लिनोलियम : विशेषेकरून जमिनीवर अथवा पृष्ठभागावर अंथरण्यासाठी वापरण्यात येणारे काहीसे कठीण, लवचिक व गुळगुळीत पृष्ठाचे आकर्षक आच्छादन. ऑक्सिजन मिसळून घट्ट केलेले जवसाचे (अळशीचे) तेल, रेझिने, भरणद्रव्ये, रंगद्रव्ये, डिंक (बंधक द्रव्ये) वगैरेंचे मिश्रण तागाचे कापड (किनतान किंवा बारदान) अथवा फेल्ट यासारख्या तंतुमय आधारपृष्ठाला लावून लिनोलियम बनवितात. मात्र व्हिनिल व इतर प्लॅस्टिके व रेझिनयुक्त कित्येक प्रकारची आच्छादने पुढे आल्याने लिनोलियम मागे पडू लागले आहे.

इतिहास : यूरोपसारख्या थंड प्रदेशांत फरशीच्या सिमेंटच्या व मातीच्या ओलसर जमिनीही थंड पडतात. त्यामुळे त्यांच्यावर उबदार आच्छादन घालणे आवश्यक असते. असे गालिच्यासारखे आच्छादन जलाभेद्य करण्यासाठी सतराव्या व अठराव्या शतकांमध्ये त्याला जवसाचे तेल लावीत नंतर त्यांवर चित्रे काढण्याची कल्पना पुढे आली आणि लोकरी कापडावर तैलचित्रे काढण्याचे एकस्व (पेटंट) १६३६ साली तर इतर आच्छादनांवर चित्रे छापण्याचे एकस्व १६६४ मध्ये देण्यात आले होते. आच्छादन जलाभेद्य करण्यासाठी नंतर तेलाच्याबरोबर रेझिने व इंडिया रबर (१७५१) वापरण्यात येऊ लागले. अशा प्रकारचे तेलकापड १८४० साली मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आले. नंतर याची जागा काँप्ट्युलिकॉन नावाच्या कापडाने घेतली. कॅन्‍व्हासवर रबर व बुचाची भुकटी लावून काँप्ट्युलिकॉन बनवीत. मात्र रबर महाग असल्याने याला पर्यायी आच्छादन शोधण्याचे प्रयत्न चालू होते. यातूनच लीनोलियमाचा शोध लागला.

हवेत उघडे पडलेले जवसाचे तेल रबराप्रमाणे घट्ट होते. आणि आधारपृष्ठाला लावून ते आच्छादनासाठी वापरता येऊ शकेल, असे फ्रेडरिक वॉल्टन यांच्या लक्षात आले. १८६० साली त्यांनी असे आच्छादन तयार केले. हे तेल अळशी (फ्लॅक्स) पासून मिळत असल्याने त्यांनी या आच्छादनाला ‘लायनम’ (अळशी) व ‘ओलियम’ (तेल) या लॅटिन शब्दांवरून ‘लिनोलियम’ हे नाव दिले. १८६३ साली त्यांनी त्याचे एकस्व घेतले आणि १८६४ साली स्टेन्स (इंग्लंड) येथे याचा कारखानाही काढला. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात आलेले लिनोलियम हे पहिले आच्छादन ठरले. नंतर त्यांनी तयार केलेल्या एका यंत्रामुळे विविध प्रकारच्या नक्षीचे लिनोलियम बनविता येऊ लागले. १८८० साली जडावाचे लिनोलियम तयार करण्यात आले. लिनोलियम अजूनही तेव्हाच्या जुन्याच पद्धतीनुसार तयार करतात, मात्र आधुनिक पद्धतीत काम जलदपणे होते. १९४० -५० च्या दरम्यान लिनोलियम उद्योगाची सर्वाधिक भरभराट झाली. त्यांनंतर मात्र संश्लेषित आच्छादनामुंळे या उद्योगाला उतरती कळा लागली.

