गृहोपयोगी उपकरणे : स्नानाचे पाणी तापविणे, चहा-कॉफी वगैरे गरम पेये बनविणे, पावाचे तुकडे भाजणे, स्वयंपाकाचे साहित्य तयार करणे, अन्न शिजविणे, भांडी घासणे, कपडे धुणे, कपड्यांना इस्त्री करणे, केर काढणे अशी घरगुती कामे करताना उपयोगी पडणाऱ्या साधनांचा गृहोपयोगी उपकरणांत समावेश होतो.

आ. १. पाणी तापविण्याच्या बंबाचे दोन प्रकार : (१) थंड पाणी आत सोडण्याचे तोंड, (२) गरम पाणी बाहेर जाण्याचे तोंड, (३) विस्तवाची जागा, (४) धुराडे.

पाणी तापविण्याची उपकरणे : स्नानाचे पाणी तापविण्यासाठी भारतामध्ये अनेक ठिकाणी लाकडाच्या ढलप्या जाळून उष्णता उत्पन्न करणारे बंब वापरतात. अशा बंबांचे दोन प्रकार आ. १ मध्ये दाखविले आहेत. हे बंब पाण्याने भरल्यावर धुराड्याच्या तोंडातून लाकडाच्या ढलप्या आत टाकतात. त्या मधल्या नळातून खालच्या 

झाऱ्यावर पडतात. या ढलप्यांवर थोडे रॉकेल टाकून पेटविले म्हणजे ढलप्या पेटतात व त्यांचा जाळ मधल्या नळातून वर जातो. या नळाच्या बाहेरच्या बाजूला पाणी असते. नळातून वर जाणाऱ्या जाळामुळे नळ तापतो व ती उष्णता पाण्याला दिली जाते व पाणी तापते. दोन्ही प्रकारांत बंबात पाणी भरण्यासाठी झाकणात एक मोठे तोंड असते. गरम झालेले पाणी बाहेर काढण्यासाठी (अ) या प्रकारात बंबाच्या खालच्या बाजूस एक तोटी असते. या तोटीतून आतील सर्व पाणी बाहेर काढता येते. सर्व गरम पाणी बाहेर काढल्यावर बंबात पुन्हा थंड पाणी भरले नाही, तर उष्णता फुकट जाते व बंबाच्या पत्र्याचेही नुकसान होते. (आ) या प्रकारात गरम पाणी बाहेर काढण्यासाठी तोटी नसते, परंतु वळण दिलेली एक नळी असते. या नळीचे वरचे तोंड पाणी भरण्याच्या तोंडाच्या थोडे खाली ठेवलेले असते. थंड पाणी आत सोडले म्हणजे पाण्याची पातळी वाढते व गरम पाणी नळीतून बाहेर येते. या पद्धतीने जितके थंड पाणी आत टाकावे तितकेच गरम पाणी बाहेर पडते व बाकीचे गरम पाणी बंबात शिल्लक राहते आणि बंब रिकामा होत नाही. हे दोन्ही प्रकारचे बंब २० ते ८० लि. पाणी ठेवण्यासाठी बनवितात. आ. १ (अ) मध्ये दाखविलेला बंब तांब्याच्या पत्र्यापासून बनवितात, त्यामुळे तो गंजत नाही व कित्येक वर्षे चांगले काम देतो. याचे सांधे झाळ देऊन पक्के केलेले असतात. या बंबातील धुराड्यावर लहानशा लोखंडी पत्र्याचे झाकण ठेवले, तर ज्वाला मंद पडतात व इंधन खर्च कमी होतो. आ. १ (आ) मधील बंब जस्त चढविलेल्या लोखंडी पत्र्याचा किंवा पितळी पत्र्याचा बनवितात व त्यातील सांधे रिव्हेट करून जोडतात किंवा वितळजोड (वेल्डिंग) पद्धतीने जोडतात. आ. १ मध्ये दाखविलेल्या दोन्ही बंबांत इंधनातील बरीच उष्णता पाणी न तापविताच धुराड्यातून निघून जाते त्यामुळे जळणाचा खर्च वाढतो.

आ. २. कोक जाळण्याचा जलतापक : (१) थंड पाणी, (२) गरम पाणी, (३) विस्तव, (४) धुराडे.

ज्या देशात कोक (धूर उत्पन्न करणारे घटक काढून टाकलेला दगडी कोळसा) विपुल प्रमाणात व स्वस्त मिळतो, तेथे उत्तम क्षमतेचे लोखंडी जलतापक वापरतात. हे तापक बाहेरून कपाटासारखे दिसतात व अनेक आकारांत मिळतात. त्यातील बहुतेक प्रकारांत गरम पाण्याचे तापमान कायम ठेवण्यासाठी तापस्थापक (तापमान कायम ठेवण्याचे साधन) जोडलेला असतो. पाण्याचे तापमान कमी झाले म्हणजे तापस्थापक भट्टीमध्ये जास्त हवा येऊ देतो, त्यामुळे कोक चांगला पेटतो व पाण्याचे तापमान वाढू लागते. तापमान ठरावीक मर्यादेच्या वर गेले म्हणजे भट्टीकडे जाणारी हवा कमी केली जाते व विस्तव मंद होतो. कोक जाळण्याच्या जलतापकाचा एक प्रकार आ. २ मध्ये दाखविला आहे. अशाच प्रकारचे पण केरोसीन जाळणारे वातीचे स्टोव्ह असलेले जलतापक  मिळतात. ते बाहेरून साधारणतः आ. २ मध्ये दाखविलेल्या जलतापकासारखेच दिसतात. केरोसीन जाळणारे स्टोव्ह अगदी साध्या रचनेचे असतात आणि ते दररोज नीट साफ करून ठेवले, तर साध्या दिव्याप्रमाणे कित्येक दिवस चांगले काम करतात. यामध्ये एकदा तेल भरले म्हणजे दिवसभर पुरते. कोक जाळणाऱ्या तापकात कोकचे तुकडे २ – २ तासांनी पुन्हा घालावे लागतात व कोकची राख दिवसातून एकदा तरी काढावी लागते. दोन्ही प्रकारांतील जलतापकांना पाण्याचे नळ कायमचे जोडलेले असतात. घरातील वरच्या टाकीतून थंड पाणी एका नळाने तापकात येते व तेथे गरम झालेले पाणी दुसऱ्या नळाने घरातील निरनिराळ्या खोल्यांमध्ये जाते. हा तापक नेहमी पाण्याने भरलेला असतो. वरच्या टाकीतील पाण्याची पातळी सतत कायम राहण्यासाठी एक खास योजना केलेली असते. या प्रकारच्या तापकातील इंधन जळण्याचे काम उत्तम क्षमतेने होईल अशी रचना केलेली असते. त्यामुळे इंधनाचा खर्च कमी होतो. कोक जाळणाऱ्या तापकात कोक प्रथम पेटविताना पंखा वापरावा लागतो.

आ. ३.भिंतीवर बसविण्याचा वायू जाळणारा जलतापक : (१) थंड पाणी, (२) गरम पाणी, (३) इंधन वायू, (४) इंधन वायू नियंत्रक, (५) धुराडे.

वायू जाळणारा जलतापक : बऱ्याच शहरांत पाणी तापविण्यासाठी वायू जाळणे फायद्याचे होते. वायूचा उपयोग करणारे जलतापक भिंतीवर बसविता येतात व त्यांना पाण्याचे आणि वायूचे नळ कायमचे जोडता येतात. वायूच्या जलतापकाचा एक प्रकार आ. ३ मध्ये दाखविला आहे आणि त्याच्या आत बसविण्याचा ज्वालक (ज्यामधून इंधन वायू बाहेर येतो व लगेच पेट घेतो तो घटक) आ. ४ मध्ये मोठ्या आकारात दाखविला आहे. ज्वालकात येणारा वायू नियंत्रित करण्यासाठी एक मूठ बसविलेली असते, ती फिरवून वायूचा पुरवठा कमीजास्त करता येतो व त्यामुळे ज्वालकात उत्पन्न होणारी उष्णता कमीजास्त होते. या ज्वालकामध्ये बसविलेली आरंभक ज्योत अगदी सूक्ष्म वायूवर जळते आणि मुख्य वायूनियंत्रक झडप बंद केली, तरी ही ज्योत तेवतच राहते. त्यामुळे प्रत्येक वेळी तापक चालू करताना ज्वालक पेटवावा लागत नाही. वायूचा पुरवठा चालू केल्याबरोबर ज्वालककड्याच्या अनेक भोकांतून वायू बाहेर पडतो व तो आरंभक ज्योतीने पेटतो. वायूच्या ज्वलनासाठी लागणारी हवा खालच्या बाजूने वर येते व जळालेले वायू वरच्या धुराड्यातून बाहेर जातात. ज्वालकाच्या वर ज्वलनकक्ष (इंधनाचे ज्वलन पूर्ण करण्याची जागा) असतो व

आ. ४. जलतापकातील वायू ज्वालक : (१) वायू प्रवेशमुख, (२) वायू नियंत्रक, (३) आरंभक ज्योत, (४) ज्वालक कड्यातून निघणाऱ्या ज्वाला, (५) ज्वालक कडे, (६) ज्वलनकक्ष, (७) दोन धातूंची स्प्रिंग, (८) उष्णता विनिमयक, (९) थंड पाणी, (१०) गरम पाणी, (११) धुराडे, (१२) गरम पाणी नियंत्रक मूठ.

