उदबत्ती : पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये धूप, ऊद, चंदन, कापूर इ. पदार्थ जाळण्याचा प्रघात फार पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मांत चालू आहे. पूर्वी उदबत्ती बनविण्यासाठी ऊद, अगरू इ. पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती ही नावे पडली. चिनी देवतांसमोर जाळण्यात येणारी ‘जॉसस्टिक’ उदबत्तीसारखीच असते.

ऊद, धूप, इ. जाळण्यासाठी खास पात्रे वापरावी लागतात. पण उदबत्ती जाळण्यासाठी तशी खास पात्रे लागत नाहीत. ती संथपणे व बराच काळ जळते व सुगंध पसरविते. हल्ली विविध प्रकारच्या उदबत्त्यांचा उपयोग बऱ्याच वेळा घरे, इमारती यांमधील वातावरण सुगंधित करण्यासाठी तसेच डास, माशा, चिलटे इ. दूर करण्यासाठी केला जातो.

उदबत्तीसाठी सुवासिक लाकडे, मुळ्या, साली, अत्तरे, रेझिने, बालसम इ. पदार्थ लागतात. सामान्यतः अगरू, चंदन यांचे लाकूड कोशी, कापूर, काचरी, वाळा इत्यादींची मुळे कॅसिया, दालचिनी यांच्या साली पाच, हिमालयीन सिल्व्हर फर, मरवा यांची पाने गुलाब, चाफा, लवंग यांची फुले वेलची, जायफळ मिऱ्ह (बोळ), ओलिबॅनम, ऊद, धूप, हळमड्डी व रेझिने, कोळसा, रंग, सॉल्ट पीटर, वुड गम, मैदाकी लकडी इ. पदार्थांचा उपयोग उदबत्तीनिर्मितीसाठी करण्यात येतो.

उदबत्त्या सामान्यतः १०-४० सेंमी. लांब व ०.१५-२.५ सेंमी. व्यासाच्या बनविल्या जातात. प्रथम शुद्ध रेझीन, अत्तरे व चिकट पदार्थ, लाकडांची पूड व इतर पदार्थ आणि पाणी एकत्र करून खलतात व त्यांचा लगदा तयार करतात. काही वेळा यामध्ये रंग, डिंक इ. मिसळतात व मिश्रण परत घोटतात. बहुतेक सर्व पदार्थ पुडीच्या स्वरूपात वापरले जातात. या पुडी हातयंत्रांनी करतात. काही ठिकाणी त्यासाठी चक्क्या वापरतात. अशा रीतीने तयार झालेला घट्ट लगदा बांबूच्या ठराविक लांबीच्या व जाडीच्या काड्यांभोवती लावतात व वळतात. केव्हा केव्हा वळताना रंग, चंदन व संथ जळण्यास मदत करणारे काही पदार्थ मिसळतात. अशा तयार झालेल्या उदबत्त्या वाळवितात व त्यांचे लहान लहान गठ्ठे करतात. हे गठ्ठे कागदाच्या किंवा पत्र्याच्या वेष्टनांत भरून विक्रीसाठी बाजारात पाठवतात.

उदबत्त्या ह्या निरनिराळ्या रंगांच्या व वासांच्या असतात. उत्तम सुगंधी उदबत्तीत चंदन, अंबर, कस्तुरी, शुद्ध रेझिने इ. सुगंधी द्रव्ये जास्त प्रमाणात असतात. उदबत्ती ही १५ मिनिटापासून ते ८ तास इतका दीर्घ काळ जळणाऱ्या लांबीच्या बनवितात. तसेच चिकट लगदा, पूड, काडी, गोळ्या इ. स्वरूपांतही त्या मिळतात.

उदबत्तीनिर्मिती हा एक कुटिर उद्योग असून, प्रामुख्याने तो कर्नाटक, तमिळनाडू व महाराष्ट्र या राज्यांत आढळतो. उदबत्त्या निर्माण करणारे दोनशेहून जास्त कारखाने कर्नाटक राज्यातील बंगलोर येथे आहेत. या धंद्यात मुख्यतः स्त्रियाच काम करतात. हलक्या प्रकारच्या उदबत्त्यांचे उत्पादन सु. ७५% आहे.

भारत हा उदबत्तीचा सर्वांत मोठा उत्पादक असून जास्तीत जास्त वापर करणारा व निर्यात करणारा देश आहे. भारतात उदबत्तीचे वार्षिक उत्पादन सु. ६ कोटी रु. चे आहे. भारताशिवाय हाँगकाँग, सिंगापूर, पाकिस्तान, थायलंड, चीन, जपान, अर्जेंटिना, अमेरिका इ. देशांत उदबत्तीची निर्मिती होते. जपानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या उदबत्त्या वजनाने हलक्या असून त्यांमध्ये दोरा वापरलेला असतो. भारतातून निर्यात होणाऱ्या उदबत्त्यांपैकी ७०% कर्नाटक राज्यात व ३०% महाराष्ट्र, तमिळनाडू व इतर राज्यांत तयार झालेल्या असतात. मलेशिया, सौदी अरेबिया, सूदान, इंग्लंड, अमेरिका इ. ९० देशांना भारतातून उदबत्त्या निर्यात होतात. १९६५-६६ मध्ये ३१.०७ लाख रु. च्या, १९६६-६७ मध्ये ४६.५८ लाख रु. च्या व १९६७-६८ मध्ये ५९.४१ लाख रु. च्या उदबत्त्यांची निर्यात झाली.

संदर्भ : C. S. I. R. The Wealth of India- Industrial Products, Vol. l., New Delhi, 1948.

मिठारी, भू. चिं.