यात छायाचित्रण करताना काही वेळा त्याचा किंवा पार्श्वभूमीचा मूळ रंग बदलणे हिताचे असते. कारखान्याची  छायाचित्रे घेताना त्याच्या रचनेकडे विशेष लक्ष द्यावे लागते. कारखान्याच्या परिसराच्या छायाचित्रणासाठी जर जवळपास एखादी टेकडी किंवा उंच इमारत नसेल, तर सोयीच्या जागी मुद्दाम उंचसा मनोरा बांधून त्यावरून छायाचित्र घ्यावे लागते किंवा काही वेळा ते विमानातूनच घेणे इष्ट असते. कारखान्यातील यंत्रांची, उत्पादित वस्तूंची व कारखान्यातील एकूण रचनेची छायाचित्रे जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरतात.


दस्तऐवजांच्या प्रती काढणे :उद्योगधंद्यांच्या, शैक्षणिक गरजांच्या व संशोधन कार्याच्या वाढत्या व्यापामुळे महत्त्वाच्या कागदपत्रांच्या व आकृत्यांच्या बिनचूक प्रतींची गरज वाढत आहे. छायाचित्रणाने बिनचूक नक्कल करता येते म्हणून अशा प्रती तयार करण्यासाठी खास कॅमेरे मिळतात. त्याच्या साहाय्याने आपल्याला पाहिजे तशी प्रत तयार करता येते. फोटोस्टॅट लि. कंपनीने अशा प्रकारच्या कामासाठी निरनिराळ्या आकारमानांचे व प्रकारांचे कॅमेरे तयार केले आहेत. या कंपनीच्या नावावरून दस्तऐवजाच्या छायाचित्रित प्रतीस फोटोस्टॅट प्रत म्हणतात.

फोटोस्टॅट यंत्र :या यंत्राने मूळ प्रतीच्या आकारमानाची किंवा तिच्यापेक्षा मोठ्या अगर लहान आकारमानाची प्रत अत्यंत अल्प वेळात बनविता येते. या यंत्राने पारदर्शिकाही बनविता येतात. यंत्रात वापरलेल्या कागदावर प्रतीचा प्रकार अवलंबून असतो. या यंत्राच्या वापरासाठी काळोख्या खोलीची गरज लागत नसून ते कोणत्याही खोलीच्या नित्याच्या उजेडात वापरता येते. घेतलेल्या छायाचित्राचे संस्करण यंत्रातच करता येते आणि त्यासाठी कॅमेऱ्याच्या बाहेरच्या बाजूस सोय केलेली असते. मोठ्यात मोठी ४५·७५ × ६०·९५ सेंमी. ( १८× २४“) या आकारमानाची प्रत या कॅमेऱ्याने काढता येते. या कॅमेऱ्याच्या भिंगावर एक ४५ अंशाचा काटकोनी लोलक बसविलेला असतो त्यामुळे कागदावरील आकृती सुलटी येते. ती दिसावयास फक्त व्यस्त प्रतीसारखी दिसते. या पहिल्या प्रतीवरून आणखी प्रती काढल्यास त्या मूळ प्रतीसारख्या दिसतात. मोठ्या व अवजड अशा पुस्तकाच्या पानाच्या छायाचित्रणासाठी एक स्वतंत्र पुस्तक-धारक या यंत्रावर बसविता येतो.

आ.१२ फोटोस्टॅट यंत्र

स्टेटफाइल रेकॉर्डर : या कॅमेऱ्याचा उपयोग प्रामुख्याने मोठे नकाशे (१·०० × १·५० मी. पर्यंत), अभियांत्रिकी आकृत्या किंवा अन्य प्रकारच्या आकृत्यांच्या प्रतिकृती करण्यासाठी करतात. या यंत्रावर १२ × १६·५ किंवा १६·५ × २१·५ सेंमी. आकाराच्या फिल्मवर प्रथम व्यस्त प्रत बनवितात व त्याच यंत्रात थोडा बदल करून त्याचे चित्रवर्धकात रूपांतर करून पाहिजे त्या आकारमानात सम प्रती काढतात. कॅमेरा दोन रूळांवरील गाड्यावर फिरता असल्यामुळे त्याची हालचाल त्वरित करता येते.

वरील दोन्ही प्रकारचे कॅमेरे मोठे कारखाने आणि बॅंकांसारख्या कचेऱ्यांत उपयोगात आणलेले आढळतात. 

 

आ. १३ सूक्ष्मप्रत निर्मिती यंत्र

सूक्ष्मप्रत निर्मिती यंत्र :कचेऱ्यांतील महत्त्वाचे कागद खराब किंवा गहाळ होण्याची काही वेळा शक्यता असते म्हणून त्यांची नक्कल ३५, १६ किंवा ८ मिमी. फिल्मवर करण्यात येते. या यंत्राच्या साह्याने ३० मी. लांबीच्या फिल्मवर पाहिजे त्या आकारमानात ८०० ते १,६०० व्यस्त प्रती काढता येतात. हे यंत्र वापरण्यास फार सोपे असते व त्यातील काही हालचाली स्वयंचलित असतात. उदा., चित्रणाच्या आकृतीची  स्पष्टता बाह्य रचनांनी करता येते. तसेच कळ दाबून फिल्मचे प्रकाशन केल्यावर ती पुढे सरकून त्या जागी पुढच्या प्रकाशनासाठी फिल्मची दुसरी चौकट येऊन चौकट मोजणी अंक बदलतो. यंत्र चालविण्यात जर बिघाड असेल, तर लक्ष वेधण्यासाठी विशिष्ट आवाज येतो. यंत्राबरोबर दिव्याचीही सोय असते. या यंत्राने घेतलेल्या फिल्मचे संस्करण करण्यासाठी  छोटी यंत्रे उपलब्ध असतात. या यंत्राने महत्त्वाच्या व दुर्मिळ ग्रंथाच्या सूक्ष्मप्रती तयार करता येतात त्यामुळे ग्रंथालयातील जागेची बचत होते.

  

सूक्ष्मप्रतदर्शक :छोट्या फिल्मवर घेतलेली सूक्ष्म छायाचित्रे पाहण्यासाठी स्वतंत्र साधने असतात. त्यात  फिल्मवरील चित्राचे ४५ सेंमी. दुधी काचेवर वर्धन केले जाते. फिल्म उभी किंवा आडवी करून पाहता येते. भिंगाच्या साहाय्याने चित्रातील एखाद्या भागापुरतेही वर्धन करता येते.

१६ मिमी. फिल्मवर घेतलेली छायाचित्रे जाड कागदावर वा फिल्मवर छापतात. या छापील प्रती वाचण्यासाठी स्वतंत्र यंत्र असते. एका लहानशा कागदावर तीन-चार पाने छापतात. त्यामुळे मोठी पुस्तके पोस्टाने पाठविण्यापेक्षा त्यातील पाहिजे तो मजकूर कागदावर छायाचित्रे घेऊन पाठविणे सोयीचे असते वरील प्रकारची साधने मोठ्या ग्रंथालयात वापरतात.


परावर्ती छपाई : दस्तऐवजाच्या प्रती काढण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा छायाचित्रण कागद बनवितात. या कागदामुळे दस्तऐवजाची प्रत कॅमेऱ्याशिवाय मूळ आकारमानात काढता येते. मूळ प्रतीवर पायसलेपन केलेली बाजू ठेवून त्यावर दाब दिल्यानंतर छायाचित्रण कागदाचे मागच्या बाजूने प्रकाशन करतात. याला परावर्ती छपाई म्हणतात.

प्रकाशनानंतर नेहमीप्रमाणे संस्करण केल्यावर मूळ प्रतीची व्यस्त प्रत कागदावर येते. या व्यस्त प्रतीवरून पुढे लागतील तितक्या सम प्रती संपर्क छपाईने केव्हाही काढता येतात. संपर्क छपाईचे कोणतेही साधन या कामासाठी वापरता येते.

छायाचित्रिय नक्कल निर्मिती : छायाचित्रिय नक्कल बनविण्याचे काम मोठ्या प्रमाणावर ज्या वेळी करावे लागते तेव्हा कॅमेऱ्यासाठी तिपाई स्तंभ न वापरता खास तयार केलेल्या टेबलाचा उपयोग करतात. त्यामुळे नक्कल तयार करण्याच्या वेळी मूळ प्रत कॅमेऱ्याच्या दुधी काचेशी समांतर ठेवण्यास मदत होते. मूळ प्रत काचेच्या दाबाने नेहमी सरळ ठेवतात. यासाठी संपर्क छपाईची चौकट उपयोगी पडते. प्रकाशयोजना करताना मूळ प्रतीशी ४५ कोन करून दोन दिवे सारख्या अंतरावर ठेवल्याने प्रकाश सारखा पडतो आणि दाबासाठी ठेवलेल्या काचेत दिव्याचे प्रतिबिंब दिसत नाही. मूळप्रत जर मोठ्या आकारमानाची असेल, तर दोन ऐवजी चार दिव्यांची सोय करतात. नक्कल निर्मितीसाठी स्वतंत्र भिंगे, अनेक प्रकारच्या फिल्म व विकाशक जरूरीप्रमाणे वापरतात.

गुन्हेशास्त्रविषयक छायाचित्रण : छायाचित्रणाच्या विविध पद्धतींचा उपयोग गुन्हेगारीचा शोध लावण्यासाठी जरुरीप्रमाणे करावा लागतो. गुन्हेगारांची छायाचित्रे ओळखपत्रासाठी नेहमी घेतली जातात. गुन्ह्याच्या जागी उठलेल्या गुन्हेगारांच्या बोटांच्या व इतर ठशांची आणि गुन्ह्याशी संबंधित असणाऱ्या विविध वस्तूंची छायाचित्रे अनेक प्रकारे घ्यावी लागतात.

कपड्यावरील किंवा इतर वस्तूवरील दृष्टीला न दिसणारे डाग, अदृश्य लेखन, दस्तऐवजावरील खाडाखोड, लेखनाच्या वेळी खाली धरलेल्या कागदावर उठलेले अदृश्य लिखाण अशा अनेक गोष्टींचे छायाचित्रण जंबूपार आणि अवरक्त किरणांचा वापर करून किंवा इतर अन्य प्रकारे करावे लागते. वेळप्रसंगी वर्णपट आणि क्ष-किरण चित्रणाचाही उपयोग करावा लागतो. कधीकधी रक्ताचे डाग, बंदुकीची काडतुसे इत्यादींची गुन्हा शोधण्याच्या दृष्टीने छाननी करण्यासाठी सूक्ष्मदर्शकातून अनेक प्रकारांनी छायाचित्रे घेतात.

थोड्या वेळात अनेक दिशांनी चलच्चित्रणाने विस्तृत भागाचे चित्रण करता येत असल्यामुळे गुन्हेगारी शोधण्यासाठी त्याचा उपयोग जास्त प्रमाणात करतात. या कामासाठी १६ मिमी.चे कॅमेरे जास्त पसंत केले जातात.

वैद्यकीय छायाचित्रण : वैद्यकीय शास्त्रात नेहमीच्या चित्रणाबरोबरच काही प्रकारच्या चित्रणासाठी खास फिल्म व विशिष्ट प्रकारची उपकरणे वापरावी लागतात. पोट, घसा, हृदय इत्यादींच्या आतील भागांच्या निरीक्षणासाठी व छायाचित्रणासाठी स्वतंत्र कॅमेरे वापरतात. 

वैद्यकीय छायाचित्रण करणाऱ्या छायाचित्रकाराला छायाचित्रणाबरोबरच वैद्यकीय शाखेतील शब्द व उपकरणे याची माहिती असावी लागते. नेमके कशाचे छायाचित्र हवे आहे, याची सर्व माहिती मिळाल्यानंतरच छायाचित्रकाराने आपल्या कामास आरंभ करावा लागतो.

क्ष-किरण छायाचित्रांचा व सुक्ष्मदर्शकातून घेतलेल्या छायाचित्रांचावैद्यकीय शास्त्रात नेहमीच उपयोग केला जातो. चलच्चित्रांचा उपयोग वैद्यकीय शास्त्रात नोंदीसाठी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर करतात त्याचप्रमाणे स्थिर छायाचित्रणाचा उपयोग कातडीचे रोग, शस्त्रक्रियेपूर्वीची व नंतरची अवस्था, विकृतिविज्ञानातील नमुने यांसाठी केला जातो. वैद्यकीय शास्त्रात रंगीत छायाचित्रांचा उपयोग वाढत्या प्रमाणात होत असून अवरक्त व जंबूपार किरणांनी घेतलेल्या छायाचित्रांचाही बऱ्याच वेळा उपयोग करण्यात येत आहे.