त्याच्यावर उष्णताविनियमक (गरम वायूतील उष्णता पाण्याला देणारा) भाग असतो. त्याच्या मदतीने ज्वलनाची बहुतेक सर्व उष्णता सभोवतालच्या पाणी भरलेल्या नळकांड्यात जाते व तेथील पाणी तापते. तापलेले पाणी वरच्या बाजूकडे चढते व बाहेर पडते. गरम पाण्याची तोटी उघडल्याशिवाय वायूज्वालक चालू होऊ नये म्हणून एक विशेष योजना बसविलेली असते. या योजनेत आत येणाऱ्या थंड पाण्याच्या दाबाने रबराचा एक पडदा वर उचलला जातो व त्यामुळे वायूची खालची झडप उघडते. पाण्याचा दाब नसेल तेव्हा वरच्या स्प्रिंगेने तो पडदा खाली येतो व खालची वायूझडप बंद होते. आरंभक ज्योतीने तापणारी एक तापस्थापक स्प्रिंग ज्वालकाच्या मध्यभागात बसविलेली असते. आरंभक ज्योत पेटलेली असली म्हणजे तापस्थापकाची स्प्रिंग तापते व तिचे वरचे टोक वाकून खाली येते आणि त्या टोकाला जोडलेली वायूची वरची झडप उघडते. आरंभक ज्योत विझली, तर तापस्थापक थंड होतो व त्याचे वरचे टोक वर जाते आणि वायूची वरची झडप बंद होते. त्यामुळे आरंभक ज्योत पेटल्याशिवाय बाहेरचा वायू ज्वालकात जाऊ शकत नाही. आरंभक ज्योत तेवत आहे किंवा नाही हे बाहेरून दिसण्यासाठी त्या ज्योतीच्या पातळीत एक लहानशी खिडकी ठेवलेली असते. या तापकामध्ये आतल्या बाजूवर काजळी साठते, ती ३-४ महिन्यांनी काढावी लागते. हे काम अवघड असते व ते वायु पुरवठा करणाऱ्या माणसाकडून करवून घेणे सोईचे होते.


विद्युत् जलतापक : (गिझर). पाणी तापविण्यासाठी विद्युत् शक्तीचा उपयोग करणारे पुष्कळ प्रकारचे 

आ. ५. विद्युत् शक्तीने तापणारा पाण्याचा बंब : (१) थंड पाणी, (२) गरम पाणी, (३) विद्युत् शक्ती, (४) तापस्थापक, (५) पाण्याची तोटी.

बंब मिळतात. लहान आकाराचे बंब भिंतीवर बसवितात व मोठे बंब टेबलाखाली ठेवतात. बंबाचा आकार ८ लिटरांपासून ५० लिटरांपर्यंत असतो व त्याकरिता १ ते ३ किवॉ. शक्ती वापरावी लागते. विद्युत् प्रवाह सुरू केल्यानंतर पाण्याचे तापमान ७० ते ८० से.पर्यंत वाढण्यास लहान बंबाला ४० ते ५० मिनिटे लागतात व मोठ्या बंबाला ६० ते ९० मिनिटे लागतात. या बंबात पाण्याच्या आतल्या भांड्याभोवती तापरोधक पदार्थाचे आवरण बसविलेले असते व त्याच्या बाहेरून शोभिवंत रंगाचे काचित (एनॅमल चढविलेले) कवच बसविलेले पोलादाचे आवरण असते. अशा बंबात चांगले तापलेले पाणी ४-५ तासपर्यंत चांगले गरम राहते. अशा बंबाचा एक मध्यम प्रकार आ. ५ मध्ये दाखविला आहे.

बंबातील पाणी तापविण्यासाठी पाण्यात बुडवून ठेवावयाचे नळीचे तापक घटक बनविलेले असतात. त्यामधील नळीच्या आत निकेलक्रोमाची बारीक तार मळसूत्री वेटोळी घालून ठेवलेली असते आणि त्या तारेभोवती अभ्रकाचे आवरण असते. त्यामुळे तापक तार बाहेरच्या नळीपासून विद्युत् दृष्ट्या अलिप्त राहते, परंतु तारेतील उष्णता अभ्रकातून नळीमध्ये जाते आणि नंतर नळीच्या बाहेरील पाण्यात शिरते. ही नळी उत्तम प्रकारे बंदिस्त केलेली असते. त्यामुळे बाहेरचे पाणी झिरपून नळीच्या आत जात नाही. पाण्याचे तापमान ७०°–८०° से. कायम ठेवण्यासाठी या तापकावर एक तापस्थापक जोडलेला असतो. पाण्याचे तापमान ७०°–८०° से. झाले म्हणजे तापस्थापकाच्या मदतीने विद्युत् प्रवाह आपोआप बंद होतो आणि तापमान थोडे उतरले, तर विद्युत् प्रवाह पुन्हा सुरू होतो.

आ. ६. पाण्यात बुडवून ठेवण्याच्या विद्युत् तापक घटकांचे काही प्रकार.

पाणी तापविण्यासाठी विद्युत् शक्तीचा उपयोग करणे हे पाणी तापविण्याच्या इतर पद्धतींपेक्षा महाग पडते. काही ठिकाणी पाणी तापविणे व अन्न शिजविणे अशा कामासाठी वापरावयाच्या विद्युत् शक्तीकरिता कमी केलेले दर आकारण्याची वहिवाट आहे. हे दर बरेच स्वस्त असले तर पाणी तापविण्यासाठी विद्युत्‌शक्तीचा उपयोग करणे फार सोईचे होते. लहान बंबात एकच तापक घटक वापरतात व मोठ्या बंबात वरच्या बाजूला एक व खालच्या भागात एक असे दोन तापक घटक बसवितात किंवा एकच दुहेरी स्वरूपाचा तापक घटक बसवितात. पाण्यात बुडवून ठेवावयाच्या तापक घटकांचे काही प्रकार आ. ६ मध्ये दाखविले आहेत.

आ. ७. पाणी तापविण्याची जोड पद्धत : (१) विद्युत् शक्तीने पाणी तापविणारा बंब, (२) विद्युत‌् तापक घटक, (३) विद्युत् शक्ती, (४) कोकच्या उष्णतेने पाणी तापविणारी भट्टी, (५) थंड पाण्याचा नळ, (६) गरम पाण्याचा नळ.

पाणी तापविण्याची जोड पद्धत : ज्या ठिकाणी विद्युत् शक्तीचा वापर करणे फार खर्चाचे होते तेथे पाणी तापविण्यासाठी दोन उपकरणे वापरतात. त्यांपैकी एका उपकरणात उष्णता उत्पन्न करण्यासाठी कोक जाळतात आणि त्या उपकरणातील भट्टीच्या वरच्या बाजूस लोखंडाचे एक बंदिस्त भांडे बसवितात. भट्टीमधील ज्वाला धुराड्याकडे जाताना या बंदिस्त भांड्यावरून जातात व त्यामुळे भांडे तापते. या उपकरणाला मदत करण्यासाठी म्हणून त्याच्या वरच्या मजल्यात विद्युत्‌शक्तीने तापणारा बंब बसवितात. या दोन्ही बंबांना थंड पाण्याचा पुरवठा करण्यासाठी घराच्या वरच्या मजल्यावर पाण्याची टाकी असते. या योजनेत कोकने तापलेले पाणी विद्युत् उपकरणात जाते व तेथे जरूर असल्यास आणखी तापते व नळातून घरातील निरनिराळ्या तोट्यांकडे जाते. ही जोड पद्धत आ. ७ मध्ये दाखविली आहे.

स्वयंपाकघरातील उपकरणे : स्वयंपाकाकरिता भाजी चिरणे, विविध पदार्थ कमीअधिक बारीक करणे, वाटणे, लाटणे, घुसळणे, कुटणे, तळणे, भाजणे इ. प्रक्रिया करण्यासाठी विविध उपकरणे वापरण्यात येतात.

आ. ८. भाजी चिरण्याची विळी

विळी : भाजीपाल्याचे पाहिजे त्या आकाराचे तुकडे करण्यासाठी पोलादी तीक्ष्ण पात्याची विळी हे एक उत्तम साधन आहे. हे साधन आ. ८ मध्ये दाखविले आहे. या विळीचे पाते २०–२५ सेंमी. लांब, ३–५ सेंमी. रुंद व २ मिमी. जाड असते व ते थोडेसे गोलाकार वाकविलेले असते. पात्याच्या एका टोकाला खीळ घालण्यासाठी एक भोक असते. ते टोक एका लहानशा लाकडी पाटाच्या टोकाजवळ बसविलेल्या लोखंडी बिजागरीत सैलसा रिव्हेट मारून कायमचे गुंतविलेले असते. पात्याच्या दुसऱ्या टोकावर पात्यावर काटकोन करील अशा बेताने अनेक बारीक तीक्ष्ण दातांची एक गोल चकती घडविलेली असते. या चकतीच्या साहाय्याने ओल्या नारळातील गर खोवून काढता येतो. पात्याच्या वरच्या बाजूवर तीक्ष्ण धार काढलेली असते. भाजी चिरण्याचे काम संपल्यावर या विळीचे पाते वळवून पाटावर ठेवता येते व मग सबंध विळी फिरवून ती भिंतीजवळ सुरक्षितपणे ठेवता येते. भाजी चिरताना साले, देठ व किडके भाग वेगळे काढावे लागतात व चिरलेला प्रत्येक भाग तपासून पहावा लागतो. त्यामुळे भाजी चिरण्याचे काम हातानेच करणे सोईचे होते. भाजी चिरण्यासाठी विळीऐवजी सुरी किंवा मोठा चाकूही वापरतात.