कच्चा माल : जवसाचे तेल, राळ, गम रेझीन, लाकडाचा भुसा, बुचाची भुकटी रंगद्रव्ये व बारदान हा लिनोलियमासाठी लागणारा प्रमुख कच्चा माल आहे. कधीकधी सोयाबीन, सूर्यफूल, करडई, टुंग इ. शुष्कन तेलेही (हवेत उघडी राहिल्यावर कठीण शुष्क पटल तयार होणारी तेलेही) यासाठी वापरतात अथवा जवसाच्या तेलात मिसळतात. सोयाबीन तेलाच्या ⇨ऑक्सिडीभवनास ( ऑक्सिजन समाविष्ट होण्यास) उशीर लागतो पण त्यापासून बनविलेले लिनोलियम अधिक लवचिक असून ते चांगले रंगविता येते. लिनोलियमाची प्रत सुधारण्यासाठी जवसाच्या तेलाऐवजी नायट्रोसेल्युलोज, क्लोरीनयुक्त रबर वगैरेही वापरण्यात येतात. आधारपृष्ठ म्हणून मुख्यत्वे बारदान वापरतात. कधीकधी फेल्ट, कॅन्व्हास, बिट्युमेनाने संपृक्त केलेला (आत घुसविलेला) कागद वैगैरेही आधारपृष्ठ म्हणून वापरतात. लाकडाचा भुसा, बुचाची भुकटी, व्हायटिंग, चिनी माती इ. भरणद्रव्ये म्हणून वापरतात. कार्बनी भरण द्रव्यांमुळे लिनोलियमाची घनता कमी होते आणि त्याची लवचिकता तसेच ध्वनी व उष्णता यांची निरोधकता वाढते. अकार्बनी भरणद्रव्यांमुळे लिनोलियमाची घनता, कठिनता व अग्निरोधकता वाढते. लिनोलियमामध्ये सामान्यपणे लिथोपोन, टिटॅनियम डाय-ऑक्साइड, लेडक्रोम, पिवडी, प्रशियन निळा इ. रंगद्रव्ये वापरतात. फिकट रंगाकरिता रंगद्रव्ये कमी प्रमाणात घालतात व व्हायटिंगही मिसळतात. बंधकद्रव्य म्हणून काही प्रकारचे डिंक वापरतात.

 

निर्मिती : लिनोलियम तयार करण्याच्या अनेक प्रक्रिया आहेत. यांच्यात किरकोळ भेद असले तरी लिनोलियम तयार करण्याची स्थूल प्रक्रिया पुढीलप्रमाणे असते.

वॉल्टन यांच्या काळी आधारपृष्ठावर जवसाच्या तेलाचा पातळ थर देत व त्यांचे हवेने सावकाश ऑक्सिडिभवन झाल्यावर त्याच्यावर दुसरा थर देत. अशा तऱ्हेने काही आठवड्यांनी घट्ट तेलाचा पुरेशा जाडीचा थर तयार होतो मात्र ही पद्धत वेळखाऊ असल्याने मागे पडली.

आधुनिक प्रक्रियेत एका दंडगोलाकार टाकीत जवसाचे तेल १२०°से. पर्यंत तापवितात व त्याच वेळी त्यात संपीडित (दाबाखालील) हवा वा ऑक्सिजन पाठवून ते ढवळले जाते. यामुळे तेलाचे ऑक्सिडीभवन जलदपणे होते. तेल सुकून रबराप्रमाणे घट्ट होईपर्यंत ही क्रिया करतात. हे रबरासारखे द्रव्य बळकट होऊन ओलसर होण्यासाठी त्यात कौरी डिंक वा राळ किंवा इतर नैसर्गिक डिंक अथवा बुहधा संश्लेषित रेझिने घालतात. या मिश्रणाला लिनोलियम सिमेंट म्हणतात. ते कित्येक दिवस साठवून मुरवतात. त्यामुळे ते पुरेसे बळकट होते.

नंतर यामध्ये रंगद्रव्य, भरणद्रव्य व बंधकद्रव्य मिसळतात. मग हे मिश्रण गरम, थंड व खिळे असलेल्या रुळांच्या मालिकेतून जाते. गरम रुळाने मिश्रण तापते व थंड रुळावर त्यांची चादर बनते आणि अखेरीस खिळे असलेल्या रुळाने ही चादर खरडली जाऊन रव्यासारखी कणीदार पूड बनते. नंतर ही पूड आधारपृष्ठाला कॅलेंडरिंग क्रियेने लावली जाते. कॅलेंडरिंग क्रियेमध्ये वाफेने तापविलेल्या अवजड लोखंडी रुळाने दाब दिला जातो. अशा तर्हेंने उष्णता व दाब यांच्यामुळे मऊ झालेले हे मिश्रण आधारपृष्ठाला पक्के चिकटते व त्याला चमकही येते. मग या लिनोलियमाच्या चादरी शुष्कन कोठ्यांमध्ये अथवा तापविलेल्या उंच इमारतीत जाडीनुसार ७ ते २५ दिवस टांगून ठेवतात.येथील तापमान सु. ६५°ते ८०°से. ठेवतात. यामुळे लिनोलियमाचा लेप हळूहळू कडक, कठीण व कोरडा होतो. नंतर त्याच्या पृष्ठावर मेण, लॅकर अथवा नायट्रोसेल्युलोज यांचा पातळ संरक्षक लेप देतात. या झिलईने लिनोलियमाचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो त्याच्यावर डाग पडत नाहीत आणि त्यावर सोडा व साबण यांचा परिणाम होत नाही. अशा तऱ्हेने लिनोलियम तयार करतान त्याच्या वर इच्छित नक्षीकाम किंवा छपाई केली जाते.