औषधे, मद्य, मानसिक आजार व मानसोत्तेजक औषधे यांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामाचे छायाचित्रण करण्याची पद्धत सेम्यॉन कीर्लिअन यांनी शोधून काढली आहे. या पद्धतीने रोगाचे निदान करण्यास तसेच पुढील संशोधनास मदत होते. या पद्धतीत उच्च विद्युत्‌ दाबाचा उपयोग करण्यात येतो.

पाण्याखालील छायाचित्रण : याचा उपयोग शास्त्रीय संशोधनासाठी व केवळ मौजेसाठीही होतो. समुद्रतळातील नैसर्गिक संपत्तीची पाहणी, समुद्रतळाचे नकाशे बनविणे, सागरी प्रवाहांचा शोध घेणे, जहाजाच्या तळाची पाहणी, बुडालेल्या जहाजांचा शोध अशा प्रकारच्या कार्यात पाण्याखालील छायाचित्रणाचा उपयोग करण्यात येतो. अशी छायाचित्रे पाणबुडे विजेच्या प्रकाशात विशेष प्रकारच्या कॅमेऱ्याने घेतात. पाण्याच्या खोलानुसार या कार्याला निरनिराळी उपकरणे वापरावी लागतात.

पाण्याखालील छायाचित्रणात प्रामुख्याने प्रकाशीय अडचणी येतात. कॅमेऱ्यात येणारी प्रतिमा पाणी, हवा व काच यांतून आल्यामुळे ती कधीच मूळच्या स्वरूपात सरळ दिसत नाही. पाणी बऱ्याच वेळा गढूळ असते. तसेच कृत्रिम प्रकाशामुळे रंग नैसर्गिक दिसत नाहीत. 

नैसर्गिक प्रकाशात छायाचित्रे फक्त पाण्याच्या पृष्ठभागाखाली घेता येतात, पण पाच मी.च्या खाली कृत्रिम प्रकाशच वापरावा लागतो. त्यासाठी कॅमेऱ्यावर एक जलरोधी आवरण घालून प्रमुख भिंगापुढे एक काच लावतात आणि प्रकाशासाठी स्फुरदीप, पाऱ्याचे बाष्प असलेला दिवा अथवा क्कॉर्ट्‌झ आयोडीन दिवा वापरतात. ६,००० मी. खालील चित्रणासाठी खास तयार केलेले दणकट कॅमेरे व दिवे वापरतात. चित्रणासाठी अतिशय खोलीवर जाण्याकरिता एका घंटेच्या आकारासारख्या पेटीतून छायाचित्रकार, शास्त्रज्ञ असे दोन-तीन लोक एकत्र जातात. या पेटीत सर्व तऱ्हांचे कॅमेरे बसविलेले असतात. पेटीला काचेच्या खिडक्या असतात व त्यांतून बाहेरच्या बाजूवर झगझगीत प्रकाश टाकून योग्य दृश्य शोधून ते चित्रित करतात.

जंबुपार छायाचित्रण : जंबुपार छायाचित्रणाचा उपयोग मुख्यत्वेकरून वर्णपटलेखन, सूक्ष्मदर्शकी छायाचित्रण, खनिज परीक्षण, गुन्हेशास्त्रविषयक छायाचित्रण, दस्तऐवज छायाचित्रण, कला व इतर प्रकारच्या संग्रहालयांतील चित्रासारख्या वस्तूंची तपासणी यांसाठी करतात.

जंबुपार छायाचित्रणासाठी जरूर असेल त्याप्रमाणे साधी, समवर्णी किंवा समग्रवर्णी फिल्म वापरतात. छायाचित्र रंगीत हवे असल्यास चित्रविषय अनुस्फुरित (जंबूपार किरण शोषून त्यांचे दृश्य किरणांत रूपांतर होईल अशी व्यवस्था करून) छायाचित्रे घेतात. जंबुपार छायाचित्रण करताना नेहमीच्या पद्धतीने किरणकेंद्र जुळवून छायाचित्र सुस्पष्ट येईल असे नाही म्हणून किरणकेंद्र बदलून एक दोन चाचण्या घ्याव्या लागतात.

जंबुपार छायाचित्रण दोन पद्धतींनी करता येते. एकीत जंबुपार किरण चित्रविषयावर टाकून तो अनुस्फुरित करतात आणि परावर्तित जंबुपार किरण शोषण्यासाठी कॅमेऱ्यावर प्रकाश गाळणी लावून फिल्मवर फक्त नजरेला दिसणारी अनुस्फुरित आकृती घेतात आणि दुसरीत म्हणजे परावर्तित जंबुपार पद्धतीत जंबुपार उद्‌गम वापरतात त्यासाठी फिल्मवर फक्त जंबुपार किरण जाऊ शकतील अशी प्रकाश गाळणी कॅमेऱ्यावर वापरतात.

जंबुपार छायाचित्रणाच्या वेळी जंबुपार उद्‌गमाकडे किंवा परावर्तित जंबुपार प्रकाशाकडे पाहू नये कारण तो डोळ्याला फार अपायकारक असतो. जंबुपार छायाचित्रण करताना प्राथमिक तयारी झाल्यानंतर खोलीतील नेहमीचा प्रकाश बंद करतात [⟶ जंबुपार प्रारण].


अवरक्त छायाचित्रण : शास्त्रीय संशोधनात अवरक्त छायाचित्रणचा पुष्कळ वेळा उपयोग करतात. एक खास प्रकारचा संवेदनशील रंजक वापरून अवरक्त तरंगलांबीला संवेदनशील असे साहित्य बनवितात. अवरक्त छायाचित्रणासाठी अवरक्त संवेदनशील साहित्य, अवरक्त किंवा गडद लाल रंगाची प्रकाश गाळणी, धातूचा वा काळा कागद गुंडाळलेला कॅमेरा व इतर वस्तू लागतात. 

अवरक्त छायाचित्रणासाठी किरणकेंद्र नेहमीच्या पद्धतीने लावून छायाचित्र सुस्पष्ट येणार नाही. ते सुस्पष्ट येण्यासाठी भिंग जास्तीत जास्त उघडे ठेवून किरणकेंद्र जुळल्यावर ते केंद्रांतर दर्शविणाऱ्या एफ ११ या खुणेवर ठेवणे जास्त सोयीचे पडते. 

गरम वस्तू, तैलचित्रे, तारे इ. नेहमी अवरक्त किरणांतील जवळच्या तरंगलांबीचे (०·८ ते २·५ मायक्रॉन या दरम्यानच्या तरंगलांबीचे, मायक्रॉन = १०-३ मिमी.) उत्सर्जन करतात म्हणून त्याची अवरक्त छायाचित्रे घेता येतात.

दूर अंतरावरून किंवा उंचीवरून साध्या नजरेला न दिसणाऱ्या गोष्टी अवरक्त छायाचित्रात दिसतात. दृष्टीला अगदी झाडांच्या पानासारख्या दिसणाऱ्या रंगांचे मायावरण जरी घातलेले असले, तरी त्या अवरक्त छायाचित्रणाने हुडकून काढता येतात. कारण असे हिरवे रंग झाडाच्या पानातील हरितद्रव्यापेक्षा जास्त प्रमाणात अवरक्त तरंग शोषून घेतात. 

अवरक्त छायाचित्रणाचा उपयोग काही प्रकारचे त्वचा रोग, अपस्फीत नीलांचे परीक्षण आणि काही प्रकारच्या हृदयविकारात होणारे शिरांचे विस्तारण यांच्या अभ्यासासाठी होतो. तसेच दस्तऐवज किंवा इतर प्रकारच्या कागदावरील खाडाखोड अवरक्त छायाचित्रणाने समजू शकते. निरनिराळ्या प्रकारचे धागे, प्राण्यांचे केस अशा प्रकारच्या वस्तूंच्या संशोधनासाठी अवरक्त सूक्ष्मदर्शकी छायाचित्रण फार मोलाचे ठरते. अवरक्त छायाचित्रणाने काळोखात छायाचित्रे घेता येतात. युद्ध काळात प्रकाशबंदी असताना शत्रूच्या प्रदेशावरून अशा प्रकारचे छायाचित्रे घेतात. यासाठी दृश्य प्रकाश नसणारे अवरक्त दिवे वापरतात.

शारीरिक व इतर प्रकारच्या उष्णता संशोधनात रंगीत अवरक्त छायाचित्रणाचा उपय़ोग करतात. त्यामुळे शरीरातील सूज व यंत्रातील घर्षण या संबंधीची माहिती झटकन मिळते. याच प्रकारच्या वनस्पतिविज्ञान, पुराजीवविज्ञान, तंत्रविद्या इत्यादींत अवरक्त छायाचित्रणाचा उपयोग करतात [⟶ अवरक्त प्रारण] .

क्ष-किरण छायाचित्रण : व्हिल्हेल्म कोनराट राँटगेन यांना क्ष-किरणाचा शोध १८९५ साली नकळत लागला. त्या वेळी अर्थातच छायाचित्रणाच्या साध्या काचा क्ष-किरण चित्रणासाठी वापरत असत. आता क्ष-किरण चित्रणासाठी फिल्म वापरतात आणि ती वेगवान व भेदक बनविण्यासाठी तिच्यावर दोन्ही बाजूंनी पायसलेपन करतात.

क्ष-किरण चित्र म्हणजे एखाद्या वस्तूवर क्ष-किरणाचा झोत टाकून मिळणारे तिच्या सावलीचे चित्र. हे चित्र वस्तूच्या आणवीय रचनेवर व जाडीवर अवलंबून असते. छायाचित्रणाची फिल्म क्ष-किरणांना संवेदनशील असते म्हणून त्यावर क्ष-किरण चित्र मिळू शकते. ज्या प्रमाणात एखाद्या पदार्थाच्या भागाने क्ष-किरणाचे शोषण केले असेल त्या प्रमाणात संस्करणानंतर आकृती फिल्मवर उमटते.

क्ष-किरणांची भेदनक्षमता त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विजेच्या दाबावर अवलंबून असते. नेहमीच्या वैद्यकीय वापरासाठी ४० ते ८० किलो व्होल्ट विद्युत्‌ दाब वापरावा लागतो. शरीराच्या जाड भागाच्या चित्रणासाठी जास्त विद्युत्‌ दाब वापरावा लागतो. औद्योगिक क्षेत्रात क्ष-किरण छायाचित्रणासाठी कित्येक लाख व्होल्टचा विद्युत्‌ दाब वापरतात. 

क्ष-किरण छायाचित्रणाचा उपयोग वैद्यकीय व औद्योगिक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर होतो. त्यांचा वैद्यकीय उपयोग सर्वांच्या परिचयाचा आहे. शरीरातील पोकळ्या, त्यांत अपघाताने जाणारे बाह्य पदार्थ, हाडाची मोडतोड, क्षय, मूत्रपिंड, पोट, हृदय, मेंदू, पाठीचा कणा, कवटीतील पोकळ्या, दंतचिकित्सा इत्यादींच्या तपासणीसाठी क्ष-किरण चित्राचा उपयोग होतो. औद्योगिक क्षेत्रात त्यांचा उपयोग धातूच्या ओतकामातील व सांध्याच्या जोडकामातील अदृश्य दोष शोधण्यासाठी करतात. त्यामुळे दोष तपासण्यासाठी त्या ओतीवाची मोडतोड करावी लागत नाही. काही विशिष्ट पद्धती वापरून यंत्राच्या कोणत्याही भागाचे क्ष-किरण चित्र घेता येते. धातूच्या जाड वस्तूंच्या निरीक्षणासाठी गॅमा किरण चित्रांचा उपयोग करतात कारण त्यांची भेदनक्षमता जास्त असते. काही विशिष्ट प्रकारच्या निरीक्षणांसाठी त्रिमितीय क्ष-किरण चित्र घेतात. केवळ /१०००००० सेकंदात प्रक्षेपित वस्तूची (उदा., बंदुकीतून सोडलेल्या गोळीची) आणि इतर जलद गतीच्या निरीक्षणासाठी क्ष-किरण चित्रे घेता येतात.