किसणी : खोबरे, मुळा व गाजर यांसारख्या भाज्या किसण्यासाठी पोलादी पत्र्यापासून बनविलेली 

आ. ९. किसण्यांचे प्रकार

किसणी हे एक चांगले साधन आहे. किसण्यांचे काही प्रकार आ. ९ मध्ये दाखविले आहेत. बटाट्याचे करवती खाचांचे काप करण्यासाठी चपट्या चौकोनी रुंद करवती काठ असलेल्या भोकांच्या किसण्या मिळतात. प्रत्येक किसणीला चार पाय असतात व त्यांवर जोडलेला एक पोलादी पत्रा असतो. त्या पत्र्यावर बारीक त्रिकोणी किंवा रुंद चौकोनी छेदांची तीक्ष्ण तोंडे पाडलेली असतात. या तीक्ष्ण तोंडांवरून खोबऱ्याची वाटी किंवा बटाटा दाबून पुढे सरकविला म्हणजे त्याचे लहान तुकडे होऊन पत्र्याच्या खाली पडतात.

कच्च्या आंब्याची साल काढण्यासाठी काही लोक मध्यभाग घासून भोक पाडलेली मोठी शिंप वापरतात. फळभाज्यांची साले काढण्यासाठी विशेष प्रकारची धातूची न गंजणारी उपकरणेही मिळतात. त्यांचा उपयोग केला, तर साल काढण्याचे काम फार लवकर व उत्तम प्रकारे करता येते.

आ. १०. मोठ्या वस्तूचे बारीक तुकडे करण्याची साधने : (अ) लोखंडी खलबत्ता (आ) उखळ व मुसळ : (१) दगडात खोदून काढलेले उखळ, (२) मुसळ (इ) पाटा आणि वरवंटा.

बारीक तुकडे करण्याची साधने : भुईमुगाच्या दाण्यासारख्या बियांची पूड करण्यासाठी लोखंडी खलबत्ता वापरतात. मसाल्याचे कठीण पदार्थ कुटण्यासाठी उखळ व मुसळ वापरतात. निरनिराळे मऊ खाद्यपदार्थ मिसळून त्यांची बारीक चटणी करण्यासाठी दगडाचा पाटा व वरवंटा हे एक चांगले साधन आहे. बारीक तुकडे करण्याची ही साधने आ. १० मध्ये दाखविली आहेत.

किरकोळ उपकरणे : स्वयंपाकघरात चाळणी, सूप, पोळपाट, लाटणे, तवा, कढई, उलथणे, झारा, पळी, चिमटा, गाळणे अशी अनेक उपकरणे लागतात. त्यांतील काही उपकरणे आ. ११ मध्ये दाखविली आहेत.

आ.११. स्वयंपाकघरातील नित्य उपकरणे : (१) उलथणे, (२) झारा, (३) पळी, (४) चिमटा, (५) सांडशी, (६) तवा, (७) कढई, (८) लाटणे, (९) पोळपाट, (१०) चपटी कढई, (११) चकली पात्र.

आ.१३. विद्युत् शक्तीने फिरणाऱ्या रव्यांचे प्रकार. आ. १४. घुसळकाम करणारे जोडयंत्र (मिक्सर-कम ग्राइंडर).

रवी : दही घुसळून ताक करण्यासाठी आणि त्यातून लोणी वेगळे काढण्यासाठी लाकडी रवी वापरतात. रवीचा एक प्रकार आ. १२ मध्ये दाखविला आहे. या रवीचा घुसळण्याचा भाग गोलाकार असतो व त्यावर त्रिकोणी छेदाच्या खोलगट खाचा पाडलेल्या असतात. हा भाग फिरविण्यासाठी त्याला एक दांडा जोडलेला असतो. रवीचा गोलाकार भाग दह्याच्या आत बुडवून वरचा दांडा उलटसुलट दिशेने जोरात फिरविला म्हणजे दही घुसळले जाते व त्यातील लोणी वेगळे होऊन ताकाच्या पृष्ठभागावर जमा होऊ लागते. थोड्या ताकासाठी रवीचा दांडा दोन्ही हातांच्या तळव्यांत धरून उलटसुलट फिरवितात. परंतु मोठ्या भांड्यातील दही घुसळण्यासाठी आ. १२ मध्ये दाखविल्याप्रमाणे रवीचा दांडा खांबाला बांधलेल्या दोन दोरांच्या फाशांत अडकवून ठेवतात व फाशांच्या मधल्या जागेत एका दोरीचे २-३ वळसे देऊन त्या दोरीची टोके दोन्ही हातांत धरतात आणि आलटून पालटून ओढतात व सोडतात. हाताने दही घुसळण्याकरिता बरीच अंगमेहनत करावी लागते व त्यासाठी बराच वेळही खर्च करावा लागतो. त्यामुळे शक्य असेल तेथे विद्युत् शक्तीने घुसळकाम करणारे यंत्र वापरणे सोईचे असते. विद्युत् चलित्राने (मोटरने) फिरणारी घुसळकामाची काही यंत्रे आ. १३ मध्ये दाखविली आहेत व आ.१४ मध्ये घुसळकाम आणि इतर काही कामे करणारे एक जोडयंत्र दाखविले आहे. आ. १४ मध्ये दाखविलेल्या उपकरणात वेगवेगळ्या कामाप्रमाणे दोन पात्रे बसविता येतात. मिश्रणपात्र बसविले, तर त्यामधील फिरणाऱ्या रवीने दही घुसळता येते. मिश्रणपात्र काढून दळणपात्र बसविले तर त्यामध्ये कॉफी बिया, मसाले, मीठ, दाणे अशा पदार्थांची पूड करून घेता येते. या उपकरणातील चलित्राची शक्ती /१० अश्वशक्ती असते. त्याचा वेग १०,००० फेरे/मिनिट असतो. त्यामुळे हे उपकरण लवकर तापते व एकावेळी दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालविता येत नाही. दोन मिनिटे चालवून ते थांबवितात आणि थोड्या वेळाने चांगले थंड झाले म्हणजे पुन्हा सुरू करतात.


दळणकाम करण्याची हात यंत्रे : दाण्याची वा तत्सम पदार्थांची पूड करण्यासाठी हाताने फिरविण्याची 

आ. १५. लहान दळण काम करण्याची हात यंत्रे.

अनेक प्रकारची यंत्रे मिळतात. ही यंत्रे टेबलावर घट्ट बसविता येतात. अशा यंत्रात वरच्या तोंडातून दाणे आत टाकल्यावर त्या तोंडात एक लाकडी बूच दाबून धरतात व यंत्राचा दांडा फिरवितात. त्यामुळे आतले किसणीचे चाक फिरविले जाऊन दाण्याची पूड होते व ती बाजूच्या तोंडाने बाहेर पडते. या प्रकारची काही यंत्रे आ. १५ मध्ये दाखविली आहेत.

किटली : आ.१६ मध्ये विद्युत् शक्तीने तापणारी चहा तयार करण्याची किटली दाखवली आहे. या किटलीच्या तळाखाली विद्युत् तापक घटक बसविलेले असतात. या तापक घटकांतील संवाहक तारांभोवती चिनी मातीच्या मण्यांचे किंवा अभ्रकाचे आवरण बसविलेले असते. त्यामुळे विद्युत् संवाहक आणि किटलीचा धातूचा भाग विद्युत् दृष्ट्या अगदी अलिप्त राहतात, त्यामुळे प्रवाह चालू असताना

आ. १६. विद्युत् शक्तीने तापणारी किटली.

किटलीला हात लागला, तरी विजेचा धक्का बसण्याची शक्यता नसते. या किटलीसाठी ७५० वॉट शक्ती लागते. किटलीच्या तापक घटकांच्या मंडलात एक संरक्षक साधन गोवलेले असते. किटलीमध्ये पाणी नसताना विद्युत् प्रवाह चालू केला तर किंवा किटलीतील पाणी उकळून संपले, तर विद्युत् मंडल आपोआप खंडित होते आणि किटलीचे नुकसान होऊ शकत नाही.

कॉफीचे पेय तयार करण्यासाठी वेगळ्या प्रकारची उपकरणे उपलब्ध आहेत. त्यांपैकी एक प्रकार आ. १७ मध्ये दाखविला आहे. कॉफीपात्रांच्या तळाखाली चहाच्या किटलीप्रमाणेच पाणी तापविणारे तापक 

आ. १७. विद्युत् शक्तीने गरम होणारे कॉफीपात्र.

घटक बसविलेले असतात. या पात्राच्या वरच्या बाजूस कॉफीची पूड ठेवण्याचे गाळणीपात्र असते. त्या पात्राचा खालचा भाग पाण्यात बुडलेला असतो त्यामुळे खालचे पाणी तापले म्हणजे पाण्याची वाफ गाळणीपात्रातील कॉफीमध्ये शिरते व कॉफीतील अर्क वाफेबरोबर बाहेर येऊन खालच्या पाण्यात मिसळतो परंतु कॉफीचा गाळ गाळणीपात्रातच अडकून राहतो. पाहिजे तितके पाणी भरून व कॉफी घालून झाकण ठेवल्यावर या उपकरणाचा विद्युत् प्रवाह चालू करतात व नंतर १५ मिनिटे झाल्यावर पात्राच्या खालच्या बाजूस असलेल्या तोटीतून गरम कॉफीपेय पेल्यात काढून घेतात. पात्रात तयार झालेले कॉफीपेय तेथेच बराच वेळ ठेवावयाचे असेल, तर पेयाचे तापमान ८० से. ठेवण्याची विशेष योजना केलेली असते. या योजनेत विजेचा प्रवाह मधूनमधून आपोआप चालू होतो व थोड्या वेळाने बंद होतो. त्याकरिता मुद्दाम लक्ष द्यावे लागत नाही. ही कॉफीपात्रे साधारणतः ४ ते ८ कप पेयासाठी बनविलेली असतात. त्यांना ५०० ते ७५० वॉट शक्ती लागते.