 प्रकार : लिनोलियमांचे अनेक प्रकार असून ते बनविण्यासाठी अनेक टप्पे असणारी प्रक्रिया वापरावी लागते. साधे व जडावाचे असे लिनोलियमाचे दोन मुख्य प्रकार असून त्यांचे अनेक उपप्रकारही आहेत. साध्या प्रकारात नक्षी फक्त पृष्ठभागावरच छापलेली असते. साधे लिनोलियम बहुतकरून हिरवे, काळे, करडे अथवा तपकिरी असते. याचे एकरंगी छापील, जॅस्पी, मोएरे इ. उपप्रकार आहेत. एकरंगी प्रकार जाड असतो तर जॅस्पी प्रकार कणीदार व सूर्यकांत मण्याप्रमाणे ( जॅस्परप्रमाणे व म्हणून नाव) दिसतो आणि छापील प्रकारात पृष्ठभागार तैलरंगांची छपाई करतात.

जडावाच्या लिनोलियमामध्ये संपूर्ण जाडीभर नक्षी व रंग असतो.त्यांचे फर्मायुक्त, सरळरेषायुक्त, ग्रॅनाइट, मार्बल (संगमरवरी), पॅराक्वेट्री इ. उपप्रकार आहेत. यातील जडावी कामासाठी कोरीव फर्मा (स्टेन्सिल) वापरतात. लिनोलियमाचा निरनिराळ्या रंगांचा भुगा अशा फर्म्यांमधून आधारपृष्ठावर चाळून पेरतात. अशा तऱ्हेने प्रत्येक रंगासाठी वेगळा फर्मा वापरून विविध नक्षी वा आकृतिबंध तयार करतात. नंतर हवेच्या दाबाने  ही नक्षी पक्की करतात व जरूरीप्रमाणे छपाईही करतात. हे लिनोलियम गालिच्याप्रमाणे दिसते. अनेक रंगांच्या लिनोलियम मिश्रणाच्या चादरींतून विविध आकारांचे तुकडे कापून घेतात व ते आधारपृष्ठावर ठेवून इच्छित आकृतिबंधांत मांडतात. नंतर दाब देऊन हा आकृतिबंध पक्का करतात. लिनोलियम मिश्रणाच्या अनेक चादरींचे मिश्रण करून व त्यांच्यावर पुन्हा कॅलेंडरिंग करून संगमरवराप्रमाणे दिसणारे लिनोलियम बनवितात. सरळरेषीय उपप्रकारात भूमितीय आकृत्यांची नक्षी असते. कधीकधी आणखी एकवेळ कॅलेंडरिंग क्रिया करून उठावाची नक्षीही तयार करता येते. जडावाच्या लिनोलियमावरील नक्षी टिकाऊ असते. उलट साध्या लिनोलियमावरील छापील नक्षी लवकर निघून जाते.

गुणधर्म : लिनोलियम दिसायला आकर्षक, आल्हाददायक व लवचिक असून ते आघात व आवाज शोषते. तेले, वसा (स्निग्ध पदार्थ), ग्रिजे व कार्बनी विद्रावक (विरघळविणारे पदार्थ) यांनी हे फारसे खराब होत नाही. दमट किंवा क्षारीय (अल्कधर्मी) स्थितीत ते हळूहळू खराब होते. तापमानाने याच्या आकारमानात बदल होत नाही मात्र थंडीमुळे हे भेगाळते. झिलईमुळे याला चकाकी आलेली असते व त्यामुळे त्यावर धूळ धरून ठेवली जात नसल्याने ते सहज साफ करता येते. सामान्यपणे लिनोलियमाची रुंदी २, ३ किंवा ४ मी. आणि जाडी १.९ ते ८ मिमी. पर्यंत असते. जडावाच्या लिनोलियमाची जाडी बहुधा १.४ मिमी. असते.