क्ष-किरण विवर्तन चित्र (एखाद्या छिद्रातून वा अपारदर्शक पदार्थाच्या कडेवरून क्ष-किरण गेल्यामुळे त्याच्या दिशेत बदल होऊन तयार होणारे आकृतिबंध) घेऊन एखाद्या स्फटिकाची आंतररचना दर्शविणारी चित्रे काढता येतात. यासाठी क्ष-किरणांचा झोत स्फटिकातून किंवा पदार्थाच्या बारीक भुकटीमधून टाकावा लागतो. काही पदार्थाचे नमुने असे असतात की, त्यांच्या फिल्मशी होणाऱ्या संयोगाने आकृती आलेखन तयार होते. यालाच स्वयं-क्ष-किरण चित्रण पद्धत म्हणतात. किरणोत्सर्गी (भेदक कण किंवा किरण बाहेर टाकणाऱ्या) समस्थानिकांचा (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकारांचा) शोध लागल्यावर ही पद्धत लक्षात आली. समस्थानिक शरीरात जेव्हा सोडली जातात तेव्हा ते कोणत्या तरी ऊतकाच्या ( समान रचना व कार्य असणाऱ्या पेशींच्या समूहाच्या) जवळ एकत्रित होतात आणि काही वेळा पेशींच्या ठराविक भागात केंद्रित होतात. शरीराचा एखादा भाग छायाचित्रणाच्या काचेवर ठेवून ते केंद्र शोधता येते कारण या काचेचे संस्करण केल्यावर अशी केंद्रे काळ्या बारीक ठिपक्यांच्या स्वरूपाची दिसतात.

क्ष-किरण फिल्म वैद्यकीय व औद्योगिक अशा दोन प्रकारांत मिळते व त्यांचे आणखी उपप्रकार असतात. क्ष-किरण चलच्चित्रणासाठी स्वतंत्र तंत्र वापरावे लागते.

छातीच्या क्ष-किरण चित्रासाठी अनुस्फुरीत पडद्यावर( किरण पडत असेपर्यंत चमकणाऱ्या पडद्यावर) दिसणाऱ्या आकृतीचे ३५ मिमी. फिल्मवर चित्रण करण्याची पद्धती दुसऱ्या महायुद्धकाळात सुरू झाली.

महाछायाचित्रण : (मॅक्रोफोटोग्राफी). पुष्कळ वेळा स्फटिक, कीटक, छोट्या वनस्पती यांसारख्या लहान आकारमानाच्या वस्तूंची दोन ते पंचवीस पटींनी मोठ्या आकारमानात छायाचित्रे लागतात. अशी छायाचित्रे वैद्यक, कीटकविज्ञान यांसारख्या विषयांबरोबर टपालाच्या तिकिटांच्या अभ्यासातही उपयुक्त ठरतात. ज्या कॅमेऱ्याचा भाता दुप्पट किंवा तिप्पट लांब करता येईल असा कॅमेरा किंवा छायाचित्रे जवळून घेण्याची उपभिंगे साध्या कॅमेऱ्यात लावून अशी छायाचित्रे घेता येतात. चित्रविषय नीट मांडून प्रकाश रचना ठरविल्यावर तो कॅमेऱ्याच्या दुधी काचेवर पहावा लागतो. प्रकाश रचना जरूर असल्यास सुधारणा करून मग फिल्मचे प्रकाशन करतात. छायाचित्रणासाठी कॅमेरा उभा की आडवा हे चित्र विषयावर अवलंबून असते. छायाचित्रणाच्या प्रखर प्रकाशामुळे चित्रविषयाची पडणारी सावली त्रासदायक वाटत असल्यास चित्रविषय काचेवर ठेवून त्याखाली थोड्या अंतरावर पांढरा व दुसऱ्या रंगाचा पुठ्ठा ठेवून त्यावर प्रकाश टाकतात.

व्यस्त प्रतीवरून चित्रवर्धकाने चित्र पाहिजे तितके मोठे करता येते. मनगटी घड्याळाचे भाग व त्यांसारख्या इतर सुक्ष्म यंत्राची तसेच हिरे, माणके, कीटक इत्यादींची अशा प्रकारे घेतलेली महाछायाचित्रे अनेक वेळा पहावयास मिळतात.


सूक्ष्मदर्शकी छायाचित्रण : (फोटोमायक्रोग्राफी). सर्व प्रकारच्या संशोधनात सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणाची गरज लागते. अशी छायाचित्रे सूक्ष्मदर्शकावर कॅमेरा लावून घेतात. ज्या कॅमेऱ्याचे भिंग काढता येते असा कॅमेरा सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणास उपयोगी पडतो. कॅमेरा सूक्ष्मदर्शकावर ठेवून ते दोन्हीही घट्ट जुळवून बसवावे लागतात. छायाचित्रे घेताना किरणकेंद्र लावण्यासाठी सूक्ष्मदर्शक व कॅमेरा यांमध्ये एक यंत्रणा लावता येते. तिचा उपयोग ज्या कॅमेऱ्याना दुधी काचेवर किरणकेंद्र पहाण्याची सोय नसते अशांसाठी करता येतो.

सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणाचा चित्रविषय प्रकाशित करण्याच्या अनेक पद्धती आहेत. चित्रविषय व गरज यांवर त्याचा वापर अवलंबून असतो. पारदर्शक चित्रविषयाला खालून आणि अपारदर्शकाला वरून प्रकाश देतात. छायाचित्रात महत्त्वाच्या गोष्टी सुस्पष्ट दिसण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या प्रकाश गाळण्या वापरतात किंवा काही वेळा चित्रविषय रंजकाने रंगवितात. अत्यंत सूक्ष्म चित्रविषयाचे छायाचित्रण करताना काही वेळा पार्श्वभूमी काळ्या रंगाची घ्यावी लागते. त्याला गडद पार्श्वभूमी चित्र असे म्हणतात. अशी छायाचित्रे घेताना प्रकाश योजना निरनिराळ्या पद्धतींनी करता येते.

चित्रविषय किती पटीत मोठा झाला हे त्यावेळी वापरलेल्या वस्तुभिंग, नेत्रभिंग व कॅमेऱ्यातील आकृती यांतील अंतर यांवरून काढता येते. सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणाची स्पष्टता चांगली येण्यासाठी छायाचित्रणाची मांडणी करावयाचे टेबल मजबूत असावे लागते. त्यावर आजूबाजूच्या हालचालींमुळे कंप येता कामा नयेत.

सूक्ष्मदर्शकी छायाचित्रणासाठी आता रंगीत फिल्म जास्त प्रमाणात वापरतात. काळ्या-पांढऱ्या छायाचित्रणासाठी मंद वेगाची समग्रवर्णी फिल्म चांगली असते. 

सूक्ष्म छायाचित्रण : ( मायक्रोफोटोग्राफी). छायाचित्रणाच्या फिल्मची विभेदनक्षमता वाढविता आल्यामुळे छायाचित्रे सूक्ष्म आकारमानात घेता येऊ लागली. साध्या ३५ मिमी. कॅमेऱ्यापासून अद्ययावत स्वयंचलित यंत्राचा उपयोग सूक्ष्म छायाचित्रणासाठी करता येतो.

मोठ्या आकारमानाच्या नकाशांची किंवा पुस्तकातील पानांची प्रथम व्यस्त प्रत घेऊन काही वेळा तिचाच उपयोग वाचनासाठी करतात, तर काही वेळा तिच्यावरून वर्धित प्रत तयार करतात. युद्धकाळात महत्त्वाच्या कागदांची मूळ प्रत पाठविण्याऐवजी त्यांची सूक्ष्मचित्रित प्रतच पाठवीत असत व त्यावरून सम प्रत काढण्यात येई. त्यामूळे मूळ प्रतीला धोका पोहोचत नसे. सूक्ष्म छायाचित्रे पहाण्यासाठी अनेक प्रकारची साधने असतात.

त्रिमितीय छायाचित्रण : १८४० मध्ये दागेअरोटाइप पद्धतीने त्रिमितीय छायाचित्रे तयार करण्यात आली होती आणि ती फारच लोकप्रिय झाली होती. लंडनच्या एकाच कंपनीकडे १८५८ साली जगातील प्रसिद्ध इमारतींची आणि रम्य ठिकाणांची १,००,००० त्रिमितीय छायाचित्रे असल्याची त्या कंपनीच्या मूल्यपत्रिकेत नोंद आहे.

त्रिमितीय छायाचित्रे अनेक पद्धतींनी घेता व पाहता येतात. ती दोन कॅमेरे एकत्रित असलेल्या त्रिमितीय कॅमेऱ्याने घेतात किंवा दोन चित्रे निराळी येतील अशी सोय असलेली यंत्रणा साध्या कॅमेऱ्याच्या भिंगावर लावूनही घेता येतात. हवाई त्रिमितीय छायाचित्रे एकाच वेळी विमानावर दूरदूर बसविलेल्या दोन कॅमेऱ्यांनी घेतात.

त्रिमितीय छायाचित्रे किंवा पारदर्शिका पहाण्यासाठी दोन भिंगे असलेले चित्रदर्शक वापरतात [⟶ त्रिमितिदर्शन]. चित्रदर्शकाशिवाय त्रिमिती दिसेल अशी छायाचित्रे आता मिळतात. ती बनविण्यासाठी दोन भिंगे असलेला मोठ्या आकारमानाचा कॅमेरा वापरतात. छायाचित्राचे प्रथम प्रकाशन एका भिंगातून फिल्मच्या अगदी जवळ समांतर रेघा असलेल्या पडद्यातून करतात. या नंतर पडदा एका रेघेच्या अंतराने पुढे सरकवून त्याच फिल्मवर दुसरे प्रकाशन दुसऱ्या भिंगातून करतात. अशा प्रकारे एकत्रित आलेल्या छायाचित्राच्या पृष्ठभागावर समांतर रेघांसारखी बर्हिगोल भिंगे असलेला प्लॅस्टिकचा पारदर्शक कागद लावतात. छायाचित्रावर हा कागद लावल्यावर त्यात त्रिमितीचा आभास निर्माण होतो.

छायाचित्रीय प्रकाशमापन : प्रकाशमापन हे प्रकाशाची तीव्रता मोजण्याचे शास्त्र आहे. प्रकाशमानाच्या अनेक पद्धतींपैकी छायाचित्रीय प्रकाशमापन ही एक पद्धत आहे.

प्रकाशीय तीव्रतेचे वर्णलेखनातील वर्गीकरण हे छायाचित्रीय पद्धतीने ठरविता येते. ज्या प्रारणाची तीव्रता मोजावयाची असेल त्याची प्रकाशीय घनता आणि प्रमाणित प्रकाश उगमाची प्रकाशीय घनता यांची छायाचित्रीय तुलना करतात. यासाठी अनेक कडक शर्ती पाळाव्या लागतात. प्रकाशीय घनतेकरिता घेतलेल्या एकाच छायाचित्रावरून ऊर्जामापन करणे अविश्वसनीय असते. प्रत्यक्षात अज्ञात प्रारणाचे एका चित्रपट्टीवर एकच प्रकाशन घेऊन त्याच्या शेजारी प्रमाणित उगमाची अंदाजे जुळतील अशी क्रमवार प्रकाशने घेतली जातात यातून प्रमाणित उगमाची जी प्रकाशीय घनता अज्ञात प्रारणाच्या प्रकाशीय घनतेशी जुळेल तिची निवड करतात आणि ती ज्या प्रारण तीव्रतेने मिळालेली असेल ती त्या अज्ञात प्रारणाची प्रकाशीय तीव्रता समजतात [⟶ प्रकाशमापन].

प्रकाश-स्थितिस्थापकता : ज्या वेळी एखाद्या यंत्राचा आराखडा तयार करतात त्यावेळी त्यातील स्थिर व फिरत्या भागांवर पडणाऱ्या दाबामुळे व ताणामुळे उद्‌भवणाऱ्या स्थितिबदलाची कल्पना रचनाकाराला पूर्णपणे येत नाही. परंतु प्रकाश-स्थितिस्थापक तंत्राचा उपयोग केल्यास या कामी उपयुक्त मार्गदर्शन होते. या तंत्राचा दंड, आकडे व जोडणाऱ्या साखळ्या, बांधकामाचे पाये, पुलांच्या कैच्या, प्रसरण जोड, कापणाऱ्या हत्यारांची क्रिया इ. ठिकाणी उपयोग करण्यात आलेला आहे.