दूध तापविण्याचे पात्र : (मिल्क कुकर). दूध तापविण्यासाठी विशेष प्रकारची पात्रे मिळतात. त्यातील दूध ठेवण्याच्या मुख्य पात्राभोवती पाणी ठेवण्याचे आवरणपात्र असते. मुख्य पात्रात दूध भरण्यापूर्वी बाहेरच्या आवरणात थोडे पाणी भरतात आणि मग ते पात्र चुलीवर ठेवतात. चुलीतील उष्णतेने पात्रातील पाणी तापू लागते व त्यातील उष्णतेने दूध तापते. दूध फार तापून उतू जाण्यापूर्वीच पाण्याचे तापमान बरेच वाढून त्यातून वाफ निवू लागते आणि पात्रातून वाफेचा शिट्टीसारखा आवाज येऊ लागतो. हा आवाज येऊ लागल्यावर दूधपात्र चुलीवरून खाली काढले, तर दूध उतू जाऊन बाहेर सांडण्याची धास्ती राहत नाही.

अन्न शिजविण्याचे दाबपात्र : कोणतेही अन्न शिजविण्यासाठी उघडे किंवा ताटलीसारखे साधे झाकण ठेवलेले भांडे वापरले, तर पाणी उकळत असताना पाण्याचा दाब बाहेरच्या दाबाइतकाच कायम राहतो आणि पाण्याची बरीचशी वाफ हवेत निघून जाते व तिच्याबरोबर बरीच उष्णताही फुकट जाते. अन्न 

आ. १८. अन्न शिजविण्याचे दाबपात्र : (१) सुरक्षा झडप, (२) जादा सुरक्षा झडप, (३) झाकण, (४) रबरी कडे, (५) शिजवावयाचे पदार्थ ठेवण्याचे भांडे, (६) बाहेरचे भांडे.

शिजविण्यासाठी झाकण पक्के बसविता येईल असा डबा वापरला, तर आतील वाफ बाहेर जात नाही व आतल्या वाफेचा दाब वाढू लागतो व त्याबरोबरच पाण्याचे तापमानही वाढते. या दोन्ही क्रियांमुळे अन्न लवकर शिजते व इंधनाचा खर्च कमी होतो. बंद केलेल्या डब्यामध्ये आतील वाफेचा दाब किती वाढू द्यावा हे डब्याच्या मजबुतीवर अवलंबून असते, परंतु आतील दाबावर चांगले नियंत्रण करता आले नाही, तर एखादेवेळी आतला दाब फार वाढून डबा फुटण्याची भीती असते. असे होऊ नये म्हणून बाजारात मिळणाऱ्या दाबपात्रामध्ये १ किग्रॅ./सेंमी. पर्यंत दाब ठेवता यावा अशा रीतीने सुरक्षा झडप बसवितात. आतील वाफ बाहेर पडू नये म्हणून झाकण बसविण्याच्या पृष्ठावरील खाचेत रबराचे गोल कडे (गास्केट) बसवितात व झाकण घट्ट दाबून बसविता येईल अशी योजना करतात. साधारणतः आतील वाफेच्या दाबानेच झाकण घट्ट बसावे अशी रचना केलेली असते. याकरिता झाकण काही दाबपात्रांत आतल्या बाजूने आणि काहींत बाहेरच्या बाजूने बसवावे लागते. आत बसवावयाचे झाकण गोलाकार न करता लंबगोलाकार करतात आणि ते तोंडाच्या आत घातल्यावर ९०फिरवून बसविले म्हणजे किंवा बाहेरच्या बाजूने बसवावयाचे झाकण विशिष्ट खुणेपर्यंत फिरवून बसविले म्हणजे ते योग्य जागी जाऊन बसते. दाबपात्रात सुरुवातीला जरूर तितके पाणी भरतात. नंतर निरनिराळे अन्नपदार्थ व जरूर तितके पाणी घातलेली भांडी आत ठेवतात व झाकण बंद करतात. हे पात्र विस्तवावर ठेवले म्हणजे त्यातील पाणी उकळू लागते व पाण्याची वाफ आतल्या आतच अडकून राहते आणि तिचे तापमान व दाब वाढतो. त्यामुळे आतील अन्नपदार्थ चुलीवर ठेवल्यापासून साधारण १५ मिनिटांतच चांगले शिजतात. पात्रामध्ये वाफेचा दाब फार वाढला, तर झाकणात बसविलेली सुरक्षा झडप आपोआप उघडते व काही वाफ बाहेर निघून जाऊन आतील वाफेचा दाब कमी होतो आणि सुरक्षा झडप आपोआप बंद होते. त्यामुळे दाबपात्रामध्ये पाणी उकळत असताना आतील दाब बाहेरच्या दाबापेक्षा थोडा जास्त राहतो, परंतु पात्राला इजा होईल इतका जास्त होत नाही. सुरक्षा झडप काही कारणाने न उघडल्यास किंवा उष्णतेने पात्रातील पाणी संपल्यास जादा संरक्षण मिळण्यासाठी वितळणारी एक जादा झडप झाकणात बसविलेली असते. ही दाबपात्रे लहान, मध्यम व मोठे अशा तीन आकारमानांची मिळतात. ही पात्रे ॲल्युमिनियमाच्या मिश्रधातूची किंवा अगंज पोलादापासून बनविलेली असतात व दिसण्यास सुबक असतात. दाबपात्राचा एक प्रकार आ. १८ मध्ये दाखविला आहे.


चुलासंच : स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी अनेक प्रकारच्या चुली आणि शेगड्या मिळतात. त्यांमध्ये उष्णता उत्पन्न करण्यासाठी लाकडे, ढलप्या, लोणारी कोळसा, कोकचे तुकडे जाळतात किंवा 

आ. १९. विद्युत् चुलासंचाचे दोन प्रकार

केरोसीन जाळणारे ज्वालक, वायू जाळणारे ज्वालक वा विद्युत् शक्तीने तापणारे तापक घटक बसविता येतात. उभे राहून स्वयंपाक करण्यासाठी बनविलेला चुलासंच ७५ सेंमी. उंच असतो आणि साधारणतः कपाटासारखा दिसतो. त्याच्या वरच्या बाजूवर दोन जाळ्या व दोन तवे बसविलेले असतात व त्यांच्या खाली तापक घटक ठेवलेले असतात. विद्युत् चुलासंचांचे दोन प्रकार आ. १९ मध्ये दाखविले आहेत. बहुतेक चुलासंचांच्या बाहेरच्या बाजूवर एनॅमल बसविलेले असते व आतल्या बाजूवर उष्णता निरोधनासाठी चिनी मातीचे अस्तर बसविलेले असते. पुढची दारे उघडताच दिसणारे आतले कप्पे तापक घटकांनी वेढलेले असतात. काही प्रकारांत वरच्या बाजूवर गरम तव्याखेरीज उभट भांडी मावतील अशा एकदोन खोलगट जागा असतात. त्यांमध्ये उकळविण्याच्या वस्तू भरलेली भांडी ठेवतात. विद्युत् शक्तीवर चालणाऱ्या बहुतेक सर्व चुलासंचांवर नियंत्रक स्विचाला पाच स्थाने असतात. त्यांच्या अवस्थेनुसार अतिउच्च, उच्च, मंद, मंदतर व कोमट अशा पाच तापमान पातळ्या राखता येतात. १५ सेंमी. व्यासाच्या शिजविण्याच्या घटकामध्ये या पाच तापमानांसाठी अनुक्रमे सु. १२००,

आ. २०. वायू जाळणाऱ्या चुलासंचाचे दोन प्रकार.

६००, ४००, २०० व १२५ वॉट विद्युत् शक्ती वापरली जाते. जाळीच्या आणि तव्याच्या घटकांसाठी देखील अशीच पाच तापमान पातळ्यांची व्यवस्था करता येते. या चुलासंचातील तापस्थापक व कालनियामक (क्रियेला लागणाऱ्या कालावधीचे नियंत्रण करणाऱ्या) साधनामुळे क्रमाक्रमाने भिन्नभिन्न तापमान पातळ्या स्वयंचलित पद्धतीने राखता येतात. या चुलासंचांच्या दर्शनी भागावर भिन्नभिन्न तापमान दर्शविणारे रंगीत दिवे बसविलेले असतात. चुलासंचाचे दार उघडल्याबरोबर आतल्या खणातील दिवे लागतात. असा चुलासंच फरशीवर ठेवताना चांगला समपातळीत राहील अशी काळजी घ्यावी लागते. चुल्याचे तापक घटक सफाईसाठी बाहेर काढले, तर ते पुन्हा बसविताना पहिल्या जागीच बसतील याबद्दल खबरदारी घ्यावी लागते.

वायू जाळणारे मोठे चुलासंच साधारणतः विद्युत् शक्तीवर चालणाऱ्या चुलासंचासारखेच दिसतात. परंतु या प्रकारात गरम तव्याऐवजी जाळीदार तबकड्या बसवितात. या तबकड्यांतील भोकांतून त्यांच्या खाली जळत असलेली ज्योत दिसते व त्या ज्योतीचे तापमान सहज नियंत्रित करता येते. या चुलासंचातील ज्वलन कक्षात एक तापस्थापक बसविलेला असतो. त्याच्या मदतीने एकदा पुरेसे वाढलेले तापमान सतत कायम ठेवले जाते. प्रत्येक जाळीच्या तबकडीकरिता एक स्वतंत्र ज्वालक बसवितात. काही संचांत त्यांच्या दारावर उष्णतारोधक काचेची मोठी खिडकी असते व

आ. २१. दाबपात्रातून मिळणाऱ्या वायूवर चालणारा चुलासंच : (१) वायू नियंत्रक, (२) ज्वालक, (३) वायू भरलेले दाबपात्र.