उपयोग : पोलादी, लाकडी, काँक्रीटच्या किंवा अन्य पृष्ठभागांवर घालण्यासाठी व त्यांच्यावर पक्के बसविण्यासाठी (उदा., टेबलावर) लिनोलियम वापरतात. अशा प्रकारे घरे, दुकाने, हॉटेले, उपाहारगृहे, रुग्णालये, शाळा, कार्यालये, रेल्वेचे डबे, बस इ. ठिकाणी पृष्ठभाग आच्छादण्यासाठी हे वापरतात. मात्र असे पृष्ठभाग ताठ, सपाट व कोरडे असावे लागतात. अन्यथा ते लवकर खराब होते. खडबडीत पृष्ठामुळे लिनोलियमाला भेगा पडतात तर ओलसर पृष्ठभागामुळे ते प्रसरण पावून त्याला फुगवटे येऊ शकतात व दमटपणामुळे त्यावर बुरशीही येते.

इ. स. १९५० नंतर लिनोलियमाचा वापर कमी होऊ लागला. कारण त्याच्यापेक्षा अधिक आकर्षक व सोयीस्कर अशी विविध प्रकारच्या प्लॅस्टिकांची आच्छादने, गालिचे, फरश्या, चटया इ. पुढे आली आहेत. ही संश्लेषित अच्छादने लिनोलियमापेक्षा अधिक पातळ, वजनाला हलकी, धुण्यास सोयीची, टिकाऊ व स्वस्त असून दमटपणा व काही रसायने यांना ती लिनोलियमापेक्षा अधिक विरोधी असतात. यामुळे लिनोलियम मागे पडले आहे.

 

भारत : ब्रिटन, जर्मनी, हॉलंड इ. यूरोपीय देश, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, ऑस्ट्रेलिया व भारत हे लिनोलियम बनविणारे प्रमुख देश आहेत. इतरत्र लिनोलियमाचे महत्त्व पुष्कळच कमी झाल्याने भारतातील या उद्योगांची थोडी माहिती पुढे दिलेली आहे.

इंडिया लिनोलियम लि. हा भारतातील लिनोलियमाचा पहिला कारखाना बिर्लापूर (प. बंगाल) येथे १९५२ साली सुरू झाला. बराचसा कच्चा माल भारतात उपलब्ध असून बुचाची भुकटी, कौरी डिंक, व्हायटिंग, लिथोपोन, संश्लेषित रेझिने, काही रंगद्रव्ये व छपाईसाठी लागणारे फेल्ट हा कच्चा माल आयात करावा लागतो. यासाठी वापरावयाच्या बारदानाच्या धाग्याचा क्रमांक व वजन ही आयएस ६५३-१९५५ या भारतीय मानकाने निश्चित केलेली आहेत. भारतात साधे, छापील, जॅस्पी, मोएरे व मार्बल प्रकारांचे लिनोलियम तयार होते. साध्या व मार्बल प्रकारांची जाडी ६ मिमी., मोएरे व जॅस्पी प्रकारांची १.६ मिमी. आणि इतरांची २ ते ६.७ मिमी. असते. त्यांचा पन्हा (रुंदी) सामान्यतः सु. १८०  सेंमी. असतो आणि लांबी ६ ते ६.७ मिमी. जाडीच्या प्रकारांची सु. ३ मी. तर इतरांची सु. ५.५ मी असते.

भारतात लिनोलियमाची आयात होत नाही. मात्र येथून न्यूझीलंड, चीन, ईजिप्त, इराण, अफगाणिस्तान, आयर्लंड, डेन्मार्क, स्वीडन नॉर्वे, तुर्कस्तान, रूमानिया, यूगोस्लाव्हिया इ. देशांना १९६३ पासून लिनोलियमाची निर्यात होऊ लागली. भारतात लिनोलियमाचे उत्पादन १९५२ साली १,४६,००० मी, १९७१- ७२ साली १०, १४,००० मी. आणि १९७९-८० मध्ये १०, २०,००० मी. झाले.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India, Industrial Products, Part V,  New Delhi, 1960.

गोखले, श्री. पु. ठाकूर अ. ना.