ज्या वस्तूची तपासणी करावयाची असेल तिची प्लॅस्टिकसारख्या पारदर्शक पदार्थाची एक प्रमाणशीर प्रतिकृती बनवितात. ज्या प्रमाणात खऱ्या वस्तूवर भार येणार असेल त्याच प्रमाणात प्रतिकृतीवर भार देतात आणि तिची एकवर्णी ध्रुवित (एकाच विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या ) प्रकाशात तपासणी करतात व त्याकरिता योग्य ध्रुवणदर्शक वापरतात. ध्रुवणदर्शकातून प्रकाशमान व गर्द रेषांचा एक आकृतिबंध दिसतो व त्याचे छायाचित्रण करता येते. दाबहीन प्रतिकृती ध्रुवणदर्शकातून काळी दिसते. वस्तूवर दाब पडला व तिच्या बनावटीचा अपवर्तनीय निर्देशांक जरी बदलला, तरी मुख्य दाबाने दिसणाऱ्या बाह्य रेषा तेजस्वीच दिसतात, त्यामुळे समान दाब पडणाऱ्या समान आकाराच्या वस्तू जरी कोणत्याही धातूच्या बनविल्या, तरी त्यांच्या अंतर्गत स्थितीबद्दल या तंत्रामुळे फार उपयुक्त माहिती मिळविता येते.

जर प्लॅस्टिकची प्रतिकृती औष्णिक घनीभवन पद्धतीने बनविलेली असेल, तर दाबामुळे मिळणारी आकृती, ती दाबात असताना गरम केल्यास कायम करता येते. यानंतर तिचे त्रिमितीय विश्लेषणासाठी योग्य पद्धतीने तुकडे करून त्यांचा पुढे त्रिमितीय प्रतिबल विश्लेषणासाठी उपयोग करता येतो. या आकृतीच्या आकाराचे मापन करून प्रतिबलाच्या अजमास करता येतो व हे काम छायाचित्रीय नोंदीमुळे सोपे होते. ज्या वेळी फिरत्या भागावरील प्रतिबल गतिशील असते तेव्हा चलच्चित्रणाने एकत्रित नोंद करणे व्यवहार्य ठरते. प्रकाशस्थितीस्थापकता तंत्रात रंगीत छायाचित्रणाचा आता अधिक वापर करतात [⟶ स्थितिस्थापकता ध्रुवणमिति].


हवाई छायाचित्रण : १८५८ मध्ये हवाई फुग्यात बसून पहिले हवाई छायाचित्र ओलसर कलोडियनाचे लेपन केलेल्या काचेवर काढण्यात आले. त्यातून १८७३ नंतर विमानातून जमिनीची पहाणी करण्याची कल्पना सुचली आणि अमेरिकेत फुग्यातून नकाशे करण्याचे एकस्व घेतले गेले. विमानाचा शोध लागल्यावर पुढे या शास्त्रात प्रगती होऊन अशा कामासाठी स्वतंत्र विमाने बनविण्यात येऊ लागली.

पहिल्या महायुद्धाच्या शेवटच्या वर्षी गुप्त खात्यासाठी हजारो हवाई छायाचित्रे घेतली गेली, तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी ती लक्षावधी घेण्यात आली. या चित्रांमुळे शत्रूच्या हालचाली व इतर बाबतींत ८०% माहिती मिळाली.

हवाई छायाचित्राचा उपयोग मुख्यत्वेकरून युद्धकाळात लष्कराला जास्त प्रमाणात होतो. यामुळे शत्रूच्या सैन्याच्या हालचाली, त्यांची स्थानके, पुरवठा, रेल्वेमार्ग, पूल, गोद्या, औद्यागिक कारखाने, जहाजवाहतूक, विमानतळ आणि त्यावरील हालचालींची माहिती मिळते. त्याचप्रमाणे शत्रूच्या प्रदेशावर केलेल्या वैमानिक हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाजही समजू शकतो. दूरवर्ती नियंत्रणाने विमान चालवून किंवा क्षेपणास्त्राने पण अशी छायाचित्रे घेता येतात. या छायाचित्रांचा उपयोग नैसर्गिक संपत्तीचा ठावठिकाणा घेण्यासाठी म्हणजे खनिज तेल, पाण्याचे साठे, जंगले, शेती, नद्या, नाले, जमिनीची धूप, तसेच शहर सुधारणा वा बांधणी यांच्या निरीक्षणासाठी करता येतो. त्याचप्रमाणे नवीन नकाशे बनविण्यासाठी किंवा चालू नकाशे दुरुस्त करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो.

लष्कराकडे हवाई चित्रणासाठी खास विमाने असून त्यांत अत्यंत गुंतागुंतीचे व स्वयंचलित कॅमेरे वापरले जातात. छायाचित्रणासाठी विमान एका काल्पनिक चौकटीच्या रेघेवरून उडते व ठराविक वेळाने एक छायाचित्र घेतले जाते. आगाऊ ठरवून दिलेल्या जागेचे छोटे भाग पाडून त्याप्रमाणे एकाच उंचीवरून विमान उडवून अनेक छायाचित्र एकापुढे एक घेतात. विमानातून घेतलेल्या प्रत्येक छायाचित्राचा बराच भाग काढून टाकून उरलेल्या भागांचे मिळून एक जोडचित्र तयार करतात.

या कामासाठी अतिवेगवान समग्रवर्णी फिल्म वापरतात. ज्यावेळी छायाचित्र अधिक स्पष्ट हवे असेल तेव्हा अतिविभेदनक्षम फिल्म वापरतात. जमिनीवरील मायावरणाची, जंगलाच्या विस्ताराची माहिती मिळविण्यासाठी अती उंचीवरून वा क्षितिजापर्यंतचे छायाचित्र येण्यासाठी अवरक्त फिल्म वापरतात. रंगीत अवरक्त फिल्मच्या वापराने पाण्याच्या व वनस्पतीच्या जागा अलग आणि स्पष्ट दिसतात. या फिल्मच्या वापराने हवेतील धूसरपणा न येता दूरवरच्या बारीकसारीक गोष्टी स्पष्ट दिसतात. 

हवाई चित्रणाच्या फिल्मची रुंदी २४ ते १०० सेंमी. आणि लांबी ३० ते १४० मी. असते व तिच्या लांबीरुंदीत संस्करणानंतर फरक फारच थोडा पडतो व हा फरक चित्रवर्धकाने दुरुस्त करता येतो.

इमारतीची व चढ-उतार असलेल्या इतर भागाची उंची समजण्यासाठी त्रिमितिदर्शक छायाचित्रे विमानातून विशिष्ट वेळी विशिष्ट पद्धतीने घेतात.

रात्रीच्या वेळी छायाचित्रे घेताना विमानातून प्रथम तेजस्वी प्रकाश निर्माण करणारा एक बॉम्ब टाकतात व नंतर त्या प्रकाशात छायाचित्र घेतात. एकानंतर एक असे अनेक प्रकाशझोत टाकून एकापुढे एक अशी छायाचित्रे घेतात.

भूमीस्वरूप छायाचित्रण : भूप्रदेशातील उंचसखल भाग दर्शविणाऱ्या छायाचित्रांचा उपयोग वनस्पतिविज्ञान, प्राणिविज्ञान, भूविज्ञान,जलसंशोधन अशा अनेक प्रकारच्या संशोधनात होतो. फ्रेंच लष्करातील कर्नल एमे लोसदा यांनी १८५१ साली भूमीस्वरूप छायाचित्रे प्रथम घेतली. त्यांनी आल्प्स पर्वताच्या प्रदेशाचे नकाशे साध्या वातयानातून छायाचित्रे घेऊन बनविले. यानंतर जवळजवळ ५० वर्षानी ई. डव्हील यांनी या प्रकारचे काम कॅनडामध्ये केले. त्यांनी फोटो थिओडोलाइट या उपकरणाचा वापर करून नकाशे बनविले. या उपकरणाने समोर दिसणाऱ्या जमिनीच्या दोन्ही बाजूंवर मुद्दाम ठेवलेल्या खुणेसह छायाचित्रे घेतात आणि त्याच खुणेसह पुढील छायाचित्रे घेतात. या खुणेमुळे संपूर्ण छायाचित्र जुळविण्यास मदत होते. फोटो थिओडोलाइट जमिनीवरून वापरतात आणि त्यावरून मिळणाऱ्या छायाचित्रात भूसपाटीची नोंद करता येते.

भूमिस्वरूप छायाचित्रणासाठी आता खास विमाने व कॅमेरे वापरतात. विमानातून काम करणे खर्चाचे असले, तरी ते लवकर होत असल्यामुळे अतिशय अवघड अशा डोंगराळ प्रदेशाचे नकाशे बनविण्यासाठी त्याचा उपयोग करतात. या कामासाठी जास्त विभेदनक्षमता असलेले आणि मंद वेगाचे संवेदनशील साहित्य वापरतात.

आवृत्तिदर्शी छायाचित्रण : एखाद्या वस्तूच्या हालचालीची एकामागून एक अशी असंख्य छायाचित्रे शास्त्रीय संशोधनासाठी नेहमी लागतात. एडवर्ड माइब्रिज यांनी धावत्या घोड्याच्या हालचालीची अशा तऱ्हेची छायाचित्रे प्रथम घेतली, पण त्यासाठी त्यांना अनेक कॅमेरे वापरावे लागले. अतिवेगाने जाणाऱ्या वस्तूंच्या छायाचित्रणासाठी स्वतंत्र साधने वापरावी लागतात. त्यांतील एक प्रमुख साधन म्हणजे इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप होय. त्याचे अनेक प्रकार व आकार असतात. त्यांच्या बनावटीसाठी निरनिराळ्या प्रकारच्या काचांचा वापर करतात. क्वॉर्ट्‌झपासून बनविलेल्या काचेचे दिवे उच्च तापमान सहन करू शकतात. अशा प्रकारच्या दिव्यात सामान्यतः झेनॉन वायू भरतात. पण काही वेळा दर सेकंदाला हजारो वेळा दिवा पेटता ठेवावा लागतो, तेव्हा मर्क्युरी कोनेट्रॉनचा १५ सेंमी. लांब व २.५ सेंमी. रुंद असा दिवा वापरतात. एकाच फिल्मवर अनेक प्रकाशने इलेक्ट्रॉनीय स्फुर दीपाने घेता येतात किंवा प्रत्येक प्रकाशनासाठी निराळी फिल्म पुढे येईल, असे कॅमेरे उपलब्ध आहेत. नेहमीच्या इलेक्ट्रॉनीय स्फुर दीपाने घेतलेल्या छायाचित्रास आवृत्तिदर्शी छायाचित्र म्हणत नाहीत. फक्त एकानंतर एक अशा क्रमाने घेतलेल्या छायाचित्रास आवृत्तिदर्शी छायाचित्र म्हणतात.

शीघ्रगती छायाचित्रण : दृष्टीच्या टप्प्यात न येणाऱ्या शीघ्रगतीच्या संशोधनासाठी शीघ्रगती छायाचित्रांचा उपयोग करतात. या तंत्राचा उपयोग शास्त्रीय व औद्यागिक क्षेत्रांतील संशोधनात बऱ्याच प्रमाणात करतात.

शीघ्रगती छायाचित्रण अनेक पद्धतींनी करता येते. कोणत्या पद्धतीचा केव्हा उपयोग करावयाचा हे मुख्यत्वेकरून चित्रविषयावर अवलंबून असते. काही वेळा संशोधनासाठी फक्त एकच छायाचित्र लागते, तर काही वेळा अनेक चित्रांची मालिका लागते. चाचणीसाठी प्रथम घेतलेल्या छायाचित्रावरून किती चित्रांची जरूरी आहे, हे आगाऊ ठरवून मग कॅमेऱ्याची निवड करावी लागते. तसेच ज्या विषयाचे चित्रण करावयाचे त्याचा प्रसरवेग व अवधी यांचा विचार पण करावा लागतो. चित्रणासाठी किती लांब फिल्म वापरावयाची हे आगाऊ ठरवावे लागते. चित्रविषय सुस्पष्ट यावा म्हणून किती प्रकाशन व किती वेगवान फिल्म वापरावयाची हे पण आगाऊ ठरवावे लागते. तसेच कॅमेऱ्याची झडप कोणत्या प्रकारची लागेल इ. सर्व गोष्टींचा विचार करून मग चित्रणासाठी योग्य अशा उपकरणाची निवड करतात. चित्रविषय स्वयंप्रकाशित आहे का चित्रणासाठी बाह्य प्रकाशाची जरूरी आहे, हे पण लक्षात घ्यावे लागते. स्वयंप्रकाशित विषय असेल, तर ठिणगी वा आवृत्तीदर्शी दीपाची जरूरी लागत नाही, तर त्यासाठी फक्त यांत्रिक झडप असलेल्या कॅमेऱ्याची जरूरी लागते. 