तीमधून संचाच्या आतल्या कप्प्यात भाजण्यासाठी ठेवलेल्या पदार्थांची स्थिती दार न उघडताच दिसते. 

वायू जाळणाऱ्या मोठ्या चुलासंचांचे दोन प्रकार आ. २० मध्ये दाखविले आहेत आणि दाबपात्रातून मिळणाऱ्या वायूवर चालणाऱ्या चुलासंचाचा अगदी साधारण प्रकार आ. २१ मध्ये दाखविला आहे. आ. २१ मधील चुलासंचासाठी पोलादी दाबपात्रात भरलेला द्रवरूप वायू वापरतात. हा संच सहज उचलून वाटेल तेथे नेता येतो. 

वायू जाळणाऱ्या चुलीमध्ये वायू पेटविण्यासाठी साधी आगकाडी वापरता येते, परंतु साध्या आगकाडीऐवजी विद्युत् प्रवाहाने गरम होणारे किंवा घर्षणाने ठिणग्या पाडणारे ज्योतआरंभक वापरणे सोईचे असते. 

रॉकेलवर चालणाऱ्या वातीचे स्टोव्ह असलेले चुलासंच साधारणतः वायू चुलासंचासारखेच दिसतात. 

आ. २२. कोक किंवा ढलप्या जाळण्याचा चुलासंच : (१) भट्टी, (२) धुराडे, (३) गरम तवा, (४) अन्न शिजविण्याची भांडी ठेवण्याची खोलगट जागा.

या दोन्ही प्रकारांत धुराडे बसविणे अगदी जरुरीचे नसले तरी श्रेयस्कर असते. त्यामुळे ज्योतीमधून निघणारे सर्व वायू परस्पर घराबाहेर जातात व घरातील वातावरण स्वच्छ राहते. 

कोक किंवा ढलप्या जाळण्याचा चुलासंच आ. २२ मध्ये दाखविला आहे. या संचात पाणी तापविण्यासाठी एक स्वतंत्र जागा असते. अन्न शिजविण्याचे काम चालू असतानाच पाणीही तापते व शिजवणे संपल्यावर तापलेले पाणी चार-पाच तासांपर्यंत चांगले गरम राहते. अशा संचावर धुराडे बसवावे लागते व भट्टीमध्ये इंधनाचे तुकडे एकएक तासानंतर टाकावे लागतात.


अवरक्त (वर्णपटातील तांबड्या रंगाच्या अलीकडील अदृश्य) किरणांचा उपयोग करून उष्णता उत्पन्न 

आ. २३. अवरक्त किरणांचा उपयोग करणारा तापक : (१) विद्युत्‌ शक्ती, (२) तबके.

करणारा तापक आ. २३ मध्ये दाखविला आहे. यामध्ये बिजागरीवर वळविता येणारी दोन तबके असतात. ही तबके जरूर तितकी जागा सोडून एकावर एक अशी बसविता येतात. ही दोन्ही तबके दोन पत्रे जोडून पोकळ केलेली असतात व त्या पोकळीत विद्युत् तापक घटक ठेवलेले असतात. खालच्या तबकावर भाकरीसारखा भाजावयाचा जिन्नस ठेवतात आणि त्यावर वरचे तबक बसवितात. दोन्ही तबके तापली म्हणजे त्यांमधून अवरक्त किरण बाहेर येतात आणि मधल्या जागेतील वस्तू भाजली जाते. 

विद्युत् शेगडी आणि रॉकेलचा स्टोव्ह : घरातील निरनिराळ्या जागी सहज नेता येईल असे हे विद्युत् तापक साधन आहे. त्याचा एक प्रकार आ. २४ मध्ये दाखविला आहे. ही शेगडी

आ. २४. विद्युत् शेगडी

चहा-कॉफीसारखी गरम पेये तयार करण्यासाठी आणि दूध तापविण्यासाठी विशेष उपयोगी पडते. 

रॉकेलवर चालणारा साधा तापक म्हणजे हातपंपाचा स्टोव्ह होय. याचा एक प्रकार आ. २५ मध्ये दाखविला आहे. या स्टोव्हच्या खालच्या बाजूला रॉकेल भरण्याची टाकी असते व तेल घालण्याचे तोंड पक्के बंदिस्त करण्यासाठी एक फिरकी झाकण असते. या झाकणाजवळच टाकीतील हवेचा दाब कमी करण्यासाठी एक मळसूत्री झडप असते. ती थोडी उघडून पुन्हा बंद केली, तर ज्वालकातून निघणारी ज्योत मंद होते व

आ. २५. रॉकेलवर चालणारा हातपंपाचा स्टोव्ह : (१) रॉकेल भरण्याचे तोंड, (२) हवा भरण्याचा पंप, (३) ज्वालक.

ती झडप कायम उघडली तर टाकीतील सर्व हवा बाहेर जाते व ज्योत विझते. टाकीमधील रॉकेल ज्वालकाकडे नेण्यासाठी मध्यभागी एक नळी असते. हातपंपाने टाकीमध्ये हवा भरली म्हणजे ती हवा रॉकेलच्या वरच्या भागात जमा होते व रॉकेलला खाली दाबते. वरून दाब पडलेले रॉकेल मधल्या नळीत शिरते व ते ज्वालकाच्या पोकळ गरम झालेल्या भागातून जाताना वायुरूप होते व तो वायू एका बारीक छिद्रातून वर उडतो. टाकीमध्ये हवेचा दाब पुरेसा असेल, तर टाकीतील सर्व रॉकेल बाहेर येईपर्यंत बारीक छिद्रातून वायू बाहेर पडत राहतो. 

आ. २६. रॉकेलचा वातीचा स्टोव्ह : (१) रॉकेल ठेवण्याचे भांडे, (२) वात, (३) ज्वालकातील बाहेरील पत्र्याची जाळी, (४) वाती वर-खाली करणारा ज्वाला नियंत्रक.

हा स्टोव्ह गरम पेये तयार करण्यासाठी, दूध तापविण्यासाठी व किरकोळ तळणकाम करण्यासाठी फार सोईचे साधन आहे. स्टोव्ह सुरू करताना प्रथम त्यामध्ये भरपूर रॉकेल भरतात व तोंड घट्ट बंद करतात. स्टोव्हचे काम सुरू होण्यापूर्वी स्टोव्हचा ज्वालक गरम करावा लागतो. याकरिता ज्वालकाच्या खाली बसविलेल्या वाटीत स्पिरिट घालून ते पेटवितात. स्पिरिट पेटले म्हणजे ज्वालकाच्या सर्व बाजूने स्पिरिटाचा जाळ सुरू होतो व ज्वालक लगेच चांगला तापतो. स्पिरिट जळण्याचे संपत आल्यावर टाकीत हातपंपाने हवा भरली म्हणजे टाकीतील रॉकेल मधल्या नळीने वर जाते व छिद्रातून बाहेर येणारा वायू पेट घेतो व ज्वालकाच्या सर्व बाजूने फिकट निळसर रंगाच्या ज्वाला वर येतात. या वेळी ज्वालकातून एक विशिष्ट आवाज येतो. त्यावरून स्टोव्ह चालू आहे, हे जवळच्या लोकांना सहज समजते. हा आवाज कमी करण्यासाठी ज्वालकावर बसविण्याची एक धातूची जाळीदार टोपी मिळते. पंपाचा स्टोव्ह नियमितपणे साफ करून ठेवला तर कित्येक वर्षे चांगले काम देतो. ज्वालकामधील तेल बाहेर पडण्याचे छिद्र फार बारीक असते, त्यामधील घाण काढण्यासाठी एक बारीक पोलादी तारेची टोचणी (पिन) मिळते. हे छिद्र टोचणीने नेहमी साफ ठेवावे लागते. 

साधारणतः पंपाच्या स्टोव्हसारखेच दिसणारे पण हवेचा पंप नसलेले वातीचे स्टोव्ह मिळतात. काही प्रकारात ज्वालक भागात गोल दोरीच्या अनेक लहानलहान वाती बसविलेल्या असतात व त्यांच्या दोन्ही बाजूंना बारीक छिद्रे पाडलेल्या पत्र्याच्या दोन जाळ्या एकाबाहेर एक अशा ठेवतात. त्यामुळे वाती संथपणे जळतात आणि धूररहित निळसर ज्वाला वर येतात. दिव्याच्या वातीप्रमाणेच त्यांची ज्योत कमीजास्त करता येते. काही प्रकारांत एकच मोठी चपटी वात गोल खाचेत बसविलेली असते व तिच्याकडे जाणारे तेल एका स्क्रूने नियंत्रित करता येते. या प्रकारच्या स्टोव्हमध्ये एकदम बिघाड होण्याची भीती नसते त्यामुळे तो सर्वांना सहज वापरता येतो, परंतु हवेच्या पंपाच्या स्टोव्हपेक्षा याची क्षमता कमी असते व यात इंधनाचा खर्चही थोडा जास्त होतो. या प्रकारचा एक स्टोव्ह आ. २६ मध्ये दाखविला आहे. 

आ. २७. गरम कपाट

इतर विद्युत् उपकरणे : विजेच्या शक्तीने गरम राहणारे कपाट आ. २७ मध्ये दाखविले आहे. याचा उपयोग शिजवून तयार केलेले पदार्थ जसेच्या तसे गरम ठेवण्यासाठी होतो. आ. २८ मध्ये विजेच्या शक्तीने तापणारे तापक पीप दाखविले आहे. हे उपकरण मुख्यतः पातळ पदार्थ भरून ठेवण्यासाठी वापरतात. विजेची गरम उशी हे उपकरण या प्रकारातीलच आहे. तयार केलेल्या पदार्थांचे भांडे गरम उशीवर ठेवतात किंवा गरम उशीच भांड्यांभोवती गुंडाळतात. या गरम उश्या अंगाला शेक देण्यासाठीही उपयोगी पडतात. या उश्यांमध्ये जाणारा विद्युत् प्रवाह रोहित्राच्या (विद्युत् दाब बदलणाऱ्या साधनाच्या) मदतीने कमी केलेल्या दाबाचा (२५ ते ३० व्होल्टचा) असतो. त्यामुळे उशीतील तापक तारेचा चुकून स्पर्श झाला तरी झटका बसत नाही. 