एकच चित्र पाहिजे असल्यास साध्या कॅमेऱ्याने /१५०० से. इतके प्रकाशन देऊन कामचलाऊ चित्र घेता येते. पण खऱ्या अभ्यासासाठी हे प्रकाशन जास्त असल्यामुळे असे चित्र परिपूर्ण येत नाही म्हणून अतिशय वेगाने फिरणारी परिभ्रमी झडप असलेल्या कॅमेऱ्याचा विशेष करून स्वयंप्रकाशित विषयाच्या चलच्चित्रणासाठी उपयोग करतात. उज्वालेचा (अल्पकालीन तीव्र प्रकाशाचा ) उपयोग करताना कॅमेऱ्याची झडप उघडीच ठेवतात व सर्व तयारी झाल्यावर चित्रविषय प्रकाशित करतात. विजेच्या साह्याने उज्वाला पाहिजे तितक्या मर्यादेपुरती निर्माण करता येते. अतितीव्र उज्वालेचा उपयोग बहुदा क्षेपणास्त्राच्या वेगाच्या संशोधनासाठी करतात. दर सेकंदाला ७०० ते १,००० मी. वेगाने उडणाऱ्या प्रक्षेपित वस्तूंची या पद्धतीने चांगल्यापैकी छायाचित्रे काढता येतात आणि यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या फिल्मांचा उपयोग करावा लागतो. वायु-विसर्जक नलिका दीपाने अत्यंत अल्प काळ टिकणारा पण अतितीव्र प्रकाश अल्पावधीत मिळतो. यालाच इलेक्ट्रॉनीय दीप म्हणतात. अल्पकालीन अतितीव्र प्रकाशासाठी उच्च विद्युत्‌ दाबाच्या ⇨ऋण किरण नलिका, ⇨ लेसर, आर्‌गॉन , स्फुर-बॉम्ब इत्यादींचाही उपयोग करतात शीघ्रगती क्ष-किरण चित्रांकरिता अत्यल्प काळ उच्च विद्युत्‌ दाब क्ष-किरण नलिकेत विसर्जित करतात. शीघ्रगती छायाचित्रासाठी चलच्चित्रण कॅमेऱ्याचा उपयोग करतात. सेकंदाला १,००० ते ३,००० चौकटी इतक्या वेगाचा कॅमेरा औद्योगिक कामासाठी उपयोगी पडतो, पण ३५ मिमी. च्या कॅमेऱ्याऐवजी १६ मिमी. किंवा ८ मिमी.चा कॅमेरा वापरणे स्वस्त व सोईचे पडते.

छायाचित्रणाच्या वेळीच त्याला लागणाऱ्या काळाची नोंद करणे जरूरीचे असते. काही वेळा यासाठी घड्याळाचा उपयोग करून त्याचा चित्रात अंतर्भाव करतात. पण अतिशीघ्रगती घड्याळाचा उपयोग करणे शक्य नसते म्हणून फिल्मच्या बाजूच्या कडेवर ठिणगीचे काही ठराविक काळानंतर चित्रण करतात.

रंगीत किंवा त्रिमितीय शीघ्रगती छायाचित्राची काही वेळा जरूरी लागते, पण ते घेण्यासाठी विशेष अडचण पडत नाही.

शास्त्रीय संशोधनासाठी अतिशीघ्र गतीची जरूरी असते आणि आता दर सेकंदास १०,००,००० चौकटी इतक्या जलद गतीने चित्रण करणारे कॅमेरे उपलब्ध आहेत. यांत्रिक पद्धतीने इतकी जास्त गती मिळत नाही म्हणून ४ किंवा ८ बाजू असलेल्या लोलकाच्या साह्याने एका फिरत्या फिल्मवर शीघ्रगती छायाचित्रांचे चित्रण करतात. या कॅमेऱ्यात फिल्म इतक्या जलद गतीने फिरते की, १६ मिमी. रुंदीची सु. १२० मी. फिल्म केवळ २ सेकंदापेक्षा कमी वेळात पुढे जाते. शीघ्रगती छायाचित्रणाकरिता फिरत्या आरशाचा व स्थिर फिल्मचाही उपयोग करतात.

शीघ्रगती छायाचित्रणामध्ये वस्तूवर योग्य प्रकारे प्रकाश पाडणे व कॅमेऱ्याचे व चित्रविषयाचे इलेक्ट्रॉनीय दीपाशी समकालीकरण करणे महत्त्वाचे असते.

शीघ्रगती कॅमेरे अनेक प्रकारचे असतात. कोणत्या वेळी कोणत्या प्रकारचा कॅमेरा वापरावयाचा हे चित्रविषयावर अवलंबून असते. बऱ्याच वेळा चलच्चित्रण कॅमेऱ्यासारखा कॅमेरा अतिशीघ्र छायाचित्रणासाठी वापरतात. पण काही ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वेगाने असे कॅमेरे वापरता येत नाहीत. प्रखर प्रकाश आणि अगदी अल्प काळ प्रकाशन हे नेहमी शक्य नसते. त्यासाठी इलेक्ट्रॉनीय दीपाच्या साहाय्याने /१०००००० इतका अल्प प्रकाश देऊन प्रकाशन करतात.


ठिणगी छायाचित्रण: छायाचित्रे घेण्यासाठी या तंत्रात विजेच्या ठिणगीचा वापर करतात. ती घेण्यासाठी ज्या जागेवर उपकरणाची जुळवाजुळव करतात त्या ठिकाणाला ‘ ठिणगी स्थानक ’ म्हणतात. हे तंत्र गतिमान प्रक्षेपित वस्तूंचे छायाचित्रण करण्यासाठी वापरतात. ठिणगी स्थानक प्रक्षेपित वस्तूच्या मार्गावर उभारतात. प्रक्षेपित वस्तू ठिणगी स्थानकाच्या अगदी जवळ आली की, आपोआप प्रकाश पडावा व छायाचित्र घेतले जावे अशी यंत्रणा त्या ठिकाणी बसवितात.

ठिणगी प्रकाश उच्च ऊर्जा धारित्राच्या (विद्युत्‌ भार साठविणाऱ्या साधनाच्या ) द्रुत विसर्जनाने निर्माण होतो. तो झगझगीत व अल्प काळ टिकणारा असून त्यात निळे व जंबुपार किरण असल्यामुळे तो छायाचित्रणासाठी परिणामकारक असतो. छायाचित्र जर काळोख्या खोलीत घेता येत असेल आणि चित्रविषय लुकलुकणारा नसेल, तर फिल्मवर चित्र येण्यासाठी कॅमेऱ्याला भिंगाची जरूरी पडत नाही. एका बाजूला ठिणगी प्रकाश व दुसऱ्या बाजूला फिल्म लावून छायाचित्रे मिळते. अशी छायाचित्रे सावलीरूपात येतात व सावली चित्रे म्हणून ओळखली जातात. त्यांचा उपयोग प्रक्षेपित वस्तूंच्या संशोधनासाठी होतो.

ठिणगीनिर्मितीच्या यंत्रणेत फेरफार करून तिचे आकारमान लहान करता येते. लहान उगमापासून प्रकाश चांगला मिळून चित्रविषयाचे सावली चित्र सुस्पष्ट येते. अशा चित्रात प्रक्षेपित वस्तूच्या बाह्य बाजू स्पष्ट दिसतात. ठिणगी प्रकाशाचा अल्प काळ, लहान आकारमान व चांगला झगझगीतपणा यामुळे असे छायाचित्र मिळू शकते.

प्रक्षेपित वस्तू वेगाने जात असल्याकारणाने त्यांची छायाचित्रे घेण्यासाठी ठिणगी पद्धत शोधून काढावी लागली. प्रक्षेपित वस्तूच्या मार्गात कोणत्याही तऱ्हेची अडचण न येता अशी छायाचित्रे घेता येतात. ताशी १,२०० किमी. वेगाने जाणाऱ्या व अंदाजे ३० सेंमी. लांबीच्या प्रक्षेपित वस्तूचे २८ × ३६ सेंमी. फिल्मवर छायाचित्र घेता येते. ठिणगी स्थानकाची क्षमता छोट्या बंदुकीच्या गोळीपासून छोट्या तोफगोळ्याचे (४० मिमी.) छायाचित्र घेण्यापर्यंत असते.

मोठ्या तोफगोळ्याचे छायाचित्र निराळ्या पद्धतीनी घेतात. एका पद्धतीत प्रक्षेपित वस्तूच्या प्रक्षेपीचे सरळ छायाचित्र न घेता त्याची सावली चित्रपटाच्या पडद्यावर पाडतात व तिचे छायाचित्र घेतात. दुसऱ्या पद्धतीत एका मोठ्या अंतर्गोल आरशाचा उपयोग करतात व या आरशाच्या केंद्रबिंदूवर एक ९०चा सुरीधारेसारखा आरसा त्याच्या धारा अंतर्गोल आरशाच्या अक्षाला ४५ चा कोन करून ठेवून प्रक्षेपित वस्तूची दोन छायाचित्रे (एक स्पष्ट व दुसरे अस्पष्ट) मिळवितात. काडतुसे व तोफगोळे यांच्यासंबंधी संशोधन करण्याच्या ठिकाणी मुद्दाम ठेवलेल्या राखीव जागेत अशी ठिणगी स्थानके प्रक्षेपित वस्तूच्या मार्गात एकानंतर एक अशी ठेवतात. तेथे संशोधनासाठी लागणारी नोंदीची इतर उपकरणेही बसवितात. या छायाचित्रणामुळे प्रक्षेपित वस्तूंच्या मार्गात येणारे अडथळे व हवेचा तिच्यावर होणारा परिणाम समजतो.

हवेचा दाब बदलता येईल अशा बोगद्यातून (वातविवरातून) काही वेळा वस्तू प्रक्षेपित करतात त्यामुळे हवेच्या दाबाने होणारा तिच्या आकारमानातील फरक छायाचित्रात समजू शकतो [⟶ वातविवर].

प्रक्षेपित वस्तूचा वेग १९५० सालापर्यंत दर सेकंदाला १,००० ते १,५०० मी. होता पण १९६० नंतर क्षेपणास्त्रे, कृत्रिम उपग्रह व अवकाशयाने यांचा वेग दर सेकंदाला ३,३५० ते ११,६०० मी.च्याही वर गेला आहे. या वेगवान उड्डाणांची छायाचित्रे घेण्यासाठी नेहमीची ठिणगी छायाचित्रण साधने निरुपयोगी ठरत म्हणून हलक्या वायूवर चालणारी एक बंदूक तयार करण्यात आली. या बंदुकीतील वायूच्या ज्वलनाने अस्राची किंवा अवकाशयानाची प्रतिकृती दर सेकंदाला ११,६०० मी.पेक्षा जास्त वेगाने उडविता येते. या प्रतिकृतींची छायाचित्रे घेण्यासाठी ठिणगी पद्धतीचे तत्त्वच अंमलात आणतात आणि त्यासाठी लेसर प्रकाशीय यंत्रणा, फेबेट्रॉन ( उच्च ऊर्जायुक्त इलेट्रॉनांची शलाका निर्माण करणारे एक साधन) इ. साधनांचा उपयोग करतात.

वायुगतिकीय छायाचित्रे : ठिणगी छायाचित्रात अतिवेगाने उडणाऱ्या विमानामुळे हवेत उत्पन्न होणारे तरंग आणि क्षोभ पहावयास मिळतात, म्हणून ठिणगी छायाचित्रणाचा खनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने होणाऱ्या ) उड्डाणात वायुगतिकीय पाहणीसाठी फार उपयोग होतो. यासाठी तयार केलेल्या साधनात श्लीरेन प्रकाशीय यंत्रणेचा उपयोग करून ठिणगी छायाचित्रणाची कार्यक्षमता वाढवितात. त्यामुळे हवेत उद्‌भवणारे तरंगही छायाचित्रित करता येतात.

या साधनात वातविवराच्या एका बाजूला ठिणगी स्थानक व एक अन्वस्तीय (पॅराबोलिक) आरसा असतो आणि दुसऱ्या बाजूला कॅमेरा, सुरीधारा व दुसरा अन्वस्तीय आरसा असतो. ठिणगी स्थानक आणि सुरीधारा अन्वस्तीय आरशाच्या केंद्रावर बसवितात. ठिणगीचा प्रकाश पहिल्या आरशावर पडून तो समांतर होतो व तो वातविवरातून जाऊन समोरील दुसऱ्या आरशावर पडून परत केंद्रित होऊन सुरीधारेवर पडतो आणि नंतर तो कॅमेऱ्यात पडतो. वातविवरात ठेवलेल्य प्रतिकृतीची कॅमेऱ्यात दिसणाऱ्या प्रतिमेची स्पष्टता आगाऊच जुळवून ठेवतात.

वातविवरात जेव्हा वारा नसेल तेव्हा प्रतिकृतीची प्रतिमा कॅमेऱ्यात सावली चित्रासारखी दिसते, पण वारा जोरात सुरू केल्यावर त्यात तरंग निर्माण होऊन त्यांतील काही सुरीधारेवर पडतात आणि काही बाहेर जातात. त्यामुळे ते छायाचित्रात स्पष्टपणे दिसतात. आघात तरंग व क्षोभ यांचे प्रणमन (दिशेत बदल) होत असल्यामुळे ते दृश्य स्वरूपात छायाचित्रांमध्ये दाखविता येतात.


खगोलीय छायाचित्रण : सूर्य, चंद्र, ग्रह, उपग्रह, धूमकेतू, अभ्रिका, तारे इत्यादींच्या छायाचित्रणास खगोलीय छायाचित्रण म्हणतात. उल्का व ध्रुवीय प्रकाश (ध्रुवीय प्रदेशात आढळणारा विविध रंगी आविष्कार) यांच्या छायाचित्रणाचाही खगोलीय छायाचित्रणात समावेश करण्यात येतो. साध्या डोळ्यांनी ६ ते ७ प्रतीचे [⟶ प्रत] तारे दिसतात. दुर्बिणीने १५ प्रतींपर्यंत आणि छायाचित्रणाने ते २१ प्रतींच्यापेक्षाही जास्त प्रतीचे दिसतात म्हणून ज्योतिषशास्त्रात छायाचित्रणाला फार महत्त्व आहे.

१८३९ साली दागेअरोटाइप पद्घत सुरू झाल्यावर १८४० मध्ये जॉन विल्यम ड्रेपर यांनी २० मिनिटे प्रकाशन करून चंद्राची छायाचित्रे घेतली. जसजशी छायाचित्रण कलेत प्रगती झाली तसतशी खगोलीय छायाचित्रणातही प्रगती झाली. जॉर्ज बाँड फिलिप्स यांनी १८५१ मध्ये प्रदर्शनात ठेवलेल्या चंद्राच्या छायाचित्राने सर्वांचे लक्ष वेधले. १८५० साली हार्व्हर्ड वेधशाळेने अभिजित (व्हीगा) ताऱ्याचे घेतलेले छायाचित्र हे पहिलेच ताऱ्याचे छायाचित्र होते. यानंतर एल्. एम्. रदरफर्ड यांनी १८६४ साली तारकागुच्छांचे व तेजस्वी तारकायुग्मांचे छायाचित्रण करण्याची योजना सुरू केली, परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही.

१८८० मध्ये जिलेटिनाचा वापर करून छायाचित्रणाच्या काचा तयार करण्यात आल्यावर खऱ्या अर्थाने खगोलीय छायाचित्रणाचा पाया घातला गेला आणि १८८२ मध्ये येणाऱ्या धूमकेतूच्या छायाचित्रणाची जोरात तयारी सुरू झाली. केप ऑफ गुडहोप येथील वेधशाळेतून ते करण्यात आले. धूमकेतूच्या छायाचित्राबरोबरच साहजिकच त्याच्या जवळच्या इतर ताऱ्यांचे चित्रण झाले. यावरून डेव्हिड गिल यांना ताऱ्यांचा छायाचित्रित नकाशा करण्याची कल्पना सुचली. दूरदर्शकातही यानंतर सुधारणा होत गेल्या. एन्सली कॉमन यांनी काचेवर चांदीचा थर देऊन एक मी. व्यासाचा आरसा तयार केला व त्याचा उपयोग करून एक दूरदर्शक बनविला. या दूरदर्शकाच्या साहाय्याने १८८३ साली ३७ मिनिटे प्रकाशन करून त्यांनी मृग नक्षत्रातील अभ्रिकेचे छायाचित्र घेतले. यानंतर अधिकाधिक मोठ्या आकारमानाचे दूरदर्शक प्रचारात येऊन खगोलीय छायाचित्रण अतिशय प्रगत अवस्थेस पोहोचले.

छायाचित्रीय दूरदर्शक : खगोलीय छायाचित्रे दूरदर्शकाच्या साहाय्याने घेतात. पूर्वी जे दूरदर्शक डोळ्याने निरीक्षण करण्यासाठी प्रचारात होते त्यांत अनेक सुधारणा करून ते आता छायाचित्रणासाठी पुष्कळ ठिकाणी वापरतात. आधुनिक छायाचित्रीय दूरदर्शकास नेत्रभिंग नसते. त्याऐवजी वस्तुभिंगातून आलेला प्रकाश केंद्राच्या जागी एकत्रित करून त्या जागी छायाचित्रणाची काच वा फिल्म लावतात. दूरदर्शक तीन प्रकारचे असतात : (१) प्रणमनावर (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रकाश किरण जाताना त्याच्या दिशेत होणाऱ्या बदलावर) आधारलेला, (२) परावर्तनावर आधारलेला व (३) संयुक्त. पहिल्यात भिंग प्रकाश एकत्रित करून तो केंद्रावर आणते, दुसऱ्यात भिंगाच्या ऐवजी धातूचा अंतर्गोल आरसा तेच काम करतो व तिसऱ्यात दोन्ही पद्धती एकत्रित केलेल्या असतात. याशिवाय प्रणमन दूरदर्शकाचे आणखी दोन प्रकार असून त्यातील एकातून दृश्य पाहता येते, तर दुसऱ्यातून फक्त छायाचित्रे घेता येतात [⟶ दूरदर्शक].

ताऱ्यांचे चित्रण साध्या कॅमेऱ्याने दीर्घकाल प्रकाशन करून केले, तर पृथ्वीच्या अक्षीय भ्रमणामुळे तारे रेघांसारखे येतात म्हणून खगोलीय छायाचित्रणासाठी दूरदर्शक एका घड्याळासारख्या यंत्रणेवर बसवितात. यामुळे चित्रविषय आणि कॅमेरा नेहमी एकाच दिशेत राहून फिल्मचे दीर्घकाल प्रकाशन करता येते.

मोठ्या प्रणमन दूरदर्शकाने १° ते २° एवढ्याच कक्षेतील छायाचित्र घेता येते. बऱ्याच मोठ्या कक्षेवर काम करण्यासाठी एफ्. ई. रॉस यांनी चार वस्तुभिंगे एकत्रित करून एक दूरदर्शक बनविला. परावर्ती दूरदर्शकाच्या बाबतीतही चांगली प्रतिमा येण्याचे क्षेत्र कमी छिद्रव्यास व वाढते केंद्रांतर यांच्या प्रमाणात कमी होत जाते. कॅलिफोर्नियातील मौंट विल्सन वेधशाळेच्या १०० इंची परावर्ती दूरदर्शक व पालोमार वेधशाळेच्या २०० इंची दूरदर्शकाची कक्षा काही मिनिटे आहे. १९२९ साली रॉस यांनी एक असे भिंग बनविले की, ते दूरदर्शकाच्या केंद्राच्या अलीकडे लावल्यावर त्याची कक्षा १° ने वाढते. अशीच भिंगे आता बहुतेक सर्व ठिकाणी वापरतात.

श्मिट दूरदर्शक : जर्मनीतील हँबर्ग वेधशाळेने बर्नहार्ड श्मिट यांनी १९३१ साली एक नव्या प्रकारचा दूरदर्शक बनविला, याला श्मिट कॅमेरा किंवा श्मिट दूरदर्शक म्हणतात. त्याचे केंद्र गोलाकार जागेत असल्यामुळे छायाचित्रणाची फिल्म त्यात नेहमीप्रमाणे सरळ न ठेवता ती वक्र स्थितीत ठेवावी लागते. त्यामुळे दूरदर्शकाची कक्षा वाढली आणि एकाच प्रकाशनात मोठ्या क्षेत्रातील ताऱ्यांची चित्रे मिळू लागली. १९६० सालापर्यंत बऱ्याच ठिकाणी २४ इंच छिद्रव्यासाचे श्मिट दूरदर्शक प्रचारात आले. माऊंट विल्सन व पालोमर वेधशाळांत सर्वांत मोठा (४८ इंची) श्मिट दूरदर्शक आहे.

इतर आधुनिक दूरदर्शक : श्मिट दूरदर्शकाप्रमाणेच १९४० नंतरच्या काळात नेदर्लंड्समधील ए. बाऊर्स व रशियातील डी. डी. माक्सूटोव्ह यांनी स्वतंत्रपणे एक दूरदर्शक बनविला. तो बनविण्यास सोपा असून त्याची लांबीही फार नाही. तथापि त्याची मर्यादित स्पष्टता ही मात्र त्यातील एक गैरसोय आहे. या प्रकारचे सर्वांत मोठे दूरदर्शक सोव्हिएट रशियाच्या आल्माआता येथील २० इंची व सीम्येईस येथील १८ इंची हे होत. आकारमानानुसार श्मिट वा बाऊर्स – माक्सूटोव्ह दूरदर्शकाच्या साहाय्याने ५° ते १५° पर्यंत क्षेत्रकक्षा मिळविणे शक्य असते. त्यांत विविध सुधारणा करून क्षेत्रकक्षा ५०° पर्यंत वाढविता येते, परंतु त्यापेक्षा ती जास्त वाढविण्यासाठी वेगवेगळे उपकरणच लागते. जे. एल्. ग्रीनश्टाइन व एल्. जी. हेनी यांनी अतिशय रुंद क्षेत्र मिळविण्यासाठी एक नवी पद्धत १९४० नंतर शोधून काढली. त्यांनी एका गोलाकार आरशाच्या साहाय्याने एका गोलाकार पृष्ठावर किरण केंद्रित होतील अशी रचना केली. पण या पृष्ठावर वक्र स्थितीत फिल्म न लावता त्याच्या थोडे वर एक अत्यंत गुंतागुंतीची भिंग प्रणाली बसवून तिच्या साहाय्याने किरण पुन्हा केंद्रित होऊन सपाट फिल्मवर पडतील अशी सोय केली. त्यामुळे आरशाचे निरनिराळे भाग आकाशाच्या निरनिराळ्या भागांच्या चित्रणासाठी वापरून बऱ्याच मोठ्या क्षेत्राचे चांगले सुस्पष्ट छायाचित्र मिळू लागले.

 यर्किझ वेधशाळेमध्ये अशा प्रकारचा सर्वांत मोठा दूरदर्शक असून त्याच्या आरशाचा व्यास सु. ३०·५ सेंमी. आहे. त्याचे उपयुक्त छिद्र फक्त ५ सेंमी. असून केंद्रांतर १ सेंमी. इतकेच आहे. या उपकरणाने एका वेळी १४०च्या क्षेत्रातील छायाचित्रण करता येते.


छायाचित्रीय संवेदनशील साहित्य : खगोलीय छायाचित्रणासाठी साधे पायस लावलेल्या काचा वापरतात. फिल्म वक्र स्थितीत वापरता येत असल्यामुळे श्मिट कॅमेऱ्यात तिचा उपयोग करतात. शिवाय सूर्याची किंवा इतर ग्रहांची जेव्हा एकानंतर एक अशी लागोपाठ छायाचित्रे घ्यावी लागतात तेव्हाही फिल्मचा उपयोग करतात.

ताऱ्यांचे तेज आणि आकाशाची पार्श्वभूमी यांवर छायाचित्र येईल की नाही हे ठरवितात व त्याप्रमाणे संवेदनशील काचा छायाचित्रणासाठी वापरतात. खगोलीय छायाचित्रणाच्या काचा व फिल्म मुद्दाम बनविलेल्या असून त्या फार संवेदनशील असून त्या निरनिराळ्या वेगांत मिळतात. त्या लवकर धूसर होतात म्हणून नेहमी थंड जागेत ठेवाव्या लागतात.

  फिकट दिसणाऱ्या ताऱ्यांची छायाचित्रे अधिक काळ प्रकाशन करून मिळत नाहीत. त्यासाठी काही मर्यादा असतात म्हणून अभ्रिकेसारख्या स्वस्थ पदार्थांची छायाचित्रे घेताना त्याचा विचार करावा लागतो. ती घेताना काही वेळा रोज थोडा वेळ याप्रमाणे कित्येक तास प्रकाशन करावे लागते. खग्रास सूर्यग्रहणासारखी संधी छायाचित्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची असते कारण तेव्हा इतर वेळी न दिसणारे तारे दिसतात.