आ. २८. तापक पीप

विद्युत् उकळपात्र हे उपकरण लहान कपाटासारखे दिसते. या कपाटाच्या भिंती निर्वात जागेचे वेष्टन असलेल्या बाटलीच्या (थर्मासच्या) तत्त्वाप्रमाणेच दुहेरी केलेल्या असतात आणि विद्युत् मंडलाची रचना रोहित्रासारखी असते. पदार्थ शिजविण्याचे भांडे रोहित्राच्या द्वितीयक गुंडाळीसारखे काम करते. प्रवर्तित आवर्ती प्रवाहामुळे (चुंबकीय क्षेत्राच्या बदलामुळे उत्पन्न होणाऱ्या उलटसुलट दिशेत वाहणाऱ्या प्रवाहामुळे) ते भांडे तापते व त्यातील पदार्थ उकळला जातो. या उपकरणाला जोडलेल्या तापस्थापकामुळे भांड्याचे तापमान पाहिजे तसे ठेवता येते.

  

पावाचे काप भाजणारी शेगडी (टोस्टर) हे विद्युत् शक्तीवर चालणारे उपकरण आहे. याची रचना आ. २९ मध्ये दाखविली आहे. यामध्ये पावाचे काप ठेवले व स्विच चालू केला म्हणजे अगदी थोड्या वेळात ते खरपूस भाजून मिळतात. प्रत्येक काप ठेवण्याच्या जागेभोवती तापक घटक बसविलेले असतात. स्विच चालू झाल्यानंतर एक ठरावीक तापमान विशिष्ट काळापर्यंतच राहू दिले जाते व नंतर तापस्थापकाच्या साहाय्याने विद्युत् प्रवाह आपोआप खंडित होतो आणि भाजलेले पावाचे काप वर उचलून धरले जातात. 


थर्मास : गरम केलेला चहा किंवा इतर पेये काही काळ गरम ठेवण्यासाठी किंवा थंड पदार्थ थंड

आ. २९. पावाचे काप भाजण्याची विद्युत् शेगडी.

ठेवण्यासाठी थर्मासचा उपयोग करतात. थर्मासचा एक प्रकार आ. ३० मध्ये दाखविला आहे. यामध्ये आतल्या बाटलीच्या बाहेरून निर्वात करता येईल अशी जागा सोडून दुसऱ्या बाटलीचा भाग बसविलेला असतो. आतल्या बाटलीमधील पेयाच्या उष्णतेने आतली बाटली तापते परंतु ती उष्णता निर्वातामधून बाहेर जाऊ शकत नाही, तसेच या बाटलीचा आतील पृष्ठभाग चकचकीत केलेला असतो त्यामुळे उष्णता आतल्या आतच राहते [ → थर्मास].  

आ. ३०. थर्मास : (१) दुहेरी पृष्ठाची काचेची बाटली, (२) बाटली ठेवण्याचा बाहेरचा पत्र्याचा डबा, (३) दोन पृष्ठांमधील निर्वात जागा, (४) आधार बूच, (५) काचेच्या दोन पृष्ठांमधील जागा निर्वात करण्याचे बंद केलेले तोंड, (६) झाकण.

किरकोळ साहाय्यक उपकरणे : नवीन धर्तीच्या स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्याच्या टेबलावर चुली ठेवतात. टेबलाच्या खालच्या भागात इंधन वायूचे दाबपात्र व स्वयंपाकाला लागणारी सर्व भांडी ठेवण्याचे कप्पे असतात. टेबलाच्या एका बाजूला हात धुण्याची जागा असते, त्यामुळे लहान घरात जमिनीवरची फारशी जागा अडून राहत नाही व स्वयंपाक करणाऱ्याला फार हिंडावे लागत नाही. अशा घरात बहुतेक सर्व भांडी, ताटे व कपबश्या ठेवण्याकरिता भिंतीवर बसविण्याची उघडी कपाटे असतात. स्वयंपाकाला लागणारे साहित्य वजन करण्यासाठी अनेक प्रकारचे तराजू मिळतात. त्यातील काही प्रकार टांगता येतात व काही प्रकार टेबलावर ठेवता येतात. 

रॉकेलचा उपयोग करण्यासाठी रॉकेलचा लहान पंप व नरसाळे असली तर फार उपयोगी पडतात.

  

मोरी स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारचे ब्रश मिळतात आणि घरातील कचरा काढण्यासाठी अनेक प्रकारच्या केरसुण्या मिळतात [→ झाडू व ब्रश]. 

घरातील कपडे टांगून ठेवण्यासाठी अनेक प्रकारची खुंटाळी मिळतात व पादत्राणे ठेवण्यासाठीही उघडी कपाटे मिळतात. अशी उपकरणे वापरली म्हणजे घरातील बहुतेक सर्व कपडे व पादत्राणे ठेवण्याला थोडीशी जागाही पुरते. 

शिंके, उखळ, मुसळ, जाते, काठ्या, दांड्या, चाळण्या, कात्र्या, सुपे, चकलीचा सोऱ्या, मोदकपात्र, इडलीपात्र, केकपात्र, बिस्कीटपात्र इ. अनेक साहाय्यक उपकरणेही स्वयंपाकघरात जरुरीप्रमाणे वापरतात. 

सुपारी कातरण्याचा अडकित्ता हेही एक नेहमी लागणारे उपकरण आहे. त्याच प्रकारचे मोठे अडकित्ते कच्च्या आंब्याच्या फोडी करण्यासाठी वापरले जातात. आवळे खोचण्यासाठी पाच खिळ्यांचा खोचक मिळतो. मोसंब्यातील रस काढण्यासाठी काचेचे अथवा प्लॅस्टिकचे फिरकी दाबयंत्र मिळते. फळांचे रस काढण्यासाठीही विविध प्रकारची उपकरणे वापरतात.

  

शीतकपाट : (रेफ्रिजरेटर). दूध, फळे, भाजीपाला, मासे, अंडी असे लवकर नाश पावणारे पदार्थ थंड जागेत ठेवले, तर ३-४ दिवस चांगल्या स्थितीत राहतात. याकरिता पोलादी पत्र्याचे शीतकपाट वापरतात. ही कपाटे लहान, मध्यम व मोठी अशा निरनिराळ्या आकारांची मिळतात. या कपाटातील मध्यभागाचे तापमान ५ ते ७ से. ठेवता येते. हे तापमान एका तापस्थापकाच्या साहाय्याने कायम राखले जाते. आइसक्रीम किंवा बर्फ तयार करण्यासाठी शीतकपाटात एक स्वतंत्र कप्पा ठेवतात. त्याचे तापमान -१५ ते -१८से. ठेवतात. अशा कपाटांच्या बाहेरील बाजूवर काचित रोगणाचे आवरण असते व आतील सर्व भाग तापरोधक पदार्थांच्या अस्तराने मढविलेला असतो. हे कपाट शक्य तितके सुंदर दिसावे अशा रीतीने बनविलेले असते, त्यामुळे ते घरातील शोभेच्या वस्तूचेही काम करते. अशा कपाटात हवा थंड करण्यासाठी संपीडक (वायूचे संकोचन करून दाब वाढविण्याची) पद्धती किंवा उष्णता शोषक पद्धती वापरता येते. संपीडक पद्धतीत विद्युत् चलित्रावर चालणाऱ्या एका लहानशा संपीडकाने शीतक जातीचा वायू (उदा., फ्रिऑन, अमोनिया, कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय-ऑक्साइड, मिथिल क्लोराइड) संपीडित केला जातो व तो दाबाखाली असतानाच द्रव अवस्थेत जातो. हा द्रवरूप वायू नंतर दुसऱ्या भागात जाऊन प्रसरण पावतो व त्या वेळी कपाटातील उष्णता शोषून घेतो, त्यामुळे कपाटातील तापमान उतरते. प्रसरण पावलेला वायू पुन्हा संपीडकात नेतात व हे आवर्तन सारखे चालू राहते. संपीडक जातीच्या शीतकपाटातील विद्युत् चलित्र व संपीडक भरपूर वंगण देऊन एका बंदिस्त जागेत ठेवतात. त्यामुळे त्यांच्या कामावर वारंवार लक्ष

आ. ३१. शीतकपाटांचे दोन प्रकार

द्यावे लागत नाही. संपीडक काम करीत असला म्हणजे त्याचा थोडा आवाज ऐकू येतो.

  

उष्णता शोषक पद्धतीच्या शीतकपाटात शीतक वायूच्या मंडलातील एक विभाग तापवावा लागतो, तापविण्याचे काम विद्युत् शक्तीने किंवा एखाद्या दिव्याच्या ज्योतीनेही करता येते. या जातीच्या कपाटातून कसलाही आवाज ऐकू येत नाही.