खगोलीय छायाचित्रे : सूर्य : कोणत्याही प्रकाशापेक्षा सूर्यप्रकाश अधिक तेजस्वी असतो. सूर्याच्या पृष्ठभागाच्या छायाचित्रणासाठी मंद वेगाची फिल्म वापरावी लागते. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नेहमी बदलत असणाऱ्या वातावरणामुळे व सूर्याच्या उष्णतेमुळे दूरदर्शकात होणाऱ्या प्रकाशीय फरकाने छायाचित्र स्पष्ट मिळत नाही. पृथ्वीच्या पृष्ठभागावर सूर्याच्या उष्णतेचा परिणाम होतो, असे लक्षात आल्यावर १९०० मध्ये जॉर्ज एलेरी हेल यांनी माऊंट विल्सन येथे १८ मी. आणि ३६ मी. व्यासाचे एकाच एक असे सौर मनोरे बांधले. हे मनोरे म्हणजे प्रणमन प्रकारचे आणि उभ्या अक्षांचे दूरदर्शकच आहेत. त्यांच्या वस्तुभिंगाचा व्यास ३०·५ सेंमी. आहे. त्यावर सपाट आरशातून दूरदर्शकावर सूर्याच्या रोजच्या हालचालीप्रमाणे त्याचा प्रकाश पडतो. बाहेरचा मनोरा आतल्या मनोऱ्याच्या संरक्षणार्थ उभारल्यामुळे आतील मनोऱ्यातील प्रकाशीय उपकरणांचे वाऱ्यापासून रक्षण होऊन त्यांत कंप उत्पन्न होत नाहीत. उंच आणि संरक्षित जागेत वातावरणात फरक न झाल्याने व उपकरणात कंप न आल्याने छायाचित्रे चांगली मिळतात. यानंतर अशा पद्धतीचे दूरदर्शक जर्मनीतील पॉट्‌सडॅम, इटलीतील आर्चेट्री आणि पाँटीॲक येथील एम्. सी. मॅथ-हलबर्ट वेधशाळा या ठिकाणी बसविण्यात आले.

पाँटीॲक येथील वेधशाळेने सूर्यावर शीघ्र गतीने बदलणाऱ्या घटनांचा चित्रपट तयार केला. सौर दूरदर्शकाने प्रकाशाच्या एकाच तरंगलांबीचा उपयोग करून छायाचित्रण करता येते.

वातावरणाचा परिणाम होणार नाही अशा उंच ठिकाणी जाऊन छायाचित्रण करण्याचा प्रयत्न १९५६ साली केला गेला. एक फुगा आकाशात सु. ६७५ मी.पर्यंत वर नेण्यात आला होता. यानंतर काही वर्षांनी मानवरहित फुगा अंदाजे २,९०० मी.पर्यंत वर पाठविण्यात आला होता. दोन्ही फुग्यांवर लहान आकारमानाचे दूरदर्शक बसविले होते. छायाचित्रणासाठी गुंडाळी फिल्म वापरण्यात आली होती आणि तीवर सूर्याची पुष्कळ छायाचित्रे घेतली गेली.

सूर्याच्या तेजाच्या मानाने त्याचे बाहेरचे तेजोवलय फार फिक्के आहे म्हणूनच सूर्यग्रहणाच्या वेळी तो जेव्हा चंद्रामुळे संपूर्णपणे झाकला जातो तेव्हा त्याचे छायाचित्रण करता येते.

पॅरिस वेधशाळेचे बर्नार्ड ल्यो यांनी १९३१ साली स्वतंत्रपणे बनविलेल्या दूरदर्शकाने सौर तेजोवलयाची सूर्यग्रहण नसतानाही अनेक छायाचित्रे घेतली. त्यांनी १९४१ मध्ये सूर्याच्या इतर भागांची व सौर डागांचीही छायाचित्रे मिळविली. अमेरिकेने सोडलेल्या फिरत्या सौर वेधशाळांतून व स्कायलॅब योजनेत सूर्याची अनेक छायाचित्रे मिळविण्यात आली आहेत.

चंद्र आणि इतर ग्रह : चंद्र आणि सूर्यकुलातील इतर ग्रह जरी सूर्यापेक्षा फिके असले, तरी पृथ्वीजवळील इतर चकमकणाऱ्या वस्तूंच्या मानाने तुलनात्मक दृष्टीने ते तेजस्वी आहेत. पृथ्वीतलावर होणाऱ्या वातावरणातील फरकामुळे त्यांची छायाचित्रे पुष्कळ वेळा अस्पष्ट येतात, म्हणून एकाच जागेची अनेक छायाचित्रे घेतात व त्यांच्या विकाशनानंतर त्यांतील चांगली निवडतात. मोठ्या आकारमानाचे एकच छायाचित्रे घेण्यापेक्षा अनेक छोटी छोटी छायाचित्रे घेऊन ती एकत्रित करणे अधिक सोयीचे पडते. अशा कामासाठी ५० ते १०० सेंमी. छिद्रव्यास असलेला दूरदर्शक चांगला उपयोगी पडतो.

छायाचित्रणामुळे चंद्राच्या पृष्ठभागाचा संपूर्ण नकाशा तयार करता आला. त्याचा उपयोग मानवाचा चंद्रावर उतरण्यासाठी योग्य जागा शोधून काढण्यासाठी झाला. याच पद्धतीने बुध, गुरू, मंगळ या ग्रहांचे छायाचित्रण केले गेले आहे.

कृत्रिम उपग्रह :  इ. स. १९५७ साली सोव्हिएट रशियाने पहिला मानवनिर्मित उपग्रह आकाशात सोडला आणि तेव्हापासून खगोलीय छायाचित्रणासाठी एक नवा विषय मिळाला. पहिले उपग्रह मोठ्या आकारमानाचे आणि तेजस्वी होते. त्यामुळे त्यांची छायाचित्रे जमिनीवरूनही सहज घेता येत होती. या उपग्रहांच्या छायाचित्रणाने बरेच शास्त्रीय प्रश्न सोडविता येणे शक्य होते म्हणून अमेरिकेने १२ कॅमेऱ्यांचे जाळे पृथ्वीवर तयार केले आहे. त्यातून अशा उपग्रहांची छायाचित्रे घेता येतात. हे कॅमेरे बेकर-नन कॅमेरे म्हणून ओळखले जातात. त्यांची रचना श्मिट कॅमेऱ्यासारखी असते. त्यांत गुंडाळी फिल्म वापरतात व ५० रुंद व ३० लांब एवढे छायाचित्र त्यावर येते. दूरदर्शकाच्या आत एक प्रकाशमान केलेले घड्याळ असते. त्यावरून उपग्रह दूरदर्शकाच्या टप्प्यात आल्याची वेळ आपोआप समजते आणि दूरदर्शक पाहिजे त्या ठिकाणी जुळविता येतो. उपग्रहाबरोबर ताऱ्यांच्याही प्रतिमा येत असल्यामुळे उपग्रहाची जागा आणि मार्ग बरोबर समजतात.

उल्का : उल्का दगडासारख्या असून त्यांचे आकारमान लहान दगडापासून ते एखाद्या घराइतके मोठे असते. त्या जेव्हा पृथ्वीकडे ओढल्या जातात तेव्हा खाली येतात व जेव्हा त्या पृथ्वीच्या वातावरणात शिरतात तेव्हा त्या घर्षणाने गरम होऊन शेवटी पेटतात आणि लखलखीत दिसतात. जमिनीवर पडण्यापूर्वी बहुतेक उल्का जळून जातात. उल्का केव्हा व कुठे पडेल हे सांगता येत नसल्यामुळे ती दिसल्याबरोबर कॅमेरा जुळवून छायाचित्र घेईपर्यंत ती नाहीशी होते म्हणून तिची छायाचित्रे सहज घेता येत नाहीत. हार्व्हर्ड वेधशाळेचे जे. बी. बेकर यांनी बनविलेला सुपर श्मिट कॅमेरा यासाठी वापरतात. या कॅमेऱ्याने ५२ अंशांच्या कक्षेचे छायाचित्रण करता येते आणि त्यासाठी खास तयार केलेली गोलाकार फिल्म वापरतात. विकाशनानंतर या फिल्मवरून एका स्वतंत्र यंत्रणेने तिचे रूपांतर सपाट काचेवर करतात. त्याचा उपयोग पुढे नोंदणीसाठी व अंतर मोजणीसाठी करतात. ५० ते १०० मी. अंतरावर दोन कॅमेरे एकाच वेळी छायाचित्रण करतात म्हणून उल्कांची उंची, वजन व अवकाशवेग बाजूच्या ताऱ्यांच्या प्रतिमांवरून समजतो.


ध्रुवीय प्रकाश :   ध्रुवीय प्रकाश रात्रीच्या वेळी दिसत असून त्याने आकाशाचा पुष्कळच मोठा भाग व्यापलेला असतो. हातात धरता येणाऱ्या कॅमेऱ्याने त्याच्या लहानशा भागाची चित्रे घेता येतात. सर्व भागांचे एकत्र छायाचित्र घेण्याच्या दृष्टीने ग्रीनश्टाइन व हेनी कॅमेरा उपयुक्त ठरतो कारण त्याने एकाच प्रकाशनात १४० व्यासाचे छायाचित्रण करता येते. या कॅमेऱ्याला चलच्चित्रण यंत्रणा जोडून यर्किझ वेधशाळेचे ए. बी. मेइनेल व त्यांचे सहकारी यांनी ध्रुवीय प्रकाशाच्या आकारमानात व रचनेत होणाऱ्या फरकाचे चित्रण केले होते.

खगोलाचा छायाचित्रीय नकाशा :  आकाशातील ताऱ्यांचे छायाचित्रण करणे म्हणजे एक अत्यंत अवघड काम आहे. ते करण्यासाठी अनेक वर्षे घालवावी लागतात व काही ठराविक वर्षांनंतर पूर्वी ज्या दूरदर्शकाने छायाचित्र घेतले असेल, त्यानेच दुसरे छायाचित्र घेतात. २५ वर्षांच्या अंतराने घेतलेल्या छायाचित्रांवरून ताऱ्याची गती, त्याचे स्थान इ. गोष्टींचे निरीक्षण करता येते. अशा छायाचित्रांवरून नवीन ग्रहांचा, उपग्रहांचा वा इतर गोलांचा शोध लागण्याची शक्यता असते. दूरदर्शकाने आकाशातील फारच थोड्या भागाचे छायाचित्रण करता येते. पूर्ण अभ्रिकेचे छायाचित्र तयार करण्यासाठी एकानंतर एक अशी तीन-चार छायाचित्रे घेऊन मग ती जुळवावी लागतात. गिल यांनी घेतलेल्या ताऱ्यांच्या छायाचित्रांवरून खगोलाचा नकाशा बनविण्याची कल्पना पुढे आली. गिल यांनी दक्षिण ध्रुवापासून १८° द.पर्यंत घेतलेल्या छायाचित्रांतील सु. ५,००,००० ताऱ्यांचे सहनिर्देशक व प्रती याकोबस कापटाइन यांनी मोजल्या. त्यानंतर १८८७ साली पॅरिस वेधशाळेचे प्रमुख आमेदे मूशेझ यांनी जगातील १८ वेधशाळांच्या सहकार्याने संपूर्ण खगोलाच्या छायाचित्रणाचे कार्य हाती घेतले. या नकाशात प्रथम चौदाव्या व नंतर अकराव्या प्रतीपर्यंतचे सर्व तारे दाखविण्याचे ठरविण्यात आले. हा नकाशा १९५८ पर्यंत जवळजवळ पूर्ण झाला, परंतु त्यात आकाशाच्या ५०% भागाचाच समावेश झालेला होता.

उत्तरेकडील आकाशाच्या छायाचित्रणासाठी १९१३ साली फ्रँक स्लेसिंगगर यांनी रुंद-कोनी भिंगे वापरून छायाचित्रण करण्याची कल्पना मांडली. १९२७ च्या सुमारास एका नवीन प्रकारच्या कॅमेऱ्याने उत्तरेकडील आकाशाचे छायाचित्रण करण्याचे काम येल व इतर वेधशाळांनी पूर्ण केले. पालोमार वेधशाळा व नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी यांनी सहकार्य करून १९४९—५६ या काळात सु. १,८०० छायाचित्रे घेतली. या छायाचित्रांत विसाव्या प्रतीपर्यंतचे तारे दृश्यमान झालेले असून त्यांवरून अमूल्य ज्योतिषशास्त्रीय माहिती मिळालेली आहे.

खगोलीय छायाचित्रांच्या साहाय्याने तारे, ग्रह, अभ्रिका इत्यादींच्या अंतर, प्रत इ. विविध ज्योतिषशास्त्रीय राशी मोजता येतात. तसेच केवळ दूरदर्शकातून डोळ्याने पाहून जे तपशील दिसू शकणार नाहीत, ते अशा छायाचित्रांवरून समजू शकतात.

छायाचित्रण साहित्यानिर्मिती उद्योग : जिलेटिनाचा वापर करून छायाचित्रणाच्या काचा बनविण्याला १८७४ साली सुरुवात झाली. तेव्हापासून या उद्योगाला सुरुवात झाली, असे म्हणता येईल. या उद्योगाचे तीन प्रमुख भाग पडतात : (१) संवेदनशील साहित्य म्हणजे काचा, फिल्म, कागद इत्यादींची निर्मिती (२) छायाचित्रणाची उपकरणे म्हणजे कॅमेरे, भिंगे, चित्रवर्धक इत्यादींची निर्मिती व (३) इतर साहाय्यक साधनांची म्हणजे छपाई चौकटी, दिव्यांचे घोडे इत्यादींची निर्मिती.

साधे कॅमेरे आणि त्यांसारखी इतर साधने मोठ्या प्रमाणावर बनवितात. त्यांचे सुटे भाग प्रथम स्वयंचलित यंत्रावर बनवून नंतर त्यांची कुशल कारागिराकडून जुळवणी करतात. मौल्यवान कॅमेरे नेहमी कमी प्रमाणावर बनवितात. त्यांच्या जुळवणीच्या वेळी त्यांच्या सर्व भागांची कार्यक्षमता प्रत्येक टप्प्यात तपासतात. पेटी (बॉक्स) वा त्याप्रकारच्या स्वस्त कॅमेऱ्याची तपासणी गट पद्धतीने करतात.

कॅमेऱ्याच्या भिंगासाठी विशिष्ट प्रकारची प्रकाशीय काच लागते आणि ती फक्त आठ-दहा देशांतच बनविली जाते.

संवेदनशील साहित्यासाठी चांदी, जिलेटीन, प्लॅस्टिक इ. साहित्य बऱ्याच प्रमाणावर वापरले जाते. चांदीचा वापर या उद्योगात ६०% होत असल्याने चांदीच्या भावाच्या चढ-उतारावर संवेदनशील साहित्याचा भाव अवलंबून असतो. या उद्योगात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत सर्वांत जास्त प्रमाणात चांदी वापरण्यात येते. त्याखालोखाल जर्मनी व जपान यांचा क्रमांक लागतो. सिल्व्हर हॅलाइडाचे जिलेटिनामधील पायस तयार करून व आवश्यकतेनुसार वर्ण-संवेदनकारक व साहाय्यक रसायने घालून कागदावर वा फिल्मवर यंत्राने अनेक थरांत लेपन करतात. पायस तयार करण्याची कृती काळोख्या खोलीतच करतात. फिल्मची आधार पट्टी सामान्यतः पॉलिएस्टर प्लॅस्टिकची करतात.

हौशी व धंदेवाईक छायाचित्रकारांच्या फिल्मवरील संस्करण व छायाचित्रांच्या प्रती काढण्याचे काम प्रयोगशाळांतून करण्यात येते. एकट्या अमेरिकेतील २,०००—३,००० प्रयोगशाळांतून हे कार्य १९६९ मध्ये सु. ८५ कोटी डॉलरचे झाले. त्यांपैकी सु. ७५ कोटी डॉलरचे काम रंगीत फिल्मचे होते. मोठ्या प्रयोगशाळांत हे कार्य यंत्रांनी करण्यात येते.

  छायाचित्रीय सामग्रीचे जास्तीत जास्त उत्पादन अमेरिकेत होते. त्याखालोखाल जपान, प. जर्मनी, इंग्लंड व फ्रान्स यांचा क्रमांक लागतो. अमेरिकेत या धंद्यात सु. १·१२ लाख लोक काम करतात, तर तेवढेच लोक जपान व जर्मनी या दोन देशांमध्ये मिळून काम करतात. अमेरिकेतून छायाचित्रण सामग्री जास्त प्रमाणात निर्यात होते. अमेरिकेतून कॅनडा, जपान, प. जर्मनी व इंग्लंड या देशांना निर्यात होते तर जपान, प. जर्मनी, इंग्लंड व बेल्जियम या देशांतून अमेरिकेत आयात होते.

कागद, फिल्म, रसायने इ. छायाचित्रण साधने यांचे अमेरिकेतील निर्मितीचे प्रमाण ३ : ४, तर जर्मनीत ते ३ : २, जपानमध्ये २ : १ व इंग्लंडमध्ये १ : २ असे आहे.

भारतीय उद्योग : छायाचित्रणासाठी सुरुवातीला काचा वापरात असल्याने भारतात लाकडी कॅमेरे प्रचारात होते व ते बेळगाव येथे तयार होत असत पण जपानने या क्षेत्रात प्रवेश केल्यावर बेळगावला तयार होणारे कॅमेरे मागे पडले. यानंतर गुंडाळी फिल्म प्रचारात आल्यावर धातूच्या पत्र्याच्या पेटी कॅमेऱ्यांची आयात होऊन ते अधिक प्रमाणात प्रचारात येऊ लागून लाकडी कॅमेऱ्याचा वापर कमी प्रमाणात होऊ लागला.

दुसऱ्या महायुद्धापूर्वी भारतात उद्योगधंदे व संशोधनकार्य आजच्या मानाने फारच कमी प्रमाणात होते. त्यामुळे छायाचित्रणाच्या साहित्यास आजच्या सारखी मागणी नव्हती. १९४२ साली त्या वेळच्या सरकारने परदेशाहून छायाचित्रणाचे सामान आयात करण्यावर बंदी घातली. युद्धानंतर व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर छायाचित्रणाच्या साहित्याची एकंदर मागणी फारच वाढल्यामुळे जे साहित्य पूर्वी परदेशातून येत असे त्यातील काही भारतात बनू लागले आणि थोड्या प्रमाणात ते परदेशीही जाऊ लागले. त्यांत छपाई चौकटी, छायाचित्रसंग्रह (अल्बम), कॅमेऱ्याच्या कापडी व कातडी पिशव्या अशा अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश होतो.

 कॅमेरे, इलेक्ट्रॉनीय स्फुर दीप, भिंगे, चित्रवर्धक यांसारख्या वस्तू आयात करण्यावर १९५७ सालापासून बंदी घालण्यात आली. फक्त काही प्रमाणात संवेदनशील साहित्य आयात करण्यात येत होते. त्यामुळे देशात संवेदनशील साहित्य बनविण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि दोन-तीन कारखाने सुरू झाले.

 जर्मनीच्या आग्फा कंपनीच्या सहकार्याने बडोदे व ठाणे येथे पेटी कॅमेरे व छायाचित्रणाचे संवेदनशील कागद बनविण्याचे कारखाने चालू आहेत. यांशिवाय इतर ठिकाणी छोटे कॅमेरे व संवेदनशील कागद बनविणारे दोन-तीन कारखाने आहेत. संवेदनशील कागद व फिल्म बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल अजून परदेशातून मागवावा लागत असून तो जरूरीच्या मानाने फारच कमी प्रमाणात आयात केला जातो.

 संवेदनशील साहित्य व पेटी कॅमेऱ्याबरोबरच चित्रवर्धक, चित्रप्रक्षेपक, पारदर्शिकादर्शक, छायाचित्रे कापण्याची, सुकविण्याची व त्यांना चकाकी आणण्याची यंत्रे, दिव्यासाठी घोडे इ. अनेक प्रकारच्या साधनांचे उत्पादन देशात होऊ लागून काही प्रमाणात ते जवळच्या देशांत निर्यात होऊ लागले आहे. असे असले तरी १९६५ साली आणि १९६७ सालच्या आयात केलेल्या साहित्याच्या खालील आकड्यांवरून भारतातील एकंदर मागणी वाढत्या प्रमाणावर आहे, असे दिसते ( आकडे लक्ष रुपयांमध्ये आहेत.)

साहित्य  

१९६५ 

१९६७ 

उपकरणे व सुटे भाग

४३·१३

८८·१०

संवेदनशील कागद

४१·५५

१२·४२

क्ष-किरण फिल्म

६३·७१

१६०·४४

साधीफिल्म

९४·२२

८५·१५

चित्रपटाचीफिल्म

२१९·३४

३५१·५४

रसायने

१८·२०

४१·४०

द हिंदुस्थान फोटो फिल्म मॅन्युफॅक्चरिंग कं. लि. नावाचा एक कारखाना १९६० मध्ये उटकमंड येथे केंद्र सरकारने सुरू केला. या कारखान्यात चलच्चित्रण, क्ष-किरण, गुंडाळी इ. प्रकारची फिल्म व छायाचित्रणाचे संवेदनशील कागद तयार होतात. १९७२-७३ मध्ये ५.६५ कोटी रुपयांची, तर १९७३-७४ मध्ये ६.९३ कोटी रुपयांची विविध प्रकारची सामग्री या कारखान्यात तयार झाली. हा कारखाना बॉचेट अँड कं. या फ्रेंच कंपनीच्या सहकार्याने सुरू झाला आहे. (चित्रपत्रे ).

पहा : कॅमेरा, चलच्चित्रपट तंत्र भिंग.

संदर्भ : 1. Bamback, E. S. Manual of Colour Photography, London, 1972.

             2. Friedman, J. S. History of Colour Photography, London, 1968.

            3. Gernshein, H. Gernshein, A. A Concise History of Photography, London, 1967.

            4. Longford, M. J. Advanced Photography, London, 1972.

             5. Mannhein, L. A. Spencer, D. A., Eds. Photography : Theory and Practice, London,  1970-71.

            6. Mannhein, L. A. and Others, Eds. The Focal Encyclopaedia of Photography, 2 Vols.,

                London, 1965.

            7. Mason, L. F. A Photographic Processing Chemistry, London, 1967.

            8. Spillman, R. The Complete Photo-Book, London, 1972.

            9. Walls, H. J. Camera Technique, Londan, 1974.

ओक, ना. चिं.


वृत्तपत्रीय छायाचित्र : ऑस्ट्रीयातील साल्झबर्ग येथे अमेरिकेचे अध्यक्ष जेरल्ड फोर्ड विमानातून उतरताना शिडीवरून घसरून पडत असताना घेतलेले छायाचित्र.गुन्हेशास्त्रविषयक छायाचित्र : (वरील) आणि प्रयोगासाठी (खालील) उडविलेल्या काडतुसांवरील चेतक-खिळीच्या चिन्हांची सूक्ष्मदर्शकी छायाचित्रे.औद्योगिक छायाचित्र : बरौनी तेलशुद्धीकरण कारखान्यातील केरोसीन तयार करण्याची यंत्रसामग्री.औद्योगिक छायाचित्र : जमशेटपूर येथील टाटा आयर्न अँड स्टील कंपनीच्या कारखान्यातील पोलादाचे ठोकळे तयार करण्याच्या प्रक्रियेतील एक टप्पा.गुन्हेशास्त्रविषयक छायाचित्र : गुन्ह्यामध्ये (डाव्या बाजूचे) आणि प्रयोगशाळेत (उजव्या बाजूचे) उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांमधील सुजोडतेची तौलनिक सूक्ष्मदर्शकी छायाचित्रे.महाछायाचित्र : (अ) प्रौढ चतुर व त्याची अर्भकावस्था. (आ) पोटॅशियम तुरटीच्या स्फटिकाची वाढ.क्ष-किरण छायाचित्र : हाताच्या मोडलेल्या हाडाचे क्ष-किरण छायाचित्र.सूक्ष्मछायाचित्र : पित्ताशयातील रक्तवाहिनीचे सूक्ष्मछायाचित्र.सूक्ष्मछायाचित्र : परिसरीय तंत्रिकेचे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने घेतलेले छायाचित्र.वैद्यकीय छायाचित्र : हृदयाची शस्त्रक्रिया चालू असताना घेतलेले छायाचित्र.पाण्याखालील छायाचित्रे.पाण्याखालील छायाचित्रे.प्रकाशीय स्थितिस्थापकता : भोक पाडलेल्या पट्टीमध्ये निर्माण झालेल्या ताणांमुळे तयार झालेल्या आकृतीबंधाचे छायाचित्र.अवरक्त छायाचित्र : वरचे छायाचित्र साध्या प्रकाशातील असून खालचे, त्यात वस्तूंचे, अवरक्त छायाचित्र आहे.खगोलीय छायाचित्र : पॅलोमार वेधशाळेचा ४८ इंची श्मिट दूरदर्शक.खगोलीय छायाचित्र : पॅलोमार वेधशाळेचा ४८ इंची श्मिट दुरदर्शकाने घेतलेले देवयानी नक्षत्रातील एनजीसी २२४ या सर्पिल दीर्घिकेचे छायाचित्र.