  

विद्युत् चलित्राने चालणाऱ्या संपीडक जातीच्या शीतकपाटासाठी दररोज साधारणतः एक किवॉ. ता. (किलोवॉट तास) विद्युत् ऊर्जा खर्च होते. विजेवर चालणाऱ्या शोषक जातीच्या कपाटासाठी दोन किवॉ. ता. पर्यंत विद्युत् ऊर्जा खर्च होतो. दिव्याच्या ज्योतीवर चालणाऱ्या कपाटासाठी दररोज साधारणतः एक लिटर रॉकेल वापरावे लागते. शीतकपाटांचे दोन प्रकार आ. ३१ मध्ये दाखविले आहेत. दूध, दही, ताक असे पदार्थ ठेवण्यासाठी बारीक तारेची जाळी बसविलेली साधी कपाटे वापरतात. यांमध्ये हवा चांगली खेळते व दुधाचे पदार्थ नासत नाहीत [→ प्रशीतन]. 


वातानुकूलक : (एअर कंडिशनर). उन्हाळ्याच्या दिवसांत घरातील खोलीचे वातावरण थंड ठेवण्यासाठी वातानुकूलक उपकरण मिळते. हे उपकरण लहान कपाटासारखे बनविलेले असते आणि ते एखाद्या खिडकीत बसवितात किंवा भिंतीवर टांगून ठेवतात. हे उपकरण विद्युत् शक्तीवर चालते. त्यामध्ये बाहेरून आत येणारी हवा थंड करण्यासाठी शीतकपाटाप्रमाणेच संपीडित जातीचा शीतक भाग असतो व हवेला चालना देण्यासाठी एक पंखाही असतो [→ वातानुकूलन]. 

बश्या धुण्याचे यंत्र : (डिश वॉशर). विद्युत शक्तीने काम करणारे हे उपकरण साधारणतः कपाटासारखेच दिसते. त्याचे दोन प्रकार आ. ३२ मध्ये दाखविले आहेत. अशा यंत्रात साधारणतः दोन कप्पे असतात. खालच्या कप्प्यात ताटे व बश्या आणि वरच्या कप्प्यात पेले, भांडी, पातेली यांसारख्या वस्तू उलट्या करून ठेवतात. चांदीच्या भांड्यांसाठी खालच्या कप्प्यात एक स्वतंत्र जागा असते. धुवावयाची खरकटी भांडी प्रथम एका पिपात भिजत घालून ठेवतात आणि ती काही वेळाने या उपकरणामध्ये भरतात. या उपकरणामध्ये वापरीत असलेल्या पाण्यामध्ये साबण वापरीत नाहीत. त्याऐवजी इलेक्ट्रोसॉल किंवा कॅलॅगोनाइट यासारखी प्रक्षालक (मळ सोडविणारी) द्रव्ये वापरतात. अशी द्रव्ये ठेवण्यासाठी या यंत्रात एक

आ. ३२. बश्या धुण्याच्या यंत्राचे दोन प्रकार

स्वतंत्र जागा असते. या द्रव्यामुळे करवडलेली भांडी लवकर स्वच्छ होतात. गंजाचे डाग घालविण्यासाठी कॅलॅगोनाइट व ऑक्झलिक अम्ल आळीपाळीने वापरतात. चहाच्या डागांसाठी बेकिंग सोडा किंवा क्लोरॉक्स वापरतात. भांडी आत ठेवल्यावर उपकरणाचे दार बंद केल्याशिवाय उपकरणाचे काम सुरू होत नाही. या उपकरणामध्ये एक समकालिक (विद्युत् दाब पुरविणाऱ्या यंत्राला जुळेल अशा कायम वेगाने फिरणारे) चलित्र बसविलेले असते. हे चलित्र कमदंड (झडपा उचलण्याचे भाग बसविलेला दंड) आणि विद्युत् परिनलिका (लोखंडाचा दांडा सरकविणारे विद्युत् प्रवाह नेणारे तारेचे लांबट वेटोळे) यांच्या मदतीने ठरावीक वेळ जाऊ देऊन क्रमाक्रमाने पाण्याची प्रवेश झडप, घाण पाणी बाहेर नेण्याची झडप व तापक घटक यांना चालू व बंद करते. या उपकरणाचे काम सुरू झाल्यावर प्रथम दोन्ही खणांतल्या सर्व वस्तूंवर प्रक्षालकमिश्रित ७० से. तापमान असलेल्या गरम पाण्याचा सणसणीत दाबाचा तीव्र फवारा मारला जातो. नंतर गरम पाण्याने सर्व वस्तू विसळल्या जातात व नंतर सर्व पाणी व घाण बाहेर ढकलली जाते. नंतर पुन्हा एकदा सर्व भांडी खळखळून विसळली जातात व तापक घटकाच्या मदतीने अर्ध्या तासाच्या आत सुकविली जातात. हे सर्व काम संपण्यास सु. ४५ मिनिटे लागतात. 

निर्वात जातीचा कचरा चोषक : (व्हॅक्यूम क्लिनर). घरातील केरकचरा काढण्यासाठी केरसुणीचे काम करणारे विद्युत् शक्तीवर चालणारे हे उपकरण आहे. याचे अनेक प्रकार मिळतात. काही प्रकारांत फक्त 

आ. ३३. केर-कचरा काढण्याचे निर्वात यंत्र : (१) विद्युत् शक्ती, (२) केर ओढून घेणारे तोंड, (३) हस्तक.

बाहेरची हवा ओढून घेण्याची सोय असते व काही प्रकारांत ब्रश फिरवून हवा ओढून घेण्याची सोय असते. केर ओढण्याचे तोंड एका लवचीक नळीच्या टोकावर बसविलेले असते व त्या नळीचे दुसरे टोक हवा ओढण्याच्या निर्वात पंपाला जोडलेले असते. पंप चालू करून हस्तक हातात धरून नळीचे तोंड जमिनीवरून सरकवत नेले म्हणजे जमिनीवरचा केर नळीच्या आत जातो व एका पिशवीत साठतो. नळीच्या टोकावर निरनिराळ्या आकाराची रबरी तोंडे बसविता येतात. त्यामुळे कोठल्याही जागेवरचा केर त्या जागेला प्रत्यक्ष स्पर्श न करताही ओढून घेता येतो. मोठी सतरंजी वा गालिचा स्वच्छ करण्यासाठी हे उपकरण विशेष उपयोगी पडते. अशा उपकरणाचा एक प्रकार आ. ३३ मध्ये दाखविला आहे.

  

कचरा विसर्जक : घरातील मोऱ्यांतून व बश्या धुणाऱ्या यंत्रातून निघणारी घाण नळामधून नेऊन दूर अंतरावर सोडावयाची असली, तर विद्युत् शक्तीने काम करणारे हे उपकरण वापरतात. या उपकरणात सांडपाण्यातील घाण दोन चाकांमध्ये चांगली भरडली जाते व पंपाच्या मदतीने ती नळातून पाहिजे तितक्या दूर अंतरावर नेऊन सोडली जाते. या उपकरणात घाण पाणी सोडण्यापूर्वी त्यातील दगड, काचेचे किंवा चिनी मातीचे तुकडे असे कठीण पदार्थ चाळून बाहेर टाकावे लागतात. याकरिता एक लहानसा हौद बांधतात आणि त्यावर लोखंडी चाळण जाळी बसवितात. 


धुलाई यंत्र : कपडे धुणे, पिळणे, वाळविणे व त्यावर इस्त्री करणे ही सर्व कामे विद्युत् शक्तीने चालणाऱ्या 

आ. ३४. धुलाई यंत्र : (१) ढवळी, (२) विद्युत् चलित्र, (३) कपडे पिळणारा व सुकविणारा भाग

उपकरणांच्या मदतीने करवून घेता येतात. या प्रकारची सर्व उपकरणे एकाच खोलीत जवळजवळ बसवितात. साबणाचे पाणी आणि प्रक्षालकाचे मिश्रण भरपूर दाबाने कपड्यातून आरपार नेले, तर कपड्यातील मळ सुटा होतो. धुलाई यंत्रात याच तत्त्वावर काम केले जाते. या उपकरणातील हौदात घातलेले कपडे उलथे पालथे करण्यासाठी व साबणाचे पाणी घुसळण्यासाठी एक यांत्रिक ढवळी असते. स्वच्छ पाणी आत घेण्याकरिता व घाण पाणी बाहेर सोडण्याकरिता एक पंप असतो. साध्या प्रकारच्या यंत्रात विविध कामे क्रमाक्रमाने करवून घेण्यासाठी एक स्वतंत्र माणूस लागतो. पण स्वयंचलित प्रकारच्या धुलाई यंत्रात कालनियंत्रक व क्रियानियंत्रक साधनांच्या मदतीने ही सारी कामे आपोआप केली जातात. या यंत्रात लागणारी यांत्रिक शक्ती पुरविण्यासाठी खालच्या कप्प्यात एक विद्युत् चलित्र असते. यंत्राच्या मध्यभागात ढवळी बसविलेला पाण्याचा हौद असतो आणि त्यावर घट्ट बसणारे झाकण असते. सर्वांत वरच्या भागात कपडे पिळणारे आणि सुकविणारे साहित्य असते. या उपकरणातील ढवळीची पाती धातूची किंवा जाड प्लॅस्टिकची बनवितात. ढवळीमुळे पाणी ढवळले जाते व कपडे उलटसुलट फिरविले जातात. हे उपकरण चालविण्यासाठी अर्ध्या अश्वशक्तीचे चलित्र लागते. या चलित्राचा वेग १,४४० फेरे/मि. असला तर, ढवळीचा वेग ६० आवर्तने/ मि. असतो. आत येणारे पाणी ०·५ किग्रॅ./सेंमी. इतक्या दाबाचे असते आणि दर मिनिटाला सु. ३० लि. गरम पाणी वापरले जाते. गरम पाण्याचे तापमान ७० से. ठेवतात. त्याकरिता एक स्वतंत्र जलतापक बंब बसवावा लागतो. धुलाई यंत्राची साधारण रचना आ. ३४ मध्ये दाखविली आहे. 

कपडे सुकविण्याचे यंत्र : धुलाई यंत्रातून धुऊन आणि पिळून निघालेले कपडे लवकर वाळविण्यासाठी स्वतंत्र प्रकारची उपकरणे आहेत. अशी उपकरणे कपाटासारखी दिसतात. यामध्ये ४,००० वॉट शक्तीचा तापक घटक बसविलेला असतो. ओले कपडे जाळीच्या आडव्या पिपामध्ये भरतात व ते पिप चलित्राने आडव्या आसाभोवती फिरवीत ठेवतात. खालच्या बाजूने बाहेरची कोरडी हवा आत येते व तापते आणि कपड्यांना वाळवून वरच्या बाजूने बाहेर जाते. कपड्यातील जंतू मारण्यासाठी ओझोन उत्पन्न करणारा एक विद्युत् घट बसविलेला असतो. 

आ. ३५. इस्त्री करण्याचे साहित्य : (अ) सपाट पृष्ठाची हात इस्त्री, (आ) लाटण पद्धतीचे इस्त्री यंत्र, (इ) इस्त्री करण्याचे घडीचे टेबल.

विजेची इस्त्री : कपड्याला इस्त्री करण्यासाठी सपाट पृष्ठाचे व हाताने उचलून सरकविण्याचे आणि लाटणी पद्धतीने व टेबलावर कायम बसविण्याचे अशी दोन प्रकारची उपकरणे मिळतात. सपाट पृष्ठाच्या इस्त्रीमध्ये तिच्या तळात मावेल एवढ्या आकाराच्या अभ्रकाच्या तुकड्याभोवती निकेल-क्रोम तारेचे वेढे देऊन बनविलेला तापक घटक असतो. इस्त्रीच्या शक्तीनुसार एक किंवा अनेक तापक घटक एकावर एक ठेवता येतात. या इस्त्रीमध्ये तापमान नियंत्रक व स्वयंचलित मंडल खंडक (विद्युत् प्रवाह खंडित करणारा) बसविलेले असतात. नियंत्रक स्विच निरनिराळ्या स्थानांवर ठेवून इस्त्री करावयाच्या कपड्याला योग्य होईल असे उष्णतामान मिळू शकते. इस्त्रीचे तापमान जास्त झाले तर विद्युत् मंडल आपोआप खंडित होऊन विद्युत् पुरवठा अल्पकाल स्थगित होतो. अशा इस्त्र्यांचे वजन एक ते पाच किग्रॅ.पर्यंत असते आणि त्यांना १०० ते ५०० वॉट विद्युत्‌ शक्ती लागते. काही इस्त्र्यांमध्ये वरच्या बाजूला थोडे थंड पाणी भरून ठेवण्याची जागा असते. ती पाण्याने भरली, तर तेथील पाणी हळूहळू गळून खालच्या पृष्ठावरील खाचेत पडते. इस्त्री करण्याचा कपडा ओलसर करण्यासाठी हे पाणी उपयोगी पडते. या प्रकारची इस्त्री आ. ३५ (अ) मध्ये दाखविली आहे. आ. ३५ (आ) मध्ये लाटण पद्धतीचे इस्त्री यंत्र दाखविले आहे. या यंत्रातील लाटणे एका चलित्राने हळूहळू फिरविले जाते. त्यावर इस्त्री करावयाचा सपाट कपडा ठेवतात व बाहेरच्या बाजूने तापक घटक बसविलेली टोपी त्यावर दाबून धरतात. हे साधन चादरीसारख्या साध्या कपड्यावर इस्त्री करण्यासाठी सोईचे असते. इस्त्री करण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या घडीच्या टेबलाचा एक प्रकार आ. ३५ (इ) मध्ये दाखविला आहे. 

उष्णता प्रारक : तरंगरूपातील उष्णता (प्रारण) दूर पाठविणारे हे उपकरण भिंतीमध्ये ठेवलेल्या मोठ्या कोनाड्यात बसवितात. पूर्वी थंड प्रदेशातील घरे गरम ठेवण्यासाठी कोनाडी चुलीतून कोक किंवा दगडी कोळसा जाळीत असत, त्यामुळे चुलीच्या वरच्या बाजूस धुराड्याची सोय करावी लागे. आता विद्युत शक्तीवर तापणारे प्रारक मिळू लागल्याने त्यांचा वापर वाढत आहे. त्यांच्या उपयोगाने धुराचा त्रास होत नाही व धुराडे लागत नाही. या उपकरणातील तापक घटक चिनी माती किंवा इतर ऊष्मसह (उष्णता सहन करू शकणाऱ्या) वस्तूच्या फलकावर गुंडाळलेले असतात. हा फलक उपकरणाच्या तळाशी बसविलेला असतो व त्याच्यावर लाल काचेचे दिवे लावतात आणि त्यांच्यावर पारदर्शक वस्तूचे मोठे तुकडे ठेवतात. हे उपकरण चालू केले म्हणजे कोनाड्यामध्ये कोकचा विस्तव निर्माण झाला आहे असा भास होतो आणि त्यामधून पाहिजे तितकी उष्णताही मिळते. या उपकरणामुळे दालनास जुन्या पद्धतीचा भारदस्तपणा प्राप्त होतो [→ तापन पद्धति, व साधने]. 

विजेचा पंखा : उन्हाळ्यात हवा खेळती ठेवण्यासाठी छतावर लावण्याचे, जमिनीवर वा टेबलावर ठेवण्याचे विविध प्रकारचे पंखे वापरतात [→ पंखा]. 

उष्ण हवा पुरविणारा पंखा : हे उपकरण सहज हातात धरून पाहिजे तसे फिरविता येईल इतके हलके असते. याच्या मुठीजवळ हवेचा झोत पुरविणारा अपमध्य (फिरणाऱ्या चाकाच्या मध्याजवळ आलेल्या द्रव्याला परिघाकडे ढकलणाऱ्या) जातीचा पंखा असतो व तो विद्युत् चलित्राने फिरविला जातो. पंख्यातून बाहेर जाणारी हवा उपकरणाच्या नळीतून पुढे जाते. या नळीच्या आतल्या बाजूने विद्युत् तापक घटक बसविलेले असतात आणि त्यांच्या उष्णतेने बाहेर जाणारी हवा तापते ओल्या वस्तू लवकर सुकविण्यासाठी या उपकरणाचा उपयोग करतात. स्त्रियांचे ओले केस वाळविण्यासाठी हे उपकरण मुख्यतः बनविलेले आहे. असेच काम करणारे पण वेगळ्या रचनेचे आणखी एक उपकरण मिळते. हे उपकरण उभ्या खांबावर एका घुमटामध्ये बसविलेले असते. खुर्चीवर बसून हा घुमट डोक्यावर आणून विद्युत् प्रवाह चालू केला म्हणजे डोक्यावर गरम हवेचा झोत येऊ लागतो व ओले केस लवकर वाळतात. केस कुरळे करणारे विद्युत् शक्तीवर चालणारे एक उपकरणही उपलब्ध आहे. 


शिवणयंत्र : घरगुती शिवणकाम करण्यासाठी हाताने किंवा पायाने चालविण्याची शिवणयंत्रे वापरतात. अशा शिवणयंत्राला विद्युत् चलित्र जोडल्यास बरेच श्रम वाचतात व यंत्रावर काम करणेही सोपे जाते [→ शिवणयंत्र].

  

विजेची साधी घंटा : हे उपकरण जोडलेल्या विद्युत् मंडलात विजेचा प्रवाह सुरू केला म्हणजे विद्युत् चुंबकाच्या धरसोडीने घंटा वाजू लागते. ही घंटा मुख्यतः बाहेरील दाराशी आलेल्या माणसाने घरातील माणसाला आल्याची वर्दी देण्यासाठी वा दूरवर असलेल्या माणसाला बोलाविण्यासाठी वापरतात. घंटेच्या विद्युत् मंडलात विद्युत् प्रवाह सुरू करण्यासाठी एखाद्या सोईस्कर जागी बसविलेला स्विच दाबून ठेवावा लागतो. एकच घंटा अनेक स्थानांवर बसविलेले स्विच दाबून वाजविता येते. घंटेजवळ बसलेल्या माणसाला कोणत्या ठिकाणचा स्विच दाबला गेला आहे हे समजण्यासाठी घंटेजवळ एक स्विच-स्थान दर्शक पेटी असते. या पेटीतील खिडक्यांमध्ये निरनिराळे अंक लिहिलेले असतात. ज्या स्विचामधून प्रवाह सुरू झाला असेल त्याचा अंक खिडकीत स्पष्ट दिसू लागतो.

  

विजेची चोरसूचक घंटा : रात्रीच्या वेळी घरामध्ये चोराचा प्रवेश होत असताना दार किंवा खिडकी उघडली जाण्याने वा प्रवेशमार्गातून आडवे जाणारे अदृश्य किरण खंडित होण्याने एक अभिचालित्र (एका भागातून जाणाऱ्या लहान विद्युत् प्रवाहातील बदलाने दुसऱ्या भागातून जाणाऱ्या मोठ्या विद्युत् प्रवाहाचे नियंत्रण करण्याचे साधन) कार्यान्वित केले जाते व त्याच्या मदतीने एका स्वतंत्र घंटेचे मंडल कार्यान्वित होते आणि घंटा वाजू लागते. या घंटामंडलाला विद्युत् घटमालेतून शक्तीचा पुरवठा केलेला असतो. त्यामुळे बाहेरून येणारा विद्युत पुरवठा तोडला तरी या उपकरणाचे काम चालूच राहते [→ धोकासूचक, विद्युत्]. 

संदर्भ : Barnes, A. Newnes Home Management, 2 Vols., London, 1960. 

ताम्हणकर, द. वि. ओक, वा. रा.